देऊळ बंद

आजकालच्या दिवसामध्ये पुण्यात तुम्ही कोठेही राहत असा, आणि तुम्हाला जर चित्रपटगृहात जाऊन एखादा चित्रपट पहायचा असेल तर खूप आधीपासूनच तयारी करावी लागते. याचे प्रमुख कारण गर्दी, पुण्यातील वाहतूक, आणि त्यातून होणारा मनस्ताप. याचा अनुभव मी गेल्या काही वर्षापासून घेत आहे. असाच एके शनिवारी आम्हा उभयतांस दुपारी थोडा वेळ होता म्हणून चित्रपट पहावयाचे ठरवले. चित्रपट पाहून ४-५ महिने झाले होते. आता पहा, वेळ होता म्हणून चित्रपट पाहावयाचा आहे. कशी परिस्थिती आली आहे. पुण्यात दुसरे काही काम असेल तरच चित्रपट पाहण्याचे साहस करू शकतो, परवडू शकते आणि होणारा मनस्ताप सहन करून शकतो. घरातून बाहेर पडण्याच्या आधी कुठला चित्रपट पाहावयाचा यावर खलबते झाली. २-३ प्रसिद्ध हिंदी चित्रपट अजून होते(बजरंगी भाईजान, बाहुबली), पण वेळा सोयीच्या नव्हत्या; काही इंग्रजी चित्रपट होते-पण विशेष काही पाहण्यासारखे नाही वाटले; एक कन्नड चित्रपट ही लागला होता-पण त्याचा विषय पाहून त्याचा नाद सोडला; देऊळबंद हा मराठी चित्रपट सोयीच्या ठिकाणी आणि सोयीच्या वेळेत होता, तसेच त्याच्या बद्दल थोडे बरे ऐकले होते, मोहन जोशी यांचा रोल वेगळा होता, त्याचेही आकर्षण होते. म्हणून तो पहावयाचे ठरवेले. चित्रपटगृहात मराठी चित्रपट पाहूनही वर्ष झाले होते. मागच्या वर्षी डॉ प्रकाश बाबा आमटे पहिला होता.

देऊळबंद चा विषय थोडाफार समजला होता. ह्या विषयावर आधी मराठीत आणि तसेच हिंदीतही चित्रपट आले होते. Oh My God त्यातील एक. त्यामुळे विशेष खूप काही अपेक्षा ठेवून गेलोच नव्हतो. आमचे काम संपवून चित्रपटगृहात पोहचलो. विशेष गर्दी नव्हती. चित्रपटाचा बहुधा ३-४ आठवडा चालू होता. आम्ही स्थिरस्थावर झालो आणि चित्रपट सुरु झाला. सुरुवातीचे काही क्षण हे मंतरलेले असतात, चित्रपट माध्यमच असे जादुई आहे की ते आपल्याला दुसऱ्या दुनियेत घेवून जातात, विशेषतः चित्रपटगृहात पाहत असाल तर.

सुरुवातीच्या काही दृश्यामुळे आणि निवेदनामुळे , एकदम स्वदेस चित्रपटची आठवण झाली. इथेही नासा मधून एक भारतीय तरुण शास्त्रज्ञ भारतात परत येतो ह्या दृश्याने चित्रपट सुरु होतो. आणि सुरु होतो आस्तिक आणि नास्तिक यामधील संघर्ष. भारतीय किनाऱ्याच्या संरक्षणाकरिता लागणाऱ्या सुरक्षाप्रणालीच्या निमित्ताने इस्रो मध्ये काही प्रकल्प करण्यास त्याला पाचारण केलेले असते. ज्या पद्धतीने तो भारतीय(आता अमेरिकेचा नागरिक असलेला) तरुण शास्त्रज्ञ येथील शास्त्रज्ञांची खिल्ली ओढतो ती हास्यास्पदपणे आणि अगदी मानहानीकारकरित्या दाखवले आहे. तेथेच माझा मूड गेला आणि ह्या चित्रपटाकडून अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही हे कळून चुकले. दहशतवादी त्याच्या मागावर असल्यामुळे त्याला कडक सुरक्षा व्यवस्था असते, त्याचीही तो खिल्ली उडवत असतो. ज्याठिकाणी तो राहत असतो, त्या ठिकाणी स्वामी समर्थांचे मंदिर असते. त्याचा तर अर्थातच देवावर विश्वास नसतो, पण त्याचे वागणे देखील टोकाचे असते(कोठलाही सुशिक्षित माणूस असे टोकाचे वागणार नाही, पण मग आपला चित्रपट पुढे कसा जाईल, त्यात नाट्य कसे येईल ना?). मग सुरु होते, त्याची आणि स्वामी समर्थांच्या भक्तांची लढाई. यापुढचा चित्रपट म्हणजे स्वामी समर्थ महिमा आहे. मोहन जोशी यांनी स्वामी समर्थ रंगवले आहे. त्यांचा वेश, बोलणे थोडी खसखस पिकवतात, काही ठिकाणी छान जमले आहे.

स्वामी समर्थ आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत स्थळांचे दर्शन होते. त्या तरुणाच्या प्रकल्पात स्वामी समर्थ त्याला कशी मदत करतात आणि त्याचे कसे परिवर्तन होते याचे चित्रण आहे. दहशतवादाची किनारही या चित्रपटाला आहे. अनेक विषय असल्यामुळे, नावाजलेल्या कलाकारांची उपस्थिती असूनही, माझ्या दृष्टीने चित्रपट परिणामकारक ठरला नाही.

चित्रपट संपल्यानंतर बाहेर पडणार, तोच धो धो पाऊस सुरु झाला, आणि आम्ही आणखी २० मिनिटे तेथेच खोळंबलो. यावर्षी पुण्यात पाऊस पडलाच नाही, आणि अगदी अनपेक्षितपणे पडणारा हा पाऊस पाहून, आमच्या मनातील नुकताच पाहिलेल्या चित्रपटाची स्मृती पार धुवून निघाली आणि उल्हासित मनाने घरी परतलो.