विजयदुर्ग

इतक्यातच एक-दोनदा वर्तमानपत्रातून वाचले कि कोकणातील एक सागरी किल्ला ज्याचे नाव विजयदुर्ग आहे त्याच्या बुरुजाच्या भिंती कोसळ्या आहेत. विजयदुर्गची तटबंदी अभेद्य मानली जाते, इतकी ती मजबूत आहे. मी खरेतर या वर्षाच्या सुरुवातीलाच विजयदुर्ग आणि जवळच्या परिसराची भटकंती करून आलो होतो. सगळे काही आलबेल होते. हि बातमी वाचून मन थोडेसे खट्टू झाले, आणि वाटले कि आपल्या त्या भटकंतीविषयी लिहावे. तसेच काही दिवसातच(ऑगस्ट १८) जागतिक हेलिअम दिन(World Helium Day) आहे. तेही कारण हा ब्लॉग लिहायचे.

आधी हेलिअम काय भानगड आहे ते सांगतो. हेलिअम हा ऑक्सिजन नायट्रोजन सारखे वायूरूप मुलतत्व आहे. आणि गमतीची गोष्ट अशी कि १८ ऑगस्ट १८९८ रोजी सूर्याच्या वातावरणात या वायूचा शोध  एका लॉकियर नावाच्या ब्रिटीश शास्त्रज्ञाला या किल्ल्यावर खग्रास सूर्यग्रहण पाहताना लागला असे मानले जाते. किल्ल्यावर  त्या शास्त्रज्ञाच्या नवे एक कट्टा आहे, त्यावर माहितीचा फलक देखील आहे. २००९ पासून किल्ल्यावर जागतिक हेलिअम दिन(World Helium Day) साजरा करण्यात येऊ लागला. विजयदुर्गावर या निमित्त दरवर्षी कार्यक्रम होतात. या वर्षी, कोरोना संसर्गामुळे माहिती नाही काय करणार आहेत. मी थोडा शोध घेतल्यावर समजले कि हेलियम शोधाची सगळी गोष्ट तशी गुंतागुंतीची आहे. तुम्ही हा  माधव गोखले यांनी लिहिलेल्या लेखाचा दुवा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. असो.

मी फेब्रुवारी २०२० मध्ये(म्हणजे कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याच्या काही दिवसच आधी!) कोल्हापुरास जाणे झाले. शनिवार रविवार हाताशी होता आणि विजयदुर्ग, देवगड, कुणकेश्वर असा पर्यटनाचा बेत ठरला. कोल्हापूरहून सकाळी सकाळीच निघालो. अणुस्करा घाट पार करत राजापूरला पोहोचलो. राजापूर जवळील उन्हाळे गावातील गरम पाण्याचे झरे पाहून देवगड बंदर आणि नंतर समुद्रकिनारी पोहोचलो. तेथे थोडावेळ थांबून, जवळील टेकडीवरील पवनउर्जा प्रकल्प पाहायला गेलो, वरून दिसत असलेलेल समुद्राचे आणि आसपासचे अप्रतिम दृश्य डोळ्यात जवळच असलेल्या प्रसिद्ध अश्या कुणकेश्वर या समुद्रकिनारी असलेल्या शिवमंदिराला भेट दिली. तेथे असलेल्या समुद्रकिनारी संध्याकाळ घालवून रात्र त्याच गावात मुक्काम केला(शिवसागर होम-स्टे). देवगड समुद्रकिनाऱ्यावरून दिसणाऱ्या देवगड किल्ल्याला टांग मारली. तसेही त्या सागर किनारी असलेल्या दुर्गावर विशेष काही पाहण्यासारखे नाही असे ऐकून होतो. देवगड बंदराला संरक्षण देण्यासाठी हा दुर्ग बांधला गेला होता. देवगड म्हटले आठवते ते देवगडचे जगप्रसिद्ध मोठाले हापूस आंबे. शिवसागर होम-स्टेच्या मालकांशी रात्री बोलताना देवगड हापूस आंब्याचा पिकाबद्दल, एकूणच त्या व्यवसायाबद्दल मनोरंजक माहिती मिळाली.

देवगड पवनउर्जा प्रकल्प

देवगड पवनउर्जा प्रकल्प

थोडेसे कुणकेश्वर मंदिराबद्दल. हे प्राचीन शिवमंदिर कोकण काशी आहे असे म्हणतात. पांढऱ्या वाळूच्या समुद्रकिनारी उंचवट्या असेलेले हे मंदिर रम्य दिसते. आम्ही तेथे गेलो तेव्हा दिवस मवाळू लागला होता. समुद्रात लाटांशी खेळताना मंदिर खुणावत होते. महाशिवरात्रीचा सण काही दिवसांवर आला होता, त्यामुळे मंदिराची रंगरंगोटीचे काम चालू होते. हा सर्व भाग अतिशय निसर्गरम्य आहे. मला आठवते त्याप्रमाणे श्वास या मराठी चित्रपटात हे मंदिर आणि हा परिसर मी पहिला होता. सगळीकडे जांभ्या दगड, त्यात कोरलेल्या पायऱ्या, पटांगण, रस्ते दिसतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी विजयदुर्गाकडे कूच केले. सर्वात आधी विजयदुर्गला फेरा मारणाऱ्या बोटीतून फिरून आलो, दुर्गाचे बाहेरून दर्शन घेतले. त्याला जिब्राल्टर ऑफ ईस्ट(Gibraltar of East) का म्हणतात हे लक्षात येते. आणि हा तसा बराच जुना किल्ला आहे. भोजराजा शिलाहार याच्या काळात बाराव्या शतकात बांधला गेला असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात मुळ छोट्याश्या किल्ल्याचे रुपांतर तिहेरी तटबंदी बांधून एक अभेद्य किल्ल्यात केले. पुढे मराठ्यांच्या आरमारात ह्या किल्ल्याला अजूनही महत्व आले. वाघोटन नदीच्या मुखाजवळ हा किल्ला आहे. बोटीतून फिरून आल्यावर आम्ही आधी पोटपूजा केली आणि स्थानिक वाटाड्या किल्ला पाहायला मार्गदर्शक म्हणून घेतला.

वाटाड्यासोबत किल्ला पाहायला चांगले दोन तास लागले. आत मध्ये अनेक वस्तू अजून बऱ्यापैकी शाबूत आहेत. तटबंदीवरून देखील फिरता आले. आणि  त्या तटबंदीवर २७ मजबूत बुरुज आहेत. किल्ल्याच्या प्रवेशदारातून आत गेल्यावर पुढे पोलीस चौकी आहे. कुठल्यातरी सदरेची चौकी झाली असणार. सरकारी विश्रामगृह आहे. पाण्याचा हौद, घोड्यांच्या पागा, दारुगोळा, धनधान्य साठवणुकीची कोठारे, अजूनही शाबूत असलेल्या तोफा या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहे. वाटाड्याने आम्हाला एके ठिकाणी, बहुधा एका बुरुजाच्या आतल्या भागातून खाली समुद्र किनारी भल्या थोरल्या पायऱ्या उतरायला लावून नेले. गलबत, बोटी त्या ठिकाणी लागत असणार. किल्ल्यावर बरीच झाडीझुडपी आहेत. बोरीची झाडे देखील आहेत. आम्ही गेलो तेव्हा ती बोरांनी लगडलेली होती. आणि आम्ही अधाश्यासारखे त्या आंबटगोड बोरांवर येथेच्छ ताव मारला!

विजयदुर्गबद्दल आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे किल्ल्याजवळ असलेली खाडीच्या पाण्यात न दिसणारी        “मानवनिर्मित भिंत” ज्या मुळे किल्ल्यावर हल्ला करणारी गलबते, जहाजे त्यावर आदळून बुडत असत. वाटाड्याने त्या भिंतीबद्दल अतिशय सुरसपणे आम्हाला सांगितले आणि ती भिंत त्याकाळी कशी बांधली गेली असेल, दुर्गबांधणीचे आपले तंत्र कसे पुढारलेले होते ह्याची कथा सांगितली. माझा मित्र आणि पुरातत्वशास्त्रज्ञ सचिन जोशी याने केलेल्या संशोधनांती असे लक्षात आणून दिले कि हि मानवनिर्मित भिंत नाही तर एक पाण्याखाली निसर्गनिर्मित खडकाळ उंचवटे आहेत. त्याचा संशोधनपर लेख या दुव्यावर पाहता येईल.

किल्ला पाहून आम्ही परतीच्या म्हणजे पुण्याच्या वाटेला लागलो, पण तितक्यात लक्षात आले कि जवळच एक जुने मंदिर आहे, रामेश्वर मंदिर असे त्याचे नाव. मुख्य रस्त्यावर आत मध्ये जांभ्या दगड पसरलेल्या भागावर प्रवेशद्वार आहे. आत गेले कि दगडात खोदलेल्या १००-१५० पायऱ्या दिसतात आणि खाली आत मध्ये मंदिर दृष्टीस पडते. मंदिर कौलारू आहे, फरसबंदी दगडी बांधकाम, दगडी उंच अश्या दीपमाळा असलेले मंदिर छान आहे.

रामेश्वर मंदिर

रामेश्वर मंदिर

आम्ही दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून पुण्यास परत कोल्हापूर मार्गे निघालो.  मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदीकारण सुरु आहे. सगळीकडे लाल माती, रस्त्याचे काम, ठीकठिकाणी बाह्यवळणे या मुळे जीव थोडा हैराण झाला. पण  किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, आणि येथील खाद्य-संस्कृतीने नटलेल्या कोकणाच्या या भागात खरेतर सवडीने चार पाच दिवस काढून आले पाहिजे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s