कर्नाटकातील भाषा

कर्नाटकातील भाषा? म्हणजे काय? कन्नड किंवा कानडी. त्यावर काय ब्लॉग लिहायचा असा प्रश्न पडला असेल. काही वर्षापूर्वी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला कर्नाटकातील चित्रपट हा कन्नड भाषेत नव्हता तर तेथील ब्यारी(Byari or Beary) नावाच्या भाषेत होता. अशी काही भाषा कर्नाटकात आहे, ह्याचा मला पत्ताच नव्हता. एक हिंदी म्हण तर सुप्रसिद्धच आहे-कोस-कोस पर बदले पानी, चार कोस पर वाणी. वेगवेगळया भागात भाषा वेगळी होत जाते. बंगळूरू, मैसूरकडील भाषा प्रमाण कन्नड भाषा, जसे की पुण्याची मराठी. मी जी कन्नड भाषा घरी बोलतो, ती बिजापूर(आताचे विजयपूर) कडील, जी उर्दू मिश्रित आहे, कारण सरळ आहे-आदिलशाही प्रभावामुळे. तीच गोष्ट गुलबर्गा, बिदरकडील भाषा, त्यात जसे उर्दूचा प्रभाव आहे, तसेच तेलुगुचाही आहे. हुबळी, धारवाडची कन्नड भाषा रांगडी(पुरुषी) भाषा असे समजले जाते!

ब्यारी ही भाषा कर्नाटकाच्या दक्षिणेकडे, केरळला लागून जो प्रदेश आहे, तेथे एक विशिष्ट जनसमुदाय आहे, त्यांची ती भाषा. कोडूगु, मडिकेरी भागातील भाषा तुळू. करावळी(म्हणजे किनाऱ्यावरील भाग, कोकण) तेथील भाषा कोकणी मिश्रित कन्नड आहे. बेळगावी(पूर्वीचे बेळगाव) कडील भाषा मराठी प्रभावित आहे. तसेच काही विशिष्ट समाजाची कन्नड भाषा, ऐकताना अगदी वेगळी वाटते. उदा. कर्नाटकातील कुरुबू समाज-म्हणजे धनगर समाज. त्यांची भाषा, त्यांची लोकगीतं, अतिशय वेगळ्या उच्चाराचे, आणि धाटणीचे असतात. चंद्रशेखर कांबार  यांच्या नाटकातून मी हे अनुभवलेले आहे. तसेच यक्षगान या नृत्य-गायन प्रकारात तुळू आणि इतर कन्नड बोलीभाषा वापरल्या जातात. कुंदापूर भागातील वेगळ्या कन्नड बोली भाषेचा अनुभव मी एका दूरचित्रवाणीवर पाहिलेल्या एका चित्रपटाच्या द्वारे घेतला.

कन्नड भाषेचा इतिहास पहिला तर असे दिसेल की भाषेचे संक्रमण होत गेले आहे, आणि तिला विविध काळात वेग-वेगळी नावे आहेत, जसे-हळेगन्नड. पण ते ग्रांथिक भाषेच्या संदर्भात जास्त खरे आहे. हुबळी धारवाड, बिजापूर वगैरे ठिकाणहून जेव्हा लोक मैसूर, बंगळूरूला जातात, तेव्हा भाषेवरून गमती जमती होतात. पुण्यातदेखील हा प्रकार दिसतो, तसाच. कन्नड नाटकात, चित्रपटातून, ह्या वेगवेगळया लकबी, बहुतेक करून, हास्य-निर्मितीसाठी वापरली जाते. सीमा-भागात, म्हणजे, महाराष्ट्रालागून असलेला भाग, तसेच आंध्रप्रदेशला लागून असलेला भाग, येथील भाषा साहजिकच त्या त्या राज्याच्या भाषेबरोबर मिसळली गेली आहे. हे अगदी प्रकर्षाने पदोपदी दिसते. आंध्राला लागून असलेला गुलबर्गा वगैरे भागात तर उर्दूचा इतका प्रभाव होता, की स्वातंत्र्यापूर्वी उर्दू भाषेतच शिक्षण होते. तसेच चामराजनगर भागातील बोली भाषा तमिळ भाषेने प्रभावित झाली आहे, कारण तो भाग तमिळनाडूशी जोडून आहे.

सोलीगा(Solega) नावाची बंदीपूर जंगलाच्या(BR Hills) आसपासच्या २० हजार अदिवासी लोकांची भाषा ज्यात जंगलासंबंधी अपार ज्ञान सामावलेले आहे. म्यानमारचे भाषा संशोधक Aung Si यांनी अथक प्रयत्नातून स्थानिक आदिवासींच्या मदतीने Solega-English Dictionary तयार केली आहे. तेथील आदिवासींचे जीवन, जंगलतील पशु पक्षी, झाडे झुडुपे, आदिवासींच्या सोलीगा बोली भाषेतील शब्द, कन्नडशी असलेला संबंध अश्या अनेक गोष्टीनी हे पुस्तक नटलेले आहे. कर्नाटकातील या बोली भाषेला नवसंजीवनी यामुळे मिळाली आहे.

हे सर्व आता लिहायायचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी माझे मित्र आणि कर्नाटकातील सुप्रसिद्ध लेख्हक रहमत तरीकेरी यांची भेट. ते गेले होते गुजरातमधील दांडी येथे, प्रसिद्ध भाषातज्ञ गणेश देवी(Ganesh Devy) आणि इतरांनी जी दक्षिणायन नावाची चळवळ सुरु केली आहे त्यात भाग घ्यायला. परत जाताना, पुण्यात त्यांचा मुक्काम होता, त्यावेळेस झालेल्या भेटीदरम्यान त्यांच्या बडोदा भेटी आणि भाषेच्या वैविध्याबद्दल बोलत होतो. येथे मी कर्नाटकातील भाषेबद्दल मुद्दाम मराठीत लिहिले, कारण कन्नड आणि मराठी यांच्यात आधीपासून देवाणघेवाण चालू आहे. आणखीन एक औचित्य म्हणजे, आज(फेब्रुवरी २०) आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. इतर भारतीय भाषांबद्दल, त्यांच्यात असलेल्या वैविध्याबदल देखील असे लिहिता येयील.