पेस्तोनजी आणि पारसी समाज

अमेरिकेसारखा, भारत, हा देखील निर्वासितांचा(migrants) देश म्हणायला हरकत नाही, असे एकूण इतिहासाकडे पहिले तर लक्षात येते. फरक एवढाच आहे, भारतात ते कित्येक हजार वर्षांपासून चालू आहे, अमेरिकेत ही लाट गेल्या काही शतकातील. दुसरा एक फरक असा की निर्वासितांनी अमेरिकेवर राज्य केले अशी उदाहरणे कमीच, पण भारतात ती मात्र भरपूर आहेत. मोगल असतील, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच असतील, सर्वानी कित्येक वर्षे राज्य केले. त्या आधी कुशाण वगैरे लोकांनी देखील राज्य केले. आर्य इथलेच की बाहेरचे हा वाद आहेच. पण ते जर बाहेरचे, निर्वासित असे समजले तर, त्यांनी देखील राज्य केले असे दिसते. पण हे सर्व समाज, निर्वासित, भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत असे दिसते. निर्वासितांची अलीकडचे उदाहरण म्हणजे सिंधी समाज. सिंधी समाज भारताच्या फाळणीनंतर, पाकिस्तानात देलेल्या सिंध प्रांताचे लोक. गेली ७० वर्षे ते येथे राहत आहेत, आणि भारतीय समजाशी एकरूप झाले आहेत. असेच भारतीय मातीशी एकरूप झालेले दुसरे उदाहरण म्हणजे पारसी समाज. पण त्याच बरोबर त्यांनी आपली संस्कृती, वेगळेपण निकाराने जपून ठेवले आहे.

हे सर्व आठवायचे कारण म्हणजे नुकताच पाहिलेला विजया मेहता दिग्दर्शित पेस्तोनजी हा सिनेमा. हा जुना(१९८०च्या दशकातील) सिनेमा आहे, आणि पाहायचे राहून गेले होते. आणि गंमत त्यात १९५०-६० चा काळातील पारसी समाजाचे चित्रण आहे, तेही मुंबईतील. पारसी समाजाचा भारतातील इतिहास बऱ्यापैकी लिहून झाला आहे, त्याची माहितीही इतरत्र भरपूर आहे. पारसी समाजातील व्यक्तींचे चित्रण आपल्याला चित्रपटात दिसते, पण ते अनुषंगिक असे असते, आणि बऱ्याच वेळेस विनोद-निर्मिती साठी योजलेली पात्रे असतात. साहित्यामध्येही पारसी व्यक्तीचित्रण दिसते. उदा. पु. ल. देशपांडे यांचा पेस्तन काका, वसंत सरवटे यांच्या सहप्रवासी या पुस्तकातील सोहराब जमशेदजी बालपोडीवाला वगैरे. खरे तर सरवटे यांनी अजून एक प्रसिद् पारसी व्यक्ती केकी मूस या विलक्षण छायाचित्रकारवर देखील लेख त्यात लिहिला आहे. पेस्तोनजी हा सिनेमा पारसी समाजाचे, त्यांच्या संस्कृतीचे, स्वभाव-वैशिष्ट्यांचे कथारूप चित्रण करतो. चित्रपटाच्या प्रसारणा दरम्यान अधूनमधून विजयाबाईं त्याबद्दल बोलत होत्या. त्यात त्या एकदा म्हणतात की त्यांना National Film Development Corporation(NFDC) चे संचालक काकांजीया यांनी दिलेल्या लघुकथेवर चित्रपट बेतला आहे. मला थोडे आश्चर्य वाटले. पु. ल. देशपांडे यांनी पारसी  व्यक्तीचित्रण करून ठेवले आहे, आणि ते नुसते विनोदी ढंगाने नाही. विजयाबाईंना त्यांच्या साहित्याची नक्कीच माहिती असणार आहे. त्यावरून चित्रपट करावा असे का नाही सुचले.

ते असो. पण चित्रपट अतिशय सुंदर आहे. नसिरुद्दीन शहाने साकारालेली फिरोजची भूमिका, बोलणे, लकबी अतिशय छान. डोळे वारंवार मिचकावणे, एका विशिष्ट पद्धतीने बाक काढून चालणे वगैरे अतिशय छान.

त्याच्याबरोबर शबाना आझमी, अनुपान खेर  यांच्या देखील भूमिका आहेत. त्यांनी देखील सुंदर वठवलेल्या आहेत त्यांच्या भूमिका. एक वेळ असे वाटून गेले की अनुपमच्या एवजी देवेन वर्मा जर, पेसीच्या असता तर आणखी धमाल आली असती. बाकी सर्व कलाकार म्हणे पारसी व्यक्तीच आहेत. चित्रीकरण स्थळे देखील अगदी त्यावेळच्या पारसी घरात असल्यामुळे पाहायला छान वाटते. NFDCचा सिनेमा असूनदेखील, documentation सिनेमा झाला नाही. चंदू पारखी ह्या गुणी नटाची देखील मुंबईतील घरगड्याची छानशी भूमिका त्यात आहे. पारसी व्यक्तीचा पेहराव, बोलणे-चालणे, इतर रिती-रिवाज, स्वभाव-वैशिष्ट्ये, गुजराती, मराठी ढंगाचे बोलणे, हे सर्व पाहताना मजा येते. हा सिनेमा खरे तर दोन मित्रांची(पेसी आणि फिरोज) कथा आहे, दोघेही अतिशय विरुद्ध स्वभावाचे. पण त्याही पेक्षा १९५०च्या दशकातील मुंबईतील पारसी समाजाची वैशिष्ट्ये सांगणार, त्या काळात घेवून जाणारा हा सिनेमा आहे.

पारसी समजाने दिलेले योगदान सुप्रसिद्ध आहे. व्यवसाय असो, नाट्यक्षेत्र असो, लष्कर असो, राजकारण, सामाजिक कार्य असो. तसेच हा समाज फक्त मुंबईच नाही. दिव-दमण भागात ते आहेत, महाबळेश्वर, पाचगणी भागात आहेत. पुण्यातही आहेत. मला तर साताऱ्याजवळ असलेल्या पांडवगड या किल्ल्यावर एक पारसी राहत असलेला दिसला. सह्याद्रीमधील एका सुळक्याचे नावच खडा पारशी असे आहे. इंडोलॉजीचा अभ्यास करताना समजले की वेद आणि पारसी समाजाचे घर्मग्रंथ अवेस्ता यात संबंध आहे. तेव्हापासून तर आणखीनच उत्सुकता वाटत राहिली आहे. ह्या समाजाची घटती लोकसंख्या, जी एक मोठी चिंतेची, त्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने, बाब आहे.