३१ डिसेंबरची आठवण

३१ डिसेंबर आणि त्याची आठवण म्हणजे लक्षात आलेच असेल, नाही का? थर्टी-फर्स्टची पार्टी, सरत्या वर्षाला निरोप, नवीन वर्षाचे धडाक्यात स्वागत, जल्लोष वगैरे, वगैरे. ख्रिसमस पासूनच वातावरण निर्मिती सुरु होते, ठिकठिकाणी. जिथे पहावे तिथे चर्चा ३१ डिसेंबरच्या तयारीची, कार्यक्रमाची. प्रत्येकाला काहीतरी खास ठिकाणी, खास असे काही तरी करून, हा साजरा करायचा असतो. गेल्या काही वर्षात हे अगदी ठळकपणे जाणवते आहे. मद्य-परवाने, पोलिसांच्या सूचना, हॉटेल्स, पब्स, रिसॉर्टसच्या जाहिराती, खुणावणारे समुद्र किनारे, जोडून आलेल्या सुट्ट्या, पाश्चिमात्य संगीत, नृत्य, रोषणाई, फटाक्यांची आताषबाजी, यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन इत्यादी यातून हे दिसते. काहीना काही करून हा दिवस करणी लावायचा असतो. १९९०-९१ पासून जेव्हा जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, त्याच्या बरोबर ज्या गोष्टी आल्या, त्यात ही देखील गोष्ट हळू हळू पुण्यासारख्या त्यावेळी तश्या छोट्याश्या शहरात देखील चालू झाल्या. एकुणात, हा दिवस(की रात्र!) साजरा करण्याची प्रथा कशी आणि का सुरु झाली हे पाहायला हवे. असो.

माझी आठवण आहे ती १९९४ मधील, ३१ डिसेंबरची. अगदी काही दिवसांपूर्वीच मी अमेरिकेत आलो होतो, तेही आयुष्यात पहिल्यांदाच. बरोबर इतर भारतीय सहकारी होते. अमेरिकेतील सॅन होजे, बे एरिया भागात माझे वास्तव्य होते. अजून अमेरिकन कल्चर शॉक मधून पूर्णपणे बाहेर आलो नव्हतो. अमेरिकेतील ह्या भागात बर्फ जरी पडत नसला तरी थंडी बरीच असतेच. ख्रिसमसपासूनच एकूण माहौल बदलत चालेला जाणवत होता. निर्मनुष्य रस्त्यांवरील, टुमदार घरे ख्रिसमससाठी सजली गेलेली दिसत होती. त्यावर्षी ३१ डिसेंबर नेमका शनिवारी आला होता. दिवसभर आम्ही सहकारी इकडे तिकडे भटकंती करत, विविध मॉल्स मध्ये जाऊन खरेदी करत घालवला. सॅन फ्रान्सिस्को हे महानगर हे साधारण पन्नास एक मैल लांब. नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी सॅन फ्रान्सिस्को येथे जाण्याचे ठरले. अमेरिकेत जीवाची मुंबई करण्यासारखा हा बेत होता!

सॅन फ्रान्सिस्को हे प्रशांत महासागराच्या किनारचे मोठे शहर. फिशरमन्स वार्फ, युनियन स्क्वेअर, गोल्डन गेट ब्रीज ही काही प्रसिद्ध स्थळे. सगळे शहर चमकत होते. ह्या शहराची एक गंमत आहे कारण अनेक छोट्या-मोठ्या टेकड्यांवर वसले आहे, त्यामुळे येथील रस्ते असे खाली वर, वळणदार(crooked) असे आहेत. आम्ही शहरात पोहचेपर्यंत रात्रीचे नऊ बाजून गेले होते. रात्र चढत होती, चिंचोळ्या रस्तांवरील रंगबिरंगी गर्दी, रोषणाई nightlife ची उत्सुकता वाढवत होती. रस्त्यांवरून गडद निळ्या रंगातील गणवेशातील सॅन फ्रान्सिस्कोचे पोलीस फिरताना दिसत होते. काही ठिकाणी तर तगड्या, उंच काळ्या घोड्यांवरून ते फिरत होते(mounted unit). रस्त्यांवरून आम्ही आजू-बाजूला असलेली दुकाने, लोकं न्याहाळत, थट्टामस्करी करत भटकत होतो. अचानक आमच्यातल्या काही जणांच्या डोक्यात चावट विचार आला, आणि काही कळायच्या आत आम्ही एका strip tease club मध्ये शिरलो. तेथील अंधाऱ्या वातावरणात, सिगारेटच्या धुरात, मद्याच्या पेल्यांसोबत, समोर एका मागून एक ललना येत, बेधुंद संगीताच्या तालावर, strip tease show करत होत्या. समोरचे दृश्य पाहून आमचे डोळे विस्फारलेले, डोके गरगरायला लागले. आमच्यातील एकजण तात्विक प्रश्न उभा करून आत आलाच नाही. काही वेळाने ते दृश्य पाहवेना, बाहेर पडावेसे वाटू लागले. त्या वासनेच्या बाजारातून बाहेर आलो, मन आतून खात होते. एक दीर्घ सुस्कारा टाकला. बाहेरच्या थंडगार हवेत, परत आम्ही जमिनीवर आलो, थंडगार झालो!

नंतर पावले वळली ती dance bar कडे. तसेच वातावरण, अंधारे, अधूनमधून लेसर, स्पॉट लाईट. कानठळ्या बसतील असे संगीत, आवाज. लोकांची ही गर्दी. सगळे बेधुंद होऊन नाचत आहेत, आरडाओरडा करत आहेत. तेथे थोडावेळ थांबून बाहेर आलो. नंतर समुद्र किनारी फिशरमन्स वार्फ, आणि तेथील Pier 39 भागात फटक्यांची आताषबाजी पाहायला गेलो, आणि डोळ्यांचे पारणे फिटले. बराच वेळ तेथे आम्ही घालवला. असे दृश्य कधी आयुष्यात पहिले नव्हते. अर्थात dance bar, strip tease club देखील पहिल्यांदाच पहिले होते! Pier 39, आणि हजारो दिव्यांनी नटलेला, चमकत असलेला Venetian Carousel भाग हा अतिशय रमणीय आहे. Embarcadero Center या भागात artificial ice rink मध्ये लोक स्केटिंग करताना दिसत होते. Port of San Francisco ची उंच इमारत पाठीमागे दिसते आहे. त्याच ठिकाणी रात्रीचे बारा वाजले, १९९४ वर्ष सरले, १९९५ हे साल सुरु झाले. एकच जल्लोष, happy new year चा जयघोष, कल्लोळ सुरु झाला. चालत चालत, शोधत शोधत, कडाक्याच्या, मध्यरात्रीच्या थंडीत कुडकुडत आमची मोटार गाडीपाशी आलो, तर पाहतो तर काय, पोलिसांनी गाडीवर नवीन वर्षाची भेट चिकटवली होती. काही तरी झाले होते, आणि आम्हाला वाहतूक पोलिसांकडून दंड झाला होता(तो अर्थातच आम्हाला नंतर भरायचा होता). आम्ही कपाळावर हात मरून घेतला! आलीय भोगासी, आणि काय!

Skating at midnight

Ice Rink at Embarcadero Center, San Francisco, circa 1994

काधीतरी पहाटे घरी परतलो. झोपलो नाहीच. १९९५, जानेवारी १, रविवार सुरु झालेला. परत पहाटे पहाटेच भटकंती साठी म्हणून लेक टाहो(Lake Tahoe) येथे गेलो. हे ठिकाण कॅलिफोर्नियामध्ये बे एरियाच्या उत्तरेला नेवाडा राज्याच्या सीमेवर आहे. हा परिसर Sierra Nevada च्या डोंगर रांगांनी वेढलेला आहे. वाटेत थोडेसे बर्फ लागले. जसे जसे डोंगरात जाऊ लागलो, तसे तसे सगळी कडे बर्फच बर्फ दिसायला लागले. आयुष्यात पहिल्यांदाच बर्फ पाहत होतो. दिवसभर तेथे भटकलो, तेथील skiing resort वर, परत आयुष्यातील पहिल्यांदा, skiing केले(खरे तर ते करण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केला). रात्री परत घरी या अनोख्या(आणि काही रंगेल!) आठवणी मनात साठवत परतलो. तर अशी ही माझी ३१ डिसेंबरची आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा केल्याची आठवण! न्यूयॉर्क मधील टाईम्स स्क्वेअर येथील ३१ डिसेंबरच्या रात्रीचा the ball drop चा कार्यक्रम प्रसिद्ध आहे असे ऐकले आहे, पण कधी तेथे त्यावेळेस गेलो नाही. पाहुयात, पुढे मागे, कधीतरी.

Advertisements

अमेरिकेतील ज्यू लोकांचा इतिहास

परवा जर्मनी मधील ज्यू लोकं आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराशी(holocaust) निगडीत एक The Reader नावाचा सुंदर चित्रपट पाहिला(ह्या विषयावर खरे तर बरेच चांगले चित्रपट आहेत-Schindler’s List, The Boy in the Striped Pyjamas, वगैरे) . एका प्रसिद्ध जर्मन कादंबरीवर तो बेतला होता. त्या चित्रपटाला अनेक पदर आहेत, त्याबद्दल नंतर कधीतरी लिहिणार आहे. चित्रपटाच्या शेवटी एक ज्यू स्त्री, जी अत्याचारांमधून बचावली असते, आणि अमेरिकेत वास्तव्य करीत असते, तीला मिळालेले धन ती अमेरिकेतील शाळेला देऊन टाकते, असा प्रसंग आहे. अमेरिकेत ज्यू लोकं कित्येक वर्षांपासून येत आहेत, आणि तेथेच मिसळून जात आहेत. अर्थात ज्यू लोकांचे मूळ म्हणजे इस्राईल. तेथेच त्यांना राहणे मुश्कील होत गेल्याने, कित्येक दशकांपासून तो समाज जगभरात, प्रामुख्याने अमेरिकेत, युरोपात विखुरले गेले. जर्मनीत अर्थात त्यांच्यावर हिटलरने अंगावर काटा आणणारे अत्याचार केले. अशा ज्यू लोकांचा अमेरिकेतील इतिहास सांगणारे मी संग्रहालय पहिले होते त्याची या चित्रपटातील प्रसंगामुळे आठवण झाली.

मी पाहिलेले हे संग्रहालय, ज्याचे नाव आहे National Museum of American Jewish History, ते  फिलाडेल्फिया या शहरात Independence Mall भागात आहे. आता हा भाग म्हणजे अगदी भन्नाट आहे, येथे अमेरिका देशाचा जन्म झाला. त्याबद्दल कधीतरी परत. अमेरिकेतील ज्यू लोकांचा इतिहास सांगणारे, हे चांगले भले मोठे संग्रहालय आहे-चार मजले आहेत. मी बराच वेळ घेत हे संग्रहालय पहिले. अमेरिकेत बरेच प्रथितयश लोक ज्यू वंशीय आहेत. आपल्या महाराष्ट्रात अलिबाग येथे बेने इस्राईली नावाचे लोक आहेत, ते मुळचे ज्यू आहेत, त्याबद्दल माहिती होते, तसेच पुण्यात देखील ज्यू लोकांचे लाल देवल नावाचे synagogue आहे. तर अमेरिकेतील ज्यू लोकांचा अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, तसेच पुढील प्रगतीत खूप मोठा वाटा आहे त्याचा इतिहास, तसेच अमेरिकेच्या काही वादग्रस्त राजकीय निर्णयांचा(ज्यू समाजाप्रती, इस्राईल देश असेल, holocaust असेल) इतिहास येथे पाहता येतो. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळेस, holocaust चा दरम्यान, अमेरिकी सरकारने immigration policy सैल सोडली असती तर कित्येक ज्यू लोकांचे प्राण वाचले असते, ही सल अजूनही त्या समाजात आहे. त्याबद्दल एका दालनात सविस्तर, सचित्र माहिती आहे. ज्यू संस्कृती, धर्म, भाषा, पारंपरिक जीवन, त्या समाजातील आजचे प्रश्न, संस्कृती टिकून ठेवण्याचे आव्हान इत्यादी विषय देखील पाहता येतात. ज्यू लोकांनी सतराव्या शतकात अमेरिकेत पाऊल ठेवल्या पासून, ते आज पर्यंत, हा समाज कसा टिकला, वाढला, त्यांनी वेगवेगळया क्षेत्रात कशी प्रगती साधली याचे सविस्तर चित्रण दिसते.

प्रत्येक मजल्यावर कित्येक जुनी छायाचित्रे, विविध जुन्या पुराण्या वस्तू ,मांडून ठेवल्या आहेत. ह्यातील बऱ्याच वस्तू ज्यू लोकांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातून ह्या संस्थेला दिल्या आहेत, हे विशेष. एकूणच अमेरिकेत राहून ज्यू लोकांनी आपली अस्मिता जागरूकपणे जपून ठेवली आहे असे दिसते(पारशी लोकांप्रमाणे ज्यू लोकं सुद्धा त्यांच्या समाजातच विवाह करण्याचे पसंत करतात). अमेरिकेतील निवडक प्रथितयश ज्यू लोकांची माहिती(उदा. अल्बर्ट आईनस्टाईन) सुद्धा एका दालनात दिसते. एकूणच ह्या अत्याधुनिक, multi-media, आणि भव्य अश्या संग्रहालयातून फेरफटका मारताना ज्यू समाजाच्या इतिहासात डोकावून आल्यासारखे वाटून गेले. संग्रहालयाच्या दारातच Religious Liberty नावाचे एक शिल्पसमूह आहे, जे संग्रहालयात जाणाऱ्याला ज्यू लोकांनी अस्मितेसाठी, स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढयाचीच आठवण करून देते.

माझे एक-दोन ज्यू मित्र आहेत. इस्राईल मध्ये ते पूर्वी होते, आता अमेरिकेत राहत आहेत. अर्थात ते आताच्या पिढीचे आहेत. इस्राईल मध्ये Palestine बरोबर सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर ते अमेरिकेत आलेले आहेत. त्यांच्या बरोबर एकदा ह्या सर्व विषयाबद्दल बोलून जाणून घ्यावेसे वाटू लागले आहे. तसे पहिले ज्यू आणि holocaust चा इतिहास सांगणारे आणखी एक संग्रहालय अमेरिकेत आहे. या पार्श्वभूमीवर ते पाहायला हवे. भारतीय लोकं देखील आता अमेरिकेत जाऊन १०० वर्षे होऊन गेली. भारतीयांनी अमेरिकेत केलेल्या भरीव कामगिरीचे एक संग्रहालय अमेरिकेत करायला हरकत नाही. अमेरिकेतील आफ्रिकन वंशाचे लोकही त्याहून अधिक काळापासून आहेत. त्यांचे देखील एक संग्रहालय फिलाडेल्फिया मध्ये आहे, ते मी पाहिले होते. त्या बद्दल नंतर काधीतरी.

The Franklin Institute

I have written various travelogues on this blogs in the past. I love to travel and explore, and off late, also write about it. Sometimes when we travel to places, when we study the history, we find that some personalities leaving profound impact on country or state or city, we are visiting. Benjamin Franklin was one such personality who had an immense impact on the USA in general and cities like Philadelphia specific. I have written about impact he has on the city of Philadelphia, which I had witnessed during my visit. Today I want to write more about one such place I visited called The Franklin Institute in Philadelphia itself, founded to honor Benjamin Franklin himself, in 1824.

20170218_150533

That day, when I reached the place(which is in Parkway Museum District of the city), it was afternoon as I had visited another interesting place nearby. The imposing Latin architecture style of the building and particularly facade is captivating. This institute is focused on subject of science. It also has many museums and Tuttleman IMAX theater. I was particularly interested in a show at that theater along with a specialty museum themed around dinosaurs. As I got in and found myself inside a dome in the front court, where one can see full size marble structure of Benjamin Franklin himself. I straightaway went to the 3D IMAX show which was titled Flying Monsters as it was a perfect precursor for museum show following next Jurassic World Exhibit. The film had a voice of David Attenborough. and it was about flying creatures that predates dinosaurs on the earth. The Jurassic World Exhibit, which is a mobile exhibition, came to the institute in November 2016. When I visited it in February 2017, it was still around.

Jurassic World Exhibition is certainly a very unique with moving moving and life size models of various types of dinosaurs on the display, with light and sound effect. After that, I visited few more exhibits and gift shop, book store, before the institute shut down. One was around train engines, another was aviation technology. The train engine exhibition is titled The Train Factory. Incidentally, Philadelphia has been part of early train history in the USA. The place where I was put up, was a near a famous area called Reading Terminal, which itself was a train terminus. The exhibit includes a famous steam engine locomotive called Baldwin 60000, which you can walk inside and look around a piece of metal. The air show is again similar, tracing the history right from Wright Brothers early attempts to some modern air-crafts. It also had a simulation console to give visitors a first hand experience of how pilots are trained.

There were many more exhibits, I visited one around brain and another one around heart. The one on heart, basically was a supersized, giant colorful model of heart, making you walk through various veins, and explaining how pumping takes place inside of a heart. The one around brain was interesting, due its nature of fuzzy decision making based on illusions and sensory systems made of neural network.

All in all, the institute experience was good. There is so much packed here, even one day won’t be enough.

 

वेलियनाडच्या आसपास

मी केरळ राज्यात, ज्याला God’s Own Country असेही म्हणतात, एक-दोनदा फिरलो आहे. दोन्हीवेळेस आधी कोचीला जाऊन मग पुढे गेलो आहे. माझी कोची आणि मग पुढे लक्षद्वीप भेटीबद्दल पूर्वी मी लिहिले आहेच. आज वेलियनाड नावाच्या गावात मी १० दिवस राहिलो होतो आणि आसपास भटकलो होतो, त्याबद्दल लिहिणार आहे.

मी वेलियनाड ह्या अनोळखी गावी जायचे काही कारण नव्हते. ते काही कुठल्याही tourist map वर नाही. मी गेलो होतो ते चिन्मय मिशनच्या Chinmay International Foundation नावाच्या संस्थेत एका अभ्यासक्रमाच्या निमित्ताने. कोची विमानतळापासून वेलियनाड(Veliyanad) हे गाव तसे थोडे लांबच आहे. कोचीला पोहचलो तेव्हा रात्र झाली होती. त्यामुळे वेलियनाडला जाई पर्यंतचा नजारा काही दिसला नाही. मुक्काम केंद्रातच होता. हे गाव म्हणजे आद्य शंकराचार्यांचे मातुल-ग्राम. सकाळी उठून पाहतो तर काय, अतिशय छान अशी केरळी तऱ्हेची घरे जी नक्षीदार लाकडी काम  यांनी सजलेली, नारळाची झाडी असलेले टुमदार गाव. ज्या झाडापासून साबूदाणा बनतो, ती  Tapioca झाडे बरीच आहेत तेथे. केंद्राचा परिसर देखील असाच रम्य आहे. आद्य शंकराचार्यांचे मातेचे घर, त्यात असलेले स्वामी चिन्मयानंदांचे ध्यानमंदिर, अय्यप्पाचे आणि नाग यक्षी यांचे केरळी मंदिर आहे. एका लाकडी बांधकाम असलेल्या आणि कौलारू छप्पर असलेल्या हॉलमध्ये दररोज सकाळी आणि दुपारी अभ्यासवर्ग असे. पहिल्याच दिवशी पाऊस सुरु झाला. माझ्या एकदम लक्षात आले, की त्या वर्षीचा मान्सुनचा पहिला पाऊस मी अनुभवतो आहे, कारण मी बरोबर जूनच्या पहिल्या आठवड्यात तेथे गेलो होतो आणि मान्सुन सुरु होणार होता.

दररोज सकाळी आणि संध्याकाळी जमेल तसे आम्ही आसपास भटकट असू. पहिल्या दिवशी काही जमले नाही, पण दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच असलेल्या Peppathy गावात शिवाचे मंदिर पहायला गेलो, तसेच पुढे Pazhur गावातील Perumthikkovil हे नदी काठी असलेल्या बाराव्या शतकातील मंदिर पाहायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून Pazhur गावातच पण Muvattupuzhla नदीच्या पलीकडे असलेले नृसिंह स्वामी मंदिर पाहायला गेलो. नंतर कोणीतरी आम्हाला त्या गावातील सुंदरन नावाच्या एका ज्योतिषाकडे देखील घेऊन गेले, ज्याचे भविष्य सांगण्याचे तंत्र वैशिष्ट्यपूर्ण आहे.

तिसऱ्या दिवशी कुठे जावू शकलो नाही. चौथ्या दिवशी दुपारनंतर, Thrippunithura या नावाच्या कोचीच्या उपनगरात Ameda Temple पाहायला गेलो, जे सप्तमातृका मंदिर आहे, तसेच जवळच असलेले Poornathrayessa Temple देखील बघितले जे विष्णूचे मंदिर आहे. केरळ मधील मंदिर स्थापत्य हा वेगळाच विषय आहे. Thrippunithura हे तसे ऐतिहासिक आहे, कोचीन राज्याची ती राजधानी आहे, आणि तेथे Hill Palace नावाचा राजवाडा आणि संग्रहालय आहे जे पाहायला आम्ही परत दुसऱ्या दिवशी तेथे गेलो. आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेले कलाडी येथेही गेलो. जवळच असलेल्या Perumbavoor गावात्तील  Iringole Kavu जंगलात दुर्गेचे मंदिर आहे तेथेही गेलो. वेलियनाड जवळ Thirumarayoor नावाच्या गावातील रामस्वामी मंदिर पाहायला गेलो. Piravom गावातील एक जुने, पहिल्या शतकातील असे Syrian Church(St Mary’s Cathedral) आणि आत असलेली जुनी चित्रे देखील पाहायला मिळाली.

आमच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी, चिन्मय मिशनच्या केंद्रात असलेल्या अयप्पा  मंदिरात सहस्रदीप कार्यक्रम झाला, ज्यात संपूर्ण मंदिर उजळून निघाले, जे अपूर्व दृश्य होते. नंतर भजनाचा कार्यक्रम झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गावात असलेले काही बंगाली कामगार गायनाच्या कार्यक्रमाला आले होते, ज्यांनी बंगाली गीते, बाऊल संगीत, कबीराचे दोहे वगैरे गायली, आणि त्या केरळी वातावरणातील संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. दुसऱ्या दिवशी आम्हा सर्व सहापाठींनी अजून एक दिवस भटकंती करून पुढे आपापल्या गंतव्य स्थळी जावे असे ठरले आणि त्या प्रमाणे, Thrissur(erstwhile Trichur) जिल्यातील प्रसिद्ध गुरुवायुर मंदिरला भेट दिली. हे मंदिर त्यांच्या हत्तीशाळेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आवारात हत्तीची राहण्याची व्यवस्था आहे. मंदिरातच रात्रभर मुक्काम ठोकला. रात्री उशिरापर्यंत कोणीतरी केरळचा प्रसिद्ध शास्त्रीय नृत्याचा अविष्कार मोहिनीअट्टम् सादर करत होते. आणि नंतर आम्ही अगदी पहाटे पहाटे ३ वाजता कृष्णमंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर Thrissur शहरातील Vadakkumnathan Temple जे प्रसिद्ध असे प्राचीन शिवमंदिर आहे त्याला भेट दिली. कोची शहरात किल्ला, जुने चर्च वगैरे पाहून कोची विमानतळावर पुण्याकडे रवाना होण्यास धडकलो.

शेवटला, जाता जाता, चिन्मय मिशन मधील अभ्यासक्रम आणि तेथील खाद्य-भ्रमंती या बद्दल!  भारतीय तत्वज्ञान/दर्शनातील क्षेत्रातील न्यायदर्शनाच परिचय हा अभ्यासक्रम जो पुण्यातीलच संस्कृततज्ञ वसिष्ठ नारायण झा यांनी आखलेला, आयोजित केलेला होता. त्याबद्दल मी पूर्वी माझ्या ब्लॉगवर येथे लिहिले आहेच. केरळची जशी मंदिर वैशिष्ठ्यपूर्ण आहेत, तशीच तेथील खाद्य-संस्कृती देखील वेगळीच आहे. त्याबद्दल अगदी थोडेसे. चिन्मय मिशन केंद्रात तेथे आम्हाला सकाळी नाश्त्याला बऱ्याच पुट्टु हा पदार्थ, इडली, सागू, कुर्मा, तेथील इलायची केळी(ती पण कधी कच्ची, तर कधी उकडलेली!), फिल्टर कॉफी सोबत मिळत असे. दोन्ही वेळच्या जेवणात अर्थातच भात, भातच असे. लाल, जाडा भरडा अश्या तांदळाचा भात, पांढरा भात, सांबार, रसम्, भाजी, मस्त ओले खोबरे  वगैरे घातलेली, पायसम्, अवियल, कच्च्या केळ्याची भाजी, फणसाची भाजी, गोथांबू पायासम्, उन्नीयप्प्म नावाचे गोड पदार्थ इत्यादी. मी तेथून फिल्टर कॉफी तयार करण्याचे पात्र, तसेच पुट्टु तयार करण्याचे पात्र पुट्टुपात्र घेऊन आलो, आणि अधून मधून केरळची आठवण म्हणून ते पदार्थ करत असतो!

तर अशी ही माझी केरळची offbeat भटकंती, जी टूरिस्ट कंपन्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी आणि समृद्ध करणारी!

आहुपे, भाग#२(रानभाजी महोत्सव)

माझ्या मागील ब्लॉग मध्ये आहुपे या आगळ्या वेगळ्या ठिकाणाच्या पावसाळी निसर्ग पर्यटनाचा अनुभव मी सांगितला होता. त्याच भटकंतीत अजून एक वेगळा अनुभव मी घेतला. वनवासी कल्याण अश्राम ही समाजसेवी संस्था गेली ५०-६० वर्षे वनवासी, आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी कार्य करते आहे. त्या संस्थेच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे गेली दोन वर्षे रानभाजी महोत्सव असा आगळा वेगळा महोत्सव आहुपे, जुन्नर जवळील कुकडेश्वर आणि तळेरान या तीन ठिकाणी केला जातोय. त्याबद्दल खूप उत्सुकता होतीच. महाराष्ट्र सरकारची एक Tribal Research and Training नावाची एक संस्था पुण्यात आहे, तेथे मी पूर्वी एकदा गेलो होतो.

IMG_0828

माझ्या आहुपेच्या वास्तव्याच्या दुसऱ्या दिवशी हा रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम होता. रानभाज्या म्हणजे सहसा शहरी भागात न आढळणाऱ्या भाज्या. जंगलात, शेतात, बांधांवरून आपोपाप उगवल्या जाणाऱ्या अश्या ह्या भाज्या. प्रामुख्याने पावसाळ्यात, काही महिने ह्या असतात. जसे कासच्या पठारावर पावसाळ्यातील काही दिवसच काही विशिष्ट फुले, रानफुले येतात, आणि काही दिवसातच ती नष्ट होतात, तसाच हा काहीसा प्रकार. अश्या ह्या रानभाज्यांची माहिती, अर्थात, जंगलात राहणाऱ्या,वनात शेती करणाऱ्या वनवासी, आदिवासी लोकांना माहिती असते. ती परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. नुसत्या त्या भाज्यांची माहिती नव्हे तर, त्या स्वयंपाकात, खाण्यात कशा वापराव्या याचे देखील पिढीजात ज्ञान त्यांच्याकडे असते. यातील बऱ्याच भाज्या औषधी गुणधर्म देखील असलेल्या असतात. या सर्वांचे एका तऱ्हेने दस्ताऐवजीकरण व्हावे, तसेच ह्याची माहिती इतरांना पोहोचावी, त्यातून आदिवासी लोकांना चार पैसे देखील मिळावे हा अश्या कार्यक्रमाचा उद्देश. आहुपे हा भाग देखील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा आणि यां निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून ह्या वनपुत्रांचा, त्याच्या भागाचा शाश्वत विकास व्हावा हा प्रमुख हेतू.

पुण्यातून वनवासी कल्याण आश्रमातर्फे पर्यटकांना आहुपेत ह्या कार्यक्रमासाठी, आश्रमाच्या अंजली घारपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणले. वनवासी कल्याण आश्रमाची स्मरणिका सर्वाना देण्यात आली, ज्यात त्यांच्या उपक्रमाबद्दल, इतिहासाबद्दल माहिती दिली होतो. सकाळी १० वाजता आहुपेतील शासकीय आश्रम शाळेत सगळे जमले. नाश्ता आणि नाचणीचे गरम गरम असे आंबट गोड आंबील देऊन स्वागत करण्यात आले. तेवढ्यात पावसाने देखील जोरदार सरी वर सरी झाडून जणू काही स्वागतच केले. आहुपे गावातील वाड्या, वस्त्यामधून अनेक महिला(लहान मुलींपासून ते आजी/मावशीपर्यंत सर्व) नटून थटून हातात त्यांनी बनवलेली रानभाजी, भाकरी यांनी सजलेले ताट घेऊन कार्यक्रम स्थळी येत राहिल्या. हॉल मध्ये भिंतींवर २५-३० रानभाज्यांची माहिती देणारी विविध भित्तीपत्रके लावली गेली होती. आलेल्या महिला आपापल्या जागी बसून त्या चाखायला येणाऱ्यांना त्याची माहिती उत्साहाने देत होत्या. आम्ही सर्व पर्यटक, तसेच नेमून दिलेले परीक्षक, ह्या सर्व भाज्या चाखत, खात फिरत होतो. प्रत्येक ठिकाणचे भित्तीपत्रक वाचून माहिती करून घेत होतो. मला एका तऱ्हेने खूप वर्षांपूर्वी केलेली अमेरिकेतील Napa Valley मधील wine tasting ची ट्रीप आठवली.

रुखाळ, भोकर, तेरा, आबई,  काट माट, कर्दुला, कोंदर, कुर्डू, तोंडेची भाजी, चावा, टाकळा, कुसरा, करंज, भारंगी, चिंचूरडा, रताळ कोंब, गोमेटी, हळदा, महाळुंग, खुरासणी, कोंभाळा अश्या भाज्यांची माहिती देणारी पत्रके लावली होती. त्यातील बऱ्याच भाज्या महिलांनी आणल्या होत्या. कुर्डू खूप जणीनी आणली होती.  काही वेळाने मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. विविध मान्यवरांची भाषणे झाली. अंजली घारपुरे यांनी कार्यक्रमाची कल्पना, स्थानिक लोकांचे सहकार्य याबद्दल बोलत, सहभागी महिलांचे कौतुक केले. डॉ. भोगावकर, ज्या वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत, त्यादेखील एकूण परंपरा जपण्याचे आवाहन करत, कार्यक्रमाचे स्वागत केले. त्यांनी ह्या Wild Edibles of Vidarbha नावाचे  एक पुस्तकही लिहिले आहे. वनवासी कल्याण संस्थेतर्फे देखील रानभाज्यांच्या माहितीचे संकलन असणारे पुस्तकाचे लवकरच प्रकाशन करत आहे. परीक्षकांतर्फे स्पर्धेचे निकाल जाहीर करून, विजेत्यांचे कौतुक, बक्षीस वितरण, मनोगत हे सर्व झाले आणि हा सोहळा पार पडला.

तेवढ्यात जेवणाची सूचना झाली. मी विचारच करत होतो की ह्या आलेल्या सर्व पर्यटकांचे भोजनाची व्यवस्था कशी होणार. पण सूचना ऐकून चाट पडलो. कल्पना अशी होती की गावातील वनवासी बंधूंकडे त्यांनी प्रत्येक ४-५ लोकांच्या समुहाची जेवणाची व्यवस्था केली होती.  अश्या प्रकारे गावातील १२-१५ जणीना त्यामुळे काही पैसे मिळाले, आणि आम्हा पर्यटकांना त्यांच्या घरात शिरकाव करून त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मिळाली. बसके घर, उताराचे कौलारू छप्पर, अंधाऱ्या खिळ्या, अंगणात शेळ्या, गायी, कोंबड्या, सरपण. स्वयंपाक घरात चूल. सारवलेल्या घरात, चुलीसमोर बसून पोत्यावर बसून घरातील आजी, मावशी यांच्या सोबत गप्पा मारत गावरान भोजनाचा आस्वाद घेण्यास मिळाला. मला तर माझ्या आजोळची आठवण झाली. माझ्या सुदैवाने माझ्या बरोबर पुणे आकाशवाणीच्या प्रसिद्ध आणि वरिष्ठ निवेदिका अंजली लाळे ह्या होत्या आणि अनपेक्षितपणे त्यांच्या आकाशवाणी संदर्भात गप्पा मारता आल्या. त्यानंतर आम्ही मग गावकऱ्यांकडून स्थानिक वाणाचे  तांदूळ विकत घेतले. सर्वांचा निरोप घेऊन, भाज्यांच्या चावीच्या आस्वादाच्या आठवणी काढत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.

एकूणच हा असा अनपेक्षित, आणि वेगळा अनुभव देणारी सहल ठरली. आदिवासी संस्कृती, जीचे विविध आयाम आहेत, त्यातील ही खाद्य-संस्कृती, ती पण जपली गेली पाहिजे. अंजली घारपुरे यांच्या पुढाकाराने नक्कीच हे होईल. प्राची दुबळे यांनी जसे आदिवासी संगीत जपण्यासाठी त्याचा अभ्यास करून, त्याचे रेकॉर्डिंग आणि दस्ताऐवजीकरण केले आहे, किंवा गणेश देवी यांनी भाषा लोकसर्वेक्षण करून आदिवासी बोली भाषेची माहिती संकलित केली, मुकुंद गोखले यांनी गोंडी लिपी तयार केली, तसेच हे आहे. परवाच जागतिक आदिवासी दिन साजरा झाला, त्या दृष्टीने ही सहल औचित्यपूर्णच ठरली असे म्हणावे लागेल.

आहुपे, भाग#१(निसर्ग पर्यटन)

महाराष्ट्र हा दऱ्या-खोऱ्याने, डोंगर कडांनी नटलेला प्रदेश आहे. सह्याद्रीत किल्ल्यांची रांगच आपल्याला दिसते. पावसाळ्यात तर हा सह्याद्री आणखीन नटून जातो. हिरव्या रंगाची सगळीकडे उधळण, ठिकठिकाणी ओघळणारे छोटे मोठे धबधबे, धुके, उन-पावसाचा खेळ, असा सर्वत्र नजारा असतो. म्हणून तर गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटन, विक-एन्ड पर्यटन वाढीस लागले आहे. त्याच्या जश्या चांगल्या बाजू आहेत, तश्या वाईट बाजू देखील आहेत. मी तसा ट्रेकर, सह्याद्रीत १२-१५ वर्षांपासून खूप भटकलेला. पण ह्या गेल्या काही वर्षातील परिस्थितीमुळे, मी थोडासा ह्या अनिर्बंधित पर्यटनापासून लांबच राहिलो होतो.

आहुपे या ठिकाणाचे(किंवा अहुपे) नाव आधीपासून ऐकतो आहे. काही वर्षांपुर्वी गोरखगड, सिद्धगड ट्रेकच्या वेळेस संदर्भ आला होता. हा ट्रेक आम्ही कोकणातून केला होता. आहुपे घाट(म्हणजे घाटवाट, नाणे घाटासारखी) जी घाटप्रदेशावरून कोकणात खालीवर करायला, असलेली जुनी-पुराणी पायवाट आहे त्याबद्दलही ऐकले होते. तसे पहिले तर अश्या घाटवाटा सह्याद्रीत ठिकठिकाणी आहेत. वनवासी कल्याण आश्रमातर्फे आहुपेत रानभाजी महोत्सव हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला जातो असे ऐकले होते. ह्या वर्षी तेथे भेट द्यावी असे ठरवले. आहुपे हे भीमाशंकर अभयारण्यातील अगदी टोकाकडील छोटेसे गाव. तसे पहिले तर पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव. महादेव कोळी नावाच्या आदिवासी लोकांचे प्रामुख्याने वास्तव्य तेथे आहे. तसे पहिले तर अभयारण्य म्हटले की त्याची परिक्षेत्रातील बऱ्याचदा गावांचे पुनर्वसन केले जाते, किंवा, त्यांच्यावर बरेच निर्बंध लागू होतात. जंगलं, वन्यजीव, आणि मानव यांच्यातील ह्या सर्व प्रश्नाचा उहापोह काही वर्षांपूर्वी पश्चिम घाट बचावो आंदोलनाने केला होता.

आपण भीमाशंकर देवस्थान, तसेच अभयारण्यातही शेकरू पाहायला गेलेलो असतो. पुण्यापासून राजगुरुनगर, मंचर, घोडेगाव करत भीमाशंकरचा रस्ता सुधारायचा. घोडनदीवरील डिंभे धरण ओलांडायचे आणि आहुपेच्या दिशेने जायचे. हा सर्व परिसर देखील निसर्गरम्य आहे हे सांगायला नकोच. आहुपेचा रस्ता ह्या धरणाच्या काठाकाठाने कित्येक किलोमीटर जातो. वाटेत कित्येक ठिकाणी थांबण्याचा मोह होतो.

पुढे मग डोंगरच्या कुशीत वसलेले माळीण गाव आहे, जेथे २०१४ मध्ये भूस्खलन होऊन डोंगराने ते गावच गिळंकृत केले होते. तेथे आता जीव गमावलेल्या गावकऱ्यांच्या स्मरणासाठी स्मृतीस्तंभ उभारला आहे. जवळच नवीन माळीण हे गाव वसवले आहे. गावातल्या लोकांशी थोडेसे बोललो, त्यांना रजई वगैरे करण्यासाठी असा रोजगार उपलब्ध करून दिला गेला असे कळाले. पण परवा परवाच पुनर्वसन कामाचा(घरे, रस्ते) दर्जा चांगला नाही, अश्या बातम्या वर्तमानपत्रातून आल्या. एखाद्या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतरीत करण्याची संधी गमावली गेली असे वाटले. ह्या संबंधी मी नुकतेच येथे लिहिले होते.

IMG_0709

असो. ही सर्व डोंगराच्या कुशीत लपलेली कित्येक गावे, वाड्या, वस्त्या ओलांडत आपण आहुपेत दाखल होतो. आणि आजूबाजूचा नजारा पाहून आपले भानच हरपते. पण थोडेसे पायपीट करण्याची तयारी हवी. गावात आपण कोणाही गावकऱ्याच्या घरात, झोपडीत मुक्काम करू शकतो, तेथेच जेवणाची सोय करता येते. आम्ही सुनिता पारधी यांच्याकडे मुक्काम टाकला. गेल्या गेल्या आम्ही चुलीवरील गरम गरम भाकऱ्या, मऊसार पिठलं, हातसाडीच्या तांदळाचा भात यावर ताव मारला, आणि मग तडक पायपिटीकरता कुच केले.

गावातल्या एकाला वाटाड्या म्हणून बरोबर घेतले. सभोवार नजर फेकली, स्वच्छ हवेचा छातीभरून श्वास घेतला. दुरवर ढगात लपलेले हिरवे डोंगर, हिरवे पठार, आदिवासींच्या झोपड्या, काळा डांबरी रस्ता हे सर्व विलोभनीय दिसत होते. पहिल्यांदा भैरोबाचे दर्शन आणि नंतर देवराईत जराशी चक्कर मारली. ही देवराई म्हणावी की आमराई हा प्रश्न पडावा, इतकी आंब्याची झाडे आहेत. देवराया ह्या निसर्ग संरक्षणाची कामगिरी फार छान रीतीने पार पडतात, भले मूळ उद्देश गावकऱ्यांचा, आदिवासींच्या श्रद्धेचा असू दे, पण त्यामुळे जंगल वाचते, मानवी हस्तक्षेपाशिवाय राहते. पुण्यात देखील देवराई महोत्सव घेतले जातात, त्याबद्दल मी पूर्वी लिहिले होते. आहुपेत आणखीन देखील २-३ देवराया आहेत.

भैरोबाची देवराई पाहिल्यानंतर, आम्ही मोर्चा वळवला तो सह्यकड्याच्या बाजूने फिरण्याचा. आहुपे हे गाव, त्याच्या वाड्या वस्त्या, समुद्र सपाटीपासून साधारण ३८०० मीटर उंचीवर एका विस्तीर्ण पठारावर वसले आहे. एका बाजूला सह्यकडा आहेत, आणि बाकीच्या बाजूने डोंगर आहे. ह्या सह्यकड्याच्या बाजूने फिरत, विविध नजारे पाहत फिरणे हा अतिशय सुखद अनुभव आहे जो अवर्णनीय आहे. खालच्या कोकण भागाचा विस्तृत परिसर नजरेस पडत राहतो. गोरखगड आणि बाजूलाच मच्छिंद्रगड अशी किल्ल्यांची जोडगोळी दिसत राहते. छोटेमोठे धबधबे दिसत राहतात. धुके की ढग हे न कळण्याइतके, ते आपल्या आजूबाजूला राहतात. असे तास दीडतास फिरल्यानंतर, पाय दुखायला लागले, अंधारही पडायला लागाला त्यामुळे नाईलाजाने पावले परत गावात मुक्कामाच्या ठिकाणी वळवली.

गावात पोचतो न पोचतो जोराचा पाऊस सुरु झाला, आणि सारा आसमंत ढगात आणि अंधारात बुडून गेला. गवती चहा टाकलेला वाफाळलेला चहा पिऊन सुखावलो. थोड्या वेळातच अंगणात शेकोटी पेटली. गावातली काही मुले पारधी यांच्या घरी आली. आमचे सह-मुक्कामी अमोल पंडित जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत, तेही तेथे आले होते. ते या भागात मुलांच्या साठी मदतीचे काम करतात. त्यांनी माग तास दोन तास मुलांशी गप्पा मारल्या, खेळ खेळले, आम्हीही त्यात थोडेफार सहभागी झालो. उद्या सकाळी काय काय पाहायचे आहे याची चर्चा केली. आहुपे घाट, धबधब्याचे जवळून दर्शन करायचे ठरले. आहुपेवरून भीमाशंकर हा ट्रेक आहे जो १३ किलोमीटरचा आहे तो देखील करता येतो(मी पूर्वी भोगिरी किल्ल्यावरून भीमाशंकर असा ट्रेक केला होता). अजूनही बरच काही पहायासारखे आहुपेत. गेली दोन-तीन वर्षीपासून सुरु झालेला, रानभाजी महोत्सव कार्यक्रम देखील होताच(त्याबद्दल पुढील ब्लॉग मध्ये लिहीनच). चुलीवरील जेवणाचा सुवास दरवळत होता. भुका लागल्याच होत्या. कुर्डू नावाच्या रानभाजीची परतून केलेली भाजी, शेवाळाच्या कंदाची चटणी, तांदळाची भाकरी असा बेत होता. जेवणावर ताव मारून, परत एकदा अंधारात फेरफटका मारून निद्रेच्या स्वाधीन झालो.

 

 

फिलाडेल्फिया मधील ऐतिहासिक तुरुंग

गेल्या वेळच्या माझ्या फिलाडेल्फिया भेटी दरम्यान बरेच काही पाहायला मिळाले. त्याबद्दल जसे जमत जाईल तसे लिहतो आहे. या आधीचे फिलाडेल्फिया बद्दलचे काही ब्लॉग तुम्ही इथे पाहू शकता. आंज ह्या ब्लॉग मध्ये Eastern State Penitentiary ह्या ऐतिहासिक तुरुंगाच्या भेटीबद्दल लिहिणार आहे.

मला ऐतिहासिक स्थळांना भेटी द्यायला आवडते. भले ते तुरुंग का असेना! भारतातील अंदमान मधील ऐतिहासिक तुरुंग ज्यात वीर सावरकर यांना ब्रिटीशांनी बंदी केले होते, ते तर जाज्वल्य असे ठिकाण आहे. तेथे अजून जायचे आहेच(पण लक्षद्वीपला गेलो आहे). पण फार पूर्वी मी जेव्हा अमेरिकेत होतो, तेव्हा तेथील San Francisco जवळील समुद्रातील Alcatraz या बेटावरील एक तुरुंग पाहायला गेलो होतो. परवाच मी The Green Mile ह्या सुंदर चित्रपटाबद्दल लिहिले होते, ज्यात Tennessee State Prison(Nashville) या ऐतिहासिक तुरुंगातील चित्रीकरण आहे. तर एके शनिवारी सकाळी सकाळी मी या फिलाडेल्फिया मधील तुरुंगाला भेट द्यायचे ठरवले. तसे ते ठिकाण माझ्या हॉटेल पासून खूप लांब नव्हते, म्हणून मी चालतच निघालो. नाहीतरी मला चालत चालत जायला आवडतेच. आणि फिलाडेल्फिया चालत चालत फिरायला अगदी मस्त आहे. ह्या तुरुंगाचे नाव आहे Eastern State Penitentiary. फेब्रुवारीचा महिना होता. अजून तशी थंडी होतीच. पण उन होते, मोकळे निळे आकाश होते, त्यामुळे अतिशय छान वाटत होते. रस्त्यावरून गर्दी अशी नव्हतीच. Vine Street वरून चालत, आतील गल्ली बोळातून इकडे तिकडे पाहत आरमात निघालो होतो. तुरुंगाच्या जवळ जसा गेलो, तसे ती भुईकोट किल्ल्यासारखी इमारत पाहून गुढरम्य परिसरात आल्यासारखे वाटून गेले.

 

हे तुरुंग अमेरिकेतील सर्वात जुने तुरुंग आहे असे त्यांच्या माहितीपत्रकावर लिहिले होते(१८२९ मध्ये सुरु झाले. ही देखील बेंजामिन फ्रँकलिनचीच कल्पना). अर्थात हा तुरुंग आता वापरात नाही. मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर १४ डॉलर देऊन तिकीट काढले. मी audio tour घेतली, आणि जवळ जवळ पुढील तास-दीड तास मी आत भटकत होतो. हे तुरुंग जुने असल्यामुळे बराच भाग नष्ट झाला होता, आणि जे काही शिल्लक होते, तेही संवर्धन करून जपून ठेवले जात होते. तुरुंगाच्या उंच दगडी भिंती, बुरुजे अजून बरीच शिल्लक आहेत. सायकलीच्या चाकांना जसे आरे असतात तश्या प्रकारची सात आरे आत मध्ये आहेत, ज्यातून कैद्यांना राहण्यासाठी कक्ष(cell blocks) खाली आणि वर असे दोन मजल्यांवर आहेत. Penitentiary हा शब्द खुपच अर्थपूर्ण आहे. गुन्हेगारांना शिक्षा न देता त्यांना प्रायश्चित्त करण्याची अशी ही जागा म्हणजे Penitentiary. ह्या audio tour मध्ये प्रत्येकाला एक MP3 player आणि headset दिला गेला होता. तुरुंगातील १०-१२ ठिकाणी audio tour जाता आले आणि तेथील इतिहास आणि माहिती मिळत गेली.

या तुरुंगातून त्याकाळचे अमेरिकेतील बरेच कुप्रसिद्ध गुन्हेगार बंदिस्त होते. Al Capone नावाचा Slick Willie Sutton नावाचा बॅंक लुटारू येथे तुरुंगवास भोगत होते. ह्या tour च्या दरम्यान आम्हाला एखाद-दुसऱ्या cell मध्ये सुद्धा जावू दिले गेले. त्यामुळे त्यावेळेस तेथील वातावरण कसे होते, याची कल्पना करता येते.

 

आत मध्ये त्यांनी बरीच प्रदर्शने, चित्रे, इतिहास सांगणारी माहिती पत्रके, छायाचित्रे ठिकठिकाणी लावली आहेत. त्यातील मला आवडले ते म्हणजे Prisons Today हे प्रदर्शन. आज घडीला अमेरिकेत तुरुंग व्यवस्था कशी आहे हे सांगणारी, आकडेवारी असलेले, प्रदर्शन आहे. तसेच अजून दुसरे प्रदर्शन आहे ज्याचे नाव आहे The Big Graph. हे मुख्य पटांगणात, उघड्यावर आहे. हे प्रदर्शन म्हणजे वेगवेगळया देशांत किती लोकं तुरुंगवास भोगत आहे यावर आहे आणि त्याचा इतिहास देखील आहे. तुरुंगात बरीच art installations देखील आहेत.

अश्या ऐतिहासिक आणि वेगळ्या ठिकाणच्या भेटी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. सर्व तुरुंग पाहून झाल्यावर तेथून निघालो आणि माझा मोर्चा The Franklin Institute कडे वळवला. पायी पायी रपेट करत मजेत येत असता Wood Street/N 20th Street च्या कोपऱ्यात Book Corner हे पुस्तकाचे दुकान दिसले. छोटेखानीच होते. बाहेर जुनी पुस्तके ठेवली होती, त्यातील बरीचशी एका डॉलर पेक्षा कमी किमतीची होती. तेथे काही वेळ काढून एक-दोन पुस्तके(E M Foster’s The Room with View, Where Angles Fear to Tread) विकत घेतली. तेथून जवळच The Franklin Institute ची भव्य इमारत आहे, तेथे गेलो. त्याबद्दल नंतर कधीतरी.