गंगुबाई हनगल

मागील महिन्यातच, जुलैच्या २१ तारखेला प्रसिद्ध गंगुबाई हनगल यांचा स्मृतिदिन झाला(२००९ साली या दिवशी त्यांचे निधन झाले होते). माझ्या सुदैवाने पुढच्याच वर्षी, म्हणजे २०१० मध्ये मला हुबळीला एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने जायला मिळाले. त्यावेळी मी त्यांच्या देशपांडे नगर या भागातील घरी गेलो होतो. तेथे घरातील दर्शनी भागात एक छोटेखानी संग्रहालय केले आहे. त्या सर्वांची आठवण झाली. मी फिल्म्स डिविजनने तयार केलेला त्यांच्यावरचा माहितीपट पहिला. त्या बद्दल थोडेसे आज लिहायचे आहे. उत्तर कर्नाटकातील विजापूर, हुबळी, धारवाड इत्यादी भागातील कलाकरांच्या, ख्यातकीर्त व्यक्तींविषयी, माझा लहानपण या भागात गेल्यामुळे विशेष जवळीक, आस्था आहे. त्या साऱ्याच्या विषयी कन्नडमधील साहित्य मराठी आणण्याचा मी छोटा मोठा प्रयत्न जमेल तसे करत असतो.

Gangubai Hangal Documentary

नुकतेच पंडित जसराज यांचे दुखःद निधन झाले. त्यांचे गाणे मी शेवटचे ऐकले ते गेल्या वर्षीच्या(डिसेंबर 2019) सवाई गंधर्व संगीत महोत्सवात. मंडपातील वातावरण अगदी भारावून गेले होते. खरे तर पंडित जसराज यांना २०१६ मध्येच गंगुबाई हनगल पुरस्कार मिळाला होता. पंडित जसराज यांचे त्यांचे भक्तिपूर्ण गायन, तसेच भजने(हवेली संगीत) लोकप्रिय होती. संगीत क्षेत्रातील जुने जाणते तारे एकेक करून अस्ताला पावत आहेत. अर्थात त्यांचे काबिल शिष्यगण उदय पावत आहेत, उदयास पावले देखील आहेत. हे कालचक्र आहे, त्याला काय करणार! थोडेसे विषयांतर झाले, असो.

फिल्म्स डिविजनचा हा १९८५ मधील गंगुबाई हनगल यांच्यावरचा माहि.तीपट मला भावला. गंगुबाई यांच्या चरित्राशी निगडीत काही पुस्तके देखील उपलब्ध आहेत. माझ्याकडे गंगुबाई यांचे कन्नड मधील आत्मचरित्र(ನನ್ನ ಬದುಕಿನ ಹಾಡು) आहे. संध्या देशपांडे यांचे मराठीत स्वरगंगा गंगबाई हनगल या नावाने आहे, ते मी वाचनालयातून मिळवून वाचले होते. गंगावतरण नावाचे अनुवादित पुस्तक माझ्याकडे आहे, जे कन्नड मध्ये दमयंती नरेगल यांनी लिहिले आहे(सुनंदा मराठे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.) गंगुबाई ह्या उत्तर कर्नाटकातील हुबळी-धारवाड भागातील ग्रामीण भागातून स्वातंत्र्यापूर्वी उदायास आलेल्या तश्या उच्चभ्रू समाजातील नसलेल्या स्त्री गायिका. हा भाग पूर्वी ब्रिटीशांच्या काळात बॉम्बे प्रेसिडेन्सी अंतर्गत होता. ह्या वैशिष्ट्यपूर्ण भागात मैसूर कडील संस्कृतीचा, कर्नाटक संगीताचा तसेच मराठी, आणि हिंदुस्थानी संगीताचा मिलाफ झालेला. एकमेकांवरील हा प्रभाव संगीत, नाट्य, तसेच चित्रपट क्षेत्रात देखील दिसतो. संगीत नाटक मंडळ्या आपली संगीत नाटके घेऊन या भागात दौरे करत असत. मी काही वर्षांपूर्वी कन्नड मधून मराठीत अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी या याच भागातील गायक-नटीच्या चरित्रामध्ये याचा आढावा घेतला गेला आहे. अमीरबाई आणि गोहरबाई या दोघी बिळगी भगिनी म्हणून संगीत नाटक, आणि गायन क्षेत्रात त्याच काळात प्रसिद्ध होत्या. स्त्री कलाकारांना बाई या विशेषणाने संबोधले जाई. गंगुबाई यांच्या मातोश्री या देखील गायिका होता, कर्नाटक संगीत गात असत. उपरोल्लिखित माहितीपटातून देखील या भागाचे चित्रीकरण सुंदरपणे केले आहे.

गंगुबाई ह्या किरणा घराण्याच्या गायिका. त्यांचे नाव घेतले कि पंडित भीमसेन जोशींची देखील आठवण येते. दोघांचे गुरु एकच-सवाई गंधर्व (पंडित रामभाऊ कुंदगोळकर). तिघेही हुबळी-धारवाड या उत्तर कर्नाटकाच्या भागातील. किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खान मिरजेत वास्तव्य करत असत(मिरजेच्या वाद्य कारखाना उद्योग परंपरे विषयी मी पूर्वी लिहिले आहे-मिरजेची सतारवाली गल्ली). गंगुबाई आधी सवाई गंधर्व यांच्या कडे शिकायला जाऊ लागल्या, नंतर काही वर्षांनी भीमसेन जोशी तेथे शिकायलाआले(त्याची कथा तर सर्वश्रुत आहे. भीमण्णा उत्तरेत जालंधरला विनातिकीट रेल्वे प्रवास करून, घरातून गाणे शिकण्यासाठी पळून गेले होते. तिकडे गेले असता पंडित. विनायकबुवा जोशी यांनी त्यांना परत आपल्या घरी पाठवून, हुबळी जवळच कुंदगोळ येथे वास्तव्यास असलेल्या सवाई गंधर्व यांच्याकडे पाठवले. त्याचा जन्म देखील तिथलाच). या मुळे गंगुबाई आणि भीमण्णा यांचे बहिण भावाचे नाते जुळले आणि ते टिकले, प्रसिद्ध देखील झाले.

गंगुबाई तर आधी आईकडून कर्नाटक संगीत शिकत होत्या (नाटककार विष्णुदास भावे यांच्या पणती श्यामला भावे ह्यांना उभयगानविदुषी असे म्हणतात, कारण त्या कर्नाटक आणि हिंदुस्थानी या दोन्ही पद्धतीचे गाणे गातात. गंगुबाई यांना जवळ जवळ २५-३० पदव्या, नमाभिधान बहाल करण्यात आली आहे, त्यात अशी पदवी मिळाल्याचे मला तरी माहित नाही). त्यांनतर काही काळाने हिंदुस्तानी गायन शिकायला सुरुवात केली. तसेच एक-दोन ग्रामोफोन रेकॉर्ड्स देखील केल्या होत्या. नंतर त्यांनी आईच्या सांगण्यानुसार सवाई गंधर्व यांच्या कडे कुंदगोळ येथे हनगल ह्या त्यांच्या गावातून रोज गाणे शिकायला येत असत. हा प्रवास रेल्वेने करावा लागत असे(Madras and Southern Maratha Railway). बरोबर तिचे मामा असत. भीमण्णा सवाई गंधर्व यांच्या घरीच राहून गाणे शिकत. गंगुबाई यांना ते त्या काळी शक्य नव्हते. स्त्री असल्यामुळे गुरूगृही न राहता, दररोज ये-जा करत, लोकांच्या हीन नजरा, आणि बोलणे चुकवत गाणे शिकावे लागले.  हि सगळी गोष्ट, मी आधी म्हटल्या प्रमाणे स्वातन्त्र्यापुर्वीच्या काळातील.

गंगुबाई यांनी प्रतिकूल परिस्थिती मध्ये अपार कष्ट करून संगीताचे शिक्षण घेतले. त्यांच्या आईचे आणि तसेच त्यांच्या इतर कुटुंबियांचे देखील त्यात योगदान आहे. गंगुबाई हनगल यांचे गाणे म्हटले कि डोळ्यांसमोर येते ती त्यांची छोटेखानी शरीरयष्टी, गाताना कानावर विशिष्टपणे हात ठेवणे, तसेच त्यांचा तो पहाडी, पुरुषी स्वर, आवाज! चरित्र वाचताना तसेच माहितीपटात त्यांची मुलाखत पाहताना त्यांचा मृदू स्वभाव, त्यांचे आई विषयी असलेले अपार प्रेम(त्या त्यांच्या पहिल्या गुरु, आणि फार लवकर त्यांचे निधन झाले) हे समजते. एक स्त्री म्हणून असलेल्या सर्व सामाजिक बंधनांना त्या काळी तोंड देऊन, वेळप्रसंगी निर्धाराने सामना करत, आपल्या ध्येयाप्रती निष्ठा बाळगून त्यांनी आपले गाणे फुलवले.

आपल्या पुण्यात जसे सवाई गंधर्व संगीत महोत्सव असतो, तसाच सवाई गंधर्वांच्या गावी, कर्नाटकात कुंदगोळ येथे नाडगिर यांच्या वाड्यात (कुंदगोळ हे गाव जमखिंडी संस्थानच्या अंतर्गत होते) देखील तो असतो. गंगुबाई थेथे जात आणि आपली संगीत सेवा सदर करत. या ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताचा प्रसार, आवड कशी जोपासली जाते आहे, एकूणच तेथील वातावरणाचे देखील या माहितीपटात छान चित्रीकरण आले आहे.

आकाशवाणी वरून गंगुबाई हनगल यांचे गाणे, का कोणास ठाऊक, विशेष ऐकू येत नाही. गंगुबाई हनगल आणि त्यांच्या सारख्या कलाकार जसे अमीरबाई कर्नाटकी, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डूकर, हिराबाई बडोदेकर, रहमानव्वा आणि इतर अनेक जणी असतील, ज्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थिती, प्रतिकूलता, प्रसंगी कौटुंबिक विरोध पत्करून, एका ध्येयनिष्ठेने कला आत्मसात केली त्याला तोड नाही. इतक्यातच शास्त्रीय संगीतावर आधारित एक वेबसेरीज आली आहे Bandish Bandits या नावाची. त्यात थोडीफार याची झलक पाहायला मिळते. तिचा विषय अर्थात वेगळा आहे. नवे आणि जुने यांच्यातील संघर्ष याचे चित्रीकरण त्यात आहे.

प्रसिद्ध गायिका वीणा सहस्रबुद्धे यांच्या वर देखील मी काही वर्षापूर्वी लिहिले होते. ते देखील जरूर वाचा.

गायिका वीणा सहस्रबुद्धे

प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका वीणा सहस्रबुद्धे ४-५ महिन्यांपूर्वीच अकाली निर्वतल्या. त्याच वेळेस हा ब्लॉग मला लिहायचा होता. पण आज-उद्या करत राहूनच गेले. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अंतर्गत कलाकारांच्या लघुपट आणि प्रत्यक्ष मुलाखती आयोजित केलेल्या असतात. ह्या उपक्रमाचे नाव षड्ज आणि अंतर्नाद असे आहे. हे कार्यक्रम शिवाजीनगर जवळ असलेल्या सवाई गंधर्व स्मारक समितीच्या इमारतीत होतात. ह्या वर्षीच्या षड्ज मध्ये वीणा सहस्रबुद्धे यांच्यावर असलेला लघुपट दाखवला जाणार आहे हे समजले आणि मानाने उचल खाल्ली. काही झाले तरी तो पहायचा असे ठरवले आणि त्यांच्यावर ब्लॉग लिहायचं हे मनाशी पक्कं केलं.

मी साधारण २००४ च्या आसपास, शास्त्रीय संगीत आपल्याला जाणून बुजून ऐकता येण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत होतो. कानसेन होण्यासाठी संगीताच्या व्याकरणाची, इतिहासाची थोडीफार ओळख होणे हे आवश्यक असते. त्याच सुमारास समीर दुबळे यांच्या तर्फे संगीत परिचय(Music Appreciation) नावाचा २-३  पाच दिवसांचा असा एक कोर्स होता, ज्यात व्याकरण, प्रात्यक्षिके, इतिहास, घराणी, शास्त्रीय संगीताचे प्रकार, इत्यादींची माहिती करून देण्यात आली. आकाशवाणी वरील शास्त्रीय संगीताचे आलाप इत्यादी कार्यक्रम वेळ काढून ऐकू लागलो. तेव्हा मला वाटते वीणा सहस्रबुद्धे यांचे नाव कानावर पडले. आणि मला आठवते त्याप्रमाणे, त्यांनी गायलेला तराणा मला भावाला होता. त्यानंतर मग केव्हातरी असेच शोध घेता घेता एकदा असे समजले की वीणा सहस्रबुद्धे यांनी मुंबईच्या आणि कानपूरच्या IIT मध्ये एक संगीत प्रशिक्षण अभ्यासक्रम तेथील तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला होता. त्यांनी The Language of Raga Music नावाची संगीत परिचयात्मक एक CD देखील काढली होती असे समजले. त्यांचे पती हरी सहस्रबुद्धे यांच्या ईमेलवर संपर्क साधून चौकशी केली. ते पुण्यातील औंध भागात कुमार क्लासिक मध्ये राहतात हे समजले. आणि मी त्यांच्या घरी एके दिवशी धडकलो. ही साधारण फेब्रुवारी २०१० मधील गोष्ट. त्यांना बरे नव्हते. ती मी घेतली, तसेच ‘उत्तराधिकार’ नावाचे त्यांनी हिंदी मध्ये लिहिलेले जो संगीत विषयावरील विविध लेखांचा संग्रह आहे. त्यांचे पिता शंकरराव बोडस यांच्याबद्दलही त्यात त्यांनी लिहिलेले आहे. त्यावेळेस का कोणास ठाऊक त्यांच्या सोबत फोटो घेण्याचे राहून गेले, त्याची रुखरुख वाटते आहे. त्यांनी तराणा याच विषयावर एक दीर्घ निबंध लिहिला होता. त्याचे असलेलेल्या फाईल्स त्यावेळेस मला इंटरनेट वर मिळाल्या होत्या. पण आता शोधले तर ते दुवे नाहीसे झाले आहेत. हे सगळे सांगायचे कारण यावरून मला असे मत झाले त्या नुसत्या practicing performer नव्हत्या तर, तर त्याबद्दल त्या लिहायच्या, बोलायच्या, वेगवेगळया भाषेत, वेगवेगळया पातळीवरील संगीत शिकू इच्छिणाऱ्याना शिकवत, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री करून त्याचा त्यांनी उपयोग करू शकल्या. या सर्वामुळे त्यामुळे त्या musicologist होत्या, जे खूप कमी कलाकारांमध्ये पाहायला मिळते.

मला तरी वाटत नाही २०१० नंतर त्यांच्या मैफिली झाल्या असाव्यात. आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर आज त्यांच्यावरील लघुपट पाहायला मिळाला. तो लघुपट फिल्म्स डिव्हीजनने तयार केला आहे. त्यांचे पिता शंकरराव बोडस त्यांच्या तरुणपणी कानपूरला स्थायिक झाले, तेथेच राहून त्यांनी संगीत शिक्षणाचे कार्य केले. वीणाजी यांचे जन्म, बालपण तेथेच गेले. त्यामुळे हिंदी भाषा त्यांना चांगली अवगत झाली(आणि त्याचा पुढे गायनामध्ये फायदा झाला). १९८४ मध्ये ते पुण्यात आले. त्यांना त्यांचे पती हरी सहस्रबुद्धे यांची चांगली साथ लाभली. त्यांनी त्यांचे भरपूर रेकॉर्डिंग करून ठेवले आहे, जे इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. हरिप्रसाद चौरसिया, मुंबईतील Rhythm House(जे नुकतेच बंद झाले) चे Amir Curmally , तसेच मिलिंद गुणाजी यांचे त्यांच्याबाद्दले मनोगत, त्यांच्या औंधच्या घरातील, रियाजाच्या वेळेचे रेकॉर्डिंग, त्या शिकवत असतानाच्या वेळचे रेकॉर्डिंग पाहायला मिळाले. हे सर्व पाहून त्यांच्या भेटीच्या आठवणी जाग्या झाल्या.