के फाईव्ह

डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पडली, आणि त्याचे अनेक पडसाद देशभर उमटले. मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट ही त्याचीच भीषण परिणीती. ही देश हादरवणारी घटना होती. नुकतीच पंचवीसहून अधिक वर्षे होऊन गेली ह्या सर्व गोष्टीला. हा इतका स्फोटक विषय, पण यांचे मराठी चित्रपट माध्यमातून, अथवा मराठी पुस्तकातून विशेष प्रतिक्रिया मला तरी दिसली नाही. इंग्रजी, हिंदी मध्ये काही आहेत. या विषयाची पार्श्वभूमी असलेल्यामुळे गेल्या आठवड्यात जेव्हा के फाईव्ह ही प्रसिद्ध लेखक अनंत सामंत यांची छोटीशी मराठी कादंबरी हाती पडली, तेव्हा उत्सुकता वाटली, आणि दोन-तीन बैठकीत वाचून काढली. त्याबद्दल थोडेसे लिहायचे आहे.

अनंत सामंत हे पूर्वाश्रमी मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यानिमित्ताने जग फिरून आलेले असे लेखक. दर्यावदी असल्यामुळे अनेक जगावेगळे अनुभव पाठीशी आहेत. हे सर्व त्यांच्या कृतीमधून उमटते. त्यामुळे अनंत सामंत यांच्या कादंबऱ्या मला आवडतात. विषय वेगळे, मांडणी वेगळी, थोडसे बोल्ड अनुभवकथन इत्यादी मुळे त्या नक्कीच उठून दिसतात. एम् टी आयवा मारू हे ठळक उदाहरण. ती तर त्यांची पहिलीच कादंबरी. वाचायला सुरुवात केल्यावर खालीच ठेववत नाही. त्यांचे अजून एक पुस्तक ऑक्टोबर एन्ड, त्याबद्दल पूर्वी लिहिले होते.  पण के फाईव्हने कादंबरीने साफ अपेक्षाभंग केला. कादंबरीचे गुणगान करणारी पुरस्कार स्वरूप अभिप्राय पुस्तकात दिली आहेत. तरीही मला ही कादंबरी आवडली नाही. पहिल्या दोन प्रकरणात थेट काश्मीर. भारतीय सैन्यदलातील कमांडोज काश्मीरच्या खोऱ्यात एका दहशतवाद्यांच्या विऱोधातील एका कामगिरीत गुंतले आहेत. के फाईव्ह हा त्या कमांडोज पैकी एक. त्या कामगिरीचे आणि कमांडोजचे वर्णन वाचताना बाबा कदम वगैरेंची काळा पहाड वगैरे नायकाची एखादी कादंबरी वाचतो आहे की काय असे वाटते. लपलेले दहशतवादी मारले जातात, पण दहशतवाद्यांच्या तावडीत एक स्त्री असते, ती बचावते, तीला पकडले जाते, आणि तेथेच कादंबरीला कलाटणी मिळते.

बाकीची कादंबरी म्हणजे त्या स्त्रीची कहाणी तिच्या जुबानी, मुलाखतीच्या रुपाने आपल्या समोर येते. मुंबई बॉम्बस्फोटात योगायोगाने ती आणि तिचे कुटुंब सापडते आणि मुंबईत त्यादिवशी दहशतवाद्यांच्या हाती सापडते. कोकणातून मुंबईत प्रथमच ती स्त्री आलेली असते. ती मराठी मुलगी, तिच्यावर अमानुषपणे कसे अत्याचार होतात, क्रूरपणे, निर्दयपणे छळ होतो, यांचे सद्यांत ती वर्णन करते आणि आपण ते वाचतो. त्यानंतर हे दहशतवादी तीला आपल्याबरोबर काश्मीर खोऱ्यात घेऊन जातात. अत्याचाराचे हे वर्णन अनेक ठिकाणी नको इतके भडक आहे. असले ते वास्तव, अश्या अत्याचाराच्या बातम्या नेहमी वाचतोच आपण. हा कादंबरीसाठी विषय नवा नाही, त्यामुळे थोडासा भडकपणा सोडला तर त्यातून वेगळे काही मिळत नाही. तर पुढे ह्या स्त्रीला तिच्या महाराष्ट्रातील घरी परत सोडून येण्याची कामगिरी के फाईव्हचे वरिष्ठ त्याच्यावर सोपवतात. आणि ही कादंबरी मुंबई बॉम्बस्फोट झाला तेव्हाची गोष्ट विस्तृतपणे सांगण्याची संधी लेखक गमावतो असे मला राहून राहून वाटले. ती होते स्त्री अत्याचाराशी निगडीत आणखीन एक कादंबरी. ही कादंबरी अर्थातच संवेदनाशून्य समाजमनावर भाष्य करते. पण त्यात नवीन काय सांगितले गेले, असा प्रश्न पडतो.

तीला तिच्या घरी घेऊन गेल्यावर कुटुंबियांकडून तिचा स्वीकार केला जात नाही. परत नेहमीचेच कथानक. मग आपला हिरो के फाईव्ह तीला मानवतावादी दृष्टीकोनातून आपल्या घरी घेऊन जातो, वगैरे. अवघड आहे! एक अत्याचार करणारा अतिरेकी, आणि दुसरा वाचवणारा अश्या दोन पुरुषाची टोकाची रूपे चित्रित केली आहेत. या कादंबरीवर एक मराठी चित्रपट, एक नाटक देखील निघालेले आहेत, दोन्ही सपशेल आपटली आहेत. ह्या कादंबरीचे शीर्षक के फाईव्ह का हा देखील प्रश्न पडतो. ही त्या कमांडोची कथा नाहीच. ही कादंबरी १९९४च्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाली आधी, आणि नंतर पुस्तक आले. लेखक आनंद सामंत यांनी दोन उल्लेख दिले आहेत सुरुवातीला, ते थोडे वेगळे वाटले. पहिला उल्लेख, जो अर्पणपत्रिकेच्या रूपात दिसतो तो असा आहे:

चितोडच्या राणा रतनसिंगाची पत्नी राणी पद्मिनी

अनहिलवाड्याच्या राणी कर्णदेवरायाची राणी कवलदे

अनहिलवाड्याच्या राणी कर्णदेवरायाची कन्या देवलदे

देवगिरीचा राजा रामचंद्रदेवरायाची मुलगी जेठाई, छिताईबेगम आणि या अखंडित परंपरेस

सहिष्णुतापूर्ण

हा उल्लेख अर्थात इतिहासातील स्त्रियांचे, त्यांच्या बलिदानाचे गुणगान करणारा आहे, ते अर्थातच सार्थच आहे. अर्थात ही यादी आणखीन मोठी आहे, पण ही प्रातिनिधिक आहे असे समजूयात. राणी पद्मिनी शिवाय इतर स्त्रियांच्या बद्दल मला तरी माहिती नाही, संदर्भ पाहायला हवेत.

दुसरा उल्लेख आहे तो गोविंद सरदेसाईकृत मुसलमानी रियासत खंड पहिल्या भागातील आहे. आणि तिसरा आहे तो Will Durant यांच्या The Story of Civilization मधील अभिप्राय. हे दोन्ही अभिप्राय म्हणजे भारतावर झालेल्या इस्लामी राजवटीचे आक्रमण(Mohammedan Conquest) आणि अत्याचार त्यावर प्रतिक्रिया आहे. मुंबई बॉम्बस्फोट असेल किंवा एकूणच दहशतवाद हे ही एका प्रकारे असे आक्रमणच आहे असे तर अनंत सामंत यांना सुचावायचे नाही ना?

ता. क. : आजचीच बातमी अशी आहे की मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक ताहेर मर्चंट, ज्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती त्याचा येरवडा कारागृहात मृत्यू झाला. माझा हा त्या विषयावरील ब्लॉग आणि ही बातमी, काय योगायोग आहे!