Oedipus Rex Opera

आपल्या पुण्यात प्राचीन ग्रीक नाटकांचे(ज्या ग्रीक शोकांतिका म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत) प्रयोग सादरीकरण कधी झालेले ऐकले नाही(चू. भू. द्यावी घ्यावी!). शेक्सपियरच्या नाटकांचे मराठीत अथवा इंग्रजीत, कधी कधी प्रयोग होत असतात. मी तीही विशेष पाहिली नाहीत. राजा लिअर(King Lear) पाहिल्याचे आठवते आहे. सूर्य पाहिलेला माणूस हे डॉ. श्रीराम लागू यांचे ग्रीक पार्श्वभूमी असलेले नाटक पहिले आहे, पण ते मूळ ग्रीक नाटक नव्हे, ते आहे मकरंद साठे यांचे. काल सकाळी सकाळीच समजले की Oedipus Rex, हे इडिपस राजाच्या जीवनावरील प्राचीन ग्रीक नाटक होणार आहे. म्हटले जाऊयात. पु ल देशपांडे यांनी राजा ओयादिपौस या नावाने ते नाटक अनुवादित केले होते हे माहीत होते. पुण्यातील Alliance Francaise या फ्रेंच भाषा शिकवणाऱ्या संस्थेतर्फे होणार होते. गेली ७० वर्षे फ्रान्स मध्ये Aix-en-Provence Festival नावाचा एक संगीत महोत्सव होतो. त्या निमित्ताने हा कार्यक्रम होणार होता. पुण्यातील IISER या संस्थेच्या प्रेक्षागृहात तो होणार होता. तेथे सातच्या आत गेलो, रंगमंचावर काहीच हालचाल नव्हती. रंगमंच देखील नाटकाच्या प्रयोगाला छोटासा वाटत होता. मनात पाल चूकचुकली. थोड्यावेळात आयोजक आले, आणि त्यांनी सांगितले की हा Oedipus Rex या नाटकावर आधारित ओपेरा आहे आणि ते आम्हाला त्याचे रेकॉर्डींग दाखवणार आहेत. मग सगळा उलगडा झाला.

त्या ओपेराची माहिती असलेला थोड्यावेळात आमच्या हातात एक कागद दिला गेला. त्यात त्या ओपेराचे शब्द(libretto) होते. तो ओपेरा Igor Stravinsky या संगीतकाराने बसवला होता. ओपेराचे शब्द मूळ नाटकावरून फ्रेंच आणि मग लॅटिन भाषेत आणले होते, त्यावर आधारित तो ओपेरा असणार होता. त्याबद्दल सांगताना निवेदिकेने आधीच कल्पना दिली की हा ओपेरा लॅटिनमध्ये असल्यामुळे तो समजणार नाही. त्यामुळे ओपेराच्या मूड मध्ये जाऊन त्याचा आस्वाद घ्यावा लागेल. आधी दिलेल्या libretto च्या कागदावरून थोडेफार समजेल. त्यात लॅटिन, आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत शब्द होते. काहीतरी वेगळे पाहायला मिळेल म्हणून आसनावर सरसावून बसलो.

नुकतेच मी मुंबई भेटी दरम्यान परत नव्याने सुरु झालेले Royal Opera House पाहून आलो होतो. अर्थात त्यावेळेस तेथे ओपेरा नव्हता. पण आतील कलात्मक, वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासारखी आहे. Pretty Woman सारख्या सिनेमातून ओपेरा म्हणजे काय असतो याची झलक आपल्याला झाली असते. मराठी संगीत नाटक ओपेरावरून आले असे म्हणतात. ओपेराचा आकृतिबंध संगीतीकेचा. निवेदन आणि संवाद दोन्ही पद्य रूपात साधारण असते, जोडीला बऱ्याचदा नृत्य(ballet) देखील असते. साधारण प्रेम, विरह, सूड, दुःख अश्या भावना तार स्वरात गाऊन, नृत्य, आणि पाश्चिमात्य कंठ आणि वाद्य संगीत, प्रामुख्याने ग्रीक, लॅटिन शब्द, उंची पाश्चिमात्य पोशाख असे सर्व त्यात असते. श्रीकृष्ण पंडित यांचे एक ओपेराच्या गोष्टी म्हणून एक पुस्तक आहे, ज्यात त्यांनी तीन ओपेरांच्या संहितेचे अनुवाद दिले आहेत. मी २०१४ मध्ये फिलाडेल्फिया मध्ये गेलो असता, तेथील The Barnes Foundation मध्ये एक ओपेराची झलक A Taste of Opera(Ainadamar) दाखवणारा कार्यक्रम पाहिला होता. त्यात लोर्का या स्पेनच्या नाटककाराच्या जीवनाची कथा सांगितली होती. या सर्वामुळे ह्या ओपेराची चित्रफीत पाहायला मी उत्सुक होतो.

Oedipus Rex या सोफोक्लेसकृत ग्रीक शोकांतिकेची कथा, अगदी थोडक्यात, साधारण अशी आहे. एका ग्रीक पुराणककथेवर आधारित हे नाटक आहे. राजा इडिपसला आपले पिता म्हणजे राजा लुईस आहेत हे माहीत नसते. राजा लुईस यांच्या मरणाला तो कारणीभूत झालेला असतो. तसेच गंमत म्हणजे अजाणतेपणी त्याचा दिवंगत राजा लुईसच्या पत्नीबरोबर, म्हणजे आईबरोबर विवाह होतो. काहीतरी धार्मिक अनाचारामुळे प्लेग रोगाच्या साथीने प्राचीन ग्रीसमधील थेब्सला ग्रासले असता, याला जबाबदार कोण याचा शोध घेण्यासाठी राजा इडिपस फर्मान काढतो. प्रजेच्या आवाहनानुसार तो ते करत असता, त्याला उमजते की तो स्वतःच याला जबाबदार आहे. त्याला हेही समजते की राजा लुईसच्या मृत्यूला देखील तोच जबाबदार आहे तसेच त्याची आई म्हणजे त्याची पत्नी जोकोस्टा आहे, हे समजल्यावर तर तो भ्रमिष्ट होतो, आणि आपले स्वतःचे डोळे काढून घेतो आणि अंध होतो. ही त्याची नियती आणि शोकांतिका.

Oedipus Rex Opera

Oedipus Rex Opera

हा ओपेरा(Oedipus Rex/Symphonie de Psaumes ) जो मी व्हिडियो स्क्रीनिंग रूपात पाहिला हा दोन अंकी होता, आणि २०१६ मध्ये Paris च्या Grand Theater de Provence झालेल्या प्रयोगाचे ते रेकॉर्डींग होते. निवेदकाने ह्या ओपेराच्या इतिहासाबद्दल थोडसे कथन केले. यांचे प्रयोग १९२७ पासून सुरु आहेत. संवाद, जे पद्य रूपात आहेत ते लॅटिन भाषेत आणि निवेदन(narration) हे फ्रेंच भाषेत आहे. हा ओपेरा असल्यामुळे मूळ नाटकातील काही महत्वाच्या घटनांचेच चित्रण यात केले गेले आहे. नाटकात आणि ह्या ओपेरात प्रजाजन हा महत्वाचा घटक असल्यामुळे, येथे सुद्धा जवळ जवळ ४०-५० जणांचा कोरस आहे, आणि त्यांचे गाणे देखील बऱ्याच वेळेस येते. नेपथ्य अगदी जुजबी, वेशभूषा तर आजच्या जमान्यातील. प्रजा शर्ट, जीन्स आशा रूपात, आणि राजा तर सुट, बूट, टाय अश्या रूपात. इतर काही पात्रे जसे की जोकोस्टा गाऊन परिधान करून आले होते. मी हा पाहिला अंक पाहिला, दुसऱ्या अंकांचा सुरुवातीची काही मिनिटे पाहिला आणि भूक लागली म्हणून उठून निघून गेलो. अर्थात शब्दतर काही कळत नव्हते, कथा थोडीशी मोघम माहिती होती, म्हणून थोडेफार काय चालू आहे हे समजत होते. नेपथ्य, वेशभूषा देखील प्रेक्षणीय नसल्यामुळे नेत्रसुख विशेष नव्हते. कंठ आणि वाद्य संगीताचे श्रवणसुख घेण्याचा प्रयत्न केला, पण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे समजत न्हवते, गाढवाला गुळाची चव ती काय येणार! त्यातल्या त्यात अभिनय(प्रामुख्याने राजाची भूमिका केलेल्या अभिनेत्याचे ), भावभावना यांचा अविष्कार थोडाफार उमजत होता, ही जमेची बाजू.

पुण्यात Alliance Francaise च्या निमित्ताने बरेच असे कार्यक्रम आखले आहेत. ते त्यांच्या संकेतस्थळावर जाणता येतील.

Advertisements

Royal Opera House: Reliving History

आपल्याला ओपेरा म्हटले की मराठी संगीत नाटकं, ओपेरा हाउस म्हटले की आपल्याला युरोप मधील, तसेच ऑस्ट्रेलिया मधील प्रसिद्ध Sydney Opera House ची आठवण येते, आणि मुंबईतील ओपेरा हाउस असे नाव असलेला भाग आठवतो. पण आपल्या मुंबईत देखील ओपेरा हाउस, तेथे पूर्वी संगीताचे कार्यक्रम होत असत हे माहिती नसते. मला तरी हे मला तरी माहितीच नव्हते. १०-१२ वर्षांपूर्वी मुंबईतल्या गिरगावातील झव्हेरी बाजार  येथे काही कामानिमित्त येथे गेलो असता जवळच असलेल्या Royal Opera House चे प्रथम दर्शन झाले. ते अर्थातच त्यावेळेस बंद होते. मध्ये केव्हा तरी ऐकले होते की त्याचे संवर्धन, नुतनीकरण करून परत सुरु करणार आहेत. २०१६ परत ते २३ वर्षानंतर नुतनीकरण झाल्यावर सुरु झाले, त्यावेळेस प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांचा Royal Opera House वरील लेख देखील वाचण्यात आला होता. तेव्हापासून तेथे जायची मला ओढ लागली होती. त्याची वेबसाईट देखील सुरु झाली आहे. १९०८ मध्ये ब्रिटीशांनी तो पाश्चिमात्य संगीताचे कार्यक्रम(soap opera, western music) करण्यासाठी तो बांधला होता. गेल्या २०-२५ वर्षांपासून तो बंदच होता. हे ओपेरा हाउस म्हणे खाजगी मालकीचे आहे(गुजरातेतील गोंदल संस्थानिक). मागील आठवड्यात मुंबई भेटी दरम्यान तेथे जावे असे ठरवले.

जायच्या आधी त्यांच्या वेबसाईट वर पहिले की काय कार्यक्रम आहेत. मी जायच्या दिवशी मुक्त प्रवेश असलेला शिल्प, चित्र आणि नृत्य एकत्र असलेला दीडएक तासांचा कार्यक्रम असणार होता. मी थोडासा खट्टू झालो. मला तेथे ओपेरा पहायचा होता. त्यासाठी परत केव्हातरी येऊ असा विचार करून तेथे संध्याकाळी पोहोचलो. बाहेरून, आतून ओपेरा हाउसची इमारत पाहून हरखून गेलो. अतिशय कलाकुसर हे वैशिष्ट्य असणारे Baroque वास्तूशैली असलेली ही इमारत. मुंबईतील जुन्या इमारती, त्यांच्या विविध वास्तूशैली हा वेगळाच विषय आहे. ही इमारत तीन माजली आहे, समोर छानसे मोकळे आवार, आतील संगमरवरी बांधकाम, जोडप्यांनी बसून संगीताचा आस्वाद घेण्यासाठी केलेली बैठक रचना(royal box), वाद्यवृंदासाठी रंगमंचासमोर जागा(orchestra pit), लाल रंगाचा गालीचा, चित्रे असलेले छत, डोळे दिपवणारी मोठमोठाली झुंबरं हे सर्व आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते. मुंबईत, तसेच भारतात हे म्हणे एकमेकव असे ठिकाण आहे. पुण्यात मी Poona Music Society तर्फे आयोजित western music चे कार्यक्रम एक-दोनदा अनुभवले आहेत(जसे की Opus Gala), पण त्यांचा Mazda Hall हे काही ओपेरा हाउस नाही.

आम्हाला कार्यक्रमाला तसा थोडा उशीरच झाला त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर dress circle मध्ये जागा मिळाली. पण वरून संपूर्ण ओपेरा हाउसचा नजारा छान दिसत होता. सतीश गुप्ता नावाच्या कलाकाराचा Wings of Eternity हा कार्यक्रम होता. त्यांनी लिहिलेल्या Zen Whispers या पुस्तकाचे प्रकाशन देखील होते. रंगमंचावर गरुडाच्या पंखांच्या सोनेरी रंगातील मोठाले असे शिल्प मांडले होते. आम्ही आत जाऊन बसे पर्यंत, त्यांची मुलाखत चालू होती. नंतर काही स्वरचित इंग्रजी हायकूचे देखील त्यांनी अभिवचन केले. बौद्ध धर्मीय घालतात तसा पेहराव परिधान करून सतीश गुप्ता एका मोठ्याला ब्रशने calligraphic paintings काढत होते. त्या शैलीला gestural painting असेही म्हणतात असे त्यांनी दिलेल्या पत्रकावरून समजले. मागे गुढ असे कुठलेसे वाद्यसंगीत चालू होते. ईशा शर्वणी नावाच्या नर्तीकेने गरुड नृत्य सादर केले. नृत्य अर्थात प्रेक्षणीय होते. पण ह्या सगळ्या visual and performing art fusion मधून अर्थात काय म्हणायचे हे काही विशेष समजले नाही. कार्यक्रम संपला आणि आम्हाला अर्थातच बाहेर पडावेसे वाटत नव्हते. अगदी हरखून खाली वर जाऊन संपूर्ण ओपेरा हाउस पहिले, भरपूर छायाचित्रे काढली. ओपेरा हाउस मध्ये एके ठिकाणे gift shop आहे. पण त्यांनी निराशा केली. ओपेरा हाउसची माहिती देणारी पुस्तके, स्मरणिका, छायाचित्रे, magnets असे काही नव्हतेच तिथे. बाहेरील आवारात सतीश गुप्ता यांच्या काही चित्रांचे प्रदर्शन, त्यांची पुस्तके मांडली होती.

image

मुंबईतील ह्या आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अश्या स्थळांपैकी असलेले ह्या ओपेरा हाउसची अधिक माहिती त्यांच्या वेबसाईट वर मिळू शकेल, आणि विकिपीडियावर देखील आहे. त्यांनी त्यांची वेबसाईट आणखीन माहितीने सजवली पाहिजे, एवढा मोठा १०० वर्षाहून अधिक इतिहास असलेल्या ह्या ओपेरा हाउस बद्दल विशेष माहिती अशी काहीच नाही. माझ्याकडे पांढरपेशांच गिरगाव नावाचे मधुसूदन फाटक यांचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी जुन्या गिरगावच्या आठवणी सांगितल्या आहेत. ओपेरा हाउस गिरगावातच आहे. त्यांनी देखील त्याचा थोडाफार इतिहास दिला आहे. संगीताचे कार्यक्रम तेथे होत असत, आणि नंतर नंतर चित्रपटही तेथे लागत असे सांगतात.

असो. तुमच्या पुढील मुंबई भेटी दरम्यान हे आपल्या नशिबाने परत सुरु झालेले ओपेरा हाउस तुमच्या भटकंतीच्या यादीत जरूर असू द्या. तेथे कायमच काहीना काही कार्यक्रम चालू असतात. आम्ही तेथून बाहेर पडलो ते लवकरात लवकर परत एखादा ओपेरा असेल तेव्हा परत यायचे हे ठरवूनच!

Music of Satyajit Ray

पुढील आठवड्यात ह्या वर्षीच्या जगप्रसिध्द ऑस्कर चित्रपट पुरस्कारांची घोषणा होईल. गेले काही वर्षे मराठी चित्रपटांची ऑस्करमध्ये वर्णी लागण्याची चर्चा होत आहे. पण मला ऑस्कर म्हटले की १९९१ मध्ये दूरदर्शनवर पाहिलेल्या ६४व्या ऑस्कर सोहळ्याची आठवण येते. त्यात प्रसिद्ध भारतीय/बंगाली चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गतकालातील प्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्न(Audrey Hepburn) ही त्यांच्या बद्दल त्यावेळेस बोलली. वयोवृद्ध असे सत्यजित राय अतिशय आजारी होते, हॉस्पिटल मध्ये आपल्या पलंगावर आडवे पडलेले, आणि ऑस्करची बाहुली हातात घेऊन त्यांनी केलेले छोटेखानी भाषण या सर्वाचे दृश्य अजून डोळ्यासमोर आहे. (नंतर त्यांना १९९२ मध्ये निधनापूर्वी भारत रत्न पुरस्कार देखील मिळाला). पण त्यावेळी ह्या चित्रपट दिग्दर्शकाचे कर्तृत्व समजण्याचे वय आणि समजही नव्हती. नंतरही काही विशेष उमजले असे काही नाही, कारण चित्रपट माध्यम साक्षरता, आस्वाद साक्षरता हा प्रकार माझ्या गावीदेखील नव्हता. कित्येक वर्षे पुण्यात FTII, NFAI यांसारख्या चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असूनही त्या विषयाकडे लक्ष गेले नव्हते. गेल्या वर्षी चित्रपट रसास्वाद शिबिरात गेलो आणि ह्या माध्यमाचे, कला प्रकारचे विविध पदर, वेगवेगळया व्यक्तींचे काम या सर्वांची तोंडओळख झाली. त्यात सत्यजित राय यांचे नाव अर्थातच भारतीय चित्रपट क्षेत्राच्या निमित्ताने सर्वात आधी घेतले गेले त्याचे कारण त्यांच्या मुळेच भारतात समांतर सिनेमा(parallel cinema), किंवा कलात्मक चित्रपट(art film) या नावाखाली वास्तववादी सिनेमाची अशी जी चळवळ किंवा लाट आली हे होय.

हे सर्व आठवण्याचे कारण परवा एक सत्यजित राय यांच्या चित्रपटातील संगीत कामगिरीचा आढावा घेणारी एक डॉक्युमेंटरी पाहिली( Music of Satyajit Ray) आणि एका वेगळ्या पैलूची ओळख झाली, त्याबद्दल थोडेसे वाटून घ्यावेसे वाटले म्हणून हा प्रपंच. जाता जाता, त्यांचे आडनाव रे की राय हा प्रश्न मराठी लिहिताना होता. काही जण रे असे लिहितात, तर काही राय. मी मात्र बांगला भाषेत कसे लिहितात हे पहिले, आणि त्यावरून ‘राय’ असे वापरण्याचे ठरवले. चूक भूल द्यावी घ्यावी! तसे पाहिले तर मेरी सेटन लिखित सत्यजित राय यांच्या चरित्रात्मक पुस्तकात(Portrait of a Director-Marie Seton) सत्यजित राय आणि संगीत याबद्दल एक प्रकरण आहे. पण हा माहितीपर चित्रपट पाहून आणखीनच त्यांच्या ह्या पैलूची ओळख होते. गतकालातील या महान कलाकाराच्या चित्रपट, संगीत या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समजतो. चित्रपट १९८४ मधील आहे, आणि तो National Film Development Corporation(NFDC) ने बनवला आहे. दिग्दर्शक आहेत उपलेंदू चक्रवर्ती. चित्रपट इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात अर्थातच चित्रपट हे मूकपट होते, त्यात ध्वनी नव्हता, पण चित्रपट चालू असताना पडद्याच्या बाजूला बसून समयोचित, प्रसंगानुरूप संगीत वाजवत, गाणी अशी नव्हतीच. जेव्हा बोलपट युग सुरु झाले, तेव्हा चित्रपटात गाणी सुरु झाली. भारतीय रागदारी संगीत, पाश्चिमात्य संगीत, वाद्य या सगळ्या मधून एक वेगळेच मिश्रण भारतीय संगीतात अगदी सुरुवातीपासून दिसू लागले. आणि बाकीचा सारा इतिहास आहेच. विशेषतः भारतीय चित्रपटांच्या बाबतीत चित्रपटातील गाणी हा एक प्रमुख विषय होऊन बसला आहे(आणि अर्थात त्याच्या जोडीला गाण्यावर केले जाणारे नृत्य हा देखील महत्वाचा विषय झाला आहे). मी २०१४ मध्ये अमीरबाई कर्नाटकी या १९४०-५० च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट गायिकेच्या चरित्राचे कन्नड मधून मराठी भाषांतर केले होते. चित्रपट संगीत आणि त्याचा इतिहास हा आणखी विशेष अभ्यास करण्याचा विषय नक्कीच आहे. पण तूर्तास सत्यजित राय सारख्या चित्रपट दिग्दर्शक चित्रपटातील संगीत विषयाकडे कसे पाहत हे समजावून घेणे नक्कीच उद्बोधक आहे.

या माहितीपर चित्रपटातून सत्यजित राय यांच्या मुलखातीमधून आपल्याला समजते की संगीताचे संस्कार त्यांच्या वर अगदी लहानपणी झाले, आणि संगीत हे त्यांचे पहिले प्रेम होऊन बसले. त्यातही पाश्चिमात्य संगीताची त्यांना सुरुवातीपासून ओढ होती, विशेषतः बेथोवेनचे संगीत. बंगालचे रविंद्र संगीत तर जसे सर्व बंगाली घरांतून असते तसे ते त्यांच्या घरातही होतेच. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीचे काही चित्रपट त्यांनी समकालीन शास्त्रीय गायक/वादक यांच्या बरोबर काम करून चित्रपट संगीत करवून घेतले. ह्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांची मुलाखत आहे, त्यांना बोलते केले आहे, त्यांच्या चित्रपटातील दृश्ये(जसे कांचनजंगा, घरे बाईरे), तसेच ते काम करत असतानाचे दुर्मिळ चित्रण, त्यांनी केलेली रेखाटने, ठिकठिकाणी निवेदनाच्या ओघात आले आहे. ते म्हणतात, ह्या गाजलेल्या संगीतकारांबरोबर(पंडित रवी शंकर, उस्ताद विलायत खान, अली अकबर खान) काम करणे त्यांच्या व्यस्ततेमुळे सत्यजित राय यांना थोडेसे अवघड होऊ लागले होते. तसेच चित्रपटात विविध ठिकाणी, गाण्यात काय आणि कसे संगीत असावे हे त्यांच्या मनात अगदी सुरुवातीपासूनच काही ठोकताळे असत, त्यामुळे त्यांनीच स्वतः आपल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन करण्यास १९६१ मध्ये सुरुवात केली, ते अगदी शेवटपर्यंत. चित्रपट संगीत म्हटले की पार्श्वसंगीत तसेच त्यातील गाणी आणि त्यांचे संगीत दोन्ही आले. त्यातही पार्श्वसंगीताचा ते किती खोलवर विचार करतात हे समजते. पार्श्वसंगीत हे कमीत कमी वापरले जावे याकडे सत्यजित राय ओढा होता, हे उघड आहे. प्रत्येक फिल्ममेकरने संगीत विषयाकडे लक्ष द्यावे असे त्यांचे म्हणणे त्यांनी मांडले आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीत, वाद्ये(जसे पियानो) यांचा त्यांनी मेळ घालून पार्श्वसंगीत, किंवा गाण्याचे संगीत त्यांनी कसे दिले, वादाकांबरोबर त्यांनी कसे काम केले, नोटेशन्स कसे शिकले या सारख्या गोष्टी या डॉक्युमेंटरी मध्ये आपल्या समोर उलगडले जातात.

तुम्ही जर सत्यजित राय यांचे, त्यांच्या चित्रपटांचे चाहते असाल, आणि ही डॉक्युमेंटरी पहिली नसेल तर नक्की पहा. त्यांच्या जीवनातील अनेक दुर्मिळ क्षण, मुलाखती, त्यांचे विचार, music sheet हातात घेऊन वादकांबरोबर, गायकांबरोबर काम करणारे सत्यजित राय इत्द्यादी पाहता येतात.

 

प्रभा अत्रे यांचा सांगीतिक संवाद

भारतीय अभिजात संगीताची आवड असणाऱ्यांना प्रभा अत्रे हे नाव नक्कीच अनोळखी नाही. पुण्यातील भीमसेन सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची सांगताच गेली काही वर्षे त्यांच्याच गायनाने होते. त्यांनी वयाची ८० वर्षे पार केली आहेत. त्या काही मोजक्या कलाकारांपैकी आहेत ज्यांनी गायनाव्यातिरिक्त, संगीताबद्दल कायम आपले विचार, चिंतन प्रकट करत आल्या आहेत, विविध प्रयोग करत आहेत. त्यांनी पुस्तके लिहिली आहेत, बंदिशी रचल्या आहेत. आपल्या स्वरमयी गुरुकुल संस्थेतर्फे(जी त्यांच्या निवासस्थानी आहे) नवीन गायक घडवताहेत, आणि सर्वांना आपली कला सादर करायला एक खुला मंच उपलब्ध करून दिला आहे. एक दोनदा पूर्वी मी तेथे काही कार्यक्रमांना गेलो होतो. गेली काही दिवस त्या पुणे विद्यापीठात खुला संगीत संवाद करताहेत. मी नुकताच त्या संवाद सत्राच्या दहाव्या आणि शेवटल्या सत्राला हजार होतो. त्याबद्दल लिहावे म्हणून हा उपद्व्याप.

image

कित्येक वर्षात पुणे विद्यापीठ परिसरात आत गेलो नव्हतो. किती रम्य परिसर आहे हा, तेथे विविध ऋतूमध्ये विविध रूपं अनुभवता येतात. कार्यक्रम संत नामदेव सभागृहात होता. मी आत जाऊन बसलो. ललित कला केंद्राचे विद्यार्थी तर होतेच, तसेच इतर ही संगीत शिकणारे विद्यार्थी आले होते, आणि माझ्यासारखे गाण्याची, ऐकण्याची समज वाढवण्याचा प्रयत्न करणारे देखील असावेत असे वाटत होते. बसतो न् बसतो इतक्यातच प्रसिद्ध गायक पंडित सत्यशील देशपांडे हे बाजूने आपल्या नेहमीच्या मिश्कील स्वभावानुसार कोणालातरी पाहून “अरे, तुम्ही अजून आहात तर!” असे म्हणत गेले. आजच्या पिढीतील हार्मोनियम वादक आणि चिंतनशील संगीतज्ञ चैतन्य कुंटे हे संवादक होते. चैतन्य कुंटे यांच्याबरोबर माझ्या अमीरबाई कर्नाटकी पुस्तकाच्या भाषांतराच्या निमित्ताने तसेच सुदर्शन संगीत सभेच्या अंतर्गत बिळगी भगिनींवरील शतमान स्मरण या रहिमत तरीकेरी यांच्या सादरीकरणाच्या आयोजनानिमित्त परिचय झाला होता. पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

कार्यक्रमाचे शीर्षक होते ‘आलोक: संगीत शास्त्र आणि प्रस्तुती’. कार्यक्रम हिंदीत होता. तो मराठीत का नाही झाला हे लक्षात नाही आले. प्रभा अत्रे यांच्या बरोबरच्या या सांगीतिक संवाद कार्यक्रमाचे याआधी नऊ भाग होऊन गेले होते. ऑक्टोबर २०१७ पासून झाला होता. त्याचा चैतन्यने धावता आढावा घेतला. कंठसंगीत, सरगम, बंदिश, सुगम संगीताचे प्रकार, राग संकल्पना, ख्याल गायकीची घराणी अशा विविध विषयांवर आधी संवाद झालेला. ह्या ना त्या कारणाने मी जाऊ शकलो नव्हतो. आजचा विषय होता संगीत शिक्षण आणि रियाज. संगीत शिक्षण म्हणजे गुरुकुल पद्धतीने शिकणे जे पूर्वी होत असे, आणि आजकाल विशेष होत नाही हा मुद्दा तर आलाच. पण शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान जरूर वापरावे असा त्यांचा आधुनिक दृष्टीकोन त्यांनी मांडला. गुरुकुल आणि संगीत विद्यालातून दिले जाणारे शिक्षण यात तुलना, फायदे तोटे हे मुद्दे आले. संगीत विद्यालयातून शिक्षण द्यायला सुरुवात होऊन देखील १०० वर्षे झाली, भातखंडे, पलुस्कर यांच्याही आधी बडोद्यातून मौलाबक्ष यांनी ते सुरु केले. पारंपारिक पद्धतीमध्ये मौखिक पद्धतीने गुरु आणि शिष्य सन्मुख बसून शिकणे, शिकवणे होते, आणि ते तसेच झाले पाहिजे. शिकवणे ही एक कलाच आहे, प्रत्येक चांगला गायक चांगला शिक्षक, गुरु होऊ शकतोच असे नाही, हे त्यांनी नमूद केले. संगीत शिकण्यारांनी सतत ऐकणे हे गरजेचे आहे, कान तयार हवा.  आपल्या संगीताचे प्रमाणीकरण झालेले नाही, त्यामुळे शिकवण्यात गुरुनुसार, घराण्यानुसार फरक पडतो. संगीत घराणे म्हणजे एक सांगीतिक विचार, सांगीतिक सौदर्यदृष्टी असे त्यांनी सांगितले, आणि तसे उमजून फरक लक्षात घेऊन तसे शिकले पाहिजे.

चैतन्य कुंटे यांनी मग रियाज ह्या अनुषंगिक  विषयाकडे चर्चा वळवली. रियाज करण्याच्या पद्धती, वेळा, त्याचे महत्व ह्या सर्वांना त्यांनी स्पर्श केला. पूर्वीच्या काळी बारा वर्षे शिक्षण, बारा वर्षे रियाज आणि त्यानंतर प्रस्तुती असे होत असे.  समर्थ रामदास यांची ‘अभ्यासोनी प्रकटावे’ ही उक्तीची ह्या वेळी आठवण झाली. रियाज हा व्यक्तीसापेक्ष असतो हा देखील महत्वाचा मुद्दा त्यांनी नमूद केलं.  प्रभा अत्रे ह्या संवेदनशील कलाकार आहेत, त्यांनी बंदिशी तर रचल्या आहेतच, पण कविता देखील रचल्या आहेत. त्यांनी रियाजानिमित्त केलेली एक कविता सादर केली जी साधारण अशी होती:

संगीताची, सुरांची साधना अशी, पाण्यावरील रेघ जशी| उमटत असता, मिटून जाई ||

आजच्या काळात साऱ्याच गोष्टी एक इव्हेंट झाल्या आहेत, दृश्य रुपाला महत्व प्राप्त झाले आहे. त्याचा सुद्धा त्यांनी विचार करून त्या म्हणतात की रियाज करताना आपले हावभाव, हातवारे, बैठक इत्यादी कडे जरूर लक्ष द्यावे. प्रभा अत्रे यांच्या बरोबर, मंचावर दोन गायक, आणि दोन साथीदार देखील दिसत होते(तबला, पेटी). बहुधा त्यांचा शिष्यगण असावा. त्यांनी मग रियाजाच्या काही पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर केले. यमन रागातील, तसेच भैरवीतील सोप्या बंदिशी घेऊन त्यांचा बंदिश स्वरात गाणे, सरगम, आकार गायन तसेच तालाचे बोल गायन या स्वरूपात रियाज कसा करता येतो हे सादर केले. राग विस्तार, ज्यात खऱ्या अर्थाने कलाकाराची कल्पनाशक्तीचा कस लागतो, त्याचा कसा रियाज करावा याचे प्रात्यक्षिक देखील सादर केले. मिंड, गमक, खटका, आंदोलन, मुरकी अश्या विविध तंत्रांचे, बारकाव्यांचा कसा रियाज करता येतो हे देखील त्यांनी दाखवले.

त्यानंतर श्रोत्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. रियाजाच्या वेळेसंबंधी एक प्रश्न आला. त्यातून एक महत्वाचा मुद्दा प्रभाताईंनी मांडला. दिवसाच्या विविध वेळी गळा/आवाज विशिष्ट्य स्थिती मध्ये असल्यामुळे सहसा मंद्र स्वरांचा रियाज पहाटे करतात, आणि हळू हळू दिवस चढला की मध्य आणि तार सप्तकाकडे जावे असा प्रघात आहे. पण कुठल्याही वेळेला कुठल्याही सप्तकाचा रियाज करता यावा अशी तयारी हवी, असा तो मुद्दा होता. दुसरा एक प्रश्न दोन वेगळ्या घराण्याच्या गायकी शिकताना काय पथ्य पाळावी याबद्दल होता.

इन मीन दोन तासांचा हा सांगीतिक संवाद चांगलाच रंगला. माझ्यासारख्या जाण्याची समाज उमज वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रोत्याला नक्कीच समृद्ध करणारा अनुभव होता. प्रभा अत्रे यांच्यासारख्या प्रगल्भ कलाकारांचे विचार ऐकायला मिळाले. प्रभा अत्रे यांनी आपल्या पुस्तकांतून देखील आपले विचार मांडले आहेतच. या आणि इतर कलाकारांचे काम, विचार हे documentation, recording, या मध्यामातून जपले पाहिजे. सुदैवाने चैतन्य कुंटे, पंडीत सत्यशील देशपांडे यांच्या सारखे जाणत्या व्यक्ती यात काम करत आहेत. पूर्वी वीणा सहस्रबुद्धे यांनी देखील तसे थोडेफार काम करून ठेवले आहे. पुण्यात डॉ. अशोक रानडे  यांच्या नावाने एक archive उभे राहिले आहे. ते एकदा वेळ काढून पाहायला जायचे आहे. गेल्या शंभर एक वर्षांतील बरीच ध्वनीमुद्रणे विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. संगीताच्या इतिहासाच्या दृष्टीने, तसेच आताच्या, तसेच पुढील पिढीसाठी हे सर्व संचित नक्कीच उपयुक्त पडेल.

जाता जाता अजून एक. ब्लॉगचा सुरुवातील अभिजात संगीत असा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ कला संगीत, किंवा सामान्य भाषेत शास्त्रीय संगीत असा होतो. नुकतेच मला ‘अभिजातता म्हणजे काय’ या शीर्षकाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले होते. मला चित्रपट रसास्वाद शिबिरात भेटलेले अग्निहोत्री यांनी तसेच रवी परांजपे फौंडेशनच्या वतीने हा आयोजित केला होता. चित्रकार रवी परांजपे, संगीतज्ञ पंडित सत्यशील देशपांडे, शास्त्रीय नर्तक सुचेता भिडे-चापेकर, तसेच उद्योजक दीपक घैसास यांनी आपापल्या क्षेत्रात अभिजातता म्हणजे काय याचा उलगडा केला. त्या कार्यक्रमाचे ध्वनीचित्रमुद्रण येथे आहे, जरूर पहा.

Dance of the wind

मी आजारी असल्यामुळे ऑफिसला दांडी मरून घरीच राहिलो होतो. अशा वेळी झोपून झोपून तरी किती झोपणार? लहानपणी आम्ही राहत असलेल्या घरी पावसाच्या पाण्यामुळे भिंतीवरती ओल चढून विविध आकार तयार होत असत. आजारी पडल्यावर, पलंगावर पडल्या पडल्या ते आकार पाहून मनात विविध प्रतिमा तयार होत आणि मनोरंजन होत असे! आता अशी परिस्थिती नव्हती. हाताशी पुस्तकं, किंवा टीव्हीचा रिमोट असतो. त्या दिवशी सकाळी सकाळी टीव्ही लावला, आणि एके ठिकाणी नुकताच सुरु झालेला सिनेमा होता. तो होता हिंदी सिनेमा, आणि त्यात किटू गिडवानी दृष्टीस पडली, पण सिनेमाचे नाव तर इंग्रजी दिसत होते(Dance of the wind) जे वेगळेच होते-Dance of the wind, म्हणजे काय? म्हटले जरा पाहुयात. पण प्रत्यक्षात, तो संपूर्ण पाहून मगच उठलो.

किटू गिडवानीला किती दिवसांनी पहिले होते. हो, तीच ती, दूरदर्शन मालिकांमधून काम करणारी. नंतर खूप अशी तीला सिनेमात पाहिलेले आठवत नाही. गोविंद निहलानी यांच्या रुक्मावती की हवेली मध्ये होती. Dance of the wind समोर चालू होता, काहीतरी गंभीर दृश्य चालू होते. किटू गिडवानीचीच प्रमुख भूमिका होती. ती एक गायिका होती त्यात, तेही तिचा आवाज गमावलेली. ही गायिका(नाव पल्लवी) म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारी गायिका. गुरुकडे(जी तिची आईच असते) समोरासमोर बसून गाण्याचे धडे ही गायिका घेते आहे, त्यातील विविध बारकावे घोटून घेणे चालू आहे. आपल्या भारतीय संगीत शिक्षणाचे, तालमीची वैशिष्ट्ये दर्शवाणारी ती दृश्ये. गुरु आपल्या शिष्याला मृत्यू जवळ आल्याची, चाहूल झाल्याची सूचना देते. एका जाहीर संगीत कार्यक्रमात, गाणे सुरु करण्यापूर्वी जे काही क्षण असतात, ते छान दाखवले आहे. पण तेथे गायिकेचा आवाज लागत नाही, कारण, आपल्याला असे समजते की गुरूच्या मृत्यूमुळे भावविवश झाल्यामुळे असे झाले असावे.

IMG_1292

Kitu Gidwani, Dance of the Wind

k

Kitu Gidwani, Dance of the Wind

पुढे काही कारणाने, तिचा आवाज पूर्णपणे जातो, कारकीर्द उध्वस्त होते-गाता येत नाही, गाणे शिकवता येत नाही. मानसिक रित्या खच्चीकरण होते, तिची तळमळ, हा सगळं प्रवास किटू गिडवानीने छान रंगवला आहे. ओघाने येणारी गाणी, विविध धून, प्रसंगानुरूप हे सर्व एक छान दृक्‌श्राव्य अनुभूती देतात. ह्या गायिकेला आपला आवाज परत गवसतो हे नंतरच्या ६०-७० मिनिटात उलगडते. चित्रपटाला एक अध्यात्माची, दैवी चमत्काराची किनार आहे. शास्त्रीय संगीत आणि अध्यात्म यांचा घनिष्ट संबंध आहे, हे मान्य. पण चित्रपटात येणारी लहान मुलगी, तारा, आणि तिचे गाणे, तिचा वावर हे का आणि कसे सांगता येत नाही. ही गायिका आपल्या आईच्या गुरुकडे, जे अर्थात अतिशय वयोवृद्ध असतात, त्यांचा शोध घेत त्यांना भेटते. त्यांचा देखील आवाज नसतो. पालवीची त्यांच्याकडून गंडा बांधून घेऊन शिकण्याची इच्छा ते धुडकावून लावतात. पण त्यांच्या आणि त्या लहानग्या मुलीच्या सान्निध्यात तीला आपला हरवलेला आवाज गवसतो अशी ही कथा आहे. तर सकाळी सकाळी हा असा शास्त्रीय गाण्यांच्या धुनानी भरपूर, असा, अध्यात्मिक अनुभव देणारा, आणि बऱ्याच वर्षांनी किटू गिडवानीला पाहिल्यामुळे, एकदम मस्त वाटले. इतक्यातच जुन्या काळातील प्रसिद्ध गायिका गिरिजा देवी यांचे निधन झाले, त्यामुळे मौखिक गुरु-शिष्य परंपरेने शिकलेल्या, शिकवण्याऱ्या त्या होत्या. शेवटी Dance of the wind या नावाबद्दल. काय असावा अर्थ याचा? मला वाटते, की बागडणारा वारा, जसा स्वछंदी असतो, आणि त्यामुळेच त्याचे गाणे होते, असा तर संदेश द्यायचा नसावा? इंटरनेट वर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची(राजन खोसा) एक साईट आहे, त्यात त्यांनी ह्या चित्रपटाची पडद्यामागची कहाणी नमूद केली आहे. ती छान आहे वाचायला. त्यात त्यांनी लिहिले आहे, की शुभा मुदगल यांना ह्या चित्रपटाच्या कथेत आपली स्वतःची कहाणी दिसली.

असो. बराच जुना, म्हणजे, १९९७ मधील हा सिनेमा आहे. प्रसिद्ध गायिका शुभा मुदगल यांचे पार्श्वसंगीत आहे. हा बहुतेक पाश्चिमात्य देशातील लोकांसाठी बनवला गेला असलेला सिनेमा असला पाहिजे. चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या श्रेयनामावलीतून समजते की जर्मन संस्था, भारतातील NFDC, आणि इतर काही संस्थांनी मिळून हा सिनेमा बनवला आहे. शास्त्रीय संगीत परंपरेवर हिंदी आणि इतर भारतीय भाषेत तसे बरेच सिनेमे आहेत. हा थोडासा वेगळाच म्हटला पाहिजे. मध्यंतरी मी माझ्या एका मित्राने एक लघुपट बनवला होता, त्याचा विषय सुद्धा गाणे हाच होता, एका वृद्धाच्या जीवनात एकाकी पण आल्यामुळे, जीवन संपवण्याचा निर्णय तो बदलतो, का तर, त्याचे गाणे ऐकून रस्त्यावरील एक लहानगी त्याच्या पित्याबरोबर गाणे शिकायला येते. त्याबद्दल मी लिहिन कधीतरी.

 

 

कानसेन व्हायचंय?

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, “आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल”. मी तरी आजपर्यंतचे जीवन या उक्ती प्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत आहे. ही ब्लॉग साईट देखील त्याचाच एक भाग आहे. संगीत, नाटक, चित्रपट, पुस्तके, डोंगरावर, किल्ल्यांवर, जंगलात भटकणे, इतिहास(Indology), भाषा हे सर्व माझे आवडीचे विषय आहेत. अर्थात त्याबद्दल काहीबाही खरडणे, लिहिणे हाही उद्योग आहेच.

आपल्याला गाणी, भावगीतं, किंवा इतर ज्याला सुगम संगीत असे म्हणतो ते सर्वसाधारणपणे भावते, आणि बऱ्याच अंशी शब्द असल्यामुळे समजते. पण भारतीय शास्त्रीय संगीत, किंवा राग संगीत/कलासंगीत जे आहे, ते आपल्याला काही वेळा आवडते, पण समजले असे होत नाही. त्यात शब्द हे अतिशय कमी, किंवा बऱ्याचदा नसतातच. काही वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रीय संगीत काय आहे, इतिहास काय, त्याचे शास्त्र काय, हे जाणून घेण्याची उर्मी निर्माण झाली. त्याच दरम्यान, ‘शोधा म्हणजे सापडेल’ या वाक्प्रचाराप्रमाणे, एके दिवशी प्रसिद्ध गायक समीर दुबळे यांची संगीत कार्यशाळेची जाहिरात पाहिली. ती होती ३-४ दिवसांची संगीत परिचय कार्यशाळा होती, ज्यात शास्त्रीय संगीताची मूलतत्वे, विविध घराणी, परंपरा, काय आणि कसे ऐकावे, याचे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन असणार होते. थोडक्यात काय तर, ज्यांना तानसेन न होता कानसेन कसे व्हावे या बद्दल तो सगळं खटाटोप असणार होता. त्याबद्दल आज लिहायचे आहे.

समीर दुबळे आणि बासरीवादक नितीन अमीन यांनी स्थापन केलेली SPECTRUM(Society for Performing Entrepreneurs and Conscious Training towards Understanding Music) ह्या संस्थेतर्फे हा कार्यक्रम होता. स्थळ होते, पुण्यातील गांधर्व महाविद्यालय. दररोज २ तास असे तीन दिवस हा कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी कार्यशाळेचे स्वरूप सांगून, सूर संकल्पना, ध्वनी, नाद, याबद्दल माहिती करून देण्यात आली. अर्थात, बरीच प्रात्यक्षिके, सोदाहरण स्पष्टीकरण यामुळे आकलन वाढले. पाश्चिमात्य संगीताची देखील थोडीशी माहिती सांगण्यात आली. भारतीय संगीतातील वेगवेगळे forms त्याबद्दल माहिती करून देण्यात आली. Classical western music आणि popular music मधील फरक कळण्याकरता Strauss, BonyM ह्यांच्या काही रेकॉर्डिंग ऐकवण्यात आल्या.

दुसऱ्या दिवशी ताल, लय पासून सुरुवात करून भारतीय संगीतात राग ही संकल्पना काय आहे याचे विवेचन केले गेले. बंदिश म्हणजे काय, आणि बंदिशीचे महत्व, ब्रज बोली(हिंदी भाषेची एक बोली, जी मथुरा भागात बोलली जाते) याबद्दल देखील चर्चा झाली. त्यानंतर ख्याल गायन जे सध्या प्रचलित आहे, त्याचा इतिहास, अगदी वेदकालीन सामगायन, नंतरचे धृपद गायन पर्यंत कसे संगीत बदलत गेले. तेराव्या शतकापासून मोगल साम्राज्यामुळे झालेली देवाणघेवाण, यामुळे संगीत कसे ख्याल गायनापर्यंत येवून थांबले हे समजले. इतर उपशास्त्रीय गायन प्रकार, जसे की ठुमरी, कजरी, टप्पा याची तोंडओळख करून देण्यात आली.  राग संगीत सादर करण्याची जी सध्याची पद्धत प्रचलित आहे, जसे की बडा ख्याल, छोटा ख्याल, साथीला तबला, पेटी इत्यादी, हे प्रात्यक्षिकासहित समजावले गेले.

तिसऱ्या दिवशी, प्रसिद्ध बासरीवादक नितीन अमीन यांनी शास्त्रीय वाद्य संगीत याबद्दल विवेचन केले. बासरी वर एखादा राग कसा सादर केला जातो, तसेच जुगलबंदी, एकल तबला वादन कसे केले जाते हे दाखवण्यात आले. भारतीय संगीतातील विविध वाद्ये, प्रकार, त्यांची गुण-वैशिष्ट्ये याबद्दल ही माहिती झाली. एकूणच संगीत विश्वाची झलक नक्कीच मिळाली आणि पुढील अभ्यासासाठी कवाडे किलकिली झाली. त्यानंतर थोडे जाणीव पूर्वक ऐकणे, मैफिलींना जाणे, संगीताबद्दल वाचन वाढणे, अश्या गोष्टी सुरु झाल्या आणि माझ्या जाणीव विस्तारू लागल्या.

संगीताच्या, गाण्याच्या मैफिली, संगीत महोत्सव पुण्यात तर कायम होतच असतात, प्रत्येक वेळी जाणे जमतेच असे नाही. पण पुणे आकाशवाणी वर शास्त्रीय संगीताचे बरेच कार्यक्रम असतात, ते मात्र ऐकू लक्ष देऊन लागलो. हा एक प्रवासच आहे, जो अजून चालूच आहे. संगीत ही प्रयोगक्षम कला असल्यामुळे, काही प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि ऐकण्यात गुणात्मक फरक पडावा म्हणून, मध्ये काही वर्षे पेटी(Harmonium, संवादिनी) शिकण्याचा उद्योग केला, दोन-तीन परीक्षाही दिल्या. हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीत अशी जी समृद्ध परंपरा आहे, त्याची थोडीशी झलक पाहायला मिळाली. संगीतज्ञांची चरित्रे, शास्त्र, आणि इतर musicology वरील पुस्तके गोळा करणे, तसेच माझी अजून एक खोड अशी की भारतीय परंपरा आणि पाश्चिमात्य परंपरा यातील फरक, साम्य धुंडाळणे, हेही संगीताच्या बाबतीत सुरु झाले, आणि अजून सुरूच आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जसे हे कालासंगीत आहे, तसेच पाश्चिमात्य देशात, देखील कलासंगीत आहे. त्याला इतिहास आहे, त्याचे शास्त्र आहे, आणि मुख्य म्हणजे तेही शब्दांच्या पलीकडे जाणारे आहे. मागील आठवड्यातच पुण्यात Western Classical Music Appreciation Workshop या नावाची एक कार्यशाळा होती. Music Shack तर्फे Shantanu Datta हे ही कार्यशाळा घेणार होते. प्रामुख्याने Western Classical संगीताचा इतिहासाबद्दल असणार होते. कार्यबाहुल्यामुळे नाही जाऊ शकलो. तर असे आहे. ही कार्यशाळा असेल, किंवा इतर गोष्टी आहेत, त्यासर्वामुळे संगीत रसास्वादाची क्षमता निर्माण होते. ही सर्व अलीबाबाची गुहा आहे, ज्यात फक्त पुढे जात राहायचे, अंत नाही, आणि परत फिरणे देखील अवघड!

शेवटी एक खंत व्यक्त करावीशी वाटतेच. आजकालच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्या कलासंगीताचा(किंवा एकूणच) समृद्ध वारसा, परंपरेची आजच्या मुलांना साधी ओळखही आपण करून देत नाही. मी असे ऐकले होते काही पाश्चिमात्य देशात शाळेत आणि घरोघरी एखादे वाद्य किंवा गायन मुलांना शिकवले जाते, आणि नवीन पिढीला त्यामुळे त्याची ओळख होते आणि पुढे ती कला त्यांच्या जीवनात त्यांची साथीदार बनते.

मी अनुभवलेले संगीत कार्यक्रम आणि त्यावर लिहिलेले जरूर माझ्या ब्लॉग वर पहा आणि प्रतिक्रिया कळवा!

 

Shadja, Antarang at Sawai

Sawai Gandharva Sangit Mahotsav(music festival) started by late Pandit Bhimsen Joshi in remembrance of his guru Sawai Gandharva, is an icon festival of Pune. Come December, music lovers from all over India, start planning on attending this. After death of Pandit Bhimsen Joshi recently, the festival got renamed as Sawai Gandharva Bhimsen Sangit Mahotsav. Apart from regular music performances which is what the main attraction is, there couple of other activities also arranged, which are equally significant to music lovers. They are titled as Shadja and Antarang. Former is a program where short films on musicians are showcased. Antarang is a program where interviews of artists participating that year’s festival are conducted.

These are held at Sawai Gandharva Smarak Samiti’s building in Shivajinagar area. I have been attending these since last 4-5 years. While history of festival itself is well-documented, I did not find history of this initiative documented anywhere. So I don’t know since how many years this is going on. But nonetheless, such programs and also Vasant Vimarsh, which is more serious endeavor, help lay music listeners in enriching their music experience. I have written about last year’s Shadja and Antarang here.

This year’s Shadja included following four short films on following artists: Carnatic music singer M S Subbalakshmi, Shehnai player Ustad Bismillakhan, Hindustani music singer Veena Sahasrabuddhe, Harmoinum and Organ player Govindrao Patwardhan. I was able to watch ones on Veena Sahasrabuddhe, and Govindrao Patwardhan. It was down the memory lane experience watching film on Veena Sahasrabuddhe(who recently passed away), about which I have written here. Her husband Hari Sahasrabuddhe also was present during the screening. This was made by Films Division and directed by Firoze Chinoy. The other short film introduced to life and works of Govindrao Patwardhan, about whom I did not know much earlier.

20161209_113442

The Antarang included interviews with following artist who were part of this year’s festival: Ustad Irshad Khan, Ganpati Bhat, and duet flute players Debopriya and Suchismita Sisters. I was able to attend flute sisters’ interview taken by Magesh Waghmare, famous Pune Akashwani announcer. I could not listen to any of them the artists this festival. It was entertaining, to say the least, to hear flute sisters talk and also play pieces for the audience. They are the only female duet flute players in Hindustani music. The Carnatic music had its own female duet flute players, Sikkil Sisters, earlier, which is what I came to know during the program. Debopriya and Suchismita Sisters unfolded their journey. Mangesh Waghmare, who himself is notable music connoisseur, having presented many music appreciation programs on radio, made them uncover nuances of playing duet, western classical music, and also their thought on fusion.

Anyways, such initiatives are much needed to spreading deeper awareness and discussing nuances of music appreciation among the discerning listeners. What’s more, this has free so far, with a free a tea served during the break!