वसंतोत्सव मधील संगीत सौभद्र

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात २०१८ सालच्या वसंतोत्सव हा प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ चालणारा संगीत कार्यक्रम जाहीर झाला. गेली काही वर्षे मी तेथे जातोय. ह्यावर्षी मी जाऊ शकणार नव्हतो, त्यामुळे मी मनातून चरफडलो. माझे त्याच सुमारास कामानिमित्त पुण्याबाहेर प्रवासाचे बेत हाकले गेले होते. ह्या वर्षीचे वसंतविमर्श चर्चासत्र देखील हुकणार होते. तबला वादनाच्या घराण्याच्या परंपरेबाबत तबलावादक योगेश सामसी बोलणार होते. शुक्रवारी १९ जानेवारीला रात्री उशिरा मी परत पुण्यात आलो. त्याच दिवशी वसंतोत्सवाचा पहिला दिवस होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्राचा निरोप आला की त्याच्याकडे एक तिकीट आहे, आणि मला येणार का अशी विचारणा केली. मी तत्काळ होकार भरला. त्या दिवशी संगीत सौभद्र या नाटकाचा प्रयोग रंगणार होता. वसंतराव देशपांडे यांनी संगीत नाटकं, नाट्यगीते या क्षेत्रात भरीव काम केले असल्यामुळे, वसंतोत्सव मध्ये संगीत नाटकाचे प्रयोग होत असतात. मला नाटकांची आवड तशी उशीरच लागली. कुठल्याही विषयाची आवड लागली की मी त्या विषयाच्या इतिहासात शिरतो, आधी काय झाले आहे हे अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. तसेच नाटकांविषयी देखील झाले. त्यामुळे बरीचशी जुनी संगीत नाटके परत परत नवनव्या संचात, रूपात सादर केली जाणारी, पाहिली गेली होती. पण हे नाटक निसटले होते.

image

संगीत सौभद्र ह्या संगीत नाटकाचे लेखक अण्णासाहेब किर्लोस्कर. ह्यांनी संगीत शाकुंतल हे नाटक लिहून किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी स्थापन केली. त्यांचा जन्म योगायोगाने विष्णुदास भावे यांनी संगीत सीता स्वयंवर हे संगीत नाटक सादर करून मराठी नाटकांची परंपरा ज्या वर्षी महाराष्ट्रात सुरु केली, त्याच वर्षी म्हणजे १८४३ साली झाला. त्याला होऊन ३०-४० वर्षे झाली होती. त्या युगात अर्थातच सुरुवातीची नाटके ही संगीत नाटके होती. संगीत शाकुंतल हे आता सादर होत नाही, त्यामुळे मी पाहिलेले नाही. शाकुंतल हे कालिदासाचे संस्कृत नाटक. लोक परंपरेवर आधारित लोकशाकुंतल हे कन्नड नाटक मी नुकतेच पहिले होते. संगीत सौभद्र हे किर्लोस्कर यांनी लिहिलेले आणि सादर केलेले दुसरे संगीत नाटक. अतिशय प्रसिद्धही झाले होते. मराठी नाटकांच्या इतिहासाबद्दल, त्यातही संगीत नाटक, नाटक मंडळी, कन्नड-मराठी रंगभूमीमधील देवाण-घेवाण याबद्दल माझ्या अमीरबाई कर्नाटकी या पुस्तकाच्या अनुवादामुळे बरेच जाणता आले. त्याबद्दल मी बरेच लेख देखील लिहिले आहेत. ह्या सर्व पार्श्वभूमी मुळे वसंतोत्सव मधील संगीत सौभद्रच्या प्रयोगाबाबत उत्सुकता होती.

संगीत नाटकं पूर्वीच्या काळी रात्रभर चालत असत. अर्थात वसंतोत्सवमध्ये ते शक्य नव्हते. त्यामळे तीन तासात ते बसले पाहिजे, आणि तसे ते त्यांनी बसवले आहे. ह्या नाटकात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, आनंद भाटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांनी केलेले नाट्यगीतांचे गायन हेच अर्थात मोठे आकर्षण होते. आम्हाला कार्यक्रम स्थळी पोहोचायला थोडासा उशीरच झाला होता. आतमध्ये जाण्यासाठी रसिक रांगेत उभे होते आणि रांग बरीच मोठी आणि लांबवर पसरली होती. नाटकांना प्रेक्षक कमी होत आहेत, त्यातही संगीत नाटकांना तर त्याहून कमी झाले आहेत असे चित्र सध्या आहे. त्या पार्श्वभूमीवर ही गर्दी तशी अनपेक्षित होती. १८८२ मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. तेव्हापासून विविध काळात विविध कलाकारांनी हे नाटक सादर केले आहे(जसे दिनानाथ मंगेशकर, स्वरराज छोटा गंधर्व, जयमाला शिलेदार). वयाच्या साठ-सत्तरीच्या पुढील रसिकांपैकी बऱ्याचश्या रसिकांनी १९६०-७० मध्ये झालेले प्रयोग पाहिलेले असणार. त्यामुळे झालेली ही गर्दी प्रामुख्याने स्मरणरंजन, पुन:प्रत्ययाचा आनंद यासाठीच होती हे उघड होते. माझ्यासारखे प्रेक्षक जे प्रथमच हे नाटक पाहणार होते, आणि इतर सध्याच्या पिढीतील प्रेक्षक ते उत्सुकतेपोटीच आले होते.

नाटकाचे कथानक प्रसिद्ध आहेच. महाभारतातील पांडवांपैकी अर्जुन आणि कृष्णाची बहिण सुभद्रा यांच्या विवाहाची कथा. कथा कसली, तो एक फार्सच म्हणावा असा आहे. टिपिकल हिंदी सिनेमात शोभण्यासारखी अशीच. माझ्याकडे १९६३ मध्ये प्रसिद्ध झालेले संगीत सौभद्र नाटकाची संहिता असलेले पुस्तक आहे. त्याला अर्थातच किर्लोस्कर यांची छोटीशी प्रस्तावना आहे, तसेच प्रसिद्ध लेखक, समीक्षक भीमराव कुलकर्णी यांचा देखील ‘सौभाद्राचा अभ्यास’ या नावाचा एक निबंध आहे. त्यांनी नाटकाच्या कथेचे मूळ स्फुर्तीस्थान काय असावे याबद्दल सांगितले आहे. ही कथा वेगवेगळया रूपात महाभारतात, भागवतात, तसेच इतर प्राकृतग्रंथातून, तसेच मोरोपंतांच्या आर्यामध्ये देखील येते. त्यांनी या निबंधातून नाटकाची समीक्षा ना सी फडके, गंगाधर गाडगीळ यांनी कशी केली याचा देखील आढावा घेतला आहे. तसेच नाटकात रंजकता, रहस्यमयता, कथानक आणि नाट्यपदांचा संबंध आणि इतर अनेक गोष्टी ज्यामुळे हे नाटक कसे एक मैलाचा दगड होऊन बसले याची चर्चा केली आहे. हा निबंध मुळातून वाचण्यासारखा आहे.

image

असो. तर आम्ही आत सभामंडपात जाऊन स्थानापन्न होई पर्यंत तिसरी घंटा होऊन गेली होती, आणि नांदी सुरु झाली होती. त्या नांदीच्या योगे प्रेक्षकांना आजच्या नाटकाचे प्रयोजन, म्हणजे सुभद्रेचा विवाह, याचे सुतोवाच झाले. राहुल देशपांडे नारद, तर आनंद भाटे कृष्ण झाले होते, तर अर्जुन अस्ताद काळे नावाच्या नटाने साकारला होता. बाकीची पात्रे जसे की सुभद्रा, बलराम, रुक्मिणी कोणी साकारले होते ते समजले नाही.  संगीत नाटकांत पूर्वी ऑर्गन वापरला जात असे. सुदैवाने अजूनही काही जण ऑर्गन, त्या पद्धतीने वाजवणारे आहेत, त्यापैकी प्रसिद्ध आणि अभ्यासू वादक राजीव परांजपे हे एक. ते साथीला ह्या नाटकात होते. नांदीनंतर अर्जुन, जो संन्याश्याच्या रुपात आहे, त्याने प्रवेश केला. कारण अर्थात उघड आहे, सुभद्रेचा विवाह त्याच्याबरोबर न ठरवता, तर तो दुर्योधनाबरोबर बलरामाने ठरवले होते, त्यामुळे त्याचा प्रेमविरह झाला होता! नारदमुनी परमेश्वराचे गुणगान ‘राधाधर मधूमिलिंद’ या प्रसिद्ध गीताद्वारे गायन करत अवतरतात. कळलाव्या नारदाला कृष्णाचे कारस्थान माहिती असल्यामुळे ते अर्जुनाला आशा न सोडण्याचा सल्ला देतो. अर्जुनाचा सुभद्रेचे अपहरण केलेल्या राक्षसाबरोबर हातापायी होऊन, सुभद्रा आणि अर्जुन यांची भेट होते. मग पुढे कृष्णाचे बलरामाची समजूत काढणे, संन्याशी अर्जुनाचे सुभद्रेच्या महालात मुक्काम करणे, तसेच कृष्ण आणि रुक्मिणी यांतील रुसवा फुगवा हे सर्व कथानकात येते. ‘प्रिये पहा’ हे नाट्यपद कृष्णाचे रुक्मिणी सोबत प्रेमालाप करतानाचे आनंद भाटे यांनी छान गायले. पण त्याचा अभिनय यथातथाच आहे असे म्हणावे लागेल. त्यानेच म्हटलेले ‘कोण तुजसम सांग’ हे नाट्यपद देखील जोरदार झाले. अशी अनेक नाट्यपदे एकामागून एक येत गेली, प्रेक्षकांच्या वाहवा मिळवत कथानक हळू हळू पुढे सरकत गेले आणि शेवट अर्थातच, आणि अपेक्षेप्रमाणे गोड होतो.

हे तसे पाच अंकी नाटक, दोन अंकात सादर केले. वसंतोत्सव मधील रंगमंच प्रत्येक वर्षी वेगळी असतो, आणि अतिशय आकर्षक असतो. ह्या वर्षी देखील तो देखणा असा होता, प्रकाशयोजना देखील चांगली होती. रंगमंच खुला असल्यामुळे दोन प्रवेशांच्या दरम्यानचे नेपथ्य प्रेक्षकांसमोरच बदलत होते. आम्ही दोघे मित्र नाटक पाहत, नाट्यगीतं ऐकत, संपूर्ण वेळ तेथे हजर होतो. माझ्या डोळ्यासमोर सारखे त्याकाळी हे नाटक कसे सादर होत असावे आणि प्रेक्षक कसा त्याचा आस्वाद घेत असावेत, त्याची मनातून कल्पना करत होतो. एकूणच त्यादिवशीची शनिवार संध्याकाळ या नाटकाच्या निमित्ताने  कारणी लागले असे वाटले.