चौक

एक काळ असा होता ज्या वेळी नाटकं पाहण्याचा आणि त्यातही प्रायोगिक नाटकं पाहण्याचा चस्का लागला होता. अर्थात नाटकं अजूनही पाहत असतो पण, प्रायोगिक नाटकं आजकाल विशेष होत नाहीत. काही ठिकाणे आहेत, जसे सुदर्शन रंगमंच, सकळ ललित कलाघर, वगैरे. पूर्वी ती मी स्नेहसदन, पत्रकार नगर येथे देखील एक खुला रंगमंच होता, तेथे ती नाटकं होत असत. पंधरा वर्षांपूर्वी(२००४ मध्ये) मकरंद साठे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित एक नाटक, ज्याचे नाव चौक, ते मी पहिले होते, पण बालगंधर्व मध्ये. ते नाटक अर्थात व्यावसायिक नव्हते, प्रयोगीकच होते. ते नाटक आठवायचे कारण म्हणजे कालचा महाराष्ट्र दिन, तोही साठावा. त्यानिमित एका दुरचित्रवाणी वाहिनीवर सुरु असलेल्या विचारमंथनात महाराष्ट्रात, प्रामुख्याने १९९१ नंतर खाउजा(खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण)चे वारे वाहू लागले, त्या नंतर, एकूणच identity crisis(एखाद्याची अस्मिता अथवा ओळख याविषयी प्रश्न) निर्माण झाला आहे का, ह्या वर चर्चा सुरु होती. चौक हे नाटक देखील त्याचाच वेध घेते.

२००४ मधील या प्रयोगात माधुरी पुरंदरे, गजानन जोशी आणि इतर बरेच कलाकार होते(त्यांची नावे आता आठवत नाहीत). खरे तर हा एक दीर्घांक आहे, एकूणच आपली स्वतःची ओळख हरवून बसण्यामुळे निर्माण झालेले प्रश्न एकूणच अस्वस्थ करणारा अनुभव दिला होता. नाटक तसे गुंतागुंतीचे आहे, सरळ काहीतरी विषय नाही(जसे ऐतिहासिक, कौटुंबिक, विनोदी वगैरे). हे नाटक म्हणजे नाटककारची एकूणच सामाजिक परिस्थितीवर भाष्य आहे. अच्युत आठवले हे प्रमुख पात्र. त्यांच्या एका कादंबरीत(अच्युत आठवले आणि आठवण, २००३) सुद्धा याच नावाचे प्रमुख पात्र आहे. या नाटकात एका चौकात traffic jam झाला आहे.  हि आपल्या दृष्टीने नेहमीचीच गोष्ट आहे.  पण मकरंद साठे त्या घटनेतून काही नवीन सांगू पाहतात.  Traffic jam मध्ये अनेक लोकं अडकलेली आहेत. बेरोजगार लोकं, पांढरपेशे लोकं, विचारवंत, समाजसुधारक, वारकरी वगैरे लोकं आहेत. त्यामुळे सगळी एकमेकांशी भांडत आहेत. सगळे वैतागले आहेत, कोणाजवळ उत्तर नाही हे असे का झाले आहे, नुसता गोंधळ गडबड सुरु आहे. एकमेकांच्यात होणाऱ्या वादविवादात, आरोप-प्रत्यारोपातून असे समजते कि लोकं आपण कोण आहोत हे विसरून गेले आहेत. समाजातील सगळेजण एकमेकांपासून तुटत जात आहे, एकमेकांशी संबंध नाही असे एकूण निरर्थेकतेकडे जाणारे असे वातावरण आहे.

ह्या गर्दीत सरळ सरळ दोन गट दिसतात. ज्यांच्या भावना पटकन भडकतात असे लोक, आणि दुसरे काही जण असे आहेत कि त्यांना काही झाले तरी  त्याच्या भावना भडकत नाहीत. दोघेही टोकाची भूमिका घेणारे, त्यामुळे समाजाचा समतोल बिघडतो, आणि हे आपण नेहमी पाहतो.  भारतात जागतिकीकरणाच्या निमित्ताने identity crisis होतो आहे, झाला आहे. आपली एक आधीची संस्कृती आणि आताची संस्कृती यात दरी असल्यामुळे असे प्रश्न निर्माण होत आहेत. ह्या नाटकात तेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. अर्थात मकरंद साठे हे त्यांच्या इतर पुस्तकांतून अश्या गोष्टींचा वेध घेत असतात. रंगनाथ पठारे देखील असाच काहीसा प्रयत्न त्यांच्या कादंबऱ्यांतून करत असतात.

मराठी विश्कोशात मकरंद साठे यांच्या बद्दलच्या नोंदीत या नाटकाचा असा उल्लेख आहे, ‘….आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरण यांच्या रेट्यामुळे आधुनिक नागर जीवनात सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मूल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घुसळण होते आहे. या स्थितीमुळे गोंधळलेल्या, भांबावलेल्या सामान्य माणसाच्या संभ्रमावस्थेचे प्रतीकात्मक चित्रण चौक या नाटकात वाहतुकीच्या कोंडीचे प्रतीक वापरून साठे यांनी केले आहे….’. हिच संभ्रमावस्था उत्तर-आधुनिक विचारधारेचे(post modernism, आधुनिकोत्तर विचारधारा) व्यवच्छेदक लक्षण आहे असे मानतात.

मकरंद साठे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित अजून एक नाटक मी पहिले होते, त्याचे नाव सूर्य पाहिलेला माणूस, आणि ते अर्थातच डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेमुळे, अभिनयामुळे, संवाद यामुळे ते बरेच चर्चेत होते. त्यावर देखील लिहायचे आहे, बघू कधीतरी.