गोहराबाई कर्नाटकी -शंभरी गाठलेली गायक-नटी

मी गोहराबाई कर्नाटकी यांच्या वरील २००९ मधील मूळ कन्नड लेख, जो डॉक्टर रहमत तरीकेरी यांनी लिहिला होता. त्याचा २००९ मध्येच अनुवाद केला होता तो आज मी येथे देत आहे.

अपूर्व नाट्य अभिनेत्री, गायिका गोहराबाई कर्नाटकी यांच्या निधनानंतरसुद्धा, त्यांना त्यांच्या
प्रतिभेनुसार गौरव प्राप्त झाला नाही. गोहराबाई (१९१०-१९६७) ह्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष
आहे; तर त्यांची आठवण ही कोणास राहिलेली दिसत नाही.

बेळगीच्या भगिनी
अमीरबाई कर्नाटकी आणि गोहराबाई कर्नाटकी या दोघी बहिणी विसाव्या शतकाच्या
सुरुवातीला नावाजलेल्या गायक-नट्या होत्या. मी अमीरबाई ह्यांचे जीवनचरित्र लिहिले होते.
त्यासाठी मी त्यांचा परिचय असलेल्या व्यक्तींकडे शोध घेत बेलाडी, धारवाड, हुबळी, विजापूर,
पुणे आणि मुंबईपर्यंत गेलो होतो. मुंबईमध्ये अमीरबाईंच्या गायकीचे अभ्यासक आणि
हिंदुस्तानी संगीताचे जाणकार प्रकाश सी बुरडे ह्यांच्याबरोबर चर्चा करायची होती. ते
अमीरबाईंबद्दल आत्मीयतेने बोलले. गोहराबाईंबद्दल बोलताना मात्र त्यांची जीभ कडवट
झाली. गोहराबाईंबद्दल काही मराठी लोकांत अनादर दिसून आला होता. मी प्रकाश यांना परत
परत विचारले असता त्यांनी लिहिलेले लेख मला वाचायला दिले. त्याचा शेवटचा भाग असा
होता:

goharabai on right side with amirbai

गोहरबाई आणि अमीरबाई कर्नाटकी

‘प्रतिगंधर्व अशी प्रसिद्धी मिळालेल्या गोहराबाईंना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या आणि
ऐकलेल्या बालगंधर्वांच्या प्रेक्षकांनी आणि हितचिंतकांनी, गोहराबाईंकडे पूर्ण दुर्लक्ष का केले
असावे? गोहराबाई कर्नाटकच्या होत्या म्हणून की मुस्लिम होत्या म्हणून? की त्यांनी अमाप
कीर्ती मिळवून, चित्रपटांत भूमिका करून, दिवसरात्र बालगंधर्वांच्या बरोबर तीस वर्षे
सावलीसारखी सोबत केली म्हणून?’
बुरडे स्वत: कन्नड आहेत(ते नुकतेच मरण पावले). त्यांनी प्रगट केलेली व्यथाश मला बोचून गेली. कन्नड रंगभूमीवरून आलेल्या कलाकारांनी मराठी रंगभूमीवर आपले जीवन अर्पण करूनसुद्धा त्यांना मराठी
लोकांनी आपलेसे का केले नाही, याचे मला कुतूहल वाटू लागले. गतकाळाचा शोध घेता घेता,
तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि रंगभूमी यांचे अवलोकन केले असता, किती प्रतिकूल
परिस्थितीमध्ये, गोहराबाई यांची प्रतिभा, त्यांची महत्त्वाकांक्षा, हट्ट समजून घेतले गेले?
महादेवीअक्का यांच्याप्रमाणे, स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी परिस्थितीचा सामना
करण्यामध्ये गोहराबाईंचे आयुष्य खर्ची झाले. त्यांच्या ह्या स्वभावामुळे गोहराबाईंनी एकेवेळ
कीर्ती भोगली पण नंतर त्यांना वाईट दिवस पाहवे लागले!

अनेक गोहर
गोहर नावाच्या अनेक जणी कलाक्षेत्रात होऊन गेल्या आहेत. उदाहरणार्थ, म्हैसूर दरबारात
हिंदुस्तानी संगीत गाणारी कोलकात्याची गोहरजान(१८७३-१९३०); पारशी रंगभूमीवरील कलाकार

गोहरजान; मुंबईच्या रणजित फिल्म्स स्टुडिओच्या गायक-नटी गोहर ह्या पहिल्या आणि
गोहराबाई कर्नाटकी हे नाव सांगणा-या कर्नाटकाची कन्या त्याच. या गोहराबाई केवळ रंगभूमी
कलाकार नव्हत्या तर हिंदुस्तानी पद्धतीच्या संगीत-गायक कलाकारही होत्या. त्या अमीरबाई
ह्यांच्यासारख्या सुंदर नव्हत्या, पण तीक्ष्ण कटाक्ष असलेले डोळे हे त्यांचे आकर्षण होते. ह्या
दोन बेलागी भगिनींपैकी अमीरबाई अधिक प्रसिद्धी पावल्या, कारण त्या चित्रपटासारख्या
प्रभावी आणि प्रसिद्ध माध्यमात काम करत होत्या. उलट, गोहराबाई चित्रपटांइतके प्रभावी
माध्यम नसलेल्या प्रादेशिक रंगभूमीमध्ये गुरफटून गेल्या. आणि मराठी रंगभूमीवर दंतकथा
झालेल्या नारायण राजहंस ऊर्फ बालगंधर्व ह्यांच्यावर बसलेले त्यांचे प्रेम. बालगंधर्वांचे
अनुकरण करून, गंधर्व कंपनीमध्ये शिरून, शेवटी, त्या बालगंधर्वांच्या जीवनसाथी बनल्या.
त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक रोमांचकारी घटना घडल्या; तसेच, अनेक अपमानित करणारे,
दुःखी करणारे प्रसंग येऊन गेले. ती आणखी दुसरीच शोकात्म कथा आहे.

कलेसाठी पूरक परिसर
त्या काळच्या मुंबई प्रांताचा भाग असलेल्या विजापूर जिल्ह्यातील बेलागीमध्ये गोहराबाई
जन्मल्या. त्यांचे वडील हसैनसाब बेलागी स्वतः रंगभूमी कलाकार होते. त्यांची स्वतःची नाटक
कंपनी होती. ती फार काळ चालली नाही. नाट्यसंगीतात चांगले नाव कमावलेले बेऊरचे
बादशाह मास्तर हे गोहराबाईंचे सख्खे मामा होते. ज्येष्ठ रंगभूमी कलाकार येलागी बाळप्पा
बादशाह मास्तरांचे शिष्य. त्या वेळच्या प्रभावशाली असलेल्या बुवा बादशाह मास्तर यांनी
त्यांच्या भाचीला शिक्षण दिले असण्याची शक्यता आहे. गोहराबाई बेलागीच्या कलाक्षेत्रात
प्रसिद्धी पावण्यासाठी अजून एक कारण असे, की त्यावेळी विजापूरच्या आसपास रंगभूमी
बहराला आलेली होती. शिव्मुर्थी कान्बुर्गी मठ, गरुड सदाशिवराव, शिर्हत्ती व्यीन्कोबाराई,
वामनराव ह्यांच्यासारखे लोक त्यांच्या त्यांच्या नाटक कंपन्यांमधून सर्वत्र पसरले होते. त्या
बरोबर विजापूरच्या लोकरंगभूमीवर जन्म पावलेल्या कृष्ण-पारिजात मध्ये बहुतांशी मुस्लिम
कलाकार काम करत होते. लोककवी आणि गायक तालेवादादा नबी त्यांच्या राधेच्या
नाटकामुळे ख्यातनाम झाले होते. पुढे कृष्ण-पारिजात च्या गाण्यांसाठी अप्पालाल नंदाघर
आले. बेलागीच्या भगिनींच्या गाण्याच्या प्रभावाखाली सर्वं कलाकार गात होते.

कन्नड रंगभूमी
अशा परिसरामध्ये गोहराबाईंचा ठसा उमटत गेला. गोहराबाईंचे कलाजीवनसुद्धा त्यांच्या
भगिनी अमीरबाई ह्यांच्याप्रमाणे, कन्नड रंगभूमीपासून सुरू झाले. गोहराबाईंनी गदगच्या
यारासी भाराम्प्पा ह्यांच्या वाणिविलास संगीत नाटक मंडळीमध्ये गायक-नटी म्हणून आपले
जीवन सुरू केले. वाणिविलास कंपनीच्या कित्तूर रुद्रम्मा नाटकात त्या रुद्रम्माची भूमिका
करत. त्या नंतर त्यांनी कुंदगोळ हणमंतराय यांच्या कंपनीमध्ये सुद्धा काम केले असावे.
गोहर यांचा अभिनय पाहिलेले हुबळीचे ज्येष्ठ अभिनेते वसंत कुलकर्णी यांच्याप्रमाणे कुंदगोळ
केव्हाही गोहर यांनाच नाटकात घ्यायचे. त्यांच्या वरप्रदान नाटकातील ललिता या पात्रामुळे
त्यांची ओळख झाली. विजयनगर राज्याची कथावस्तू असलेल्या वरप्रदान नाटकात ललिताचे

पात्र गोध्चारिणीचे होते. गोहर ह्यांचा त्या वेळेस रंगभूमीवर काम करणा-या मल्लिकार्जुन
मन्सूर आणि बसवराज मन्सूर ह्यांच्याबरोबर परिचय होता. त्यांनी बसवराज मन्सूर यांच्या
कलाप्रकाश नाट्यसंघ कंपनी मध्येसुद्धा काम केल्याचे दिसून येते. म्हैसूरच्या पद्मा श्रीराम
ह्यांच्या आठवणीप्रमाणे, गोकाकच्या एका कंपनीच्या मानमती नाटकात गोहरने मानमतीचे
काम केले होते. त्या मोठ्या आवाजात संवाद म्हणायच्या.

कन्नड नाट्यगीते
त्यांचे रंगभूमीवरील काम पाहिलेले कोणी राहिलेले नाही. आढळतात ती फक्त त्यांनी गायलेली
रंगभूमीवरील गाणी. कित्तूर रुद्रम्मा नाटकातल्या ‘ना पेलुवे निनोगोडूपाया तारावाल्ली नेनागे
अपमान मारुली आत्महत्यीडू महापाप्वे’ ह्यासारखे गीत हे त्यातलेच. एचएमव्ही कंपनीने
काढलेले, ७८ आरपीएम मुद्रिकेमध्ये असलेले त्यांचे गीत लोकप्रिय झाले होते. हे गीत त्यांच्या
गायकीची साक्ष आहे. गोहर कन्नड नाट्यगीते अदभुत रीतीने गायच्या. गोहर यांनी
कन्नडमध्ये अजून कितीतरी गीते गायली असण्याची शक्यता आहे. त्या बालगंधर्वांच्या
शैलीमध्ये गायच्या.

मराठी रंगभूमीशी संपर्क
उत्तर कर्नाटकात त्या वेळेला मराठी रंगभूमीचे आकर्षण होते. ह्यास अनेक कारणे होती:
१. विजापूर जिल्ह्यापर्यंतचा भाग त्या वेळी मुंबई प्रांतात सामील होता. त्यास मुंबई-कर्नाटक
असे म्हटले जायचे. (काही जण त्यास दक्षिण महाराष्ट्र असे म्हणतात). ह्यामुळे उत्तर
कर्नाटकातील नाट्यकलाकार, चित्रपट कलाकार, संगीतकार, अभ्यासक यांचा जास्त संपर्क
पूर्वीच्या म्हैसूर राज्याच्या ऐवजी पुणे, नाशिक, कोल्हापूर यांसारख्या गावांबरोबर सहज येई.
गंगुबाई हनगल, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, बसवराज राजगुरू, कुमार गंधर्व
ह्यांच्यासारखे हिंदुस्तानी शास्त्रीय गायकही विजापूर परिसरात उत्कर्ष पावले आणि ते जास्तीत
जास्त कार्यक्रम त्याच भागात करत होते. कन्नड भाषेतील चित्रपट म्हैसूर-कर्नाटकात तयार
होत परंतु त्यांचे केंद्र मात्र मद्रास आणि कोईमतूर या ठिकाणी होते. म्हैसूरचे चित्रपट आणि
नाटक या क्षेत्रामध्ये कर्नाटक शास्त्रीय संगीत प्रभावी होते, तिथे हिंदुस्तानी शास्त्रीय गायकांना
जास्त संधी नव्हत्या. उत्तर कर्नाटकातील हिंदू-मुस्लिम संस्कृतीमधून तयार झालेल्या, संगीत
रंगभूमी आणि लोकसंगीतातून तयार झालेल्या इथल्या कलाकारांचे दक्षिण कर्नाटकातील
रंगभूमी आणि चित्रपटांबरोबर एवढे जमले नाही, त्यामुळे हे कलाकार त्यांची सांस्कृतिक आणि
भाषिक जवळीक असलेल्या हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांकडे आकर्षले गेले. त्यामुळेच ह्या
भागातल्या व्ही. शांताराम, शांता हुबळीकर, लीला चिटणीस, सुमन कल्याणपूर, लीना
चंदावरकर यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी मुंबईकडे धाव घेतली. तीच वाट बेलागीच्या
भगिनींनी चोखाळली.
२. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तर कर्नाटकातील नाटक कंपन्या मराठी नाटक कंपन्यांकडे
पाहून उत्कर्ष पावल्या. स्वतः गोहरबाई काम करत असलेली यारासी भाराम्प्पाअन्च्यी कंपनी

मराठी नाटके कन्नडमध्ये अनुवाद करून बसवत असे. त्याच काळात वामनरावांची विश्वदर्श
कंपनीसुद्धा मराठी नाटकांचे अनुवाद करून प्रयोग बसवत होती. त्यामुळे मराठी रंगभूमीच्या
गाण्यांच्या धाटणीवर कन्नड नाट्यगीते गाणे ही बाब सर्वसामान्य समजली जाई.
त्याचबरोबर, मराठी नाटक कंपन्या विजापूर, बेळगाव, हुबळी-धारवाड या भागात दौरे
करायच्या. त्यांचासुद्धा दीर्घ इतिहास आहे. तो एकोणिसाव्या शतकात किर्लोस्कर
कंपनीपासून आरंभ झाला. अण्णासाहेब किर्लोस्कर मूळचे कर्नाटकाचे. त्यांनी मराठी रंगभूमी
निर्माण केली कर्नाटकात, तीच मुळी कन्नड रंगभूमीच्या प्रभावामुळे. त्यांची कंपनी उत्तर
कर्नाटकात मुक्काम ठोकून असे. इतर मराठी नाटक कंपन्यासुद्धा तिथे मुक्काम करायच्या.
पुढे, बालगंधर्वांची नाटक कंपनीही त्या भागात दौ-यावर येत असे. ह्या नाटक कंपन्या मराठी
तसेच कन्नड भाषिकांमध्ये सुद्धा लोकप्रिय होत्या. गंधर्व कंपनीचे हुबळीच्या सिद्धारूढ
मठाबरोबर जवळचे संबंध होते. सुरुवातीच्या कन्नड नाटककारांपैकी रामचंद्र यांचे ‘जेथे पाहवे
तेथे मराठी कलाकारांचे अस्तित्त्व होते’ हे मराठी रंगभूमीच्या सांस्कृतिक प्रभावाबद्दलचे वाक्य
या गोष्टीचे प्रमाण आहे. गोहर ह्यांच्यासारख्या स्थानिक प्रतिभावंत कलाकाराचा मराठी
रंगभूमीवरील प्रवेश या परिस्थितीमध्ये झाला.

चित्रपट कलाकार गोहर
गोहर यांनी मराठी नाटक कंपनीमध्ये जाण्यापूर्वी हिंदी चित्रपटांमधून काम केले.
त्या १९३२च्या सुमारास मुंबईला गेल्या. गोहरयांना चित्रपटांमधून काम करायला सांगणारे होते
कृष्णराव चोणकर. ते गंधर्व नाटक कंपनीमध्ये नट होते. कृष्णराव चोणकर यांनी गोहरयांना
चित्रपटविश्वाची नुसती ओळख करून दिली नाही तर त्यांनी स्वतः तिच्याबरोबर काम केले.
शारदा फिल्म्स कंपनीचा रास्विलास हा गोहर यांचा पहिला चित्रपट. गोहर यांनी नानुभाई
वकील यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांमधून अधिक काम केले. त्यांचा उल्लेख त्या वेळेला
महिन्याला तीनशे रुपये मिळवणारी गाणारी नटी असा आढळतो. त्यांनी सुमारे पंधरा
चित्रपटांमधून काम केले. उदाहरणार्थ, रास्विलास(१९३३), राम्भारांनी(१९३३), गरीब का
प्यार(१९३५), बुर्खावली(१९३६), गीला निशान(१९३७), सिंहलद्वीप की सुंदरी(१९३७),
गुरुघांटाल, काला भूत, कुलदीपक, तारणहार. हे चित्रपट फार महत्त्वाचे नाहीत. त्यानंतर
बालगंधर्व यांच्याकडे आकृष्ट झाल्यामुळे गोहर यांनी चित्रपटसृष्टीला राम-राम केला आणि
मराठी रंगभूमीवर प्रवेश केला.

गोहर गायिका झाल्या
गोहर लहानपणापासून बालगंधर्वांच्या गायनाकडे आकर्षल्या गेल्या होत्या. विजापूरमध्ये जेव्हा
गंधर्व कंपनी मुक्काम करत असे, तेव्हा गंधर्वांची गाणी ऐकून त्यांच्या मनात बालगंधंर्वांबद्दल
सुप्त आकर्षण होऊ लागले. त्यावेळेला बालगंधर्वांच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका कोलंबिया
कंपनीने काढल्या. गोहर त्या ऐकून त्यांच्या शैलीत गाण्याचे शिकल्या. अनागी बालप्पासुद्धा
म्हणतात, की गोहर बालगंधर्वांचे अनुकरण करून गायच्या. त्यामुळे मराठी लोकांनी त्यांना
प्रतिगंधर्व असे नामाभिधान देऊन टाकले होते. पुढे, त्यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका

एचएमव्ही कंपनीने काढल्या. त्यांचे 'वैकुण्गचार्या' नावाचे सुरुवातीचे नाट्यगीत प्रसिद्ध
झाले होते. गोहर यांनी मराठी, बंगालीमध्ये गायलेली पट्टी खूप जास्त असे.

गंधर्वांप्रती वेड
पुढे, गोहर यांच्या जीवनातील मुख्य ध्येय गंधर्व कंपनीमध्ये जाणे हेच झाले. त्यासाठी त्यांनी
केलेले प्रयत्न कुतूहल जागवणारे आहेत. त्या १९३२-३४च्या अवधीत दररोज रात्री गंधर्व
कंपनीच्या नाटकांना जाऊन पहिल्या रांगेत बसायच्या. नाटकांच्या मध्यंतरात गंधर्वांची भेट
घेण्याचा प्रयत्न करायच्या. शेवटी, त्या गंधर्व कंपनीत शिरल्या. त्या गंधर्व कंपनीत कशा
शिरल्या याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत:
१. विजापूरमध्ये त्यांचा मुक्काम सोडण्याआधी बालगंधर्वांनी गोहर यांची प्रतिभा ओळखून,
त्यांना कंपनीमध्ये बोलावून घेतले.
२. विजापूरच्या प्रसिद्ध सर्कस आणि नाटक कंपनीचे मालक, त्रिपुरसुंदरी टॉकिजचे छत्रे यांनी
स्वतःच्या गावातील मुलीला मुंबईच्या चित्रपटसृष्टीमध्ये जाण्यासाठी ओळख करून दिली.
३. स्वतः कलाकार असलेल्या आणि नाटक कंपन्यांमध्ये मध्यस्थी करणा-या चाफेकर नावाच्या
गृहस्थांनी, १९२८ मध्ये किर्लोस्कर कंपनी विजापूरमध्ये असताना पेटी वाजवणा-या गोहरयांना
पाहिले व त्यांनी गोहर यांची गंधर्व कंपनीमध्ये ओळख करून दिली. चाफेकर गोहर यांच्या
घरी गेल्यावर, गोहरनी बालगंधर्वांची गाणी हुबेहूब आवाजात म्हटलेली ऐकून चकित झाल्याचे
त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. त्यांनी गोहर यांना गंधर्वांची भेट घालून देण्याचा
शब्द दिला.
४. बालगंधर्वांच्या आईने स्वतः गोहर यांचे अभंग त्यांच्या मुलाच्या कानावरून जातील अशी
व्यवस्था केली.

गंधर्व-गोहर जोडी
बालगंधर्वांना आपले जीवनसाथी बनवावे अशी सुप्त इच्छा गोहर यांच्या मनात ब-याच
काळापासून असावी असे दिसते. ते गोहरयांच्यापेक्षा तेवीस वर्षांनी मोठे होते, मधुमेहाने त्रस्त
होते. तरीपण गोहर आणि बालगंधर्व यांच्यामध्ये प्रेम अंकुरले. गंधर्व कंपनीच्या बिकट
परिस्थितीने त्यांना आणखी जवळ आणले. त्या वेळेला बालगंधर्वांनी 'संत एकनाथ' हा चित्रपट
काढून हात पोळून घेतले होते. मुंबईनंतर बालगंधर्वांची कंपनी पुणे, मिरज, कोल्हापूर येथे
गेली. कंपनी कर्जाखाली दबून गेली होती. कलाकार कंपनी सोडून जात होते. अशा कष्टमय
परिस्थितीत(१९३७) बालगंधर्व त्यांची चाहती असलेल्या गोहर ह्यांच्या घरी गेले. ह्या भेटीला
बालगंधर्वांचे चरित्रकार वेगळा रंग देतात. पण गोहर यांच्या जीवनातील ही अपूर्व घटना होती.
त्यांनी बालगंधर्वांना हात देऊन कंपनीची दिवाळखोरी कमी करायला मदत केली. ती दोघे
१९३८ मध्ये एकत्र राहू लागली होती. कलाकार कंपनी सोडून जात असताना ती
वाचवण्यासाठी किंवा त्यांना पैसे देणे आहेत म्हणून, कंपनीच्या मालकांनी त्यांच्याबरोबर
विवाह केला. ही त्या काळी रीतीची गोष्ट मानली जाई. पण बालगंधर्व-गोहर प्रेमसंबंध म्हणजे

हे विशिष्ट प्रकरण होते. त्या दोघांमध्ये अतुट असा प्रेमबंध निर्माण झाला होता. बालगंधर्व
यांच्या पत्नी निधन पावल्यानंतर(१९५१) त्यांनी गोहर यांच्याबरोबर कायदेशीर रीतीने विवाह
केला. त्या वेळेला गोहर यांचे वय चाळीस होते आणि बालगंधर्वांचे वय त्रेसष्ट. पुढे गोहर यांनी
त्यांचे पूर्ण आयुष्य गंधर्वांच्या प्रती वेचले. रंगभूमीवर त्यांची जोडी नापसंत ठरली.
बालगंधर्वांबरोबर विवाह झाल्यानंतर, गोहर यांनी इतर नायकांबरोबर काम केले नाही.
त्यानंतर, काही दिवसांतच गोहर आणि गंधर्व यांचे कष्टाचे दिवस सुरू झाले. गंधर्वांचे वजन
वाढून, ते स्त्रीपात्र रंगवण्यात असमर्थ ठरू लागले. त्यामुळे गोहर त्यांच्या भूमिका साकारू
लागल्या. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात गंधर्वांसारखे गाणारी गोहर एकट्याच होत्या. तरीपण कंपनीचे दिवाळे निघाले.
कंपनीचे १९५३ हे शेवटचे वर्ष ठरले. कंपनी पूर्णपणे बंद पडली. त्यानंतर गोहर आणि
बालगंधर्व वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यगीते गाऊ लागले. गंधर्व कालांतराने आजारी पडले आणि
अंथरुणाला खिळून गेले. ते मधुमेही होतेच, त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला.
तेव्हा गोहर गंधर्वांची काळजी घेऊ लागल्या. हुबळीचे बिलंकर त्यांच्या आठवणी सांगत: 'मी
गोहरना १९४८ मध्ये पाहिले. मुंबईमध्ये असताना मी त्यांच्याकडे जात असे. तेव्हा त्यांना बरे
नसे. त्यांना अस्थमाचा त्रास होता. त्या वेळेला आम्ही बालगंधर्वांचा कार्यक्रम कोयनानगरमध्ये
करून त्यांना पाचशे रुपये जमा करून दिले. तेवढ्यात चिपळूणमधील परशुराम मंदिराचे पुजारी
आले. ते म्हणाले, की त्यांच्या मुलाचे लग्न आहे, त्यासाठी काही मदत करावी. तेव्हा गोहर
यांनी ते पैसे त्यांना देऊन टाकले! आणि त्या मुंबईला रिकाम्या हातानी परत गेल्या. हे
आम्हाला नंतर कळले. त्यानंतर आम्ही कोयनानगर-चिपळूणमध्ये बालगंधर्वांचे चार-पाच
कार्यक्रम करून, गोहर-गंधर्वांना बोलावून त्यांना दोन हजार रुपये रोख दिले. तेव्हा गोहर
म्हणाल्या: 'बिलंकर, ह्या वेळेला रक्कम आमच्या हातात देऊ नका. किराणा दुकानदाराला
शंभर रुपये, औषध दुकानदाराला पाचशे रुपये देऊन टाका'. आम्ही गंधर्वांना त्यांच्या
मुंबईमधील घरी पोचवून, खाली असलेल्या दुकानदाराला पैसे दिले. बालगंधर्व आणि गोहर
खूप उदार होते. कसेही पैसे खर्च करायचे.

शेवटचे दिवस
बालगंधर्व त्यांच्या शेवटच्या दिवसांत शारीरिक व मानसिक रीत्या पूर्णपणे गोहर यांच्यावर
अवलंबून होते. ते गोहरना प्रेमाने 'बाबा' अशी हाक मारत. कोणी आले की म्हणत, 'बाबा,
आले बरं का'. गोहरंना अस्थमाचा त्रास होता. तरी त्या बालगंधर्वांची अपार सेवा करत.
त्यातच त्या दमून गेल्या. त्या १९६४ मध्ये निधन पावल्या. त्या वेळेस त्यांचे वय ५३-५४
होते. त्यांना माहिया येथील कब्रस्तानात दफन केले गेले. त्या वेळी गंधर्वांनी खूप आक्रोश
केला. त्यांना गोहर यांच्या निधनाचा मोठा धक्का बसला. पुढे गोहर यांची मानलेली मुलगी
अशाम्माने गंधर्वांचा सांभाळ केला. बालगंधर्वांचे निधन गोहर गेल्यानंतर तीन वर्षातच झाले.

मराठी लोकांचा कठोरपणा

बालगंधर्व ह्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता अशी अफवा उठून ते मरण पावल्यानंतर
त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी गोंधळ निर्माण करण्याचे कारस्थान काही जणांनी रचले होते.
बालगंधर्व गोहरयांच्याबरोबर राहिल्याचे त्या काळच्या कर्मठ लोकांना सहन झाले नाही.
गंधर्वांच्या पत्नीचे आकस्मिक निधन होण्यास गोहर-गंधर्व यांचे प्रेमप्रकरण कारणीभूत झाले
असे ते लोक मानत. चालण्याची शक्ती नसलेले गंधर्व यांचे गोहर यांनी गावोगावी फिरून,
त्यांच्यासारखे गाऊन पैसे कमवल्याचा काही लोक त्यांच्यावर आरोप ठेवतात. मराठी
रंगभूमीच्या चरित्रकारांपैकी काही जणांनी 'गंधर्वांच्या पत्नीचे हृदय पुरुषाचे आणि गोहरच्या
पतीचे हृदय स्त्रीचे' होते असे नमूद करून ठेवले आहे. बालगंधर्व ही मराठी लोकांची अस्मिता
बनली. गोहरनी गंधर्वांना त्यांच्यापासून हिरावून घेतले अशी त्यांची भावना झाली होती. लोक
गोहर-गंधर्वांची प्रीती समजून घेऊ शकले नाहीत की ‘स्वतःच्या प्रिय व्यक्ती’वर लोकांनी
दाखवलेला अधिकार गोहरला सहन झाला नाही! गंधर्वांना १९६४ मध्ये पद्मभूषण जाहीर
करण्यात आले, त्या वेळेला गोहर समारंभास उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात
आली होती. गंधर्वांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या वेळेला(१९८८) प्रकाशित झालेले लेखन आणि
इतर साहित्य यांमध्ये सुद्धा गोहरबद्दल गरळ ओकले गेले आहे. 'गोहरचे मायाजाल' अशा
एका लेखात गोहरयांना खलनायिका ठरवण्यात आले आहे.

कलावंतांचे जीवन
गोहर-बालगंधर्व यांच्या संबंधाचे स्वरूप कसे असेल हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या दोघांच्या
फोटोमध्ये कोट घातलेल्या आणि डोक्याला फेटा गुंडाळलेल्या पुरुषी वेशामध्ये गोहराबाई आहेत
आणि बाजूला बालगंधर्व स्त्रीवेशामध्ये आहेत. गोहर-बालगंधर्व संबंध दैहिक, प्रेमिक की
कलात्मक होते हे सांगणे कठीण आहे. ते आपल्या समाजामध्ये प्रचलित असलेले आध्यात्मिक
असावेत. कोलकात्याची गोहरजान, बेंगलुरूची नाग्रत्नाम्मा, बेलागीच्या अमीरबाई आणि
गोहराबाई, शांता हुबळीकर ह्या कलाकारांचे जीवन पाहिले तर असे दिसेल, की त्यांचे जीवन
अतिशय कष्टदायी होते. हे कलाकार आपले जीवन धर्मातीत रीतीने जगत असतात, त्यांची
कला भाषांतीत माध्यमामधून व्यक्त होत असते. ती प्रांत, सीमा ओलांडून सर्वदूर
रसिकांपर्यंत पोचलेली असते. तरीपण त्यांना पाहणा-या समाजाचा दृष्टिकोन संकुचित असतो.
ते जिवंत असताना त्यांना प्रेम देण्यासाठी काहीही करतील, त्यांच्या मृत्युप्रश्चात त्यांना
महात्मापद देण्यास तयार असतील, पण गोहरबाईंच्या वाट्याला हे सुख आले नाही. त्यांच्या
मृत्यूची वार्तासुद्धा कळली नाही. त्या कर्नाटकच्या असून, मराठी रंगभूमीवर काम केले हे
कर्नाटकाचे लोक विसरले आहेत. गोहर यांनी कलेला किंवा प्रेमाला दिलेली ही आहुती आहे
असेचं म्हणावे लागेल.
– डॉक्टर रहमत तरीकेरी

मुबारक बेगम आणि अमीरबाई कर्नाटकी

काही दिवसांपूर्वीच गतकाळातील प्रसिद्ध गायिका मुबारक बेगम यांचे निधन झाले. १९४०-५० मधील त्यावेळच्या काळाच्या साक्षीदार असलेल्या कलाकारांमधील अजून एक दुवा निखळला. दुसरी गोष्ट अशी, त्याकाळातील, मुस्लीम धर्मीय, तेही महिला कलाकारांची, जी परंपरा होती(नूरजहॉं, अमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम, सुरैय्या, जोहराबाई इत्यादी), त्यातील त्या शेवटच्या कलाकार होत्या. त्यांचे चरित्र आहे की नाही ते माहीत नाही. पण त्या काळाचे documentation झाले पाहिजे असे वाटत राहते. मी ३-४ वर्षांपूर्वी अमीरबाई कर्नाटकी, तसेच गोहरबाई कर्नाटकी, याही त्याच काळातील कलाकार, त्यांच्या बद्दलचे रहमत तरीकेरी यांचे कन्नड मधील लेख, पुस्तक, यांचे मराठीत भाषांतरित केले होते. मुबारक बेगम आणि अमीरबाई कर्नाटकी यांचा काही संपर्क झाला होता का या संबधी काही पुरावे नाहीत, पण तो नक्कीच झाला असावा, असे वाटते. खालील लेख त्यांचाच आहे, मूळ कन्नड मध्ये. ते अमीरबाईचे चरित्र लिहीत होते, त्याविषयीचे अनुभव त्यांनी यात मांडले आहेत.

कर्नाटकच्या संस्कृतीच्या अध्ययनासाठी उत्तर कर्नाटकात हिंडत असताना, अमीरबाई कर्नाटकी यांचे नाव कानावर सतत पडतच होते. बिजापूरच्या अमिउद्दिन दर्ग्याला गेलो असता, त्या उरुसामध्ये येऊन गात असत अशी आठवण स्थानिकांकडून कळाली. बिळगीच्या डोंगरी दर्ग्यामध्ये असताना, त्या दर्ग्याच्या परमभक्त होत्या, बिळगीच्या मोहरम सणामध्ये कात्तालरात्रीच्या दिवशी अमीरबाई मुंबईहून येऊन गाणे म्हणत असत, अशी आठवण स्थानिक लोक सांगत असत. गदग, धारवाड, बागलकोट येथील हिदुस्थानी संगीतकारांबरोबर बोलत असताना ते अमीरबाई म्हणत असलेल्या गजल, मुजरा याबाबत गौरवोद्गार काढत. अमीरबाईंची नाट्यगीते कन्नड रंगभूमी वर काम करणारे अगदी आनंदाने स्मरत असत. तसेच सुफी संत, मोहरम, रंगभूमी, चित्रपट आणि संगीत इत्यादी क्षेत्रात संशोधन करत असता, कोणाला, अमीरबाई यांचे माहित नसायचे. अमीरबाई गेल्या शतकातल्या ४०-५० च्या दशकातल्या हिंदी चित्रपटामधल्या ख्यात अभिनेत्री आणि मधुर गायिका होत्या. त्याच्या गाण्याने त्या काळी तरुणाना वेड लावले होते. त्यांचे ‘वैष्णव जन तो तेने कहिये’ भजन गांधीजींना अतिशय आवडायचे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे, त्यांच्या बद्दल कुतूहल जागृत होत गेले, तरी पण, विस्तृत माहिती कुठेच मिळत नव्हती.

माझ्या कुतूहलाला बळ मिळाले ते धारवाडच्या संगीतप्रेमी राजशेखर जंगमशेट्टी यांच्यामुळे. ते मूळचे बिजापूर जिल्ह्याचे रहिवासी. ते विद्युत विभागातून अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. त्‍यांना जुनी हिंदी गाणी आवडायची. एकदा बोलता बोलता अमीरबाई यांचा विषय निघाला. ते म्हणाले, “हे पहा, बिळगीसारख्या खेड्यातून ही बाई मुंबईमध्ये आली. किती मोठी साधना केली! ती दिसायलाही किती रूपवान! तिचे गाणे सुद्धा किती मधुर! तिला कर्नाटकाप्रती अतिशय प्रेम, म्हणून तर तिने कर्नाटकी हे नाव लावले. तिच्याबद्दल खूप लोकांना माहिती नाही. कर्नाटकात फिरत राहा, तिच्यावर संशोधन करा”. त्यांनी मला त्‍यांच्‍याकडील तिच्या गाण्यांची एक कॅसेट दिली आणि तिच्याबद्दल खूप प्रेम आणि माहिती असणारे धारवाडचे सुरेश कुलकर्णी यांची भेट घालून दिली. मला ह्या नटीच्या मागे लागायला तेवढे पुरेसे होते.

माझा शोध सुरु झाला. उत्तर कर्नाटकातील अनेक गावांमध्ये तिचे रसिक हजारोने आहेत, धारवाड च्या आकाशवाणी केंद्राने त्यांच्यावर एक कार्यक्रम प्रसारित केला होता. बिजापुर मध्ये तिचे धाकट्या बंधूंची मुले राहत, तिच्या बंधुंसाठी बांधून दिलेले अमीर नावाचे चित्रपटगृह आहे; बिजापुर्च्या दफनभूमीत तिची कबर आहे. बिजापूर मध्ते असलेल्या त्यांच्या बंधूना भेटलो. त्यांच्याकडून अमीरबाई यांचे छायाचित्र मिळाले. एका छायाचित्रात चार व्यक्ती आहेत. गोहाराबाई यांच्या एका बाजूला चंचल कोवळेपण असलेले, अमीरबाई यांच्या चेहेर्यावर गांभीर्य आहे. प्रसन्न मंदस्मित आहे. हे छायाचित्र साधारण ४५ वर्षे जुने आहे. शोधता शोधता मला असे विस्मायाकारारीत्या, माझ्यापुढे अमीरबाई यांचे विश्व उभे होते.

बिजापूरमध्ये शोध

अमीरबाई कर्नाटकी त्या वेळच्या बिजापूर जिल्ह्यातील बेलागी मध्ये जन्मल्या. आईचे नाव अमीन. वडिलांचे नाव हुसैनसाब, जे तबला आणि पेटी वाजवत असत. अमीरबाई ना अहिल्याबाई मोठी बहिण होती. गोहराबाई, बडेमा, डोंगरीमा वगैरे धाकट्या बहिणी होत्या. दस्तगीर नावाचे त्यांचे मामा होते. अमीरबाई यांचे संगीत आणि नाटक प्रेमी कालाराकारांचे घराणे. कर्नाटकातील कलाकार मूलतः मंदिर संस्कृतीमध्ये सामील झाल्या. आजही कर्नाटकात अनेक मंदिरात कलाकार (ह्यात बहुसंख्य मुस्लीम) संगीत सेवा करण्याची पद्धत आहे. ह्यासाठी काही जणांना दान देले जाते. उत्तर कर्नाटकातील अनेक गावा-गावामध्ये कलाकारांच्या वस्त्या आहेत. धर्मातीत जीवन जगात असलेले हे कलावंत लोक प्रतिभाशाली संगीतकार, अभिनेते म्हणून उदयास येत होते.

१९३०च्या दशकातील पहिल्या पूर्वार्धात हिंदुस्तानी संगीत, रंगभूमी, चित्रपट सारखे कलाप्रकार होते. मोठेमोठे गायक चित्रपट आणि रंगभूमीमध्ये काम करत होते. चित्रपट आणि रंगभूमी ह्यामध्ये संगीत अतिशय सामर्थ्यशाली होते. त्या वेळच्या नाटक आणि चित्रपट या मध्ये सुद्धा संगीताचा प्राधान्याने होते. ही तीन कलाक्षेत्राव्यतिरिक्त कलाकरांना मोहित नव्हते. बेंगलुरू नागरात्न्नाम्मा, लता मंगेशकर, अशा भोसले, एम. एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटकाच्या शांत हुबळीकर, पंढरीबाई, गंगुबाई हनगल ह्याच माळेतील मणी होते. कलेच्या क्षेत्रात कीर्तीवंत झालेले हे कलाकार शेवटी समाजाच्या दृष्टीने मान्य नसलेले जीवन जगात होते. मराठी चित्रपटात मोठे नाव असलेल्या शांता हुबळीकर यांच्या जीवनात हे ठळकपणे दिसते. आता बाळसे धरलेल्या कर्नाटकाच्या वेश्यांकडे पाहिल्यास हे घोरसत्य डोळ्यांना दिसते. त्यांना हीन दृष्टीने पाहणाऱ्या विशिष्ट समाजातील वाकड्या नजरेमुळे हे कलाकार पिडीत झाले होते. ह्या वेदानेमध्ये त्याच्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. बाकीचे कलाकार मंदिर-मंदिरामध्ये संगीत सेवा करत आपापल्या गावीच राहिल्या. काहीजण ह्या मंदिरातील संगीतसेवेच्या सीमेबाहेर येवून, विशाल अशा रंगभूमीवर शास्त्रीय संगीतामध्‍ये, चित्रपटामध्ये, जाऊन मोठे नाव मिळवले. ह्यामध्ये गंगुबाई हनगल, शांत हुबळीकर, पांढरीबाई, गोहरबाई प्रमुख आहेत.

मुंबईमध्ये आगमन

उत्तर कर्नाटक भाग हा त्या वेळच्या मुंबई प्रांताशी संलग्न होता. बिजापूर, धारवाड, गदग, हुबळी, बेळगावी ह्या भागातील बहुतेक कलाकारांना कोल्हापूर, पुणे, मुंबईचे आकर्षण होते. ह्या भागातील अनेक नट-नटी तेथे स्थलांतर करत. त्यांमध्ये अन्कुदारीचे शांताराम, शांता हुबळीकर, अशोककुमार बरोबर काम केलेल्‍या प्रसिद्ध नटी लीला चिटणीस, सुमन कल्याणपूर, लीना चंदावरकर, शान्तेश पाटील हे प्रमुख होत. ह्या मालेत गिरीश कर्नाड हे अलीकडचे. मुंबई कर्नाटकचे कलाकार कोल्हापूर, पुणे, मुंबई इथल्या जगात मिसळण्यासाठी ते राजकीयदृष्ट्या मुंबई प्रांतात शिरले हेच एक कारण नाही. ह्या भागातातील सांस्कृतिक परिसर हे ही एक कारण आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटासाठी हवा असणारा भाषिक परिसर येथे होता. धारवाड हुबळी परिसराला भारतातील प्रमुख हिंदुस्तानी संगीत गायक लाभले होते. मराठी रंगभूमी इथे येवून ताल ठोकत असे. त्याच वेळेस कन्नड भाषेतील मुख्याधारेतील चित्रपट मैसूर कर्नाटकात तयार होत असत. त्याचे मद्रास, कोईम्बतूर हे केंद्र होते. मैसूर रंगभूमीच्या कर्नाटक संगीताचा प्रभाव होता. हिंदुस्तानी संगीतातील कलाकारांना तेथे संधी मिळत नव्‍हती. गंगुबाई हनगल यांसारख्या कलाकारांनी मराठी चित्रपटामध्ये काम केले, कारण त्‍यांना कन्नडमध्ये संधी मिळाली नाही. अपवाद म्हणजे, शांता हुबळीकर यांनी गुब्बी वीरांना यांच्या ‘जीवन नाटक’ ह्या कन्नड चित्रपटामध्ये काम केले होते. कन्नड चित्रपटांमध्ये मुख्यत्वेकरून ब्राम्हण जीवनाचे दर्शन असायचे. ते, हिंदू-मुस्लीम संस्कृती मिळून तयार झालेली संगीत रंगभूमी आणि लोकसंगीत यामधून निर्माण झालेल्या त्‍या भागातील कलाकारांना भावत नव्‍हते. हिंदी चित्रपट, हिंदुस्तानी संगीत आणि त्‍या भागातील रंगभूमी यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम होते. संपूर्ण मुंबई नगर भारतातील बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, बहुभार्मिक कलाकारांनी भरले होते.

१९३० च्या दशकातील पहिल्या पूर्वार्धात नाटक आणि चित्रपटामध्ये अभिनय करणारे आणि गायन करणाऱ्यांची आवश्‍यकता होती. कन्नड आणि मराठी रंगभूमीवर गायक-नटी म्हणून काम करत असलेल्या अमीरबाई-गोहरबाई भगिनी त्यांच्या भागातील जत्रा, उरुसांमध्ये गात होते. बिजापूरमध्ये तात्पुरत्या वस्तीसाठी आलेल्या मराठी रंगभूमीच्या प्रसिद्ध संगीतकार आणि नाटककार बालगंधर्व यांनी त्‍या दोन्ही भगिनींची प्रतिभा हेरली आणि त्यांना स्‍वतःच्या कंपनीमध्ये बोलावले. त्या वेळेला अमीरबाई यांचे कुटुंब बिळगी सोडून बिजापूरमध्ये आले होते. त्यानंतर त्या दोघी मुंबईला निघाल्या. त्या मुंबईला गेल्याचे वर्ष नक्की समजले नाही. त्या काळी चित्रपटासारख्या अद्भूत कलाप्रकाराचा प्रसार होत होता. मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरु झाला. अमीरबाई पंचवीस वर्षांच्या असताना त्‍यांनी एच. एम. व्ही. कंपनीसाठी एक कव्वाली गायली. त्यामुळे त्यांचा तेथील कलाक्षेत्रात प्रवेश सुलभ झाला. पुढे अमीरबाई गायक-नटी झाल्या आणि गोहरबाई रंगभूमीच्या रंगसंगीतामध्ये सीमित राहिल्‍या. गोहर पुढे गंधर्व कंपनीमध्ये गेल्या आणि बालगंधर्वांच्या जीवन-संगती झाल्या. बालगंधर्व यांना अर्धांगवायू जडला असता, गोहरबाई यांनी दहा वर्ष त्यांची लहान मुलाची करावी तशी सेवा केली. गंधर्वांची सेवा करता करता त्याच आधी निर्वतल्या. कोलंबिया रेकॉर्डिंगमध्ये गोहर यांनी गायलेल्या बाहत्तर आर. पी. एम. रेकॉर्डिंग आहेत. मराठीमध्ये, बंगालीमध्ये, त्यांनी विभिन्न रागामध्ये गायलेली पट्टी ऐकली की, आश्चर्यचकित व्हायला होते. ‘कित्तूर रुद्रम्मा’ नाटकामध्ये त्यांनी गायलेली गीते सुद्धा प्रसिद्ध आहेत.

चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश

बेलागीच्या भगिनी असूनही अधिक प्रसिद्धी मिळाली ती अमीरबाई यांना. कारण, त्या प्रतिष्ठित आणि प्रभावशाली होत असलेल्या चित्रपट क्षेत्रात काम करू लागल्या होत्या. अमीरबाई यांचा चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाला तो गोहरबाईंमुळे. अमीरबाई मूक चित्रपटापासून बोलपटापर्यंत सहजपणे काम करू लागल्या. त्या वेळेला कंपनी नाटक आणि हिंदुस्तानी संगीत क्षेत्रातील अनेक नट आणि गायक हे सुद्धा चित्रपटक्षेत्रात प्रवेश करत होते. अमीरबाई यांनी चित्रपटामध्ये पार्श्वगायन सुरु केले तेव्हा, मुबारक बेगम, सुरय्या, जोहरा अम्बालावाली, नूरजहाँ, शमशाद बेगम, उमादेवी यांसारख्या प्रसिद्ध गायिका होत्या. लता मंगेशकर तेव्हा लहान होत्या. त्‍या सर्वांमध्ये अमीरबाई त्यांच्या अपूर्व आवाजामुळे वैशिष्ट्यपूर्ण होत्या. बहुतेक १९४० चे दशक त्यांचे यशस्वी दशक ठरले. त्या किर्तीशिखारावर पोहचल्या ते ‘किस्मत’ (१९४२) या चित्रपटामुळे. तो चित्रपट ‘बॉम्बे टाकीज’ ने निर्माण केला होता आणि ज्ञान मुखर्जी यांनी दिग्‍दर्शित केला होता. भुरट्या चोऱ्या करणारा प्रेमिक साकारणाऱ्या अशोक कुमार यांचा हा चित्रपट. हा त्या वेळच्या कलकत्त्यात सतत तीन वर्ष चालला. भारतीय चित्रपट इतिहासात त्याने जमवलेला गल्ला (एक कोटी) हा त्यावेळचा विक्रमच होता. तो विक्रम त्यानंतर आठ वर्षांनी आलेला ‘आवरा’ या चित्रपटाने मोडला. ‘किस्मत’ने त्या वेळच्या तरुण-तरुणींना वेड लावले होते. त्याचे मुख्‍य कारण म्हणजे अमीरबाई यांनी त्यात गायलेली गाणी. ‘दूर हटो जी दुनियावालो’, ‘घर घर में दिवाली’, ‘धीरे धीरे आरे बादल’ ही त्या वेळची सुप्रसिद्ध गाणी होती.

प्रमुख चित्रपट

अमीरबाईंनी काही चित्रपटामध्ये अभिनयही केला होता. त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट ‘विष्णुभक्त’ (१९३४). अमीरबाई यांनी काम केली इतर चित्रपट असे आहेत – भारत की बेटी, यास्मिन, प्रेमबंधन, दुखीयारी, सरसीभगत, हमारा देश, सरदार, भक्तीचा मळा, दर्शन, वैठीवाल्लभ, माली, मां-बाप, कुलकलंक, रामायण, नर्गिस, हक़्दार, पिलिंग म्यान, अंगूर बाला, किस्मत का सितारा, हातिमताई, जादुई बांसुरी, रामबाण, रतन मंजिरी, भक्त भिल्मंगल, भक्त गोपाल भय्या, सिपाहीया, रूपबसंत, बिजली, जन्माष्टमी, बेदर्दी, लवकुश, दिवाना, माशुक, आसू, सुबह का तारा, हम पंछी एक डाल के, पवनपुत्र हनुमान, जनम जनम के फेरे, मिस्टर एक्स, खोटा पैसा, बेदर्द जमाना क्या जाने, बॉयफ्रेंड, डॉकेर्स स्ट्रीट, अमृत बंधन.

अमीरबाई यांनी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले असावे. १. हिंदू पुराणावर आधारित भक्तिप्रधान चित्रपट. मंदिर संस्कृतीशी परिचय असल्यामुळे त्यांना ते काम करणे जड गेले नाही. २. स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईच्या प्रभावामुळे स्वतंत्रता संग्रामाचा आशय असलेले चित्रपट. पुढे त्या गांधींना सुद्धा प्रिय झाल्या. ३. प्रेम, सामाजिक समस्या मांडलेले कौटुंबिक चित्रपट. अमीरबाई यांनी अभिनीत केलेले काही चित्रपट त्यांच्या जिल्ह्यामधून आलेले वि. शांताराम यांनी दिग्दर्शित केले होते. त्यामध्ये ‘भारत मिलाप’ हा मुख्य होता. अमीरबाईंनी स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षातच हिंदी चित्रपटामध्ये काम करणे थांबवले. त्‍या गुजराती आणि मारवाडी चित्रपटांमध्ये गेल्या. अमीरबाई ज्‍या तीन राज्यामध्ये राहिलेल्या, तेथील भाषांमध्ये त्‍यांनी गाणी म्हटली आणि त्या भाषेमधल्या चित्रपटांमध्ये कामही केले. त्यांचे वैयक्तिक जीवनसुद्धा धर्मातीत संबंधावर आधारित होते. ह्याचे कारण त्यांचे व्यक्तिमत्‍त्‍व जातपातीच्या पलीकडे कलेवर आधारित होते. तसेच, त्या वेळचे मुंबईचे संस्कृतिक वातावरणसुद्धा कारणीभूत होते. कन्नड भाषिक असलेल्या बेलागीच्या भगिनी, उर्दू, मराठी, गुजराती, हिंदी, मारवाडी, आणि बंगाली भाषेतील चित्रपट आणि गायनक्षेत्रात काम करत होत्‍या.

यशस्वी गायिका

अभिनेत्री म्हणून तितकीशी प्रसिद्धी न मिळालेल्या अमीरबाई, परत परत गायनाकडे येत असे दिसते. गायन त्यांचे खरोखरच अभिव्यक्तीचे रूप होते. त्यांनी ज्या चित्रपटांमधून गाणी गायली ती अशी – बसंत, किस्मत, आम्रपाली, शिकारी, सिंदूर, लीला, ऐलान, समाधी, घायल, दीपक, सगाई, लवकुश, बिखरे मोती, उषाकिरण, भतृहारी, रतन, शहनाई, कारवां वगैरे. त्यांच्या गाण्यांना अल्लारखा, पन्नालाल घोष, एस डी बर्मन, अनिल विश्वास, नौशाद अली सारख्या ख्यातनाम संगीतकारांनी संगीत दिले. त्यावेळेस नौशाद अली राग संयोजनामध्ये भारतात श्रेष्ठ गायिका असलेल्या लता, नूरजहाँ, सुरय्या, शमशाद, जोहर, उमादेवी गात असत. अमीरबाईसुद्धा त्यांच्याकडे गायल्या. नौशाद अली यांच्या संयोजनाखाली ‘मिलके बिछड गये अखियाँ’ (रतन) हे गाणे अमीरबाई यांनी अत्यंत मधुरपणे गायले आहे. त्यांच्या अद्भूत आवाजाचा पुरेपूर उपयोग करून घेतला टो अनिल विश्वास यांनी. अमीरबाई त्यांच्या काळातील नूरजहाँ, सेहगल, अरुणकुमार मुखर्जी, शामकुमार, सी. रामचंद्र, लता सारख्या मोठ्या गायक/गायिकांबरोबर सुद्धा गायिल्या.

गाण्यातील विविधता

अमीरबाई यांचे गायन वैशिष्‍ट्यपूर्ण होते. त्‍यांमागे मजरूह सुलतानपुरी यांसारख्याच्या रचना गाऊन प्राप्त केलेली साहित्यिक जाणीव, शास्त्रीय संगीताचे ज्ञान आणि तार स्वरामध्ये गाण्याचा रंगभूमी वरील सराव अशी अनेक कारणे होती. अमीरबाई यांनी मुख्यत्वे उल्हासपूर्ण गाणी गायली आहेत. लता बरोबर त्यांनी गायलेली गाणी (‘समाधी’) लोकप्रिय झाली होती. ‘गोरे गोरे ओ बांके छोरे, अभी मेरी गली न आया करो’ असे लताने गायले, मागे मागे अमीरबाई ‘गोरी गोरी ओ बांकी छोरी, चाहे रोज बुलाया करो’ असे गायले आहे. ह्या गाण्यामधील लताचा शीतमधुर आवाज कानाला सुखद वाटतो, तसाच अमीरबाई यांचा मादक आवाज अंगावर रोमांच आणतो. ‘शहनाई’ चित्रपटामध्ये असलेले ‘मारी कटारी मर जावा, के अखियाँ किसीसे मिलाना ना, खाके जहर मरजना के मनमे किसीको बुलाना ना’ हे गाणे तर अहंकारयुक्त विरहगीत. ‘धीरे धीरे आरे बादल’ गाण्याच्या पूर्वार्धात अरुणकुमार मुखर्जी खुल्या गळ्याने गायले, उत्तरार्धात, तार स्वरात अमीरबाई यांचा गळा ‘कौन गात है रुबाई रे?’ असे गातात. ‘फिर वो किसकी याद आईरे?’ किसने पहनादी मुझको प्रेमकी माला? किसने मेरी जिंन्दागिका रंग बदल डाला?’ असे हलकेपणाने विचारतात. ‘आम्रपाली’ च्या ‘उद् जा मोरे तारो कि दुनिया में में उड जाउ रे’ असे गाणे म्हणणारी गायिका पंख पसरून गगनात विहार करते आहे अशी अनुभूती देते. ‘इस दुनियाके पगदंडी पर. तुम्ही हो मेरे साथी'(‘आम्रपाली’), ‘पिया मेरे साथ रहेंगे आज कि रात’ ह्या सारखी मनाला संतोष देणारी गाणी त्यांनी गायली आहेत. खरोखरच अमीरबाई यांची गानप्रतिभा व्यक्त होते ती ह्या दर्दभऱ्या गाण्यामधून असे वाटते. ‘ये दुनिया भला बिगाड देगी क्या तेरा’?’ असे प्रश्न विचारताना ‘घर घर में दिवाली है मेरे घर में अंधेरा’ (किस्मत) गाणे हृदय पिळवटून टाकते. ‘हमे क्या पता था, दिल कि कली को मसल देंगे वो?’ हमे क्या पता था, राहत गम बदल देंगे वो’ असे सुरु होणारे गाणे, मनात उमटणाऱ्या वेदनाना वाट करून देते. ‘दुनिया ने हमे दो दिन रहने ना दिया मिलके’ (शिकारी), ‘आ चल ये जिंदगी’ (ऐलान), ‘आंसू थी मेरी जिंदगी’ (बिखरे मोती) ही त्यांची इतर मुख्य दर्दभरी गाणी.

विरह भावनेने युक्त दुःखप्रद गाणी एका वेगळ्याच प्रकारे त्यांनी एके ठिकाणी व्यक्त केले आहे. ‘मिलके बिछड गये अखियाँ, हाय राम’ (भ्रतुहारी) सारखे गाणे ह्याचे द्योतक आहे. ह्या मध्ये ‘रोते है नयना जिया तळमळ करे जावो कोई उनको लावो’ ह्या गाण्यातील आर्तता काळीज चिरून जाते. “हो जानेवाले बलाम्वा, लौटकर आ, लौटकर आ” (रतन) हे गाणे शामकुमार बरोबर गायलेले गाणे. खूप वेगात जाणारे गाणे, खूप लवकर संपते. ‘बसंत’ चित्रपटातील‘हुवा क्या कुसूर, जो हमसे हुवे दूर’ हे गाणे सुद्धा विर्हाचेच गाणे. आर्ततापूर्ण भक्तीगीतांमुळे अमीरबाई यांना लोकप्रियता मिळाली. ‘किस्मत’ मधील ‘अब तेरे सिवा मेरा कौन कृष्ण कन्‍हय्या’ हे इतके प्रसिद्ध झाले होते की, मुंबईमधील लोकाल गाड्यांमधून हे गाणे भिकारी म्हणायचे. ‘सिंदूर’ मधील ‘तुमको कैसे मनवू ओ रोतेहुवे भगवान’, ‘ओ दुनिया बनानेवाले क्या यही है तेरी दुनिया’ ह्या सारखी गाणी सुद्धा असेच दैवाला सवाल करणाऱ्या रचना होत.

जुनी हिंदी चित्रपट गाणी ऐकणा-यांना अमीरबाई यांचे नाव परिचित आहे. पुणे, दिल्ली, अहमदाबाद येथे अमीरबाई यांचे फॅन क्लब असत. वहाब पिक्टुरेसच्‍या ‘शहनाझ’ (१९४२) चित्रपटासाठी स्वतः अमीरबाई यांनी संगीत दिले. नौशाद आणि अमीरबाई यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते असे अमीरबाई याचे कुटुंबीय ताजुद्दीन यांनी सांगितले. अमीरबाई मराठी, मारवाडी, गुजराती चित्रपटामध्ये गायल्या. लता मंगेशकर ह्याच्या पार्श्वगायानाक्षेत्रातील प्रवेशानंतर अमीरबाई यांचे युग संपले.

अमिरबाई यांचे व्यक्तिमत्त्व

अमीरबाई यांच्या जीवनाबद्दल अधिक माहिती मिळत नाही. त्यांचे जन्मसाल १९०८ आहे असे समजले जाते. त्या मुंबईमध्ये माहीम येथे राहत होत्या. अमीरबाईंकडे येणारे त्‍यांचे भाचे ताजुद्दीन यांच्या आठवणीनुसार, अमीरबाई जीवन सुकर व्हावे यासाठी कायम प्रयत्नशील राहायच्या. अमीरबाई यांनी विजापूर १९४५ मध्ये एक चित्रपटगृह बांधले. त्या काळी त्याला पंच्‍याहत्‍तर हजार खर्च झाला. पन्नास वर्षापासून असलेले अमीर चित्रपटगृह आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. अमीरबाई यांचे दुसरे भाचे शौकत यांनी त्यांच्या आत्याने गायलेली गाणी जपून ठेवली आहेत.

अमीरबाई स्वतःच्या प्रिय असलेल्या छोट्याशा काळ्या मोटारीमधून मुंबईहून बिजापुरला जायच्या असे सांगितले जाते. जर त्या रेल्वेने आल्या तर सगळ्या गावातले लोक त्यांना भेटायला येत. बिजापूर स्टेशनवरून मोठ्या घोडागाडीमधून त्या घरी जात असत. इतर टांगेवाल्‍यांची निराशा टाळण्‍यासाठी त्‍या त्‍यांनाही भाडे द्यायच्‍या आणि सारे टांगेवाले त्यांच्या घोडागाडीच्या मागे त्‍यांच्‍या घरी येत असत.

शोकपूर्ण गाणी गाणाऱ्या अमीरबाई यांचे वैयक्तिक जीवन सुद्धा त्‍या गाण्‍यांना साजेसे होते. त्‍यांनी १९४० च्या दशकात खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमालयवाला यांच्याबरोबर संसार केला. गर्भश्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या हिमालयवाला याचे अमीरबाईंवर प्रेम जडले. अमीरबाई यांचे हिमालयवालासोबतचे वैवाहिक संंध सुखकारक न्हवते. त्यांनी घटस्‍फोटानंतर गुजराती पत्रकार आणि संकलक असलेल्या बद्री कान्‍चावाला यांच्या बरोबर संसार थाटला.

जातीभेदापलिकडली कलाकार

संगीत रंगभूमीची दुनिया संकुचितपणाविरुद्ध आहे. कलेची शक्तीच अशी आहे की, ती संप्रदाय ओलांडून जाते. त्यातही इस्लाम धर्मामध्ये संगीतावर बंदी असूनही संगीत आणि रंगभूमी क्षेत्रामध्‍ये अपार संख्येने कष्ट करून साधना करतायेत. कन्नड रंगभूमीचा मोठा नट पीर मोहम्मद, अप्पालाल नदाफ यांसारखे लोक अमीरबाईचे समकालीन होत. अप्पालाल नदाफ हे तर अमीरबाईचे अतिशय जवळचे. ‘किस्मत’ चित्रपटातील ‘अब तेरे सिवा’ गाण्याच्या चालीवर ते कृष्ण-पारिजात कार्यक्रमात ते गात असत.

गायक महम्मद रफी यांचे निधन झाल्यावर, शम्‍मी कपूर यांना कोणीतरी सांगितले की, ‘कपूर साहेब, तुम्हारी आवाज चाली गयी!’ रफी यांच्या आवाजावर गाणे अभिनीत करणारे शम्मी कपूर अतिशय शोकाकुल झाले. हेच चित्रपटश्रुतीचे अद्भूत तत्व आहे. कोणाचेतरी साहित्य, कोणाचेतरी संगीत संयोजन, अजून कोणीतरी गाणे गाणारे, त्यावर कोणीतरी ओठांची हालचाल करून अभिनय करणारे अभिनेते दुसरेच. कवी-संगीतकार-गायक-अभिनेता या सर्वांना एकत्र आणणारे चित्रपटासारखे माध्यम. ते चित्रपट पाहणारे सुद्धा समस्त जातीधर्माचे.

संगीत आणि रंगभूमी ही क्षेत्रे सुद्धा, चित्रपटासारखी जातीभेदापलिकडील आहे. भीमसेन जोशी यांचे गुरु सवाई गंधर्व यांचे गुरु उस्ताद अब्दुल करीम खान मिरजकर हे होते. सुरेश माने/हिराबाई बडोदेकर, शांता हुबळीकर यांचा गुरु करीमखान यांचे पुत्र सुरेश माने होते. ही गोष्ट शांता हुबळीकर त्यांच्या आत्मचरित्रात आदराने नमूद करतात. कट्टर ब्राम्हण असलेले शिष्य मुस्लीम असलेल्या गुरुंची सेवा करत. अल्लारखॉं, मजरूह सुलतानपुरी, गुलजार, अब्बास, नौशाद, महबूब रहमान ह्यांना विसरून चित्रपट जग कल्पिता येत नाही. मुंबईच्या या बहु-भाषिक/बहु-सांस्कृतिक जगात बिळगी भगिनींची कर्मभूमी झाली ह्यात आश्चर्य काहिच नाही.

कर्नाटक संबंध

उत्तर कर्नाटकाने हिंदी चित्रपट, हिंदुस्तानी संगीत, आणि मराठी रंगभूमीला अनेक कलाकार दिले आहेत. त्यात मुख्यत्वे ओनाकुदारीचे व्ही. शांताराम, शांता हुबळीकर, अमीरबाई आणि गोहाराबाई. ‘माणूस’ चित्रपटामुळे व्ही. शांताराम आणि शांता हुबळीकर प्रसिद्ध झाले. हा चित्रपट त्या वेळचा अत्यंत यशस्वी चित्रपट होता. शांता हुबाळीकारांच्या समकालीन असलेल्या अमीरबाई यांचे रंगभूमीवरील पदार्पण गदग येथे झाले. शांता हुबळीकर या गुब्बी कंपनीमध्ये होत्या. अमीरबाई कोठल्या कंपनीत होत्या ते मात्र अजून कळत नाही. पुणे-मुंबई मध्ये राहून सुद्धा शांता हुबळीकर आणि अमीरबाई कन्नड भाषेला विसरल्‍या नाहीत. त्‍यांनी कर्नाटकाबरोबरचे संबंध कायम ठेवले. अमीरबाई बिजापूर आणि बेळागीला येत जात असत. प्रत्येक वर्षी मोहरम साजरा करण्याकरता बेळागीला जात असत. त्या बेळागीच्या मध्वराम उमरजी नावाच्या अभिनेत्याबरोबर तेथील लक्ष्मी मंदिरात गात असत, असे स्थानिक लोक सांगतात. (नाटकामध्ये काम केलेल्या उमरजी यांनी नंतर विषप्राशन करून आत्महत्या केली). अमीरबाई यांनी मुंबईमध्ये राहून सुद्धा स्‍वतःच्‍या आहार-विहार आणि संस्कृतीमध्ये बदल केला नाही. ताजुद्दीन यांच्यानुसार, त्या ज्वारीची भाकरी प्रेमाने खात असत. अमीरबाई यांनी साकारलेले भिकारणीचे पात्र आणि त्यांनी गायलेले गाणे असलेला ‘चिरंजीवी मार्कंडेय’ (धारवाडच्या कर्नाटक टाकीजची निर्मिती) हा चित्रपट पाहायला मिळत नाही. सुरेश कुलकर्णी सांगतात की, त्‍या चित्रपटाची रिळे आकस्मिकरीत्या जळाली. अमीरबाई यांचा अभिनय असलेल्या बसवण्णा यांचा चित्रपट अर्ध्यावरच थांबला. आता तीची रिळे नष्ट झाली आहेत. अमीरबाईंनी कन्नडमध्ये गायलेले अनेक गाणी आहेत. अमीरबाई यांना ‘कर्नाटक कोकीळ’ असे म्हटले जायचे. अतिशय महत्वाची बाब अशी की, कर्नाटकाचे एकीकरण होण्‍याच्‍या आधीच त्‍यांनी कर्नाटकी असे नाव बदलून घेतले. गंगुबाई हनगल यांचे उदाहरण येथे नमूद करायला हवे. मुंबईला येणारे लोक स्‍वतःच्‍या नावापुढे स्वतःच्या गावाचे/प्रदेशाचे नाव लावत.

अखेरचे दिवस

१९४०-१९५० च्या दरम्यान अमीरबाई चित्रपटामध्ये काम करत नव्हत्या असे दिसते. याचे कारण बहुतेक त्यांचे प्रकृती. त्यांना पार्श्ववायू झाला होता. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. चार दिवसानंतर त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांची शेवटची इच्छा होती की, त्यांना बिजापूरमध्ये दफन करावे. कला जीवनामध्ये भरपूर देशाटन केल्यावर, त्‍यांना अखेरीस स्‍वतःच्‍या गावी चिरनिद्र घ्यावी असे वाटले असावे काय? त्यांच्या समाधीची दुर्दशा झाली होती. बिजापुरचे लोक या दोन ही भगिनींचे कार्य विसरले काय? असे व्हायला कारण असावे असे वाटते. अठराव्‍या वर्षी बिजापूर सोडून, सारा जीवनकाल मुंबईमध्ये व्यतीत केलेल्या अमीरबाई यांची प्रतिभा कन्नडमध्ये येण्यास अवकाश मिळाला नाही. त्‍यांचा जन्म झालेला बिजापूर जिल्हा त्या वेळेस मुंबई प्रांतात होता. कर्नाटक एकीकारांच्या वेळेला मुंबई आणि बिजापूर वेगवेगळ्या राज्यांमध्ये सामील झाले. त्‍यामुळे अमीरबाई यांचे कर्नाटकाशी असलेले संबध हळूहळू कमी होत गेले असतील. तरी सुद्धा जुन्या काळातल्या लोकांना जर बोलते केले अमीरबाई त्यांच्या स्मृतीमध्ये अजुनही आहे असे दिसते. तेवढेच नाही तर, अमीरबाई यांची कबर पाहायला गेलो असताना, तेथील मंडळीनी अमीरबाई यांची गाणी गाऊन दाखवली.

अमीरबाई यांच्या समाधी जवळच आदिलशाही बादशाह इब्राहिमची ‘इब्राहीम रोजा’ ही समाधी आहे. ‘जगद्गुरू’ असे बिरूद मिरवणाऱ्या इब्राहीमला संगीताचे वेड होते. त्‍याने सरस्वती आणि गणेश प्रार्थनेपासून सुरु झालेले संगीत-ग्रंथ ‘किताब-ई-नवरस’ लिहिले. अनेक संगीतकारांना बोलावून संगीतावर प्रयोग करण्यारे नवरसपूर हे गावच त्‍याने निर्माण केले; कलेसाठी जगलेल्या आणि  प्रवाहाविरुद्ध गेलेल्या बिजापूरच्या सीमेवर हे दोन जीव चिरनिद्रा घेत आहेत हे अपूर्वच आहे.

(ह्या लेखनासाठी अमीरबाई यांचे भाचे ताजुद्दीन आणि शौकत, धारवाड चे सुरेश कुलकर्णी, आणि राजशेखर जंगमशेट्टी यांच्याकडील मोलाची महिती मिळाली. मुंबईचे प्रकाश सी. बुरडे, गदगचे रविंद्रनाथ दोड्डमत्ती, घोळसंगीचे का. हुं. बिजापूर, होन्नावरचे बसवराजस्वामी मेलउप्पारगीमठ, चित्रपट दिग्दर्शक श्री. टी. एस. कणवी, बिजापुरचे संगीत शिक्षक थोरात मास्तर, रंजन गर्ग आणि पत्रकार ड. रा. पुरोहित यांच्या बरोबरच्‍या चर्चा उपयोगी पडल्‍या. त्‍या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.)

मूळ लेखक – रहिमत तरीकेरी
अनुवाद – प्रशांत कुलकर्णी

एका अनुवादाची कहाणी

मी अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी या कन्नड पुस्तकाचे प्रकाशन होवून आता एक वर्ष उलटून गेले आहे. एक दोन नवीन पुस्तकांच्या अनुवादाचे काम देखील सुरु झाले. मूळ कन्नड पुस्तकाचे लेखक जे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत, ते रहिमत तरीकेरी परवा पुण्यात आले असता मला भेटले. त्यांनी मला सुचवले की मी केलेल्या अनुवादाच्या प्रक्रिये संबंधी लिहून काढावे. म्हणून हा आजचा ब्लॉग-प्रपंच. इतक्यातच आज मराठी भाषा दिन आपण साजरा केला. त्यानिमित्ताने अनुवाद साहित्याबद्दल देखील बोलले गेले. अनुवाद हा साहित्य प्रकार आता मराठी रुजू पहातोय, त्याला वाचकांची पसंती मिळते आहे, मराठी भाषा आणि साहित्य त्यामुळे समृद्ध होते आहे.

माझी मातृभाषा कन्नड आहे. पण मी पुण्यातच वाढलो, मराठी माध्यमात शिकलो. मी दहावीत असताना सुट्टीत कन्नड लिहायला आणि वाचायला शिकलो. दोन्ही भाषेची पुस्तके, मासिके आणि इतर साहित्य यांचे थोडेफार वाचन कायमच घरात होत असे. अनुवादाच्या आयडियाची कल्पना माझ्या ध्यानीमनी नसताना डोक्यात आली. त्याचे झाले असे की साधारण २००९ च्या सुमारास, ‘मयूर’ नावाच्या एका कन्नड मासिकात, मला गोहरबाई आणि बालगंधर्व यांच्यावर रहमत तरीकेरे यांचा एक लेख आढळला. बालगंधर्वावर कन्नडमध्ये असलेला तो लेख पाहून मला जरा आश्चर्यच वाटले. तो लेख वाचल्यानंतर, आणि रहमत तरीकेरे यांच्या बरोबर ईमेल आणि दूरध्वनीवर झालेल्या चर्चेत मला या विषयाची व्याप्ती समजली. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा आताच्या कर्नाटकातील काही भाग बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये होता. मराठी आणि कन्नड जनात वेगवेगळया पातळीवर सांस्कृतिक देवाणघेवाण होत असे. संगीत नाटकं, बालगंधर्वांची नाटकं कन्नड प्रदेशात जात, तेथे प्रयोग होत, त्यांचा प्रेक्षक वर्ग तेथे होता. तर मी त्या लेखाचा मी मराठीत अनुवाद करून, तो लेख मी ग्रंथालीचे आणि ‘थिंक महाराष्ट्र‘चे दिनकर गांगल यांच्याकडे तो पाठवला. त्यावर त्यांनी संपादकीय संस्करण करून त्यांनी तो येथे प्रसिद्ध केला आणि मला बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. त्या विषयावर काम करणारे आणि त्याचा अभ्यास असणारया बऱ्याच व्यक्तींशी परिचय झाला. रहमत तरीकेरे यांनी अमीरबाई कर्नाटकी यांच्या चरित्रावर पुस्तक लिहित आहे असे कळवले. तत्काळ मी त्यांना त्याचा अनुवाद करण्याची परवानागी मागितली आणि ती त्यांनी आनंदाने दिली. आणि माझे सौभाग्य असे की ग्रंथाली यांनी देखील तो अनुवाद प्रकाशित करण्याची तयारी दर्शवली.

यथावकाश कन्नड मधील अमीरबाई यांच्या चरित्राचे प्रकाशन झाले(२०१२) आणि मला ते पुस्तक प्रो. तरीकेरे यांनी पाठवले. पुस्तक तर ३०० पानाच्या आसपास होते. माझ्या मनात धडकीच भरली, हे कसे आणि कधी होणार. मी संगणक क्षेत्रात कार्यरत आहे, आणि त्यामुळे वेळेचा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. पण मी मनाचा हिय्या केला आणि काम सुरु केले. रहिमत तरीकेरे यांच्या पुस्तकाची कन्नड भाषा तर ग्रांथिक होती. पुस्तक संशोधनात्मक होते, भरपूर तळटिपा, संदर्भ साहित्य यांची रेलचेल होती. भाषा ललितलेखांप्रमाणे सरळ आणि सोपी नव्हती. मूळ वाक्य, वाक्यरचना, त्याचा मतितार्थ समजायला बरेच कष्ट पडले. माझ्याकडे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित केलेला जुना कन्नड-शब्दकोश आहे, तो हाताशी घेतला. महाराष्ट्रातील, आणि मराठी, तसेच मुंबई, तेथील चित्रपटसृष्टी याचे संदर्भ बरेच असल्यामुळे पुढे पुढे समजायला सरळ होत गेले. सकाळी लवकर उठून १-२ तासांची बैठक मारून काम करायला लागलो, आणि हळूहळू अनुवादाला आकार येवू लागला. माझे सारे कुटुंबीय कर्नाटकातील विजापूरचे. त्यामुळे तेथील संदर्भांबद्दल चर्चा करता आली. कन्नड भाषेतील शब्दांच्या छटाबद्दल त्यांच्या बरोबर चर्चा करता आली. त्यातच मी २-३ महिन्यांसाठी अमेरिकेला गेलो, आणि काम बंद झाले. तेथून आल्यावर परत सुरु केले, आणखी माहितीबद्दल प्रो. तरीकेरे यांच्या बरोबर चर्चा सुरु झाल्या.

त्यातच २०१३ मध्ये मी, रहमत तरीकेरे यांचा पुण्यात सुदर्शन रंगमंच तर्फे चैतन्य कुंटे यांच्या बरोबर सुदर्शन संगीत सभा अंतर्गत, एक कार्यक्रम पुण्यात घडवून आणला. तो होता अमीरबाई आणि गोहारबाई यांच्या जीवनावर. त्याचे नाव होते -‘बिळगी भगिनी-शतमान स्मरण‘. त्यावेळेस ते पुण्यात आले होते, त्यामुळे प्रत्यक्ष चर्चा करता आली, आणि बरेच मुद्दे आणखीन समजले. याच पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर तरीकेरे यांनी बंगळूरू येथील लेखिका मंगला सर्वा यांच्याकडे दिले होते, त्यांचे देखील काम सुरु झाले होते. २०१४ मध्ये  मी बंगळूरूयेथे गेले असता, प्रो. तरीकेरे, आणि मंगला सर्वा यांची भेट मंगला यांच्या घरी झाली. तेथे झालेली चर्चा अतिशय उद्बोधक होती. असे करता करता मुख्य पुस्तकाचे काम झाले आणि तो मसुदा मी ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी यांच्याकडे पाठवला. त्यांची चिकित्सक नजरेने भाषिक दोष, वाक्यरचनेतील दोष, भाषांतरातील दोष, तसेच काही तपशीलातील दोष माझ्या निदर्शनास आणून दिले. तरीकेरे यांच्या सुचनेनुसार मुंबईचे प्रकाश बुरडे, धारवाड येथील प्रो. यार्दी, मुधोळचे आनंद झुंजूरवाड, मुंबईचे प्रकाश दिवाण इत्यादी जाणकारांना कच्चे खर्डे तपासून द्यायला पाठवले. त्या सर्वानी देखील बहुमोल सूचना दिल्या, आणि त्याचा देखील पुस्तक आकारास येण्यास उपयोग झाला. त्याच सुमारास मी रहिमत तरीकेरे यांनी लिहिलेल्या अमीरबाई कर्नाटकी यांच्या चरित्राचा संशोधनाचा निमित्ताने आलेल्या अनुभवांवर एक कन्नड लेख लिहिला, तो मी अनुवादित केला आणि तोही थिंक महाराष्ट्र वर येथे प्रसिद्ध झाला.

ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर यांनी मला कळवले की ग्रंथालीच्या ४०व्या वर्धापनदिनी डिसेंबर २५, २०१४ ला मुंबईत पुस्तक प्रकाशन करायचे आहे असे ठरले आहे. मुंबईत तो दिवस ग्रंथाली वाचकदिन म्हणून साजरा करते. दिवसभर कार्यक्रम असतो. संध्याकाळी पूर्वनियोजित पुस्तकांचे प्रकाशन असते. माझी त्यामुळे तारांबळ उडाल्यासारखी परिस्थिती झाली. अजून कितीतरी कामे राहिली होती. पुस्तकातील छायाचित्रांची यादी, त्यांची माहिती, छायाचित्रे ग्रंथालीला द्यायची होती. आणि मनोगत लिहायचे होते, मुखपृष्ठ करायचे होते. जसे काही काऊंटडाऊनच सुरु झाले होते. मुखपृष्ठासाठी पुण्यातील National Film Archives of India(NFAI) मधील आरती कारखानीस यांची माहिती तरीकेरे यांनी कळवली. आणि त्यांनी तत्परतेने एक अतिशय लोभस आणि दुर्मिळ असे अमीरबाई यांचे छायाचित्र  उपलब्ध करून दिले. इतर सगळे सोपस्कार झाले आणि ग्रंथालीची आमंत्रण पत्रिका धडकली. रहमत तरीकेरे माझ्याकडे पुण्यात आले आणि आम्ही सर्वजण मुंबईस गेलो आणि प्रकाशन सोहळा संपन्न झाला. आणि गंगेत घोडे न्हाले.

हा अनुवाद करण्याचा माझा हेतू एवढाच होता की, अमीरबाई यांच्या चरित्राशिवाय, त्यांच्या आणि गोहरबाई यांच्या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील सांस्कृतिक देवाणघेवाण कशा प्रकारची होती यावर कर्नाटकातील संशोधकाच्या/अभ्यासकाच्या दृष्टीने टाकलेला झोत मराठी रसिकासमोर यावा. मला हा अनुवाद करताना खुपच मजा आली, दोन्ही भाषेच्या माझ्या आकालानात आणखीन भर पडली तसेच तो काळ समजून घेण्यातही मदत झाली. त्या दृष्टीने रहमत तरीकेरे यांच्या सोबत झालेल्या चर्चा, माझी पत्नी अनिता हिच्या बरोबर कन्नड भाषेतील बारकाव्यावर आणि शब्दार्थाच्या छटा यावर झालेल्या चर्चा खुपच उपयोगी पडल्या.

पुस्तक प्रकाशनानंतर यथावकाश पुस्तकाबद्दल अभिप्राय येवू लागले, फोन येवू लागले, मला एकूणच आणखीन मजा येवू लागली. पुस्तकाच्या दुकानात जाऊन  मी माझे पुस्तक पाहू लागलो. पुस्तक प्रकाशित झाल्यावर पुण्यातील प्रसिद्ध संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांना मी पुस्तक अभिप्रायासाठी दिले होते. त्यांनी काही दिवसापूर्वी, प्रत्यक्ष भेटी दरम्यान काही चुका निदर्शनास आणून दिल्या, पुस्तकातील काही निष्कर्षांबद्दल मला त्यांचे मत त्यांनी कळवले. ह्या सर्व गोष्टी मला रहमत तरीकेरे यांच्याशी बोलून, माझ्या अनुवादातील चुका दुरुस्त करून, दुसरी आवृत्ती करायची आहे, पाहुयात कसे जमते ते!