माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#६

येत्या ऑक्टोबर १० रोजी गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तची पुण्यतिथी आहे. गुरुदत्तचे आयुष्य म्हणजे एक शोकांतिकाच आहे. त्याच्या निधनाला पन्नासहून अधिक वर्षे होऊन गेली, पण त्याची मोहिनी काही कमी होत नाही. गुरुदत्तवर अनेक जणांनी अनेक तऱ्हेने आणि अनेक पैलू दाखवणारे लेखन केले आहे. नुकतेच असे वाचले होते कि गुरुदत्त वर एक चित्रपट येऊ घातला आहे, ज्याचे दिग्दर्शन भावना तलवार या करत आहेत. अर्थात त्याचे कित्येक चित्रपट हे त्याच्या आयुष्यावरच बेतले आहेत.

मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गुरुदत्तच्या आईने म्हणजे, वासंती पदुकोण, यांनी १९७६ साली लिहिलेल्या कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याची क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर जमेल तसे करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू आत्माराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध केला होता (माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१) आणि लगेचच दुसरा भागही सदर केला होता(भाग#२). सप्टेंबर महिन्यात मध्ये तिसरा आणि चौथा भाग देखील दिला होता(भाग#३ आणि भाग#४). ह्याच महिन्यात काही दिवसांपूर्वी पाचवा भाग दिला होता. त्याच्या पुण्यतिथी निमित्त आज सहावा आणि शेवटचा भाग देत आहे. त्याच्या चरित्राच्या अनुवादाची प्रकल्पाची आज  या निमित्त सांगता होत आहे. त्यानिमित्त त्याच्या आयुष्याबद्दल खुद्द त्याच्या आई कडून समजवून घेण्यात आले. तसे गुरुदत्त हा विषय अनाकलनीयच आहे. 

मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#६

ऑक्टोबर १९६१ मध्ये तरुणला त्याच्या आईने(गीता) तिच्या माहेरी घेऊन गेल्यावर, दुसऱ्या दिवशी सकाळी, चहा पिताना, गुरुदत्त मला म्हणाला, ‘आई, स्टुडियो मध्ये मद्रास कडील एक चांगला चित्रपट दाखवणार आहेत. तू आणि मामी तो पाहायला जाणार का?” आम्ही दोघे पाहू असे त्याला म्हणालो. नंतर तो परत झोपला. त्यादिवशी शनिवार होता. ऑफिसमधून हिशेबनीस त्याची कश्यावर तरी सही घेण्यास घरी आला. साधारण दुपारचा एक वाजत आला होता. आता बँक बंद होतील असे म्हणून तो निघून गेला. विजय देखील तेथेच होता. गुरुदत्त उठला आणि काही तरी लिहित बसला होता. विजयचे त्याच्या कडे लक्ष गेले होते. ते पाहून गुरुदत्त त्याला म्हणाला, ‘ह्या खोलीत तुझे काय काम आहे?’ विजय तेथून उठून मित्राकडे जातो असे सांगून बाहेर गेला. सुमारे दोन वाजता, गुरुदत्तच्या खोलीमधून ‘फुरर ‘फुरर’ असा आवाज यायला लागला. दुपारच्या शांततेत ते शब्द ऐकून कसेबसे वाटले. मी उठून त्याच्या खोलीत गेले. पाहते तर काय, तर ते शब्द त्याच्या तोंडातून येत होते. डोळे कसे तरी करत होता, हात पाय झाडत होता. ते सर्व पाहून मी घाबरले आणि घरातील नोकरांना बोलावले. ‘काही तरी खाल्लेले असेल’ असे ते म्हणाले, आणि त्याच्या चालकाने ऑफिसला फोन केला. तेवढ्यात विजय देखील घरी परत आला होता. त्याच्या काहीतरी लक्षात आले, आणि त्याने उशीखाली हात घातला, आणि एक कागद बाहेर काढला. ते होते, गुरुदत्तला उद्देशून लिहिलेले पत्र. त्यात त्याने लिहिले होते, ‘आत्मा, मी जीवनाला कंटाळलो आहे. मी आत्महत्या करत आहे. मुलांना तूच सांभाळायला हवे आहेस. सगळा भार तुझ्यावर आहे’. त्यात त्याने सही देखील केली होती. ऑफिसमधून सगळे आले. कुठल्याच नर्सिंग होम मध्ये अशी केस घेत नाहीत. त्यामुळे त्याला नानावटी हॉस्पिटल मध्ये स्पेशल रूम मध्ये दाखल केले. तीन दिवस तो झगडत होता. माझे जावई, माझ्या भावाचा मुलगा(जो डॉक्टर होता), जेवणखाण, झोप सोडून त्याच्या जवळ हॉस्पिटल मध्ये बसले. तो शुद्धीवर आला खरा, पण काही दिवस त्याची प्रकृती खराबच होती. पंधरा दिवसानंतर तो घरी आल्यावर, त्याला दिवसरात्र पाहायला एक नर्स ठेवली. मानसरोगतज्ञाला देखील बोलावून घेतले. त्याला काही मानसिक आजार झाला आहे कि काय असे वाटत होते. गीता माहेरहून त्याला भेटायला येत असे, आणि तिऱ्हाइताप्रमाणे थोडावेळ बसून जात असे. त्याची प्रकृती सुरळीत होण्यास दीड महिना लागला. डॉक्टरांनी हवा बदलाचा सल्ला दिला. गीता ह्या घरी परत आली होती. पती, पत्नी, आणि मुले सर्व मिळून काश्मीरला गेले. तेथील हवामानामुळे गुरुदत्तला पूर्णपणे बरे वाटू लागले. त्यानंतर जानेवरी १९६३ मध्ये नीनाचा जन्म झाला. मी हुश्श म्हणाले आणि वाटले कि आलेले अरिष्ट टळून गेले असे वाटले.

गुरुदत्त काही बाबतीत तसा भित्रा होता, तसेच मनात आले कि ते करायचे असे वागत असे. पती-पत्नी मध्ये जेव्हा सर्व काही चांगले होते तेव्हा गीताने पाली हिल्सचे घर तोडून सात-आठ माजली इमारत बांधून त्यातील सदनिका भाड्याने देण्याचा सल्ला दिला होता. भाड्याचे पैसे भरपूर मिळाले असते. एक दोन दिवसातच लाखो रुपये खर्च करून आस्थेने बांधलेले घर तोडले गेले. त्याला कितीस वेळ लागतो? हे सगळे पाहून मला वाटले कि गुरुदत्तच्या जीवनात देखील असेच झाले आहे. काश्मीर मधून नवीन प्रकारचे छत त्याने मागवून, गुरुदत्तने ते आपल्या दोन खोल्यांना लावले. तेथूनच बोटी आणून पवई तलावात मासेमारी करण्यासाठी तो जात असे. सगळे विचार फुग्यासारखे फुटले. मी नवीन ठिकाणी राहायला गेले नाही, तर आशिष नावाच्या बंगल्यात राहायला गेले. पाली हिल्स चे घर मातीमोल होऊन काही दिवस झाले असतील नसतील, राहते घर देखील जमीनदोस्त झाले. गुरुदत्तला ह्या वेळेस मुलगी झालेली. पण ज्या घरात ती जन्मली, त्याच घरातला कलह वाढत गेला. आशिष बंगला सोडून द्सरीकडे भाड्याने राहायला गेले. गुरुदत्तने आता मुले नकोत म्हणून स्वतःवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. तरुण अरुण भायखळा येथील शाळेत जात असत. गीताच्या बहिणीला बहारे फिर भी आयेंगी या चित्रपटात घ्यावे म्हणून घरी ठेऊन तिला अभिनयाचा सराव करवून घेत असे. तिचे काम गुरुदत्तला आवडले नाही. विमल मित्र यांच्या गुलमोहर ह्या कादंबरीवर त्याला एक चित्रपट बनवायचा होता. पण झाले नाही. शेवटी त्यावर बंगालीत दुसऱ्या कोणी निर्मात्याने चित्रपट बनवला. ती मुलीने त्यात नायिका म्हणून काम केले. पण तो चित्रपट चालला नाही त्यामुळे तिने अभिनयाचा नाड सोडून दिला.

पार्श्वगायक सी एच आत्मा यांच्या पत्नी मुलासोबत आमच्याकडे राहायला आल्या. तिचे आई वडील अफिक्रेत असत. तिच्या बरोबर राहण्यामुळे, संगतीमुळे, गीता आणखीन स्वैराचारी झाली. एकदा तरुण खूप आजारी होता. तो वाचतो कि नाही अशी परिस्थिती आली होती. अश्या परिस्थितीमध्ये गीता तिच्या मैत्रिणीसोबत लंडनला गेली. मी नेहमीप्रमाणे त्याच्या सोबत हॉस्पिटल मध्ये होते. गुरुदत्त त्यावेळी मद्रासकडील चित्रपटातून काम करत होता, त्या मुले तो जाऊन येऊन करत असे. तरुणच्या आजारात मी त्याला मद्रासला जाऊ नको असे सांगितले नाही. पण तो थांबला. देवाच्या कृपेने तरुण त्या आजारातून बरा झाला. १९६३ ऑगस्ट मध्ये नीनाचा पहिला वाढदिवस होता. गीता त्यावेळी लंडनहून परत आलेली नव्हती. गुरुदत्तला तिचा वाढदिवस साजरा करायचा होता. सगळ्या नातेवाईकांना बोलावले, आणि मोठा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी गीता परत आली.

त्याच सुमारास गीताने बंगाली चित्रपटातून काम करण्यास सुरु केले. त्यामुळे तिचे कलकत्त्याला जाणे येणे वाढले होते. तिचे संसारात विशेष लक्षच नव्हते. गुरुदत्तने पेडर रस्त्यावर घर घेऊन तेथे राहोत आहे असे मला समजले. त्याला ह्या बद्दल विचारायाचे मला धैर्य होत नव्हते. आम्ही दोधे आई-मुलगा एकमेकांपासून लांब होत चाललो होतो. त्याला काही सांगायचे असेल तर त्याने मला माझ्या घराच्या पत्त्यावर पत्र पाठवावे, आणि मला काही सांगायचे असेल तर मी त्याच्या स्टुडियोच्या पत्त्यावर पत्र पाठवावे असे सुरु होते. असे जरी असले तरी त्याने मला काय हवे नको तो लक्षात ठेवून करत असे. त्याने मला आई म्हणून हाक मारलेली मला ऐकू येत नसे. त्याची खुशाली मला दुसऱ्यांकडून समजावून घ्यावी लागत होती. हि गोष्ट माझ्या मनाला अतिशय लागली.

पेडर रोड वरील घरी गेल्यावर गीता देखील दुसरीकडे राहायला गेली. आधीच्या सुरक्षा रक्षकाला, तसेच घरातील इतर नोकरांना काढून टाकून, नवीन लोकांना त्याने कामावर घेतले. मला त्याने एकदात बोलावून घेतले. माझ्या हृदयात धडधड चालू झाली, का बोलावले असेल. त्याच्या कडे गेले तर म्हणाला कि माटुंगा येथील घरातून लोणकढी तूप आणि लोणचे पाठव. तसेच त्याच्या स्वयंपाक्याला आपल्या पद्धतीचा स्वयंपाक शिकव, आणि त्याला हिंदी मध्ये सगळे लिहून दे. रतन म्हणून एकाला त्याने स्वीयसहकारी नेमला होता. ते घर तसे खूपच चांगले होते. मला त्याच्या बरोबर तेथे रहावेसे वाटत होते. पण तो मद्रासला चित्रपटाच्या निमित्ताने नेहमी जात येत असे, त्यामुळे मी एकटीने घरी रहायला त्याला नको होते. गुरुदत्तची मुले त्यांच्या आईसोबतच राहत होती. कधी कधी गुरुदत्तकडे देखील येत असत. नीना मात्र विशेष येत नसे. गुरुदत्तचा तिच्यावर मोठा जीव होता. तो जो पर्यंत स्वतःहून गुरुदत्तकडे जायचे असे म्हणे तोपर्यंत ती पाठवत नसे. ती एक प्रकारची सुडाची भावना तिच्यात असेल. तिच्या घरासाठी खर्चासाठी पैसे, तसेच मुलांसाठी पैसे गुरुदत्त पाठवत असे. आपल्या जवळचे घरात कोणी नाही, अश्या घरात एकाकी राहत असताना त्याला काय यातना झाल्या असतील कोणास ठाऊक? या घरी आल्यापासून त्याचे पिणे वाढले होते असे मी ऐकत होते. मी एक अबला स्त्री होते, काय करू शकत होते? सगळ्यांनी त्यांच्याकडून होणारी मदत, आणि इतर गोष्टी त्याच्याकडून जेव्हा पाहिजे तेव्हा घेतल्या, पण त्याला जेव्हा गरज होती तेव्हा कोणी आले नाही. कोणी त्याची मानसिक स्थिती समजावून घेतली नाही, त्याला काय चिंता सतावत होती, चिखलातील दोलायमान खांबासारख्या हलणाऱ्या त्याच्या संसाराला कोणी हात दिला नाही. त्याला समजावून घेण्याचा प्रयत्न देखील कोणी केला नाही. मुले त्याच्या जवळ राहायलाआली कि तो त्यांच्याशी कितीतरी वेळ बोलत बसे असे मी ऐकले होते! कितीतरी वेगवेगळे खेळ देखील खेळत असत असे हि ऐकले होते!

१९६४ जुलै मध्ये गुरुदत्तचा वाढदिवस साजरा झाला, पण मी काही कारणाने जाऊ शकले नाही. आलेल्या सर्व बहिण-भावांना त्याने विचारले. दुसऱ्या दिवशी १० तारखेला पाली हिल्स येथे भूमीपूजन होते. घर पाडून परत नवीन घर उभारण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार होता. त्यासाठी जायचे होते म्हणून आदल्या दिवशी गेले नाही. गुरुदत्तला राग आला होता असे वाटले. प्रत्येक वर्षी मी गुरुदत्तच्या वाढदिवशी त्याला आवडणारे पदार्थ करून घेऊन जात असे. ह्याच वेळी गेले नव्हते. भविष्य कोणाला माहिती असते?

भूमी-पूजनाला सगळे आले होते. गीता मुलांना घेऊन आली होती. पण पूजेला गुरुदत्तसोबत बसण्यास नकार दिला. गुरुदत्तला अतिशय दुःख झाले. तेव्हा त्याने मला पूजेला सोबत बसण्यासंबंधी विचारले. मी काहीही आढेवेढे न घेता त्याच्या बरोबर बसले, मुले देखील जवळ होती. घर बांधण्याचे काम त्यावेळी महापौर असलेल्या श्री डहाणूकर यांच्याकडे होते. पूजा संपल्यानंतर अनेक फोटो काढले गेले. त्या दिवशी चित्रीकरण होते, त्यामुळे गुरुदत्त त्याच्या प्रिय अश्या लाल रंगाच्या मोटारगाडीतून निघाला. त्यावेळी मी त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, ‘गुरुदत्ता, काल तुझ्या वाढदिवशी मी आले नाही. मला क्षमा करशील?’ त्याने काही न बोलता, हसत हसत गाडी सुरु करून निघून गेला. कितीतरी वेळ मी तो गेलेल्या रस्त्याकडे पाहत उभी राहिले. माझ्या पासून माझा मुलगा दूर दूर जातो आहे असे वाटत राहिले. त्याने आज जे काही केले ते सर्व त्याच्या मोडलेल्या संसारासाठी केले असे मला वाटले. हे सर्व मी पाहावे असे माझ्या नशिबात होते कि काय? अश्या मी माझ्याच विचारात गढून गेले असता, माझी मुलगी ललिता माझ्या जवळ आली आणि माझ्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाली, ‘आई, तू मझ्या घरी येतेस का?’ माझे विचारचक्र तेथेच थांबले. मी तिला म्हणाले, ‘नाही गं, लल्ली, मला घरी जायचे आहे, काम आहे घरी’. आणि मी तेथून निघाले.

त्यानंतर मी गुरुदत्तला पाहिले ते त्याच्या मुलीच्या नीनाच्या दुसऱ्या वाढदिवशी, तेही गीताच्या घरी. त्याने पांढरा शुभ्र पायजमा कुर्ता परिधान केला होता. आणि तो घरी हसतमुखाने आला होता. अजूनही डोळ्यांपुढे त्याची ती मूर्ती दिसते आहे. मला पाहून तो म्हणाला, ‘आई, तू अशी का वाळून गेली आहेस?’ मी काय उत्तर द्यावे त्याला? तरी सुद्धा थोडे बरे नाही असे बोलले. कोणा डॉक्टर कडे जातेस? असा त्याने उलटप्रश्न केला. मी म्हणाले, ‘डॉ. जयगोपालन आहेत त्याच्याकडे जाते’. तो म्हणाला, ‘हुं, त्याला अजून म्हणावा तसा अनुभव नाही. आपल्या रुबेरू डॉक्टर कडे जातेस का?’

बायको त्याला सोडून जरी राहत असली तरी, तो मुलांच्या वाढदिवशी, त्यांच्यासाठी, कधी त्यांना भेटण्यासाठी, गीताच्या घरी तो जात येत असे. नीनाच्या वाढदिवस अतिशय दिमाख्यात साजरा केला गेला. गुरुदत्तला भेटायला, त्याच्याशी पोट भरून बोलायला मला त्या दिवशी खूप दिवसांनी संधी मिळाली होती. त्यानंतर आम्ही दोघे परत भेटलोच नाही. हि ऑगस्ट १९ तारखेची त्याच्याशी झालेली माझी शेवटची भेट.

नेहमीप्रमाणे रतन दर पंधरा दिवसांनी माझ्याकडे येऊन गुरुदत्तला आवडणारी लोणची, तूप, चटण्या इत्यादी वस्तू घेऊन जात असे. एकदा, त्याला बहुतेक एकूणच कंटाळा आला असेल त्यामुळे, तो तरुण आणि अरुण यांना घेऊन अभिनेता जॉनी वॉकर याला सोबत घेऊन तो जंगलात फिरायला गेला होता. तेथे त्यांना वाघ पाहायचा होता. एका नुकतेच मेलेल्या वाघाबरोबर त्यांनी फोटो काढून घेतला. नंतर परत येऊन मुलांबरोबर तो खूप खेळला त्यावेळी, भोवरा, पतंग, विटीदांडू वगैरे, तसेच चित्रपट पाहायला देखील घेऊन गेला. गीता अनेक वेळेस मुलांना त्याच्याकडे पाठवण्यास नकार देत असे. त्याला त्यावेळेस अतिशय क्लेश होत असे. त्यातूनच तो प्रमाणाबाहेर दारू पीत असे. कधी कधी झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या देखील तो घेत असे मी ऐकले होते. तर कधी कधी आपल्या मोटार गाडीतून रात्री अपरात्री कुठेतरी निघून जाई असे मी ऐकले होते. लोणावळा हे त्याचे अत्यंत आवडते ठिकाण होते. तेथेही तो जात असे. हा कुठे एकता गेला कि मनात धाकधूक असे कि तो स्वतःला काही अपाय वगैरे करून घेईल कि काय.
असे असले तरी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याची व्यथा काय आहे, हे कोणी समजावून घेण्यास प्रयत्न केलाच नाही. त्याला काहीच कारण नाही. गुरुदत्त अंतर्मुखी होता. तो मनमोकळेपणाने बोलत नसे, मनात काय चालले आहे हे समजत नसे. लहानपणापासूनच त्याचा हा स्वभाव होता. त्याला उचलून खेळवले तरी तो जास्त बोलत नसे. काही करायचे असेल तर तो माझे मत मात्र विचारत असे. मी आणि तो फक्त आई आणि मुलगा असे नव्हतो. मात्र असे सगळे तो चित्रपट-व्यवसायात शिरेपर्यंत होते. त्यात शिरल्यानंतर तो हळू हळू माझ्यापासून दूर होत गेला. माझ्या इतर सगळ्या लौकिक इच्छा आकांक्षा तो पूर्ण करत असे. पण त्याच्या अंतरातील दुःख, व्यथा ह्या सर्व दिसत असूनही काही न करता, डोळे झाकून बसावे लागले. शेवटी शेवटी तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याचे देखील धैर्य मला होत नसे. त्यामुळे मी त्याच्या संसारात कशी ढवळाढवळ करणार? ते जेव्हाब भांडत नसत, किंवा भांडलेले नसले, कि एकमेकांशी प्रेमानेच वागत. तिने त्याला पूर्ण वश केले होते, तिने जर म्हटले कि हि रात्र नाही दिवस आहे, तर तो देखील त्याला तिच्या बोलण्याला होकार देई. असे असले तर त्याच्यांत काही भांडण झाले तर मी कशी आणि कोणाची समजूत घालणार? एक ना एक दिवस ते एकत्र सुखाने नांदतील, आपला संसार-रथ पुढे नेतील असा अंधविश्वास मला होता. त्यासाठी पूजा-पाठ, मंत्र-तंत्र असे नाके गोष्टीत तो खर्च करत असे हे मला माहिती होते. पण तिला गुरुदत्तचे यश पचत नव्हते. ती काही ना काही खोडा घालण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्या चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्यांना काही ना काही सांगून त्यांच्या विरुद्ध भडकावत असे. जिचा पत्नी म्हणून हात धरला तीच असे त्याच्या विरुद्ध कट कारस्थान रचत असे. ह्याला कोण काय करणार?

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गीता कलकत्त्यास गायनाच्या निमित्ताने गेली होती म्हणे. तेथे तिने दारूच्या नशेत गायला गेली, अद्वातद्वा गायली, गोंधळ घातला; त्यामुळे तिला अपमानित व्हावे लागले. त्या घटनेनंतर एक आठवडा ती गायब होती. कुठे गेली होती समजत नव्हते. तिचा भाऊ घरी आला होता आणि त्याने गुरुदत्तला विनंती केली होती कि तिला कसेतरी शोधून घरी आणा. त्याने आपली माणसे इकडे तिकडे पाठवून, तिचा शोध घेतला, आकाशपातळ एक केले. असे प्रसंग आले कि गुरुदत्तच्या मनाला आणखीन यातना होत असत. त्याने ते सर्व कसे सहन केले असेल?

ऑक्टोबर दहाला ललिताच्या घरी अब्दुल आलो जाफर यांच्या सितार वादनाचा कार्यक्रम होता. अनेक जणांना आमंत्रण गेले होते. घराच्या जवळच्या लोकांना जेवण देखील असणार होते. त्या दिवशी तिच्या मुलाचा दुसरा वाढदिवस होता. गुरुदत्तने निरोप पाठवला कि तो येणार नाही. नंतर केव्हा तरी येऊन जाईन. गर्दी त्याला अलीकडे सहन होत नसे. माटुंगाच्या माझ्या घरी माझा जावई मला घ्यायला आला होता. विजयला त्याच सुमारास कलकत्त्याला काम मिळाले होते. ते गुरुदत्तला सांगावे या करिता आणि सविस्तर चर्चा करावी या करिता तो त्याच्या स्टुडियो मध्ये गेला. मला त्या दिवशी कसे तरी वाटत होते. आदल्या रात्री पडलेल्या वाईट स्वप्नामुळे, मं अस्वस्थ होते. तरी सुद्धा आईला मी जेवण वाढले, मी जेवले आणि आत्मारामच्या घरी गेले. माझ्या सुनेला, आणि तिच्या मुलीला घेऊन बाहेर जावे असा विचार होता. घरी पाउल ठेवताच गुरुदत्तच्या ऑफिसमधून फोन आला, गुरुदत्तला बरे नाही, लवकर निघून या.

हे ऐकून माझ्या पोटात आग उसळली. आत्माराम लगेच त्याच्या घरी पेडर रोडला निघाला. मी त्याला म्हणाले मी देखील येते. पण तो म्हणाला, आता नको, मी जाऊन पाहतो काय झाले आहे, कसा आहे, त्यानंतर ये. पण तो लगेच परत आला, गाडीची चावी विसरला होता. मला हे बरे लक्षण वाटले नाही. तो जाऊन बराच वेळ झाला तरी तेथून काही बातमी आली नाही.
कुठला तरी क्रिकेटचा सामना चालला होता. टॅक्सी लवकर मिळत नव्हत्या. कितीतरी वेळानंतर एक मिळाली. माटुंगाला आधी घरी गेले आणि गंगूला निरोप दिला कि मी पेडर रोडला जात आहे, गुरुदत्तला बरे नाही, तसेच विजय आला कि त्याला तेथे पाठव. आणि मी निघाले. गुरुदत्तच्या घरी टॅक्सी पोहोचली, त्यातून उतरूले तर तेथील लोकांचे पडलेले चेहरे दिसले. माझ्या काळजात धस्स झाले. वरच्या मजल्यावर गेले, खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत्मारामने मला पहिले आणि तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, ‘आई, सगळे संपले.’ आणि रडू लागला. गुरुदतला पलंगावर झोपलेले पाहिले. त्याचे तो तेजस्वी चेहरा आणखीनच तेजस्वी दिसत होता, शांत झोपला होता. त्याला पाहून तो गेला आहे ह्या वर माझा विश्वास बसत नव्हता. माझा भाचा जयगोपाल त्याच्या जवळ उभा होता. त्याला गदागदा हलवून दुःखातिरेकाने विचारले, ‘माझ्या गुरुदत्तला कुठे पाठवलेस? गेल्यावेळेस तूच नाही का त्याला वाचवलेस, नाही का? बोल, का बोलत नाहीस?’ आणि मोठ्या आवाजात मी खूप रडले. तो म्हणाला कि गुरुदत्तचा प्राण जाऊन खूप वेळ झाला. बऱ्याच उशिराने कळले, सगळे हाताबाहेर गेले होते. त्यामुळे काही करून शकलो नाही. मी नंतर गुरुदत्तच्या पायाजवळ जाऊन बसले. किती वेळ बसले कोणास ठाऊक. गीता उर बडवत बडवत रडत होती. त्यानंतर त्याचे मित्र, चित्रपट सृष्टीतील सहकारी, नातेवाईक सर्व आत येऊ लागले होते. आत्मारामने माझा हात धरून मला आतल्या खोलीत घेऊन गेला. तेथून निघताना त्याला मी डोळेभरून बघून घेतले, त्याच्या खोलीतील त्याच्या वस्तू निरखल्या. डोक्याजवळ पाणी होते, दारू भरलेला ग्लास देखील होता. अर्धवट वाचून तसेच ठेवलेले पुस्तक तसेच पडले होते. त्याचे दोन्ही हात छातीवर नमस्कार केल्या सारखे जोडलेले होते. नीना, त्याची दोन वर्षांची मुलगी, त्याच्या अंगावर पाडून त्याला हाक मारत होती. एकामागून एक त्याला पाहायला येऊ लागले, ललिता आली, तिचे पती गोपालकृष्ण, माझे मुलगे विजय आणि देव्सास आले. तरुण अरुण दोघे शाळेत गेले होते. त्यांना तेथे एक इंगर्जी कार्टून चित्रपट दाखवत होते म्हणे. माझे जावई शाळेत जाऊन त्यांना घेऊन आले असे नंतर समजले. तरुण दहा वर्षांचा होता. वडिलांच्या पार्थिवाच्या शेजारी बसून रडत होता. गुरुदत्त आणि त्याच्या मुलांचे एकमेकांवर खूप प्रेम होते; त्याचा तो आक्रोश पाहून तेथील सर्वाना अगदी हृदय पिळवटून टाकणारे होते.

आत्माराम माझ्या जवळ येऊन म्हणाला, ‘आई, गुरुदत्तच्या शरीराचे पोस्ट-मोर्टेम करायचे असल्यामुळे ते हॉस्पिटल मध्ये घेऊन जात आहेत’. मी खूप रडले आणि तसे करायला नकार देत होते. त्यावर तो म्हणाला, ‘अगं, गुरुदत्त जसा तुझा आहे, तसाच तो लोकांचा देखील आहे. त्यांना संशय येत आहे, त्याच्यावर असे मरण का ओढवले. डॉक्टर नक्की काय कारणाने त्याचा मृत्यू झाला हे समजल्याशिवाय मृत्यूचे प्रमाणपत्र देणार नाही. त्याशिवाय पुढचे कार्य करता येणार नाही. थोडासा धीर आणि परवानगी देऊन टाक’

मी ह्रदयावर दगड ठेऊन एका कोपऱ्यात जाऊन बसले. तो पर्यंत गुरुदत्तला पाहायला चित्रपट सृष्टीतील अनेक नट नट्या आले होते. प्रत्येकाच्या हातात फुलांचा हार होता. त्याच्या स्टुडियोमधील लोकं देखील आले. आप्तेष्ट, ओळखीचे असे अनेक लोकं आले होते. पोस्ट-मोर्टेम नंतर त्याचे कापलेले शरीर घरी घेऊन आल्यावर मला तेथे राहवले नाही. ज्या हातानी त्याला भरवले, दुध पाजले, त्याच हातानी ते चैतन्यहीन शरीरावर शेवटचे फुल ठेवले(आईने तसे करायचे नसते, तरी सुद्धा). आणि मनातल्या मनात म्हणाले, ‘देवा, ह्याच्या आत्म्याला आता तरी शांती दे’.

जीवनात आलेल्या सुख दुःख, मानसिक व्यथा, वेदना हे सर्व गिळलेला, पण चेहऱ्यावर कायम शांतता असणारा तो आता ह्या जगात नाही. ह्या सगळ्या त्रासातून तो मुक्त झाला, हेच बरे झाले, असे कधी कधी वाटते. कितीही वाटले आपल्याला तरी ते नश्वर शरीर आपल्याजवळ कायम कसे राहू शकते? ज्याने जन्म घेतला त्याला मरण काही चुकले नाही. असे माझे मन वेगवगळ्या विचारात गढले होते. तेथून मी नंतर मुलीच्या घरी गेले. खाली गुरुदत्तच्या अंत्यायात्रेची तयारी सुरु होती. त्याची स्वतःची लॉरी, आपल्या मालकाच्या शवाला गेहून जाण्यास सिद्ध झाले होते. मला त्याच्याकडे पाहवत नव्हते. मी मान खाली घातली. जावयाच्या गाडीत त्यांच्या घरी गेले. कार्यक्रमासाठी आलेली लोकं बसली होती. एके एक करून सगळे निघून गेले. अब्दुल हलीम यांनी गुरुदतला श्रद्धांजली म्हणून राग भैरवी सतारीवर वाजवून, अल्लाकडे गुरुदत्तच्या आत्म्याला शांती मिळावी या करिता प्रार्थना केली.

सगळे कार्यक्रम संपवून मुलगी घरी परत आली. मी तेथे काय काय झाले हे ऐकायला आतुर झाले होते. मी मुलीला त्याबद्दल विचारले. तिने सुद्धा सविस्तर सांगितले, ‘आई, काय आणि कसे सांगू? गुरुदत्तला स्नान करवून, वेवेगळ्या सुगंधी द्रव्य त्याच्या शरीरावर लावले गेले, त्याचा आवडता सूट, मोजे, बूट त्याला परिधान करण्यात आले, सजवून, लॉरीवर दर्शनासाठी ठेवले. एक एक जण येऊन फुलांचा हार घालून, नमस्कार करत जात होते. सगळा देह फुलांनी, हारांनी झाकला गेला होता, फक्त चेहरा दिसत होता. भजन कीर्तन करणारे पुढे होते, त्यांच्या मागे लॉरी सावकाश चालली होती. सोनापूर येथे स्मशानभूमी जवळ पोहोचल्यावर अनेकांनी फोटो काढले. मग विद्युत दाहिनीत त्याचे शरीर काही मिनिटात भस्म झाले. कधीही स्वप्नात सुद्धा आले नव्हते, असा प्रसंग कसा सहन करून मी’ असे बोलून मला तिने मिठी मारली आणि मनसोक्त रडली.

त्या रात्री आकाशवाणीवर हि बातमी वारंवार प्रसारित केली जात होती.

डिसेंबरपासून गुरुदत्तच्या श्रीकांत या नवीन चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार होते. कलकत्याच्या कानन बाला नावाच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला त्यात घेऊन चित्रपट बनणार होता. त्याचे नाव होते श्रीकांत, जो त्याच नावाच्या शरदचंद्र यांच्या कादंबरीवर होता. चित्रपटाचा मुहूर्त देखील झाला होता.

पाली हिल्स मधील बंगला तोडून नवीन इमारत बांधण्याच्या प्रकल्पाचा मुहूर्त करून, अर्धवट राहिलेले अनेक चित्रपट तसेच ठेऊन, त्याचे आवडते विश्रांतीधाम लोणावळा तसेच सोडून. भांडणार्या बायकोला, आणि त्याच्या प्रिय मुलांना तसेच अर्ध्यावर सोडून त्याची सारखी काळजी करणाऱ्या आईला, असलेले सगळे तसेच सोडून, काही तरी महत्वाचे काम असल्यासारखे गुरुदत्त आमच्यातून कधीही परत न येण्यासाठी निघून गेला! तो काय थोड्या वेळासाठी बाहेर गेला आहे, येईल परत असे म्हणत वाट पाहत बसलेला तो चित्रपट स्टुडियो, ती रंगभूमी, अजून तशीच आहे. काळाच्या पडद्याआड गेलेला गुरुदत, आता कानन बालाला परत दिसणार नाही!

गुरुदत्तने आत्महत्या केली का? कि कोणी त्याला मारले? कि स्वाभाविक मरण त्याला आले? हे सर्व प्रश्न आणि संशय मला आजही सतावत आहेत.

कारण, त्या दिवशी चित्रीकरण रद्द झाले होते. राज कपूरने त्याला घरी बोलावले होते. रेकॉर्डिंग पण होते. रात्रीचे जेवण बनवून, तो आणि अबरार अल्वी यांच्या सोबत ‘बहारे फिर भी आयेंगी’ ह्या चित्रपटाचे काही अंतिम संवाद लिहिण्याचे काम रात्री दोन वाजेपर्यंत चालले होते. रात्री दहा वाजता गुरुदत्त-गीता यांच्यात मुलांच्या ताब्या विषयी मोठे भांडण झाले. गीताने मुलांना त्याचाकडे पाठवणार नाही हे सांगितल्यावर गुरुदत्तच्या कोमल मनाला यातना झाल्या असणार. त्या यातना सहन न झाल्यामुळे त्याने प्रमाणाबाहेर मद्यसेवन केले असे नंतर कळले. त्यानंतर त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या अशी वंदता होती.

१० ऑक्टोबरच्या सकाळी १० वाजता गीताचा दूरध्वनी आला. कायम त्याच्या प्रती उदासीन असणार, काळजी नसणारी गीता, अचानक, असे गुरुदत्तबद्दल काळजी करणारा दूरध्वनी का करते? तीने नोकरांना सांगितले कि गुरुदत्त अजून उठला का नाही, त्याच्या खोलीचा दरवाजा उघडून पहा जरा. तिने असे का विचारले, हा गूढ प्रश्नच आहे. जे झाले ते झाले, आता दुःख करत बसण्यात काही अर्थ नाही, हे खरे आहे. पण हि दुर्घटना कशी विसणार बरे? त्यातच त्याचे पोस्ट-मोर्टेम रिपोर्ट यायला सहा महिने लागले, याचे काय कारण असेल?

(समाप्त)

गुरुदत्त कोण?

हा गुरुदत्त कोण बुवा, असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाबद्दल तुम्हाला माहीत नाही असाच होऊ शकतो. पण तुम्हाला जर गुरुदत्त हा हिंदी सिनेमाचा एक संवेदनशील फिल्ममेकर होता हे माहीत आहे, पण तरीही तो कोण होता, कसा होता, आणि इतर प्रश्न त्याच्याबद्दल असतील तर, ते नक्कीच वाजवी आहेत. गुरुदत्त म्हणजे प्यासा, कागज के फूल आणि साहिब बीबी और गुलाम हे चित्रपट, त्यातील प्रसिद्ध गाणी माहिती असतात. माझे देखील तसेच होते. त्याच्या निधनाला पन्नासहून अधिक वर्षे झाली आहेत. दोन पिढ्या दरम्यान होऊन गेल्या. त्याची चित्रपट कारकीर्द वादळी होती. त्याच्याबद्दल अनेक वर्षात अनेक प्रकारे लिहून झाले आहे.

मी २-३ वर्षांपूर्वी सुरु केलेले गिरीश कर्नाड यांच्या पुस्तकाचे, आगोम्मे इगोम्मे या कन्नड पुस्तकाचे भाषांतराचे, काम तसे अजून अर्धवटच आहे, त्यात एक कर्नाडांचा गुरुदत्तविषयी लेख आहे, तो मी वाचला, आणि बरेच दिवस विसरून गेलो. का आणि कसे पण अचानक मला गुरुदत्तच्या आईने(वासंती पदुकोण, १९७६, प्रकाशक-मनोहर ग्रंथमाला, धारवाड) लिहिलेल्या ‘नन्न मग गुरुदत्त’ हे चरित्रात्मक कन्नड पुस्तक हाती पडले. कर्नाडांचा तो लेख म्हणजे ह्या पुस्तकाची त्यांची प्रस्तावना होती. हे पुस्तक गुरुदत्तच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी प्रकाशित झाले होते. गुरुदत यांचे कुटुंब कर्नाटकातील, त्यांच्या जन्म देखील कर्नाटकातील, पण शिक्षण कलकत्ता येथे, आणि त्यांची कर्मभूमी अर्थात मुंबईची चित्रपटसृष्टी.

एक-दोन वर्षांपूर्वी, मी चित्रपट रसास्वाद शिबिराला गेलो होतो. तेथे गुरुदत्तचा उल्लेख झाला, तसेच सत्यजित राय यांचा अर्थातच देखील झाला. खोपकरांचे गुरुदत्त:तीन अंकी शोकांकिका हे पुस्तक होते माझ्याकडे, ते परत बाहेर काढले. सुधीर नांदगावकर यांनी संपादित केलेले गुरुदत्तवरील पुस्तक मागवले. आणि कर्नाडांच्या त्या कन्नड लेखाचे मराठी भाषांतर केले. ते मी येथे देत आहे. वासंती पदुकोण यांच्या त्या पुस्तकाचे देखील मराठीत भाषांतर सुरु केले आहे. गुरुदतच्या आयुष्यावर आणखी प्रकाश त्यामुळे पडणार आहे; गुरुदतचे वेगळेपण परत नव्या पिढीला समजण्यास मदत होईल असे मला वाटते.

Guru Dutt

The back cover of the book by Vasanti Padukone. Biography of Guru Dutt

एखाद्या आईने आपल्या मुलाचे चरित्र लिहावे असा मला माहिती असलेला पहिलाच प्रसंग आहे. नाही चुकलो. सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरचे चरित्र त्यांच्या आईने(मीनल गावसकर) देखील लिहिले आहे, पुत्र व्हावा ऐसा या नावाने ते पुस्तक आहे. पण ते नंतरचे आहे, १९८७ मधील. गुरुदत्तवरील पुस्तक १० वर्षे आधी आले. असो.

अनुवाद: माझा पुत्र गुरुदत-प्रस्तावना(गिरीश कार्नाड)

श्रीमती वासंती पदुकोण यांच्या बरोबर माझी पहिली भेट त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार सुरु झाल्यावर दीड वर्षांनी झाली. असे असले तरी पहिले पत्र वाचतातच त्या माझ्या अतिशय परिचयाच्या असल्याचा भास झाला. मुंबई मध्ये ‘संस्कार’ चित्रपट पाहून आल्यावर त्यांनी मला पहिले पत्र लिहिले होते. ‘मी गुरुदत्तची आई’ असे सुरुवात केलेले पत्र चित्रपटाबद्दल प्रशंसा करणारे होते, आणि काहीश्या अनिवार्यपणे त्यांनी गुरुदत्तबद्दल बरेचसे लिहिले होते. असे चित्रपट पाहिल्यावर पुत्राच्या आठवणी, त्याचे कलात्मक अभिनय, अर्थपूर्ण चित्रपट करावे असा त्याला असलेला ध्यास,त्याच्या अकाली मृत्यूमुळे अर्ध्यावरच थांबलेल्या कित्येक योजना, असे त्यांनी बरेच काही पत्रातून लिहिले होते.

ते पत्र आता माझ्याकडे नाही. तरी पण त्या पत्रात शेवटी आलेला मजकूर अजून लक्षात आहे. ‘मी लहान असताना मला नीट शिक्षण मिळाले नाही. मार्गदर्शन मिळाले नाही. काहीतरी करायला जावे तर त्यात खोडा घालणारे लोकच जास्त. त्यावेळी माझ्या पाठीशी राहून, मला उत्तेजन दिले असते तर, मी अजून बरेच काही केले असते. काही तर नक्कीच मिळवले कमावले असते.

हि गोष्ट मला अतिपरिचयाची वाटली. त्या पत्रातील त्यांच्या भावना. कळकळ हि एका पिढीची होती. त्या काळी विशी-एकविशीच्या उंबरठ्यावर असलेल्या समस्त सारस्वत स्त्रियांचीच ती मनोव्यथा त्या सांगताहेत असे मला वाटून गेले.

ह्या पुस्तकाचा विषय म्हणजे गुरुदत्त जो चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आहे. मी चित्रपट जगतात वावरत असल्यामुळे किंवा माझे चित्रपट श्रीमती पदुकोण यांना आवडत असावेत, त्यामुळे त्यांनी मला हि प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली असावी. असे असले तरी मी हि ‘स्मृतिचित्रे’ वाचल्यावर मला भावलेली गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकात आढळणारे सामाजिक प्रश्न.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी ‘चित्रापूर’ सारस्वत समाज हा कुमटा-मंगळूरू दरम्यानच्या प्रदेशात भूभागात एकवटलेला होता. काही एक अपवाद सोडले तर, बहुसंख्य सारस्वत समाज हा आर्थिकदृष्ट्या गरीबच होता. उद्योग धंदा करण्याएवढी चतुरता त्यांच्या जवळ नव्हती. जमीन कसण्याची शारीरिक क्षमता जवळ नाही. ब्रिटीशांनी भारतात घट्टपणे पाय रोवल्यावर, कारकुनाची नोकरी करण्याला त्यांना जमले होते, त्यावेळेस हि सर्व मंडळी, मोठ्या शहरांकडे, विशेषतः पुण्या मुंबईकडे स्तायिक होऊ लागले.

ह्या समाजाची लोकसंख्या तशी फार मोठी नाही, त्यामुळे हा नवीन पेशा आणि त्याच्याबरोबर आलेली नागरीकरणामुळे ह्या समाजावर पटकन परिणाम झाला. वरिष्ठ पदाची नोकरी हे ध्येय ठरल्यामुळे, त्याच्या आड येणाऱ्या सारस्वत समाजाचे संस्कार त्या आड आले तरी ते नाकारायला, ओलांडायला कठीण गेले नाही. हे सपष्ट करण्यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. समुद्र प्रयाण हे त्यांच्या मठाने बहिष्कृत केले होते. पण चांगल्या पदावरील नोकरी मिळवण्याकरिता इंग्लंडला जाणे आवश्यक झाले होते. पाहता पाहता बरेच जन परदेशगमन करून आले, आणि त्याचा परिणाम म्हणून अर्धाहून अधिक सारस्वत समाज मठाने बहिष्कृत केला. पण त्यामुळे झाले काय तर, मठाची सारी आर्थिक गणिते फिस्कटली. जाती बाहेर गेलेल्या मंडळीनी काही प्रयशित्त देखील घेतले नाही. शेवटी मठाने बहिष्कार मागे घेऊन त्यांना सामावून घेतले.

नवीन विचार नवीन आचार ह्या समाजात पसरू लागला, हे खरे आहे, पण समाज याचा अर्थ येथे त्यातील पुरुषमंडळी असा घ्यावा लागेल. बदलाचे वारे जरी पुरुषांना निर्भयपणे आपलेसे करण्यात काही अडचण आली नाही, पण स्त्रियांना तसे करायचा अधिकार नव्हता. दोन ‘बुकं’ शिक्षण, वयाची तेरा वर्षे ओलांडायच्या आताच झालेले लग्न, पंचविशीच्या आत कमीतकमी अर्धा डझन मुले पदरी पाडून, तारुण्य कुस्करले जाऊन, उरलेले सारे जीवन पत्नी म्हणून, आई म्हणून जगण्याचे भागदेय काही बदलले नाही.

महाराष्टात त्या काळी तीव्र वेगाने सामाजिक क्रांती सुरु झाली होती. कर्वे, गोखले वगैरे मंडळीनी स्त्री शिक्षण, विधवाविवाह या करिता आंदोलने सुरु केली होती. लक्ष्मीबाई टिळक, रमाबाई रानडे ह्या सारख्या समाजसुधारक महिला पुढे येऊन एक नवीन आदर्श समाजापुढे ठेऊ पाहत होत्या. त्यामुळे गाव मागे टाकून शहराकडे पुरुषांबरोबर आलेल्या सारस्वत महिलांना हे सर्व दिसत असल्यामुळे, त्यांच्या आशा-आकांक्षाना नवीन धुमारे फुटू लागले यात आश्चर्य ते काय. असे असले तरी सामाजिक जीवनात हे नवीन बदल अंगीकारत असताना, मानसिक बदल, विचारांतील बदल अजून म्हणावे तितके झाले नव्हते.

वासंतीबाईंच्या पहिल्या पत्रात मला दिसलेली ही तळमळ मी त्या पिढीतील इतर स्त्रियांकडूनही पूर्वी ऐकली होती.

‘त्यावेळी स्त्री शिक्षण नुकतेच सुरु झालेले होते. माझ्या शाळेची मुख्याध्यापिका घरी येऊन वडिलांच्या पाया पडून विनंती करत होत्या कि हिला शाळेत पाठवा, ती अतिशय हुशार आहे, पुढे ती काहीतरी नक्कीच करेल. पण त्यांनी ते ऐकले नाही, आणि माझा वयाच्या पंधराव्या वर्षीच विवाह लावला’. १९१४ मध्ये घडलेला हा प्रसंग साठ वर्षानंतर देखील आठवून डोळ्यात पाणी काढलेल्या महिला मी पहिल्या आहेत.

सामाजिक विरोधाला न जुमानता तसेच परिणामांची पर्वा न करता आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याचा ध्यास, आपल्या कर्तृत्व शक्तीवर असलेला विश्वास त्या वेळच्या स्त्रीयांकडे होता: स्वतःहून अथवा भाऊ असेल, किंवा पती असेल यांची मदत घेऊन शिक्षण पूर्ण करून, विणकाम शिकणे, संगीत शिकणे, नर्स, शिक्षिका किंवा समाज सेविका यांचे प्रशिक्षण घेणे, कथा, कविता, भजन, कीर्तन लिहिणे, उतार वयात आकाशवाणी वर कोकणी कार्यक्रमात भाग घेणे, अश्या अनेक उपक्रमातून त्या कार्यरत राहत असत.(चित्रपट शृष्टी म्हटले कि मध्यमवर्ग अजूनही नाक मुरडत असे, घाबरत असत. असे असताना चाळीस वर्षांपूर्वी भावाने वासंतीबाई यांना ‘तू काही काम का करत नाहीस?’ असे दिवचाल्यावर त्यांनी चित्रपटासाठी एक हिंदी पटकथा लिहून, मुंबईला जाऊन त्यावेळचे चित्रपट सम्राट चंदुलाल शाह यांच्या ती देऊन त्या आल्या होत्या हे येथे नमूद केले पाहिजे). असे सगळे असले तरी, त्यावेळी, शेवटी ह्या स्त्रीयांच्या नशिबी पुढे विशेष काही आले नाही.

अशी अतृप्त, अस्वस्थ मनोवृत्ती झाल्यामुळे. हि अपूर्ण महत्वाकांक्षा त्यांनी आपल्या मुलांच्या जीवनात पाहिली. आपल्याला जे जमू शकले नाही त्यांच्या हातून घडावे ह्या करता त्या आग्रही राहिल्या. त्यामुळे ‘माझा पुत्र गुरुदत्त’ हे जरी वैयक्तिक चरित्र न राहता, त्या वेळच्या सामाजिक प्रतिक्रियेचे विस्ताराने केले चित्रण आहे असे म्हणू शकतो.

तरीसुद्धा असा परकाया प्रवेश सोपा नसतो, त्यात धोके असतात. वैवाहिक जीवनात सुख असे नव्हतेच. त्यांचे पती, जे त्या पिढीच्या साऱ्या पुरुषांचेच प्रतिनिधी करणारे असे होते, मध्यमवर्गीय मुल्यांवर विश्वास असणारे, जीवनात सुस्थिती, स्थैर्य असावे असे वाटणारे, सरकारी नोकरीच्या गुंगीतून येणारी निष्क्रियता, या मुळे विकासाला पोषक असे वातावरण नव्हते आणि आवश्यक असा संयम असाही नव्हता. याहुनही विशेष म्हणजे स्वतःची मुले यशस्वी होऊन पुढे ती त्यांना सोडून गेली याचे दुःख त्यांना झेलावे लागले. आपला मुलगा आयुष्यात मोठा होत आहे, यशस्वी होत आहे, नाव कमावत आहे, या विषयी असलेले समाधान होतेच, पण त्याच बरोबर तो आपले असे वेगळे स्वातंत्र्य जीवन जगणार आहे, आपल्या दुःखाभोवती तटबंदी निर्माण करतो आहे, अश्या अनुभवांना देखील त्यांना सामोरे जावे लागले. शेवटी आपल्या जीवनात आपल्याला जे साधले नाही ते आपल्या मुलांत पाहत असताना, ते शक्य झाले नाही, हा व्यक्त केलेला विषाद असे सर्व या पुस्तकात येते.

आधी सांगितल्याप्रमाणे, हा सर्व अनुभव हा काही याच पुस्तकाच्या निमित्ताने आलेला नाही. किंवा त्या पिढीच्या साऱ्या स्त्रियांच्या नशिबी असेच जीवन आले होते असेही मी म्हणत नाही. पतीची नोकरी, त्याहून वरची मुलांची नोकरी, सुसंकृत, शिष्टाचारी मुलगी, सासू, लहानपणापासून मनी जपलेले स्वप्न, मनातील रेडियो, मोटार-कार, संगीताच्या रेकॉर्ड्स, या सगळ्यात संतृप्त अश्या ह्या स्त्रीया जीवनात मागे राहिल्या. त्या सर्व स्त्रिया पुण्यशील होत्या.

असे असले तरी ‘माझा पुत्र गुरुदत्त’ मध्ये मला जाणवलेले म्हणजे रोष, आंतरिक पिशाच्च या विरुद्ध त्यांचा लढा दिसतो. श्रीमती पदुकोण यांनी माझ्या बद्दल, आणि त्यांच्या जवळपास असणाऱ्याबद्दल काही न लपवता, न विसरता लिहिले आहे. बहुशः, विविध यातना सहन केल्यामुळे, त्या पिढी मध्ये अशी प्रामाणिकता, धैर्य दिसून येते.

(फेब्रुवारी १९७६)