खुशवंत सिंग आणि निसर्ग

काल संध्याकाळी तास-दीड तास मस्त पाऊस झाला. सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला औंधच्या दिशेने निघालो. औंध-रावेत रस्त्यावरल्या औंध छावणी ह्या भागात दोन्ही बाजूला भरपूर झाडी आहेत. काल रात्रीच्या पावसामुळे, रस्त्यावर चालताना मुंगळे दिसत होते. तसेच छोटे छोटे कीटक, बहुधा चतुरासारखी असलेली हि कीटके हजारोंच्या संख्येने उडत होते. ह्या किड्यांना खाण्यासाठी कावळे, मैना, आणि सरडे सुद्धा दिसले. एकदा दोनदा तर हे सरडे माझ्या नजरेस न पडल्यामुळे, ते पसार होताना पाहून माझ्या छातीचा ठोका चुकला होता. रस्त्याच्या दुतर्फा शिरीष वृक्ष, तसेच रेन ट्री, आणि इतरही वृक्ष आहेत, ते पावसामुळे स्वच्छ धुवून गेल्याने परत हिरवे दिसत होते.

मी माझ्या घराच्या आगे मागे छोटीशी बाग केली आहे. काही ना काही मी बागकामातील प्रयोग करत असतो. मी राहतो त्या भागात देखील विविध देशी-विदेशी वृक्षांची रेलचेल आहे. ह्या झाडांची विविध ऋतूतील रूपं अनुभवायला येतात मला. आणि त्या वृक्षांमुळे, ह्या आसमंतात, विविध पक्ष्यांची उपस्थिती असते. त्यांचे देखील विविध अनुभव येत राहतात. ह्या सर्वांबद्दल विस्ताराने लिहायचे मनात आहेत. बागेत असलेल्या कांचन बद्दल तसे मी पूर्वी लिहिले आहेच. पण हे सगळे एवढे प्रास्ताविक का हे सांगतो.
प्रसिद्ध लेखक खुशवंतसिंग यांचे नाव घेतले कि भारताच्या फाळणी नंतरची दारूण कथा सांगणाऱ्या The Train to Pakistan या पुस्तकाची(आणि चित्रपटाची) आठवण येते. त्यांचे इतरहि पुस्तके गाजली. प्रामुख्याने त्यांच्या जीवनात आलेल्या स्त्रियांच्या आणि प्रेमाच्या रंगेल गोष्टी सांगणारे पुस्तक देखील आहे. पण त्यांनी त्यांचे निसर्ग प्रेम विषद करणारे देखील एक पुस्तक लिहिले आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याचे शीषर्क आहे Delhi through the seasons. त्यांच्या ह्या आगळ्या पुस्तकाबद्दल थोडेसे आज लिहायचे आहे. खरे तर हे पुस्तकच मराठी मध्ये आणावे असा मानस आहे. पाहूयात.

हे पुस्तक म्हणजे वर्षाच्या बारा महिन्यात दिल्ली शहरात दिसणाऱ्या निसर्गाचे , त्यातील बदलांचे खुशवंतसिंग यांनी केलेले वर्णन आहे. ते त्यांच्या घरातील बागेतील झाडे, पक्षी यांचे देखील अनुभव नमूद करतात. पुस्तकात निसर्ग चित्रकार शुद्धसत्व बसू यांनी काढलेली नितांत सुंदर चित्रे देखील पानोपानी विखुरलेली आहेत. खुशवंतसिंग यांच्या सूक्ष्म निरीक्षणाचे आणि त्यांनी त्यांच्या रोजनिशीत ठेवलेल्या नोंदींचे कौतुक करावेसे वाटते. जसे कि प्रत्येक महिन्यात सूर्योदय आणि सूर्यास्त कधी होती, त्या वेळेत कसा बदल होतो त्याबद्दल ते लिहितात, वेगवेगळ्या ऋतू मध्ये दिल्ली मधील हवामान कसे असते ह्याचे देखील ते वर्णन करतात. ठिकठिकाणी संस्कृत साहित्यात, लोकसाहित्यात तसेच इंग्रजी कवींच्या साहित्यात आलेले निसर्गाविषयी संदर्भ ते वेळोवेळी उधृत करतात. दिल्ली शहराच्या निसर्गाव्यातिरिक्त, आपल्या घराच्या बागेत त्यांना दिसलेला निसर्ग, पक्षी जगत ह्याबद्दल ते सांगतात. ते वाचताना तर माझ्या सारख्या अनेक वाचकांना नक्कीच आपले अनुभव वाटतील असे आहेत. उदाहरणार्थ, ते लिहितात, कि सकाळी लवकर उठल्याबरोबर ८-१० मांजरी त्यांची वाट पाहत असतात. मग त्यांना दुध देणे हा कार्यक्रम असतो. अगदी असेच मी अनुभवतो दररोज. १-२ मांजरी समोरच्या किंवा मागील बागेत, खिडकीत मी उठल्याची चाहूल लागताच मला साद घालतात, आणि दुधाची मागणी करतात. अश्या सर्व अनुभवांमुळे आणि एकूणच ललित अंगाने मांडणी केल्यामुळे हे पुस्तक अतिशय झाल्यामुळे वाचनीय झाले आहे.

प्रस्तावनेत खुशवंतसिंग आपल्या पक्षी निरीक्षणाच्या जुन्या छंदाबद्दल लिहितात. हे पुस्तक आधी Nature Watch या नावाने १९९० मध्ये आले होते. याची माहिती मला एका लेखात मिळाली. माझ्याकडे जे आहे ते २०१५ ची आवृत्ती आहे जी खुशवंतसिंग यांच्या २०१४ मध्ये झालेल्या निधनानंतर नव्या रुपात नव्या नावानिशी परत प्रकाशित करण्यात आले. दोन्ही पुस्तकांच्या प्रास्ताविकात थोडासा फरक आहे. जुन्या आवृत्तीत ते आपल्या ऑक्सफोर्ड मधील दिवसांचा उल्लेख करून ते निसर्ग वाचन करायला कसे शिकले याची छोटीशी गोष्ट सांगतात. आणि परत दिल्लीस आल्यावर तो छंद त्यांनी जोपासला आणि त्यातून नोंदी करत करत भरपूर माहिती जमवली, ज्यातून त्यांनी आकाशवाणीवर कार्यक्रम करू शकले. दोन्ही प्रस्तावनेत त्यांनी आपल्या बागेबद्दल लिहिले आहे.

लहानपणी मी राहत असलेल्या चाळीच्या मागे टणटणीची झाडी होती. त्याची छोटीशी काळसर फळे आम्ही खात आणि त्या छोट्या फुलांमधील मध चोखून घेत असू. त्याचे इंग्रजी नाव lantana असे आहे हे ह्या पुस्तकातून समजले आणि टणटणी ह्या मराठी नावाच्या उगमाचे रहस्य उमगले. मी राहत असलेल्या गृहसंकुलात असलेल्या काही झाडांची, वृक्षांची नावे काय असावीत असा मी विचार करत असे. जसे फुलांना अतिशय उग्र वास असलेला सप्तपर्णी वृक्ष, तसेच माझ्या बागेत असलेल्या आणि नाव माहित असलेल्या काही फुलझाडांबद्दल त्यांनी बरीच माहिती पुरवली आहे, त्यामुळे त्यांची नव्याने ओळख झाली(उदाहरणार्थ, चाफ्याबद्दल त्यांनी दोन परिच्छेद लिहिले आहेत ते मुळातून वाचायला हवे). कांचन झाडाच्या कळ्या दहीत किंवा भाजीत टाकतात हि माहिती देखील मला मिळाली.

मे महिन्यातील कडूलिंबाचा बहर जो ठिकठिकाणी दिसतो त्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. लहानपणी आजोळी दुपारच्या उन्हात कडूलिंबाच्या झाडाखाली बैलगाड्या बैल सोडून लावेल्या असत, त्यात बसून आम्ही मुले पत्ते वगैरे असे खेळ खेळायचो. चैत्रपाडाव्याला ह्याची फुलं गुळ घालून खाण्याची, तसेच, ह्याची पाने अंघोळीच्या पाण्यात घालून त्याने न्हायची पद्धत आहे(त्यांनी याबद्दल लिहिले नाही, बहुधा उत्तर भारतात हे प्रथा नसावी). दिल्लीतील आंब्याच्या मौसमाबद्द्ल देखील त्यांनी लिहिले आहे. त्याच महिन्यातील गुलमोहर तसेच बहावा(Casia, Indian Laburnum)किंवा अमलतास या बद्दल त्यांनी लिहिले आहे. मी पिवळा रंगाच्या फुलांचा बहावा पहिला आहे, पण त्यांनी गुलाबी फुलांचा देखील बहावा असतो हे सांगितले आहे.

दिल्लीत जांभूळ जुलै महिन्यात पिकतो असे नमूद करून त्याबद्दल लिहितात कि हे झाड कृष्णाला प्रिय आहे. हि माहिती मला नवीन आहे. आपल्या इथे जांभूळ, करवंद मे -जून महिन्यात डोंगरची मैना म्हणून सर्वत्र मिळतात. त्यांनी भेंडी नावाच्या एका झाडाचे वर्णन केले आहे. ती अर्थातच आपण जी भाजी म्हणून खातो ती भेंडी नाही. पिंपळाच्या पानांसारखी पाने असणारे हे झाड वर्षभर पिवळ्या फुलांनी लगडलेले असते. मुंबईतील प्रसिद्ध भेंडी बाजार भागात याच भेंडीची झाडे भरपूर होती म्हणून तसे नाव दिले गेले. मला वाटले होते कि त्या भागात भाजी मंडई आहे की पूर्वी होती. मधुमालतीची फुलं आणि तिची वेल खुशवंतसिंगांची बहुधा आवडती असावी असे दिसते. त्यांच्या बागेत ती आहेच. त्याबद्दल त्यांनी बरेच लिहिले देखील आहे. तिच्या Latinनावाचा Quisqualis अर्थ who? what? असे मजेशीर आहे कारण मधुमालतीची तशी वेडीवाकडी वाढते, तसेच दररोज नवीन पाने देखील तिला येत असतात, असे ते नमूद करतात.

महाराष्ट्रात सगळी कडे दिसणाऱ्या बुचाच्या फुलांच्या झाडाबद्दल त्यांनी लिहिलेले दिसत नाही. दिल्ली भागात ती आढळत नाहीत कि काय. सगळीकडे दिसणारा आणि सरळसोट उंच वाढणाऱ्याअशोक वृक्षाचे नाव अशोक नसून अन्शुपाल आहे असे ते नमूद करतात. आपल्या बागेतून बाहेर रस्त्यावर डोकावणाऱ्या फांद्यांतून सकाळी सकाळी पूजेसाठी फुले तोडून नेणारे आपण नेहमी पाहत असतो. कधी आपल्याला राग येतो, तर कधी आपण दुर्लक्ष करतो. त्याबद्दल खुशवंतसिंग काय लिहितात हे पाहणे मनोरंजक ठरावे. ते म्हणतात, ‘…My Chandani and hibiscus shrubs continue to be plundered by devout who suffer no pangs of conscience from plucking flowers others have planted as long as the loot is offered to their gods…’!

आता थोडेसे त्यांनी वर्णन केलेल्या पक्षी जगताबाद्द्ल. दिल्ली आणि आसपासच्या त्यांच्या पक्षी निरीक्षणादरम्यान त्यांनी केलेल्या नोंदी त्या पुस्तकात ठिकठिकाणी देतात. बसू यांची चित्रे देखील मनमोहक आहेत. माझ्या लहानपणी चाळीतल्या घरात चिमण्या बिनधास्त जा ये करायच्या, कुठेतरी घरटी देखील बनवायच्या. आजकाल त्या तश्या कमीच झाल्या आहेत हे नक्की, पण आता त्यांची जागा बुलबुलने घेतली आहे. ते नेहमी घराच्या आसपास असतात, कधीमधी घरात घुसून बागडून परत जातातही. हाच अनुभव खुशवंत सिंग यांनी मस्त दिला आहे. तीन चार महिन्यात बुलबुलचे एखादे घरटे घराच्या आसपास दिसतेच दिसते. बाया म्हणजे सुगरण पक्ष्याबद्दल आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खोप्या बद्दल त्यांनी लिहिले आहे. पामच्या झाडाच्या धाग्यापासून खोपा विणतात. हे मी देखील माझ्या बागेत बरेचदा पहिले आहे. बाया पक्षी खोपा करतानाचे मी छोटेसे चित्रीकरण देखील केले होते. खुशवंत सिंग दिल्ली मध्ये सप्टेंबर पासून दिसणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांबद्दल देखील लिहितात. तसेच विविध पक्ष्यांच्या विणीच्या हंगामातील वर्तन त्यांनी आपल्या तिरकस शैलीत नोंदवले आहे.