माझा कांचन

जसा जसा हिवाळा सुरु होतो, आणि निसर्गात पानझड होवू लागते. आणि हे माझ्या पटकन लक्षात येते. माझ्या बागेतील, आवारातील पानांचा सडा वाढू लागतो. त्यातच बागेत एका कोपऱ्यात उभा असलेल्या माझा कांचन जोरदार पानझड करून आणि वाळलेल्या शेंगा खाली टाकून लक्ष वेधून घेतो. त्या शेंगा पडताच एखादी फुसका लवंगी फटका वाजवा तसा आवाज होवून शेंग फुटते आणि त्यातून बिया आसपास विखुरल्या जावू लागतात. आणि हा प्रकार अख्खा दिवस सुरु राहतो. शनिवारी, रविवारी सुट्टीच्या दिवशी घरी असलो तर, दिवसभर हे ऐकू आणि पाहू शकतो. कित्येक वेळेला ह्या पडलेल्या बिया मी वाकून वाकून गोळा करतो आणि पावसाळा आला की रानावनात जाऊन त्या विखरून द्यायच्या असा उद्योग मी काही वर्षे करतो आहे. तसेच ज्या राहून जातात त्या काही दिवसात कोंब फुटून छानसे रोपटे जमिनीतून उगवते आणि ठिकठिकाणी ही रोपटी नजरेस पडू लागतात. आता नवीनच उद्योग करावा लागतो आणि तो म्हणजे, नाईलाजास्तव ती रोपटी उपटून काढावी लागतात.

पानझड सुरु झाली की समोरच्या दाक्षिणात्य आजीबाईंची कुरुकुर सुरु होते. कारण उनाड वाऱ्यामुळे बराचसा पानांचा हा कचरा त्यांच्या आवारात जातो. त्या मग या कांचनाच्या जीवावर उठतात आणि माझा कांचन तोडून टाकण्याचा तगदा लावतात. मी, अर्थातच, त्यांना काही दाद देत नाही. पण मी मनात कांचनाला म्हणतो जरा दमानं घ्या, आणि सांभाळा! तर असा हा माझा सखा, बागेतील कांचन. गेली १०-१२ वर्षे मी त्याला वाढताना, बहरताना पाहतो आहे. सुख-दुःखाच्या, मनाच्या विभोर अवस्थेत बागेत नजर टाकली की हा समोर असतोच. बागेत बसून हिवाळ्यात उन खाताना, उन्हाळ्यात सावलीखाली बसून कॉफी पीत, गप्पा मारत, काही-बाही वाचत बसण्याची मजा काही औरच.

कधी सकाळी सकाळी चहाचा काप हातात घेवून झोपाळ्यावर बसावे तर एखादे मांजर ह्या माझ्या कांचनच्या अंगाखांद्यांवर टपून बसलेले दिसते. मला पाहून सावध होते. आणि परत एखाद्या पक्ष्याच्या मागावर ध्यान लावून बसते. तर कधी मांजराची छोटी छोटी पिले, जी अजून धड चालायलाही शिकलेली नसतात, ती उसना धीटपणा गोळा करून, कांचनावर चढून, उड्या मारून, एकमेकांच्या खोड्या काढण्यात मग्न असतात. नुकतीच फुटलेली पायाच्या बोटांवरची नखे काढून, कांचनच्या खोडावर ओरबाडून पाजळतात. हा बिचारा कांचन हुं की चू करत नाही. बऱ्याचदा तर कांचनावर पक्षांची सभाच भरलेली असते. बुलबुल, चिमणी(हो चिमणी), कावळे, सुगरण, दयाळ, क्वचित एखादा भारद्वाज वगैरे एकत्र नांदत असतात आणि तेव्हाही हा कांचन काही एक तक्रार करत नाही. कांचनला लागून बागेची भिंत आहे, आणि कोपऱ्यात भिंतीवर पाण्याने भरलेली ताटली ठेवलेली असते. कांचनावरील किडे, फुलांमधील मध खावून झाला की हे पक्षी येवून पाणी पितात, तर मध्येच अंघोळही करतात! परत कांचनावर जाऊन पंख वाळवत बसतात. बुलबुलासारखे किंवा सुगरणीसारखा एखादा पक्षी ह्याच कांचनावर आपला संसार थाटात, घरटी तयार करतात, अंडी घालतात, आणि सुखाने नांदातात.

बागेतील कांचन विविध ऋतूत विविध रूप धारण करण्यात पटाईत आहे. पावसाळा संपता संपता टोकदार, हिरव्या कळ्या उमलू लागतात. हिवाळ्यात सुरुवातीला सुंदर अश्या जांभळ्या फुलांनी लगडून जातो. पाहता पहाता पूर्ण झाड फुलांनी भरलेले दिसते. त्या फिकट जांभळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा कांचनपुष्पांचा मंद, हलकासा गंध साऱ्या आसमंतात भरून जातो. मधमाशांना, टवाळ भुंग्याना हे आमंत्रणच असते, आणि त्याही आनंदाने ते आमंत्रण स्वीकारून मधाचा पाहुणचार स्वीकारतात.  झाडाखाली लावलेल्या मोटारीवर फुलांचा सडा पडू लागतो आणि ती मोटार सजू लागते. त्यातच हळू हळू हिरव्या शेंगा नजरेस पडू लागतात.  जसे जसे उन वाढू लागते, तशी तशी ती पिकून, वाळून, खाली पडायला लागतात. वाळलेली पाने देखील गळून पडतात. काही दिवसातच कांचन जवळ जवळ निष्पर्ण होवून जातो. त्याच सुमारास नवीन धुमारे फुटून, चिमुकली चिमुकली हिरवी पाने फुटू लागतात. ही पाने म्हणजे आपट्याच्या पानासारखी जोडी-जोडीने, द्विखंडी असतात. परत काही दिवसातच परत कांचन हिरवा शालू धारण करतो, आणि पावसाळ्यात तर आणखीनच गच्च होवून जातो. आणि आपल्याला समजते की हा नवीन बहर आहे, तोही काही काळच टिकणार आहे, आणि सृष्टीचे चक्र अव्याहत चालू राहणार आहे.

हे सर्व न्याहाळताना राहून राहून शिरीष पै यांची कांचनबहार नावाची सुंदर कथा आठवत राहते. त्यातील ललिता आणि मधू यांचे कांचनाच्या साक्षीने फुललेले हळुवार प्रेम आठवत राहते. आणि हा माझा सखा कांचन आणखीनच हवाहवासा वाटू लागतो!

 

Advertisements