दुबई वारी, भाग#१

आपल्याकडे कित्येक वर्षांपासून, रोजगारानिमित्त, व्यापारानिमित्त, लोकं दुबई, ओमान, बहारीन, मस्कत, कुवेत, सौदी अरेबिया या सारख्या आखाती भागात जात आहेत. एकदिवसीय क्रिकेट मुळे दुबई, शारजा यांची पण ओळख झाली. इतक्यात दुबईकडे सुद्धा पर्यटन म्हणून अनेकजण जाऊ लागले. भारतापासून विशेष दूर नसलेला दुबई, तसेच गेल्या २-३ दशकातील दैदीप्यमान प्रगतीमुळे, पर्यटक इकडे आकर्षित होऊ लागले. मीही ह्या वर्षी दिवाळीच्या आधी दुबई वारी करून आलो. एका तऱ्हेने दिवाळीपूर्वीची दिवाळी झाली म्हणा ना!

दुबई हा भाग संयुक्त अरब अमिराती ह्या आखाती देशातील एकूण सात अमिरातींपैकी एक अमिरात. अबु धाबी ही अजून एक अमिरात, जेथेही मी गेलो. शारजा ही तिसरी प्रसिद्ध अमिरात, जवळ असूनही मला जाता आले नाही. बाकीच्या चार अमिराती(अजमान, उम्म अल् कुवेन, रस अल् खैमा, फुजैरा) तितक्याश्या प्रगत आणि प्रसिद्ध नाहीत. दुबईचा इतिहास फार जुना नाही. हा सगळा आखाती भाग रखरखीत वाळवंट असलेला. इस्लाम धर्माचा प्रसार होण्यापूर्वी भटक्या जमातीतील असलेले हे लोक, उंट पालन, खजूर, मासेमारी, समुद्रातील मोती वेचण्याचे काम करणारे लोकं म्हणून ही सर्व शेख मंडळी असे काम करत होती. १९६० मध्ये या भागात खनिज तेलाचा सुगावा लागला आणि या भागाचे नशीब बदलले. दुबई, अबू धाबी आणि इतर भाग जोरात प्रगत होऊन अत्याधुनिक शहरांत गणले जाऊ लागले. आणि पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले. दुबई तर ग्लोबल सिटी म्हणूनच गणले जाऊ लागले आहे.

आम्ही जेव्हा दुबई विमानतळावर उतरत होतो तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. विमानातून खाली पाहत असताना बराच वेळ वाळवंट असल्यामुळे काही दिसत नव्हते, दुबई जवळ येऊ लागताच दिव्यांची रोषणाई, झगमगाट डोळ्यात भरू लागला. दुबई विमानतळ सुद्धा अवाढव्य, दररोज जगभरात विविध ठिकाणी शेकडो विमान उड्डाणे येथून होतात. विमानतळावर पांढऱ्या शुभ्र झग्यातील शेख मंडळी दिसत होती, काळ्या झाग्यातील स्त्रियाही बऱ्याच दिसत होत्या. उतरल्यावर व्हिसा(आम्ही दुबईचा व्हिसा तेथे गेल्यावरच मिळवला), इमिग्रेशन वगैरे सोपस्कार पाडून, विमानतळावरून आमच्या राहण्याचे ठिकाण असलेल्या हॉटेलला पोचे पर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. हे हॉटेल उत्तरेकडील दुबईचे उपनगर असलेल्या डायरा सिटी(Diera City) मघ्ये होते.

दुबई पर्यटन आमचे आम्हीच करायचे ठरवले होते. त्यामुळे कसे, कुठे जायचे याची तयारी करावी लागली होती. त्यानुसार आम्ही आमच्या ५-६ दिवसांच्या वास्तव्याची आखणी केली होती. दुबईत मेट्रो रेल्वे सेवा अतिशय सुलभ असल्यामुळे त्यावर आमचा भर असणार होता. आमचे आम्हीच फिरायचे ठरवल्यामुळे थोडा अभ्यास केला होता. एरवी सुद्धा तशी सवय माझी आहेच. कारण आपण प्रवास, पर्यटन का करती? रोजच्या रहाटगाड्यातून बाहेर येऊन काहीतरी नवीन, बदल अनुभवण्यासाठी, थोडी मौज करण्यासाठी, नव्या अनुभूतींनी समृद्ध होण्यासाठी. त्यासाठी थोडे परिश्रम करायला हवे. मानसिक तयारी करायला हवी. इतिहास, भूगोल, स्थळांची, संस्कृतीच्या विविध पैलूंची माहिती थोडीफार करून घ्यायला हवी. त्यामुळे आपल्या प्रवासाचा आस्वाद अधिक आनंददायी होतो असा माझा तरी अनुभव आहे. घरातून बाहेर पडायचे म्हणजे शारीरिक स्वास्थ्य देखील हवेच. तशी सर्व तयारी करूनच उत्सुक मनाने आम्ही दुबईत थडकलो होतो.

सकाळी उठून आम्ही सर्वात आधी बुर्ज अल् अरब ह्या समुद्रकिनारी उभ्या असलेल्या ठिकाणी गेलो. चालत चालत पाम जुमेरा नावाची वैशिष्ट्यपूर्ण इमारत पाहून नंतर जुमेरा बीच नावाच्या पांढऱ्या शुभ्र वाळूच्या समुद्र किनारी गेलो. दोन्ही इमारती अर्थातच प्रसिद् अलिशान हॉटेल्स आहेत. निळाशार समुद्र, त्यामागे ही दोन्ही हॉटेल्स असा सगळा सुंदर देखावा दिसत होता. येथे गेलो. ऊन तर होतेच. जवळच एक मस्जिद दिसत होते, पण ते बंद होते. त्यामुळे आत जाता नाही आले. परत येताना मॉल ऑफ एमिरेट्स(Mall of Emirates) मध्ये गेलो. हा दुबई मधील अनेक मॉल्स पैकी एक. पण अवाढव्य. दुबई आणि मॉल हे समीकरणच आहे. ह्या मॉल्स मधील शॉपिंग फेस्टिवल्स प्रसिद्धच आहेत. ह्या मॉल मध्ये skiing center आह!. कमाल ह्या अरबांची, वाळवंटात skiing! तेथे गेलो, बाहेरूनच पहिले. हे सगळे अर्थात कृत्रिम बर्फातून तयार केलेले आहे, तेही ह्या रखरखत्या वाळवंटात. आहे की नाही ह्यांची कमाल. त्या दिवशी संध्याकाळी दुबई खाडीतील बोटीतून रात्रीची सफरीचा कार्यक्रम होता. संथ बोटीतून खाडीतून बोट चाळली होती. रात्रीचा दुबईचा रोषणाई केलेला परिसर नयनरम्य, स्वप्नवत भासत होता. बोटीवरच अलिशान जेवण होते, मन रिझवण्यासाठी इजिप्तचे तोमुरा(Tanoura) नृत्य चालू होते.

दुसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध बुर्ज खलीफा परिसराच्या भेटीचा कार्यक्रम आखला होता. येथे जायला थेट मेट्रो होती. बुर्ज खलीफा ही जगातील सध्याची सर्वात उंच इमारत(५५५ मीटर!). अनेक आकर्षणे असलेली ही इमारत पाहायला तुफान गर्दी असते. १४०व्या मजल्यावर जाऊन दुबईचा नजरा पाहणे हा प्रमुख कार्यक्रम असतो. आम्ही सकाळी सकाळीच मेट्रोने पोहचलो. आधीच राखलेल्या तिकिटांची खातरजमा करून घेतली. थोड्या वेळात आम्हाला रांगेत उभे राहण्यास सांगितले गेले. १२५व्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या लिफ्ट पर्यंत पोचेपर्यंत जवळ जवळ दोन तास रांगेत उभे राहावे लागणारे होते. जशी जशी रंग पुढे सरकत होती, तसे तसे आम्हाला वाटेत बुर्ज खलीफाच्या बांधकामाचा इतिहास, विविध टप्पे यांची माहिती देणारे फलक दिसत होते, मोठाल्या टेलीव्हिजन पडद्यावर त्याचे व्हिडियो इत्यादी दाखवले जात होते.

आम्ही एकदाचे त्या लिफ्ट मधून १२५व्या मजल्यावर असलेल्या observation deck वर वेगात पोहचलो. खरे तर आणखीन १४८व्या मजल्यावरही जाता येते, पण त्याचे वेगळे तिकीट आहे. वरून १८० अंश कोनातून दुबईचा नजारा पाहायला मिळतो. एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेले वाळवंट, ढगाळ वातावरणातून दिसू शकते.

हे सगळे पाहून खाली परत येई पर्यंत दुपारचा एक वाजून गेला होता. तेथे जेवून, बुर्ज खालीफाच्या आवारातील संगीतमय कारंज्याच्या दर्शनाचा कार्यक्रम सुरु होणार होता, तो पाहायला गेलो. त्या कारंज्याच्याच रात्री देखील कार्यक्रम असतो, तो अधिक चांगला असतो, तोही पहायचा होता. बुर्ज खलीफा मध्येच Dubai Aquarium तसेच Underwater Zoo देखील आहे. तेथील Dubai Mall मध्ये तंगड्या तुटे पर्यंत हिंडलो. तेथे ice skating साठी ice rink आहे. त्याच्या बाजुलाच Reel Cinemas नावाचे मल्टीप्लेक्स आहे. इंग्रजी तसेच हिंदी देखील सिनेमे लागले होते. पाय दुखतच होते, विश्रांती हवी होती. बधाई हो! नावाचा सिनेमा पहायचा होताच, तिकिटे काढली आणि दुबईत चक्क हिंदी सिनेमा पाहिला!

रात्रीचा संगीतमय कारंजे पाहायला गेलो. त्याला अलोग गर्दी झाली होती. मला वाटते दुबई दुपारहूनच जागे होते, आणि रात्री बऱ्याच उशिरापर्यंत गजबजलेले असते. रोषणाई केलेला बुर्ज खलीफा रात्रीचा मस्तच दिसतो. ती चित्रे मनात ठेवून थकून हॉटेलला परतलो.

Advertisements

Bohemian Rhapsody

प्रत्येक वर्षी इंग्रजी चित्रपट प्रेमींना ऑस्कर पारितोषिक विजेत्या चित्रपटांची प्रतीक्षा असते. पूर्वी असा काळ हे पारितोषिक विजेते चित्रपट भारतात यायला कित्येक महिने जायचे. आणि आज असे चित्र आहे की, ऑस्कर साठी नामांकन झालेले चित्रपट सुद्धा लगेचच भारतात, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये पाहण्याची संधी मिळते आहे. ह्या वर्षी PVR Cinemas ने पुण्यात अशी ऑस्कर नामांकन झालेली काही चित्रपटांचा एक महोत्सवच(The PVR Oscar Film Festival) आयोजित केला होता. त्यातील एक चित्रपट पाहण्याची संधी मला मिळाली. त्याचे नाव बोहेमियन राफ्सेडी. तो चित्रपट एका गायकाच्या जीवनावर आधारित, चरित्रपट आहे, हे वाचून समजले होते. मला असे चित्रपट पाहायला आवडतात. The Artist नावाचा ऑस्कर विजेता चित्रपट लगेचच पाहिला होता २०१२ मध्ये. La La Land नावाचा वर्ष २०१७ चा ऑस्कर विजेता संगीतमय चित्रपट थोडा नंतर पाहिला. पाश्चिमात्य गायकांचे चरित्र सहसा एकसुरी नसते. अनेक प्रिय, अप्रिय घटनांनी ते घडलेले असते, वादळी जीवन असते. हट्टी, मनस्वी, सारे जग नाकारून आपलीच वाट चोखाळणारे असे हे असतात. अशी अनेक उदाहरणे सांगता येईल. Bob Dylan चा चरित्रपट देखील असाच वादळी होता. तीच गोष्ट कृष्णवर्णीय लोकं ज्यांनी काहीतरी करून दाखवले आहे अशी. उदाहरण द्यायचे तर अमेरिकन बॉक्सर मोहम्मद अली याच्या वरचा चित्रपट अली.

हाही चित्रपट असाच काहीसा असणार हा कयास बांधूनच चित्रपट पाहायला गेलो. मी खरे तर पाश्चिमात्य संगीत, त्यातही रॉक, पॉप वगैरे विशेष ऐकत नाही. अतिशय जोरकस, झिंग आणणारे संगीत, अगम्य शब्द असणारी ती गाणी, त्यातील स्थानिक संस्कृतीच्या, समाजाच्या, आणि इतिहासाचे संदर्भ यामुळे तसे समजायला कठीण असतात. पण आपल्याकडे देखील असे संगीत ऐकणाऱ्या लोकांची कमी नाही. अर्थात गेल्या तीन साडे तीन दशकात भारतात उपग्रह वाहिन्यांवर MTV सारख्या वाहिन्यांमुळे हे आणखी शक्य झाले आहे. ह्या संगीत प्रकारांचे विविध संगीत महोत्सव Sunburn, NH7 Weekender याला आपल्या येथे देखील चाहता वर्ग आहे. बोहेमियन राफ्सेडी हा चित्रपट इंग्लंड मधील Queen ह्या बँडवर आणि त्यातील गायक फ्रेडी मर्क्युरी यावर आहे. त्या दोघांबद्दल काही माहिती नव्हते. हा फ्रेडी मूळ भारतीय वंशाचा, पारसी कुटुंबातील होता.

परवा पुस्तकांचे गाव भिलार हे पाचगणी, महाबळेश्वर जवळ आहे तेथे गेलो असता अचानकच, Peter Patrao ह्या पाचगणीतील गतकाळातील प्रसिद्ध व्यक्ती संबंधी एका ग्राफिती मधून समजले. त्याबद्दल शोधाशोध करता असे कळाले की बोहेमियन राफ्सेडी ह्या चित्रपट ज्या गायकावर आहे तो फ्रेडी, हा पाचगणीत बोर्डिग शाळेत शिकत असताना हे Peter Patrao त्याला शिकवत असत, आणि ह्या फ्रेडीचे जगभरातील चाहते पाचगणीत त्याची शाळा पाहायला येत असत, अजूनही येतात. हे सारे अचंबित करणारे आहे.

बोहेमियन राफ्सेडी खरे तर क्वीनच्या प्रसिद्ध गाण्याचे शीर्षक आहे. तर ह्या चित्रपटाची कथा सुरु होते ती लंडनच्या हिथ्रो विमानतळावर. तेथे हा फ्रेडी विमानात प्रवाश्यांचे समान भरण्याचे काम करत असतो. लंडनमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीय पारसी कुटुंबातील हा मुळचा फारुख बलसारा. विचित्र दिसणारा, पुढचे दोन दात विचित्र रीतीने पुढे आलेले. त्यामुळे स्वभावतः बुजरा झालेला, पण त्याच्या अंगात संगीत लहानपणापासूनच असते. पाचगणीतील शाळेत असतानाचा त्याने म्हणे music band चालू केलेला असतो, पियानो देखील तेव्हापासूनच वाजवत असतो. हे मात्र चित्रपटात दाखवलेले नाही. विमानतळावर काम करत करत लंडनमधील एका बँडमध्ये त्याची अचानक गायक म्हणून वर्दी लागते आणि त्याचा सांगीतिक प्रवास सुरु होतो. त्यातील अनेक चढ उतार, त्याचे आणि त्याचे सहकारी यांच्याशी जुळलेले सूर, नंतर विसंवादी झालेले सूर, असफल प्रेम प्रकरण, घरातील लोकांचा विरोध, संघर्ष, आणि नंतर त्याचे समलैंगिक असणे, आणि पुढे अनेक प्रसिद्ध पाश्चिमात्य व्यक्तीमध्ये(आणि एकूणच त्या संस्कृतीत, समाजात) दिसणाऱ्या लैंगिक स्वैराचारामुळे एड्स रोगाने ग्रासून अकाली मृत्यू पावणे असा हा जीवन प्रवास, आलेख हा चित्रपट मांडतो.

Bohemian Rhapsody

Bohemian Rhapsody, courtesy Internet

अर्थात ठायी ठायी पायाचा ठेका धरायला लावणारी गाणी, संगीत चित्रपटात आहेच. क्वीन बँडच्या जगभरातील tours आणि live concerts यांचा भारावून टाकणारा धावता आढावा येतो. क्वीन बँडच्या एक दोन प्रसिद्ध गाण्यांची जन्मकथा देखील हा चित्रपट सांगतो. संगीत क्षेत्रातील व्यावसायिक अपप्रवृत्तींचे दर्शन घडवणारे काही प्रसंग देखील आहेत. फ्रेडीला क्वीन बँड सोडून एकट्यालाच गाणे गाण्याची, त्याबदल्यात अमाप मोबदला देण्याचा प्रसंग देखील आपल्याला दिसते आणि त्यामुळे अर्थात हा क्वीन बँड तुटतो. तो परत कसा एकत्र येतो हे देखील पाहणे मनोरंजक आहे. प्रमुख भूमिकेत Rami Malek (Night at the Museum fame) नावाचा अभिनेता आहे, ज्याने ही भूमिका छानच निभावली आहे. भूमिकेतील विविध छटा, मनस्वीपणा, गायकाचा अभिनय हे छान वठले आहे. चित्रपटाच्या(आणि क्वीन बँडच्या) नावाचा अर्थ जो उत्श्रुंखलपणाचा अविष्कार असा आहे, तसाच तो चित्रपट आणि त्या फ्रेडीचे जीवन आहे. चित्रपटात सब-टायटल्स होती म्हणून संवाद बरेचसे समजू शकले.

आपल्या हिंदी मध्ये २०११ आलेला Rockstar हा असाच काहीसा चित्रपट मला ह्या निमिताने आठवला. त्यात रणवीर कपूरने चांगले काम केले होते, आणि संगीतकार ए आर रेहमानचे जोरकस असे पाश्चिमात्य संगीत असली गाणी चांगली होती. असो. बोहेमियन राफ्सेडी ह्या चित्रपटाला ऑस्करची पाच नामांकनं आहेत. त्याला मिळतील की नाही काही सांगता येत नाही, पण चित्रपट नक्कीच पाहावा असा आहे. क्वीन बँड आणि फ्रेडी यांच्या बद्दल अर्थातच तीन तासात सगळे सांगता अशक्य आहे, पण अधिक जाणून घेण्यास नक्कीच आपल्यात उत्सुकता हा चित्रपट निर्माण करतो.

पुस्तकांचे, स्ट्रॉबेरीचे गाव भिलार

गेली दोन महिने मी महाबळेश्वरची आणि आसपासची भटकंती करण्याची योजना आखतोय. काही ना काही कारणाने जमत नव्हते. परवा योग आला. ह्या वर्षी थंडीचा मुक्काम वाढला आहे. सहसा लोकं महाबळेश्वरला उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून जातात. ते तसे बरोबरच आहे. पण थंडीच्या दिवसांत देखील ते मस्त भटकायला आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने महाबळेश्वर जवळील भिलार गाव हे पुस्तकांचे गाव म्हणून विकसित केले.  राज्य मराठी विकास संस्थेचा हा प्रकल्प आहे. हे गाव आधीच सुमधुर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी साठी प्रसिद्ध आहे. त्याची मला उत्सुकता होतीच, पण खरे तर त्या पुस्तकांच्या गावाला भेट द्यायची होती. इंग्लंडमध्ये असेच एक पुस्तकांचे गाव, Hay On Wye , कित्येक वर्षांपासून आहे. ते अर्थातच जुनी, दुर्मिळ पुस्तके खरेदी विक्री ह्या साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे भिलार हे जगातील दुसरे असे पुस्तकांचे गाव, भारतातील पहिले. तसेच ह्या दिवसांत महाबळेश्वर आणि आसपासच्या परिसरात स्ट्रॉबेरी देखील भरपूर चाखायला मिळते.

सकाळी सकाळी मी पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने कुच केले. वाटेत वाई येथे त्रिवेणी साहित्य संगम हा कार्यक्रम सुरु होता, तो थोडासा पाहिला. पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर, सुधीर फडके यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारतर्फे हा कार्यक्रम होता. स्टार निवेदक सुधीर गाडगीळ यांनी प्रसिद्ध नाट्यकलावंत, गायिका फैयाज यांच्याशी साधलेला संवाद मी ऐकला, गदिमांच्या जोगिया ह्या गणिकेच्या जीवनाविषयीच्या गाण्याचे भावपूर्ण सादरीकरण केले ते ऐकले. पुढे पाचगणीत थोडासा रेंगाळून, जेवण करून तेथील प्रसिद्ध table land(पाचगणीचे पठार) वर गेलो. तेथे बरीच लोकं paragliding करत होती, स्थानिकांकडून समजले की परदेशी पर्यटक ह्या साहसी खेळात भाग घेतात. हा ब्लॉग आज लिहिताना बातमी ऐकली की एक कोरियन पर्यटक ह्या खेळात डोंगरावर आदळून मृत्युमुखी पडला. असो. मी दुपारच्या सुमारास आडवा तिडवा पसरलेला पसरणी घाट पार करत भिलारला पोहचलो. महाबळेश्वरच्या अलीकडे १०-१२ किलोमीटर आधी भिलारला एक फाटा फुटतो. आधीपासूनच पुस्तकांच्या गावाचे फलक दिसू लागतात(तसेच रस्त्यांच्या कडेला स्ट्रॉबेरी विकणारे देखील दिसतात). गावात गेल्यावर ठिकठिकाणी कुठली पुस्तके आहेत हे सांगणारे फलक दिसतात. मी भिलार मध्येच श्री नारायण वाडकर यांच्याकडे राहण्यासाठीची व्यवस्था राखून ठेवली होती. त्यांच्याकडे लोकसाहित्य प्रकारातील पुस्तके ठेवली होती.

महाबळेश्वर जवळच असल्यामुळे तेथे जाण्याचा मोह टाळता आला नाही. नाकेखिंड(केट्स) पॉइंट, महाबळेश्वर मंदिर परिसर, वेण्णा तलाव, मॅप्रो गार्डन वगैरे पाहून संध्याकाळी भिलारला परत आलो. वाडकर यांच्याकडे घरचे ताजे जेवण करून, थोडीफार पुस्तके चाळून, डॉ. तारा भवाळकर यांचे ‘लोकसाहित्यच्या अभ्यासाच्या दिशा’ हे पुस्तक रात्री वाचण्याकरता घेतले.

Kates Point, Mahabaleshwar

Kates Point, Mahabaleshwar

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही गावात भटकायला बाहेर पडलो. जिथे नजर जावी तिथे स्ट्रॉबेरीचे मळे दिसत होते, तसेच पुस्तकांची दालनांची फलके दिसत होती. गावातील लोकं स्ट्रॉबेरी तोडण्यास बाहेर पडली होती, शेतावर स्ट्रॉबेरी तोडण्याची लगबग दिसत होती. आम्ही अशाच एका शेतावर गेलो, स्ट्रॉबेरी लागवडीचे दृश्य पाहून हरखून गेलो. मनसोक्त स्ट्रॉबेरी खाल्ली. शेतकऱ्यांशी बातचित करता समजले की आदल्या दिवशी पहाटे पहाटे इतकी थंडी पडली होती, की शेतावर दावबिंदू गोठून बर्फाची चादर पसरल्या सारखे दिसत होते. ते दृश्य दिसायला छान असेल पण त्यामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान होते. स्ट्रॉबेरीच्या मळ्यात मधून मधून लसूणही लावलेला दिसत होता. शेतकऱ्यांनी असेही सांगितले की दरवर्षी गुड फ्रायडेच्या आसपास स्ट्रॉबेरी महोत्सव असतो, तेव्हा स्ट्रॉबेरीच्या शेतात जाऊन मनसोक्त स्ट्रॉबेरीखाता येते.

परत वाडकरांकडे येऊन मस्त नाश्ता केला आणि गावातील इतर ठिकाणी पुस्तके पाहायला बाहेर पडलो. मनसोक्त तीन चार तास भटकत, पुस्तके चाळत, पाहत त्या छानश्या गावातून फिरलो. एकूण तीस एक घरांतून, पंचवीस-तीस हजार पुस्तके आहेत गावात. लोकांचा उत्साह, आणि एकूण पुस्तकांचे गाव असा लौकिक असलेला अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या प्रकल्पाचे कार्यालय देखील गावातच आहे. तेथे देखील गेलो. सरकारचा पुढाकार, आणि गावकऱ्यांचे सहकार्य, आणि सहभाग यामुळे एक छान संकल्पना येथे उभी राहिली आहे. स्ट्रॉबेरीच्या निमित्ताने कृषी पर्यटन, तसेच पुस्तकांच्या निमित्ताने साहित्य आणि वाचन संस्कृती जोपासण्याचे काम हा प्रकल्प करतो आहे. साहित्य क्षेत्राशी निगडीत वर्षभर विविध कार्यक्रम देखील होत असतात. गावकऱ्यांनी देखील आपापल्या घरांवर साहित्याशी निगडीत, पुस्तकांची, व्यक्तींची चित्रे, रेखाटने काढून आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषेची समृद्धी येथे भेट देणाऱ्यांना कळावी, साहित्यात रुची निर्माण व्हावी, पुस्तके सहजपणे हाताळता यावी असा हा प्रकल्प आहे. मला दत्तात्रय गणेश गोडसे यांचे लोकधाटी हे पुस्तक सापडले, जे मी बरेच दिवस शोधत होतो(त्यांची इतरही पुस्तके जसे ‘गतीमानी’ वगैरे सारखी देखील दुर्मिळ आहेत). अजून एक चांगले पुस्तक पाहता आले, ते म्हणजे स्वरलय, जे मूळ तेलगु पुस्तक आहे सामला सदाशिवा यांचे, ते मराठीत साहित्य अकादेमीने आणले आहे. हे संगीत विषयक पुस्तक आहे. आणखीही अनेक पुस्तकं पाहायला मिळाली.

Peter Patrao

Peter Patrao, Panchgani

आम्ही दुपारी भिलार मधून पुण्याकडे यायला निघालो, वाटेत वाई मध्ये जेवावे असा विचार केला. वाटेत पाचगणी नंतर, पसरणी घाटाच्या अलीकडे, एका ग्राफितीने लक्ष वेधून घेतले. मी थांबलो आणि फोटो काढले. ही ग्राफिती Zostel नावाच्या आगळ्या वेगळ्या हॉटेलच्या(मालवाहतुकीसाठी असलेले कंटेनर वापरून केलेले हॉटेल) आवारात भिंतीवर होती. ती होती Peter Patrao ह्या व्यक्ती संबंधी. त्याचे रेखाचित्र, तसेच पाचगणीत स्ट्रॉबेरी लागवडीचा आरंभ करणारे असा उल्लेख होता. घरी येऊन इंटरनेटवर जरा शोधाशोध केली, तर विस्मयकारक माहिती मिळाली. हा जो पीटर होता, पाचगणीतील बोर्डिंग शाळेत रसायनशास्त्र शिकवायचा, आणि नंतर पाचगणीत स्ट्रॉबेरी लागवड सुरु केली. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले हे पीटर बाबा, इंग्लंडमध्ये नंतर प्रसिद्ध गायक झालेल्या, फ्रेडी मर्क्युरी, हा त्यांचाच विद्यार्थी. ह्याच फ्रेडीवर नुकताच आलेला Bohemian Rhapsody हा चित्रपट मी पाहिला.

असो. वाईसारखे ऐतिहासिक, निसर्गरम्य ठिकाण, पाचगणी, महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणे, प्रतापगड, पांडवगड सारखे किल्ले, जावळीचे बेसुमार जंगल, आणि त्यात भिलार सारखे स्ट्रॉबेरीचे, तसेच आता पुस्तकांचे गाव हे देखील पर्यटकांना नवीन आकर्षण ठरेल यात शंका नाही.

उत्तरयात्रा नॉर्वेची

गेल्या दिवाळीच्या सुमारास मुंबई गोवा अशी अलिशान ऐशोआरामी बोटीतून होणारी आंग्रीया(Angriya, शिवाजी महाराजांच्या आरमारातील आद्य दर्यावर्दी सरखेल कान्होजी नावाची यांच्या नावाची) नावाची सफर सुरु झाली आहे अशी बातमी आली होती. आपण टायटॅनिक हा प्रसिद्ध सिनेमा पाहिलेला असतो. १९१२ मधील अशीच ती सुप्रसिद्ध अलिशान सागर सफारीसाठी प्रसिद्ध अशी अनेक मजली बोट, आणि तिची दुर्दैवी कहाणी. आन्ग्रीया त्या मनाने खुपच लहान आहे अर्थात. माझ्या एका कार्यालयीन सहकारीने एक-दोन वर्षांपूर्वी गेंटिंग ड्रीम(Genting Dream Cruise Liner) नावाच्या एका अलिशान बोटीतून मुंबई श्रीलंका असा प्रवास केला होता. एखादी अलिशान बोट मुंबईत(आणि भारतात) नांगर टाकते असा तो पहिलाच प्रसंग होता. माझे स्वप्न आहे अश्याच कुठल्यातरी सागर सफरीवर आलिशान बोटीतून प्रवास करण्याचे. नाही म्हणायला मी पूर्वी लक्षद्वीपला गेलो तेव्हा बोट प्रवास केला होता २-३ दिवस, पण ती अर्थातच साधी प्रवासी बोट होती.

पुण्यातील एके ठिकाणच्या जुन्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात परवा मीना प्रभू यांचे उत्तरोत्तर ताजे पुस्तक हाती लागले. ते मी पटकन उचलले. त्यांनी नॉर्वे सफरीची, जे उत्तर धुर्वाजवळ असलेला, उत्तर युरोपातील देशाच्या सफरीची कहाणी सांगणारे जाडजूड पुस्तक लिहिले आहे. तेवढेच नाही तर, ते पुस्तक क्वीन मेरी-२ (Queen Mary-2, QMT) या अलिशान बोट प्रवासाबद्दल देखील तितकेच आहे. त्या पुस्तकावर, त्या दोन्ही गोष्टींवर आजचा हा ब्लॉग.

मीना प्रभूंच्या प्रवासवर्णनाच्या पुस्तकांचा अख्खा संच माझ्याकडे आहे. हे पुस्तक नव्हते. मस्त पुस्तके असतात त्यांची, अतिशय वाचनीय. सर्वात आवडते पुस्तक म्हणजे माझे लंडन. त्यांच्या कुठल्याच पुस्तकांवर मी पूर्वी कधी लिहिले नाही. पण ह्या पुस्तकावर लिहावेसे वाटले. त्यांचे उत्तरोत्तर हे पुस्तक अगदी undownputable असेच. त्यात दोन भाग आहेत. पाहिला भाग, जो मोठा आहे, तो आहे उन्हाळ्यात इंग्लंडवरून नॉर्वेचा बोटीने केलेला प्रवास आणि मध्यरात्रीचा सूर्य त्यावेळेस जो पाहिला त्या बद्दल. दुसरा भाग हा हिवाळ्यात इंग्लंडवरून विमानाने नॉर्वेचाच प्रवास, पण ऑरोरा(अर्थात northern lights or aurora) पाहण्यासाठी केलेला या बद्दल आहे.  त्यांचा हा बोट प्रवास ठरेपर्यंतचा प्रवास, बोटीवर चढल्यावर त्या बोटीचे वर्णन, सुखसोयी, त्यांना भेटलेले विविध लोक, त्यांचे स्वभाव, त्यांच्या गमती जमती, त्यांनी बोटींवर अनुभवलेले विविध अनुभव यांचे रसभरीत वर्णन केले आहे. अशा अलिशान बोटींवर प्रवासी काय करू शकतात याची पण त्यांनी झलक वाचकांना दिली आहे. या सर्वांबद्दल लिहिताना जवळ जवळ पहिली १५० पाने खर्ची घातली आहेत, इतके त्यांनी भरभरून लिहिले आहे.

नॉर्वे हा देश देखील अखातातील दुबई, सौदी अरेबिया सारख्या देशांसारखा १९६०-७०च्या दशकात खनिज तेलाच्या शोधामुळे अचानक श्रीमंत झालेला देश. पण विविध नैसर्गिक वैशिष्ट्याने नटलेला देश. त्याची झलक मीना प्रभूंनी पुस्तकात करून दिली आहे. इंग्लंड मधील Southampton येथील बंदरातून त्यांचा क्वीन मेरी-२ या अलिशान बोटीचा प्रवास सुरु होतो. बोटीचा नॉर्वेच्या आधी जर्मनीतील हॅम्बुर्ग येथे नांगर पडला आणि त्यांना हे शहर देखील पाहायला मिळाले, तसेच मीठाकरता प्रसिद्ध असलेले ल्युनबर्ग सुद्धा. नंतर नॉर्वेची राजधानी असलेले ऑस्लो येथे १३० मैलांचा ऑस्लो फिओर्डमधून बोट ऑस्लो बंदराला लागली. ऑस्लो शहर दर्शनाची माहिती, गुस्ताव्ह व्हीग्लंडची उघड्यावरील शिल्पे, कॉन टिकी संग्रहालय(एका नॉर्वेच्या साहसवीराने प्रशांत महासागरात केलेल्या धाडसी प्रवासाची महती सांगणारे) देखील पहिले त्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. नंतर येथे त्यांची बोट Stavanger या गावी गेली. तेथे त्यांनी ऑईल म्युझियम पहिले त्याबद्दल लिहिले आहे. त्यात तेथे त्यांनी पेट्रोपोलीस नावाचा माहितीपट पाहिला. त्यानंतर बर्गन या गावी, जी नॉर्वेची जुनी राजधानी आहे, तेथे गेले. अकराव्या शतकात व्हायकिंग लोकांनी वसवलेले ते शहर. पुढे त्याची बोट आलेसुंड येथे गेली. तिथे ती पहिल्यांदाच गेली असे ते लिहितात. छोटेसेच बंदर, त्यामुळे क्वीन मेरी-२ सारख्या बोटीला तेथे नांगर टाकायला धक्का नाही. समुद्रात दूर कुठेतरी थांबून छोट्या बोटीतून किनाऱ्यावर यावे लागते. शेवटी नॉर्थ केपजवळ मध्यरात्रीचा सूर्य त्यांना पाहता आला त्याची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. हे वाचताना प्रसिद्ध लेखक अरुण प्रभुणे यांनी २०१९च्या पद्मगंधा दिवाळी अंकात लिहिलेल्या एका लेखाचे स्मरण झाले. अमेरिकेतील अलास्का राज्याच्या उत्तर टोकावर स्थित आर्क्टिक प्रदेश, आर्क्टिक (गोठलेला) महासागर परिसरात सहकुटुंब फिरायला गेले असता आलेले रोमांचकारी अनुभव, मध्यरात्रीचा सूर्य, न मावळणारा सूर्य हे सर्व पहिले त्याबद्दल तो लेख होता.

असो. दुसऱ्या भागात मीना प्रभूंच्या पुस्तकात, हिवाळ्यात नॉर्वेला लंडनहून विमानाने प्रवास करून ऑरोरा पाहायला गेल्यावेळचा अनुभव ते कथन करतात. ऑरोरा हा देखील निसर्गाचा मनमोहक अविष्कार नॉर्वेत त्राम्स येथून दिसतो. हा ऑरोरा अमुक एका वेळेस अमुक एका ठिकाणी दिसेलच असे नाही. दोन-तीनदा प्रयत्न करून शेवटी तो त्यांना दिसला. त्याची रोमहर्षक कहाणी, त्या ऐन थंडीतील, बर्फातील दिवसांबद्दल रसभरीत लिहिले आहे.

आता थोडेसे त्यांच्या बोटीवरील अनुभवांबद्दल. मैल दीडमैल लांब असलेली १३ मजली ती बोट, जणू एक गावच. २५०० पेक्षा अधिक प्रवासी, १२०० पेक्षा अधिक कर्मचारी वर्ग, भोजन, उपहार यासाठी असलेली विविध ठिकाणे, मनोरंजनासाठी असलेले विविध पर्याय, ज्यात चित्रपट, संगीत, विविध व्याख्याने(विशेषतः जेव्हा बोटीचा sea day असतो तेव्हा), जादूचे प्रयोग, तारांगण, पब्स, नाईट क्लब्स, नाचण्यासाठी बॉलरुम्स; विविध खेळ खेळण्याची व्यवस्था, आरोग्य, स्वास्थ्याकरिता व्यायामशाळा, स्पा, पोहण्याचे तलाव, हॉस्पिटल वगैरे वगैरे. बोटीवरील विविध शिष्टाचार, वेशभूषा करण्याचे नियम, याची देखील त्यांनी मनोरंजक माहिती ओघवत्या भाषेत दिली आहे. त्या सफरीत विविध विषयांवर बोलण्यासाठी वेगवेगळया तज्ञ मंडळीना बोटीवर बोलावलेले असते, आणि तशी अनेक व्याख्याने त्यांनी ऐकली, अनुभवली. क्वीन मेरी-२ बोटीची, तसेच क्युनार्ड कंपनीचा इतिहास सांगणारे, नॉर्वेचा इतिहास सांगणारे, संगीताबद्दल, अवकाश आणि सूर्यमाला यांची माहिती सांगणारी व्याख्याने त्यांनी ऐकली.

मीना प्रभूंची भाषा अतिशय ओघवती, असे वाटावे की आपण त्यांच्यासोबत बोटीत आणि इतरत्र फिरत आहोत. पाहिलेल्या, ऐकलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची तपशीलवार माहिती, पण नुसती रुक्ष यादिवजा नाही, तर वाचनीय, मनोरंजक, आपल्याला खिळवणारी अशी. शब्दरचना तर इतकी वेगळी, नादमय आणि आनंद देणारी. परवाच बातमी वाचली की नॉर्वेमध्ये तेथील फिओर्डच्या(fjord) खाली floating underwater tunnel तयार करणार आहेत, जेणेकरून वाहतूक विना अडथळा व्हावी. मी हा ब्लॉग लिहिता लिहिता क्वीन मेरी-२ सहलींची माहिती त्यांच्या म्हणजे Cunrad च्या वेबसाईटवर पाहतो आहे. कधी जमणार हे सगळे असा विचार येतो आहे!

मराठी हॅम्लेट

मी माझ्या आधीच्या ब्लॉग मध्ये म्हटल्याप्रमाणे मी शेक्सपिअरचे इतक्यात पाहिलेले हॅम्लेट हे दुसरे नाटक. त्याआधी राजा लिअर पहिले होते तेही कथकली सादरीकरणात. हॅम्लेट हे मराठी नाटक झी मराठीने आणले आहे. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांसोबत नाट्यनिर्मिती क्षेत्रात देखील ते उतरले आहेत, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. आज ह्या मराठी हॅम्लेट नाटकाविषयी लिहायचे आहे.

शेक्सपिअरची नाटके म्हणजे काही विचारायला नको खरे तर. गेली चारशे वर्षे ती कुठे ना कुठे काही ना काही रुपात, भाषेत जगभर सादर केली जातात. ही सार्वकालिक नाटके आहेत. मराठीत देखील त्याच्या नाटकाच्या भाषांतराची, रूपांतराची मोठी परंपरा आहे. वि वा शिरवाडकरांनी त्यांच्या शोध शेक्सपिअरचा या पुस्तकात त्याचा छान आढावा घेतला आहेत. शेक्सपिअरचे नाट्यविश्व कायमच विविध रूपात आपल्यासमोर येत राहते. मी त्याच्या Twelfth Night या नाटकाचे पिया बहुरुपिया नावाचे हिंदी अविष्करण पाहिले होते. मी दोन-तीन वर्षांपूर्वी कर्नाटकातील निनासम येथे एका शिबिरानिमित्त गेलो होतो, तेव्हा तेथे शेक्सपियर मनेगे बंदा(ಶೇಕ್ಸಪಿಯರ ಮನೆಗೆ ಬಂದ, अर्थ शेक्सपियर येती घरा) ह्या नाटकाचा प्रयोग पाहिला होता. हे नाटक म्हणजे शेक्सपियर वरील नाटककाराचे असलेले प्रेम/आदर दर्शवायचा एक प्रयत्न. एका दृष्टीने पहिले तर ती एक प्रकारची जिवंत डॉक्युमेंटरीच म्हणावी लागेल. त्याच्या वेगवेगळया नाटकांची चर्चा, त्यातील प्रसंग आणि पात्रे याचे सादरीकरण, असे एकमेकात गुंफून एक संगीतमय कार्यक्रम होता तो. शेक्सपियरचा एकूण प्रभाव आणि त्याच्यावरील प्रेमच म्हणजे हे नाटक. मराठीतही एकूणच शेक्सपिअरच्या नाटकांचा अनेक अंगाने देखील अभ्यास झाला आहे, त्याची देखील मोठी परंपरा आहे. हॅम्लेट या नाटकाइतकी शेक्सपिअरच्या इतर नाटकांची चर्चा झाली नाही असा इतिहास आहे. हॅम्लेटविषयी प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक टी एस इलियट म्हणतो की हे नाटक वाड्मयातील मोना लिसा आहे.

Halmet

मराठी हॅम्लेट

मराठीत हॅम्लेट नाटक प्रथम आले ते नाना जोग यांच्या भाषांतरामुळे. प्रसिद्ध नट दामू केंकरे यांनी हॅम्लेट रंगवला होता. त्याच भाषांतरवर बेतलेले सध्याचे झी मराठीचे नाटक आले आहे. सुमित राघवन याने अतिशय ताकदीने हॅम्लेट उभा केला आहे. हॅम्लेटच्या मनातील गोंधळ, अस्वस्थता, संशय, राग, हतबलता इत्यादी अनेक भावना विविध प्रकारे त्याने मांडल्या आहेत. सुनील तावडे, तुषार दळवी या सारखे इतर कसलेले अनुभवी नट देखील त्यात आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांचे नाट्यदिग्दर्शन लाभले आहे. हॅम्लेटचा काळ उभा करण्यासाठी नेपथ्य(जे किल्ल्याचे-castle, तसेच राजदरबाराचे आहे), प्रकाशयोजना, वेशभूषा जी लागते त्यात काही कसूर नाही, आणि त्या जोडीला असलेले संगीत(जे राहुल रानडे यांनी दिले आहे). या सर्वांद्वारे प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जाते आणि एखादे मराठी नाटक पाहतो आहे असे न वाटता इंग्लंडमधील नाटक पाहतो आहे असे भासू लागते, हे या प्रयोगाचे यश आहे. बालगंधर्व रंगमंदिरातील प्रयोगाची मी वरून तिकिटे राखली होती. तिथे गेल्यावर समजले की मला बाल्कनीतील आसने मिळाली आहेत. थोडा मी हिरमुसलो. नाटक बाल्कनीतून नव्हे तर पहिल्या पाच रांगेतून पाहायचे असते! पण हळूहळू नाटक जेव्हा सादर होत गेले, मला त्याचा आस्वाद घेताना मी बाल्कनीतून ते पाहतो याची आठवणसुद्धा झाली नाही.

हॅम्लेटची कथा थोडक्यात सांगतो. तशी ती प्रसिद्ध आहेच. ते एक सूडनाट्य आहे. तसेच शोकांतिका देखील आहे, ती देखील हॅम्लेटच्या एकलेपणाची. डेन्मार्कचा राजा असलेल्या वडिलांच्या खुनानंतर त्याचा काका राजपुत्र हॅम्लेटच्या आईबरोबर विवाह करतो. इतक्या घाईघाईत आईने त्याला राजी व्हावे, हे त्या राजपुत्र हॅम्लेटला पटत नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर दुःखीकष्टी झालेला असतो. त्याला वडिलांच्या हत्येचा सूड घ्याचा असतो, पण तो पुरता गोंधळात पडलेला असतो(तसेच इतरांना देखील त्याच्या वागणुकीवरून गोंधळात टाकतो). आईच्या व्यभिचारी वर्तनाचा देखील त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो, एकूणच घृणा वाटत असते. काय करावे त्याला समजत नाही(जगावे की मरावे, to be or not to be, हे ह्या नाटकातीलच हॅम्लेटच्या तोंडी असलेले प्रसिद्ध वाक्य. ह्या नाटकात स्वगतं देखील बरीच आहेत). ह्या सगळ्यातून तो त्याच्यावर प्रेम असलेल्या मुलीच्या प्रेमावर देखील शंका घेऊ लागतो. ह्या सगळ्यातून तो सूड घेतो, पण त्याचा मानसिक प्रवास आपल्या समोर उलगडत जातो.

नाटकात भुताचे एक पात्र आहे, जे हॅम्लेटला वडिलांच्या खुनाबद्दल माहिती देण्यासाठी निर्माण केले आहे. खरेतर नाटक त्याच प्रसंगापासून सुरु होते. ते ज्या पद्धतीने सादर केले गेले आहे, तेथेच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेते. शेवटचा तलवारबाजीचा द्वंद्वाचा प्रसंग देखील खराखुरा वठला आहे. या सगळ्यात हॅम्लेट झालेला सुमित राघवन याने भूमिकेचे सोने केले आहे. ठिकठिकाणी टाळ्या पडतात. अनेक भावभावनांचे प्रदर्शन, एकूण त्याचा वावर, त्याचा एकूण पेहराव हे सगळे एकूण मस्तच जमले आहे त्याला. हॅम्लेट वडिलांच्या खुनाचा सूड घेण्यासाठी एका नाटक मंडळीला पाचारण करतो, आणि नाटक सादर करायला लावतो. त्यावेळेस त्याच्या तोंडी शेक्सपिअरने अभिनायासंबंधी, नाटकासंबंधी काही विचार मांडले आहेत, ते देखील टाळ्या खेचणारे आहेत. अडीच तास खिळवून ठेवणारे, मनाची पकड घेणारे हे नाटक जरूर पाहण्याजोगे आहे.

 

कथकलीतील राजा लिअर

गेल्या एक-दीड महिन्यात मला शेक्सपियरच्या दोन नाटकांचे भारतीय आविष्करण पाहण्याचे भाग्य मला लाभले. शेक्सपियरची नाटके मूळ इंग्रजीतून मी कधी पाहिली नाहीत. लंडनला ती कधीतरी पाहण्याचे माझे स्वप्न आहे. मी इतक्यात पाहिलेल्या नाटकांपैकी त्यातील एक होते हॅम्लेट, जे मराठी रंगभूमीवर झी मराठीने आणले आहे. दुसरे किंग लियर हे नाटक( Kathakali King Lear). आणि हे नाटक केरळच्या सुप्रसिद्ध नृत्य-नाट्य प्रकार असलेल्या कथकलीच्या रूपात सादर करण्यात आले, तेही खुद्द पुण्यात! त्याबद्दल आज येथे थोडेसे. हॅम्लेट बद्दल नंतर कधीतरी. वि वा शिरवाडकर यांचे नटसम्राट हे सुप्रसिद्ध नाटक खरे तर किंग लिअरचेच रुपांतर आहे, अर्थात बरेच बदल असलेले. पण कल्पना तीच, आणि ती देखील शोकांतिकाच.

शरद भुताडिया अभिनीत राजा लिअर हे नाटक बऱ्याच वर्षांपूर्वी(२००१) पाहिले होते(जे विंदा करंदीकर यांच्या भाषांतरावर आधारित होते). कथकलीतील राजा लिअर पाहायला मिळणार म्हणून मी तसा हरखून गेलो होतो. कथकलीचा प्रयोग देखील मी कधी पाहिला नव्हता. कथकली हा प्रकार तसे पहिले तर मुकनाट्य प्रकार. मुद्राभिनय आणि इतर तंत्रे वापरून, शब्दांविना गोष्ट सांगायची. मी पूर्वी कधीतरी लक्षद्वीप बेटांवर जाताना केरळ मधील कोची येथे उतरलो होतो, तेव्हा कार्यक्रम पहायचा हुकला होता. पुण्यात झालेल्या कथकली राजा लिअर ह्या कार्यक्रमाचे स्थळही खरे तर आकर्षण होते. संध्याकाळ होऊन हळू हळू रात्र चढत होती. हवेतील गारवा देखील सुसह्य होता. पुण्यातील प्रसिद्ध विज्ञान संशोधन केंद्र, जे पाषण रस्त्यावर आहे, त्याच्या क्रिकेट क्रीडांगणावर एका बाजूला हिरवळीवर कथकलीचा रंगपट उभारला गेला होता. अगदी मोजकेच प्रेक्षक कार्यक्रमाला आले होते. तेथे गेल्यावर एक पत्रक देण्यात आले, त्यात या अनोख्या प्रयोगाबद्दल सविस्तर दिले होते. ते पत्रक खरे तर अमेरिकेत नाटकाला गेल्यावर देण्यात येणाऱ्या playbook सारखे होते.

दोन भिन्न संस्कृतीतील दोन वेगळ्या कालाप्रकारांचा संगम असलेल्या कथकलीच्या रूपातील राजा लिअर हे नाटक खरे तर १९८९ मध्ये रंगभूमीवर आले होते. पण त्याची सुरुवात १९८८ मध्येच झाली होती. म्हणजे तीस वर्षांपूर्वी. त्यावेळेस त्याचे जगभर दहा वर्षे प्रयोग होत राहिले. लंडनच्या ग्लोब थिएटर मध्ये १९९९ मध्ये शेवटचे काही प्रयोग होऊन ते थांबले. ऑक्टोबर २०१८ मध्ये निर्मात्यांनी (The Annette Leday/Keli Company) परत हे नाटक पुनर्जिवित करायचे ठरवेले. Trivandrum Alliance Francaise ने केरळ मध्ये तालमी आयोजित केल्या. आधीच्या निर्मितीची कागदपत्रे, विडियो वगैरे पाहून अभ्यास करून हा प्रयोग सज्ज करण्यात आला. हे सगळे वाचून प्रयोगाच्या विषयी उत्सुकता ताणली गेली होती.

आम्ही त्या क्रिकेट मैदानावरील हिरवळीवर स्थानापन्न झालो होतो. रंगमंचावर कथकलीच्या दरम्यान असणारा पडदा ओढला गेला होता. आजूबाजूस केरळी कलाकार त्यांच्या पांढऱ्या लुंग्यांवर आणि काही वाद्यांसोबत दिसत होते. तेवढ्यात कथकली मधील प्रमुख पात्र जे कथकली वेशात कुठून तरी येऊन पडद्यामागे अंतर्धान पावतो. कथकली हे केरळ मध्ये प्रामुख्याने मंदिराच्या पटांगणात होतो(केरळ मधील मंदिरे अतिशय वेगळी असतात, मी ती पाहिली आहेत. मी गुरुवायुर मंदिराच्या आवारात मोहिनीअट्टम नृत्य पहिल्याचे आठवले). प्रयोग सुरु करण्यापूर्वी दोन वादक त्यांचे वाद्य घेऊन मंदिरात आशीर्वचनपर वादन करतात. तसेच काहीसे वादन आम्ही बसलो होतो त्यामागे सुरु झाले. आणि वातावरण एकदम बदलले.

प्रसिद्ध साहित्यिक विंदा करंदीकर यांचे राजा लिअर नाटकाचे मराठी भाषांतराचे पुस्तक माझ्याकडे आहे, ते तसे थोडेफार वाचले होते. वर उल्लेल्ख केलेलेया शरद भुताडिया यांचा प्रयोग ह्याच भाषांतरावरून सज्ज केला आहे. त्यात गो वि करंदीकर यांची दीर्घ प्रस्तावना, भाष्य देखील आहे, अनेक अंगाने नाटकाची चिकित्सा केली आहे. एकूण पाच अंकात असलेल्या ह्या मोठ्या नाटकात मोठमोठे संवाद त्यात तर आहेत, तसेच दीर्घ स्वगतं देखील त्यात आहेत. हे सगळे कथकलीच्या माध्यमातून कसे सादर होणार ह्याचीच उत्सुकता लागून राहली होती. हे नाटक म्हणजे शेक्सपिअरकृत अनेक ज्या शोकांतिका आहेत त्यातील एक शोकांतिका आहे. काय आहे या जगप्रसिध्द काव्यनाट्याची कथा. थोडक्यात सांगतो. आम्हाला दिलेल्या पुस्तिकेत थोडक्यात अशी एकूण नऊ प्रवेशात विभागलेली या नाटकाची कथा सांगितली आहे.

वार्धक्याकडे झुकलेला राजा लिअर आपले राज्य तीन मुलींच्यात वाटायचे ठरवतो. पण एक वेडसर अट घालतो, ती अशी की त्या मुलीनी बापाला पटवून द्यायचे की त्या त्याच्यावर किती जास्त प्रेम करतात ते. असे प्रेमाचे हीन प्रदर्शन तिसऱ्या मुलीला, म्हणजे कॉर्डेलीयाला पसंत नाही, आणि त्यात भाग घेत नाही. अर्थातच मुर्ख राजाला हे अपमानास्पद वाटते. तीचा विवाह फ्रान्सच्या राजाशी होतो, आणि तो तीला काही न देता तिची पाठवणी करतो. इतर दोन्ही मुली प्रेमाचा देखावा करून राज्य मिळवतात आणि आपल्या बापाला ते हाकलून देतात. राजा लिअरचे अर्थात या सर्वामुळे मानसिक संतुलन बिघडते. कॉर्डेलीया त्याला तश्या स्थिती आधार देते, सावरते, आणि त्याला बरे करण्याच्या मार्गात असते. पण तेवढ्यात इतर दोन मुली (ज्यांचे जेथे विवाह झाले आहेत, ते राज्य, म्हणजे ब्रिटीश) आणि कॉर्डेलीयाच्या फ्रेंच राजाचे सैन्य यांत युद्ध सुरु होते. त्यात कॉर्डेलीयाचा पराभव होतो, तीला कैद होते, तीला मृत्युदंड होतो. हे सर्व समजून अतीव शोकाने, मानसिक संतुलन बिघडलेल्या स्थितीत त्याचा मृत्यू होतो. दुर्वासगोत्री पित्याचा(राजा लिअर) अविवेक आणि मुलींचा तितकाच तीव्र अहंकार यांच्या संघर्षातून ही शोकांतिका उभी राहते.

अश्या ह्या विविध चढ उतार असलेल्या वादळी नाटकातील विविध प्रसंग, भावभावनांचा कल्लोळ, विविध प्रकारचे वातावरण या सर्वांचे प्रदर्शन या कथकली नाट्यनृत्य सादरीकरणातून प्रभावीपणे विना संवाद आपल्यासमोर सादर होते. राजा लिअर झालेला प्रमुख कथकली कलाकार तर अतिशय लाजवाब. कथकलीची रंगीबेरंगी भव्यता, हावभाव, हस्तमुद्रा हे अतिशय प्रेक्षणीय झाले. केरळी मार्शल आर्ट प्रकार कलारीपयट्टू वापरून काही युद्धाचे प्रसंग रंगवले आहेत. जंगलातील वादळवारा तालवाद्याच्या (चेन्डा, आणि मद्दलम) वैशिष्ट्यपूर्ण वादनाने निर्माण होते. शेवटचा प्रसंग ज्यात राजा लिअर मृत कॉर्डेलीयाच्या जवळ बसून जो विलाप करतो त्याला तोड नाही. विनाव्यत्यय असलेल्या ह्या ९० मिनिटाचे सादरीकरण सगळ्यांना अगदी भारावून टाकते.

Romancing Pancham

४ जानेवारी. अवलिया संगीतकार पंचम उर्फ आर डी बर्मन यांचा पंचविसावा स्मृतीदिन. १९९४ साली याच दिवशी पंचम कालवश झाले. एका युगाचा अंत झाला, आणि पण त्यांचे अमर संगीत, रचना, व्यक्तिमत्व मागे ठेवून. हिंदी चित्रपट संगीत शौकीन, रसिक, जरी वर्षभर त्यांच्या संगीतात आकंठ बुडालेले असतात, तरी ह्या दिवशी, आणि तसेच त्यांच्या जन्मदिनी म्हणजे २७ जून, ह्या दोन्ही दिवशी, त्यांच्या संगीतात रममाण होण्याची रसिक वाट पाहत असतात. ते म्हणजे पुण्यातील पंचममाजिक तर्फे आयोजित ह्या दोन्ही दिवशीच केले जाणारे कार्यक्रम. कालच मी अजून एक असाच Romancing Pancham नावाचा त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम पाहून आलो. त्याबद्दल लिहायचे आहे.

खरे तर २००० सालापासून, प्रत्येक वर्षी दोन असे कार्यक्रम, मध्ये काही मोजके विशेष कार्यक्रम, असे रसिकांना मेजवानी देणारे उपक्रम PanchamMagic तर्फे चालवले जात आहेत. मी त्यातील काही मोजकेच कार्यक्रम पाहू शकलो आहे. त्या बद्दल मी पूर्वीही लिहिले आहे(Remembering Pancham, Pancham Ek Toofan). तसे पहिले तर PanchamMagic ही संस्था, जिच्या तर्फे हे कार्यक्रम होतात, त्याची सुरुवात माझा शाळकरी मित्र महेश केतकर  आणि अर्थाच त्याचे सहकारी राज नागुल, आशुतोष सोमण, अंकुश चिंचणकर या सर्वानी केली. आम्ही दोघेही चिंचवडचे रहिवासी, लहानपणापासून एकाच शाळेत(तो एक वर्ष माझ्या पुढे), एकत्र क्रिकेट खेळलेलो वगैरे. हा पठ्या दहावीत बोर्डात आलेला. त्याच वेळेस गिटार देखील शिकलेला. दहावी-बारावी नंतर आमचे मार्ग भिन्न झाले. चिंचवडहून दररोज पुण्यात उपनगरीय रेल्वेने, शिक्षणासाठी, कामासाठी, प्रवास करत असल्यामुळे अधूनमधून भेट होत राही. हिंदी चित्रपट, संगीत यांच्या प्रती त्याचे प्रेम वाढत चालले समजत होते. पण एक दिवशी अचानक तो आणि त्याचे इतर सहकारी राज नागुल, अंकुश इत्यादी मंडळीनी थेट पंचमवर, त्याच्या संगीतावर रसग्रहणात्मक कार्यक्रम सुरु करणार हे समजले. आणि तो सारा प्रवास, एका वेडाचे, भान विसरून छंदाचा मागोवा घेण्याचा प्रयत्नाचे रुपांतर आता एका मोठ्या उपक्रमात झाल्याचे पाहून खूप आनंद झाला. आधी गुगल ग्रुप्स, PanchamMagic संकेत स्थळ, फेसबुक ग्रुप वगैरेच्या माध्यमातून पंचम वेडे रसिक यांचे एक मोठे कुटुंब झाले आहे. वर्षातून या दोन्ही दिवशी पंचम साठी एकत्र येणे हा आता एक सोहळा झाला आहे. त्या साऱ्या प्रवासाचा काही प्रमाणात मी साक्षीदार असल्याचा मला अभिमान वाटतो.

Program's poster

Program’s poster. Image courtesy Panchammagic group on Facebook.

हा कार्यक्रम पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथेच प्रत्येक वेळेस होतो, एखाद दुसरा अपवाद वगळता. तिकिटे खुली कधीच मिळत नाहीत, दर वेळेस महेशला किंवा आणखीन कोणाला तरी सांगून राखावी लागतात. कार्यक्रम हाउसफुल्ल असतो. हाही कार्यक्रम हाउसफुल्ल होता. मी एक तास आधीच पोचलो होतो, गाडी पार्क करून आवारात हिडत होतो. हवेत मस्त असा गारवा होता. उत्साह भरला होता. ठिकठिकाणी लोकांची टोळकी गप्पा हश्या यात रंगली होती. सगळे पंचमच्या प्रेमापोटी वर्षानुवर्षे या कार्यक्रमाला येत असतात. मनात आले की एखादे वेड कसे मोठे रूप धारण करू शकते, यांचे उत्तम उदाहरण महेशच्या ध्यासाने, वेडाने करून दाखवले. आत गेलो, नेहमी प्रमाणे रंगमंचावर पंचमचा फोटो होता. आणि भला थोरला असा पियानो देखील होता.

ह्या वेळच्या कार्यक्रमात सुरुवातीला पाचारण केले ते विनोद शहा यांना. ते कित्येक हिंदी चित्रपटांचे निर्माते आहेत आणि पंचम बरोबर काम केले आहे. कला सोना, धन दौलत, मेरे जीवन साथी, झलाझला असे अनेक चित्रपट. त्यांनी त्यांची निर्मिती असलेल्या कित्येक चित्रपटांच्या संदर्भातील अनेक गोष्टी, त्यातही पंचमशी निगडीत, त्याच्या संगीत निर्मिती प्रक्रियेविषयी गोष्टींना हृद्य उजाळा दिला. त्यांच्या चित्रपटांचे जुने पोस्टर्स पाहायला मिळाल्या, त्यातील गाण्यांच्या medley अधूनमधून ऐकायला मिळाल्या. त्यांच्या ‘मेरे जीवन साथी’ ह्या चित्रपटातील रेकॉर्ड ब्रेकिंग गाणे ‘ओ मेरे दिल के चैन’ ह्याच्या संगीताची जन्मकथा सांगितली. त्यांचे, राजेश खन्ना, पंचम, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक किशोरकुमार ही त्यांची टोळी. ते सगळे कसे काम करत ह्या बद्दल सांगून सगळ्यांना त्या काळात नेले. पंचमच्या मनस्वीपणाचे, संगीत उत्कृष्ट कसे करता येईल याचा सतत विचार, त्याचा दिलदारपणा, या बद्दलचे अनेक किस्से सांगून त्यांनी प्रेक्षकांचे डोळे पाणावले. महेशने आणि त्याचा सहकारी अंकुश चिंचणकर यांनी त्यांना बोलते केले. करण शाह ह्या अभिनेत्याला देखील आला होता. त्याची एकुलता एक गाजलेला चित्रपट जवानी याबद्दल तो बोलला. हा चित्रपट १९८४ चा. पुढे पंचमला काम मिळेनासे झाले, काही तरी बिनसले होते. हळू हळू त्याचा करिष्मा कमी होत गेला, त्या दिवसांबद्दल तो, त्याची पत्नी भावना बलसावर आणि विनोद शहा बरेच बोलले. प्रसिद्ध सिनेपत्रकार चैतन्य पदुकोण, ज्यांनी २०१६ मध्ये पंचमवर R D Burmania: Panchamemoirs नावाचे पुस्तक लिहिले आहे, ते देखील आले होते.

मध्यांतरानंतर प्रसिद्ध पियानो वादक, जाझ संगीत वादक लुईस बँक्स (जे मुळचे नेपाळचे) यांना रंगमंचावर पाचारण करण्यात आले. त्यांनी अर्थातच पंचम बरोबर काम केले होते. त्याबद्दल तर ते बोललेच, पण ते त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल, एकूण त्यांच्या संगीतप्रवासाबद्दल बोलले. पंचम यांनी त्यांना एका हॉटेल मध्ये वादन करत असताना कसे हेरले याबद्दलचा किस्सा सांगून त्याच्या गुणग्राहकते बद्दल बोलले. आता सत्तरीत असलेल्या लुईस यांनी पियानोवर वेगवेगळया सुरावटी आळवल्या. त्यांच्या बरोबर साथीला अश्विन श्रीनिवासन हे बासरीवादक देखील आले होते. त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे साथ देऊन रंगत आणली. त्यांची काही व्हिडिओ येथे पाहायला मिळतील. लुईस बँक्स हे स्वतंत्रपणे पाश्चात्य संगीतकार आहेत. त्यांची स्वतःची वेबसाईट आहे, तेथे त्यांच्याबद्दल, त्यांच्या एकूण संगीत प्रवासाबद्दल बरीच माहिती आहे, ती येथे जरूर पहा. लुईस बँक्स यांनी पंचमचा आधुनिक मोझार्ट असा उल्लेख करून रसिकांची वाहवा मिळवली.

गेली पाच वर्षे पंचम टाईम्स नावाचे पंचमने संगीत दिलेल्या विविध चित्रपटांबद्दल त्यावेळच्या मासिकांतून, वृत्तपत्रांतून आलेल्या विविध लेखांचे, पोस्टर्स आणि इतर मनोरंजक माहिती यांचे संकलन असलेले एक पत्रक या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित केले जाते. जुन्या गोष्टींना उजाळा मिळतो. ह्या वर्षी देखील असेच पत्रक प्रकाशित करण्यात आले. ते शोले चित्रपटाला खास वाहलेले आहे. त्याची प्रत सगळ्यांना कार्यक्रम संपल्यावर जाताना दिली गेली. तर असा हा पंचमच्या विश्वात नेणारा रसिकांचा आवडता कार्यक्रम, त्याच्या आठवणी मनात रुंजी घालत, मध्यरात्री घरी परतलो.