अरबी कहाण्या

मी जुन्या पुस्तकांचा चाहता आहे. जसे जमेल तसे मी ती गोळा करत असतो. गौरी देशपांडे यांनी अरेबियन नाईट्सचे केलेल्या मराठी भाषांतराचे १६ खंड आहेत त्याबद्दल ऐकले, वाचले होते. काही वर्षांपूर्वी मी ते बरेच दिवस शोधत होतो. आणि एकदाचे मिळाले. महाभारत, जातक इत्यादी प्रमाणे मौखिक परंपरेतून आलेल्या वास्तव आणि अद्भूतरम्य यांचे मिश्रण असलेल्या गोष्टी आहेत, ज्या कित्येक शतके सांगितल्या जात होत्या आणि लोक-परंपरेचा भाग होता(आठव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत) असे अभ्यासक सांगतात. त्याची बरीच म्हणजे बरीच भाषांतरे आहेत. पण रिचर्ड बर्टनने केलेले भाषांतर हे मुळाबरहुकुम आहे असे म्हणतात. रिचर्ड बर्टनने केलेल्या भाषांतरात बऱ्याच ऐतिहासिक, समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीयदृष्ट्या तळटीपा आहेत. तेच गौरी देशपांडे यांनी मराठीत आणायला वापरले आहे. त्यांच्या आधी कृष्णशास्त्री चिपळूणकर(आणि इतर प्रभृती) यांनी एका वेगळ्या भाषांतरावरून ह्या गोष्टी मराठी प्रथम आणल्या होत्या. ह्यातील बऱ्याच कहाण्या आणि इतरही अद्भूतरम्य अरबी कहाण्या जसे अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, अलीबाबा आणि चाळीस चोर, सिंदबादच्या सफरी, अलीफ लैला वगैरे आपल्या अनेकांच्या भावविश्वाचा भाग आहेत.

परवा वाचनलयात जी ए कुलकर्णी यांचे ‘एक अरबी कहाणी’ हे पुस्तक मिळाले. जी ए कुलकर्णी यांची अनुवादित पुस्तकेही बरीच प्रसिद्ध आहेत. जी ए कुलकर्णी यांची पुस्तके म्हणजे माझा अजून एक weak-point, त्यातल्या त्यात त्यांच्या पत्रांचा संग्रह. त्यांची काही अनुवादित पुस्तके मी पूर्वी वाचली आहेत. एक अरबी कहाणी हे पुस्तक The Shaving of Shagpat या जॉर्ज मेरेडिथ यांनी लिहिलेल्या जुन्या कादंबरीचा अनुवाद आहे. जी ए यांनी हे पुस्तक अनुवादित केले यात आश्चर्य काही नाही. कारण कल्पनारम्य, अद्भुतरम्य कादंबरी आहे. त्यांना अद्भुताचे म्हणजेच fantasy चे आकर्षण प्रचंड होते. हा मुक्त अनुवाद आहे. मला या पुस्तकाचे आकर्षण वाटायचे दुसरे कारण म्हणजे मलपृष्ठावर लिहिलेले वाक्य जे असे आहे-‘अरेबियन नाईट्सच्या धर्तीची अथपासून इतीपर्यंत वाचनाची उत्कंठा वाढवीत नेणारी अद्भुतरम्य कादंबरी’. हा अनुवाद अनंत अंतरकर(आणि आता आनंद अंतरकर धुरा सांभाळत आहेत) यांनी स्थापन केलेल्या विश्वमोहिनी प्रकाशन तर्फे १९८३ मध्ये प्रकाशित झाले आहे. म्हणजेच जी ए कुलकर्णी यांच्या मृत्यूच्या ४ वर्षे आधी.

प्राचीन पर्शिया देशाची पार्श्वभूमी असलेल्या, ह्या कादंबरीत अरेबियन नाईट्स प्रमाणे विविध गोष्टी आहेत. जॉर्ज मेरेडिथ कवी होता त्यामुळे अधूनमधून काव्यपंक्ती देखील येतात, त्या देखील जी ए यांनी अनुवादित केल्या आहेत. (तश्याच अरेबियन नाईट्स मध्येही काव्यपंक्ती  आहेत, ज्या रिचर्ड बर्टन, आणि गौरी देशपांडे यांनी अनुवादित केल्या आहेत). तर ही कादंबरी कशाबद्दल आहे हे सुरुवातीलाच लेखकाने सांगितले आहे. शागपाट नावाचा पर्शियन राजाच्या हजामतीची ही कहाणी आहे. का ही हजामत करायची आहे? त्यात काय विशेष? का तर म्हणे तो पर्शियन राजा त्याच्या जादुई अश्या लांब सडक अश्या वज्रकेसाने शिराझ शहराला जखडून ठेवलेले असते. त्यापासून सुटका करण्यासाठी ही हजामत आवश्यक आहे. ती करतो दरबारातील मुख्य न्हावी(!) शिबली. आणि इतर कादंबरी म्हणजे हे ध्येय साध्य करताना काय अद्भूत गोष्टी घडतात, त्याची सर्व ही कहाणी आहे. खरेच ही अद्भूत अरबी कहाणी आहे. पण त्यामुळेच जी. ए. कुलकर्णी यांनी याला ‘एक अरबी कहाणी’ असे शीर्षक दिले असावे का की काय? ‘शागपाटची हजामत’ असे का नाही दिले?

ह्या कादंबरीच्या अनुवादाच्या निमित्ताने जी ए यांचा आनंद अंतरकर यांच्याशी पत्रसंवाद झाला होता. तो आणि इतर पत्रसंवाद अंतरकर यांनी आपल्या ‘एक धारवाडी कहाणी’ या संग्रहात त्यांनी मांडला आहे. तो देखील ह्या कादंबरीप्रमाणे मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यात जी ए यांनी त्यांच्या पत्रातून तसेच अंतरकर यांनी देखील अरेबियन नाईट्स संबंधी देखील आपापली मते मांडली आहेत. त्यांनी म्हणे हा अनुवाद आपल्या बहिणीसाठी करून ठेवला होता. तसेच जी ए कुलकर्णी अनुवादाविषयी, अनुवाद-प्रक्रियेविषयी, त्या कादंबरी काही अद्भूत घटना आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल ही विवेचन आहे. तसेच भाषांतर प्रक्रियेविषयी देखील त्याची मते त्यांनी मांडली आहेत(उदा. हा अनुवाद मुक्त अनुवाद आहे, स्वैर अनुवाद नव्हे, इत्यादी). ही दोन्ही पुस्तके आपल्याला समृद्ध करतात. अरेबियन नाईट्स, आणि गौरी देशपांडे यांचे भाषांतर याच्याबद्दल तर विचारायलाच नकोय(अर्थात त्याचे १६ खंड आहेत, कधी वाचून होणार, हा ही एक प्रश्नच आहे!)

खरेतर आजकाल अद्भूतरम्य कादंबऱ्या(आणि चित्रपट) यांचा सध्या जमाना आहे. Harry Potter च्या कादंबऱ्या, चित्रपट, तसेच आपला पूर्णतः भारतीय चित्रपट बाहुबली, प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. The Shaving of Shagpat वर पुढे मागे एखादा इंग्रजी(अथवा भारतीय) चित्रपट आला तर आश्चर्य वाटायला नकोय!

दि बा मोकाशी यांच्या कथा

परवा मी मुंबईला अमेरिकेच्या व्हिसासाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. रात्रीच्या मुक्कामासाठी बरोबर मोकाशी यांचे पुस्तक नेले होते. त्यातील ‘आता आमोद सुनासि आले’ ही कथा वाचत होतो आणि तिने मला खिळवून ठेवले. त्यात एकाच्या मुलाच्या मृत्यनंतर निर्माण झालेल्या मानसिक अवस्थेचे वर्णन, आणि समांतर अशी दुसरी घटना, जेथे एक गाय व्यायते आहे, अडली आहे, आणि त्यावेळेस होणाऱ्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे, ताण-तणाव यांचे वर्णन असलेली ही कथा न संपवता झोपूच शकलो नाही. गेली ७-८ वर्षे मी मोकाशी यांची पुस्तके जमेल तशी मिळवून वाचतोय. त्यांचा परिचय मला जी ए कुलकर्णी यांच्या पत्रांच्या संग्रहाचे खंड वाचताना झाला. त्यात त्यांनी मोकाशी यांच्या कथा, लघुकथा याबाबतीत अनुकूल मत(जे अतिशय दुर्मिळ आहे) नोंदवले होते. मला वाटते त्यांनी ‘देव चालले’ या पुस्तकाबद्दल लिहिले होते. त्यामुळे खरे तर त्यांच्या पुस्तकांकडे वळण्यास सुरवात केली. गेल्या आठवड्यात त्यांचे ‘जरा जाऊन येतो’ हे पुस्तक हाती लागले होते. त्यातीलच वर उल्लेखलेली कथा आहे. हा कथा संग्रहच आहे, पण तो सरोजिनी बाबर यांनी निवडलेल्या कथांचा. त्या आधी कुठे प्रकाशित झाल्या होत्या की काय याचा उल्लेख नाही. हे जरा वेगळेच वाटले. आधी वाचलेले कथासंग्रह मोकाशी यांनीच तयार केलेले होते. परत या संग्रहाला सरोजिनी बाबर यांची छान प्रस्तावना आहे. १९८७ मध्ये प्रकाशीत झालेल्या या पुस्तकाचे निमित्त काय होते हेही समजले नाही. पण प्रस्तावनेतून त्यांच्या बाबतीत, तसेच त्यांची जडण घडण कशी झाली हे समजते.

ते कायम पुण्यात राहिले, त्यांचा छोटासा स्वतंत्र व्यवसाय होता. १९३८-८१ या काळातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय जीवनानुभव यावर सहसा आधारित या कथा आहेत. अतिशय तरल, ललित लेखनाच्या अंगाने जाणाऱ्या, वेगवेगळया शैलीचे घडवणाऱ्या, अतिशय छोट्या छोट्या विषयांच्या, किंवा शुल्लकशा अश्या विषयांच्या आसपास फिरणाऱ्या या कथा आहेत. उदा. ‘आपला-तुपला चहा’ या कथेत विषय असा आहे की एका व्यक्तीला महिनाभर वस्तीला आलेल्या पाहुण्यांनी जेरीस आणले असते. ते बाहेर गेल्यानंतर, त्याला हवा असलेल्या एकांत मिळालेला असतो, पण तो अनुभवता त्याची मानसिक अवस्था म्हणजे ही कथा. ह्या संग्रहात ‘वाया दिवस बालपणीचे’, तसेच ‘डोंगर चढण्याचा दिवस’ हे दोन ललितलेखही आहे, ते या कथासंग्रहात कसा आला हे समजत नाही, पण हरकत नाही. ‘डोंगर चढण्याचा दिवस’ हा लेख वाचून माझ्या सारख्या कायम डोंगर-किल्ले चढणाऱ्याला गंमत वाटली. मीही माझ्या ट्रेकिंगचे अनुभव लिहीत असतो, इतरांचे लेख वाचत असतो, पण हे अगदी वेगळेच वाटले.

२०१५ साल हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. त्यावर्षी अंतर्नाद मासिकाच्या दिवाळी अंकात मोकाशी यांच्या पत्नीनी लिहिलेल्या आठवणीचा लेख आला आहे. तो त्यांनी दि बा मोकाशी यांच्या मृत्युनंतर १२ वर्षांनी लिहिला होता(१९८१ मध्ये मोकाशी गेले, लेख १९९३चा आहे, आणि १९९४ मध्ये त्यांच्या पत्नीदेखील निर्वतल्या). त्यांच्या मुलीने तो लेख मासिकासाठी दिला होता. तसेच मासिकाने कथा स्पर्धा देखील आयोजित केली होती. त्यांच्या पत्नीच्या लेखात सहजीवनाच्या, कथांच्या जन्माच्या, त्यांच्या लकबी, सवयी इत्यादींचे वर्णन आहे. मी सुरुवातीला उल्लेखलेल्या कथेचे बीज त्यांनी चौक गावात अनुभवलेल्या एका घटनेचे रूपं होते हे (आता परत) वाचून गंमत वाटली. या संग्रहात ‘रोमच्या सुताराची गोष्ट’ नावाची एक  गमतीदार कथा, ज्यात, एकाचे गोष्ट सांगणे विविध कारणांमुळे अडते, अडखळते, आणि ती सांगून संपवणे होतच नाही. ह्या कथेचे मूळ मोकाशी पती-पत्नी यांच्या एका हट्टात, खटक्यात आहे हे नमूद केले आहे. पण मला ती गोष्ट, म्हणजे रोमच्या सुताराची, पूर्णपणे काय आहे हे माहीत नाही.

त्यांची इतर काही पुस्तकं मी वाचली आहेत. आदिकथा, वणवा, अठरा लक्ष पावलं इत्यादी. त्यांच्याबद्दल लिहीन कधीतरी परत. पण जी ए कुलकर्णी यांनी प्रशंसलेली ‘देव चालले’ हे पुस्तक काही मिळत नाहीये अजून. त्यांचे अजून एक पुस्तक म्हणजे वात्सायन ही कादंबरी, जी त्याच्या जीवनाचा पट मांडते, तसेच त्याने कामसुत्रे कशी कशी लिहिली याचा देखील तो पट आहे. दि बा मोकाशी यांची कायमच स्त्री पुरुष यांच्या भावविश्वाचा, सहजीवनाचा वेध त्यांनी  त्यांच्या कथांतून घेतलेला आहे. या दृष्टीकोनातून हे पुस्तक वाचायला हवे. पाहुयात कसे जमते ते.