A Beautiful Mind

मी मानसिक आरोग्य क्षेत्राशी गेली १०-१२ वर्षे निगडीत आहे. सध्याच्या सक्तीच्या बंदीमुळे(लॉकडाऊन) समाजात मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत, त्याबद्दल आपण ऐकतो, वाचतो आहोत. अनेक तज्ञमंडळी या बद्दल विविध माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. घर बसल्या  समुपदेशनाच्या सुविधा देखील आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात(मार्च-एप्रिल) डॉ. आनंद नाडकर्णी यांची दैनिक सकाळ मध्ये मानसिक आरोग्याचे विविध पैलू सांगणारी लेखमाला येत असे. ती खूप भावली, त्यात तितिक्षा या संस्कृत शब्दाचा उल्लेख होता, त्याचा अर्थ तग धरून राहण्याची क्षमता (सहनशीलता नव्हे तर सहनसिद्धता). त्यांचीच एक मनाविषयी(Mind Feast) एक कार्यशाळा झाली होती गेल्यावर्षी, ती येथे मी पहिली. भारतीय(पौर्वात्य) परंपरेत आणि पाश्चात्य परंपरेत, विज्ञानात मनाबद्दल काय संगीतले आहे  याचा त्यात त्यांनी वेध घेतला आहे.

आमच्या Schizophrenia Awareness Association(SAA) संस्थेतर्फे विविध समुपदेशनाचे कार्यक्रम स्वमदत गटांमधून होतात. त्यावेळी मानसिक आजार असूनही आपापल्या क्षेत्रात विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांनी कसे काम केले आहे याची उदाहरणे  देत असतो. त्यातील प्रमुख उदाहरण म्हणजे नोबेल पारितोषिक विजेता प्रज्ञावंत अमेरिकी गणिती असलेला जॉन नॅश याचे. त्याचे चरित्र A Beautiful Mind या नावाने प्रसिद्ध आहे. ते मी पूर्वी कधीतरी वाचायला घेतले होते, पण समयाभावी पूर्ण झाले नव्हते. सध्या मिळालेल्या वेळेत ते पूर्ण केले. तसेच त्याच नावाचा चित्रपट देखील नुकताच पाहिला.

आधी पुस्तकाबद्दल. जॉन नॅशचे चरित्र Sylvia Nasar हिने अतिशय संशोधन पूर्वक आणि अभ्यासपूर्ण रीतीने लिहिले आहे. १९९८ मध्ये ते प्रकाशित झाले. त्यावर आधारित चित्रपट २००१ मध्ये आला, आणि जॉन नॅशचे २०१५ मध्ये अपघाती निधन झाले. पुस्तक (आणि चित्रपट) त्याला १९९४ मध्ये नोबेल (सहमानकरी) मिळाल्याच्या नंतर थांबते. पुस्तकाला जवळ जवळ २००-२५० पानांची पुरवणी आहे ज्यात लेखिकेने प्रकरण क्रमानुसार विस्तृत नोंदी, संदर्भ दिल्या आहेत. ते पाहून अचंबित व्हायला झाले मला. त्याच्या गणिती संधोधन कारकिर्दी विषयी, तसेच त्याच्या मानसिक आजाराबद्दल(schizophrenia) तपशील  तर आहेच, पण १९५०, ६० च्या दशकात अमेरिकेत आणि त्यावेळच्या सोविएत रशिया यांच्यातील संबंध(cold war hysteria) कसे होते हेही तपशीलवार येते.

अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील Princeton विद्यापीठात तो शिकला. बोस्टन मध्ये कॅम्ब्रिज येथील MIT विद्यापीठात काम केले. जॉन नाशला game theory विषयातील संशोधनाबद्दल नोबेल  मिळाले. हा विषय  संगणक शास्त्र पदवी शिकताना आम्हाला होता. अनेक क्षेत्रात ह्या विषयाचा उपयोग होतो. संरक्षण क्षेत्रात, व्यापारात, अर्थशास्त्रात, अश्या अनेक ठिकाणी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या विषयाची मुलतत्वे उपयोगात आणली जातात. या विषयाची सविस्तर माहिती, इतिहास या पुस्तकात येतो.

आधी त्याच्या आजाराबद्दल आणि त्याने, त्याच्या कुटुंबाने कसा सामना केला आणि तो कसा त्याच्या विषयात काम करत राहिला हे पुस्तकात आले हे अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा मानसिक आजार झालेल्या व्यक्ती सोबत असतो तेव्हा काय आणि कसे तोंड द्यायचे हे समजत नाही. त्याच्या पत्नीने, Alicia ने त्याची आयुष्यभर साथ दिली. १९५७ मध्ये त्यांचे लग्न झाले, मुलगा झाला. १९६३ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला, पण ती त्याच्या बरोबर १९७० पासून राहू लागली, त्यांची देखभाल करू लागली. त्यांनी परत खूप नंतर २००१ मध्ये विवाह केला. जॉन नॅश क्षेत्रातील सहकारी यांचे सुद्धा सहकार्य, सहानुभूती, समजूतदारपणा त्याच्या आजाराला तोंड देताना उपयोगी पडला.

विद्यापिठात शिकत असताना जॉन नॅश त्याच्या विचित्र वागण्या बद्दल प्रसिद्ध होताच. त्यातच त्याचा समलैंगिक संबंधाकडे ओढा होता. अतिशय संशयी, स्वतःच्याच दुनियेत रमणारा, आजूबाजूच्या परिस्थितीचे कधी कधी भान नसणारा असा होता. विचार, भावना आणि कृती यांचा मेळ नसलेले असे त्याचे व्यक्तिमत्व लोकांना वाटत होते. १९५९ च्या आसपास, वयाच्या तिशीत, त्याला paranoid schizophrenia झाल्याचे निदान झाले. त्याला भास होत असत. अमेरिकेत आणि त्यावेळच्या सोविएत रशिया यांच्यातील ताणलेल्या संबंधांमुळे अमेरिकेत conspiracy theory चे पेव फुटले होते. रशियन हेर आपल्या मागे आहेत असे भास त्याला होत असत. तो त्यावेळी अमेरिकी लष्कारासाठी गुप्त संदेश शोधण्याचे काम एका संस्थे मध्ये(Rand Corporation in Santa Monica near Los Angeles) करत असे. त्याच्यावर  उपचार करण्यासाठी अनेक वेळेला मानसोपचार रुग्णालयात दाखल केले गेले. नऊ-दहा वर्षे उपचार, औषधे, विविध थेरेपी अश्या सगळ्या चक्रातून पुढे मात्र आजाराबद्दल उमज आल्यावर घराच्या घरीच कुटुंबीयांच्या, सहकाऱ्यांच्या मदतीने आजाराची लक्षणे आटोक्यात आली. हे सगळे मांडताना लेखिकेने अमेरिकेतील त्यावेळी  मानसोपचार क्षेत्रातील स्थिती कशी होती हे देखील सविस्तर मांडले आहे. मानसिक आजार, त्यातही schizophrenia बद्दलही तिने अभ्यासपूर्ण विचार पुस्तकात मांडले आहेत.

आता चित्रपटाबद्दल थोडेसे. ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असलेला अभिनेता रसेल क्रो(Russel Crowe) याने जॉन नॅशची भूमिका केली आहे. चित्रपट पुस्तकापासून बरीच फारकत घेतो, काही काल्पनिक गोष्टी cinematic liberty च्या नावाखाली येतात. बऱ्याच गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीत. असे असले तरी चित्रपट म्हणून परिणामकारक आहे. Princeton University परिसर, तो सर्व काळ छान चित्रीत केला गेला आहे. जॉन नॅशला नोबेल प्रदान करण्याचा समारंभ दाखवून चित्रपट संपतो. त्याने मुळात न केलेले भाषण चित्रपटात दाखवले आहे. त्या उभायान्तांचा उतारवयातील make-up देखील छान जमला आहे.  रसेल क्रो याला अभिनयाचे ऑस्कर देखील मिळाले आहे. ज्या MIT मध्ये जॉन नॅशने काम केलेले, त्या MIT च्या संकेत स्थळावर या चित्रपटावर चांगलीच तिखट प्रतिक्रिया दिली आहे, ती जरूर वाचा.असे असले तरी चित्रपटाचा पुस्तकाच्या विक्रीवर चांगलाच परिणाम झालेला दिसतो. चित्रपट आल्यानंतर पुस्तकाच्या जी आवृत्ती निघाली त्याच्या मुखपृष्ठावर रसेल क्रोचे चित्र आहे, आणि चित्रपटाचा  उल्लेखही आहे. माझ्याकडे देखील तीच आवृत्ती आहे.

अश्या चरित्रात्मक पुस्तकांमुळे आणि चित्रपटांमुळे समाजात मानसिक आजाराविषयी असलेले गैरसमज,कलंक(stigma) दूर व्हायला नक्कीच मदत होते. मी पूर्वी मानसिक आजार आणि चित्रपटांतील त्याचे चित्रण या विषयी एक ब्लॉग लिहिला होता. तो देखील जरूर पहा. Stephan Hawking या अशाच आणखी एका दुर्धर आजाराने ग्रस्त अशा संशोधकाच्या जीवनावरचा The Theory of Everything हा चित्रपट पाहायचा आहे केव्हातरी.

 

 

 

स्मरण आचार्य अत्र्यांचे

आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे हे दोघेही मराठीतील सुप्रसिद्ध लेखक, आणि तेही विनोदी. पण तसे दोघेही अनेक क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहिलेले. या दोघांचे नाव माहित नसलेला मराठी माणूस विरळा, अर्थात आत्ताच्या पिढीचे काही सांगता येत नाही! १२ जून हा पु ल देशपांडे यांचा स्मृतीदिन, तर आचार्य अत्रे यांचा १३ जूनला असतो. काय विचित्र योगायोग आहे नाही! पु ल देशपांडे यांचे निधन होऊन वीस वर्षे झाली ह्या वर्षी(२०२०), तर आचार्य अत्रे यांचे निधनाला दोन वर्षांपूर्वी(२०१८) पन्नास वर्षे झाली. सर्वसामान्य मराठी वाचकांप्रमाणे, रसिकांप्रमाणे, मी दोघांचेहि थोडेबहुत साहित्य वाचले आहे, आणि इतर क्षेत्रातील त्या दोघांचे कर्तृत्व थोड्याफार प्रमाणात माहित आहे. मी पु ल देशपांडे यांच्या एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाबद्दल थोडेसे लिहिले आहे या आधी(काय वाट्टेल ते होईल). आचार्य अत्रे यांच्या बद्दल काहीच लिहिले नव्हते. कालच त्यांचा स्मृतीदिन साजरा झाला, त्यामुळे हा लेखन-प्रपंच.

आचार्य अत्रे

आचार्य अत्रे यांचे अर्कचित्र(निवडक ठणठणपाळ या पुस्तकातून साभार)

अर्थात आचार्य अत्रे यांना मी पुस्तकांतूनच अधिक अनुभवले आहे, कारण त्यांच्या निधनाच्या वेळी मी जेमतेम एक वर्षांचा होतो! सुदैवाने पु ल देशपांडे यांना प्रत्यक्ष पाहता आले होते. साधारण १२-१५ वर्षांपूर्वी मी आचार्य अत्रे यांच्या स्मृतीदिनानिमित पुण्यातील बाबुराव कानडे यांच्या आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती विविध वक्ते देत होते. बाबुराव कानडे आचार्य अत्रे यांचे शिष्य. आचार्य अत्रे यांच्या प्रेमापोटी त्यांनी हे प्रतिष्ठान आणि त्याच बरोबर विनोद विद्यापीठ देखील उभारले आहे. पु ल देशपांडे देखील आचार्य अत्र्यांना गुरु मानायचे.

माझ्या आठवणीप्रमाणे त्यांच्या कवडी चुंबक या नाटकातील एक उतारा आमच्या नववी किंवा दहावीच्या मराठीच्या पुस्तकात होता. पण माझ्या वाचनप्रवासात अत्रे थोडे उशिरा आले असे म्हणावे लागेल. अत्र्यांचे आत्मचरित्र कऱ्हेचे पाणी (याचे पाचही खंड) हे मला वाटते मी गंभीरपणे वाचलेली त्यांची पहिली साहित्यकृती. त्यांची तोंडओळख हि शाळेतील पाठ्य पुस्तकांतून झालेली होतीच. त्यांच्या मुलीने म्हणजे शिरीष पै यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांतून देखील त्यांच्या बद्दल आणखीन समजते. एकूणच अफाट व्यक्तिमत्व होते त्यांचे. त्यांच्या वकृत्वाचे, हजरजबाबीपणाचे, तसेच फटकळपणाचे किस्से अजूनही चर्चिले जातात. आचार्य अत्रे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान फार मोठे आहे. मराठी चित्रपटाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो त्यांच्या श्यामची आई या चित्रपटाला(आणि योगायोग पहा, परवाच ११ जून साने गुरुजींचा स्मृतिदिन होता). प्रसिद्ध नाटके मोरूची मावशी, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी आणि इतरही बरीच अशी त्यांच्या नावावर आहेत.

गेल्यावर्षी असेच पाथारीवरील जुन्या पुस्तकांच्या ढिगात आचार्य अत्रे यांचे केशवकुमार या टोपण नावाने प्रसिद्ध झालेल्या विडंबन काव्याचा संग्रह झेंडूची फुले हे पुस्तक अवचित हाती लागले. विडंबन काव्याची परंपरा खंडित झाली आहे असे दिसते आहे(माझे नागपूरकडील एक नातेवाईक प्रा. सुरेश खेडकर हे विडंबन काव्य करतात आणि ती सादर देखील करतात. त्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे एप्रिल फुले असे आहे). त्यांचे समाधीवरील अश्रू हे मला भावलेले पुस्तक. त्यांनी अनेक मान्यवर व्यक्तींच्या मृत्युनंतर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखांचा संग्रह आहे. मुलांसाठी लिहिलेले नवयुग वाचनमाला हि पुस्तके देखील अतिशय लोकप्रिय होती. माझ्याकडे असलेले अजून वेगळे पुस्तक जे आचार्य अत्रे यांनी लिहिले नाही, पण ते त्यांच्या विषयी आहे. त्याचे शीर्षक आहे आदेश विरुद्ध अत्रे, पु भा भावे यांचे. आदेश हे नागपूर वरून प्रसिद्ध होत असलेले पु भा भावे संपादित मराठी साप्ताहिक. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या नवयुग मधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अशिष्ट अशी टीका केली होती. आदेश मधून पु भा भावे यांनी त्याच प्रकारे त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यावरून आदेश आणि अत्रे यांच्यात न्यायालयीन तंटा झाला. त्याचा पु भा भावे यांनी या पुस्तकात वृत्तांत दिला आहे. पुस्तकाची प्रथमावृत्ती आहे १९४४ मधील आहे. ते सर्व वाचणे मनोरंजक आहे; अत्र्यांच्या आणि समोरच्या पक्षाच्या विचारांचे त्यातून दर्शन होते. आचार्य अत्रे यांनी असे अनेक वाद-विवाद ओढवून घेतले आहेत. जसे अत्रे-ना सी फडके वाद, अत्रे-बाळासाहेब ठाकरे वाद!

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या विनोद गाथा या पुस्तकात विनोदाचे थोडेफार तात्विक विवेचन केले आहे. ते नक्कीच उदबोधक आहे. त्यात ते म्हणतात कि समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निघाली, त्यात विनोदाचे रत्न कसे सापडले नाही याचे राहूनराहून आश्चर्य वाटते. आचार्य अत्रे यांचा आवडता आणि अतिशय प्रसिद्ध शब्द म्हणजे गेल्या ‘दहा हजार वर्षांत..’! हे अतिशयोक्ती स्वरूपाचा विनोदाचे उदाहरण आहे. या निमित्त एक किस्सा सांगितला जातो. पु ल देशपांडे यांच्या विषयी बोलताना ते म्हणतात, ‘पु ल देशपांड्यासारखा विनोदी लेखक येत्या दहा हजार वर्षांत होणार नाही’. कुणीतरी बोलले कि, ‘आचार्य, तुम्ही फार अतिशयोक्ती करता बुवा’. यावर आचार्य अत्रे उत्तरले, ‘अरे, यात अतिशयोक्ती कसली? मला अतिशयोक्तीच करायची असती तर मी म्हणालो असतो की पु ल देशपांड्यासारखा विनोदी लेखक येत्या दहा हजार वर्षांत होईल! असे हे अत्रे!

१९५-६० च्या काळात लोणावळा खंडाळा हे अनेक प्रसिद्ध लोकांचे आवडते ठिकाण होते असे दिसते. प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्तच्या चरित्रात त्याच्या लोणावळा खंडाळा येथील घराचा उल्लेख आहे. आचार्य अत्रे यांचे देखील ते आवडते ठिकाण होते, त्याबद्दल, त्यांच्या खाद्य रसिकते बद्दल, तेथील विविध मैफिलीबद्दल त्यांनी चवीने लिहिले आहे. काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रातून वाचले होते कि त्यांचे तेथील घर राजमाची दर्शन हे डॉ बावडेकर यांच्या मालकीचे आहे आणि त्यांनी त्याची चांगली देखभाल केली आहे. हि चांगली बातमी आहे. साहित्यिकांची घरे हि पुढच्या पिढीसाठी प्रेरक असतात. त्याबद्दल मी पूर्वी लिहिले होते(लेखकाचं गाव लेखकाचं घर).

पु ल देशपांडे नवीन पिढीला माहित आहे असे म्हणता येईल, पण तसे आचार्य अत्रे यांच्या बाबतीत नाही म्हणता येणार. नव्या पिढीला आचार्य अत्रे नावाच्या झंझावाताची थोडीफार कल्पना यावी याकरिता त्यांच्या नावाचे संकेतस्थळ(website) सुरु करायला हवे किंवा एखादा माहितीपट/चरित्रपट करायला हवा(असेल तर मला कल्पना नाही). जसे पु ल देशपांडे आणि गदिमा यांची संकेतस्थळे आहेत त्याच धर्तीवर. त्यामुळे रसिकांच्या मनात नक्कीच त्यांच्या स्मृती कायम राहतील आणि प्रेरणा देत राहील. आजचे प्रसिद्ध व्हिडियो समाज माध्यम Youtube वर चारी अत्रे यांच्या बद्दल बरेच साहित्य आहे.  दरवर्षी त्यांच्या जन्मगावी(सासवड) येथे त्यांच्या जयंतीच्या(१३ ऑगस्ट) निमित्ताने आचार्य अत्रे साहित्य संमेलन आयोजित केले जाते, ती नक्कीच स्पृहणीय गोष्ट आहे.

ता. क. आज(सप्टेंबर ८, २०२०) कळले कि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे निधन झाले. त्यांनी लिहिलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारित हुतात्मा हि कादंबरी खूप गाजली होती. त्यावर आधारित वेब मालिका देखील आली होती गेल्यावर्षी. त्याचे भाग मी पाहतो आहे, त्यात आचार्य अत्र्यांची भूमिका अभिनेता आनंद इंगळे यांनी चांगली आठवली आहे. ती मालिका जरूर पाहा.