Glorious Gohar, Part#2

मिस गोहार नावाची अगदी जुन्या काळात एक अभिनेत्री होती. तिचे पूर्ण नाव गोहार माम्माजीवाला. भारतीय संगीत आणि नाट्य क्षेत्रात अजून दोन गोहार होऊन गेल्या आहेत. त्यातील एक गोहार जान , जी शास्त्रीय संगीत गाणारी गायिका होती आणि दुसरी गोहराबाई कर्नाटकी, जी नाट्य क्षेत्रात कार्यरत होती. या मिस गोहार बद्दल गिरीश कर्नाड एक लेख लिहून गेले आहेत. त्यांच्या आगोम्मे ईगोम्मे या कन्नड पुस्तकात तो आहे. त्याचे मराठीत मी भाषांतर करत आहे. हा लेख काही भागात ब्लॉगवर आपल्या साठी देत आहे. दोन गोहार बद्दल लिहून झाले आहे. तिसऱ्या गोहर बद्दल लवकरच लिहीन. विक्रम संपत यांनी लिहिलेले तिचे चरित्र माझ्याजवळ आहे. असो. ‘ग्लोरिअस’ गोहार लेखाचा दुसरा भाग आज देत आहे. पहिला भाग येथे पाहता येईल.

मी ‘ पण तुम्ही ह्या छायाचित्रात खूपच glamorous दिसत आहात’ असे म्हटल्यावर, त्यांनी माझे मत ‘non-sense’ असे म्हणून झटकून टाकले.
‘मी साकारलेल्या अनेक पात्रांत मुलगी निष्पाप भोळ्या असत. जया भादुरी सारखेच. मला अभिनय येत नसे. काही काळानंतर सुलोचना इम्पेरिअल स्टुडियो मध्ये गेल्या. साऱ्या चित्रपटसृष्टीत त्यांना जेवढे पैसे मिळत, तेवढे अन्य कोणा तारकेला मिळाले नाहीत. महिन्याला एक हजार रुपयांहून अधिक. मुंबईच्या गव्हर्नरला देखील त्या काळी इतके पैसे मिळत नसत, अशी अफवा होती. मी देखील रणजीत फिल्म्स स्टुडियो मध्ये शिरले, त्यांची भागीदार झाले. त्यामुळे माझी गोष्ट वेगळीच झाली’

‘मी कुठल्याच चित्रपटात मुख्य भुमिके व्यतिरिक्त, नायिके व्यतिरिक्त इतर भूमिका केल्या नाही. एकच अपवाद म्हणजे Typist Girl(१९२६). सुलोचना त्या चित्रपटात नायिका होती. दिग्दर्शक चंदुलाल शहा यांनी मला एक छोटीशी भूमिका त्यात करण्यास विनवले. त्या चित्रपटात माझा नवरा हा दारुडा असतो, आणि दारूच्या नशेत तो माझ्या लहान मुलाला खिडकी बाहेर फेकतो असे अवघड दृश्य होते. चित्रपट खूपच गाजला. ते दृश्य सुद्धा लोकांना खूप आवडला होते.’

त्यानंतर मी विचारले ,’चंदुलाल शहा यांच्या बरोबर तुमचे काम कधी सुरु झाले?’

‘एक अपघात त्यासाठी कारण झाले. चंदुलाल हे कोहिनूर मध्ये होमी मास्टर यांचे सहदिग्दर्शक म्हणून काम करत होते. होमी मास्टर त्या वेळी शिरीन-फरहाद नावाचा चित्रपट बनवत होते. मी शिरीनची भूमिका करत होते, तर खलील हे फरहादची भूमिका करत होते. सुरुवातीच्या काही मूकपटातून आमच्या दोघांची जोडी बऱ्याचदा असे. एका दृश्यात दोन राक्षस शिरीनला डोंगरावरून खाली नेत आहेत असे होते. होमी मास्टर मला हे दृश्य समजावत असता, ते स्वतः पाय घसरून खाली पडले, आणि त्यांचा पाय मोडला. त्या काळात चित्रपट चित्रीकरण पंधरा ते वीस दिवसात संपवायचे असे होते. जास्तीत जास्त एखादा महिना चाले. त्या मुळे चंदुलाल शाह हे दिग्दर्शक झाले. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. त्या वेळेपासून माझे सगळे चित्रपट त्यांनीच दिग्दर्शित केले आहेत.’

भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील अत्यंत दैदिप्यमान आणि दीर्घकालीन साहचर्य त्या दिवशी सुरु झाले असे म्हणता येईल. गोहार १९३६ मध्ये निवृत्त होई पर्यंत चंदुलाल दिग्दर्शक, आणि गोहार तारका म्हणून अविरत कार्यरत राहिले. पुढील तीस वर्षे देखील त्यांच्यातील साहचर्य, व्यावसायिक भागीदारी, तेवढेच फलप्रद ठरले.

चंदुलाल शाह कोहिनूर सोडून जगदीश फिल्म्स मध्ये गेल्यानंतर, गोहार, राजा स्यान्डो, आणि छायाचित्रकार पांडुरंग नायक(‘त्यांचे काम पहिले आहे का? अतिशय गुणी कलाकार आहेत’), त्यांच्याबरोबर तिकडे गेले. पुढे चंदुलाल आणि जगदीश यांच्यात काही कारणाने बेबनाव झाल्यामुळे, चंदुलाल आणि गोहारा दोघांनी मिळून स्वतःची कंपनी सुरु केली, तिचे नाव रणजीत फिल्म्स स्टुडियो.

त्यांची भागीदारी अतिशय यशस्वी झाली(‘अर्थात त्यात आम्ही बरेच चढ उतार पाहिले’), हे लक्षात येण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे. चंदुलाल यांनी गोहर साठी एक चांदीची प्रतिकृती असलेली एक इमारत जिचे नाव Dreamlandभेट म्हणून दिली. त्यात दिव्यांचे खांब होते, अंगण होते, एक विद्युत्चालीत उद्वाहक देखील होते.

आता तो चांदीचे महाल अस्तित्वात नाही. पण गोहार यांनी मला तो महाल करणाऱ्याने एक पुस्तिका तयार केली होती, ती दाखवली. त्यात असे म्हटले होते कि, चंदुलाल यांनी भारतातील राजा-महाराजांचे अनुकरण करून तसा तो महाल तयार करवून घेतला असेल.

पण मला जाणून घ्यायचे होते ते म्हणजे रणजीत फिल्म्स स्टुडियोची सुरुवात कशी झाली.
‘मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हते. ती संपूर्णपणे चंदुलाल यांची कल्पना होती. ते असामान्य होते, अनेक गोष्टीत ते पारंगत होते-व्यवहार कुशल, तंत्रज्ञ, कलाकार, लेखक देखील होते. त्यांनी मास्टर विठ्ठलदास यांच्या कडून कर्ज काढले होते. मी जास्तीचे बोलले कि काय!’ असे म्हणून, त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. ‘तुमची पहा, पन्नास हजार रुपये! १९२७ मध्ये खूप मोठी रक्कम होती ती. कर्ज काढताना मास्टर विठ्ठलदास यांनी एक अट घातली होती. मी त्यात भागीदार व्हावे अशी ती अट होती. मला माहित नाही त्यांनी मला भागीदार करून घेण्यास चंदुलाल यांना का सुचवले ते. त्या प्रमाणे मी भागीदार झाले. नंतर आम्ही ‘पती-पत्नी’ या नावाचा चित्रपट सुरु केला. एखाद दुसरे दृश्य वगळता सारा चित्रपट चंदुलाल यांच्या बहिणीच्या घरी चित्रित झाला होता. त्या चित्रपटाने खूप यश कमावले. त्यातून मिळालेल्या कमाई मुले आमचे कर्ज देखील फेडता आले. अशा तऱ्हेने रणजीत स्टुडियो सुरु झाला होता.’

रणजीत स्टुडियोचे मानचिन्ह म्हणजे पाळणारा घोडा. त्या मागे देखील एखादी रोचक कथा असेल अशी माझी अटकळ होती. पण ते तसे काही नव्हते. चंदुलाल मुळचे जामनगरचे. जामनगर हे संस्थान होते, तेथील महाराजांना चंदुलाल यांच्या कामात रस होता. त्या संबंधाची आणि पाळणारा घोडा मानचिन्ह असण्याचा काही तरी संबंध असावा. गोहरना देखील विशेष माहिती नव्हते.

‘आम्ही १९२७ मध्ये एका stage ने स्टुडियो सुरु केला होता. पण लवकरच पसारा मोठा होत गेला. चार stage झाले आमच्याकडे. त्यातील दोन stage सध्या रूपतारा स्टुडियो मध्ये आहेत. कधी पाहावे तेव्हा तीन stage वर कायम काहीना काही काम सुरु असे. चंदुलाल यांनी जयंत देसाई आणि नंदलाल जसवंतलाल यांना आपल्या हाताखाली तयार केले होते, त्या मुले पसारा वाढताना त्यांची खूपच मदत झाली.’

‘त्या stage वर छत नव्हते त्या वेळी. सगळे मोकळे. कारण सुर्प्रकाशाविना चित्रीकरण साध्य नसे. पडदे, reflector, वापरून सूर्यप्रकाश हवा तसा वळवून, stage वरील प्रकाशयोजना होत असे. तुम्ही जुन्या स्टुडियोत कसे काम चालते ते पहिले असेल ना. बराच पसारा असे.’

‘स्टुडियोचे कामकाज चंदुलाल यांचे बंधू दयाराम शाह हे पाहत. सहाशे कर्मचारी काम करत असत. तंत्रज्ञ, नट, नट्या, एक्स्ट्रा, आणि इतर कामगार मंडळी. हे सर्व लोकं दररोज काम असो नसो, स्टुडियो मध्ये येत असत, यावे लागत असे, इतर कार्यालयात जसे कामगारांना जावे लागते तसे.’

‘रणजीत स्टुडियो मध्ये दोन प्रकारचे चित्रपट तयार होत असत. एक तर सामाजिक आणि दुसरे stunt चित्रपट. त्या दोन्ही चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग अगदी भिन्न होता. सामाजिक चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना stunt चित्रपट पाहणे हिणकस वाटे. बजेट २५ हजार रुपयांपासून ते ६० हजार रुपयांपर्यंत असे. Stunt चित्रपटांचे बजेट थोडे जास्ती आहे. याचे कारण राजपुत्र, राजपुत्री यांची वेशभूषा, मोठमोठाले नेपथ्य, घोडे, doubles, काही दृश्ये चित्रित करण्यासाठी दोन दोन कॅमेरे लागत असत.’

‘सामाजिक चित्रपटांसाठी चांगली कथा मुख्य असे. आपल्या समाजात एखादी सर्वगुणसंपन्न अशी कोणी असते, तरीही पती वेगळी वाकडी वाट करतो, या सारख्या कथा तेथे चालत. आजकाल नवऱ्याला वाकडी वाट धरायला जाही कारण लागतेच असे नाही…’

‘एक चित्रपट केला होता, ज्याचे नाव, गुणसुंदरी . त्यात एका सरळमार्गी गृहिणीची कथा आहे. तिच्या पतीने पाश्चिमात्य संस्कृती अंगिकारली आहे. पत्नीने देखील सामाजिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या मागे राहिले नाही पाहिजे असे त्याला वाटत असते. पत्नीला त्यात विशेष रस नसतो. त्यामुळे पती बाहेरख्याली करायला लागतो. मग पत्नी त्याला धडा शिकवायचा असा निर्धार करते आणि ती सुद्धा पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारून आपल्यात बदल घडवते. मग बरेच काही पाणी वाहून गेल्यावर, मेलोड्रामा झाल्यावर, ते दोघे परत एकत्र येतात. १९२५-२६ मध्ये कोहिनूर साठी केलेला हा चित्रपट बराच यशस्वी झाला होता. १९३४ मध्ये हिंदी गुजराती मध्ये रिमेक झाला. नंतर निरूप रॉय बरोबर या चित्रपटची तिसरी आवृत्ती देखील नंतर आली. हे दोन्ही चित्रपट तेवढेच यशस्वी ठरले. या प्रकारचे कथानक नंतरच्या कित्येक चित्रपटांतून आलेले आहे हे वेगळे सांगायला नको. पण माझ्या गुणसुंदरी चित्रपटात ते पहिल्यांदा त्या प्रकारचे कथानक आले.’

चित्रपटाला आवाज मिळाल्यानंतर, समस्या वाढल्या का, असे विचारातच, ‘नक्कीच’! असे त्या म्हणाल्या, आणि हसल्या. ‘कावळ्यांची कटकट वाढली. दृश्ये पुन्हा पुन्हा चित्रित करावी लागली. एवढेच, विशेष काही नाही. बोलपट तंत्रज्ञान येणार याची अटकळ आम्हाला लागली होती. त्या दृष्टीने आमची तयारी देखील सुरु झाली होती. आमच्या तंत्रज्ञांनी ते चटकन आत्मसात केले. अभिनेत्यांना थोडासा त्रास झाला. आम्ही रणजीत फिल्म्स हे नाव टाकून देवून रणजीत मुव्हीटोन्स असे नवीन धारण केले.’

‘पहिला बोलपट देवी देवयानी हा होता, जो कच आणि देवयानी यांच्या पौराणिक कथेवर आधारित होता. त्यावेळी आमचा अभिनय, संवादशैली हि नाटकांच्या प्रमाणे होती. या चित्रपटाला संवाद अघा हशर काश्मिरी या नाटककाराने लिहिले होते. भाषा खूपच अलंकारिक होती, आणि वाक्यागणिक शायरी(काव्य) येत असे. मग आम्ही कज्जनबाई आणि निस्सार सारख्या रंगभूमी कलाकारांना बोलावले. नायकाचे वय ६५-७० च्या आसपास, मी वयाची विशी ओलांडली होती. नायक हा नाटक कंपनीत नाटकं करणारा प्रसिद्ध नट भगवानदास होता. चित्रपटात खूप गाणी होती. त्यामुळे मी खुश झाले. मला गायांची खूप आवड होती. मी काही संगीत, नृत्य शिकले नव्हते.’

‘चित्रीकरण करताना जवळच संगीत वाद्ये असल्यामुळे, जसे तबला, हार्मोनियम, सारंगी, आणि या सर्वांना तसेच गायकाला मिळून एकच माईक असल्यामुळे , चित्रपटातील गाणी हि mid-shot मध्ये करावी लागत असत’.

‘अश्या कृत्रिम अभिनयाचे, नाटकी, जोरकस शैली असलेला अभिनय एक दोन बोलपटापुरता होता. पुढे वास्तववादी शैली चित्रपटात असायला हवी असे आमच्या लक्षात आले’

‘बोलपट आल्यामुळे अभिनेत्यांना मार बसला. मी सुदैवी होते-मला उर्दू येत असे. मी लहान असताना मला एक मुल्ला घरी येत असत आणि कुराण शरीफ शिकवत असत. फारसी भाषा देखील थोडीफार येत असे. माधुरी काळाच्या पडद्याआड गेली. सुलोचनाचे देखील तेच झाले. मी आणि सुलोचना दोघी मैत्रिणी होतो. मी सुलोचनाला सारखी सांगत असे. माधुरी Anglo-Indian होती. तो घरी इंग्रजी बोलत असे. माझी मातृभाषा हिंदुस्तानी. तिने का स्वतःला बदलले नाही, कळले नाही. तिला आवश्यक वाटले नसावे. असो, खूपच दुर्दैवी होते ते सगळे.’

(क्रमशः)

Leave a comment