पुस्तकांचे, स्ट्रॉबेरीचे गाव भिलार

गेली दोन महिने मी महाबळेश्वरची आणि आसपासची भटकंती करण्याची योजना आखतोय. काही ना काही कारणाने जमत नव्हते. परवा योग आला. ह्या वर्षी थंडीचा मुक्काम वाढला आहे. सहसा लोकं महाबळेश्वरला उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून जातात. ते तसे बरोबरच आहे. पण थंडीच्या दिवसांत देखील ते मस्त भटकायला आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने महाबळेश्वर जवळील भिलार गाव हे पुस्तकांचे गाव म्हणून विकसित केले.  राज्य मराठी विकास संस्थेचा हा प्रकल्प आहे. हे गाव आधीच सुमधुर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी साठी प्रसिद्ध आहे. त्याची मला उत्सुकता होतीच, पण खरे तर त्या पुस्तकांच्या गावाला भेट द्यायची होती. इंग्लंडमध्ये असेच एक पुस्तकांचे गाव, Hay On Wye , कित्येक वर्षांपासून आहे. ते अर्थातच जुनी, दुर्मिळ पुस्तके खरेदी विक्री ह्या साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे भिलार हे जगातील दुसरे असे पुस्तकांचे गाव, भारतातील पहिले. तसेच ह्या दिवसांत महाबळेश्वर आणि आसपासच्या परिसरात स्ट्रॉबेरी देखील भरपूर चाखायला मिळते.

सकाळी सकाळी मी पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने कुच केले. वाटेत वाई येथे त्रिवेणी साहित्य संगम हा कार्यक्रम सुरु होता, तो थोडासा पाहिला. पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर, सुधीर फडके यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारतर्फे हा कार्यक्रम होता. स्टार निवेदक सुधीर गाडगीळ यांनी प्रसिद्ध नाट्यकलावंत, गायिका फैयाज यांच्याशी साधलेला संवाद मी ऐकला, गदिमांच्या जोगिया ह्या गणिकेच्या जीवनाविषयीच्या गाण्याचे भावपूर्ण सादरीकरण केले ते ऐकले. पुढे पाचगणीत थोडासा रेंगाळून, जेवण करून तेथील प्रसिद्ध table land(पाचगणीचे पठार) वर गेलो. तेथे बरीच लोकं paragliding करत होती, स्थानिकांकडून समजले की परदेशी पर्यटक ह्या साहसी खेळात भाग घेतात. हा ब्लॉग आज लिहिताना बातमी ऐकली की एक कोरियन पर्यटक ह्या खेळात डोंगरावर आदळून मृत्युमुखी पडला. असो. मी दुपारच्या सुमारास आडवा तिडवा पसरलेला पसरणी घाट पार करत भिलारला पोहचलो. महाबळेश्वरच्या अलीकडे १०-१२ किलोमीटर आधी भिलारला एक फाटा फुटतो. आधीपासूनच पुस्तकांच्या गावाचे फलक दिसू लागतात(तसेच रस्त्यांच्या कडेला स्ट्रॉबेरी विकणारे देखील दिसतात). गावात गेल्यावर ठिकठिकाणी कुठली पुस्तके आहेत हे सांगणारे फलक दिसतात. मी भिलार मध्येच श्री नारायण वाडकर यांच्याकडे राहण्यासाठीची व्यवस्था राखून ठेवली होती. त्यांच्याकडे लोकसाहित्य प्रकारातील पुस्तके ठेवली होती.

महाबळेश्वर जवळच असल्यामुळे तेथे जाण्याचा मोह टाळता आला नाही. नाकेखिंड(केट्स) पॉइंट, महाबळेश्वर मंदिर परिसर, वेण्णा तलाव, मॅप्रो गार्डन वगैरे पाहून संध्याकाळी भिलारला परत आलो. वाडकर यांच्याकडे घरचे ताजे जेवण करून, थोडीफार पुस्तके चाळून, डॉ. तारा भवाळकर यांचे ‘लोकसाहित्यच्या अभ्यासाच्या दिशा’ हे पुस्तक रात्री वाचण्याकरता घेतले.

Kates Point, Mahabaleshwar

Kates Point, Mahabaleshwar

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही गावात भटकायला बाहेर पडलो. जिथे नजर जावी तिथे स्ट्रॉबेरीचे मळे दिसत होते, तसेच पुस्तकांची दालनांची फलके दिसत होती. गावातील लोकं स्ट्रॉबेरी तोडण्यास बाहेर पडली होती, शेतावर स्ट्रॉबेरी तोडण्याची लगबग दिसत होती. आम्ही अशाच एका शेतावर गेलो, स्ट्रॉबेरी लागवडीचे दृश्य पाहून हरखून गेलो. मनसोक्त स्ट्रॉबेरी खाल्ली. शेतकऱ्यांशी बातचित करता समजले की आदल्या दिवशी पहाटे पहाटे इतकी थंडी पडली होती, की शेतावर दावबिंदू गोठून बर्फाची चादर पसरल्या सारखे दिसत होते. ते दृश्य दिसायला छान असेल पण त्यामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान होते. स्ट्रॉबेरीच्या मळ्यात मधून मधून लसूणही लावलेला दिसत होता. शेतकऱ्यांनी असेही सांगितले की दरवर्षी गुड फ्रायडेच्या आसपास स्ट्रॉबेरी महोत्सव असतो, तेव्हा स्ट्रॉबेरीच्या शेतात जाऊन मनसोक्त स्ट्रॉबेरीखाता येते.

परत वाडकरांकडे येऊन मस्त नाश्ता केला आणि गावातील इतर ठिकाणी पुस्तके पाहायला बाहेर पडलो. मनसोक्त तीन चार तास भटकत, पुस्तके चाळत, पाहत त्या छानश्या गावातून फिरलो. एकूण तीस एक घरांतून, पंचवीस-तीस हजार पुस्तके आहेत गावात. लोकांचा उत्साह, आणि एकूण पुस्तकांचे गाव असा लौकिक असलेला अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या प्रकल्पाचे कार्यालय देखील गावातच आहे. तेथे देखील गेलो. सरकारचा पुढाकार, आणि गावकऱ्यांचे सहकार्य, आणि सहभाग यामुळे एक छान संकल्पना येथे उभी राहिली आहे. स्ट्रॉबेरीच्या निमित्ताने कृषी पर्यटन, तसेच पुस्तकांच्या निमित्ताने साहित्य आणि वाचन संस्कृती जोपासण्याचे काम हा प्रकल्प करतो आहे. साहित्य क्षेत्राशी निगडीत वर्षभर विविध कार्यक्रम देखील होत असतात. गावकऱ्यांनी देखील आपापल्या घरांवर साहित्याशी निगडीत, पुस्तकांची, व्यक्तींची चित्रे, रेखाटने काढून आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषेची समृद्धी येथे भेट देणाऱ्यांना कळावी, साहित्यात रुची निर्माण व्हावी, पुस्तके सहजपणे हाताळता यावी असा हा प्रकल्प आहे. मला दत्तात्रय गणेश गोडसे यांचे लोकधाटी हे पुस्तक सापडले, जे मी बरेच दिवस शोधत होतो(त्यांची इतरही पुस्तके जसे ‘गतीमानी’ वगैरे सारखी देखील दुर्मिळ आहेत). अजून एक चांगले पुस्तक पाहता आले, ते म्हणजे स्वरलय, जे मूळ तेलगु पुस्तक आहे सामला सदाशिवा यांचे, ते मराठीत साहित्य अकादेमीने आणले आहे. हे संगीत विषयक पुस्तक आहे. आणखीही अनेक पुस्तकं पाहायला मिळाली.

Peter Patrao

Peter Patrao, Panchgani

आम्ही दुपारी भिलार मधून पुण्याकडे यायला निघालो, वाटेत वाई मध्ये जेवावे असा विचार केला. वाटेत पाचगणी नंतर, पसरणी घाटाच्या अलीकडे, एका ग्राफितीने लक्ष वेधून घेतले. मी थांबलो आणि फोटो काढले. ही ग्राफिती Zostel नावाच्या आगळ्या वेगळ्या हॉटेलच्या(मालवाहतुकीसाठी असलेले कंटेनर वापरून केलेले हॉटेल) आवारात भिंतीवर होती. ती होती Peter Patrao ह्या व्यक्ती संबंधी. त्याचे रेखाचित्र, तसेच पाचगणीत स्ट्रॉबेरी लागवडीचा आरंभ करणारे असा उल्लेख होता. घरी येऊन इंटरनेटवर जरा शोधाशोध केली, तर विस्मयकारक माहिती मिळाली. हा जो पीटर होता, पाचगणीतील बोर्डिंग शाळेत रसायनशास्त्र शिकवायचा, आणि नंतर पाचगणीत स्ट्रॉबेरी लागवड सुरु केली. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले हे पीटर बाबा, इंग्लंडमध्ये नंतर प्रसिद्ध गायक झालेल्या, फ्रेडी मर्क्युरी, हा त्यांचाच विद्यार्थी. ह्याच फ्रेडीवर नुकताच आलेला Bohemian Rhapsody हा चित्रपट मी पाहिला.

असो. वाईसारखे ऐतिहासिक, निसर्गरम्य ठिकाण, पाचगणी, महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणे, प्रतापगड, पांडवगड सारखे किल्ले, जावळीचे बेसुमार जंगल, आणि त्यात भिलार सारखे स्ट्रॉबेरीचे, तसेच आता पुस्तकांचे गाव हे देखील पर्यटकांना नवीन आकर्षण ठरेल यात शंका नाही.

माझा वाचनप्रवास, भाग#१

ब्लॉगचे शीर्षक वाचून दचकू नका. मी काही फार मोठा वाचक वगैरे नाही(लेखक तर मुळीच नाही). साहित्याचे माझ्या जीवनात असलेले स्थान याबद्दलही लिहिणार नाहीये. वाचनप्रांतात थोडीफार लुडबुड करतो वेळ मिळेल तसा. आणि वाचलेल्या पुस्तकांबद्दल(तसेच इतर गोष्टींबद्दल) लिहायला आवडते, म्हणून लिहितोही. आज असेच मनात आले की आपण कधीपासून वाचायला लागलो, काय वाचले लहानपणी वगैरे. मग बसलो त्याबद्दलच लिहायला. हे एक प्रकारे स्मरणरंजनच(down the memory lane) म्हणा हवे तर.

मला आठवतय त्याप्रमाणे माझ्या घरी, अथवा आसपास वाचनसंस्कृती अशी काही गोष्ट अस्तित्वातच नव्हती. चाळीतील कनिष्ठ मध्यमवर्गीय जगणे. थोड्याफार अभ्यासाव्यतिरिक्त इतर मुलांबरोबर हूडपणा, व्रात्यपणा यातच वेळ जायचा. घरची परिस्थिती बेतासबात असल्यामुळे वर्तमानपत्र देखील अगदी कधीतरी येत असे. शाळेतही ग्रंथालय वगैरे नव्हते. पण झाले असे, आठवी-नववीत असताना माझा एक हात मोडला, आणि १५-२० दिवस जायबंदी झाला. शाळेला कित्येक दिवस दांडी झाली. तेव्हा मला आठवते त्याप्रमाणे, जवळच एक छोटेखानी वाचनालय होते, ते लावले. आणि सुरु झाला आमचा वाचनप्रवास! ते चिंतामणी वाचनालय आणि तेथील उपाध्ये नावाचे गृहस्थ, अजून डोळ्यांसमोर आहे. या आधी मी ब्लॉगवर वाचनालयांवर एक लेख लिहिला होता.

अधून मधून वडील मुलांसाठी असलेली मासिके घरी आणायचे. जसे चांदोबा, चंपक, आनंद वगैरे वाचल्याचे आठवते. चांदोबा विशेष प्रिय, त्यातील विक्रम आणि वेताळ यांच्या गोष्टींसाठी. काही वर्षांपूर्वी तर मी चांदोबाचा collectors’ edition एक विकत घेतली, या आठवणींकरता. वाचनालयातल्या असलेले अमृत मासिक मला खूप आवडायचे, अजूनही मी ते केव्हातरी वाचत असतो. वाचनालयातच असलेली गुरुनाथ नाईक यांची पुस्तके माझ्या हाती लागली.युद्धस्य कथा रम्य: ह्या उक्ती प्रमाणे त्यांच्या त्या थरारकथा मनाची पकड घेत असत. मेजर भोसले, कप्तान दीप, भारत पाकिस्तान युद्ध, या नायकांच्या करामती, हे सर्व वाचताना मन रंगून जायचे. तेथेच मी रणजित देसाई यांची स्वामी, शिवाजी सावंत यांची पुस्तके वाचल्याचे आठवते. पु. ल. देशपांडे यांची बटाट्याची चाळ आणि इतर पुस्तके देखील वाचली. वाचनालयात बरीच मासिकेही असत, त्यातील देखील किर्लोस्कर, मनोहर सारखी मासिके, साप्ताहिक स्वराज्य सारखी साप्ताहिके वाचायला मिळत. त्याच सुमारास, किंवा थोडे आधी असेल, समोर पाठक म्हणून कुटुंब राहत असे. त्यांच्याकडे असलेली सिंहासन बत्तीशी, वेताळ पंचविशी सारखी पुस्तके वाचल्याचे आठवते. नंतर दहावीत गेल्यावर दहावीचे वर्ष, म्हणून, अभ्यासावर लक्ष असावे, यासाठी, वाचनालयाची वर्गणी बंद झाली आणि वाचन बंद झाले. अर्थात हे सगळं फुटकळ वाचनच होतं.

अकरावीत असताना घरी नको त्या वयात नको ते पुस्तक हाती लागले. काही दिवस मनाची चाळवाचाळव, आजूबाजूला असलेल्या मोठ्या लोकांकडे पाहताना माझी मलाच वाटलेली शरम, हे सगळे अजून आठवते. काही दिवसांनी ते पुस्तक घरातून गायब झाले आणि मी परत मार्गाला लागलो! त्याच सुमारास घरी कन्नड मासिके, जशी तुषार, तरंग, सुधा अशी मासिके यायला लागली. नुकतेच आईकडून कन्नड वाचायला शिकलो होतो, त्यामुळे ही मासिके वाचायला आवडू लागले. या व्यतिरिक, नंतर कॉलेजमध्ये असताना विशेष वाचनप्रेम जडले नाहीच, का कोणास ठाऊक. तरी बरं त्यावेळेस आम्ही मित्रांनी पुण्यातील प्रसिद्ध अश्या ब्रिटीश लायब्ररी(British Library) नाव नोंदवले होते. पण आमचे उदिष्ट वेगळे होते, ते म्हणजे, संगणकविषयक पुस्तके वाचण्यासाठी, संदर्भासाठी. त्यामुळे की काय काही अपवाद(जॉर्ज ऑर्वेल(George Orwell), पी. जी. वोडहाउस(P G Wodehouse)ची पुस्तके, तसेच क्रिकेटची आवड असल्यामुळे Bob Willis चे Fast Bowling हे पुस्तक) वगळता त्यांच्याकडे असलेल्या इंग्रजी साहित्याच्या खजिन्याकडे कधी लक्षच गेले नाही. माझ्या एका मित्राला इंग्रजी पुस्तके वाचण्याचा नाद होता. एकदा मी त्याच्याकडून घेवून Robin Cook चे Coma हे पुस्तक वाचल्याचे आठवते. कॉलेजच्या अभ्यासक्रमासाठी अशी जी पुस्तके असत, त्यातील काही विकत घेतली होती. पण तेवढेच.

पुढे कॉलेज संपून नोकरी सुरु केली, तरी सुद्धा माझी वाचनाची गाडी पुढे सरकेना. कामातच इतका गुरफटून गेलो होतो. फक्त एक अपवाद-एकदा एका सहकाऱ्याकडे Frederick Forsyth चे Fist of God हे पुस्तक पहिले, आणि ते वाचल्याचे आठवते. ते पुस्तक माझ्याकडेच राहिले, आणि आजही ते आहे. नंतर मी अमेरिकेत गेलो, तेव्हा जाताना स्वयंपाक हे सिंधुताई साठे यांचे पुस्तक विकत घेतले. हे माझे विकत घेतलेले पहिले मराठी पुस्तक! तेथे गेल्यावर तेथील वाचनालयांची श्रीमंती पाहिली. एका वेळेस १०-१५ पुस्तके/मासिके घरी घेवून जाता येत असत. तेथे बरीच पुस्तके वाचली, त्यातील प्रामुख्याने पर्यटनावरील, इतिहास यावरील. अजूनही साहित्याची गोडी लागली नव्हती. वाचनाने महत्व समजत होते. कामाचा भाग म्हणून, तसेच इतर तत्सम अशी पुस्तके वाचत होतो, विकत घेत होतो. पण निखळ साहित्य, म्हणजे कथा, कादंबरी, कविता यांचे विश्व अजून खुणावत नव्हतेच. त्या दृष्टीने करंटेच राहिलो.

काही वर्षांनतर पुण्यात परतलो. हिंडण्या-फिरण्याचा, भारताचा इतिहास जाणून घेण्याचा छंद जडला होता(Indology च्या नादाने). त्यानिमित्ताने पुस्तके विकत घेण्याचा, वाचण्याचा सपाटा सुरु झाला. दिवाळी अंक घेऊ लागलो आणि त्यामुळेही मराठी साहित्यविश्वाची ओळख होत गेली. नाटकं, त्यातही, प्रायोगिक नाटके पाहण्याचा नाद लागला. त्यानिमित्ताने देखील पुस्तके घेण्याचा, पुस्तक प्रदर्शनात जावू लागलो. हळू एक एक करत, कथा, कादंबऱ्याकडे ओढला गेलोच शेवटी. पुण्यातील Institution of Engineers हे इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन भरवणारे प्रसिद्ध स्थळ. तेथेही हळू-हळू इंग्रजी साहित्यामध्ये, सुरुवात, science fiction ने(Robot Vision-Issac Asimov, The Nuclear Age-Tim O’Brian) होत, अडकू लागलो. पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी यांची पुस्तके, शामची आई, माडगुळकर यांची बनगरवाडी, माणदेशी माणसे, विश्राम बेडेकर यांचे नाटक टिळक आणि आगरकर, रा. चिं. ढेरे यांचे लज्जागौरी इत्यादी. त्याचवेळेस चिंचवड गावातील वाचनालयातून प्रभुदेसाई यांचा देविकोश हाती लागला. मग अमरेंद्र गाडगीळ यांचा गणेशकोश सापडला. त्याच सुमारास एका मित्राकडून भारतीय दर्शन की रूपरेखा हे हिंदी पुस्तक हातात पडले आणि भारतीय दर्शन म्हणजे काय हे समजले. नंतर मी भरतविद्या(Indology) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर तर त्या विषयाची बरीच पुस्तके घेतली, वाचली, अजूनही चालूच आहे.

माझ्या वाचनप्रवासातील या पुढची वाटचाल नंतर कधी तरी, याच ठिकाणी!