सायबेरियातील शोध

सायबेरिया(Siberia) म्हटले कि आपल्याला आठवतात तो रशियाच्या अति उत्तरेकडे, अति थंड प्रदेशातील, स्टॅलिनच्या काळातील ती कुप्रसिद्ध कारागृहे. त्याबद्दल पूर्वी मी वाचले आहे. मी ज्या शोधाबद्दल लिहिणार आहे ते काही या तुरुंगांच्या किंवा त्यातील कैद्यांच्या शोधाबद्दल नाही तर, तेथे मूळ वास असणाऱ्या एका जवळ जवळ नामशेष झालेल्या पक्ष्याच्या शोधाबद्दल. बरं, मी काही पक्षीतज्ञ वगैरे नाही, पण हौशी पक्षी निरीक्षक नक्कीच आहे, सर्वसाधारण उत्सुकता, माहिती ह्या क्षेत्राबद्दल  मला असते. त्याचे असे झाले की, सध्याच्या ह्या सक्तीच्या स्थानबद्धतेत (lockdown) मी माझ्या संग्रहातील पुस्तकांकडे जरा नजर वळवली. त्यात मला मी गोळा करून ठेवलेले, न वाचलेले, अर्धवट वाचलेले, नजरेआड झालेली, थोडी वेगळ्या विषयांवरची पुस्तके हाती आली, येत आहेत. त्यातीलच एक पुस्तक, जे प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ, पक्षीतज्ञ प्रकाश गोळे यांचे सायबेरियातील शोध हे पुस्तक परवा माझ्या हाताला लागले, आणि मी ते छोटेसे पुस्तक एक-दोन बैठकीत वाचून काढले. पुस्तकात गोळे यांनी शोध मोहिमेची माहिती, तसेच सायबेरिया प्रदेशाची ओळख ललित अंगाने मांडली आहे.

Siberian Crane

सायबेरियन क्रौंच पक्षी(Siberian Crane) हे भारतात अनेक इतर परदेशी पक्ष्यांप्रमाणे स्थलांतर करतात. ते रशियाच्या उत्तरेकडील सायबेरिया भागातून येतात हे समजले होते, पण त्यांच्या प्रवासाचा मार्ग अजून कळला नव्हता. त्यासाठी आणि एकूणच त्यांच्या संवर्धनासाठी म्हणून आखलेल्या एका प्रकल्पात त्यांना सहभागी होता आले, त्याविषयी हे पुस्तक आहे. सायबेरियन क्रौंच पक्षी भारतात हिवाळ्याच्या मोसमात प्रामुख्याने भरतपूर पक्षी अभयारण्य(आता केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान) येथे येत असत. ११९२ मध्ये भारत, रशिया आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही शोधमोहीम आखली गेली होती. ते स्वतः, अमेरिकन नागरिक असलेली मीनाक्षी नागेन्द्रन(जो मुळची भारतीय) आणि रशियातील कोसिरजीन व साशा दोन सहकारी असे सगळे त्यांच्या चमूत होते.

सायबेरिया म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवातील आर्क्टिक खंडाच्या परिसरातील प्रदेश. तेथून भारतात हजारो किलोमीटर प्रवास करून हे पक्षी भारतात येत असत. १९६० साली जवळ जवळ १०० सायबेरियन क्रौंच पक्षी आल्याची नोंद आहे, पण १९९१ मध्ये फक्त ६ पक्षी आले. त्यांची संख्या कमी का होते आहे, हे कळण्यासाठी, त्यांचा प्रवासाचा मार्ग समजणे आवश्यक होते. क्रौंच पक्ष्यांच्या साधारण १५ जाती आहेत, मी त्यातील कुठलीच पाहिलेली नाही. क्रौंच पक्ष्याबद्दल मी संस्कृत शिकताना ऐकले होते, क्रौंच पक्षी भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचे प्रतिक मानतात. मारुती चितमपल्ली यांच्या पक्षीकोशात क्रौंच पक्ष्यांचा उल्लेख आहे, त्यात त्यांनी चार क्रौंच प्रकारांची माहिती दिली आहे(सायबेरियन क्रौंच, सारस, क्रौंच-Demoiselle Crane, कुलंग-Common Crane). अमेरिकतील International Crane Foundation या पक्ष्यांच्या संवर्धनाच्या कार्यक्रमात अग्रेसर आहे. त्यांच्या ३०० एकर परिसरात सर्वच्या सर्व १५ जातींचे १०० क्रौंच पक्षी आहेत.

प्रकाश गोळे रशियामध्ये गेले  त्या आधी २-३ वर्षे आधी तेथे राजकीय उलथापालथ झाली होती. आधीच्या सोविएट युनियनची नुकतीच शकले झाली होती. कम्युनिझम हळू हळू मागे पडत होता. दिल्ली वरून विमानाने मॉस्कोला पोहोचले. रशियाला त्यांनी याआधी भेट दिलेली होती. त्यामुळे त्यांना आधीचे आणि दुसऱ्यांदा गेले तेव्हा जाणवलेल्या बदलांचे वर्णन केले आहे. १९८९ मध्ये एका परिषदेच्या निमित्ताने रशियातील Astrakhan या शहराला भेट दिली होती, जे वोल्गा नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर रशियाच्या दक्षिणेला वसले आहे. मॉस्कोला पोहोचल्यावर त्यांना सर्व बदलल्याचे दिसू लागले. रशियाचे चलन रुबल घसरला होता. महागाई वाढली होती. दुहेरी अर्थव्यवस्था असल्याचे त्यांना दिसले. कारखाने, वस्तूंचे उत्पादन व्यवस्था कोलमडली होती. गोळे यांनी एक निरीक्षण नोंदवले आहे कि त्यांना दुकानांमधून गणकयंत्र(calculator) कोणी वापरताना दिसले नाही, सगळे तारेच्या मण्यांचा उपयोग करून हिशेब करत होते. मॉस्कोमध्ये त्यांना हिरवाई अजून असल्याचे दिसले. जांभळ्या रंगांची रानफुले असलेली झाडे त्यांना दिसत होती. त्यांना समजले कि या झाडांच्या पानांपासून रशियात चहा केला जाती, त्याला इव्हानचा चहा असे म्हणतात, हा चहा औषधी असतो.

मॉस्कोमधून प्रकाश गोळे यांनी ठरल्याप्रमाणे सायबेरियात प्रवेश केला. सायबेरियात ईशान्येकडे असलेल्या सालेखार्द या गावात ते पोहोचले, हे गाव आर्क्टिक सर्कलच्या आत आहे. ऑब नदीच्या मुखाशी सालेखार्द हे गाव, प्रचंड दलदल, जमिनीखाली कायमस्वरूपी असलेला, कधीही न वितळणारा बर्फ, permafrost होता. तेथून पुढे जंगलात त्यांच्या तळ पडला होता, ह्या भागात सायबेरियन क्रौंच पक्षी घरटी करतात. हा प्रदेश टुंड्रा प्रदेश म्हणून ओळखला जातो, जंगल तैगाचे जंगल म्हणून ओळखले जाते, जे दक्षिणेकडून टुंड्रा प्रदेशात देखील तापमान वाढीचा परिणाम म्हणून पसरले होते.  सालेखार्दहून हेलिकॉप्टरने त्या जंगलातील त्यांच्या नियोजित तळापाशी जायचे होते. अमेरिकेतील सहकारी मीनाक्षी आधीच त्यांच्या केंद्रामध्ये जन्मलेल्या क्रौंच पक्ष्यांच्या पिलांना घेऊन तेथे  महिनाभर आधीच गेली होती.

प्रकल्पाच्या कामानिमित्त सायबेरिया प्रदेशात केलेल्या भटकंतीचे मस्त वर्णन केले आहे. तेथील दलदलीचा भूप्रदेश, झाडे, क्रौंच व्यतिरिक्त इतर अनेक पक्षी, प्राणी जे जे त्यांनी पहिले अनुभवले ते त्यांनी मांडले आहे. सुवर्ण गरुड ह्या शिकारी पक्ष्याबद्दल तर दोन प्रकरणे आहेत. सायबेरिया मधील आदिवासी यांच्या वर देखील एक प्रकरण आहे. हे लोक रेनडीअरची शिकार करून जगतात. त्यांनी त्यांचे आदिवासी निसर्गपूजक जीवन, तसेच आधुनिक रशियन लोकांशी संबंध आल्यावर त्यांचे बदलेले जीवन याबद्दल लिहिले आहे. पन्नास वर्षांपूर्वी रशियाने सायबेरिया प्रदेशात खनिज तेलाचे साठे सापडले असता तेथे ज्या तेलविहिरी बांधल्या, त्याचे न वापरात असलेल्या इमारतींचे अवशेष त्यांना दिसले, त्याबद्दल देखील लिहीले आहे. (ताजा कलम, जून ७, २०२०: आजच वर्तमान पत्रात वाचले की रशियाच्या  arctic circle भागात त्यांनी बांधलेल्या एका तेलसाठ्याच्या tank चे बांधकाम permafrost वितळल्यामुळे कोसळून खनिज तेल तेथील भागात पसरले आणि तेथील पर्यावरणाची हानी होत आहे. ती बातमी येथे तुम्ही वाचू शकता.

Arctic Circle Oil Spill

Arctic Circle Oil Spill

वर दिलेल्या चित्रात तो भूभाग दाखवला आहे. त्याच्या आसपासच्या भागात सायबेरियन क्रौंच पक्ष्यांचा अधिवास आहे.)

जंगलातील तळावर पोहोचल्यावर तेथे मीनाक्षीने बरोबर आणलेल्या पिलांना तेथील परिसरात सोडले. त्या पिलांचे आणि तेथील वन्य कुत्री यांचे(Siberian Husky, Sibe) कसे जमत गेले हे देखील वाचण्यासारखे आहे. तेथील क्रौंच पक्ष्यांच्या पाठीवर प्रक्षेपक( transmitter ) कसे बसवले याचा वृतांत आहे. हे transmitter बसवलेले पक्षी स्थलांतर करून भरतपूर येथे आले येत असताना त्यांच्या प्रवास मार्गाची माहिती गोळा केली जाते. त्याकाळी हे transmitter पाच हजार डॉलर्स किमितीचे होते. हे प्रक्षेपक बांधताना त्या सर्वांना क्रौंच पक्ष्यासारखा पोशाख करून त्यांच्या मिसळून, त्यांना गव्हाच्या दाण्यांची लालूच दाखवून, ते काम करावे लागले.

Feeding Siberian Cranes

Siberia

काही दिवसांनी त्यांचा चमू परत मॉस्कोला परत आला. त्यांना त्यांच्या रशियन सहकार्यांकडून अशी बातमी मिळाली कि, प्रक्षेपक बसवल्याच्या दुसऱ्या दिवशीच क्रौंच पक्ष्यांनी स्थलांतरासाठी प्रवास सुरु केला. उपग्रहामार्फत त्यांचा प्रवास समजू लागला, पण १५०० किलोमीटर पर्यंतच, नंतर संदेश येणे बंद झाले. नंतर काही महिन्यांनी भरतपूर येथे आलेल्या कॉमन क्रौंच पक्ष्यांच्या पाठीवर प्रक्षेपक लावून ते परत सायबेरिया मधील मुळ ठिकाणी पोहोचेपर्यंतचा मार्ग संशोधकांना ज्ञात झाला.

जाता जाता, मी लिहिलेले पक्ष्यांविषयीचे आणखीन काही लेख जरूर वाचा आणि प्रतिक्रिया कळवा. त्यातील एक आहे धनेश(hornbill) आणि pink headed duck, तर दुसरा एका ओरिसा राज्यातील चिलका सरोवर परीसातील पक्ष्यांच्या माहितीपटाविषयी आहे.

दिलीप कुलकर्णी: पर्यावरणाचे कृतीशील विचारवंत

पश्चिम महाराष्ट्रात, सांगली कोल्हापूर भागात, नुकत्याच झालेल्या पुरामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती ही तसे पाहिले तर बऱ्याच अंशी मानवनिर्मित आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे अक्षम्य दुर्लक्ष हे त्याचे कारण आहे. एकीकडे जरी आजकाल पर्यावरण विषयाबाबत जागृती हा परवलीचा शब्द बनला असला, तरी सुद्धा दुसरीकडे असे त्या दुष्परिणामाचे चित्र आपल्याला वारंवार दिसते. या विषयावर समाजातील अनेक संस्था, अनेक लोकं, त्यांचे काम करत असतात, अनेक चळवळी आजूबाजूला होत असतात. जागतिक पातळीवर या सर्वाची सुरुवात सुरु झाली ती अमेरिकेत, Rachel Carlson यांच्या Silent Spring या १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामुळे. आधुनिक काळात आपल्याकडे, भारतात, त्याचे लोण यायला थोडा वेळ लागला, असे असले तरी आपल्याकडे पंधराव्या शतकात राजस्थानात वनातील झाडे वाचण्यासाठी बिष्णोई आंदोलन नावाचे आंदोलन झाले होते. गेल्या ३०-३५ वर्षांपासून या विषयाकडे लक्ष जाऊन चिपको, पश्चिम घाट बचावो आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन अशी मोठी आंदोलने आणि इतरही लहानसहान, स्थानिक पातळीवरील अनेक विचारमंथन, प्लास्टिक बंदी सारखे उपाय वगैरे झाली. मुख्य म्हणजे पर्यावरण रक्षण कायदा देखील झाला. हे अर्थातच अतिशय तोकडे आणि तात्पुरते उपाय आहेत.

मला स्वतःला गेली दोन-अडीच दशकांपूर्वी सुरु झालेल्या किल्ले पदभ्रमणाच्या निमित्ताने निसर्गात, दऱ्या-खोऱ्यात, खेडेगावातून, जंगलातून भटकण्याचा बराच योग आला. माझे त्यामुळे एकूणच पर्यावरण ह्या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष जाऊ लागले. त्य विषयावरील विविध पुस्तके वाचण्यात येऊ लागली, एक दोन देवरायांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी जायला मिळाले आणि जाणीवेच्या कक्षा रुंदायला लागल्या. प्रबोधनाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. अतुल देऊळगावकर यांची, जगदीश गोडबोले यांची, माधव गाडगीळ, अनुपम मिश्र यांची पुस्तके वाचनात आली. पर्यावरण या विषयाचा आवाका समजू लागला, खरा विकास म्हणजे काय हे देखील उमजू लागले. आत्ता अलीकडेच निसर्गायण हे दिलीप कुलकर्णी यांचे पुस्तक वाचनात आले. खरे तर हे तीस वर्षे जुने पुस्तक आहे, १९८० च्या दशकात आलेले. त्यांनी इतर पुस्तकांप्रमाणेच उपलब्ध माहितीच्या आधारे बऱ्याच गोष्टी मांडल्या आहेत, पण एक तत्वज्ञानात्मक विश्लेषण देखील करण्याचा प्रयत्न केला आहे. हेच पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

निसर्गायण या पुस्तकातून त्यांचा विचारवंताचा पैलू दिसतो. पर्यावरण साक्षरता असलेल्या आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक पातळी काही तरी करायचे असते. आपण ते करतोही, जसे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण किंवा सेंद्रिय भाज्या, धान्ये यांचा वापर करणे, पाणी जपून वापरणे वगैरे आले. पण दिलीप कुलकर्णी याही पुढे जाऊन आपल्या मानसिकतेचा, समाजव्यवस्थेचा, गेल्या २५० वर्षांपासून औद्योगिकरणामुळे निर्माण झालेले प्रश्नांचा विविध अंगाने आढावा घेऊन सूत्रे ते आपल्या पुढे मांडतात, आणि वैयक्तिक पातळीवर काय काय करू शकतात हे सांगतात. आनंद म्हणजे काय, उपभोगता म्हणजे काय, गरज, चैन यांतील फरक, चंगळवाद आणि त्यामुळे निर्माण झालेला अनर्थ, वापरा आणि फेका मानसिकता आदी पैलूंवर विवेचन करतात. विकासाच्या नावाखाली निसर्गावर मात करण्याच्या नादात निसर्गाची हानी समाज करतो आहे, आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो आहे हे ते स्पष्ट करतात.  ग्राहक केंद्रित अर्थव्यवस्था,  अधिकाधिक वापरा, उपभोगा, अधिकाधिक निर्माण करा हे तत्व, आणि ते कसे चुकीचे आहे आणि त्यातून निसर्ग, पर्यावरण यांचे नुकसान कसे होते आहे हे सांगतात. निसर्ग आपल्याला कायमच दोन्ही हाताने देत असतो, पण आपण ते ओरबाडून घेतो, हाव संपत नाही.  सगळीकडे जो eco-friendly गोष्टींचा बोलबाला आहे, त्या वरवरच्या उपायांच्या पलीकडे जाऊन मुळातून वृत्ती बदलली पाहिजे असे ते ठामपणे प्रतिपादन करतात, आणि आपल्या जगण्यातून त्यांनी ते दाखवून दिले आहे. आपले जीवन हे जास्तीत जास्त निसर्गस्नेही कसे करता येईल ते सांगतात. समस्या कोणतीही असो, त्यांचे मूळ अखेरीस, ‘व्यक्तीचे वाढलेले/वाढणारे उपभोग’ ह्या एका करणात आहे. हे न उमगल्याने, त्या समस्या एकात्मिक रीतीने मुळातून सोडवायच्या ऐवजी, तुकड्यातुकड्यातून, प्रत्येक स्तरावर स्वतंत्रपाने उपाय केल्यामुळे परिस्थिती बिकट होत राहते, मूळ प्रश्न न सुटता, तो फक्त दुसरीकडे सरकतो, हे ते दाखवून देतात.

त्यांचे अजून एक पुस्तक नुकतेच(म्हणजे २०१८ मध्ये) आले आहे, ते म्हणजे स्वप्नामधील गावा. त्यात दिलीप कुलकर्णी(आणि त्यांच्या पत्नी पौर्णिमा कुलकर्णी) यांनी असे निसर्गस्नेही जीवन गेली पंचवीस वर्षे कसे जगात आहेत, ते अनुभव आपल्यासोबत वाटून घेतात. त्यामुळे मी त्यांना पर्यावरणाचे कृतीशील विचारवंत असे म्हणतो. उक्ती आणि कृतीने ते वावरतात. पंचवीस वर्षांपूर्वी हे जोडपे कोकणात पुणे सोडून कायमचे निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गस्नेही जीवन जगण्यासाठी कुडावळे ह्या गावी ते राहायला आले. हिंदू धर्मात गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे, पण त्यांनी गृहस्थाश्रमात असतानाच वानप्रस्थान स्वीकारून निसर्गस्नेही जीवन जगत आहेत. (हेन्री डेविड थोरो याने, त्याच्या वाल्ड्न पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, त्याने देखील तसेच केले, पण काहीच वर्षे. प्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे यांनी सुद्धा असाच प्रयोग केला होता, पुण्याजवळ फलटणपासून काही अंतरावर असलेल्या विंचुर्णी या गावात घर बांधून त्या ८-१० वर्षे राहिल्या, त्याचे अनुभव त्यांनी विंचुर्णीचे धडे या पुस्तकात दिले आहेत). तर हे अनोखे, जगावेगळे  जोडपे तेथे राहून, विविध पुस्तके लिहून, शिबिरे घडवून आणून, गतिमान संतुलन नावाचे नियतकलिक चालवून, पर्यावरण जागृतीचे, निसर्गस्नेही जीवन जगण्याचा म्हणजे आपले उपभोग संयमित ठेवण्याचा मार्ग समाजाला दाखवत, राहत आहेत.

मी तर त्यांना एका दृष्टीने गांधीवादीच म्हणेन. त्यांचे, म्हणजे, त्यांनी संपादित केलेले, गांधी उद्यासाठी हे राजहंस प्रकाशनचे पुस्तक मी नुकतेच वाचले. त्यातील बरेचसे लेख त्यांचे आणि पौर्णिमा कुलकर्णी यांचेच आहेत. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जन्मवर्षानिमित्त ते केलेले विचारमंथन आहे. त्यांचे हे सर्व लेख आजची जीवनशैली, खरा विकास या सारख्या गांधींच्या मार्गावरील विचार आहेत, आणि त्याची आज निकड किती आहे हे दाखवणारे आहेत. हे इतर मान्यवर लेखकांच्या लेखातून देखील, त्या पुस्तकातून, आले आहे, फक्त विषय इतर आहेत इतकेच. महात्मा गांधी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे-The world has enough for everyone’s needs, but not everyone’s greed, त्याचेच भान दिलीप कुलकर्णी आपल्याला परत एकदा करून देतात.

दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी यांची काही व्याख्याने, मुलाखती यांचे व्हिडीओ देखील पाहायला मिळाले. त्यातून हे सर्व विचार आणखीन स्पष्ट होतात. तुम्ही देखील ते येथे पाहू शकता.

वैयक्तिक पातळीवर तथाकथित प्रगती, जी प्रामुख्याने आर्थिक विकास आहे, अश्या भ्रामक प्रगतीच्या मागे न लागता, प्रगतीच्या इतर आयामांचे जसे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याचे ते सुचवतात, आणि तसे आणि तत्सम असे अनेक  जीवनशैली प्रवाह समाजात आपल्याला दिसतातही. जसे कि Minimalists, FIRE(Financial Independence, Retire Early) चळवळ, Four Rs(Refuse, Reduce, Reuse, Recycle). वैश्विक पातळीवर, निसर्गाच्या मर्यादांचे भान ठेवून (म्हणजे निसर्गातील संसाधनांच्या उपलब्धतेची, उर्जेच्या उपलब्धतेची, प्रदूषणाचे शुद्धीकरण करण्याची, कचऱ्याचे विघटन करण्याची, जीव-विविधता टिकून ठेवण्याची), उपभोग आणि उत्पादन म्हणजे सम्यक विकास असे ते प्रतिपादतात. त्यांची इतरही पुस्तके आहेत. त्यांच्या कुडावळे ह्या गावी ते त्यांचे राहणीमान अनुभवण्यासाठी, विचार प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांच्या घराची दारे उघडी असतात. तिथे देखील जायचे आहे. मी अर्थात माझ्या पद्धतीने, जमेल तसे त्या गोष्टी जास्तीत जास्त अंगीकारायाचा प्रयत्न करतोच आहे. पण अर्थातच त्याला मर्यादा आहेत. आपण सर्वांनीच तसे केले तर परिस्थिती आशादायक नक्कीच आहे. निसर्गायण म्हणजे निसर्गाकडे जाणे. उपभोग हे साध्य नसून, जीवनाचे उद्दिष्ट नसून आत्मदर्शन हे आहे. उपभोग हे साधन आहे हे जेव्हा समजेल तेव्हा निसर्गायण सुरु होईल असे ते सांगतात, ते पटायला काही हरकत नाही. आणि ह्यातूनच पर्यावरणाचे, निसर्गाचे रक्षण, संवर्धन होणार आहे.

अच्युत गोडबोले यांचे नुकतेच आलेले नवीन पुस्तक अनर्थ, तसेच त्यांचेच एक जुने पुस्तक चंगळवादाचे थैमान सुद्धा साधारणपणे हीच तत्वे म्हणजे संयमित उपभोग, सम्यक विकास विषद करतात.

 

 

 

वास्तुशिल्पी लॉरी बेकर

महाराष्ट्रातील लातूर जवळ किल्लारी येथील भूकंप होऊन गेल्याला आता ३० सप्टेंबरला पंचवीस वर्षे होतील. त्या निमित्ताने वास्तुशिल्पी (architect या अर्थाने) लॉरी बेकर यांची आठवण होणे स्वभाविक आहे. अतुल देऊळगावकर यांच्या किल्लारी भूकंपावर लिहिलेल्या डळमळले भूमंडळ या पुस्तकात लॉरी बेकर यांनी भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनच्या बाबतीत घेतलेल्या पुढाकाराचा तसेच त्यांना त्यातून डावलण्यात आलेल्या घटनेचा उल्लेख आहे. डळमळले भूमंडळ बद्दल मी लिहिले होते. नुकतेच अतुल देऊळगावकर  लिखित प्रसिद्ध वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांच्या वरचे पुस्तक हाती लागले. आज त्यावर लिहिण्यासाठी हा प्रपंच. वास्तुतज्ञ हा शब्द मुद्दामच वापरात नाही, कारण तो थोडा वास्तुशास्त्र कडे झुकतो, जो वेगळा विषय आहे. वास्तुविशारद किंवा वास्तूरचनाकार हा देखील शब्द वापरता आला असता.

मी बारावीत असताना माझ्या एका मित्राच्या (सु!)संगतीमुळे, आणि एकूणच चित्रकला विषयात रस असल्यामुळे, मी वास्तूकला (architecture) च्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, त्यात करियर करावे असे ठरवले होते. पण मला हवे तेवढे गुण मिळाले नाही मात्र मित्राला मिळाले. तो त्या अभ्यासक्रमाला गेला आणि मी त्याच वर्षी सुरु झालेल्या संगणक शास्त्र पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. पण त्या विषयाची गोडी, आकर्षण कायमच मनात राहिले. पुढे भारतविद्या (Indology) शिकताना त्यात प्राचीन भारतीय वास्तुकलेची तोंडओळख झाली. विविध ठिकाणची प्राचीन भारतीय शिल्पकला, वास्तुशिल्पे डोळसपणे पाहून या विषयाचे आकर्षण, कुतूहल आणखीनच वाढले. किल्ले भटकंतीच्या वेळेस सुद्धा कितीतरी शतकांपुर्वीच्या वास्तूकलेतील नमुने पाहायला मिळतात. पुढे मागे मग पुस्तके वाचता वाचता माधव आचवल यांच्या वास्तुकलेतील (आणि त्याजोडीला अंतर्गत रचना) आधुनिक काळातील कामाची ओळख झाली. चंदिगडला गेलो असता पाहायला मिळाले. या ना त्या निमित्ताने त्या विषयाशी संपर्क कायमच राहत गेला.

अतुल देऊळगावकर यांचे लॉरी बेकर यांचे व्यक्तीचित्रण, त्यांच्या कामाची ओळख करून देणारे  करणारे त्याच शीर्षकाचे पुस्तक वाचले होते. किल्लारी भूकंप, त्याची पंचवीस वर्षे, या पार्श्वभूमी वर त्या पुस्तकाची ओळख करून घेणे समयोचित ठरावे. व्यावसायिक रीतीने कां करणारे तसेच वेगळा विचार करणारे, समाज उपयोगी असे काम करणारे असे अनेक वास्तुशिल्पी आहेत, त्यात लॉरी बेकर यांचे वेगळेपण कसे ठसते हे या पुस्तकातून कळते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर मजकूर असा आहे, ‘अवकाशाला कोंडणाऱ्या चार भिंती आणि छप्पर यांची अर्थशून्य, भावहीन रचना म्हणजे घर नाही….व्यक्तीच्या गरजा, आवड, विचार त्यांच्या घरातून व्यक्त होत असतात. हे पुस्तक वाचल्यावार समजते की लॉरी बेकर यांच्या वास्तुकलेत सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी आहे. ती साधी सरळ आहे, त्यामुळे दगड, विटा सुद्धा सचेत होतात. अरुपाला रूप येतं. संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या त्यांची वास्तू मनाचा ठाव घेतात.’ माझ्याकडे असलेली या पुस्तकाची पाचवी आवृत्ती, १९९७ मधील. त्या आवृत्तीच्या निमित्ताने मनोगतात त्यांनी तसेच प्रस्तावनेत उल्हास राणे यांनी एकूणच वास्तुकलेबद्दल चिंतन व्यक्त केले आहे. वास्तुकलेत निसर्ग मानव, उपयुक्तता आणि सौंदर्य, परंपरा आणि आधुनिकता/नवता यांचा संगम, तसेच साधनसामुग्रीची काटकसर ही तत्वे ते नमूद करतात. आजकालच्या जमान्यात जेथे वास्तुशिल्पींचा  मोबदला इमारतीच्या खर्चाच्या टक्केवारीत  मोजला जातो, त्यामुळे वरील तत्वांचा तिथे विसर पडतो अशी खंत ते प्रकट करतात.

लॉरी बेकर

राजू भावसार यांनी पुस्तकासाठी चितारलेले लॉरी बेकर यांचे रेखाचित्र

पुस्तक खरे तर पहिल्या तीन प्रकरणात आटोपले आहे, पण नंतर बरीच परिशिष्टे आहेत. त्यात त्यांची पत्रे आहेत, त्यांची अतुल देऊळगावकर यांनी घेतलेली मुलाखत, त्यांचे काही प्रकल्प अहवाल, व्याख्याने, सूची आणि इतर गोष्टी आहेत. पहिले प्रकरण लॉरी बेकर इंग्लंडवरून भारतात कसे आले, इथेच कसे स्थायिक झाले याबद्दल आहे. १९१७ मध्ये इंग्लंड मध्ये बर्मिंगहॅम येथे जन्म झाला. तेथेच वास्तुविशारद झाले. त्यांचा आधीपासूनच क्वेकर (Quaker) ही ख्रिश्चन धर्मातील उदारमतवादी चळवळीकडे ओढा होता. अमेरिकेत देखील ह्याचे लोण आले होते. माझ्या फिलाडेल्फिया भटकंतीत क्वेकर संबंधित काही ठिकाणे पाहिली आहेत, खरे तर फिलाडेल्फिया शहराचे दुसरे नाव Quaker City हे आहे आणि शहराचा संस्थापक विलियम पेन हा क्वेकर पंथाचा पुरस्कर्ता होता. त्याच निमित्ताने चीनमधून १९४४-४५ च्या आसपास भारतात आले आणि शेवटपर्यंत इथेच राहिले. आधी हिमालयात पिठोरागड, नंतर केरळ ही त्यांची कर्मभूमी झाली.

दुसरे प्रकरण हे बेकर आणि इतर समकालीन प्रसिद्ध वास्तुशिल्पी यांच्यात साम्य, भेद या विषयी आहे. अमेरिकेतील Frank Lloyd Wright, Le Corbusier(ज्यांनी चंदिगडची रचना केली), Sir Edwin Lutyens(ज्याने नवी दिल्लीची रचना केली), Louis Kahn, Charles Correa(ज्यांचे नुकतेच निधन झाले), इजिप्त मधील हसन फादी याची देशी वास्तुकला या सर्वांच्या कामाची तोंडओळख, तसेच लॉरी बेकर यांचे वेगळेपण कसे आहे या बद्दल ते लिहितात. माझ्याकडे चिदाकाश घटाकाश नावाचे वास्तुशिल्पी अरुण ओगले यांच्या लेखांचे संकलन असलेले पुस्तक आहे. त्यात त्यांनी वरील सर्व वास्तुशिल्पींवर लिहिले आहे, पण लॉरी बेकर यांच्यावर नाही, उल्लेखदेखील नाही. का कोण जाणे?

तिसरे प्रकरण लॉरी बेकर यांच्या सर्जनशील यात्रे संबंधी आहे, जे साहजिकच विस्तारलेले आहे. लेखकाने लोकवास्तुकला असा शब्द वापरून लॉरी बेकर यांनी व्यावसायिक वास्तुकलेपासून दूर राहून ग्रामीण भागात केलेल्या कामाचा गौरव केला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या Center for Science and Technology for Rural Development (COSTFORD) या संस्थेबद्दल माहिती आहे. पुणे भागात काम कार्नाआरी डॉक्टर आनंद कर्वे यांची संस्था Appropriate Rural Technology Institute (ARTI) देखील तसेच काम करते. केरळ मधील विविध कामांचा विस्ताराने परिचय करून दिला आहे. केरळ मध्ये लॉरी बेकर यांनी बरेच काम केले आहे. नुकत्याच (ऑगस्ट २०१८) झालेल्या विनाशकारी प्रलय, पाऊस यामुळे झालेल्या वाताहतीच्या संदर्भात त्यांच्या कामांचा आढावा घेणे उचित ठरेल. किल्लारी मध्ये लॉरी बेकर यांनी भूकंपानंतर पुनर्वसन करताना काटकोन चौकोनी वसाहत न करता त्यांनी गावकऱ्यांशी बोलून शेजारपण जपणारी गृहसंकुल करावी असे सुचवले होते, तसेच खर्च देखील वाजवी होता. पण हितसंबंध जपणाऱ्या लोकांमुळे ते या कामात राहिले नाही. आता पंचवीस वर्षानंतर काय परिस्थिती आहे हे शोधले पाहिजे.

माझ्या घराचे काम करणारा माझा मित्र दिनेश गपचूप हा देखील त्याच विचारसरणीचा वास्तुशिल्पी, अंतर्गत रचनाकार आहे. हे पुस्तक वाचताना त्याची आठवण होत होती. असो. योगोयोग म्हणजे येत्या काही दिवसातच मी जीवाची दुबई करायला चाललो आहे. ते तर आधुनिक व्यावसायिक वास्तूकलेतील एकाहून एक नमुने असलेले शहर. त्याबद्दल लिहीनीच नंतर.

 

 

 

आहुपे, भाग#२(रानभाजी महोत्सव)

माझ्या मागील ब्लॉग मध्ये आहुपे या आगळ्या वेगळ्या ठिकाणाच्या पावसाळी निसर्ग पर्यटनाचा अनुभव मी सांगितला होता. त्याच भटकंतीत अजून एक वेगळा अनुभव मी घेतला. वनवासी कल्याण अश्राम ही समाजसेवी संस्था गेली ५०-६० वर्षे वनवासी, आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी कार्य करते आहे. त्या संस्थेच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे गेली दोन वर्षे रानभाजी महोत्सव असा आगळा वेगळा महोत्सव आहुपे, जुन्नर जवळील कुकडेश्वर आणि तळेरान या तीन ठिकाणी केला जातोय. त्याबद्दल खूप उत्सुकता होतीच. महाराष्ट्र सरकारची एक Tribal Research and Training नावाची एक संस्था पुण्यात आहे, तेथे मी पूर्वी एकदा गेलो होतो.

IMG_0828

माझ्या आहुपेच्या वास्तव्याच्या दुसऱ्या दिवशी हा रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम होता. रानभाज्या म्हणजे सहसा शहरी भागात न आढळणाऱ्या भाज्या. जंगलात, शेतात, बांधांवरून आपोपाप उगवल्या जाणाऱ्या अश्या ह्या भाज्या. प्रामुख्याने पावसाळ्यात, काही महिने ह्या असतात. जसे कासच्या पठारावर पावसाळ्यातील काही दिवसच काही विशिष्ट फुले, रानफुले येतात, आणि काही दिवसातच ती नष्ट होतात, तसाच हा काहीसा प्रकार. अश्या ह्या रानभाज्यांची माहिती, अर्थात, जंगलात राहणाऱ्या,वनात शेती करणाऱ्या वनवासी, आदिवासी लोकांना माहिती असते. ती परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. नुसत्या त्या भाज्यांची माहिती नव्हे तर, त्या स्वयंपाकात, खाण्यात कशा वापराव्या याचे देखील पिढीजात ज्ञान त्यांच्याकडे असते. यातील बऱ्याच भाज्या औषधी गुणधर्म देखील असलेल्या असतात. या सर्वांचे एका तऱ्हेने दस्ताऐवजीकरण व्हावे, तसेच ह्याची माहिती इतरांना पोहोचावी, त्यातून आदिवासी लोकांना चार पैसे देखील मिळावे हा अश्या कार्यक्रमाचा उद्देश. आहुपे हा भाग देखील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा आणि यां निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून ह्या वनपुत्रांचा, त्याच्या भागाचा शाश्वत विकास व्हावा हा प्रमुख हेतू.

पुण्यातून वनवासी कल्याण आश्रमातर्फे पर्यटकांना आहुपेत ह्या कार्यक्रमासाठी, आश्रमाच्या अंजली घारपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणले. वनवासी कल्याण आश्रमाची स्मरणिका सर्वाना देण्यात आली, ज्यात त्यांच्या उपक्रमाबद्दल, इतिहासाबद्दल माहिती दिली होतो. सकाळी १० वाजता आहुपेतील शासकीय आश्रम शाळेत सगळे जमले. नाश्ता आणि नाचणीचे गरम गरम असे आंबट गोड आंबील देऊन स्वागत करण्यात आले. तेवढ्यात पावसाने देखील जोरदार सरी वर सरी झाडून जणू काही स्वागतच केले. आहुपे गावातील वाड्या, वस्त्यामधून अनेक महिला(लहान मुलींपासून ते आजी/मावशीपर्यंत सर्व) नटून थटून हातात त्यांनी बनवलेली रानभाजी, भाकरी यांनी सजलेले ताट घेऊन कार्यक्रम स्थळी येत राहिल्या. हॉल मध्ये भिंतींवर २५-३० रानभाज्यांची माहिती देणारी विविध भित्तीपत्रके लावली गेली होती. आलेल्या महिला आपापल्या जागी बसून त्या चाखायला येणाऱ्यांना त्याची माहिती उत्साहाने देत होत्या. आम्ही सर्व पर्यटक, तसेच नेमून दिलेले परीक्षक, ह्या सर्व भाज्या चाखत, खात फिरत होतो. प्रत्येक ठिकाणचे भित्तीपत्रक वाचून माहिती करून घेत होतो. मला एका तऱ्हेने खूप वर्षांपूर्वी केलेली अमेरिकेतील Napa Valley मधील wine tasting ची ट्रीप आठवली.

रुखाळ, भोकर, तेरा, आबई,  काट माट, कर्दुला, कोंदर, कुर्डू, तोंडेची भाजी, चावा, टाकळा, कुसरा, करंज, भारंगी, चिंचूरडा, रताळ कोंब, गोमेटी, हळदा, महाळुंग, खुरासणी, कोंभाळा अश्या भाज्यांची माहिती देणारी पत्रके लावली होती. त्यातील बऱ्याच भाज्या महिलांनी आणल्या होत्या. कुर्डू खूप जणीनी आणली होती.  काही वेळाने मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. विविध मान्यवरांची भाषणे झाली. अंजली घारपुरे यांनी कार्यक्रमाची कल्पना, स्थानिक लोकांचे सहकार्य याबद्दल बोलत, सहभागी महिलांचे कौतुक केले. डॉ. भोगावकर, ज्या वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत, त्यादेखील एकूण परंपरा जपण्याचे आवाहन करत, कार्यक्रमाचे स्वागत केले. त्यांनी ह्या Wild Edibles of Vidarbha नावाचे  एक पुस्तकही लिहिले आहे. वनवासी कल्याण संस्थेतर्फे देखील रानभाज्यांच्या माहितीचे संकलन असणारे पुस्तकाचे लवकरच प्रकाशन करत आहे. परीक्षकांतर्फे स्पर्धेचे निकाल जाहीर करून, विजेत्यांचे कौतुक, बक्षीस वितरण, मनोगत हे सर्व झाले आणि हा सोहळा पार पडला.

तेवढ्यात जेवणाची सूचना झाली. मी विचारच करत होतो की ह्या आलेल्या सर्व पर्यटकांचे भोजनाची व्यवस्था कशी होणार. पण सूचना ऐकून चाट पडलो. कल्पना अशी होती की गावातील वनवासी बंधूंकडे त्यांनी प्रत्येक ४-५ लोकांच्या समुहाची जेवणाची व्यवस्था केली होती.  अश्या प्रकारे गावातील १२-१५ जणीना त्यामुळे काही पैसे मिळाले, आणि आम्हा पर्यटकांना त्यांच्या घरात शिरकाव करून त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मिळाली. बसके घर, उताराचे कौलारू छप्पर, अंधाऱ्या खिळ्या, अंगणात शेळ्या, गायी, कोंबड्या, सरपण. स्वयंपाक घरात चूल. सारवलेल्या घरात, चुलीसमोर बसून पोत्यावर बसून घरातील आजी, मावशी यांच्या सोबत गप्पा मारत गावरान भोजनाचा आस्वाद घेण्यास मिळाला. मला तर माझ्या आजोळची आठवण झाली. माझ्या सुदैवाने माझ्या बरोबर पुणे आकाशवाणीच्या प्रसिद्ध आणि वरिष्ठ निवेदिका अंजली लाळे ह्या होत्या आणि अनपेक्षितपणे त्यांच्या आकाशवाणी संदर्भात गप्पा मारता आल्या. त्यानंतर आम्ही मग गावकऱ्यांकडून स्थानिक वाणाचे  तांदूळ विकत घेतले. सर्वांचा निरोप घेऊन, भाज्यांच्या चावीच्या आस्वादाच्या आठवणी काढत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.

एकूणच हा असा अनपेक्षित, आणि वेगळा अनुभव देणारी सहल ठरली. आदिवासी संस्कृती, जीचे विविध आयाम आहेत, त्यातील ही खाद्य-संस्कृती, ती पण जपली गेली पाहिजे. अंजली घारपुरे यांच्या पुढाकाराने नक्कीच हे होईल. प्राची दुबळे यांनी जसे आदिवासी संगीत जपण्यासाठी त्याचा अभ्यास करून, त्याचे रेकॉर्डिंग आणि दस्ताऐवजीकरण केले आहे, किंवा गणेश देवी यांनी भाषा लोकसर्वेक्षण करून आदिवासी बोली भाषेची माहिती संकलित केली, मुकुंद गोखले यांनी गोंडी लिपी तयार केली, तसेच हे आहे. परवाच जागतिक आदिवासी दिन साजरा झाला, त्या दृष्टीने ही सहल औचित्यपूर्णच ठरली असे म्हणावे लागेल.

डळमळले भूमंडळ

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर जवळ असलेल्या माळीण गावी तीन वर्षांपूर्वी पावसाच्या दिवासात मोठी दरड कोसळून, त्याच्या कुशीत वसलेल्या छोट्याश्या गावाला गिळून टाकले. या दुर्घटनेला आता तीन वर्षे झाली. पूर्णच्या पूर्ण गाव उध्व्वस्त झाले होते, त्याचे गेल्या तीन वर्षात पुनर्वसन करण्यात आले. पण आता बातम्या अश्या येत आहेत की पुनर्वसन झालेल्या ठिकाणी बांधलेली घरे निकृष्ट दर्जाची आहेत, घरांना तडे  गेले आहेत, तसेच जमिनी, रस्ते देखील भूस्खलन झाल्यामुळे खचले आहेत, अश्या बातम्या येत आहेत. आता काय अहवाल, चौकशी, समिती ह्या दुष्टचक्रात सर्व अडकणार.

ह्या निमित्ताने यापूर्वी झालेल्या एक-दोन मोठ्या दुर्घटनेच्या आणि त्यामुळे झालेल्या पुनर्वसनाच्या संबंधी असलेल्या पुस्तकांची आठवण झाली. १९७७ मध्ये आंध्र प्रदेश मध्ये झालेल्या प्रलयंकारी चक्रीवादळामुळे झाले होते. प्रभाकर पेंढारकर यांनी  चक्रीवादळ या पुस्तकात त्याबद्दल लिहिले आहे. फ्रेड क्युनी(Fred Cuny) याने केलेल्या आणि सुचावालेल्या उपायांचे त्यांनी वर्णन केले आहे. त्या बद्दल मी येथे लिहिले होते. त्याच प्रकारे महाराष्ट्रात देखील १९९३ मध्ये लातूर मध्ये जो विनाशकारी भूकंप झाला, त्याचे आणि त्यानंतर झालेल्या पुर्वासानाचे, तसेच लॉरी बेकर(Laurie Baker) यांनी केकेल्या कामाचा लेखजोखा अतुल देऊळगावकर यांनी  डळमळले भूमंडळ या पुस्तकात दिला आहे. लॉरी बेकर यांच्या एकूणच जीवनाचा, कार्याचा परिचय करून देणारे दुसरेही पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

डळमळले भूमंडळ हे पुस्तक १९९७ मधील आहे(म्हणजे लातूर/किल्लारी भूकंपानंतर चार वर्षांनी), ग्रंथालीने प्रकाशित केलेले आहे. अतिशय तळमळीने आणि संवेदनशील रीतीने त्यांनी हे वाचनीय पुस्तक लिहिले आहे. एकूणच भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप, मदतीच्या, पुनर्वसनाच्या कार्याच्या विविध पैलूंवर प्रकाश, यावर प्रत्यक्ष अनुभवांवर लिहिले आहे. एकूण १५ प्रकरणे आहेत, पण प्रकरणांना शीर्षके नाहीत. लातूर/किल्लारी आणि आसपासची १५-१६ गावे या भूकंपाने बाधित झाली होती. येथे मध्ये एवढी जीवितहानी का झाली याची कारणमीमांसा, नवीन घरे बांधताना काय करायला हवे होते, काय केले गेले याचे कठोर परीक्षण येते. लॉरी बेकर यांनी सांगितले होते की नवीन गावे न वसवता, आहे त्याच ठिकाणी त्यांनी सुचववेल्या तंत्राप्रमाणे घरे बांधली असती तर, सदोष पुनर्वसनाचे कित्येक सामाजिक दुष्परिणाम टाळता आले असते. शरद पवार, विलासराव देशमुख, प्रवीणसिंह परदेशी या सारखे राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी यांनी घेतलेले निर्णय, काम यावर त्यांनी सखोल लिहिले आहे.

‘आनंदवन’चे डॉ. विकास आमटे यांनी केलेल्या घर-बांधणी प्रयोग याचीही माहिती समजते. डॉ. यंदे सारखे मानसोपचारतज्ञ यांनी त्यावेळी केलेल्या समुपदेशनाचे काम देखील ते सांगतात(post traumatic mental disorder). अश्या मोठ्या आपत्तीच्या वेळेस सरकारी यंत्रणा, सेवाभावी संस्था हे सर्व काम करण्यासाठी पुढे येतात, पण या सर्वांमध्ये संवाद आणि समन्वय आवश्यक असतो. तो नसेल तर काय होवू शकते याचे विदारक चित्र ते रेखाटतात. प्रभावी संवाद नसल्यामुळे अफवाना उत येतो. जसे की भूकंप परिसरात युरेनियम सापडल्याची आणि त्यामुळे होणाऱ्या परिणाम याबद्दल अफवा पसरली आणि त्यामुळे झालेले परिणाम याचे वर्णन येते.  शेवटच्या प्रकरणातून ते ‘भूकंप: आपले आणि त्यांचे’ या प्रकरणातून जपान, अमेरिका, चीन मधील भूकंप, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन यांची तुलना भारतातील परिस्थितीशी केली ती देखील उद्बोधक आहे. माहितीपूर्ण अशी ६ परिशिष्टे देखील पुस्तकात आहेत. विस्तृत संदर्भसूची देखोल त्यांनी दिली आहे. पुस्तकात विविध पानांवर सतीश भावसार यांची रेखाटने आहेत, जी अतिशय बोलकी आहेत. सुरुवातीला असलेले ‘कल्लोळ’ असे शीर्षक असलेले मनोगत तर अतिशय भावपूर्ण आहे. त्यांच्या जीवनावर राशोमान या जपानी चित्रपटाचा प्रभाव देखील ते नमूद करायला विसरत नाहीत.  असे हे पुस्तक मुळातून वाचले पाहिजे आणि माळीण संदर्भात तपासून पहिले पाहिजे.

माळीणचे, खूप मोठा गाजावाजा करत पुनर्वसन काम पूर्ण करून झाले. स्मार्ट माळीण असे संबोधण्यात आले. पण एकूण परिस्थिती पाहता आणखी बरेच काही करता येण्यासारखे आहे असे दिसते. वरील दोन पुस्तकांसारखे माळीणवर देखील एखादे पुस्तक यावे, म्हणजे पुढील काळात त्यापासून काही शिकता येईल. माळीण काय किंवा लातूर/किल्लारी काय, आणखीन इतर ताज्या घटना काय, या सर्व नैसर्गिक(किंवा इतर मानवनिर्मित) आपत्ती आहेत. त्याचे व्यवस्थापन, त्यातून पुनर्वसन हे सर्व कठीण काम असते. सर्व अत्याधुनिक साधने असूनही, अश्या आपत्तींचे इष्टापत्ती मध्ये रूपांतर करण्याची संधी, एकूणच दूरदृष्टीचा अभावामुळे, गमावली गेली, आणि सुरु राहिले ते दुष्टचक्र(पानशेत धारण फुटल्यामुळे पुण्यात १९६१ मध्ये पूर आला. त्यावेळेस पुण्याचे स्वरूप बदलून टाकण्याची त्या काळचे आयुक्त स. गो. बर्वे यांची योजना सफल झाली नाही, हे उदाहरण याचेच आहे). माझे गेल्या काही वर्षातील काम देखील असेच आपत्ती व्यवस्थापनाचे आहे. पण क्षेत्र थोडेसे वेगळे आहे. एक आहे व्यावसायिक म्हणजे information technology मधील disaster recovery. या बद्दल लिहीन कधीतरी विस्ताराने. आणि दुसरे आहे ते सेवाभावी, म्हणजे मानसिक आजारामुळे निर्माण झालेल्या वैयक्तिक/कौटुंबिक आपत्तीमधून कसे बाहेर यायचे, त्याचे कसे व्यवस्थापन कसे करायचे, त्याच्याशी निगडीत आहे. त्याबद्दल मी माझ्या ब्लॉग वर नेहमीच लिहीत आलो आहे.

झाडे लावणारी बाई

नुकताच जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा झाला. नेमिची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर येणाऱ्या पर्यावरणजागृती साठी केला जाणारा हा खटाटोप, जागर परत एकदा संपन्न झाला. झाडे, वृक्ष, जंगले यांचे महत्व आपल्या संस्कृतीत आधीपासूनच आहे, जसे की देवराया, ज्या मुळे वृक्षांचे जतन, संवर्धन होते. तो जीवनाचा एक भागच आहे. पण गेल्या काही वर्षांत औद्योगिकरणामुळे बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगलांचा ऱ्हास झाला आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. पश्चिम घाट बचावो सारखी आंदोलने देखील झाली आहेत. पुण्यात नुकत्याच मेट्रो वाहतुकीचा प्रकल्प सुरु झाला, आणि त्यामुळे झालेली वृक्ष तोड ताजी आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर काल सहज channel surfing करता करता एक सुंदर कन्नड चित्रपट पाहण्यात आला. त्याचे नाव बनदा नेरेळू(ಬನದ ನೆರೆಳು, वृक्षांची सावली).

हा चित्रपट २००९ मधील कर्नाटक राज्य पुरस्कार मिळालेला चित्रपट आहे. सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री बी. जयश्री यांची मुख्य भूमिका त्यात आहे. त्याच आहेत झाडे लावणाऱ्या, जगवणाऱ्या बाई, जिचे नाव आहे बानव्वा. ही कथा घडते ती उत्तर कर्नाटकातील एका खेड्यात. बानव्वाला झाडांबद्दल अगदी लहानपणापासून प्रेम असते.  गावातल्या एकाने बँके कडून कर्ज घेऊन १२ एकर जागेत फळबागेची लागवड करावी असा व्यवहार्य विचार केलेला असतो. त्या जागेत बनव्वाची झाडे असतात. तीला जेव्हा जेव्हा याबद्दल कळते, तेव्हा सुरु होतो तिचा झगडा. ती आजच्या भाषेत पर्यावरणवादी नाही, पण झाडे, वृक्ष यांच्या प्रती तिच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ती त्यासाठी काय काय करते हे पाहण्यासारखे आहे. शोले या हिंदी चित्रपटातील विरूचा(धर्मेंद्र) बसंतीसाठी(हेमामालिनी) इमारतीवरून जीव देण्याच्या प्रसिद्ध प्रसंगाची आठवण करून देणारा एक प्रसंग यात आहे. बनव्वा वृक्षतोडीच्या विरोधात एका इमारतीवरून जीव देण्याची धमकी देते. अर्थात बनव्वा संपूर्ण शुद्धीत आहे. नंतर ती विहिरीत जीव देण्याचाही प्रयत्न करते, पण ती त्यातून वाचते. नंतर एकदा फासावर जाण्याचा प्रयत्न करते, ती वाचते, पण तिची वाचा जाते. नंतर ती एकूणच हाय खाते. भ्रमिष्टासारखी करायला लागते, आणि त्यातच तिचा शेवटी अंत होतो. चित्रपटाचे खेडेगावातील चित्रीकरण, कृषीसंस्कृतीचे दर्शन(शिगे हुणीमे, ಶಿಗಿ ಹುನ್ನಮ್ಮಿ, जो थंडीत खरीप पिक हाती लागल्यावर येतो, सुगी) , लोक-गीते(जी YouTube वर येथे पाहता येतील), हे सर्व छानच आहे. जाता जाता, काल नेमका बैल-पोळा होता, आणि मातीचे बैल अजूनही घरी केले जातात.

बी. जयश्री यांनी अभिनयाची कमाल केली आहे. उत्तर कर्नाटकातील टिपिकल आजीबाईचा पेहराव, चंची मधून पान खाणे, फतकल मारून बसण्याची लकब, एकूण स्वभावातील वयानुसार आलेला खटपणा, त्यांच्या तोंडी असलेली त्याभागातील रांगडी कन्नड भाषा हे सगळे पाहताना मजा येते. बी. जयश्री या विलक्षण ताकदीच्या अभिनेत्री आहेत. त्या रंगभूमी तसेच चित्रपट या दोन्हीत मोठे काम करून ठेवले आहे. त्यांची काही कन्नड नाटके मी पाहिली आहेत, जसे चंद्रशेखर कम्बार यांचे करीमयी. त्यांचा आवाज अतिशय मोठा पल्ला असलेला आहे. नागमंडल हाही असाच त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेला सिनेमा. कर्नाटकातील संगीत नाटक परंपरेतील आद्य नट आणि संगीत नाटक कंपनी सुरु केलेल्या गुब्बी वीरण्णा यांच्या त्या नात आहेत. अभिनय त्यांच्या रक्तातच आहे. गुब्बी वीरण्णा यांच्या सारखेच दुसरे कन्नड संगीत रंगभूमीवरील नट म्हणजे एणगी बाळप्पा, जे आज १०३ वर्षांचे आहेत. अमोल पालेकर यांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात रंगसंगीत महोत्सवात एणगी बाळप्पा यांचा सत्कार केला होता. त्या निमित्ताने बी. जयश्री ह्या देखील आल्या होत्या, त्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष पाहता आले. नुकतेच जयश्री यांचे आत्मचरित्र(कण्णा मुच्चे काडे गोडे, ಕಣ್ಣಾ ಮುಚ್ಚೇ ಕಾಡೇ ಗೊಡೇ) प्रकाशित झाले आहे. ते मागवायचे राहिले आहे याची आठवण झाली या निमित्ताने. एणगी बाळप्पा यांचे चरित्र(बण्णद बदुकीन चिन्नद दिनगळू, ಬಣ್ಣದ ಬದುಕಿನ ಚಿನ್ನದ ದಿನಗಳು) देखील मागील वर्षी गणेश अमीनगड यांनी लिहलेले उपलब्ध आहे.

चित्रपटाचा शेवटी Jean Giono चा उल्लेख येतो आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. Jean Giono याचे The Man Who Planted Trees नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यावरून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवलेला दिसतो. त्या मूळ फ्रेंच पुस्तकाचे मराठी भाषांतर माधुरी पुरंदरे  यांनी केले आहे. आपल्याकडे सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन तर प्रसिद्धच आहे. मी अमेरिकेत असताना जुलिया हिल नावाच्या एका महिलेचा वृक्ष वाचवण्यासंबधीच्या लढ्याबद्दल वर्तमानपत्रात वाचले होते. कॅलिफोर्नियातील महाकाय रेडवूड नावाच्या वृक्षतोडीच्या विरोधात तिने त्या झाडावर सलग दोन वर्ष राहून लढा दिला होता, या सर्वांची आठवण या सिनेमाच्या निमित्ताने झाली.

Aamby Valley City

Pune and surrounding area through which Sahyadri range passes north to south, has been hot spot for various organizations to setup resorts, luxury residential premises, to attract growing population of neo-rich, and ever increasing international tourists and visitors. Many of these places have sprouted in last the decade or two, have arguably damaged sensitive ecosystem of this area. Lavasa, around backwaters of Bhatghar dam near Pune, Aamby Valley City near Lonavala, which is surrounded by Pavana dam and also Mulshi dam backwaters, Hilton Shillim, to name a few. Another issue with such places is water usage, and depriving general public from their right to water.

Last month, I happened to visit Aamby Valley City, to be there as part of out team building activity(I have written about similar event at Garud Machi) . Aamby Valley City is built by Sahara India Pariwar. It was not my first time to this place. I have been there about 8-9 years ago for similar event, but was only a day’s visit. This time, I got chance to stay overnight there. Long time back, when I had visited a fort Koraigad which is on the edge of Aamby Valley City, I could see large expanse of the resort/township, and could notice a significant patch of deforestation, compared the surrounding area, which was quite green.

Anyways, we reached the place in the morning. Once cleared off security checks at the entrance, we proceeded towards reception. I noticed a huge sculpture of goddess with her roaring tigers. While we were checking in, we watched screens on the walls running videos of Aamby Valley City, telling various facts and figures about its facilities and features. We were allocated Burmese Cottage, which are made of wood. These cottages had separate occupations on the ground floor as well first floor. The view of the surrounding from the balcony was breathtaking.

 

The remaining part of day was full of learning for us. We had interesting trainer, Harrish Sairaman, accompanying us. His sessions on team building along with activities were quite engaging. His style of talking was captivating and kept us engaged. Later we learnt that he is trained hypnosis therapist too. We did most dreadful thing in the life, called Iron Rod Bending exercise, which was thrilling. He ended his day with electrifying talk on relationships, specifically, referring to pioneering work of John Kappas on relationship types such as E&P(emotional and physical). In the evening, we also experienced fire walking as well. Aamby Valley City arranges fountain, light and sound show off a man-made lake, which we got to witness when it got dark. The evening time was off into wilderness. And this is what I did not like about it. Aamby Valley City arranges dinners in these wilderness, along with regular band music with loud noise, which runs for more than 4-5 hours. I am sure this causes noise pollution, affecting not only locals around, but also wild-life in the forest area nearby.

Anyways, after dinner, I was walking around inside Aamby Valley City, late night. I was hoping to see night sky full of stars, since the area is far off from the city, but it was not be. The sky was cloudy, there was hardly any stars visible. The light pollution also could have played a role as well, as it is still a township, with lot of street lights on throughout. The morning walk next day, exploring surround area turned out to be fine. We also got a glimpse of houses which were gifted to cricket players by Sahara, after winning world cup few years.

With the year end celebrations around the corner, places such as Aamby Valley City would be overbooked soon, if not already. I only wish that people realize the damage caused to environment and locals due to such places and do something towards it.

पश्चिम घाट बचाओ मोहीम आणि जगदीश गोडबोले

जगदीश गोडबोले हे पुण्याचे अवलिया पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्व, ज्यांनी पर्यावरण क्षेत्रात ३०-३५ वर्षांपूर्वी इतके काम करून ठेवले आहे, पण मला वाटते ते आणि त्यांचे काम काहीसे विस्मृतीमध्ये गेले आहे. काही वर्षांपूर्वी वाचनालयात सापडलेले जगदीश गोडबोले यांचे मोहीम इंद्रावतीची हे पुस्तक वाचले होते. इंद्रावती नदी जी महराष्ट्र, आणि आजचे छत्तीसगड ह्या दोन राज्यांच्या सीमेवरून वाहते, त्या भागातील आदिवासी जीवनाच्या शोधमोहीमेबद्दलची माहिती त्यात होती. जगदीश गोडबोले यांनी पवना धरणग्रस्तांच्या बाबतीत काम केले आहे. ते अधिक झोतात आले ते त्यांनी काढलेल्या सह्याद्रीच्या जंगलाच्या, आणि तेथील आदिवासी ह्यांच्या हक्कांच्या जागृतीबद्दल काढलेल्या पश्चिम घाट मोहीम बचाओ मोहीमेमुळे(Save Western Ghat March). परवाच मला जगदीश गोडबोले यांनी ह्या मोहिमेचा वृत्तांत लिहिलेले पुस्तक मिळाले. हे १९८९ मध्ये प्रकाशित झालेली आवृत्ती आहे. त्याची नवीन आवृत्ती देखील आली आहे, जी ह्या मोहिमेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, त्यांचा पत्नीने, अर्चना गोडबोले, यांनी त्यात आणखी भर घालून आणले. जगदीश गोडबोले यांचे तसे पहिले तर अकाली निधन झाले. त्यांच्या नावाने पर्यावरणक्षेत्रात काम करणाऱ्याला दरवर्षी पुरस्कार देखील दिला जातो. मला वाटते त्यानिमित्तानेच मी वर्तमान पत्रामध्ये केव्हातरी आलेले मी वाचले, पाहिले असणार, कारण त्यांचे नाव, आणि तो त्यांचा उमदा फोटो अजून स्मरणात आहे. त्यामुळे हे पुस्तक सापडल्यावर एका बैठकीत वाचून काढले, आणि ह्या चळवळीचा आणि गाडगीळ समिती वगैरेचा संदर्भ समजला.

ह्या पुस्तकात जगदीश गोडबोले यांच्या हरहुन्नरी, आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीचा ठायी ठायी प्रत्यय येतो. सह्याद्री हा तर माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. कित्येक वर्षे मी सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर असलेल्या किल्ल्यांवर, तसेच काही जंगलातून भटकंती केली आहे. लवासा(Lavasa) प्रकल्प, Aamby Valley City प्रकल्प, तसेच इतर गोष्टीमुळे जंगलाला होत असलेला धोका याबद्दल आपण वाचत असतोच. निळू दामले यांनी लिहिलेल्या लवासा या पुस्तकातून प्रकल्पाची केलेली भलावण वाचून वाईट वाटले होते. तसे मी त्यांना कळवले देखील होते. २५-३० वर्षांपूर्वीच ह्या प्रश्नावर जागृती करण्यासाठी काढलेल्या ह्या मोहिमेबद्दल पूर्वी कुठेतरी थोडेसे असे वाचले होते, पण असे पुस्तक आहे हे माहीत नव्हते. त्यामुळे मी ते अधाशासारखे वाचून काढले. त्यात परत जगदीश गोडबोले यांच्या शैलीमुळे ते अगदी वाचनीय झाले आहे. कुठेही कंटाळा येत नाही.

पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि मानववंश-शास्त्रज्ञ कैलाश मल्होत्रा यांच्या एका संशोधन वृत्तांतामुळे जगदीश गोडबोले सह्याद्रीच्या अभ्यासासाठी अशी मोहीम काढण्यास प्रेरित झाले. कैलाश मल्होत्रांनीच ह्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. सुरुवातीच्या काही पानातून, अशी शंभर दिवसांची ही मोहीम आखण्यातील अडचणी, वेगवेगळया तऱ्हेचे अनुभव, विविध व्यक्तींचा सहभाग ह्याची त्यांनी अगदी तपशीलवार, आणि रोचकपणे मांडली आहे. मला ह्या मोहिमेचे नाव सह्याद्री बचाओ मोहीम असे का दिले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते. सह्याद्री दक्षिणोत्तर असा पसरला आहे, जो महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, शेवटी काही भाग तामिळनाडू मधून देखील जातो. सगळीकडे तसे पहिले तर सह्याद्री हे नाव प्रचलित आहे. लेखक याचा उलगडा करतात. ब्रिटीश सरकारने दिलेल्या ह्यामुळे देखील सह्याद्री ओळखला जातो, त्यामुळे मोहिमेला हे नाव त्यांनी दिले. हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे मोहिमेचा वृत्तांतच आहे, पण निरस माहितीने भरलेले नाही. ही मोहीम उत्तरेकडून(खानदेशातील नवापूर) आणि दक्षिणेकडून(कन्याकुमारी) एकाच वेळी सुरु झाली. आणि शेवटी दोन्ही गट गोव्यात एकत्र येऊन मोहिमेची सांगता झाली. लेखक प्रामुख्याने उत्तरेकडून मोहिमेवर असलेल्या गटासोबत असल्यामुळे त्या प्रवासाची माहिती येते. तसे पहिले तर लेखकाने आधीच कबुल केल्याप्रमाणे, हे पुस्तक कार्यकर्त्यांच्या नोंदवहीवर बरेचसे बेतले आहे. पण, तसे असले तर दक्षिणेकडून सुरुवात करून मोहीम पूर्ण केलेल्या गटाच्या वृत्तांत का आला नाही हे कळाले नाही. तीच गोष्ट पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या मोहिमेत सहभागी झालेल्या साथीदारांची यादीमध्ये, दक्षिणी नावे बिलकुल नाहीत.

अशा प्रकल्पातून लोक सहभाग, तसेच मोठे मनुष्यबळ लागते, ते देखील एकाच ध्येयाने प्रेरित झालेले, शिस्तबद्ध काम करणारे असे हवे असते. नाही तर दहा लोकांची दहा दिशेला तोंडे, अशी परिस्थिती होते, आणि मूळ उद्देश बाजूलाच राहतो. या पार्श्वभूमीवर गोडबोले यांची धडाडी, पूर्वीच्या मोहिमांचा अनुभव, तसेच, विलक्षण लोकसंग्रह यामुळे, विशेष चकमकी न झाडता मोहीम फत्ते झाली. चिपको आंदोलनाचे सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद भट्ट यांचे मार्गर्शन, तसेच चंडीदास यांचा प्रत्यक्ष मोहिमेत काही काळ झालेला सहभाग, तसेच ठिकठिकाणी विविध प्रथितयश व्यक्तींचा सहभाग, चर्चा, यामुळे देखील मोहिमेला फायदा झाला. सह्याद्रीमध्ये अशा मोहिमा याआधी देखील निघाल्या आहेत. आम्हा ट्रेकर्समंडळीमध्ये trans Sahyadri expedition, जो साधारण १०००-१२०० किमी  किल्ल्यांवरून केलेली भटकंती असते, बरीच प्रसिद्ध आहे. पण जगदीश गोडबोले यांच्या मोहिमेचा उद्देश वेगळा होता, जो सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातून राहणाऱ्या लोकांशी, संस्थांशी, संघटनांशी संपर्क साधणे, आणि त्यांच्या दृष्टीकोनातून विनाशाची कारणे व त्यावरील उपाय समजावून घेणे  हा होता असे पुस्तकात नमूद केले आहे. म्हणजेच सह्याद्रीचे जंगल, त्याच्याशी निगडीत वनसृष्टी, जीवसृष्टी यांच्या ऱ्हासाची कारणे, तसेच ह्या सर्वाशी तेथील लोकांचे, आदिवासी यांचे असलेले अनुबंध, वेगवेगळया कारणामुळे त्यांच्या जीवनात निर्माण झालेले पाणी, चार, इंधन या सारखे प्रश्न, यांचा समन्वय कसा घालता येईल हे सर्व पाहणे हाच उद्देश होता.

मोहीम गावा-गावातून जाते तेथील अनुभवांचे वर्णन येते. ह्या निमित्ताने, सभा, भाषणे, मिरवणुका, बैठकी, लोकांकडून माहिती गोळा करणे, स्वागत समारंभ, पथनाट्ये, प्रदर्शने, घोषणेबाजी(जंगल बचाव-मानव बचाव) या सर्वांचा जल्लोष, आणि उडालेला धुराळा याचे आणि त्यानिमित्ताने आलेले कटू, तसेच हृद्य, मजेशीर अनुभवांचे खुमासदार शैलीत तपशील येतात. ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य हा प्रश्न त्यांना दिसला, धरणांच्या आसपास असलेल्या गावातही पाण्याचा प्रश्न त्यांना त्यावेळीही दिसला. पण एकूण इतर काय प्रश्न होते, चर्चा काय झाल्या, किंवा सर्वसाधारण उपाय काय असू शकतील या बद्दल विशेष मला लिहिलेले दिसले नाही. त्यांनी नंतर प्रसिद्ध केलेल्या अहवालात असेल तर माहिती नाही. मोहिमेच्या वृत्तांताच्या ओघात लेखक बरीच विविध माहिती पुरवत जातात, जी नक्कीच नवीन(आजही) आहे. उदाहरणार्थ, धुळ्यापासून जवळच ४१०० हेक्टर परिसरात लळिंग-कुरण नावाचे अशियामधील सर्वात मोठी Fodder Bank आहे. साधारण १० वर्षांपूर्वी लळिंग किल्ल्यावर मी गेलो होतो, पण ह्या बद्दल माहिती नव्हती. निलगिरी सारख्या एक-प्रजातीय वृक्षांची लागवड, त्यातील फायदे, तोटे याबद्दल झडलेल्या चर्चा देखील येते. शिवाजी महाराज यांनी वन रक्षणाच्या संदर्भात काढलेल्या आज्ञापत्राचे रेखाचित्रदेखील त्यांनी दिले आहे, हेही मी कधी पहिले नव्हते. कोल्हापूरजवळ दाजीपूरचा जंगलात झालेल्या चर्चेत कुमरी शेतीचे(shifting cultivation) तोटे आणि त्यावर उपाय यावर चर्चा झाली.

भारतातील पर्यावरण चळवळीतील एक महत्वाचा टप्पा असलेल्या ह्या मोहिमेच्या संदर्भात हे पुस्तक वाचायला, त्यातच जगदीश गोडबोले यांच्या लेखनशैलीची मजा घ्यायला हे पुस्तक वाचायला हवेच. आता एवढ्या वर्षानंतर, ह्या मोहिमेचे काय झाले हे समजावून घ्यायला नक्कीच आवडेल. अर्चना गोडबोले त्यांच्या Applied Environment Research Foundation आणि Save The Western Ghats या संस्थेद्वारे हे काम पुढे नेत आहेत, तसेच डॉ. माधव गाडगीळ यांनी सुद्धा ह्या विषयावर भरीव काम केले. त्यांनी तर २०१० मध्ये पश्चिम घाटाच्या विषयीचा अभ्यासपूर्ण अहवाल भारत सरकारला सादर केला आहे. पण त्याची अंमलबजावणी काही होत असताना दिसत नाही.

Jallary Natural Forest

Bengaluru is famous for its lakes and gardens. Both of them disappearing fast due to urbanization, and construction activities. Bengaluru is also fortunate to have urban forest area  which are managed by state government forest department. Bannerghatta National Park is one such example. There are many other smaller forest parks dotted at various parts across Bengaluru. One such park is Jallary Natural Forest.

This forest park is located near the place I usually stay with my folks during my Bengaluru trips. I make sure that I visit it at least once. This forest is also called Arekere Reserve Forest or Doresanipalya Forest. Arekere is a lake nearby. The forest now is mainly consists of Bamboo bushes and Eucalyptus(neelgiri) trees. It is said in the past it used to consists of Jallary trees(Lac tree. The Lac extract is used in making of ornaments). There are various trails inside one can take. One can spot various creatures, insects such as black colored centipedes alongside. There many ant hills as well, many be some of them are dead with no apparent activity. One can sport many butterflies as well.

20161031_08513720161031_08525920161031_085400

A little search on Internet provides some information about local interest on preserving this forest area and also efforts to bring its past glory. The forest, on one edge, has a environment management and policy institute as well(EMPRI), run under Government Of Karnataka. Do plan to visit the forest next time when you are in Bengaluru.

Girish Godbole

And the birds started chirping again

भारतात डॉक्युमेंटरी फिल्म(documentary film, वार्ताचित्र) तयार करण्याची गेली कित्येक वर्षांची परंपरा आहे. पूर्वी चित्रपटगृहातून अशी वार्ताचित्रे चित्रपट सुरु होण्याच्या आधी बऱ्याच वेळेस दाखवली जात असत. फिल्म्स डिव्हिजन(Films Division) तर्फे ही बनवलेली असत. बरीचशी वार्ताचित्रं अतिशय चांगल्या विषयावर, तसेच उत्तम पद्धतीने, थोड्या वेळात मांडली गेली जात असत. कला, इतिहास, सामाजिक प्रश्न, भारताची विविध क्षेत्रातील प्रगती, आदिवासी परंपरा, आणि इतरही बऱ्याच विषयांवर ती असत. आता गेल्या काही वर्षांपासून माध्यम क्रांती मुळे, छोट्या छोट्या फिल्म्स, वार्ताचित्रं सर्वसाधारण लोकं देखील बनवू लागले आहे. लोकांना व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून हे नवीन साधन हाती लागले आहे, आणि त्याचा अतिशय चांगला वापर होताना दिसतो आहे. तसेच रुपेरी पडद्याकडे वळण्यासाठी सुलभ मार्ग निर्माण झाला आहे. मीच ह्या ब्लॉग वर एक-दोनदा त्यावर लिहिले आहे. माझ्या मित्रांपैकीच विराज गपचूपने पाणी-बचतीवर फिल्म बनवली होती आणि अच्युत चोपडेने, तर चित्रपट क्षेत्रात उतरण्याच्या तयारीने, वेगवेगळी short films बनवत आहे.

आमच्या भागात राहणारे गिरीश गोडबोले ह्यांनी सुद्धा ओडिशामधील चीलिका(चिल्का, Chilika Lake) सरोवराच्या परिसरावर एक वार्ताचित्र बनवले आहे हे त्यांनी मला गेल्या वर्षी असेच एकदा संध्याकाळी फिरताना भेटल्यावर सांगितले होते. त्यांच्याशी नुकताच परीचय झालेला होता. त्यांचे कार्यक्षेत्र हे वाणिज्य आणि एका सेवाभावी संस्थेतून ते मोठ्या पदावरून निवृत्त झाले आहेत असे समजले होते. सामाजिक क्षेत्राचा मोठा अनुभव त्यांच्या जवळ आहे हे समजले होते. त्यातच ते short films देखील बनवतात हेही समजले होते.

Girish Godbole

Screen shot from the film itself

परवाच त्यांच्या त्या फिल्म बद्दल Indian Express मध्ये आलेले वाचले, त्यांना परत भेटलो, आणि त्याबद्दल भरभरून सांगत होते. फिल्मचे नाव आहे And The Birds Started Chirping Again. ती फिल्म YouTube वर देखील आहे, ती पाहिली. चीलिका सरोवर हे तर भारतातील अतिशय मोठे वैशिष्ट्यपूर्व सरोवर, पक्ष्यांचे नंदनवन. दोन दशकांपूर्वी सरोवर परिसरातील गावकरी, आपल्या इतर उद्योगांव्यतिरिक्त, सरोवरातील पक्ष्यांची शिकार करून, पकडून ते विकण्याचा व्यवसाय करत असत. पण तेथील काही सेवाभावी संस्थांनी, तसेच सरकारी प्रयत्न करून, गावकऱ्यांना त्याबद्दल समजावून सांगितले, तसेच महत्वाचे म्हणजे, त्यांना पर्यावरणपूरक पर्यटनाच्या(eco-tourism) माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले. Chilika Development Authorityने मंगलाजोडी नावाच्या गावातील गावकऱ्यांच्या जवळ असलेले पक्ष्यांचे ज्ञान, त्यांना थोडेसे प्रशिक्षण देऊन त्यांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम दिले. त्यामुळे पक्ष्यांना जीवदान मिळाले, तसेच तेथील रहिवाश्यांना देखील रोजगार मिळाला, आणि ते पर्यावरण-संवर्धन कार्यात त्यांचाही हातभार लागला. भक्षकच कसे रक्षक बनले त्याची ही कहाणी ही छोटीशी फिल्म सांगते. सर्वसमावेशक प्रगती, किंवा सकारत्मक बदल जर सर्वाना सामावून, वेगवेगळया संधी उपलब्ध करून दिल्यातर, कसे वेगळे काम होते याचे हे उदाहरण. अर्थात हे काही पहिलेच असे उदाहरण नाही. अरुणाचल प्रदेश मधील हॉर्नबिल पक्ष्याची गोष्ट सुद्धा वेगळी नाही. त्याबद्दल गेल्यावर्षी पुण्यात हॉर्नबिल महोत्सव भरला होता तेव्हा समजले होते. गिरीश गोडबोले यांची ही फिल्म Consortium for Educational Communication(CEC) च्या प्रकृती फिल्म फेस्टिव्हल मध्ये निवडली गेली आहे. ती फिल्म आणखीन इतर ठिकाणी जावून, पर्यावरण जतनाचे काम करावे अशी अपेक्षा आहे.

तर परत एकदा आठवण करून देतो. फिल्म्स डिव्हिजनकडे त्यांनी बनवलेल्या फिल्म्सचा खजिना आहे. फिल्म्स डिव्हिजनची नवी-जुनी वार्ताचित्रं जर कोणाला हवी असतील तर ती आपल्या सुदैवाने उपलब्ध आहेत. त्यांच्या संकेत-स्थळावर ती विक्रीस उपलब्ध आहेत. जरूर पहा.