पर्व: युद्धाचे तत्वज्ञान (Philosophy of War)

पर्व हे कन्नड मधील सुप्रसिद्ध लेखक भैरप्पा यांच्या महाभारतावर आधारित भल्या थोरल्या कादंबरीचे छोटेसे शीर्षक. या कादंबरीबद्दल वाचले ते त्यांच्याच आवरण या कादंबरीच्या प्रस्तावनेत. मी आवरण बद्दल लिहिले आहेच, तसेच त्यांच्या मंद्र कादंबरी आधारित नाटकावर देखील लिहिले आहे. आज पर्व बद्दल लिहायचे आहे. महाभारतावरील पर्व वाचताना आणि त्यावर लिहितांना भैरप्पा यांची रामायण ह्या अजून एका महाकाव्यावर उत्तरकांड नावाची कादंबरी देखील नुकतीच आली आहे हे समजले, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.

उमा कुलकर्णी यांनी १९९० मध्ये केलेला ह्या कादंबरीचा मराठी अनुवाद मी वाचला. चाळीस वर्षांपूर्वीची मूळ कादंबरी, जवळ जवळ तीस वर्षांपूर्वीचा अनुवाद, आणि आज २०१८ मध्ये त्याबद्दल मी लिहीतोय. ७००-७५० पानांची ही कादंबरीचे एका वाक्यात मी युद्धाचे तत्वज्ञान (Philosophy of War) सांगणारी कादंबरी असे मी करेन. युद्ध ह्या संकल्पनेचा सांगोपांग विचार करणारी, त्याचे तत्वज्ञान सांगणारी पुस्तके मराठीत मी तरी काही पाहिली नाहीत. त्याच बरोबर महाभारतकालीन समाज (जो आर्य, आणि आर्येतर यांनी मिळून बनला होता), त्यावेळचे लोक, वंश, चालीरीती, संस्कृतीची वैशिष्ट्ये तपशीलवार येतात. त्यादृष्टीने पर्व कादंबरी भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू या खूप नंतर आलेल्या कादंबरीशी थोडीफार करता येयील. या दोन वैशिष्ट्यांमुळे ही कादंबरी महाभारतावरील अजून एक अशी साहित्यकृती बनून राहत नाही.

भैरप्पा

भैरप्पा यांचे रेखाचित्र, सौजन्य इंटरनेट

तत्वज्ञान, त्यातही भारतीय दर्शने, भारतीय तत्वज्ञान हा हा भैरप्पा यांचा विषयच, त्याच बरोबर इतिहास, आणि हिमालय हे ही त्यांचे आवडीचे विषय. या सर्वांचा सुरेख मेळ या कादंबरीत झाला आहे. ह्या कादंबरीला त्यांची प्रस्तावना आहे, त्यात ह्या कादंबरीसाठी केलेली पूर्वतयारी, माहितीचे विविध श्रोत धुंडाळत केलेल्या नोंदी या बद्दल ते लिहितात. त्या निमित्ताने हिमालय, आणि इतरही भाग जसे कुरुक्षेत्र, राजगीर इत्यादी ते फिरून आले, ह्या विषयावर सखोल संशोधन केलेल्या अनेक व्यक्तींना ते भेटले. महाभारताचा सर्वमान्य काल इसवी सन पूर्व बारावे शतक असा पकडून त्यादृष्टीने मांडणी केली आहे. विश्वास पाटील यांच्या पानिपत कादंबरीसाठी ते असेच पानिपत आणि आजूबाजूचा परिसर हिंडले होते, त्याची आठवण झाली. ही कादंबरी वाचताना भैरप्पा आपल्याला त्या काळात आणि त्या भौगोलिक परिसरात आपसूकच नेतात, सगळे तपशील, वर्णने दृश्यात्मक कादंबरीचा भास निर्माण करतात. त्यांनी पुस्तकात सुरुवातीला महाभारतकालीन भौगोलिक स्थिती दर्शवणारा एक नकाशाच दिला आहे.

वर म्हटल्याप्रमाणे महाभारत म्हणजे कौरव पांडव युद्ध, जी मोठी घटना आहे, आणि कादंबरीचा देखील एकेप्रकारे केंद्रबिंदूच आहे. एकूणच युद्ध संकल्पनेचा सांगोपांग विचार केला आहे. युद्ध म्हणजे काय, ते कशामुळे होते, मानव आणि युद्ध यांचा परस्पर संबंध काय, नैतिक दृष्ट्या युद्धाचे समर्थन करता येईल का (युद्धाचे नीतिशास्त्र) अशा आणि अनेक प्रश्नांचा उहापोह ह्या निमित्ताने तात्विक विवेचानाद्वारे त्यांनी केला आहे. आणि हेच माझ्या दृष्टीने कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. जवळजवळ निम्मी कादंबरी ही ह्या विषयाशी निगडीत आहे. युद्धाच्या आधीची परिस्थिती, मानसिकता, प्रत्यक्ष युद्धाच्या वेळची, सुप्रसिद्ध असे संजय उवाच मध्ये केलेले प्रत्यक्ष वर्णन, आणि सर्वात महत्वाचे युद्ध संपल्यानंतरची विदारक, विषण्ण करणारी परिस्थिती यांचे विवेचन त्यांनी केले आहे. आता ही कादंबरी आहे, संशोधनपर ग्रंथ नव्हे. त्यांमुळे विविध पात्रे, त्यांची मनःस्थिती, भाव भावना, विचार, संवाद रुपाने, तसेच स्वसंवाद रुपाने आपल्यासमोर उलगडते. पात्रे तरी किती, छोटी, मोठी, विविध वंशाची, जातींची, त्यांच्या प्रेरणा, मूल्ये, यांचे चित्रण भैरप्पा करतात. महाभारतकालीन स्त्रीचे प्रमुख कार्य सुप्रजनन, त्यमुळे लैंगिक संबंधांची त्यावेळची स्थिती, विवाह संस्थेचे पैलू, नियोग सारखी प्रथांची चाचपणी ते करतात. या कादंबरीच्या आधीही आणि नंतरही श्रेष्ठ असे संशोधन ग्रंथ या विषयावर तयार झाले आहेत. जसे भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांचा उपसंहार हा ग्रंथ, जो महाभारताच्या मराठी भाषांतराच्या दशखंडी प्रकल्पाचा शेवटला आणि दहावा खंड आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे (BORI) प्रकाशित करण्यात आलेल्या The Critical Edition of Mahabharata  मध्ये देखील असे संशोधन आणखी विस्ताराने दिसते असे मी वाचले आहे.

हे पुस्तक वाचायला घेतली असता एके दिवशी मला हिंदीतील वयं रक्षाम: ही रामायण ह्या महाकाव्यावरची आचार्य चतुरसेन यांची कादंबरी मला अचानक रस्त्यावरील पुस्तकाच्या ढिगाऱ्यात सापडली. ही तर पर्व पेक्षाही आधीची कादंबरी आणि रामायणाचा कालखंड हा देखील महाभारताच्याही आधीचा. त्याबद्दल नंतर सविस्तर, पण एकच मुद्दा. भैरप्पा यांनी महाभारतकालीन समाज, संस्कृती यांचे सूक्ष्म बारकावे कादंबरीत टिपले आहेत, तसेच आचार्य चतुरसेन यांनी देखील रामायणकालीन समाज, संस्कृती यांचे तपशील विस्ताराने मांडले आहेत. महाभारत हे संस्कृत महाकाव्य १८ भागात आहे, ज्याला पर्व असेही म्हणतात. त्यावरून भैरप्पा यांनी कादंबरीचे शीर्षक निवडलेले दिसते.

तांड्याबरोबरचे भैराप्पांचे तत्वचिंतन

अतिशय लोकप्रिय असलेले प्रसिद्ध कन्नड लेखक भैरप्पांच्या आवरण कादंबरीनंतर त्यात उल्लेख केलेल्या सार्थ या कादंबरीबद्दल उत्सुकता मी खूप वेळ दाबून ठेवू शकलो नाही. लवकरच मी वाचनालयातून ती कादंबरी हस्तगत केली. अर्थात आवरण प्रमाणे सार्थ ही कादंबरी कन्नड मधून मराठी मध्ये आणली आहे ती उमा कुलकर्णी यांनी. माझ्या पुस्तक परिचयात्मक ब्लॉग मध्ये नमूद केल्याप्रमाणे आवरण ही कादंबरी मध्ययुगीन काळावर अतिशय संशोधन पूर्ण केले भाष्य आहे. तर सार्थ मध्ये भैराप्पांनी सातव्या आठव्या शतकातील एका वैदिक पंडिताच्या जीवन प्रवासाचा वेध घेतला आहे. सार्थ(१९९८) ही कादंबरी आवरणच्या (२००७) बरीच आधीची आहे. प्राचीन भारतातील सातवे आठवे शतक म्हणजे विविध दर्शने, तत्वज्ञान, शैव, वैष्णव, जैन, बौद्ध धर्म यांच्या एकत्र संमिश्र प्रगतीचा काळ. मी काही वर्षांपूर्वी भरतविद्या(Indology) मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम केला होता, त्यात प्राचीन भारताच्या इतिहासाच्या विविध अंगांची ओळख झाली होती. त्यात धर्म, तत्वज्ञान इत्यादी विषयांचा उहापोह झाला होता. पुढे माझ्या वैयक्तिक रुची मुळे न्याय, वैशेषिकादी षड्दर्शने ह्या आस्तिक दर्शनांचा, तसेच जैन, बौद्ध ह्या नास्तिक दर्शनांचे तत्वज्ञान यांचा मी स्वतंत्र अभ्यास केला होता. त्या निमित्ताने इतर शक्ती, शैव, वैष्णव, तांत्रिक, वामाचारी इत्यादी पंथ, यांची देखील ओळख झाली. हा सराव अभ्यास, त्याचा काळ अतिशय रोचक आहे. भैराप्पांची ही कादंबरी या सर्वाचा वेध घेते.

स्वतः भैरप्पा इतिहास, तत्वज्ञान शिकले आहेत. त्यांच्या कादंबऱ्या, प्रामुख्याने इतिहासाशी निगडीत, ह्या विविध संशोधन, अभ्यास, अनेक संदर्भ इत्यादी साधन सामग्री वापरून कथानक गुंफलेल्या असतात. आवरण ह्या कादंबरीत तर त्यांनी संदर्भांची लांबलचक यादीच दिली आहे. सार्थ मध्ये तसे नाही, पण त्या काळाचे सर्जनशील चित्रण नक्कीच आहे. सर्वात आधी सार्थ या शब्दाविषयी. इंग्रजीत ह्याला caravan हा शब्द. सार्थ ह्या शब्दाचा अर्थ सर्वसाधारणपणे आपल्याला जो माहीत असतो तो अर्थपूर्ण, उपयोगी असा आहे. पण सार्थ हा संस्कृत शब्द म्हणजे व्यापारी लोकांचा तांडा, सौदागारांची टोळी असाही आहे हे माहिती नव्हते. पूर्वी कधी सार्थवाह शब्द, कुठल्यातरी संस्कृत नाटकात ऐकल्याचे आठवते आहे, त्याचा अर्थ अश्या टोळीचा प्रमुख असा आहे. कादंबरीचा नायक नागभट्ट हा वेदाभ्यास केलेला पंडित अश्याच एका सार्थाबरोबर(जो गांधार देशापर्यंत जाणार होता) भारतवर्षात प्रवासाला निघतो. त्याचा हा प्रवास, जो तात्विक अनुभूतींचा देखील होतो, त्याचा  ही कादंबरी विस्तृत पट मांडते. या निमित्ताने भारतखंडातील विविध जनसमूह, नाना जनपदे, महाजनपदे, छोटी छोटी राज्ये, त्याकाळच्या गावांच्या, शहरांची नावे वाचून मला परत प्राचीन भारताच्या इतिहासावरील एखादे पुस्तक वाचतोय की काय असे वाटू लागले होते. नागभट्ट हा माहिष्मतीच्या मंडणमिश्र यांच्या पाठशालेत शिक्षण घेतले असे समजते. मंडणमिश्र म्हणजे आदी शंकराचार्य यांनी ज्यांना तात्विक वादविवादात, शास्त्रार्थात हरवले ते आचार्य. मंडणमिश्र हे खरे तर पूर्व मीमांसा दर्शनाचे पंडित. माहिष्मती म्हणजे आजच्या मध्यप्रदेश मधील महेश्वर हे महाभारतकालीन नगर. अर्थात या नगरीचा उल्लेख इतक्यात आलेल्या बाहुबली या चित्रपटात देखील आहे!

पहिल्याच प्रकरणात सार्थ ही संकल्पना, त्याचा उगम, त्याची रचना, त्यावर झालेला बौद्ध धर्माचा परिणाम, सार्थचे रक्षण करण्यासाठी बोधीसात्वाची, मणीभद्र या यक्षाची नेमणूक वगैरेचे विवेचन, याचा देखील ते तपशीलात जाऊन प्रसंगानुसार भैरप्पा उलगडत जातात. तसेच त्याकाळी बौद्ध धर्माची भारतवर्षावर पडलेली छाप, त्याचे वर्चस्व, धर्मप्रसाराची चाललेली धडपड यांचे विविध प्रसंगातून, दाखल्यातून ते देतात. नागभट्ट सार्थाबरोबर मथुरेत येतो, आणि काशीकडे जाणाऱ्या दुसऱ्या एका सार्थाची वाट पाहत तेथेच मुक्काम करतो. त्याकाळात नाटकात काम करणाऱ्या चंद्रिका या स्त्रीची ओळख होते, पुढे आसक्ती निर्माण होते. तसेच पुढे योग, हठयोग तत्वज्ञान अचारणाऱ्या संन्याशी लोकांशी परिचय होऊन योग, ध्यान इत्यादी गोष्टीत नागभट्ट आपला काळ व्यतीत करू लागतो. अष्टांग योगाच्या पायरींचे, प्रगतीचे वर्णन नागभट्ट त्यात कशी प्रगती करतो या निमित्ताने भैरप्पा विषद करतात.

पाचव्या प्रकरणात नायकाचा वामाचारी, तांत्रिक साधना मार्गाशी परिचय होतो. ही पद्धती योग पद्धतीपेक्षा अतिशय वेगळी, आणि विरुद्ध. योगात निवृत्ती, वासनांवर विजय मिळवणे हे ध्येय, तर तांत्रिक साधनेत त्याचा उपभोग घेऊन, शक्ती प्राप्त करून घेणे हेच ध्येय. याही साधनेचे भैरप्पा अतिशय विस्तृतपणे तपशील देतात. त्यातील योनीपूजेसारख्या विधींची माहिती देतात. अर्थात अशी अघोर पंथाची माहिती या विषयावरील इतर पुस्तकातून देखील आहे, पण कादंबरीच्या कथानकात त्यांनी ही गुंफली आहे. पण मनाला ग्रासणार शून्यभाव काही कमी होत नाही. नागभट्ट या तंत्रसाधनेतून देखील बाहेर पडतो, ते का व कसे हे कादंबरीत वाचले पाहिजे. मग पुढे तो काशी येथे न जाता मथुरेतील बौद्ध भिक्षूंच्या सल्ल्यानुसार, बौद्ध धर्माचा, श्रमण मार्गाचा अवलंब न करता, नालंदा येथे पुढील विद्याभ्यासासाठी निघून येतो. नालंदा वर बौद्धधर्मियांचा ताबा, वर्चस्व असल्यामुळे, भैरप्पा असे लिहितात की इतर विषयांचे जरी तेथे अध्ययन होत असले तरी, शेवटी त्याचा उपयोग बौद्ध धर्माच्या श्रेष्ठत्वासाठी त्या ज्ञानाचा वापर करत असत. तेथील वातावरण बौद्धधर्मातील महायानपंथाशी संलग्न होते. तेथील वातावरण एखादा कॅमेरा नालंदात फिरवून आणल्यासारखा भैरप्पा आपल्यापुढे उभे करतात.

पुढे नालंदात नागभट्टने पाहिलेली तंत्रमार्गातील योनीपुजेशी साधर्म्य असणारी बौद्धधर्मातील (वज्रायन पंथात, त्यात तांत्रिक मार्गाचा शिरकाव त्यावेळी झाला), युगनग्ध साधनेबद्दल येते. पौर्णिमेच्या चांदण्या रात्री झालेल्या त्या विधीचे तपशीलवार वर्णन भैरप्पा यांनी दिले आहेत. हे सगळे वैभाषिक, सौतान्त्रिक योगाचार माध्यमिक यांसारख्या बौद्ध धर्माच्या शाखा हे सर्व पाहून, मूळ बौद्ध तत्वांची ही तोडफोड पाहून, नागभट्ट निराश होतो. जिथे बुद्धाला ज्ञानोदय झाला त्या बोधगया या ठिकाणी नालंदा सोडून त्याने जाण्यासाठी त्याने प्रस्थ ठेवले. तो तेथे जातोही, आणि बुद्धाच्या मूळ विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडतो. आणि परत तो नालंदा येथे परततो. तेथे त्याला कुमारील भट्ट भेटतात. तरुण असे शंकराचार्य देखील तेथे येतात, पण दोघांचा शास्त्रार्थ काही होत नाही. हा सारा प्रसंग छान रंगवला आहे. पुढे कुमारील भट्ट हे आत्महत्या करतात असाही एक प्रसंग आला आहे.

पुढे नागभट्ट माहिष्मतीला आपल्या गुरुकडे म्हणजे मंडणमिश्र यांच्याकडे जातो. तेथे शंकराचार्य येतात, आणि मंडणमिश्र यांच्याशी शास्त्रार्थ वादविवाद होऊन त्यात शंकराचार्य विजयी होतात, आणि अद्वैत वेदान्त तत्वज्ञान आणखीनच समाजमान्य पावते. त्या सगळ्या प्रसंगाचे भैरप्पा यांनी छान रंगवला आहे. त्यानंतर नागभट्ट वायव्येकडे मूलस्थान(आजचे पाकिस्तानातील मुलतान) येथे सार्थाबरोबर जातो. तेथे अरब आक्रमणाचा संदर्भ येतो, त्यांच्याबरोबर धर्म संकल्पनेवर त्याची चर्चा होते असे दाखवले आहे. मुलतान मधील सूर्य मंदिराच्या विध्वंसाचा उल्लेख देखील येतो. नागभट्ट अरबांच्या हाती सापडतो. तेव्हा त्यांच्यात आणि नागभट्ट यांच्या दरम्यान थोडीफार शाब्दिक चकमक धर्म विषयावरील रंगवली आहे.

कादंबरीच्या शेवटी काय होते, त्या चंद्रिकेचे आणि त्याचे काय होते हे सर्व समजण्यासाठी कादंबरी वाचायला हवी. पण एक मात्र नक्की भैराप्पानी विविध पंथ, तत्वज्ञान, यांनी युक्त आशा भारताचे चित्र छान रेखाटले आहे. पण कुठे खूपशी अशी तात्विक चर्चा त्यांनी केली नाही. कादंबरीसाठी ते थोडे सोयीचे होते, पण नागभट्ट कसा काय जीवनात वेगवेगळे अनुभव घेऊन पुढे जातो, पण त्याच्या मानसिक, बौद्धिक, तात्विक धरसोडीचे जास्ती वर्णन, आणी त्यामुळे शेवटी कशामध्ये तरी परिणीती होण्यापेक्षा झाले आहे असे मला वाटते.

 

 

‘आवरण’ के पीछे क्या है?

प्रसिद्ध कन्नड लेखक भैरप्पा यांच्या एका कादंबरीचे नाव आवरण आहे. हे पुस्तक मी नुकतेच वाचले. तसे पाहिले तर त्यांची ही मी वाचलेली पहिलीच कादंबरी. पण त्यांच्या काही कलाकृतींचा मी इतर माध्यमातून आस्वाद घेतला आहे. काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या वंशवृक्ष कादंबरीवर आधारित आधी नभोनाट्य, आणि नंतर अभिवाचन देखील आकाशवाणी वरच ऐकले होते. नायी नेरळू(मराठी अर्थ-कुत्र्याची सावली) ह्या कादंबरीवर आधारित गिरीश कासारवल्ली दिग्दर्शित एक कन्नड सिनेमा मी पाहिला होता. मंद्र या संगीत क्षेत्राशी निगडीत कादंबरीवर आधारित कन्नड नाटकाचा आस्वाद घेतला आहे, त्यावर पूर्वी मी लिहिले आहे(‘मंद्र’चा कन्नड नाट्यानुभव). त्यांची आणखीन एक कादंबरी गृह्भंग याची माझ्याकडे, कन्नड आवृतीची, जुनी प्रत आहे, पण ती अजून मी वाचलेली नाही. भैरप्पा यांचे नाव कर्नाटकात जसे प्रसिद्ध आहे तसे ते महाराष्ट्रात गेली काही वर्षे  गाजते आहे. त्यांच्याबद्दल, त्यांच्या कादंबऱ्यांबद्दल नेहमी काही ना काही लिहून येत असते.

भैराप्पांचे लेखन हे नक्कीच गंभीर, आशयपूर्ण, अभ्यासपूर्ण असेच असते. त्यांचा स्वतःचा भारतीय तत्वज्ञानाचा (ज्याला दर्शन शास्त्र असेही म्हणतात) अभ्यास आहे, त्यांनी ते शिकवले देखील आहे. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांत भारतीय इतिहास, तत्वज्ञान, जाती व्यवस्था यावर प्रश्न असतात, उहापोह असतो. प्रस्तुत कादंबरी आवरण देखील अशीच भारतातील हिंदू मुस्लीम संबंधाच्या इतिहासाशी निगडीत आहे. त्यांची पर्व ही कादंबरी महाभारतावर, तर सार्थ ही कादंबरी भारतातील सातव्या आठव्या शतकातील वातावरणात घडते. त्या दोन्ही लवकरात लवकर वाचण्याचा मी संकल्प केला आहे. मी कुठलेही पुस्तक मी वाचायला घेतले की पहिले काही पाने ज्यात प्रस्तावना वगैरे असते, आणि शेवटची काही पाने ज्यात उपसंहार, संदर्भ वगैरे असतात, मी चाळतो. आवरण पुस्तक हाती पडल्यावर तेच केले आणि चकित झालो. कादंबरीच्या शेवटी त्यांनी संदर्भ म्हणून दिलेली इतिहासा विषयाशी निगडीत पुस्तकंची यादी धडकावणारी आहे. प्रस्तावनेत देखील आवरण संकल्पनेचे विवरण आहे, तसेच सार्थ या कादंबरीचा उल्लेख करून आवरण ही कादंबरी कशी सार्थ मध्ये आलेल्या काळानंतरच्या पुढच्या काळातील राजकीय, धार्मिक परिस्थिती आहे हे नमूद करतात.

कर्नाटकतील प्रसिद्ध अश्या हंपी येथे, जेथे विजयनगर साम्राज्याचे अवशेष विखुरले आहेत, तेथे कादंबरीची सुरुवात होते. नायिका माहितीपट निर्माण करण्यासाठी, त्याची सामग्री जमा करण्यासाठी तेथे आली आहे. हंपी मधील मंदिरांचे, मूर्तींचे भग्न अवशेष पाहून तिच्या मनात हे सर्व का झाले, कोणी केले असे स्वाभाविक प्रश्न निर्माण होतात. मग ती  या इतिहासाचा, त्यातही भारतातील इस्लामी राजवटीचा, हिंदू मुस्लीम संबंधाचा धांडोळा घेते, अशी ही कादंबरीची थोडक्यात रूपरेखा. खरेतर मला भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू-एक समृद्ध अडगळ ह्या कादंबरीची आठवण झाली. तिची रूपरेखा थोडीफार अशीच. खंडेराव नामक पुरातत्त्वशास्त्रज्ञ आर्यकाळापासूनचा भारतवर्षाचा इतिहासाचा उहापोह करतो. आवरण मध्ये अजून एक समांतर रेघा आंतरधर्मीय विवाह, धर्मांतर अशी सुद्धा आहे. नायिका मुळची हिंदू, पण प्रेमविवाह होऊन मुस्लीम धर्म स्वीकारते. पण नंतरच्या निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तिची होणारी कुचंबणा, घालमेल, घरचा विरोध या सर्वांचा सामना करताना निर्माण होणारे प्रश्न चर्चिले आहेत. मध्यंतरी मी वि ग कानेटकरांची होरपळ कादंबरी वाचली होती, त्यात त्यांनी ख्रिस्ती मिशनरी, मराठी माणसाचे ख्रिस्ती धर्मांतर, दोन्ही धर्माच्या तत्वज्ञानाची चर्चा, धर्मांतरामुळे त्यामुळे झालेली होरपळ हे सर्व विषय मांडले होते.

कादंबरीत एक अतिशय वेगळ्या विषयावरील रोचक प्रकरण आहे. ते म्हणजे हिंदुस्थानात राजे, बादशाह यांच्या पदरी असलेले जनानखाने. जनानखान्यांची देखरेख करण्यासाठी नपुंसक हिजडे बाळगले जात. यासाठी पुरुषांना नपुंसक कसे बनवले जात असे ह्याची सद्यांत माहिती आहे.  खरे तर ह्या प्रकरणाचा कादंबरीच्या विषयवस्तूशी तसा काहीच संबंध नाहीये. उगीचच घुसडल्यासारखे वाटते. पण माहिती अतिशय रोचक आहे हे मात्र खरे. माझ्याकडे Sex life in Indian Harems by R N Saletor असे पुस्तक आहे, ज्यात जनानखान्यांची(harems) माहिती, त्यातील स्त्रियांचे जीवन याबद्दल दिले आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन सविस्तर परत.

आवरण कादंबरीत दाखवलेला काळ हा बाबरी मस्जिद पडल्याच्या घटनेच्या आसपासचा आहे. त्यानिमित्ताने, जवळ जवळ एक तपाहून कालावधी लोटल्यानंतर,  ह्या कादंबरीत भैरप्पांनी इस्लामी राजवटीबाबत, हिंदू मुस्लीम संबंधाबद्दल एक भूमिका घेतली आहे, अर्थात ती त्यांच्या पात्रांच्या मार्फत. सत्यावरील आवरण हटवले आहे, असा दावा आहे. समर्थनार्थ, अनेक पुरावे, दाखले दिले आहेत. ह्या कादंबरीने प्रचंड वाद निर्माण केला होता. इतिहासात या विषयी नक्की काय झाले, कोणी काय केले, का केले, खरे काय नी खोटे काय हे कदाचित नक्की सांगू शकणार नाही. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, आपण पुरोगामी की प्रतिगामी हे सिद्ध करण्याचा हा काळ. प्रसिद्ध लेखक गिरीश कर्नाड, यु. आर. अनंतमूर्ती यांनी जाहीर टीका केली होती.

असो, त्यात आपण नको शिरायला. पण कादंबरी रचनेशी निगडीत काही गोष्टी मात्र पटत नाहीत. नायिकेचा पिता तिने आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे, तिच्यावर बहिष्कार टाकल्यावर, इस्लामी राजवटीचा, हिंदू मुस्लीम संबंध या विषयाशी निगडीत सखोल वाचन करतो, पुस्तके जमा करतो वगैरे. पुढे, नायिका देखील याच विषयावर माहितीपट तयार करायचा म्हणून जेव्हा संशोधन करण्यास सुरुवात करते, त्याच सुमारास तिच्या पित्याचे निधन होते, आणि तीला आपल्या पित्याने या विषयावर करून ठेवलेल्या  कामाची जाणीव होते. आणि ती तेच संदर्भ वापरून ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न करते. हा सारा उपद्व्याप लेखक आपले संशोधन, त्यातून बनलेले मत मांडण्यासाठी ओढून ताणून केल्या सारखे वाटू लागते. कादंबरी हातात घेतल्यावर, पहिले आणि शेवटची पाने पाहिल्यावर, सुरुवातीला वाटलेले कौतुक, आश्चर्य हळू हळू कमी होऊ लागले, असे माझे तरी कादंबरी वाचताना नक्कीच झाले.

शेवटी कादंबरीच्या आवरण या शिर्षकानिमित्त दोन गोष्टी. पाहिली गोष्ट अशी. कादंबरीत ते नायिकेच्या लघुपटाच्या अभिप्रयानिमित्त कोणाच्यातरी भैराप्पानी एक वाक्य टाकले आहे, ते असे आहे, ‘इतर कितीतरी बुद्धिवान कलाकार करतात त्याप्रमाणे तुझा लघुपट Suppressio Veri Suggestio Falsi असा झाला आहे- सत्य दडवून असत्य मांडणारी सामान्य कलाकृती झाली आहे’ मी सहज या दोन शब्दांचा अर्थ काय आहे याचा इंटरनेटवर शोध घेतला तर असे दिसले की हे दोन्ही शब्द कायद्याच्या भाषेतील आहेत. त्यांचा अर्थ सत्य दडवून ठेवणे, सत्याचा आभास निर्माण करणे वगैरे. दुसरी गोष्ट अशी की, प्रस्तावनेत भैरप्पा म्हणतात, ‘विस्मरणाने सत्य झाकाळून टाकणाऱ्या मायेला आवरण म्हणतात, असत्य बिम्बावणाऱ्या कार्याला विक्षेप म्हणतात. वैयक्तिक पातळीवर चालणाऱ्या क्रियेला अविद्या असे म्हणतात, आणि सार्वजनिक पातळीवर माया म्हणतात…..सत्य आणि असत्याची समस्या तत्वाच्या पातळीवर नेऊन तिचे दर्शन घडवणे हे भारतीय दर्शन शास्त्राचे वैशिष्ट्य.’ त्यांनी हे खूप छान सांगितले आहे, माझा भारतीय तत्वज्ञानाचा थोडाफार अभ्यास आहे, त्यात न्यायशास्त्र आणि नव्यन्याय (Indian Logic) नावाची दर्शनशास्त्राची एक शाखा आहे, तिचा वापर सत्य-असत्य निर्णय, तात्विक वाद यामध्ये पंडित लोकं करीत असा इतिहास आहे.

एक मात्र नक्की, या कादंबरीच्या निमित्ताने भैराप्पाने केलेले वाचन, संशोधन, अपार कष्ट नक्कीच दिसतात, त्यात वादच नाही. उमा कुलकर्णी यांनी केलेला मूळ कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद अगदी सुरेख झाला आहे, कुठेही यत्किंचीतही रसभंग होत नाही.

‘मंद्र’चा कन्नड नाट्यानुभव

प्रसिद्ध कन्नड लेखक डॉ. भैरप्पा यांच्या पुस्तकांचे भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन संवादु अनुवादु नुकतेच वाचले. त्यांनी अर्थात फक्त भैरप्पा यांचीच पुस्तके मराठी आणली नाहीत, इतर बऱ्याच कन्नड लेखकांची पुस्तके त्यांनी मराठीत केली आहेत. आत्मकथनात त्यांनी भैरप्पा यांच्या कादंबऱ्या अनुवादित करतानाचे अनुभव मांडले आहेत. भैरप्पा यांच्या संगीत विषयाशी निगडीत ‘मंद्र’ या कादंबरीचा उल्लेख आला. मी मूळ कन्नड आणि तसेच मराठी अनुवादही वाचलेला नाही. पण झाले असे की दहा एक वर्षांपूर्वी मी बंगळूरू येथे गेलो असता, माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तेथील प्रसिद्ध अश्या रंग शंकरा या नाट्यगृहात कन्नड नाटक पाहायचे असे ठरवले होते. त्या वेळेस भैरप्पा यांच्या या कादंबरीवर आधारित मंद्र नाटकाचा प्रयोग पहिला होता त्याची आठवण मनात रेंगाळली. रंग शंकराचे बंगळूरू मधील स्थान म्हणजे पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरचे जे स्थान आहे तेच तेथे आहे. तेथील नाट्य चळवळीत ह्या जागेचे महत्वाचे स्थान आहे. त्या कन्नड नाट्यानुभावाबाद्द्ल बद्दल थोडे आज.

Bhyrappa

Kannada author Bhyrappa and Hindustani music singer Gangubai Hangal seen together, circa 1999. Photo courtesy Mayur magazine

मंद्र(ಕನ್ನಡ: ಮಂದ್ರ) नाटक हे एका प्रथितयश गायकाच्या आयुष्याचा चढता उतरता असा आलेख आहे. काळाच्या ओघात मानवी षड्रिपूंनी ग्रासलेल्या गायकाचे चित्रण आहे. तसे पहिले तर ही शोकांतिकाच आहे. मला तरी त्यावेळेस र. वा. दिघे यांच्या ‘गानलुब्धा मृगनयनी’ या कादंबरीची आठवण झाली. मंद्र हे नाटक बेंगळुरूच्या कला गंगोत्री ह्या जुन्या हौशी नाट्य संस्थेने सादर केले होते. या नाटकात अर्थात संगीत, नृत्य हे सर्व विषयाच्या ओघाने आले आहेच, तरीही हे रूढार्थाने संगीत नाटक नाही. पण नाटकाची मूळ कथावस्तू अर्थात मोहनलाल नावाच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायकाच्या जीवनातील आरोहाचे, अवरोहाचे, त्याच्या मनःस्थितीचे दर्शन घडवणारे आहे. त्याच प्रमाणे मोहनलालच्या जीवनात आलेल्या स्त्रियांच्या मनःस्थितीचे दर्शन काही प्रमाणात घडवणारे आहे, जे आणखीन विशेष प्रमाणात आले असते तर नाटकाला आणखीन वेगळा परिमाण लाभला असता.

भैरप्पा यांनी त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला संगीताचे धडे  घेतले होते असे कुठेतरी वाचले होते. त्यामुळे संगीत क्षेत्रातील बारकावे नाटकात आले आहेतच. कलेचे कुठलेही क्षेत्र घ्या, इतिहास आपल्याला अशी बरीच उदाहरणे देता येतील जेथे कलाकाराचे स्वैराचारी जीवन, त्याच्या अधोगतीस कारण ठरते. शेवटी अति तेथे माती होतेच. अर्थात कलाकाराचे कला जीवन, आणि त्याचे वैयक्तिक जीवन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हेही तितकेच खरेच आहे. तर हा प्रथितयश गायक मोहनलाल हा गुरु देखील आहे, संगीत शिक्षणाचे पवित्र कार्य करतो आहे. आपल्या जीवनात विविध काळात विविध स्त्रिया त्याच्या जीवनात शिष्या म्हणून येतात. तो त्यांच्या कडे कसे पाहतो, प्रेम, की वासना, त्या स्त्रिया कशा त्याला आधीन होतात, व्याभिचार असेल, किंवा आणखी काही असेल, काही नकार देतात, मग त्याचा अहंकार कसा दुखावतो, त्याच्या गायन कलेवर कसा परिणाम होतो, वगैरे वगैरे. मोहनलालच्या गायनाच्या सर्जनता विविध स्त्रियांशी असे संबंध असल्यामुळे येते असे या नाटकात(आणि बहुधा मूळ कादंबरीत देखील) मांडले आहे. तसेच गाणे शिकायचे आहे म्हणून कलेसाठी समर्पण करणाऱ्या स्त्रिया दाखवल्या आहेत, हे ही पटत नाही. ह्या स्त्रियांची प्रेम आणि वासना यात गल्लत झाली आहे हे समजत नाही. हे सर्व आजकालच्या स्त्रीमुक्तीच्या काळात, #MeToo च्या काळात हे नक्कीच पटत नाही. पण असे हे पूर्वी होत असे, आणि आजही होत आहे हे नक्की. असे करणारी व्यक्ती कलाकार असल्यामुळे ते चूक, की बरोबर, समर्थनीय, की असमर्थनीय, नैतिक, का अनैतिक वगैरे सर्व गोष्टी आपण कसे त्याकडे पाहतो यावर सर्व अवलंबून आहे. मला तरी त्यावेळेस हे नाटक म्हणून काही खूप ग्रेट असे वाटले नव्हते. मानसिक आंदोलने दाखवणारे संवाद, अभिनय, संगीत, नृत्य वगैरे सर्व गोष्टी ठिक आहेत. नाटकाला नेपथ्य असे देखील काही विशेष नाही.

भारतीय शास्त्रीय संगीतात मंद्र, तार स्वर अशी संकाल्पना आहे, जे स्वर सप्तकातील खालचे, आणि वरचे सूर दर्शवतात. मंद्र स्वर हे खर्जातील, म्हणून शांत, सात्विक भाव निर्माण करतात, या उलट तार स्वर भावना उद्दीपित करणारे असे मानले जातात. नाटकाचे(तसेच कादंबरीचे नाव) मंद्र असे आहे. पण नाटकात मुख्य पात्राच्या विषयसुखाच्या भावनेचा जो तार-अविष्कार आहे, त्यावरून तरी या अडीच तासांच्या नाट्यप्रयोगात मंद्र सूर असा लागला नाही असेच  म्हणावे लागेल. असो. हे कन्नड नाटक मराठी रंगभूमीवर यायला काही हरकत नाही. भैरप्पांच्या मराठी वाचकांना चाहत्यांना नक्कीच नाटकाचा विषय आवडेल, तसेच संगीत रसिकांना देखील भावेल असे वाटते. या पूर्वीही ह्या ब्लॉगवर मी पाहिलेल्या कन्नड नाटकांच्या बद्दल लिहिले आहे, ते येथे जरूर पहा.

 

संवादु अनुवादु

ह्या ब्लॉगचे शीर्षक म्हणजे प्रसिद्ध अनुवादक उमा कुलकर्णी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे शीर्षक आहे. उमा कुलकर्णी ह्या कन्नड मधून मराठी मध्ये अनुवाद करणाऱ्या स्टार अनुवादक आहेत. अर्थात त्या काही पहिल्या आणि शेवटल्या अनुवादक नाहीत. त्यांच्याही आधी आणि नंतरही बऱ्याच जणांनी कन्नड पुस्तके मराठी मध्ये आणली आहेत. पण उमा कुलकर्णी ह्या सातत्याने गेली ३०-३५ वर्षे अनुवादानाचे काम करतायेत, पन्नासहुन अधिक पुस्तके त्यांनी केली आहेत. मी गेल्या वर्षी एका अनुवाद कार्यशाळेत गेलो होतो, तेव्हा तेथे त्या त्यांचे विचार मांडायला आल्या होत्या. काही वर्षांपूर्वी गिरीश कार्नाड यांच्या आत्मचरित्राचे(अटाडता आयुष्य) कन्नड मधून मराठी अनुवाद त्यांनी केला होता. त्या निमित्ताने पुण्यात एक कार्यक्रम झाला होता, ज्याला मी हजार होतो, त्यावेळी कार्नाड यांच्या काही चित्रपटांचे प्रदर्शन देखील झाले होते. तेव्हाही त्यांनी आपले विचार मांडले होते. मीही एक पुस्तक(अमीरबाई कर्नाटकी चरित्र, मूळ कन्नड रहमत तरीकेरी) ३-४ वर्षांपूर्वी कन्नड मधून मराठी मध्ये आणले होते(ग्रंथाली प्रकाशन). कन्नड मराठी भाषेच्या देवाणघेवाण संदर्भात मी काहीबाही खुडबुड करत असतो. मध्यंतरी कुवेंपू भाषा भारती प्राधिकारतर्फे, आनंद झुंझूरवाड यांच्या मुळे, दोन मराठी लेखांचा कन्नड अनुवाद करायला मिळाला, तो त्यांच्या चुंबकद गाळी या पुस्तकात प्रसिद्ध झाला. या सर्व पार्श्वभूमीमुळे, जेव्हा त्यांचे आत्मचरित्र आले, तेव्हा मला खूप उत्सुकता होती ते वाचण्याची आणि जाणून घेण्याची. त्याबद्दल सांगावे म्हणून हा खटाटोप. त्यांची भेट घेण्याचा मात्र योग अजून आला नाही, पाहुयात पुढे मागे!

तर मेहता पब्लिशिंग हाउस तर्फे ‘संवादु अनुवादु-आत्मकथन’ पुस्तक २०१७ दिवाळीच्या सुमारास आले. संत ज्ञानेश्वर यांच्या एका प्रसिद्ध अभंगातील(पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती) हे दोन शब्द. लता मंगेशकर यांनी ते गायले आहे. हे प्रांजळ आत्मकथन अतिशय देखणे, वाचनीय झाले आहे. मुखपृष्ठावर त्यांचे छायाचित्र आहे, पण आत काहीच छायाचित्रे नाहीत. ती असती तर आणखीन मजा आली असती. आत्मचरित्र अगदी मोकळेपणाने मांडले आहे हे नक्की. उमा कुलकर्णी त्यांच्या बेळगाव ठळकवाडी येथील लहानपणाच्या दिवसापासून सुरुवात करतात. प्रकाश संताच्या पुस्तकातील बेळगाव मधील लंपनच्या भावजीवनाचे जे वर्णन आले त्याच्याशी त्या त्यांचे लहानपणाच्या दिवसांचे ते नाते जोडतात. पुढे विरुपाक्ष यांच्या बरोबर विवाह होतो. विरुपाक्ष यांचे कुटुंब म्हणजे कर्मठ कन्नड वैष्णव माध्व संप्रदायी. त्यांना आलेल्या अनुभवांचे आणि जुळवून घेतानाचे कष्ट यांचे त्यांनी वर्णन केले आहे. हे सगळे मला खूप जवळचे वाटले कारण आमच्या कुटुंबात देखील असेच वातावरण आहे. मला अर्थात उत्सुकता होती त्यांनी अनुवाद करायला कशी सुरुवात केली हे जाणून घेण्याची. उमा कुलकर्णी आणि विरुपाक्ष कुलकर्णी यांचा विवाह होऊन ८-९ वर्षे झाली होती. त्याच सुमारास कारंतांच्या ‘मुक्कजीय कानसुगळू’ या कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. विरुपाक्ष यांनी ते पुस्तक वाचायाला म्हणून घरी आणले आणि उमा कुलकर्णी यांनी ते समजावून घेता नकळत मराठीत अनुवादित केले. पण ते पुस्तक बाहेर आले नाही कारण मीना वांगीकर यांना कारंत यांनी आधीच अनुवादाचे हक्क दिले होते. मग दुसरे पुस्तक कन्नड लेखिका त्रिवेणी यांचे ‘बेक्कीन कण्णु’ हे पुस्तक अनुवादित केले, पण अनुवाद हक्काविषयी काही गैरसमजुतीमुळे  तेही बाहेर आले नाही. अखेर शिवराम कारंत यांचे ‘मै मनगळ सुळीयल्ली’ हे पुस्तक त्यांनी अनुवादित केले आणि ते प्रकाशित झाले. अशी त्यांची अनुवाद कारकीर्दीची सुरुवात झाली.

त्यानंतर शिवराम कारंत, भैरप्पा, प्रभाकर पाध्ये, कमल देसाई यांच्याशी कसं त्यांचा या ना त्या कारणाने ऋणानुबंध जुळले, घरोबा झाला यांचे सद्यांत वर्णन वाचनीय आहे. १९८४ च्या सुमारास त्यांची प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांच्याशी ओळख झाली. ती कशी झाली हेही मजेशीर आहे वाचायला. शिवराम कारंत यांचेच ‘बेट्टद जीव’ यांचे भाषांतर करून ते पोस्टात कारंत यांना पोचते करण्यासाठी थांबल्या असता त्यांची आणि सुधा मूर्ती यांची ओळख झाली. अर्थातच पुढे त्याची परिणीती सुधा मूर्ती यांची काही पुस्तके अनुवादित कण्यात झाली. सुधा मूर्ती यांनी भैरप्पा यांची वंशवृक्ष या कादंबरीची ओळख उमा कुलकर्णी यांना करून दिली आणि त्यांनी त्याचा अनुवाद सुरु केला. त्या ओघाने भैरप्पा यांची ओळख झाली, पुण्यात भैरप्पा आले असता त्यांच्याकडे उतरत. उमा कुलकर्णी यांचे पती खडकी येथील भारत सरकारच्या High Explosives Factory येथे तंत्रज्ञ म्हणून काम करत. त्यांची बदली खानदेशात भुसावळ जवळ वरणगाव येथील कारखान्यात झाली. आत्मचरित्रात तेथील वास्तव्याचे, अनुभवांचे वर्णन आहे. तेथे असतानाच त्यांना वंशवृक्षच्या अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर विरुपाक्ष यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करून अनुवादासाठी उरलेले आयुष्य व्यतीत करायचे ठरवले, या उभयतांच्या धाडसी निर्णयाबद्दल देखील अगदी मनमोकळेपणाने लिहिले आहे. विरुपाक्ष यांनी देखील बरीच पुस्तके मराठीतून कन्नड मध्ये आणली आहेत, त्यात प्रामुख्याने आहे ते उमा कुलकर्णी यांच्या अनुवादावरील समीक्षा लेख आहेत, हेतू हा की कन्नड वाचकांना हे सर्व कळावे हा. त्यांनी केलेला सुनिता देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी..’ या पुस्तकाचा कन्नड अनुवाद कर्नाटकात बराच प्रसिद्ध झाला, त्या सर्वाची कहाणी येते.

दरम्यानच्या काळात त्यांनी मराठी कन्नड स्नेहवर्धन ही संस्था स्थापन केली आणि त्यातर्फे विविध कार्यक्रम करत राहिले. कर्नाटकातील त्यांचे साहित्यप्रेमी, व्यावसायिक असलेले मदनूर संगण्णा या व्यक्तीमत्वाची ओळख आपल्याला होते. कन्नड मराठी भाषांतील विविध अंगांनी होणारी देवाण घेवाण या निमित्ताने सुरु राहिली. पुढे उमा कुलकर्णी यांनी पूर्णचंद्र तेजस्वी यांची कार्वलो ही लघुकादंबरी अनुवादित केली. तेजस्वी हे कर्नाटकतील पहिले ज्ञानपीठ विजेते कुवेंपू यांचे पुत्र. त्यात कर्नाटकातील मलनाड या डोंगराळ, जंगली भागात असलेल्या संस्कृतीची झलक मिळते. वेलदोड्याची शेती हा प्रमुख विषय त्यात होता. त्या सर्वांच्या अनुवादाच्या निमित्ताने आलेल्या अडचणी, प्रश्न याबद्दल लिहिले आहे. पूचंते(पूर्ण चंद्र तेजस्वी यांचे कर्नाटकातील प्रसिद्ध नाव) यांच्या मुळे जंगल तज्ञ मारुती चितमपल्ली यांच्याशी त्यांची ओळख झाली. अनिल अवचट आणि त्यांची पत्नी सुनंदा(उर्फ अनिता) अवचट यांच्याशी ओळख झाली, आणि उठबस सुरु झाली. पुढे अनंतमूर्ती यांच्या कथा, कादंबऱ्या यांचे देखील त्यांच्या हातून अनुवाद झाले. गिरीश कार्नाड यांच्या पुस्तकांचे, नाटकांचे अनुवाद देखील त्यांनी केले.

पाचव्या आणि शेवटच्या प्रकरणात त्यांनी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिदरी येथे भरलेल्या Alva’s Vishwa Noodisari Virasat या साहित्य, संस्कृती संमेलनाचे अनुभव कथन केले आहे. त्यांना तेथे मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने त्यात सहभाग होता आले होते. मी खूप वर्षांपूर्वी मूडबिदरी येथे गेलो होतो, ते एक जैन क्षेत्र आहे. त्यांनी केतकरवहिनी या त्यांच्या स्वतंत्र कादंबरीच्या लेखन प्रक्रियेविषयी मांडले आहे. वंशवृक्ष कादंबरीचे आकाशवाणी रुपांतर कसे झाले यांचे अनुभव आहेत. हे रुपांतर मी आकाशवाणी वरून ऐकले आहे, खूप प्रभावी ठरले आहे. पुढे त्यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी देखील अनुवादाचे काम केले, त्यातही त्या कश्या रमल्या, त्याचे अनुभव कथन येते. लेखनाच्या ओघात त्या कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल सांगतात. जसे की त्यांच्याकडील कामवालीबाई लक्ष्मी, वरणगाव येथून स्कूटरवरून पुण्याला येतानाचे अनुभव, त्यांच्या घराशी(शशिप्रभा) निगडीत अनेक आठवणी,  देव आहे की नाही याची चर्चा, जे. कृष्णमूर्ती यांचे तत्वज्ञान, बाबा आमटे यांचे चरित्र कन्नड मध्ये अनुवादित करताना त्यांची आनंदवन भेट इत्यादी वगैरे. चरित्राच्या शेवटी त्यांना मिळाले पुरस्कार, त्यांच्या आणि विरुपाक्ष यांच्या पुस्तकांची यादी इत्यादी दिली असती तर बरे झाले असते. असो. अनुवाद हे एक कारण असेल, पण त्यामुळे त्या अतिशय समृद्ध जीवन जगत आहेत याची प्रचीती येत राहते. त्यांचे कन्नड मराठी या भाषा भगिनींबद्दल असलेले प्रेम, इतिहास(जसे भारतीय मंदिर स्थापत्य कले वरील संशोधन), चित्रकला(हेब्बार यांच्या बद्दल त्यांनी लिहिले आहे, तसेच मी पूर्वी कुठल्याशा दिवाळी अंकात त्यांचाच चंद्रकांत कुसनूर, जे प्रसिद्ध अमूर्त चित्रकार आणि लेखक आहेत, यांच्या वरील लेख वाचल्याचे आठवते), संस्कृती, विरुपाक्ष यांना असलेली भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल असलेली आस्था, जाण, वेगवेगळया क्षेत्रातील व्यक्तींची ओळख यामुळे समृद्ध करणारे आलेले अनुभव त्यामुळे चाकोरीत राहून देखील चाकोरीबाहेरचे जग हे दोघे जगले आहेत हे समजते. त्या दोघांच्या पुढे अजूनही बरेच आयुष्य आहे आणि ते अर्थातच कार्यरत आहेत, जी नक्कीच चांगली गोष्ट आहे.

जाता जाता शेवटचे. त्यांनी आत्मकथनात असे मांडले आहे की तत्व म्हणून अनुवादित पुस्तकांना अर्पणपत्रिका नसावी असे स्वीकारले. त्या नादात त्यांनी आपल्या स्वतंत्र कलाकृती असलेल्या केतकरवाहिनी याला त्या अर्पणपत्रिका देण्यास विसरल्या असे ते नमूद करतात. पण या आत्मचरित्राला अर्पणपत्रिका आहे, आणि ती खूप हृद्य आहे, ती तुम्ही पुस्तकातच वाचायला हवी.