मराठी हॅम्लेट

मी माझ्या आधीच्या ब्लॉग मध्ये म्हटल्याप्रमाणे मी शेक्सपिअरचे इतक्यात पाहिलेले हॅम्लेट हे दुसरे नाटक. त्याआधी राजा लिअर पहिले होते तेही कथकली सादरीकरणात. हॅम्लेट हे मराठी नाटक झी मराठीने आणले आहे. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांसोबत नाट्यनिर्मिती क्षेत्रात देखील ते उतरले आहेत, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. आज ह्या मराठी हॅम्लेट नाटकाविषयी लिहायचे आहे.

शेक्सपिअरची नाटके म्हणजे काही विचारायला नको खरे तर. गेली चारशे वर्षे ती कुठे ना कुठे काही ना काही रुपात, भाषेत जगभर सादर केली जातात. ही सार्वकालिक नाटके आहेत. मराठीत देखील त्याच्या नाटकाच्या भाषांतराची, रूपांतराची मोठी परंपरा आहे. वि वा शिरवाडकरांनी त्यांच्या शोध शेक्सपिअरचा या पुस्तकात त्याचा छान आढावा घेतला आहेत. शेक्सपिअरचे नाट्यविश्व कायमच विविध रूपात आपल्यासमोर येत राहते. मी त्याच्या Twelfth Night या नाटकाचे पिया बहुरुपिया नावाचे हिंदी अविष्करण पाहिले होते. मी दोन-तीन वर्षांपूर्वी कर्नाटकातील निनासम येथे एका शिबिरानिमित्त गेलो होतो, तेव्हा तेथे शेक्सपियर मनेगे बंदा(ಶೇಕ್ಸಪಿಯರ ಮನೆಗೆ ಬಂದ, अर्थ शेक्सपियर येती घरा) ह्या नाटकाचा प्रयोग पाहिला होता. हे नाटक म्हणजे शेक्सपियर वरील नाटककाराचे असलेले प्रेम/आदर दर्शवायचा एक प्रयत्न. एका दृष्टीने पहिले तर ती एक प्रकारची जिवंत डॉक्युमेंटरीच म्हणावी लागेल. त्याच्या वेगवेगळया नाटकांची चर्चा, त्यातील प्रसंग आणि पात्रे याचे सादरीकरण, असे एकमेकात गुंफून एक संगीतमय कार्यक्रम होता तो. शेक्सपियरचा एकूण प्रभाव आणि त्याच्यावरील प्रेमच म्हणजे हे नाटक. मराठीतही एकूणच शेक्सपिअरच्या नाटकांचा अनेक अंगाने देखील अभ्यास झाला आहे, त्याची देखील मोठी परंपरा आहे. हॅम्लेट या नाटकाइतकी शेक्सपिअरच्या इतर नाटकांची चर्चा झाली नाही असा इतिहास आहे. हॅम्लेटविषयी प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक टी एस इलियट म्हणतो की हे नाटक वाड्मयातील मोना लिसा आहे.

Halmet

मराठी हॅम्लेट

मराठीत हॅम्लेट नाटक प्रथम आले ते नाना जोग यांच्या भाषांतरामुळे. प्रसिद्ध नट दामू केंकरे यांनी हॅम्लेट रंगवला होता. त्याच भाषांतरवर बेतलेले सध्याचे झी मराठीचे नाटक आले आहे. सुमित राघवन याने अतिशय ताकदीने हॅम्लेट उभा केला आहे. हॅम्लेटच्या मनातील गोंधळ, अस्वस्थता, संशय, राग, हतबलता इत्यादी अनेक भावना विविध प्रकारे त्याने मांडल्या आहेत. सुनील तावडे, तुषार दळवी या सारखे इतर कसलेले अनुभवी नट देखील त्यात आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांचे नाट्यदिग्दर्शन लाभले आहे. हॅम्लेटचा काळ उभा करण्यासाठी नेपथ्य(जे किल्ल्याचे-castle, तसेच राजदरबाराचे आहे), प्रकाशयोजना, वेशभूषा जी लागते त्यात काही कसूर नाही, आणि त्या जोडीला असलेले संगीत(जे राहुल रानडे यांनी दिले आहे). या सर्वांद्वारे प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जाते आणि एखादे मराठी नाटक पाहतो आहे असे न वाटता इंग्लंडमधील नाटक पाहतो आहे असे भासू लागते, हे या प्रयोगाचे यश आहे. बालगंधर्व रंगमंदिरातील प्रयोगाची मी वरून तिकिटे राखली होती. तिथे गेल्यावर समजले की मला बाल्कनीतील आसने मिळाली आहेत. थोडा मी हिरमुसलो. नाटक बाल्कनीतून नव्हे तर पहिल्या पाच रांगेतून पाहायचे असते! पण हळूहळू नाटक जेव्हा सादर होत गेले, मला त्याचा आस्वाद घेताना मी बाल्कनीतून ते पाहतो याची आठवणसुद्धा झाली नाही.

हॅम्लेटची कथा थोडक्यात सांगतो. तशी ती प्रसिद्ध आहेच. ते एक सूडनाट्य आहे. तसेच शोकांतिका देखील आहे, ती देखील हॅम्लेटच्या एकलेपणाची. डेन्मार्कचा राजा असलेल्या वडिलांच्या खुनानंतर त्याचा काका राजपुत्र हॅम्लेटच्या आईबरोबर विवाह करतो. इतक्या घाईघाईत आईने त्याला राजी व्हावे, हे त्या राजपुत्र हॅम्लेटला पटत नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर दुःखीकष्टी झालेला असतो. त्याला वडिलांच्या हत्येचा सूड घ्याचा असतो, पण तो पुरता गोंधळात पडलेला असतो(तसेच इतरांना देखील त्याच्या वागणुकीवरून गोंधळात टाकतो). आईच्या व्यभिचारी वर्तनाचा देखील त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो, एकूणच घृणा वाटत असते. काय करावे त्याला समजत नाही(जगावे की मरावे, to be or not to be, हे ह्या नाटकातीलच हॅम्लेटच्या तोंडी असलेले प्रसिद्ध वाक्य. ह्या नाटकात स्वगतं देखील बरीच आहेत). ह्या सगळ्यातून तो त्याच्यावर प्रेम असलेल्या मुलीच्या प्रेमावर देखील शंका घेऊ लागतो. ह्या सगळ्यातून तो सूड घेतो, पण त्याचा मानसिक प्रवास आपल्या समोर उलगडत जातो.

नाटकात भुताचे एक पात्र आहे, जे हॅम्लेटला वडिलांच्या खुनाबद्दल माहिती देण्यासाठी निर्माण केले आहे. खरेतर नाटक त्याच प्रसंगापासून सुरु होते. ते ज्या पद्धतीने सादर केले गेले आहे, तेथेच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेते. शेवटचा तलवारबाजीचा द्वंद्वाचा प्रसंग देखील खराखुरा वठला आहे. या सगळ्यात हॅम्लेट झालेला सुमित राघवन याने भूमिकेचे सोने केले आहे. ठिकठिकाणी टाळ्या पडतात. अनेक भावभावनांचे प्रदर्शन, एकूण त्याचा वावर, त्याचा एकूण पेहराव हे सगळे एकूण मस्तच जमले आहे त्याला. हॅम्लेट वडिलांच्या खुनाचा सूड घेण्यासाठी एका नाटक मंडळीला पाचारण करतो, आणि नाटक सादर करायला लावतो. त्यावेळेस त्याच्या तोंडी शेक्सपिअरने अभिनायासंबंधी, नाटकासंबंधी काही विचार मांडले आहेत, ते देखील टाळ्या खेचणारे आहेत. अडीच तास खिळवून ठेवणारे, मनाची पकड घेणारे हे नाटक जरूर पाहण्याजोगे आहे.

 

शेक्सपिअरचे गारुड

मी गेल्या आठवड्यात बंगळूरूला गेलो होतो. पुण्याच्या विमानतळावर द विकचा(The Week) अंक कुलुपबंद कपाटात दिसला आणि त्यावर शेक्सपिअर विराजमान होता. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. प्रसिद्ध कवी आणि नाटककार शेक्सपिअरची ४००वी पुण्यतिथी ह्या वर्षी २३ एप्रिल साजरी होत आहे. तो अंक त्यावर असणार. ह्या शतकातील ही मोठी घटना आहे असे म्हणायला हरकत नाही. २६ एप्रिल १९६४ ह्या च्या चौथ्या जन्मशताब्दी वर्षी सुद्धा अश्याच मोठ्या प्रमाणात साजरी केली गेली असणार.  शेक्सपिअरबद्दल मी काही लिहावे एवढा माझा वकूब नाही. पण मी एक नाटकवेडा रसिक आहे, तसेच पुस्तकवेडाही  आहे. मला शेक्सपिअरचे आकर्षण आहे आणि जमेल तसा मी त्याच्याबद्दल समजावून घेत असतो. त्याच्या ४००व्या पुण्यतिथीनिमित्त थोडेफार मला भावलेला समजलेला, त्याच्याबद्दल वाचलेले, ऐकलेले येथे लिहावे म्हणून हा प्रपंच. हे सर्व स्मरण रंजन आहे, त्याच्या गारुडाचे.

इंग्रजी साहित्य घेवून बी.ए/एम्. ए करणाऱ्या मंडळीना शेक्सपिअर, त्याची नाटके अभ्यासाला असतात. जशी संस्कृत मध्ये बी.ए/एम्. ए करणाऱ्या मंडळीना कालिदास असतो तसे. कालिदास भारताचा शेक्सपिअर. मी तर संगणक शास्त्र क्षेत्रातील. मला वाटते अकरावी बारावी मध्ये इंग्रजी विषयात त्याच्या नाटकातील एखादा प्रवेश असावा. त्याच्या नाटकातील काही प्रसिद्ध वाक्ये आपल्याला माहिती असतात. जसे To be or not to be is the question, What’s in a name वगैरे. साधारण २००१ च्या सुमारास जेव्हा माझे नाटक वेड पूर्ण भरात होते तेव्हाच, मला विनय हर्डीकर यांचा ‘सर्वांसाठी शेक्सपिअर’ हा कार्यक्रम मला पाहायला मिळाला. आजच मी वाचले की ते हा कार्यक्रम आता, पुण्याबाहेर देखील घेवून जाणार आहेत. गेली पंधरा वर्षे ते हा कार्यक्रम करत आहेत. मी अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी यांच्या चरित्राच्या निमित्ताने, आणि एकूणच संगीत नाटक, त्याचा इतिहास, ह्या विषयावरील वाचनामुळे असे समजले की मराठीतील नाटकांच्या सुरुवातीच्या काळात शेक्सपिअरचा प्रभाव होता. उदा. सं. झुंझारराव हे प्रसिद्ध नाटक.

त्याची प्रसिद्ध नाटके रोमिओ जुलिएट, ऑथेल्लो, मर्चंट ऑफ व्हेनिस अशी आपल्याला महिती असतात. प्रामुख्याने राज घराण्यावरील नाटके त्याने लिहिली. त्याने शोकांतिका, विनोदी, तसेच रहस्यमय नाटके देखील हाताळली. मानवी स्वभावाचे चिरंतर पैलू जसे राग, लोभ, मत्सर, प्रेम, सूड ही सगळी त्याने मांडली. तो स्वतः अभिनेता देखील होता. त्याची नाटक कंपनी होती, त्याचे नाट्यगृह होते(Globe Theater). या सर्वामुळे तो सार्वकालिक, तसेच सर्वाना आपलासा वाटणारा ठरला. शेक्सपिअरच्या नाटकामध्ये सर्वसामान्य रसिकाला दिसणारा मुद्दा म्हणजे त्यातील इंग्रजी, जे व्हिक्टोरियन काळातील आहे, ते बरेचसे बोजड वाटते. तसेच नाटकातील मोठ-मोठाली स्वगते हे आणखीन एक वैशिष्ट्य. कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकात(आणि इतक्यात आलेल्या सिनेमात देखील), हे आपण पहिले असते. त्यातील प्रसिद्ध नट, अशाप्रकारच्या नाटकातील भूमिका करून मोठा नट झालेला असतो, आणि त्याच्या उतरत्या काळात त्याला हे सर्व आठवत असते, आणि तो ते मोठ-मोठाले संवाद, स्वगते म्हणतो. २००१ च्या आसपासच मला किंग लियर ह्या नाटकाच्या मराठी अनुवादाचे पुस्तके मिळाले. हे लिहिले आहे विंदा करंदीकर यांनी. त्यात त्यांची भली-मोठी विवेचक प्रस्तावना आहे. गोविंद तळवलकर हे देखील असेच शेक्सपिअर अभ्यासक आहेत.

शेक्सपिअरचा अभ्यास, आणि त्याच्यावरील पुस्तके हा देखील एक वेगळाच विषय आहे. त्याच्यावर म्हणे एक लाखावर पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. अनेक अंगाने त्याचा अभ्यास करण्यात आला आहे. वोल्टेअर(Voltaire)चे गमतीदार विधान कुठेतरी मी वाचले होते. तो म्हणतो कि शेक्सपिअर हा थोडीफार कल्पना शक्ती असलेला, प्यायलेला हिस्त्रक पशुसारखा आहे ज्याची नाटके लंडन आणि कॅनडा मध्ये थोडीफार चालतात (Shakespeare is a drunken savage with some imagination whose plays please only in London and Canada).  मराठीमध्ये शेक्सपिअरवर एक पुस्तक मराठी नाट्य परिषदेने प्रसिद्ध केले आहे. तो केला १९६५ मध्ये, चौथ्या जन्मशताब्दी वर्षी. त्यातही अनेक अभ्यासकांनी शेक्सपिअरची अनेक अंगानी ओळख करून दिली आहे. ते मला गेल्यावर्षी मिळाले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी देखील १९७९ मध्ये शेक्सपिअर परिचय ग्रंथ असे पुस्तक प्रकाशित केले होते. The Tales from Shakespeare by Charles and Mary Lamb हे पुस्तक त्याच्या नाटकात आलेल्या कथेसंदर्भात अभ्यासासाठी छोटेखानी पुस्तक आहे. त्यात शेक्सपिअरच्या एकूण माहीत असलेल्या ३८ नाटकांपैकी २० नाटकांच्या कथेसंदर्भात लिहिले आहे. हे पुस्तक मला जी ए कुलकर्णी यांच्या पत्रातून नमूद केल्याचे दिसले आणि ते मी २-३ वर्षापूर्वी घेतले. मी वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या नाटकात मानवी स्वभावाचे पैलू दिसत राहतात. काही अभ्यासकांनी त्याच्या नाटकांचा(प्रामुख्याने किंग लिअर) अभ्यास मानसशास्त्र आणि मानसोपचारशास्त्राच्या अंगाने देखील केला आहे. मी ह्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला ते आणखी समजावून घेण्याची उत्सुकता आहे.

जगभरात त्याची ४००वी पुण्यतिथी जोरात साजरी होणार. लंडनमध्ये, तसेच त्याच्या जन्मगावी म्हणजे Stratford जे एव्हान नदीच्या किनारी आहे(Stratford upon Avon), जेथे त्याचे घर आहे, तेथे तर कार्यक्रमांची लयलूट आहे आणि ती वर्षभर असणार. ब्रिटीशांनी ते घर अजून जपून ठेवले आहे. आपण बऱ्याच प्रवासवर्णनात त्याबद्दल वाचले असते. मलाही तेथे जायचे आहे एकदा, पण तात्पुरते तरी मी माझ्या इंग्लंड मधील मित्रांना त्याबद्दल विचारणार आहे! ते असो, पण इंटरनेटवर देखील बरीच माहिती आहे. इच्छुकांनी येथे आणखी माहिती मिळवता येयील. BBCच्या संकेतस्थळावर देखील Shakespeare Lives असा ऑनलाईन महोत्सव कार्यक्रम सहा महिने चालणार आहे. इतरही बऱ्याच संकेतस्थळांवर माहिती मिळू शकेल. पुण्यात देखील बरेच कार्यक्रम असणार. त्यातील एक आहे विनय हर्डीकर यांचा ‘सर्वांसाठी शेक्सपिअर’, एस. एम् जोशी सभागृहात, संध्याकाळी ६.३० वाजता. तो जरूर आपण सर्वानी पाहावा, आणि शेक्सपिअरचे गारुड अनुभवा.

आणखीन एक जाता जाता. एप्रिल २३ हा देखील स्पेन मधील प्रसिद्ध कादंबरीकार सर्वांतेस याची देखील ४००वी पुण्यतिथी आहे. तो त्याच्या डॉन क्विक्झोट ह्या महाकादंबरीबद्दल प्रसिद्ध आहे. ती मी अजून अर्थात वाचली नाही, कधी तरी वाचायची म्हणून घेवून ठेवली आहे. पण जी. ए. कुलकर्णी यांच्या काही कथा त्यातील मूळ धाग्यावर आधारलेली आहेत. त्यांच्या पत्रलेखनात देखील त्याच्याबद्दल बऱ्याचदा उल्लेख येतो. स्पेनमध्ये त्याची पुण्यतिथी साजरी केली जात आहे.