Sergei Eisenstein’s October

काही दिवसांपूर्वी गतकाळातील प्रसिद्ध रशियन(अर्थात त्यावेळेस सोविएत रशिया) चित्रपट दिग्दर्शक सर्जी आयझेनस्टाईन(Sergei Eisenstein) याचा १२०वा वाढदिवस साजरा झाला. गुगलने त्यावर एक छानसे डूडल देखील केले होते. या दिग्दर्शकाचा परिचय गेल्यावर्षी चित्रपट रसास्वाद शिबिरात झाला होता. रशियन राज्यक्रांतीच्या(October Revolution) निमित्ताने त्याने दिग्दर्शित केलेला October हा सिनेमा देखील मी नंतर पाहिला होता. रशियन राज्यक्रांतीला देखील १०० वर्षे गेल्याच वर्षी झाली. बरेच दिवस चालले होते त्या सर्वाबद्दल थोडेसे लिहावे म्हणून. आज तो योग जमतोय.

sergei-eisenstein

Sergei Eisenstein’s doodle by Google

चित्रपट रसास्वाद शिबिरात, ज्या बद्दल मी सविस्तर लिहिले आधी आहेच, आम्हाला चित्रपट निर्मितीचा, कलेचा, तंत्राचा इतिहास, त्यातील प्रमुख टप्पे, विविध व्यक्तींची धावती का होईना, थोडीशी ओळख, जमल्यास त्या व्यक्तींच्या कामाचा एखादा तुकडा दाखवणे इत्यादी गोष्टी झाल्या होत्या. उद्देश असा होता की हे सर्व कानावर पडावे, आणि प्रत्येकाने आपल्या सवडीने, आवडीने विविध विषयांत पुढे मार्गक्रमणा करावी. Sergei Eisenstein चा उल्लेख चित्रपट संकलनाच्या क्षेत्रात त्याने केलेल्या कामाबद्द्ल तसेच montage ह्या तंत्राबद्दल बोलताना आला होता. त्याचे एक पुस्तक The Film Sense नावाचे इंटरनेटवर येथे उपलब्ध आहे. ते थोडेफार चाळले आहे, पण व्यवस्थित वाचले पाहिजे, म्हणजे त्याची विचार सरणी आणखी समजू शकेल. आयझेनस्टाईन हा चित्रपट बनवायचा, तसेच तो ते कसे बनवायाचे यांचे शिक्षण देखील द्यायचा. त्याने सहा सिनेमे बनवले. त्याचा एक सिनेमा Battleship Potemkin ची झलक आम्हाला शिबिरात दाखवली होती.

ऑक्टोबर हा सिनेमा १९२७ मध्ये प्रदर्शित झाला, आणि तेही नेमक्या राज्यक्रांतीचा दहाव्या वर्धापनादिवशीच. हा सिनेमा आयझेनस्टाईनने लेनिनग्राड(पूर्वीचे पेट्रोगार्ड) मध्ये चित्रित केला. सिनेमा सुरु होतो तो फेब्रुवारी १९१७ मध्ये जेव्हा रशियाची जनता तिसऱ्या अलेक्झांडर राजाचा पुतळा उध्वस्त करतात तेथून, आणि मग पुढच्या आठ महिन्यातील ठळक घाटांची नोंद ह्या चित्रपटात(तसे पहिले तर हा documentary धाटणीचा सिनेमा आहे) करते. चित्रपट श्वेत-धवल आहे, अधून मधून सबटायटल्स दिसत राहतात, ज्यायोगे बोध होत राहतो. Provisional Government ची स्थापना होते. पण रशियन जनतेचे दुष्टचक्र संपत नाही(सबटायटल सांगते-No bread, no land). मग एप्रिल १९१७ मध्ये लेनिनचे झालेले आगमन अतिशय नाट्यपूर्ण दर्शवलेले आहे. लेनिनच्या आणि सामान्य कामगार जनतेच्या विरोधात जाणाऱ्या Provisional Government च्या नेत्याची खिल्ली उडवलेली दाखवलेली आहे, आणि परत सरकार जुलमी राजाच्यासारखे वागणार की काय हे सुरुवातीला उध्वस्त केलेल्या राजाचा पुतळा परत जोडला जावू लागला आहे असे दाखवून सूचित केले आहे. असे असले तरी हंगामी सरकारच्या सैन्याचा कामगार परभव करतात. रशियन राज्यक्रांतीचे तीन प्रमुख नेते लेनिन, स्टालिन आणि ट्रोत्स्की हे दिसतात. त्यांच्यातील वाद-विवाद दिसतात. इतक्यातच स्टालिनवर The Death of Stalin नावाचा एक सिनेमा आला आहे, त्यावरून रशियात सध्या गदारोळ सुरु आहे. भूमिगत झालेला लेनिन सशस्त्र क्रांतीचा नारा देतो, आणि मग सगळे हात उंचावून आपला पाठींबा दर्शवतात आणि All in favor of Lenin असे वाक्य पडद्यावर दिसते.

 

हा सिनेमा सोविएत फिल्ममेकर्सच्या एका चमूने बनवला आहे, ज्याचे नेतृत्व आयझेनस्टाईनने केले होते. रशियन राज्यक्रांती हा विषयच तसा असल्यामुळे चित्रपटात भरपूर नाट्य, ताण, रहस्य, तसेच मध्येच थोडीसा विनोद अशी वेगवेगळी तंत्रे वापरलेली दिसतात. Montage तंत्र, ज्यात पडद्यावरील दृश्याला एका वेगळ्या दृश्यामधून आर्थ प्राप्त होतो, असे त्याने बरेच या चित्रपटातून केले आहे. चित्रपट एकूण १०० मिनिटांहून थोडा अधिक आहे. शेवटची ४५-५० मिनिटे ऑक्टोबर २५ तारखेला जे काही होते त्याचे चित्रण सविस्तरपणे करते. लाल सैन्य(Red Guards) हे Winter Palace ची सुरक्षा करत असतात. त्यांचे कडे तोडून सोविएत जनता महालात घुसते, सर्व नेते कैदेत येतात. या सिनेमाचे उपशीर्षक आहे “Ten Days That Shook the World”. आणि हे शेवटी जगातील विविध शहरातील घड्याळे दाखवून सूचित केले आहे. चित्रीकरण सुरु असताना, त्यांना महालावर एक वेगळेच मोठेसे घड्याळ नजरेस पडले होते. त्यावर विविध देशांतील शहरांच्या वेळेची तसेच स्थानिक म्हणजे पेट्रोग्राडची वेळ देखील होती. त्यावरून घड्याळाच्या आणि क्रांतीच्या दृश्यांचे मोन्ताज करावे असे सुचले. उपरोक्त पुस्तकात तो म्हणतो, ‘The appearance of this clock struck in our memory. When we wanted to drive home especially forcefully historic moment of victory and establishment of Soviet power, the clock suggested a specific montage solution: we repeated the hour of fall of Provisional Government, depicted on the main dial of Petrograd time, throughout the whole series of subsidiary dials showing time of London, Paris, New York, Shanghai’

अर्थात ऑक्टोबर २५ ला(ही तारीख जुलिअन कालगणनेनुसार, तर नोव्हेंबर ७ ही ग्रेगोरियन कालगणनेनुसार येते) क्रांती संपूर्ण होऊन साम्यवादी सरकार आले आणि सोविएत रशियाची(USSR) स्थापना झाली. रशियन राज्यक्रांतीचे कितीतरी दुरगामी परिणाम रशियावरच नाही तर, साऱ्या जगावर झाले हा इतिहास आहेच. रशिया हा देश गेल्या शंभर वर्षात कितीतरी संक्रमणातून गेला आहे. १९९१ मध्ये त्याची शकले झाली आणि साम्यावादाकडून लोकशाहीकडे स्थित्यंतर झाले. पण १९१७च्या राज्यक्रांती मुळे कम्युनिस्ट विचारसरणीचा झपाट्याने प्रसार झाला, ह्या आकर्षणातून भारतातून देखील बरेच लोक ५०-६० वर्षापूर्वी रशियाला जाऊन आले. त्यातील काहीजणांनी आपले अनुभव पुस्तकातून मांडले आहेत. या चित्रपटातून त्याकाळच्या सोविएत रशियाचे Sergei Eisenstein ने केलेले चित्रण आपल्याला पाहायला मिळते, तसेच या पुस्तकांतून देखील ते पाहायला मिळते. मी ह्या ब्लॉगवर पूर्वी अश्या दोन पुस्तकांबद्दल लिहिले आहे, ते येथे(अनंत काणेकर) आणि येथे(अण्णाभाऊ साठे) पाहता येईल.