रंग सम्राज्ञी कुकनूरु रहमानव्वा

रंग सम्राज्ञी कुकनूरु रहमानव्वा

मूळ कन्नड लेख: अजित फोफर्डी
प्रसिद्धी: कस्तुरी मासिक ऑगस्ट 2019

मराठी अनुवाद: प्रशांत कुलकर्णी

अनुवादकाची टीप: रहमानव्वा हि स्वातंत्र्यपूर्व काळातील गायक-नटी. अमीरबाई आणि गोहरबाई कर्नाटकी या दोन बिळगी भगिनीसारखीच(ज्यांच्या बद्दल मी पूर्वी ह्याच ब्लॉगवर लिहिले आहे). रहमानव्वा कायमच कन्नड रंगभूमीवर कार्यरत राहिल्या. अमीरबाई पुढे हिंदी चित्रपटात गेली, तर गोहरबाई पुढे बालगंधर्वांच्या सोबत मराठी रंगभूमी वर आली. या दोघी गायिका म्हणून प्रसिद्धीस आल्या. तर रहमानव्वा हिने नाटकातील अभिनय आणि नाटक मंडळी चालवणे हे प्रामुख्याने केले. रहमानव्वा हि हैदराबाद-कर्ह्यानाटकातील, तर बिळगी भगिनी मुंबई-कर्नाटक भागातील. तश्या अपरिचित कलावती बद्दल कस्तुरी ह्या कन्नड मासिकात वाचले. तिच्या बद्दल मराठी वाचकांना माहिती करून देणारा हा लेख मला अनुवादित करायला खूप आनंद झाला.

परिचय

रहमानव्वाचा जन्म मुळा नक्षत्रावर झालेला. गुरांचा चरायवास नेणे हे तिचे काम करी. पण तिचे नशीब असे की नाटकांतून भूमिका करायला मिळाल्या. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. कायम हिरोईनचे काम त्यांना मिळाले! सहा दशकांहून अधिक काल कन्नड रंगभूमीवर रंगनायकी म्हणून त्यांनी मिरवले. आपल्या अकरा मुलांपैकी सहा मुलांना तिने रंगभूमीवरच जन्म दिला. मरण पावलेल्या मुलाला मूठमाती देऊन आला दिवस चेहर्‍याला रंग लावून ती रंगभूमीची पायरी चढली. जगलेल्या पाच मुलांना तिने रंगभूमीस अर्पण केले. अशी होती त्यांची रंगभूमीवरील श्रद्धा, संलग्नतेचे प्रतीक. रंगभूमीच त्यांचा श्वास आणि तेच त्यांचे दुसरे नाव. ही पुरुषाशी छाती असणार्‍या स्त्रीने स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा भाग घेतला होता. भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांकरीता जंगलात जाऊन त्यांच्या साथी जेवणाचे डबे झाडांवर बांधून आली. रझाकार चळवळीच्या दरम्यान तिने पुरुषी वेश धरण करून हेरगिरीसुद्धा केली. स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या नाटक कंपनीत अन्न वस्त्र देऊन सहारा दिला. देशासाठी अहर्निश सेवा करणार्‍या या मातेच्या पाचवीला गरीबी पूजली होती. ती मरण पावल्यानंतर स्मशानभूमीत तिला दफन करण्यासाठी जागा देण्यास मज्जाव केला. तिच्या मुलांनी कुर्‍हाडी घेऊन प्रतिकार केल्यावर तिच्या दफनाची सोय झाली.

 

सुरुवातीचे दिवस

तो 1915चा काळ होता. उत्तर कर्नाटक, त्यातही हैदराबाद-कर्नाटक म्हणजे निरक्षरांचा प्रदेश. त्यातील कोप्पळ जिल्ह्यातील यलबुर्गी तालुक्यातील कुकनुरू हे कुग्राम. तेथील एका देवदासी असलेल्या घरी हुसेनव्वा नावाच्या शिक्षिकेच्या पोटी तिचा जन्म झाला. त्यात तिचा मुळा नक्षत्रावर जन्म झाला. अशी मुले ही घरदार विकून, माता पित्यांच्या जीवाला धोका निर्माण करतात असा अंधविश्वास तेथील समजात आहे, आजही तो आहे.

ह्या मुलीचे नाव रहमानबी असे ठेवण्यात आले. तिची आई सततच्या आजारपणामुळे ती जन्मल्यावर सहा-आठ महिन्यातच, जसे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली तसे होऊन, निर्वतली. रहमानबीचे वडील कोण माहीत नाही. तिची आज्जी हसनव्वा हिच्यावर नातीचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली. दररोज चारेक घरी जाऊन भिक्षा मागून आणल्यावरच तिची तोंडाची आणि पोटाची गाठ पडे. त्यातच नातीचा अतिरिक्त भार तिच्यावर आला. तरीही तिने 7-8 वर्षे कसाबसा तिचा सांभाळ केला. कुकनूरु गावाजवळील तळकल्लू गावातील वेंकरेड्डी नावच्या श्रीमंत जमीनदाराच्या घरी रहमानबीला तिने गुरांचा सांभाळ करण्यासाठी सोडून आली. त्यावेळेस रहमानव्वा पूर्ती दहा वर्षांची देखील झालेली नव्हती. स्वतःकडून तिचे नीट पालनपोषण होत नसल्यामुळे, जमीनदाराच्या घरी कमीत कमी दूध दुभते खाऊन पिऊन काही बाही काम करत जगेल या उद्देशाने तिने हे पाऊल उचलले असावे.

बाहेरचे जग कसे असते, जीवन म्हणजे काय, याचा काहीही गंध अजून त्या कोवळ्या मुलीला, रहमानबीला थांगपत्ता देखील नव्हता. ती त्या जमीनदाराकडे गुरेढोरे सांभाळत खाऊन पिऊन ती वाढत होती. दिवस उजाडल्यावर गुरांना जंगलात चरायला घेऊन जाणे, दिवसभर त्यांच्या सोबत तेथे राहून, संध्याकाळी घरी परत येऊन, गुरांना त्यांच्या गोठ्यात बांधून, रात्रीचे जेवण करून तेथेच रात्री ती झोपत असे. अशी चार पाच वर्षे तिची दिनचर्या होती.

एके दिवशी तिचे नशीब फळफळले. नशिबाचे दरवाजे कोणाला कसे किलकिले होतील हे सांगता येत नाही तसेच झाले. अचानकपणे तिला कित्तूरच्या राणी चन्नम्मा हिची भूमिका एका नाटकात करायला मिळाली आणि ती रातोरात कन्नड रंगभूमी वरील नायिका बनली. दुसर्‍या दिवशी सकाळी तळकल्लू गावातील लोकांच्या तोंडी हिचेच गुणगान दिसत होते. “आपल्या वेंकरेड्डी यांच्या घरातील गुरे पाळणार्‍या मुलीने, म्हणजे आपल्या रहमानीने नाटकात चन्नम्माची भूमिका जबरदस्त केली…काशी काय शिकली ही मुलगी हे सगळे, आणि कधी शिकली, शाब्बास!” तिचा हा पराक्रम आसपासच्या पंचक्रोशीत पसरायला वेळ लागला नाही. दुसर्‍या दिवशी ती जेव्हा परत गुरे घेऊन जंगलात जाऊ लागली तेव्हा गावातील लोकांनी तिला बोलावून तिची वाह वाह केली, तिला दूध प्यायलाही दिले, आग्रहाने तिला जेवायलाही दिले.

गुरे पळणारी रहमानबी उर्फ रहमानी उर्फ रहमानव्वा हीने राणी चिन्नम्माची भूमिका केलांनंतर काही दिवसातच त्यावेळच्या मुघल राज्यात(म्हणजे हैदराबाद-कर्नाटक भागात) रहमान जान ह्या नावाने प्रसिद्ध झाली. सुमारे सहा दशके तिने कन्नड व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत राहिली. नायिका म्हणून रंगभूमीवर प्रवेश करून, शेवटपर्यन्त नायिकेच्या भूमिकाच केल्या, आणि नायिका म्हणूनच तिने एग्झिट घेतली. तिने पुरुष भूमिकादेखील ती स्त्री कलाकार आहे ओळखू न येईल अशा बेमालूमपणे केल्या.

कन्नड रंगभूमीवरील त्याकाळातील बहुतेक सर्व रथी महारथी कलाकारांबरोबर तिने काम केले. तिने स्वतःची अशी नाटक कंपनी दोनदा काढली, आणि दोन्ही वेळेस हात पोळून घेतले. रंगभूमीवर दंतकथा ठरलेले आनेक प्रतिभावंत कलावंत जसे, एलिवाळ सिद्धय्या स्वामी, दुर्गादास, मरुळसिद्धय्या, अर्जुनसा नाकोड, डंबळ संकणणा, गोकाक विरय्या हे सर्व तिच्या नाटक कंपनीत कधीना कधी काम केले होते, यावरून तिचा दबदबा दिसून येतो. त्या खडतर काळी रहमानव्वाच्या कंपनीत शंभरेक लोक काम करत असत, यावरून तिचे रंगवैभव समजून येते.

रहमानव्वा ही फक्त नाट्यकलाकार आणि नाटक कंपनीची मालकीण एवढीच तिची ओळख असे म्हटले तर ते चुकीचे ठरेल. ती एक स्वातंत्र्य सैनिक देखील होती. यालबुर्गी तालुका बोर्डची ती सदस्य होती, तिच्या मार्फत तिने समाजसेवा देखील केली आहे. कर्नाटक नाटक अकादमी पुरस्कार, कर्नाटक राज्य राज्योत्सव पुरस्कार तिला मिळाले आहेत. 1950 पर्यन्त तिने अनेक नट नट्यांना तिने नाट्यकलेत तयार केले आहे. केवळ कर्नाटकातच नव्हे तर, शेजारील महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश येथे देखील तिने आपली कला सादर करून कर्नाटक रंगभूमीची पताका उंचावत ठेवली आहे. अशी ही कुकनूरची रहमानव्वा उर्फ रहमान जान ही कन्नड कलाजगतात दंतकथा ठरलेल्या अमीरबाई कर्नाटकी, शांता हुबळीकर, लक्ष्मीश्वर बच्चासानी, आर. नागरत्नम्मा, ए व्ही वरदचार्य, एम पीर, आर. नागेंद्रराव, हंदीगनूर सिद्धरामप्पा सारख्या एव्हरग्रीन प्रतिभावंतापेक्षा वेगळी नाही.

अदृष्टाच्या वाटा

गुरे पाळणारी रहमानव्वा नाटकात कशी गेली ह्याची कथा देखील रोचक आहे. ती ज्यांच्याकडे राहायची ते वेंकरेड्डी जमीनदार स्वतः कलाप्रेमी होते तसेच कलेला प्रोत्साहन, आश्रय देणारे होते. ते स्वतः अभिनय देखील करत. त्यांच्या गावातील जत्रा, सण समारंभातून नाटकांचे प्रयोग ते आयोजित करत असत. जानपद, आणि इतर संस्कृती कार्यक्रम आयोजित करण्यात ते हौशी होते. गावातील आणि आसपासच्या गावातीलही स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना ते सहभागी करून घेत असत. वर्षातून असे एक दोन वेळेस असे कार्यक्रम होत असत. घराघरांतून वर्गणी काढून नाटकं करण्याची परंपरा होती त्या गावात, काही हजार रुपये जामा होत असत . ती पद्धत आजही आहे, पण आज वर्गणी लाखोंनी गोला होते. घरटी ठराविक रक्कम किंवा शेतकरी कुटुंब असेल तर एकरी एक ठराविक रक्कम अशी गोळा करण्याची पद्धत त्यावेळेपासून आहे. नाटकांतील पुरुष पात्र त्या त्या गावातील पुरुष मंडळी करतात, आणि महिला पात्रांसाठी शेजारील शहरातून महिला कलाकारांना बोलवण्याची परंपरा आजही आहे.

वेंकरेड्डी जमीनदारांनी त्या वर्षी(1920) कित्तूर राणी चेन्नम्मा हे नाटक करण्याचे ठरवले. कन्नड व्यावसायिक रंगभूमीवर ह्या नाटकाचा स्वतःच असा रोचक इतिहास आहे. वेंकरेड्डी यांना हेच नाटक करण्याची स्फूर्ति झाली ती अब्बिगेरी बसवनगौडा यांच्या मुळे. ते हेच नाटक त्यांच्या कन्नड साहित्य सेवा संगीत नाटक मंडळी तर्फे ते करत असत. त्या वेळेस सुरू असलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीत हे नाटक जनामनात खूप लोकप्रिय झाले होते. हे नाटक पाहून क्रोधित झालेल्या बेळगावी जिल्ह्यातील नागनूर संस्थांनातील राजमहिलांनी त्यावेळच्या ब्रिटिश कलेक्टरच्या मुस्काटात मारली होती. या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने अब्बिगेरी यांच्या कित्तूर राणी चेन्नम्मा, झाशी राणी लक्ष्मीबाई, नरगुंद बंडाय या सारख्या नाटकांवर बंदी आणली. त्यामुळे अब्बिगेरी यांच्या नाटक कंपनी तोट्यात जाऊ लागली. तरीसुद्धा या आदेशाविरुद्ध अब्बिगेरी यांनी दिल्लीच्या कोर्टापर्यंत जाऊन आले., बराच पैसे आणि वेळ खर्च झाला, पण ब्रिटिश सरकार नमले नाही.

वेंकरेड्डी जमीनदारांनी कित्तूर राणी चेन्नमा हे नाटक पहिले होते. त्यांना त्या नाटकावर नंतर बंदी आली आहे हे देखील समजले होते. तरी सुद्धा त्यांनी आपल्या गावात तेच नाटक करायचे ठरवले. त्याची गावात तालिम देखील सुरू झाली. दोन तीन महिन्यात रंगभूमीवर रंगीत तालिम होणार होती. गावातल्या लोकांमध्ये या नाटकबद्दल चर्चा सुरू झाली होती, उत्सुकता वाढत होती. रंगीत तालिमीच्या काही दिवस आधीच नाटकात राणी चेन्नम्माचे काम करणारी हुबळीची नाती जमनाबाई ही अचानकपपणे गायब झाली.

कित्तूर राणी चेन्नम्मा

प्रमुख कलाकार जमनाबाई बेपत्ता झाल्या मुले वेंकरेड्डी आणि गावातील इतर आयोजकांवर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली. त्यावेळेस गावातील काही मुलं वेंकरेड्डी कडे आली आणि म्हणाली, ‘धनी धनी, तुमच्या घरातील ती गुरे पाळणारी मुलगी आहे ना, ती रहमानव्वा, तिला कित्तूर राणी चेन्नम्मा या नाटकाचे संवाद माहिती आहेत आणि खूप छान बोलते. तो हुबळीची नटी जशी तलवारबाजी करायची, तसेच ही रहमानव्वा देखील करते’. वेंकरेड्डी जमीनदाराला हे ऐकून हायसे वाटले. त्याने तातडीने जंगलात गुरे चरायला घेऊन गेलेल्या रहमानव्वा निरोप धडला आणि तिला बोलावून घेतले. ती घाबरत घाबरत नाटकाची तालिम जेथे सुरू होती, तेथे आली. तेव्हा तिचे अंदाजे १३-१४ वर्षे वय असावे. तालमीच्या वेळेस जमनाबाईला धरायला देण्यात येणार्‍या गाढवाला रहमानव्वाच्या हाती सोपवले. कित्तूर राणी चेन्नम्माचे संवाद म्हटण्यास तिला वेंकरेड्डी यांनी आदेश दिला. रहमानव्वाने न घाबरता तिने ते संवाद म्हटले आणि तसेच गाणी देखील म्हटली. ह्या मुलीने एखाद्या वीरासारखी सकच्छ सदी नेसून जमनाबाई यांच्या सारखेच आवेशपूर्ण आविर्भावात म्हंटलेले संवाद ऐकून तिचा तो अभिनय आवेश पाहून वेंकरेड्डी आणि त्यांचे सहकारी अवाक झाले. सगळ्यांना आनंद झाला. जमनाबाईल जायचे असेल तर जाऊदे ह्या मुलीकडून राणी चेन्नम्माचे पात्र करवून घेऊया या निर्णयापर्यन्त सर्वजण आले. तिचा तो सडसडीत बांधा, तार स्वरातील ध्वनि, चेहर्‍यावर राजकुमारीसारखे तेज, हे सर्व पाहुन वेंकरेड्डी समोरचा मोठा प्रश्न अगदी सहजपणे सुटला.

नाटकाच्या पहिल्या प्रयोगासाठी अजून काहीच दिवस शिल्लक होते. नाटकाच्या तालिम मास्तरांनी सगळ्या कलाकारांना एकत्र करून रात्रंदिवस तालिम करवून घेवून, रंगीत तालिम सुद्धा घेतली. रहमानव्वाचे संवाद थोडे अशुद्ध भाषेत होते, ते तिला समजावून त्यात सुधारणा करून घेतली. रंगभूमिवर प्रवेश कसं करायचा, प्रवेश संपल्यावर परत विंगेत कसे याचे हे देखील तिला सांगितले. सिंहासनावर कसे बसावे, हात कसे वर करावे, समोर असलेल्या कुठल्या पात्रावर कशी तिची दृष्टीफेक असावी, तसेच दीर्घ श्वास घेऊन ब्रिटीशांच्या विरोधी आक्रोश कसा करायचं, ब्रिटिश कप्तान जॉन ठ्याकरे समोर असताना करावयाचे अभिनिवेश हे सर्व तिला बारकाईने तालिम मास्तरांनी समजावले.

नाटकाच्या पहिल्यावहिल्या प्रयोगाचा दिवस उजाडला. कित्तूर राणी चेन्नम्मा होऊन ती रंगभूमीवर ती आलीच. गावातील लोक अभिमानाने एकमेकांना सांगू लागले, हीच आमच्या गावची रहमानव्वा, अगदी कौतुकाने विचारात होते की कशी करते आहे रहमानव्वा चेन्नम्माची भूमिका. तिचे ब्रिटिश सैन्याविरुद्ध आवेशपूर्ण संवादफेक पाहून प्रेक्षक भारावून जात असत.

तळकल्लू आणि आसपासच्या पंचक्रोशीतील गावांतील लोकांमध्ये तिचेच नाव, तिचीच प्रशंसा होत होती. पहिला प्रयोग रात्री झाला, आणि दुसर्‍या दिवसाच्या सकाळपासून ती रहमानव्वा न राहता रहमान जान झाली. तेव्हा पासून ह्या भागात केव्हाही हे नाटक झाले की कित्तूर राणी चेन्नम्माच्या भूमिकेत तिचे नाव कायमच झाले. जवळ जवळ दशकभर हे पात्र करत असलेल्या हुबळीची जमनाबाई, गदगची रत्नम्मा ह्या दोघीही हलल्या. आणि रहमानव्वाच्या नशिबाचे दार किलकिले झाले.

स्वातंत्र्यलढ्यातील धामधूम

दररोज रात्री नाटकाच्या तालिमघरात जाऊन नाटकाच्या तालमी पहात बसण्याचा रहमानव्वाच छंद तिला त्याच नाट्यक्षेत्रात ओढून घेऊन आला आणि तिच्या मेहनतीमुळे आणि प्रतिभेमुळे हुबळीच्या जमनाबाई आणि गदगची रत्नम्मा ह्या दोघींना प्रेक्षकांना विसरायला लावले. तिच्या जीवनात भाग्योदय झाला. तिच्या मधील कला प्रतिभा ओळखून वेंकरेड्डी यांनी तिला एक नाटक कंपनी देखील काढून दिली., जिचे नाव श्रीरंजनी नाट्य संघ, तळकल्लू असे होते. त्या वेळच्या अनेक ख्यातकीर्त नाटक कंपन्यांनी तिला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. एक दोन वर्षातच कुकनूर रेहमानव्वा हैदराबाद-कर्नाटक भागात आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावले. त्यावेळेस तिचे वय अवघे १५-१६ वर्षांचे होते. तो काल प्रामुख्याने पौराणिक, ऐतिहासिक, नाटकांचा होता. सामाजिक नाटकांची संख्या तशी कमीच. पण पुढे सामाजिक नाटकांची संख्या वाढू लागली.

तिने एणगी बाळप्पा यांच्या कलावैभव नाट्यसंघ, बसवनप्पा यांच्या श्री शारदा नाटक मंडळी, हंदीगनूर सिद्धरामप्पा यांच्या गजानन नाटक मंडळी, विश्वरंजनी नाटक मंडळी, चिंदोडी विरप्पा यांच्या श्री करीबसवरज ड्रामा कंपनी या सारख्या नाटक कंपन्यात काम केले. त्या नंतर वेंकरेड्डी यांनी काढलेल्या नाटक कंपनीत कायम शेवटपर्यन्त काम करीत राहिली. कित्तूर राणी चेन्नम्मा या नाटकात तिने नायिकेचे काम करून नाट्यक्षेत्रात आपले पाय ठेवले, आणि शेवटपर्यन्त तिने नयिकेच्याच भूमिका केळया. ही कामगिरी अतिशय दुर्मिळ आहे.

हेमरेड्डी मालम्मा, बेलवडी मालम्मा, चित्रांगदा, द्रौपदी, तारामती, कुंती, जयंती, सिंगल राणी, नरसम्मा, सीता, सारख्या पौराणिक, ऐतिहासिक नायिकेच्या भूमिका केल्या, तसेच सामाजिक नाटकांतून देखील नायिकेच्याच भूमिका तिने निभावल्या. नायकीचे किंवा त्याच तर्‍हेचे खलनायिकेचे पात्र जर नाटकात मिळणार नसेल तर ती काम करण्यास नकार द्यायची. किंवा नाटक कंपनी सोडून जात असे.

संपूर्ण रामायण, कुरुक्षेत्र, रक्तरात्री, अक्षयांबर, सत्य हरिश्चंद्र, चित्रांगदा, मातंग कन्या, रेणुका यल्लम्मा, लंका दहन, दैवदुरंत कर्ण, अग्नि कमल, बालचंद्र, नेल्लुरू नंबक्का, टिपू सुलतान, बडतनद भूत, दत्तूपुत्र, निर्मला, हसिरू बळी, गुणसागरी, गुलाबकावली, स्त्री रत्न, हळ्ळी हुडुगी, बेळ्ळि चुक्की, तायी करळू, सिंदूर रक्षण, हुच्चर राज्य, रत्न मांगल्य ह्या सारख्या शंभराहून अधिक नाटकातून रहमानव्वा नायिकेच्या भूमिका केल्या. साठ वर्षांच्या कारकिर्दीत तिने नाटकांचे हजारेक प्रयोग केले.

रहमानव्वाच्या बरोबर कन्नड रंगभूमी वरील त्यावेळच्या अनेक प्रथितयश कलाकारांनी काम केलेले दिसते. रक्तरात्री नाटकात एलिवाळ सिद्धय्यास्वामी यांनी अश्वथाम, आणि ही द्रौपदी. सत्य हरिश्चंद्र नाटकात हंदीगनूर सिद्धरामप्पा हे राजा हरिश्चंद्र तर हिची भूमिका ताराबाई होती. कित्तूर चेन्नम्मा, कित्तूर रुद्रम्मा नाटकातून डी. दुर्गादास हे मल्लसर्ज झाले होते, तर हिने अनुक्रमे राणी चेन्नम्मा आणि रुद्रम्मा ह्या भूमिका केल्या होत्या.

रहमानव्वा एकदा जुन्या मैसूर येथील शांतिनिवास नाटक कंपनी मध्ये जाऊन एका नाटकात अभिनय केला तेव्हा डॉक्टर राजकुमार आणि पंढरीबाई तेथे होते, त्यांनी तिचा अभिनय पाहून तोंडात बोटे घातली.

कुकनूर रहमानव्वा ही हैदराबाद-कर्नाटक ह्या तश्या मागासलेल्या भागातील ग्रामीण संस्कृतीतील प्रतिभा होती. हिने एखाद्या वेळेस कन्नड चित्रपट क्षेत्रात जर पदार्पण केले असते तर, तिने लीलावती, पंढरीबाई सारख्या प्रसिद्ध कलाकारांबरोबर बरोबरीने काम केले असते. पण तशी तिला संधि मिळाली नाही. अभिनय कलेचा जीवंत आविष्कार असलेल्या रंगभूमीलाच तिने आपले मानले. अनेक छोट्या मोठ्या कलाकारांना तिने बरोबर घेऊन त्यांना तयार करून त्यांच्या बरोबर काम केले. गरिबीवर मात करून कलेच्या झेंडा तिने उंच फडकावला आणि नाट्य क्षेत्रात मैलाचा दगड बनली.

जाती धर्मपलीकडील कुटुंब

रहमानव्वा रंगभूमी वर येऊन 3-4 वर्षातच म्हणजे तिच्या वयाच्या 16 व्या वर्षी तीचे लग्न नंदराज मेवुंडी या एका हौशी नटासोबत झाले. जाती धर्मनिरपेक्ष तत्वे पाळण्याची सुरवात तिच्या लग्नापासूनच झाली. नंतर पाती नंदराज दलाली संस्थेची खासगी नोकरी सोडून काही वर्षे रहमानव्वा सोबतच नाटक कंपनीत काम केले.

तिच्या मुलांची नावे तिने हिंदू आणि मुस्लिम अशी दोनशी ठेवली. थोरल्या मुलाला, जमालसाब, याला, ती बाबण्णा असे संबोधित असे. सून मेहबूबबील महादेवी असे ती म्हणायची. उम्मरसाबला उमेश, जन्नतबील ललिता, महम्मदबीला मंजुळा, सून गोरीमाळला चेन्नम्मा असे ती संबोधित असे. नातवांना ममता, नवीन, दानम्मा, आप्पाजी, राज, शाहिरा, यशवंत, सरोजा अशी नावे तिने ठेवली!

हिंदू मुस्लिम दोन्ही सण ती साजरे करत असे. रामजान, बकरी ईद, बिर्याणी, शिर कूर्मा असे पदार्थ, तर दसरा, दिवाळी, गुढी पाडवा या दिवशी कडबू, पुरणपोळी, खिचडी या सारखे पदार्थ ती घरी करत असे. दर्ग्याला जाऊन फुले, चादर अर्पण करून येत असे. देवळात जाऊन अभिषेकादी पूजन करत असे. तिच्या घरातील देव्हार्‍यात मक्का मदिनाच्या चित्रांसोबत नटराज, शिव, राम, कृष्ण, पुट्टज्जा पंचाक्षरी यांचे चित्र होती, आणि ती त्यांची समान पुजा करीत असे. आजही तिचा थोरला मुलगा असलेला बाबण्णा ही पुजा पद्धती चालवत आहे. प्रत्येक वर्षी गदगच्या पंडित पंचाक्षरी गवायी यांच्या पुण्यतिथिच्या वेळेस जाऊन त्यांच्या समाधीचे ती दर्शन घेत असे.

खरे सांगायचे म्हणजे, तिच्या एवढे धर्मनिरपेक्ष भावनेने काम करणारे त्या वेळच्या नाटक मंडळीत दुसरे कोणी नव्हते. धर्मनिरपेक्ष बद्दल बोलणारे राजकारणी आणि समजतील इतरांनी तिच्या कडून हे शिकायला हवे.

काट्याकूटांचा रस्ता

जरी रहमानव्वा साठ वर्षे नाट्यक्षेत्रात किर्तिच्या शिखरावर राहिली, तरी तिची वाटचाल ही अतिशय खडतर होती, काट्याकूटांनी भरलेली होती. तिच्या आयुष्यातील अनेक अश्या कठीण प्रसंगांकडे पहिले तरी अंगावर काटा येतो.

त्यावेळच्या अनेक नाट्यकलाकारांसारखे रहमानव्वा ने देखील एक नाही तर दोन नाटक कंपन्या सुरू केल्या. श्री महामाया नाट्यसंघ, श्री ललित कला नाट्य संघ ह्या ती दोन नाटक कंपन्या. त्यातून तिने काही कमवण्यापेक्षा तिने गमावलेच अधिक. सुमारे 16-17 वर्षे कुकनूर मध्ये कंपनी चालवल्यावर सहा एकरी शेतजमीन घेता आली, हाच तो काय लाभ. पण दुर्दैव असे की, तिचा धाकटा मुलगा मुन्ना ह्याला मोटार अपघातात गंभीर जखमी झाल्यावर मणिपाल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी, ती शेतजमीन देखील विकवी लागली. पण मुन्ना त्या अपघातातून बारा होऊन परत नाटकातून काम करायला लागला. ती शेतजमीन विकल्यानंतर आजही तिला रहमानव्वाचे शेत असेच ओळखतात. 1960 मध्ये धारवाड जवळ सत्तुरू गावाजवळ एका भीषण मोटार अपघातात तिची मुले ललिता, मंजुळा, जावई निंगनगौडा हे जागीच मरण पावल्याचे तिला पाहावे लागले. मुन्ना वाचला तरी, अपंग झाला, तिची नातवंडे अनाथ झाली.

ती इतरांसारखी नाटक कंपनी चालवली नाही. त्या काळात तिच्या कंपनीत काम करणार्‍यांसाठी राहण्याची व्यवस्था तिने उत्तम ठेवली होती. खाण्या पिण्याची आबाळ कधी झाली नाही. इतर कंपन्यात साहसा जेवणासाठी सार भात एवढेच नव्हते. 1966 मध्ये आंध्रप्रदेश मधील आडवाणी यांच्या बदन्याळ येथील मुक्कामात तिच्या नाटक कंपनीला आग लागली आणि संपूर्णपणे नष्ट झाली. तरी सुद्धा तिने माघार घेतली नाही. असेल नसेल ती दागिने, आणि इतर पैसा लाऊन तिने परत नाटक कंपनी उभी केली. ती शेवटपर्यन्त तिने यशस्वी पणे चालवली.

बर्‍याच लोकांना माहिती नाही. डॉक्टर राजकुमार, मंजुळा, वज्रमुनी, यांच्या अभिनयाने नटलेला एक कन्नड चित्रपट ‘संपत्तिगे सवाल’ याचे मुळ कथा ही उत्तर कर्नाटकातील नाटककार पी. बी.
धुत्तर्गी हे होत. त्यांना रंगभूमीवर आणले ते कुकनूर रहमानव्वा कल्मनी हिने. ही गोष्ट धुत्तर्गी यांनी राजकुमार यांना सांगितल्यावर रहमानव्वाची भेट घेतली आणि तिला धन्यवाद दिले.

धुत्तर्गी यांनी लिहीलेल्या ‘ताईय करळू’ हे नाटक त्यावेळच्या प्रसिद्ध कलाकार, नाटक कंपनी मालक एणगी बाळप्पा हे नाटक करण्यास असमर्थता दर्शवल्यावर रहमानव्वाने आपल्या नाटक कंपनीतर्फे ते केले, त्यात तिने नायिकेची म्हणजे गौरम्माची भूमिका देखील केली. त्या नंतर बर्‍याच नाटक कंपन्यांनी देखील करून बक्कळ पैसा कामावला असा इतिहास आहे. अशी ही धाडसी रहमानव्वा होती.

तिने फक्त नाटक कंपनीच चालवली नाही. तिला आपल्या राज्याबद्दल कळकळ होती. रहमानव्वाने नाटक कंपनी सुरू केल्याचा काळ हा स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीचा होता. तिने भूमीगत स्वातंत्र्य सैनिकांना कायमच आपल्या नाटक कंपनीत आश्रय दिला, अन्न, निवारा दिला. ब्रिटिश सरकारचे पोलिस त्यांच्या शोधात नाटक कंपनीत आले असता, त्या स्वातंत्र्य सैनिकांना रंगभूषा करून नाटकातील पात्र आहेत असे सांगून त्यांना गुंगारा देत असे. या स्वातंत्र्य सैनिकांसाठी ती जंगलात त्यांच्या साठी अन्न पाठवत असे.

नंतरच्या काळात हैदराबाद राज्याचा नवाबाची राजकार संघटना देश विरोधी कारवाया करत असताना, हल्ले करत असताना देखील तिने स्वातंत्र्य सैनिकांना मदत करणे थांबवले नाही. राजकरांशी मुकाबला करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली मुरडी भीमज्जी, पुंडलिकप्पा ज्ञानमोठे, डॉक्टर जी. एस. मेलकोटे, आर. व्ही. भिडप, पुंडलिक कुष्टगी, कोळुरू मल्लप्पा, जनार्दन राव देसाई, बुर्ली बिन्दुमाधवराव, जयतीर्थ राजपूरोहित, कोळेकर नरसिंहरायरू गजेंद्रगड वगैरे कुष्टगी येथील शिबीर असो किंवा इतर उपशिबिरे असोत, रहमानव्वाने या सर्वांना मदत केली. राजकरांच्या हालचालीची माहिती ह्या लोकांना ती पुरवत असे. ही माहिती मिळवायला ती वेश बदलून आपल्या गावातील चहा दुकानात, विड्या देखील फुकट, सोंग घेत ती लोकांत मिसळत असे. ह्या बद्दल अनेकांनी दुजोरा दिला आहे, जसे की कर्नाटक विधान परिषदेचे माजी सभापती डी. बी. कळ्मणकर, गुलबर्ग्याचे प्रसिद्ध वकील कुसुमाकर देसाई, गजेंद्रगडचे अंदानप्पा कुंदरगी,

गाढ रंग श्रद्धा

रहमानव्वाची रंगभूमीप्रती अपार श्रद्धा होती. हे अनेक घटनांमधून दिसून येथे. मुडगल येथे तिच्या नाटक कंपनीचा मुक्काम पडलेला. ताराबाईची भूमिका ती करत होती. ती गर्भवती होती, दिवस अगदी भरलेले होते. तिचे दृश्य संपवून विंगेतून ग्रीन रूम मध्ये आली आणि तेथेच प्रसूत झाली. तिला मुलगी झाली, तिचे नाव मंजुळा. पुढच्या दृश्यात तिच्या मुलाला बाबण्णा याला साडी नेसवून त्याला नाटकात पुढील दृश्यांसाठी पाचारण केले. आणि तिसर्‍याच दिवशी पुढील प्रयोगासाठी ती सज्ज झाली!

पुढे नाटक कंपनीचा मुक्काम गब्बुरू येथे होता. तेच नाटक आणि तिची भूमिका देखील तीच-ताराबाई हिची. तेथेही ती प्रसूत झाली ग्रीन रूम मध्येच, ह्या वेळेस मुलगा झाला, मुन्ना त्याचे नाव. अजून एक उदाहरण द्यायचे तर, कंपनीचा मुक्काम यलबुर्गा येथे होता. नाटकाचे नेपथ्य लावायचे काम चालू होते. त्याच वेळेस तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. ह्या वेळेस चेन्नम्मा नावच्या मुलीला तिने जन्म दिला. असेच अजून एक दोनदा झाले, जसे मुद्दापुर, सिंधनूर येथील नाटक कंपांनीच्या मुक्कामी झाले. दोनही वेळेस झालेली मुले मात्र फार जगली नाही. बळ्ळारी जिल्ह्यात मुक्काम होता. ती गरोदर होती, आणि एक दोन दिवसापूर्वीच ती प्रसूत झाली होती. ओली बाळन्तीण. नाटक कंपनीचा मुक्कामचा शेवटचा दिवस, पुढे जायची तयारी सुरू झाली होती. पुढच्या मुक्काम ठरला होता. तान्ह्या मुलाला तेथेच झोपवून, साथीदारांना सांगून ती पुढे व्यवस्था करण्यास गेली. परत आल्यावर समजले, ते मूल दगावले आहे. तिने धैर्याने त्याचा अंत्यविधी करून, डोळ्यातील अश्रुंनी पुढील नाट्य प्रयोगासाठी चेहर्‍यावर रंग लावला. अशी ही महान रंगभक्त!

दुसर्‍या एका प्रसंगात, एके ठिकाणी, ती रंगभूमी असतानाच, तिला गर्भपात झाला! पण थोडेसे उपचार करून परत पुढील दृश्यासाठी रंगभूमीवर परत आली. तिच्या अकरा मुलांपैकी सहा मुले जी रंगभूमीवर जन्मली, ती सर्व जगलीच नाही, त्याला हे सर्व करणीभूत असावे. फक्त दोनच जगली-मुन्ना आणि मंजुळा. ती दोघेही पुढे चांगले अभिनेते झाले. तिच्या मुलांपैकी आता फक्त बाबण्णा हे एकटेच अजूनही आहेत. त्यांचे वय 75, आणि ते आजही अभिनय करत आपले जीवन जगत आहेत.

धैर्यवान स्त्री

रहमानव्वा सारखी धीरोदत्त स्वभावाची स्त्री कलाकार कन्नड नाट्य क्षेत्रात दुसरी नसावी. दिसायला सुंदर, प्रतिभावंत, उदार मनाची, जेव्हा अन्याय होतो आहे असे दिसले की ती पेटून उठे. एकदा लिंगनबंडी मौनेश्वरच्या जत्रेत तिच्या नाटक कंपनीचा मुक्काम होता. आधीच्या दोन्ही मुक्कामात तिच्या नाटक कंपनीचे नुकसान झालेले होते. तिला काही कारणाने परवाना मिळाला नव्हता. कंपनीतील 50-60 जणांचा खाण्या पिण्याचा प्रश्न होता. नाटक झाले तर पोटा पाण्याची व्यवस्था होणार होती. रहमानव्वाने नाटक सुरू करून टाकले. पोलिस आले आणि नाटक बंद करण्यास संगितले. ती त्यांच्या हातापाया पडून नाटक सुरू ठेवण्याविषयी विनंती केली, पण त्याचा काही फायदा झाला नाही. तर मग तिने काय करावे? तिने आपल्या मुलांना सांगून त्या पोलिसाला थिएटरच्या मागे झाडाला बांधून टाकले! नाटक संपल्यानंतर त्याला सोडले आणि वर म्हटले काय करायचे ते करून घ्या!

तिच्या नाटक कंपनीचा सुरपुर जवळ रंगमपेठ येथे मुक्काम होता. दोन गुंड लोकं नाटकाचे तिकीट न घेता नाटक पाहायला थिएटर मध्ये येऊन बसले. थिएटर पूर्ण भरलेले पण गल्ला मात्र रिकामा. तिने रंगमंचावर जाऊन घोषणा केली, जे आपल्या बापचे मुलं असतील त्यांनी तिकीट घ्यावे, आणि जे नसतील त्यांनी तिकीट न घेता नाटक पाहावे! झाले, सगळे लोकं उठले, आणि तिकीट घेऊन आले आणि मग नाटक सुरू झाले. सुरपूर मध्येच एका खासगी बसचा कंडक्टर दरात थांबून आत चढणार्‍या स्त्रियांच्या अंगलट येत असे. बाजूला सरक असे म्हटल्यावरही ती तिथेच उभा राहत असे आणि वर म्हणत असे, याचे तर या, नाही तर मागच्या बसने या. रहमानव्वाने जेव्हा हे पहिले तेव्हा त्या कंडक्टर कॉलर पकडून त्याला खाली ढकलून ती मग वर बस मध्ये चढली, तेव्हा त्याने ब्र ही उच्चारला नाही!

असेच एकदा चिंचोळी येथे नाटक कंपनीचा मुक्काम होता. काही गुंड लोकं तिकीट न घेता नाटकाला येऊन बसले. ती लोकं नाटक कंपांनीच्या लोकांना जुमानत नव्हते. मग तिने पुढे जाऊन त्यांचा समाचार घेऊन त्यांना पोलिसात दिले आणि मग पुढे नाटक सुरू केले. रहमानव्वाच्या रंगयात्रेत असे अनेक प्रसंग आहेत.

नायिकेची भूमिका करत रंगभूमीवर पदार्पण केलेल्या रहमानव्वाने आयुष्यभर नायिकेच्याच भूमिका केल्या. दुय्यम भूमिका केल्याच नाहीत. इतिहासात अशी कलाकार दुसरी कोणी नसावीच. तिला कोणी गॉडफादर नव्हते, स्वतःची कारकीर्द तिने स्वतःनेच घडवली. इतक्यातच नाटक अकादमीने तिच्या आयुष्यावर एक टेलिफिल्म तयार केली आहे. त्याचे दिग्दर्शक आहेत परमेश्वर. तिच्या कष्टाच्या दिवसात सरकार, समाजाने तिला काही मदत केली नाही. तिच्या मृत्यूनंतरही तिच्या दफनासाठी देखील काहीतरी वाद झाला. अशी ह्या दुर्दैवी कलावतीची स्थिती.