शेक्सपिअरचे गारुड

मी गेल्या आठवड्यात बंगळूरूला गेलो होतो. पुण्याच्या विमानतळावर द विकचा(The Week) अंक कुलुपबंद कपाटात दिसला आणि त्यावर शेक्सपिअर विराजमान होता. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. प्रसिद्ध कवी आणि नाटककार शेक्सपिअरची ४००वी पुण्यतिथी ह्या वर्षी २३ एप्रिल साजरी होत आहे. तो अंक त्यावर असणार. ह्या शतकातील ही मोठी घटना आहे असे म्हणायला हरकत नाही. २६ एप्रिल १९६४ ह्या च्या चौथ्या जन्मशताब्दी वर्षी सुद्धा अश्याच मोठ्या प्रमाणात साजरी केली गेली असणार.  शेक्सपिअरबद्दल मी काही लिहावे एवढा माझा वकूब नाही. पण मी एक नाटकवेडा रसिक आहे, तसेच पुस्तकवेडाही  आहे. मला शेक्सपिअरचे आकर्षण आहे आणि जमेल तसा मी त्याच्याबद्दल समजावून घेत असतो. त्याच्या ४००व्या पुण्यतिथीनिमित्त थोडेफार मला भावलेला समजलेला, त्याच्याबद्दल वाचलेले, ऐकलेले येथे लिहावे म्हणून हा प्रपंच. हे सर्व स्मरण रंजन आहे, त्याच्या गारुडाचे.

इंग्रजी साहित्य घेवून बी.ए/एम्. ए करणाऱ्या मंडळीना शेक्सपिअर, त्याची नाटके अभ्यासाला असतात. जशी संस्कृत मध्ये बी.ए/एम्. ए करणाऱ्या मंडळीना कालिदास असतो तसे. कालिदास भारताचा शेक्सपिअर. मी तर संगणक शास्त्र क्षेत्रातील. मला वाटते अकरावी बारावी मध्ये इंग्रजी विषयात त्याच्या नाटकातील एखादा प्रवेश असावा. त्याच्या नाटकातील काही प्रसिद्ध वाक्ये आपल्याला माहिती असतात. जसे To be or not to be is the question, What’s in a name वगैरे. साधारण २००१ च्या सुमारास जेव्हा माझे नाटक वेड पूर्ण भरात होते तेव्हाच, मला विनय हर्डीकर यांचा ‘सर्वांसाठी शेक्सपिअर’ हा कार्यक्रम मला पाहायला मिळाला. आजच मी वाचले की ते हा कार्यक्रम आता, पुण्याबाहेर देखील घेवून जाणार आहेत. गेली पंधरा वर्षे ते हा कार्यक्रम करत आहेत. मी अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी यांच्या चरित्राच्या निमित्ताने, आणि एकूणच संगीत नाटक, त्याचा इतिहास, ह्या विषयावरील वाचनामुळे असे समजले की मराठीतील नाटकांच्या सुरुवातीच्या काळात शेक्सपिअरचा प्रभाव होता. उदा. सं. झुंझारराव हे प्रसिद्ध नाटक.

त्याची प्रसिद्ध नाटके रोमिओ जुलिएट, ऑथेल्लो, मर्चंट ऑफ व्हेनिस अशी आपल्याला महिती असतात. प्रामुख्याने राज घराण्यावरील नाटके त्याने लिहिली. त्याने शोकांतिका, विनोदी, तसेच रहस्यमय नाटके देखील हाताळली. मानवी स्वभावाचे चिरंतर पैलू जसे राग, लोभ, मत्सर, प्रेम, सूड ही सगळी त्याने मांडली. तो स्वतः अभिनेता देखील होता. त्याची नाटक कंपनी होती, त्याचे नाट्यगृह होते(Globe Theater). या सर्वामुळे तो सार्वकालिक, तसेच सर्वाना आपलासा वाटणारा ठरला. शेक्सपिअरच्या नाटकामध्ये सर्वसामान्य रसिकाला दिसणारा मुद्दा म्हणजे त्यातील इंग्रजी, जे व्हिक्टोरियन काळातील आहे, ते बरेचसे बोजड वाटते. तसेच नाटकातील मोठ-मोठाली स्वगते हे आणखीन एक वैशिष्ट्य. कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकात(आणि इतक्यात आलेल्या सिनेमात देखील), हे आपण पहिले असते. त्यातील प्रसिद्ध नट, अशाप्रकारच्या नाटकातील भूमिका करून मोठा नट झालेला असतो, आणि त्याच्या उतरत्या काळात त्याला हे सर्व आठवत असते, आणि तो ते मोठ-मोठाले संवाद, स्वगते म्हणतो. २००१ च्या आसपासच मला किंग लियर ह्या नाटकाच्या मराठी अनुवादाचे पुस्तके मिळाले. हे लिहिले आहे विंदा करंदीकर यांनी. त्यात त्यांची भली-मोठी विवेचक प्रस्तावना आहे. गोविंद तळवलकर हे देखील असेच शेक्सपिअर अभ्यासक आहेत.

शेक्सपिअरचा अभ्यास, आणि त्याच्यावरील पुस्तके हा देखील एक वेगळाच विषय आहे. त्याच्यावर म्हणे एक लाखावर पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. अनेक अंगाने त्याचा अभ्यास करण्यात आला आहे. वोल्टेअर(Voltaire)चे गमतीदार विधान कुठेतरी मी वाचले होते. तो म्हणतो कि शेक्सपिअर हा थोडीफार कल्पना शक्ती असलेला, प्यायलेला हिस्त्रक पशुसारखा आहे ज्याची नाटके लंडन आणि कॅनडा मध्ये थोडीफार चालतात (Shakespeare is a drunken savage with some imagination whose plays please only in London and Canada).  मराठीमध्ये शेक्सपिअरवर एक पुस्तक मराठी नाट्य परिषदेने प्रसिद्ध केले आहे. तो केला १९६५ मध्ये, चौथ्या जन्मशताब्दी वर्षी. त्यातही अनेक अभ्यासकांनी शेक्सपिअरची अनेक अंगानी ओळख करून दिली आहे. ते मला गेल्यावर्षी मिळाले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी देखील १९७९ मध्ये शेक्सपिअर परिचय ग्रंथ असे पुस्तक प्रकाशित केले होते. The Tales from Shakespeare by Charles and Mary Lamb हे पुस्तक त्याच्या नाटकात आलेल्या कथेसंदर्भात अभ्यासासाठी छोटेखानी पुस्तक आहे. त्यात शेक्सपिअरच्या एकूण माहीत असलेल्या ३८ नाटकांपैकी २० नाटकांच्या कथेसंदर्भात लिहिले आहे. हे पुस्तक मला जी ए कुलकर्णी यांच्या पत्रातून नमूद केल्याचे दिसले आणि ते मी २-३ वर्षापूर्वी घेतले. मी वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या नाटकात मानवी स्वभावाचे पैलू दिसत राहतात. काही अभ्यासकांनी त्याच्या नाटकांचा(प्रामुख्याने किंग लिअर) अभ्यास मानसशास्त्र आणि मानसोपचारशास्त्राच्या अंगाने देखील केला आहे. मी ह्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला ते आणखी समजावून घेण्याची उत्सुकता आहे.

जगभरात त्याची ४००वी पुण्यतिथी जोरात साजरी होणार. लंडनमध्ये, तसेच त्याच्या जन्मगावी म्हणजे Stratford जे एव्हान नदीच्या किनारी आहे(Stratford upon Avon), जेथे त्याचे घर आहे, तेथे तर कार्यक्रमांची लयलूट आहे आणि ती वर्षभर असणार. ब्रिटीशांनी ते घर अजून जपून ठेवले आहे. आपण बऱ्याच प्रवासवर्णनात त्याबद्दल वाचले असते. मलाही तेथे जायचे आहे एकदा, पण तात्पुरते तरी मी माझ्या इंग्लंड मधील मित्रांना त्याबद्दल विचारणार आहे! ते असो, पण इंटरनेटवर देखील बरीच माहिती आहे. इच्छुकांनी येथे आणखी माहिती मिळवता येयील. BBCच्या संकेतस्थळावर देखील Shakespeare Lives असा ऑनलाईन महोत्सव कार्यक्रम सहा महिने चालणार आहे. इतरही बऱ्याच संकेतस्थळांवर माहिती मिळू शकेल. पुण्यात देखील बरेच कार्यक्रम असणार. त्यातील एक आहे विनय हर्डीकर यांचा ‘सर्वांसाठी शेक्सपिअर’, एस. एम् जोशी सभागृहात, संध्याकाळी ६.३० वाजता. तो जरूर आपण सर्वानी पाहावा, आणि शेक्सपिअरचे गारुड अनुभवा.

आणखीन एक जाता जाता. एप्रिल २३ हा देखील स्पेन मधील प्रसिद्ध कादंबरीकार सर्वांतेस याची देखील ४००वी पुण्यतिथी आहे. तो त्याच्या डॉन क्विक्झोट ह्या महाकादंबरीबद्दल प्रसिद्ध आहे. ती मी अजून अर्थात वाचली नाही, कधी तरी वाचायची म्हणून घेवून ठेवली आहे. पण जी. ए. कुलकर्णी यांच्या काही कथा त्यातील मूळ धाग्यावर आधारलेली आहेत. त्यांच्या पत्रलेखनात देखील त्याच्याबद्दल बऱ्याचदा उल्लेख येतो. स्पेनमध्ये त्याची पुण्यतिथी साजरी केली जात आहे.