तीन चित्रकार, तीन पुस्तके, तीन चित्रपट

ह्या लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडील पुस्तकांची आवारावर करताना चित्रकला आणि चित्रकार यांच्या वरील मी गोळा केलेली काही पुस्तके पुढ्यात आली. आणि थोडीशी उसंत असल्यामुळे, चित्रकारांची चरित्रे, त्यावरील पुस्तके वाचावीत आणि चित्रपट पाहावेत अशी मनाने उचल खाल्ली. त्याबद्दल आज लिहायचे आहे. तसे पाहिले तर भारतीय चित्रकला आणि पाश्चिमात्य चित्रकला ह्यांचा तुलनात्मक अभ्यास, तसेच अमूर्त चित्रकला(abstract painting) हे विषय आधीपासून डोक्यात आहेत, पण त्याबद्दल नंतर कधीतरी. पूर्वी कधीतरी अनंत सामंत यांच्या चित्रकार, चित्रकला हा विषय घेऊन लिहिलेल्या एका कादंबरीबद्दल लिहिले होते(ऑक्टोबर एंड).

एके दिवशी सहज म्हणून माधवी देसाई यांचे कांचनगंगा हे पुस्तक, कधी तरी आणून ठेवले होते, ते वाचायला हाती  घेतले. त्यात एकोणिसाव्या शतकातील मुंबईतील तीन मैत्रिणींची कथा आहे गायिका अंजनी मालपेकर, चित्रकारांसाठी मॉडेल म्हणून काम करणाऱ्या सुरंगा मुळगावकर आणि नाटककार हेमा पेडणेकर. सगळ्या मुळच्या गोव्याच्या. त्यातील सुरंगाबद्दल उत्सुकता वाटली. ती चित्रकार राजा रवि वर्मा (१८४८-१९०६) याच्यासाठी मॉडेल म्हणून काम करत असे असा उल्लेख आला. मी वाचलेल्या रणजीत देसाई यांच्या राजा रवि वर्मा ह्या कादंबरी-वजा चरित्रात सुगंधा असा उल्लेख आला होता. ते पुस्तक परत कपाटातून काढले आणि वाचले. सुगंधा हि अर्थात नाव बदलेली सुरंगा होती हे समजले. राजा रवि वर्मा याच्या जीवनावर बेतेलेला रंग रसिया हा २००८ मधील चित्रपट देखील पहिला. एकोणिसावे शतक आणि न्यूड मॉडेल, पुराणातील प्रसंग रेखाटणे, राजा रवि वर्माचे काळापुढे असणे हे सर्व अतिशय रोमांचित करणारे वाटले. राजा रवि वर्माचे भारतीय चित्रकलेच्या इतिहासात मोठे स्थान आहे. भारतात आधुनिक चित्रकला त्यांच्या पासून सुरु झाली असे म्हणतात. त्या आधी अर्थात कित्येक शतके चित्रकला होतीच, नाही असे नाही. पण त्यांनी  तैलरंगात वास्तववादी चित्रे काढली. त्यांच्या काळात अजून जे जे  कला महाविद्यालय मुंबई मध्ये सुरु झाले नव्हते. नंतर चित्रकलेतील विविध आधुनिक प्रवाह येत गेले. कला महाविद्यालय झाल्यानंतर विद्यार्थ्यांना न्यूड मॉडेल पाहून रेखाटने करायला शिकवले सुरु झाले(नुकताच मराठी मध्ये ह्या विषयावर न्यूड हा चित्रपट येऊन गेला होता). इतर अनेक शैली, अनेक विचारप्रवाह देखील सुरु झाले.

Raja Ravi Varma

Raja Ravi Varma

मग मी मोर्चा वळवला तो माझ्याकडे असलेल्या दोन पाश्चात्य चित्रकारांच्या चरित्रात्मक पुस्तकांकडे. प्रसिद्ध चित्रकार विन्सेंट व्हॉन गॉगचे (१८५३-१८९०) चरित्र लस्ट फॉर लाइफ परत कपाटातून बाहेर काढले, पूर्वी केव्हातरी वाचायला घेतले होते, पंधरा-वीस पाने वाचून झाली होती. दुसरा पाश्चिमात्य चित्रकार ज्याचे चरित्र माझ्याकडे होते तो म्हणजे लोत्रेक(१८६३-१९०१). त्याच्या चरित्राच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे जयंत गुणे यांनी केलेले स्वैर रुपांतर होते. मुळ लेखक पिएर ल मूर. ते देखील वाचले. दोघांवर चित्रपट निघाले होते. ते देखील शोधले आणि पाहिले. ह्या दोघांच्या जोडीला तिसरा चित्रकार पॉल गोगँची  (जयंत गुणे यांचाच पॉल गोगँची वरील मौज २०१४ च्या दिवाळी अंकात आलेला लेख मी वाचला होता). हे तिघे पॅरिसमधीलच समकालीन, आणि एकमेकांना भेटलेले, मित्र असलेले. पण पॉल गोगँची बद्दल नतंर केव्हातरी. लोत्रेक मातृप्रेमी, तर व्हॉन गॉग बंधूप्रेमी. दोघेही अल्पायुषी पण वादळी आयुष्य जगलेले. दोघेही चांगल्या घरातील, पण आयुष्यभर दारिद्र्यात जगले, तळागाळातील लोकांबरोबर राहिले. अर्थात त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांत दिसते.

असो. आधी लोत्रेक बद्दल आणि जयंत गुणे यांनी केलेय पुस्तकाच्या अनुवादाबद्दल. लोत्रेकचा जन्म फ्रान्स मधील राजघराण्यातला, एकोणिसाव्या शतकातील. लहानपणी कसल्याश्या आजारामुळे दुर्दैवाने त्याच्या कंबरेखालचा भागाची वाढ खुंटते, थांबते. आई वडिलांचा, त्यातही वडिलांचा भ्रमनिरास होतो. आई त्याची अशी अवस्था पाहून मनातल्या मनात दुःखीकष्टी असते. त्यातच त्याला चित्र काढण्याचा नाद लागतो, आणि आयुष्यात चित्रकार बनायचे असे स्वप्न बाळगतो. पॅरिसला जातो, तेथून जवळच असलेल्या मोंमात्र येथे समाजातील निम्न स्तरातील लोकांत मिसळतो, वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली, स्त्रिया, मोलमजुरी करणाऱ्या लोकांची, नाईट क्लब, हॉटेल्स मधील दिसणाऱ्या दृश्यांची चित्रे काढत राहतो. आयुष्यात एखाद्या स्त्रीशी लग्न करून संसार थाटायचे स्वप्न मात्र साकार होत नाही, त्याच्या बेढब शरीरयष्टीमुळे त्याच्या जवळहि कोणी येत नसत. तो एकाकी, व्यसनाधीन, मनातून खचलेला होता. त्याच्या चित्रांना प्रसिद्धी मिळत होती, नाही असे नाही, त्याचे नाव देखील होत होते. पण ह्या इतर गोष्टींचा परिणाम होऊन तो वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी निर्वतला. लस्ट फॉर लाइफ या पुस्तकात एक प्रसंग आहे.  एकदा पॉल गोगँ आणि विन्सेंट व्हॉन गॉग पॅरिस  मध्ये बोलत असता लोत्रेकचा विषय निघाला. पॉल गोगँ म्हणतो, ‘….He is a damn fine painter, but he is crazy. He thinks that if he sleeps with five thousand women, he will vindicate himself for not being a whole man. Every morning he wakes up with gnawing inferiority because he has no legs; every night he drowns that  inferiority  in liquor and woman’s body. But it is back with him next morning. If he weren’t crazy, he would be one of our best painters….”.

Moulin Rouge (मुलॉं रूज)  नावाचा त्याच्या जीवनावर एक चित्रपट आहे (YouTube वर आहे). मुलॉं रूज नावाचे पॅरिस मध्ये एक प्रसिद्ध night-club आहे, आणि तो तिथे नेहमी जात असे. त्याच नावाचे त्याचे एक चित्र देखील आहे. म्हणून त्याचेच नाव चित्रपटाला आहे. दहा एक वर्षांपूर्वी युरोप सफरीच्या दरम्यान पॅरिसला धावती भेट होती, तेव्हा Paradis Latin नावाच्या एका night-club मध्ये देखील गेलो होतो. पॅरिस हे कला संस्कृती साठी प्रसिद्ध आहे, परत एकदा सवडीने तेथे जाऊन आले पाहिजे. पॅरिस मध्ये तर त्यावेळी अनेक चित्रकार राहत होते, ते एकमेकांना भेटत, चर्चा करत, मदतही करत, वादविवाद, हेवे-दावे होत. एकूण कलेला पोषक असे वातावरण होते असे दिसते या दोन्ही पुस्तकांतून. आता काय परिस्थिती आहे कोणास ठाऊक.

आता विन्सेंट व्हॉन गॉग बद्दल. जगभरात अतिशय प्रसिद्ध चित्रकार. लस्ट फॉर लाइफ हे त्याच्या आयुष्यावरील पुस्तक वाचनीय आहे. त्याचे जीवन आणि त्याची चित्रकला दोन्ही एकमेकांत मिसळले होते. बऱ्याच जणांना आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे हे खूप उशिरा समजते किंवा समजत देखील नाही. व्हॉन गॉगला देखील त्याला चित्रकार व्हायचे आहे हे खूप उशिरा उमगते. घरची परिस्थिती अतिशय चांगली होती, चित्रे आणि शिल्पं विकण्याचा व्यवसाय होता. दोन-तीन असफल प्रेमप्रकरणे, पैश्यांची कायम चणचण. त्याचा भाऊ थिओ (art dealer) याच्या जीवावर तो, त्याने प्रत्येक महिन्याला पाठवलेल्या पैश्यांवर जगत होता. दोघांचे एकमेकांवर अतिशय स्नेह होता, आणि त्या दोघांत खूप मोठा पत्रव्यवहार आहे. विन्सेंटला त्याच्याकडे उपजत कला नाही आणि त्याच्या चित्रांना काहीही तंत्र नाही असे कायम आयुष्यभर ऐकावे लागले. त्याने असे असूनसुद्धा आपल्या मनाचे ऐकत, त्याला जशी चित्रे काढायची होती तशीच त्याने ती काढली. तो हायात असे पर्यंत उभ्या आयुष्यात एकच चित्र विकले गेले. पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चित्रांना अमाप प्रसिद्धी लाभली. व्हॉन गॉगने वयाच्या ३७व्या वर्षी गोळी मारून घेऊन आत्महत्या केली.

त्याच्यावर असलेले तीन चित्रपट माझ्या पाहण्यात आले. तसे बरेच आहेत. पहिला Loving Vincent, दुसरा Vincent and Theo, आणि तिसरा Lust for Life जो त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. Loving Vincent हा painted animation चित्रपट आहे, २०१७ मधील, Amazon Prime वर आहे. आणि हा चित्रपट त्याच्या शेवटच्या काही  दिवसांमधील घटनांवर आधारित आहे, आणि खूपच वेगळा चित्रपट आहे.  Vincent and Theo आहे त्याच्या आणि भावाच्या संबंधावर आधारित आहे, १९९० मधील, YouTube वर आहे. शेवटचा आहे १९५६ मधील, Kirk Douglas ची प्रमुख भूमिका असलेला. अजून एक विशेष म्हणजे, त्याच्या आयुष्यातील विविध स्थळांची, गावांना भेट देऊन त्याचे जीवन समजावून घेण्यासाठी एक guided tour आहे. त्याची माहिती येथे आहे, आणि त्याच्यावर एक लेख येथे आहे. Kenneth Wilkie याने व्हॉन गॉग वर बरेच संशोधन केले आहे. त्याची माहिती व्यंकटेश माडगुळकर यांनी लेखकाचं गाव लेखकाचं घर या पुस्तकात दिली आहे. कधीतरी हा प्रवास करायचे मनात आहे, पाहूयात.

अशी ही तिघा चित्रकारांची विलक्षण आयुष्यं, चांगल्या घरातून असूनही, चित्रकलेसाठी त्यांनी आयुष्य वेचले. साधारण एकाच काळात, पण एक स्वातंत्र्यपूर्व भारतात, तर दुसरे युरोप मध्ये कार्यरत असलेले. त्यामुळे त्या काळात दोन्ही ठिकाणी कलेची एकूणच परिस्थिती कशी होती याची कल्पना येते. तसे मी काही चित्रे,  किंवा चित्रप्रदर्शने खूप अशी पहिली नाहीत. खूप पूर्वी औंध (सातारा जिल्हा, यमाई देवी) मधील पंतप्रतिनिधी यांचा चित्र संग्रह(भवानी म्युझियम) पहिला आहे, अमेरिकेत Philadelphia Museum of Art, Barnes Foundation येथे असलेला चित्र संग्रह पाहिला आहे. त्या सर्वांबद्दल बद्दल परत कधीतरी. या तिन्ही चित्रकारांची चित्रे मी पाहिली आहेत कि नाही ते माहित नाही; पाहिली असली तरी किती कळली हे अलविदा! पण त्यांची चरित्रे वाचून, पाहून हे सर्व मांडावेसे वाटले, इतकेच. भारतातील चित्रकारांच्या चरित्रात्मक/आत्मचरित्रात्मक पुस्तके तशी बरीच आहेत, पण चित्रपट नाहीत. प्रसिद्ध चित्रकार गायतोंडे, किंवा मकबूल फिदा हुसैन यांच्या जीवनावर चित्रपट यायला हरकत नाही.

 

लेखकाचं गाव लेखकाचं घर

आपल्याला वाचनाची, साहित्याची आवड असेल तर, आपल्या आवडत्या, प्रसिद्ध लेखकाबद्दल माहिती करून घेणे हे नक्कीच उत्सुकतेचे असते. मॅजेस्टिक प्रकाशनने खूप वर्षांपूर्वी लेखकाचे घर नावाचे पुस्तक प्रकशित केले होते. विख्यात लेखकांचा त्यांच्या वास्तूशी असलेल्या संबंध उलगडून दाखवावा, त्याच्या लेखनाशी घराचे असलेले नाते स्पष्ट करावे या उद्देशाने ललित मासिकात लेखमाला आली होती. त्यांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक. त्यात प्रामुख्याने मराठीतील अनेक प्रथितयश लेखकांच्या घरांबद्दल मनोवेधक माहिती संकलित केली आहे. काही वर्षांपूर्वी गणपती पुळे येथे गेलो असता केशवसुत यांचे निवासस्थान पहिले होते.

या पुस्तकात अश्या २५-३० लेखकांच्या स्वकीयांनी, मित्रांनी घराचे, वास्तव्याचे वर्णन करणारे लेख लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ, माधव आचवल, माडगुळकर बंधू (त्यांची घरे म्हणजे पंचवटी, आणि अक्षर), प्रभाकर पाध्ये, मधू मंगेश कर्णिक, अनिल अवचट, जयवंत दळवी, इंदिरा संत, कुसुमाग्रज, गंगाधर गाडगीळ, यांच्या निवासस्थानांबद्द्ल वाचता येईल. जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे यांच्या निवासस्थानाबद्द्ल का नाही हे समजले नाही. अरुणा ढेरे यांनी रा. चिं. ढेरे यांच्या घराबद्दल लिहिले आहे, ते आता संशोधन केंद्र झाले आहे.

व्यंकटेश माडगुळकर यांच्या चरित्ररंग या पुस्तकातील काही लेख असेच काही लेखकांच्या घराबद्दल, गावाबद्दल लिहिले आहे. आणि तेही पाश्चात्य लेखकांच्या बद्दल. पाश्चात्य जगातील लेखकांच्या गावाबद्दल, घरांबद्दल असलेल्या पुस्तका असले तर मला तरी माहिती नाही. व्यंकटेश माडगुळकर हे किती विविधांगी लेखन करत याचा अनुभव प्रत्येक वेळेस त्यांचे एखादे नवीन पुस्तक हाती घेतल्यावर येतो. हे पुस्तक वाचले त्याचा प्रत्यय परत आला. तो खरे तर पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. त्या लेखांची विभागणी दोन भागात आहे. एका भागात त्यांच्या चित्रपट क्षेत्राशी निगडीत तीन चार आठवणी आहेत. आणखीन एका भागात त्यांनी तीन इंग्रजी लेखकांची आगळीवेगळी ओळख करून दिली आहे. त्या भागात अर्थात इतरही काही लेख आहेत जसे की चित्रकार देऊस्कर यांच्यावरील व्यक्तिचित्रणात्मक लेख.

माडगुळकर यांचे इंग्रजी वाचन देखील अर्थातच अफाट होते. त्यांनी चितारलेले हे तीन इंग्रजी लेखक म्हणजे Liam O’Flaherty, John Steinbeck, Kenneth Wilkie. मला यातील John Steinbeck फक्त माहिती होता, त्याची काही पुस्तके माझ्याकडे आहेत, काही वाचली आहेत. दुसरा Liam O’Flaherty हा कसा समुद्रकिनारी राहून तेथील प्राणी, पक्षी जीवन आपल्या कथा, कादंबऱ्यांत आणले आहे त्याच्याबद्दल आहे, आणि तिसरा लेख Kenneth Wilkie यांचे The van Gogh Assignment या पुस्तकाच्या निर्मितीची कथा, त्याच्याविषयीच्या लेखात आहे.

John Steinbeck च्या लेखात माडगुळकर त्याच्या अमेरिकेतील गावी दिलेल्या भेटीचे वर्णन करतात. John Steinbeck हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील Salinas ह्या गावी जन्माला, बराच काळ तेथेच त्याचे वास्तव्य होते. त्याच्या कादंबऱ्या ह्या सर्व त्याच भागात घडतात. मी देखील २००४ मध्ये कॅलिफोर्नियात गेलो असता, Salinas च्या आसपासच्या (Monterey Bay) भागाला भेट दिली होती. हा लेख वाचताना त्या सर्वांची मला परत आठवण झाली. त्या भेटीबद्दल मी येथे लिहिले आहे. माडगुळकर Salinas मधील त्याच्या घराला भेट देऊन आले.

Liam O’Flaherty वरील लेखात सुद्धा त्यांनी त्याचे आयर्लंड मधील समुद्रकिनारचे गाव, आणि त्याच्या कथा, कादंबऱ्यांतून तो आलेला परिसर यांचे छान वर्णन त्यांनी केले आहे. समुद्र, किनारा, तेथील प्राणी, पक्षी जीवन, हेच त्याचे विषय आहेत. याची कुठलीच पुस्तके माझ्या कडे अजून नाहीत, किंवा वाचली देखील नाही.

Vincent van Gogh वरील त्यांचा लेख म्हणजे त्याच्याविषयी Kenneth Wilkie याच्या शोधाच्या खटपटीचा धावता परिचय आहे, ज्यात Vincent van Gogh च्या वास्तव्याच्या विविध ठिकाणांची माहिती येते. उदाहरणार्थ Netherlands मधील Neunen या खेडेगावी जेथे तो दोन वर्षे राहिले, तेथे छानसे संग्रहालय आहे. तसेच Paris शहरातील एका इमारतीतील असलेले त्याचे वास्तव्य, तसेच लंडनमधील वास्तव्य, बेल्जिअम मधील त्याची वास्तव्याची ठिकाणे याबद्दल आले आहे. फ्रान्स मधील Arles गावातील त्याचे Yellow House नावाने प्रसिद्ध असलेले घर देखील Kenneth Wilkie ने पहिले.  माझ्याकडे Lust for Life नावाचे Irvine Stone लिखित Vincent van Gogh चे चरित्र आहे. मला vangoghroutes.com नावाची एक छान वेबसाईट सापडली . त्याच्या विविध वास्तव्याच्या ठिकाणची माहिती संकलित केली आहे.

असो. मी दोन-तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे गेलो असता Edgar Allan Poe या इंग्रजी कथाकाराचे निवासस्थान पहिले होते, त्याबद्दल येथे लिहिले आहे. फक्त लेखकांच्या घराचे कशाला, प्रसिद्ध व्यक्तीच्या घराबद्दल आपल्याला नक्कीच उत्सुकता असते. जसे दिल्लीला गेलो असता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे घर, राष्ट्रपती भवन, मुंबईत चित्रपटसृष्टीतील ताऱ्यांची, तारकांची घरे, आणि इतर. हे सर्व पाहताना, वाचताना समृद्ध करणारे अनुभव देऊन जातात. सुप्रसिद्ध कन्नड लेखक कुवेंपू आणि शिवराम कारंथ यांची कर्नाटकातील निवासस्थाने(अनुक्रमे तीर्थहल्ली, पुत्तूर), शेक्सपिअरचे घर, रविन्द्रनाथ टागोर यांचे घर देखील पाहायला जायचे मनात आहे कितीतरी दिवसापासून, पाहुयात कसे काय जमते.

प्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे यांचे पुण्याजवळ फलटण भागात विंचुर्णी गावात असलेले त्यांचे घर, घराशेजारी असलेले तळे वगैरे त्यांच्या विंचुर्णीचे धडे या पुस्तकातून वाचायला मिळते. पुणे आकाशवाणी वर नुकताच एक कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी निवेदिका गौरी लागू आणि इतर काही लेखिका हे सर्व विंचुर्णी येथे त्यांचे घर पाहायला गेले होते. तेथे गेल्यावर त्यांना काय दिसले, गौरी देशपांडे यांच्या पुस्तकांतून आलेल्या विविध व्यक्तीरेखा, स्थळे, विंचुर्णीच्या घराचे बांधकाम चालू असतानाचे उल्लेख या सर्वांबद्दल प्रत्यक्ष भेटीवर चांगला तासभर कार्यक्रम केला.

तुमचे काय आठवणी, अनुभव आहेत अश्या लेखकांच्या घरांबद्दल, गावाबद्दल?