Glorious Gohar

मिस गोहार नावाची अगदी जुन्या काळात एक अभिनेत्री होती. तिचे पूर्ण नाव गोहार माम्माजीवाला. भारतीय संगीत आणि नाट्य क्षेत्रात अजून दोन गोहार होऊन गेल्या आहेत. त्यातील एक गोहार जान , जी शास्त्रीय संगीत गाणारी गायिका होती आणि दुसरी गोहराबाई कर्नाटकी, जी नाट्य क्षेत्रात कार्यरत होती. या मिस गोहार बद्दल गिरीश कर्नाड एक लेख लिहून गेले आहेत. त्यांच्या आगोम्मे ईगोम्मे या कन्नड पुस्तकात तो आहे. त्याचे मराठीत मी भाषांतर करत आहे. हा लेख काही भागात ब्लॉगवर आपल्या साठी देत आहे. दोन गोहार बद्दल लिहून झाले आहे. तिसऱ्या गोहर बद्दल लवकरच लिहीन. विक्रम संपत यांनी लिहिले तिचे चरित्र माझ्याजवळ आहे. असो. ‘ग्लोरिअस’ गोहार लेखाचा पहिला भाग आज देत आहे.

‘ग्लोरिअस’ गोहार

मुंबईत रॉक्सी चित्रपटगृहाशेजारी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी उभी राहिलेली एक इमारत आहे, जिचे नाव Dreamland आहे. त्यात चवथ्या मजल्यावर एक अलिशान घर आहे. दिवाणखान्यातील वस्तू ह्या १९२०च्या काळातील अलिशान शैली असलेल्या आहेत हे दिसते आहे. लाल रंगांच्या मऊ मऊ गुबगुबीत सोफा. भिंतीवर विक्टोरियन युगाच्या उत्तरार्धातील एक चित्र लटकलेले आहे. ते प्राचीन ग्रीक वादक Orpheusआपल्या संगीताने सारे जंगल मंत्रमुग्ध करत आहे असे चित्रित केले आहे. रणजीत स्टुडियो मधील एका कलाकाराने ते चित्र काढले आहे. कोपऱ्यातल्या एका मेजावर रणजीत यांचे एक शिल्प आहे. खिंकळणारा घोडा, फडकत असलेला रुमाल, . रणजीत स्टुडियोने निर्मित केलेला १०० वा चित्रपटाचे ते स्मृतिशिल्प होते. जवळच असलेल्या एका वहीत त्या सगळ्या १०० चित्रपटांची नावे होती.

गोहार दिवाणखान्यात येताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ओसंडून वाहत होता, त्यात घराच्या आलिशानतेची सावली होती. विशेष अशी उंची नसलेली, साधारण स्थूलतेकडे झुकलेली शरीरयष्टी त्यांची होती. गोल गुबगुबीत चेहरा. खालील ओठ थोडासा पुढे आलेला . त्या आरामात येऊन बसल्या. मुलाखती दरम्यान पुढील दीडतास त्या तश्याच न हलता बसून होत्या. बोलताना येणारे चैतन्यपूर्ण हास्य, आणि काही तरी सांगताना डावा हात हवेत फिरवण्याव्यतिरिक्त त्याची कशीच हालचाल नव्हती. मी जमिनीवर एक पाय रोवून त्यांचे ऐकत बसलो असता, त्या जवळ येऊन पाठीमागे हात बांधून दोन्ही पाय विलग करून उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांची ती चर्या, मला नेपोलियनची आठवण करून दिली.

त्यांचे बोलणे सहज प्रवाही, झऱ्याच्या वाहत्या पाण्यासारखे होते. स्वतःबद्दल बोलताना, त्या स्वतःवरच विनोद करत, त्या बोलत होत्या. त्यांच्या देहबोलीतून अभिमान, आत्मविश्वास दिसत होता, तर बोलताना त्यांच्या खट्याळ स्मित आणि हास्यामध्ये एक विचित्र विरोधाभास दिसत होता. मी ‘तुमचे घर खूपच छान आहे ‘असे म्हणताच, ‘ओह, जुने होत चालले आहे’, असे म्हणत त्यांनी ते सहज झटकून टाकले. अभिनेत्री म्हणून त्यांचे सुरुवातीचे दिवस कसे होते, असे विचारताच, ‘मी खूप वाईट नटी होते’ असे त्या म्हणाल्या. छायाचित्रे काढणाऱ्या छायाचित्रकाराकडे बघून त्या म्हणाल्या, ‘तुम्ही तुमच्या फिल्म्स वाया घालवत आहात’. पण हे अशे बोलणे फक्त त्यांच्या स्वतःविषयी असेल तरच! दुसऱ्यांविषयी बोलताना मात्र त्या गंभीरपणे बोलत. डोळ्यांच्या पापण्या न हलवता बोलणे, तसेच त्यांच्या आवाजात आणि देहबोलीत दिसणारा आत्मविश्वास, या दोन्ही गोष्टी त्यांचे मुळ व्यक्तिमत्व उभारत होते. ‘ग्लोरिअस’ गोहार होऊन चित्रपटसृष्टीच्या त्या मोठ्या तारका झाल्या होत्या, तसेच, ‘मिस जी. के. मामाजीवाला’ ह्या नावाने सुमारे पन्नास वर्षे चित्रपट व्यवसायात त्यांचे असलेले प्रभुत्व या सगळ्यात त्यांची चाणाक्ष बुद्धीचे दर्शन घडत होते.

(दीडतासाच्या मुलाखतीच्या दरम्यान त्यांचा संयम एकदा ढळला. मी विचारले, ‘तुमची आई नर्तकी होती असे मी ऐकले आहे’. गोहार यांचा पारा चढला लगेच, आणि लगेच त्या म्हणाल्या, ‘मला त्याबद्दल बिलकुल बोलायचे नाही. I don’t want it mentioned’. मी त्याबद्दल लिहिणार नाही असे म्हणताच त्यांचा पारा उतरला आणि पूर्ववत झाल्या. हि गोष्ट मी Cinema Vision मध्ये छापलेल्या मुलाखतीत मी नमूद केलेली नाही).

‘तुम्हाला काय विचारायचे आहे?’ त्यांनी सुरवातीला प्रश्न केला. ‘मी आधीच कित्येक मुलाखती दिल्या आहेत. तेच तेच सांगण्यात काय अर्थ आहे?’
तसे असेल तर त्यांनी आपले आत्मचरित्र का बरे लिहिले नाही. भारतीय चित्रपट इतिहासाच्या अभ्यासकांना ते मूल्यवान संदर्भ वाटेल, असे मी म्हणालो.
‘काही वर्षांपूर्वी तसा विचार केला होता, ते खरे आहे. पण तोपर्यंत बऱ्याच गोष्टी विस्मृतीत गेल्या होत्या. मी आधीपासूनच लिहित आले असते तर बरे झाले असते. त्या वेळी किती उपद्व्याप होते, त्यामुळे रोजनिशी ठेवू शकले नाही’
‘अजून एक समस्या अशी आहे कि, चित्रपटांना आवाज प्राप्त झाल्यावर एक दोन वर्षात रणजीत स्टुडियोला आग लागली. आमची आधीच्या अनेक चित्रपटांच्या फिल्म्स, अनेक वस्तू, सर्व काही आगीत भस्म झाले. ‘

त्यांनी असे म्हटल्यावर, मी माझ्या मुलाखतीची सुरवात प्राथमिक प्रश्नानेच केली. त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या कश्या?

‘माझ्या आई वडिलांच्या मनात मी ह्या क्षेत्रात यावे असे काहीच नव्हते. मला खरेतर डॉक्टर व्हायचे होते. पण मी matrick मध्ये असताना माझ्या वडिलांचे एक मित्र एक ऑफर घेऊन आले. मी आनंदाने नाचू लागले. महिन्याला तीनशे रुपये पगार त्या वेळेस खूप होता. चित्रपटाचे नाव होते बाप कमी अर्थात Fortune and Fools. त्यावेळेस मूकपट दोन दोन नावाने प्रदर्शित होत असत. इंग्रजीत एक आणि गुजराती किंवा हिंदी मधील एक नाव. मीच चित्रपटाची नायिका होते. त्यामुळे पुढे आणखीन एक दोन चित्रपटात काम मिळाले. पण मला यश असे म्हणता येईल ते लंका नि लाडी अर्थात The Bride from Ceylon या चित्रपटामुळे. तो चित्रपट करताना सुरुवातीलाच एक गमतीशीर घटना घडली.’

‘कोहिनूरची निर्मिती असलेला तो चित्रपट होमी मास्टर यांनी दिग्दर्शित केला होता. त्यांनीच मला नायिकेची भूमिका दिली. पण कथा होती ती मोहनलाल दावे यांची. त्या काळातील ते सलीम जावेद होते असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या परवानगीशिवाय नट नटी यांची निवड करू नये असा त्यांचा हट्ट होते. त्यांना माझी झालेली निवड रुचली नव्हती. पण होमी मास्टर यांनी मला त्या दिवशी यायला सांगितले होते. मी घरून मुहूर्तासाठी प्रसाद तयार करून घेऊन गेले. कॅमेराच्या पुढे गेले. तेथे मोहनलाल मला पाहून लांब गेले आणि येरझाऱ्या घालू लागले. माझ्याबद्दलचे त्यांचे मत मला माहित होते. त्यामुळे मी अतिशय तणावाखाली होते. मी एका दुर्बल अश्या मुलीची पात्र करत होते. पहिल्याचा शॉट मध्ये माझ्या रडण्याचे दृश्य होते. मला आधीच रडवेले झाले होते. कॅमेरा सुरु झाला आणि मला खरेखरेच रडू सुरु झाले, रडू दाबून ठेऊ शकलेच नाही. सगळ्यांनी माझी खूप प्रशंसा केली. हाच माझ्या कारकिर्दीचा शुभारंभ झाला असे म्हणूयात! ‘

त्यांनी जसे सुरुवातीलाच साली जावेद यांच्या नावाचा उल्लेख केला, तसेच, साऱ्या मुलाखतीत ते आजकालच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांचा उल्लेख त्या करत जातात. त्यामुळे मी त्यांना ‘तुम्ही आजकालचे चित्रपट पाहता का?’ असे विचारणार होतो. पण तो प्रश्न सोडून द्यावा लागला, याचे कारण उघड आहे, त्यांना आजकालच्या चित्रपटसृष्टीबद्दल माहिती नक्कीच आहे.

‘आजकालचे नट नट्या अतिशय कष्ट करत आहेत. दिवसाला तीन तीन शिफ्ट करून देखील किती चांगले काम करत असतात! आम्ही आमच्या काळात इतके कष्ट घेतले नाही. मी तेवढी polished देखील नव्हते. आमचा अभिनय अतिरंजित अश्या प्रकारची होती. आजच्या अभिनेत्रींना चांगल्या कुटुंबाची घराची पार्श्वभूमी असल्यामुळे, त्या सुशिक्षित आहेत. आमच्याजवळ त्यावेळी बहुतेक अधिक शिस्त होती असे म्हणता येईल. आम्ही ज्या स्टुडियोत पगारी नोकरदार असू त्या स्टुडियोशी आमची बांधिलकी असे. आजचे कलाकार अधिक कष्ट करत आहेत हे मात्र नक्कीच सत्य आहे. राजेश खन्ना किंवा अमिताभ बच्चन एवढ्या उंचीवर जाऊन सुद्धा किती प्रामाणिकपणे काम करत आहेत.’

आम्ही परत त्यांच्या कारकिर्दीच्या वाटचालीबद्दल बोलू लागलो. ‘लंका नि लाडी’ झाल्यावर मी कोहिनूरचे काही चित्रपट केले. कोहिनूर स्टुडियो मूकपट काळातील महत्वाचा स्टुडियो होता. त्यांच्या कडे मोहनलाल भवनानी सारखे दिग्दर्शक होते. मूकपट काळातील ते प्रसिद्ध दिग्दर्शक होते, तसेच अतिशय चांगली व्यक्ती होती. एस मोदी, जमुना, गुलाब,अर्माल्येन यासारख्या तारका होत्या. पण काही काळात मी आणि सुलोचना top star झालो. तिच्या आणि माझ्या चित्रपटातील पात्रांत बराच फरक असे. त्या लावण्यवती होत्या. माझे रूप सामान्य होते.’

(क्रमशः)

Leave a comment