सायकल

करोना काळात तीन एक महिने घरी बसून बसून कंटाळा आला होता म्हणून एके दिवशी सकाळी सकाळी सायकल काढून बाहेर गेलो. पुणे विद्यापीठाच्या जवळ जाऊन परत येण्याच्या बेतात होतो आणि तेवढ्यात एक रिक्षाने मला धडक दिली आणि मी जबरी जखमी झालो. उजवा खांदा, बरगड्या, हाताला मुकामार बसला आणि दोन-तीन महिने जायबंदी झालो. सायकलीची देखील बरेच नुकसान झाले आणि ती परत आणता आलीच नाही.

त्या सायकलीचे आणि माझे तसे जुने नाते होते. जवळ जवळ पंधरा वर्षे तिने साथ दिली. अपघातग्रस्त झाल्यावर मी असाच हात गळ्यात टाकून घरात काही न करता बसलो होतो. काही करता येईल अशी परिस्थिती नव्हतीच म्हणा! डोक्यात त्या सायकलीचे विचार घोळत होते. असे करत करत मन कधी बालपणाच्या दिवसात गेले हे कळलेच नाही. आयुष्यात सायकल पहिल्यांदा कधी माझ्या हातात आली ते आठवत होतो.

तसे मी सायकल बऱ्यापैकी मोठा झाल्यावर शिकायला लागले. मला वाटते मी तेरा-चौदा वर्षांचा असेन. आजकाल कसे अगदी तीन-चार वर्षांची मुले सायकल चालवताना दिसतात. तसे त्या वेळेस नव्हते. एक तर घरोघरी सायकली होत्याच असे नाही. ठिकठिकाणी सायकल मार्ट असत, जेथे सायकली भाड्याने मिळत असत. अगदी पंचवीस पैसे(म्हणजे चारआणे) प्रती तास अशी मिळत असे. आमच्याकडे देखील सायकल नव्हती. पण नुकतेच वडिलांनी चार पैसे हाताशी लागावे या करिता छोटासा असा तयार कपडे विकण्याचा व्यवसाय सुरु केला होता. त्या साठी त्यांनी एक जुनी सायकल शंभर-दीडशे रुपयाला विकत घेतली होती. दररोज संध्याकाळी आणि रविवारी ते कपडे घेऊन विकायला जात असत. इतर वेळेस ती घरी असे.

मग काय विचारता? आम्ही भावंडं, चाळीतील इतर मित्र अश्या सगळ्यांचे त्या सायकलीवर शिक्षण सुरु झाले. कधी अर्धे पेडल, तर कधी पूर्ण, तेही सिटावर न बसता, उभे राहून! धडपडत, टक्केटोणपे खात सायकल चालवायला शिकलो एकदाचा. झाले! इकडे तिकडे भटकणे सुरु झाले. शाळा जवळच होती, त्यामुळे शाळेत सायकलवर कधी गेलो नाही. सायकलीची चैन निसटली कि ती बसवणे, वंगण घालणे, अधून मधून धुणे, पुसणे, असे उद्योग देखील सुरु झाले. काही झाले तर, जसे हवा भरणे, पंक्चर दुरुस्त करणे, ब्रेक्स दुरुस्त करणे अशा कामासाठी सायकल मार्ट मध्ये जाणे येणे होऊ लागले. तेथील लोकांबरोबर उठ-बस होऊ लागली, त्यांचे काम उत्सुकतेने निरखणे होऊ लागले. त्या काळी सायकलवर आमच्या चाळीत दुधवाला गवळी येत असे, गाद्यांचे कापूस पिंजारून देणारा सायकलवर येत असे, पोस्टमन सायकल वर येत असे, वर्तमानपत्र घरोघरी फिरून देणारा पोऱ्या देखील सायकलवर, पुढे गठ्ठा अडकवून येत असे, महिन्याचा किराणा माल देखील सायकलवर दुकानातील कोणीतरी घेऊन येत असे. कात्रीला, चाकू, सुरी यांना धार करून देणारा सुद्धा सायकलवर येऊन धार करून देत असे. एकूणच सायकल यत्र तत्र सर्वत्र होती! माझेही तसेच होते.

एकदा तर चिंचवडहून पुण्याला एका मित्राला डबलसिट घेऊन शाळेसाठी कंपासबॉक्स आणायला पंधरा-वीस किलोमीटर गेलो होतो, आणि तेवढेच अंतर परत आलो. धमाल आली होती. माझे मित्र, खासकरून जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असत, ती मंडळी, बऱ्याचदा तेव्हा सायकलीवर टोळक्याने पुण्याजवळ असलेल्या किल्ल्यांवर सैर निघत असत, तेथे जात असत. पण मला कधी जाता आले नाही.

त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरु झाले. दररोज पुण्याला उपनगरीय रेल्वेने ये जा करू लागलो, सायकल मागे पडू लागली. नंतर काय झाले आठवत नाही, सायकल कायमची माझ्यापासून तुटूनच गेली. बरीच वर्षे मी कुठल्याच सायकलीला हात लावला नव्हता. नाही म्हणायला अमेरिकेत वास्तव्य असताना येसोमिती राष्ट्रीय उद्यानात(Yosemite National Park) गेलो असता सायकली भाड्याने घेऊन तेथील जंगलात सैर केली होती. तेवढाच तो एक अपवाद. त्यानंतर जवळ जवळ २०-२५ वर्षे गेल्यावर वयाच्या चाळीशीत व्यायामासाठी, सैर करण्यासाठी म्हणून घेतलेली, पंधरा वर्षांपूर्वी हि सायकल लाल-काळी अशी सायकल घेतली होती. गेल्या काही वर्षात ती तशी कुरुकुरुतच होती. आजूबाजूचे सुचवत देखील होते, बास झाली ती सायकल आता, नवीन चांगली, गियरवाली सायकल घ्या आता! पण मी काही तिचा नाद सोडत नव्हतो. मी आपला तीच जुनी पुराणी आवडती सायकल दामडत इकडे तिकडे जमेल तसे फिरवत असे. कधीतरी बाहेरही लांबवर सैर करायला घेऊन जात असे. परवा मार्च एप्रिल मे महिन्यात जेव्हा आपल्या येथे लॉकडाऊन होते तेव्हा देखील मी माझी सायकल घराच्या छतावर चालवत असे.

Riding bicycle on terrace during COVID-19 Lock-down 1.0 in India(in April 2020)

पण जून मधील त्या दिवशी तो दुर्दैवी अपघात झाला आणि मी माझ्या सायकलीला दुरावून बसलो. मी अर्थात थोडक्यात बचावलो, पण सायकल आता कुठे असेल कोण जाणे? कशी असेल तेही माहित नाही. पूर्वी घराच्या पार्किंग मध्ये ती कायम दिसत असे, आता ती जागा मोकळी, सुनी आहे. जवळचा सायकलवाल्याने देखील परवा विचारले, बरेच दिवस झाले सायकलीत हवा भरायला आला नाही ते!

पुण्याला पूर्वी सायकलींचे शहर असे म्हणत, तो काळ म्हणजे १९६० ते १९८०. नंतर तो दुचाकी गाड्या, आणि गेल्या काही वर्षांत चारचाकी म्हणजे मोटारींचे शहर झाले आहे. नाही म्हणायला व्यायामासाठी गियरच्या भरमसाठ किमती असलेल्या विदेशी बनावटीच्या सायकली रस्त्यांवर आजकाल खूप दिसत आहेत. सायकल चालवताना म्हणून असलेले शिरस्त्राण, विशिष्ट पोशाख, आणि विविध प्रकारच्या सायकली हे दृश्य आता सहजप्राप्य आहे. त्याच बरोबर नेहमीच्या सध्या सायकली कोणी घेत नाही त्यामुळे त्यांना उठाव नाही. देशी कारखाने ह्या अश्या सायकली बनवत होत्या, त्या बंद पडत आहे, हे हि तितकेच खरे आहे. आता सायकल जीवनावश्यक अशी राहिली नाही, तर हौस, व्यायाम, किंवा जाणून बुजून अंगीकारलेली जीवनशैली, अश्या मार्गाने तिने आपल्या जीवनात प्रवेश केला आहे. हे चांगलेच आहे. रस्त्यावर सायकलींसाठी वेगळे रस्ते राखलेले दिसतात. परेशात प्रवासी वाहतूक करणाऱ्या उपनगरीय बस मध्ये, किंवा रेल्वे मध्ये सायकल नेण्याची सोय असते, तशी आपल्याकडे अजून आली नाहीये. पण येईल. ठिकठिकाणी मोबाईलवरून सायकली भाड्याने घेण्यासाठी देखील सायकली ठेवलेल्या दिसतात. तेही चांगलेच आहे.

एकूण काय, सायकलींना परत चांगले दिवस आलेले दिसत आहेत. मलाहि नवीन सायकल घ्यायची आहे. पाहूयात, कधी आणि कसे ते! जाता जाता अजून एक. प्रत्येक वर्षी जूनच्या तीन तारखेला जागतिक सायकल दिन साजरा करतात. काही वर्षांपूर्वी या निमित्त पुण्यात एके ठिकाणी जुन्या vintage सायकलींचे प्रदर्शन काही हौशी मंडळींनी भारावले होते. ते मी पाहायला गेलो होतो. त्याबद्दल येथे(World of Vintage Cycles) लिहिले आहे.

2 thoughts on “सायकल

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s