वसंतोत्सव मधील संगीत सौभद्र

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात २०१८ सालच्या वसंतोत्सव हा प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ चालणारा संगीत कार्यक्रम जाहीर झाला. गेली काही वर्षे मी तेथे जातोय. ह्यावर्षी मी जाऊ शकणार नव्हतो, त्यामुळे मी मनातून चरफडलो. माझे त्याच सुमारास कामानिमित्त पुण्याबाहेर प्रवासाचे बेत हाकले गेले होते. ह्या वर्षीचे वसंतविमर्श चर्चासत्र देखील हुकणार होते. तबला वादनाच्या घराण्याच्या परंपरेबाबत तबलावादक योगेश सामसी बोलणार होते. शुक्रवारी १९ जानेवारीला रात्री उशिरा मी परत पुण्यात आलो. त्याच दिवशी वसंतोत्सवाचा पहिला दिवस होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्राचा निरोप आला की त्याच्याकडे एक तिकीट आहे, आणि मला येणार का अशी विचारणा केली. मी तत्काळ होकार भरला. त्या दिवशी संगीत सौभद्र या नाटकाचा प्रयोग रंगणार होता. वसंतराव देशपांडे यांनी संगीत नाटकं, नाट्यगीते या क्षेत्रात भरीव काम केले असल्यामुळे, वसंतोत्सव मध्ये संगीत नाटकाचे प्रयोग होत असतात. मला नाटकांची आवड तशी उशीरच लागली. कुठल्याही विषयाची आवड लागली की मी त्या विषयाच्या इतिहासात शिरतो, आधी काय झाले आहे हे अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. तसेच नाटकांविषयी देखील झाले. त्यामुळे बरीचशी जुनी संगीत नाटके परत परत नवनव्या संचात, रूपात सादर केली जाणारी, पाहिली गेली होती. पण हे नाटक निसटले होते.

image

संगीत सौभद्र ह्या संगीत नाटकाचे लेखक अण्णासाहेब किर्लोस्कर. ह्यांनी संगीत शाकुंतल हे नाटक लिहून किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी स्थापन केली. त्यांचा जन्म योगायोगाने विष्णुदास भावे यांनी संगीत सीता स्वयंवर हे संगीत नाटक सादर करून मराठी नाटकांची परंपरा ज्या वर्षी महाराष्ट्रात सुरु केली, त्याच वर्षी म्हणजे १८४३ साली झाला. त्याला होऊन ३०-४० वर्षे झाली होती. त्या युगात अर्थातच सुरुवातीची नाटके ही संगीत नाटके होती. संगीत शाकुंतल हे आता सादर होत नाही, त्यामुळे मी पाहिलेले नाही. शाकुंतल हे कालिदासाचे संस्कृत नाटक. लोक परंपरेवर आधारित लोकशाकुंतल हे कन्नड नाटक मी नुकतेच पहिले होते. संगीत सौभद्र हे किर्लोस्कर यांनी लिहिलेले आणि सादर केलेले दुसरे संगीत नाटक. अतिशय प्रसिद्धही झाले होते. मराठी नाटकांच्या इतिहासाबद्दल, त्यातही संगीत नाटक, नाटक मंडळी, कन्नड-मराठी रंगभूमीमधील देवाण-घेवाण याबद्दल माझ्या अमीरबाई कर्नाटकी या पुस्तकाच्या अनुवादामुळे बरेच जाणता आले. त्याबद्दल मी बरेच लेख देखील लिहिले आहेत. ह्या सर्व पार्श्वभूमी मुळे वसंतोत्सव मधील संगीत सौभद्रच्या प्रयोगाबाबत उत्सुकता होती.

संगीत नाटकं पूर्वीच्या काळी रात्रभर चालत असत. अर्थात वसंतोत्सवमध्ये ते शक्य नव्हते. त्यामळे तीन तासात ते बसले पाहिजे, आणि तसे ते त्यांनी बसवले आहे. ह्या नाटकात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, आनंद भाटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांनी केलेले नाट्यगीतांचे गायन हेच अर्थात मोठे आकर्षण होते. आम्हाला कार्यक्रम स्थळी पोहोचायला थोडासा उशीरच झाला होता. आतमध्ये जाण्यासाठी रसिक रांगेत उभे होते आणि रांग बरीच मोठी आणि लांबवर पसरली होती. नाटकांना प्रेक्षक कमी होत आहेत, त्यातही संगीत नाटकांना तर त्याहून कमी झाले आहेत असे चित्र सध्या आहे. त्या पार्श्वभूमीवर ही गर्दी तशी अनपेक्षित होती. १८८२ मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. तेव्हापासून विविध काळात विविध कलाकारांनी हे नाटक सादर केले आहे(जसे दिनानाथ मंगेशकर, स्वरराज छोटा गंधर्व, जयमाला शिलेदार). वयाच्या साठ-सत्तरीच्या पुढील रसिकांपैकी बऱ्याचश्या रसिकांनी १९६०-७० मध्ये झालेले प्रयोग पाहिलेले असणार. त्यामुळे झालेली ही गर्दी प्रामुख्याने स्मरणरंजन, पुन:प्रत्ययाचा आनंद यासाठीच होती हे उघड होते. माझ्यासारखे प्रेक्षक जे प्रथमच हे नाटक पाहणार होते, आणि इतर सध्याच्या पिढीतील प्रेक्षक ते उत्सुकतेपोटीच आले होते.

नाटकाचे कथानक प्रसिद्ध आहेच. महाभारतातील पांडवांपैकी अर्जुन आणि कृष्णाची बहिण सुभद्रा यांच्या विवाहाची कथा. कथा कसली, तो एक फार्सच म्हणावा असा आहे. टिपिकल हिंदी सिनेमात शोभण्यासारखी अशीच. माझ्याकडे १९६३ मध्ये प्रसिद्ध झालेले संगीत सौभद्र नाटकाची संहिता असलेले पुस्तक आहे. त्याला अर्थातच किर्लोस्कर यांची छोटीशी प्रस्तावना आहे, तसेच प्रसिद्ध लेखक, समीक्षक भीमराव कुलकर्णी यांचा देखील ‘सौभाद्राचा अभ्यास’ या नावाचा एक निबंध आहे. त्यांनी नाटकाच्या कथेचे मूळ स्फुर्तीस्थान काय असावे याबद्दल सांगितले आहे. ही कथा वेगवेगळया रूपात महाभारतात, भागवतात, तसेच इतर प्राकृतग्रंथातून, तसेच मोरोपंतांच्या आर्यामध्ये देखील येते. त्यांनी या निबंधातून नाटकाची समीक्षा ना सी फडके, गंगाधर गाडगीळ यांनी कशी केली याचा देखील आढावा घेतला आहे. तसेच नाटकात रंजकता, रहस्यमयता, कथानक आणि नाट्यपदांचा संबंध आणि इतर अनेक गोष्टी ज्यामुळे हे नाटक कसे एक मैलाचा दगड होऊन बसले याची चर्चा केली आहे. हा निबंध मुळातून वाचण्यासारखा आहे.

image

असो. तर आम्ही आत सभामंडपात जाऊन स्थानापन्न होई पर्यंत तिसरी घंटा होऊन गेली होती, आणि नांदी सुरु झाली होती. त्या नांदीच्या योगे प्रेक्षकांना आजच्या नाटकाचे प्रयोजन, म्हणजे सुभद्रेचा विवाह, याचे सुतोवाच झाले. राहुल देशपांडे नारद, तर आनंद भाटे कृष्ण झाले होते, तर अर्जुन अस्ताद काळे नावाच्या नटाने साकारला होता. बाकीची पात्रे जसे की सुभद्रा, बलराम, रुक्मिणी कोणी साकारले होते ते समजले नाही.  संगीत नाटकांत पूर्वी ऑर्गन वापरला जात असे. सुदैवाने अजूनही काही जण ऑर्गन, त्या पद्धतीने वाजवणारे आहेत, त्यापैकी प्रसिद्ध आणि अभ्यासू वादक राजीव परांजपे हे एक. ते साथीला ह्या नाटकात होते. नांदीनंतर अर्जुन, जो संन्याश्याच्या रुपात आहे, त्याने प्रवेश केला. कारण अर्थात उघड आहे, सुभद्रेचा विवाह त्याच्याबरोबर न ठरवता, तर तो दुर्योधनाबरोबर बलरामाने ठरवले होते, त्यामुळे त्याचा प्रेमविरह झाला होता! नारदमुनी परमेश्वराचे गुणगान ‘राधाधर मधूमिलिंद’ या प्रसिद्ध गीताद्वारे गायन करत अवतरतात. कळलाव्या नारदाला कृष्णाचे कारस्थान माहिती असल्यामुळे ते अर्जुनाला आशा न सोडण्याचा सल्ला देतो. अर्जुनाचा सुभद्रेचे अपहरण केलेल्या राक्षसाबरोबर हातापायी होऊन, सुभद्रा आणि अर्जुन यांची भेट होते. मग पुढे कृष्णाचे बलरामाची समजूत काढणे, संन्याशी अर्जुनाचे सुभद्रेच्या महालात मुक्काम करणे, तसेच कृष्ण आणि रुक्मिणी यांतील रुसवा फुगवा हे सर्व कथानकात येते. ‘प्रिये पहा’ हे नाट्यपद कृष्णाचे रुक्मिणी सोबत प्रेमालाप करतानाचे आनंद भाटे यांनी छान गायले. पण त्याचा अभिनय यथातथाच आहे असे म्हणावे लागेल. त्यानेच म्हटलेले ‘कोण तुजसम सांग’ हे नाट्यपद देखील जोरदार झाले. अशी अनेक नाट्यपदे एकामागून एक येत गेली, प्रेक्षकांच्या वाहवा मिळवत कथानक हळू हळू पुढे सरकत गेले आणि शेवट अर्थातच, आणि अपेक्षेप्रमाणे गोड होतो.

हे तसे पाच अंकी नाटक, दोन अंकात सादर केले. वसंतोत्सव मधील रंगमंच प्रत्येक वर्षी वेगळी असतो, आणि अतिशय आकर्षक असतो. ह्या वर्षी देखील तो देखणा असा होता, प्रकाशयोजना देखील चांगली होती. रंगमंच खुला असल्यामुळे दोन प्रवेशांच्या दरम्यानचे नेपथ्य प्रेक्षकांसमोरच बदलत होते. आम्ही दोघे मित्र नाटक पाहत, नाट्यगीतं ऐकत, संपूर्ण वेळ तेथे हजर होतो. माझ्या डोळ्यासमोर सारखे त्याकाळी हे नाटक कसे सादर होत असावे आणि प्रेक्षक कसा त्याचा आस्वाद घेत असावेत, त्याची मनातून कल्पना करत होतो. एकूणच त्यादिवशीची शनिवार संध्याकाळ या नाटकाच्या निमित्ताने  कारणी लागले असे वाटले.

Advertisements

लोक शाकुंतल

गेला महिना-दीड महिना तीव्र उन्हामुळे, पुण्यात(तसेच इतर ठिकाणी देखील) राहणारा मी अगदी हैराण झालो होतो. काही दिवसांपूर्वी बंगळूरूला जाण्याची संधी मला मिळाली. मी पूर्वी कित्येकदा बंगळुरूला गेलो आहे पण तरीसुद्धा मी मनातून सुखावून गेलो. पहिले कारण असे, तेथील हवामान, इतक्या प्रमाणात शहरीकारण होवूनही बरेच सुखावह असते. तेथील वैशिष्ट्य म्हणजे, बहुतेक वेळेला संध्याकाळी पावसाच्या सरी काही काळ पडून हवेत हवाहवासा थंडावा येतो. दुसरे कारण मला कन्नड नाटकांचा आस्वाद घेण्याची पर्वणी मिळणार होती. पुणे विमानतळावरू विमानाने उड्डाण केले आणि सहज खिडीकीतून खाली पहिले तर, लोहगाव, खराडी ह्या खडकाळ, वैराण, बिलकुल हिरवाई नसलेला प्रदेश नजरेस पडतो. नाही म्हणायला मुळा-मुठा नदी दिसते, ती वरून स्वच्छ, छानच दिसते, पण आपल्याला सर्वांना माहिती असते, की जशी दिसते तशी ती नदी मुळीच नाही. या उलट, जसे जसे विमान बंगळूरूच्या केम्पेगौडा विमानतळाच्या जवळ येते, त्यावर घिरट्या मारते, आणि तुम्ही खाली पहिले तर, छान हिरवाई, नारळाच्या बागा दिसतील, आखीव, रेखीव, शेती दिसेल. आणि मनाशीच आपण म्हणतो की वा! आली की ही गार्डन सिटी!

बंगळुरूमधील काही दिवसांच्या मुक्कामाच्या शेवटल्या टप्प्यावर आलो तेव्हा कुठे नाटक पाहण्याबद्दल वगैरे बद्दल जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. पण त्याआधी सिनेमा पाहायची टूम निघाली. सचिन पाहावा की बाहुबली २, ही काथ्याकूट करण्यात २-३ दिवस गेले आणि शेवटी कटाप्पाने बाहुबलीला पहिल्या भागात का मारले हे अजून जाणून घ्यावयाचे असल्यामुळे तोच सिनेमा पाहायचे ठरले आणि पाहिला देखील. आता काही मी त्या सिनेमाबद्दल काही लिहीत नाही, नाही तर जुने ते जुने गुऱ्हाळ ठरायचे. परत नाटकाचे ठरवण्याच्या उद्योगाला लागलो. वर्तमानपत्रात पहिले, तर ७-८ नाटके त्या वीकएंडला होणार होती(शिखंडी, सुयोधन सारखी कन्नड प्रायोगिक नाटकं, The Cut सारखे इंग्रजी नाटक). बंगळूरमध्ये कन्नड व्यावसायिक नाटक असे नाहीच, पण प्रायोगिक नाटकं बरीच, आणि ती प्रामुख्याने वीकएंडला. त्यातील बरीच इंग्रजी नाटके होती. काही कन्नड नाटके होती. पण मला माझ्या सोयीनुसार जाता येण्याजोगे एकच नाटक होते ते म्हणजे लोक शाकुंतल. हे नाटक प्रसिद्ध नाटककार के. व्ही. सुब्बण्णा, ज्यांनी निनासम ही संस्था सुरु केली होती, त्यांनी लिहिले आहे. लोक रंगभूमी जागृत ठेवण्याचे त्यांचे कार्य मी जाणून होतो. त्यातच शाकुंतल नाटकाचे लोक रंगभूमीवरील सादरीकरण कसे असेल ह्याची मला उत्सुकता लागली. सकाळीच BookMyShow वर तिकीट राखून ठेवले. आधुनिक मराठी रंगभूमीची ज्या संगीत शाकुंतल नाटकाने झाली, त्याचा मी लोक रंगभूमीवरील कन्नड भाषेतील अवतार पाहणार होतो!

आणि मी संध्याकाळी निघालो. नाट्यगृह होते बंगळूरुच्या मध्यवर्ती भागात, जवळ जवळ १२-१५ किलोमीटर लांब. मला धडकीच भरली होती. वाहतूक-कोंडीमुळे, गर्दीमुळे, तेथे जाई पर्यंत माझा अर्धा जीव जायचा. त्यातच संध्याकाळी पाऊस पडतो, आणि तो त्यादिवशी देखील पडलाच. कसाबसा वेळेवर नाटकाला पोहोचलो. थोडीफार गर्दी दिसत होती. प्रवेशद्वाराजवळ नाटकाशी संबंधित असलेले काही लोक तिकीट वाटप करत बसले होते. त्यातील एक-दोन जण परिचयाचे निघाले, निनासममध्ये ओळख झाली होती. नाट्यगृह आणि आसपासचा परिसर सुंदर, झाडी असलेला होता. नाट्यगृहाचे नाव गुरुनानक भवन.

त्याच परिसरात National School of Dramaच्या बेंगळुरू शाखेचे शहरातील केंद्र आहे(प्रमुख केंद्र हे बेंगळुरू विद्यापीठाच्या परिसरात आहे). लोक शकुंतल हे नाटक अंतरंग संस्थेने बसवले आहे, आणि दिग्दर्शन केले आहे प्रसिद्ध नाट्य-दिग्दर्शक चिदंबरराव जम्बे यांनी. कर्नाटकातील सुप्रसिद्ध नाट्य-संस्था रंगायन याचे ते संचालक देखील होते. ही संस्था मैसुरू येथे आहे. निनासम संस्थेचे जवळ जवळ २२ वर्षे प्रमुख देखील होते. या सर्वामुळे, एकूणच कालिदासाच्या संस्कृत ‘अभिज्ञान शाकुंतल’ नाटकाच्या ह्या कन्नड नाट्य-प्रयोगाला एक वेगळेच वजन प्राप्त झाले होते.

काहीही सूचना, घोषणा न करता नाटक सुरु झाले, पडदा देखील नव्हता. रंगमंचावर नेपथ्य अगदी माफकच होते. दुष्यंत राजा सैनिकांबरोबर शिकारीला गेला आहे हे पहिले दृश्य होते. दोन काठ्यांनी आणलेला धनुष्य-बाणाचा आभास, एका स्त्री-कलाकाराने केलेली हरिणाची भूमिका हे छान वाटले. दुष्यंत राजा अगदीच मामुली वाटला. लोक-संगीत, यक्षगान नृत्याविष्कारावर आधारित हा नाट्य-प्रयोग नटला आहे. रंगमंचाच्या मध्यभागी दोन वादक(एक पेटी-वादक, आणि एक ढोलकवाला) होते, आणि एक गायक, जो सूत्रधार देखील होता. दुष्यंत-शकुंतला यांची कथा प्रसिद्धच आहे, ती काही सांगत बसत नाही. पण ह्या एक तास पन्नास मिनिटांच्या दीर्घ एकांकीच्या प्रयोगात मला विशेष मजा आली नाही. प्रयोग तसा रुक्षच वाटला. शकुंतलेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने थोडीसी जान आणली आहे. कन्नड भाषा, तिचा वेगळा बाज, वेगवेगळे शब्द ऐकताना तसे छान वाटले. पण एकूणच ह्या नाटकात जे नाट्य आहे, राग, प्रेम, पश्चाताप इत्यादी भावनेचे प्रदर्शन आहे, जे अगदी कमीच वाटले. प्रयोग संपल्यानंतर सर्व कलाकारांची ओळख करण्यात आली, तसेच ह्या नाटकाचा पुढील प्रयोग पाहण्यासाठी आप्तेष्टांना घेवून येण्याचे आवाहन करण्यात आले.

असो. काही दिवसातच आषाढ मास सुरु होईल. त्याचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.  त्या निमित्ताने हा वेगळा प्रयोग पाहिल्याचे समाधान मिळाले. प्रयोग संपल्यानंतर रात्री परत घरी जायचा प्रश्न होता. पाऊस अजून पडतच होता. मनाचा हिय्या करून, हे नाटक पाहून बंगळूरू भेटीचे सार्थक झाले असे मनाची समजूत घालून परतीचा प्रवास मी सुरु केला. वर सुरुवातीला म्हटले खरे की बंगळूरू मध्ये पाऊस पाडून हवा छान होते वगैरे, पण बऱ्याचदा असे होते की पाऊस थोडाफार पडतो संध्याकाळी, पण तो घरी परतणाऱ्या लोकांना काळ वाटतो, कारण, पावसामुळे जमणारे पाणी, जोराच्या वाऱ्यामुळे पडणारी झाडे, फांद्या, यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी!