‘फियरलेस’ नादिया, भाग#३

साधारण पाच वर्षांपूर्वी विशाल भारद्वाज दिग्दर्शित, आणि आजची वादप्रिय अभिनेत्री कंगना राणावत हिची प्रमुख भूमिका असलेला रंगून नावाचा चित्रपट आला होता. तो नादिया नावाच्या एका जुन्या काळातील अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित होता. ती मी पाहिला होता, आणि आवडला होता मला. त्याच नादियावर १९७६ मध्ये गिरीश कार्नाड एक लेख लिहून गेले आहेत. त्यांच्या आगोम्मे ईगोम्मे (२००८, प्रकाशक मनोहर ग्रंथमाला, धारवाड) या कन्नड पुस्तकात तो आहे. त्याच वेळेला मला तो लेख भाषांतरित करून ब्लॉग वर टाकायचा होता. पण जमले नाही. आज तो योग येत आहे. हा लेख काही भागात ब्लॉगवर आपल्या साठी देत आहे. पहिला आणि दुसरा भाग येथे आणि येथे आहे. आज तिसरा आणि शेवटचा भाग देत आहे. युट्यूब वर नादियाचे काही चित्रपट आहेत. वेळ काढून कधीतरी पहिले पाहिजेत आणि तो काळ थोडासा तरी अनुभवता येईल असे वाटते.

फियरलेस’ नादिया, भाग#३

‘एका चालत्या रेल्वेवर खलनायकाला मी उचलून धरते असे एक दृश्य एका चित्रपटात होते. रेल्वेच्या वर जाण्यासाठी एक अरुंद अशी फळी होती. दोन्ही बाजूला उतार होता. चार चार कॅमेरे लावले होते. होमीने कॅमेराकडे चेहरा फिरवण्यास सांगितले. इकडे मी ह्या माणसाला खांद्यावर घेऊन उभी होते, आणि तो ‘मुझे तुम छोडो!’ असा संवाद बोलत होता. तुम्हीच कल्पना करा. मी त्या चालत्या रेल्वेवर उभी राहिले आहे, तो माझ्या खांद्यावर आहे, त्याला मी रागावून तोंड बंद करायला सांगणारा संवाद म्हणायचं आहे, आणि कॅमेराकडे चेहरा देखील करायचा आहे. आणि हे सगळे मी माझा तोल सांभाळून करायचे आहे.’

मी होमी वाडिया यांना विचारले, ‘एखाद्या अवघड दृश्याची कहाणी सांगा’. होमी यांनी Diamond Queen मधील एका दृश्याची आठवण सांगू लागले. विल्सन धरणाच्याजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यात नादिया बुडाली नाही, वाहून गेली नाही हे नशीब.

पण नादिया यांनी सांगितलेली आठवण वेगळीच होती.

‘Jungle Princess नावाच्या चित्रपटात असलेले सिंहाबरोबर एक दृश्य होते. होमी वाडिया यांनी मला ते समजावून सांगितल्यावर मी नकार दिला. बहुयात काय होते असे म्हणत सर्कशीतील सिंहाच्या पिंजऱ्यात त्याने पाय ठेवला. तेवढ्यात सर्कशीत काम करणाऱ्या एका मुलीने सिंहासाठी दुधाचे पातेले आणून ठेवले. मी कसाबसा होकार दिला. ‘

‘चित्रीकरणाच्या दिवशी सर्कशीतील पिंजरा आणला गेला. त्याच्या आजूबाजूला झाडेझुडुपे, फांद्या वगैरे लावली गेली आणि जंगलाचा आभास निर्माण करण्यात आला. सिंहांना एकट्या दुकट्याने काम करण्याएवजी एकमेकांबरोबर काम करायला आवडले, ते सोपे देखील जाते असा अनुभव असल्याने चार चार सिंह पिंजऱ्यात आणले होते. ‘

‘चित्रीकरण सुरु झाले. त्याच वेळेस त्या चार सिंहामधील एक सुंदरी नावाची सिंहीण होती तिने मोठी डरकाळी फोडून उडी मारली. माझे डोके, होमीचे डोके, तसेच छायाचित्रकाराचे डोके ओलांडून तिने पिंजऱ्याच्या सळ्यांवर धडाका मारायला सुरुवात केली. बाकीचे तीन सिंह त्यामुळे उत्तेजित झाले आणि त्यांनी देखील आपल्या शेपट्या वळवळायला सुरुवात केली. त्या सिंहाचा प्रशिक्षक आम्हाला हलू नका, डोळ्यांच्या पापण्या देखील मिटू नका असे सांगू लागला. डोळ्यांच्या पापण्या काय मिटता त्या वेळेला, आमचा श्वास देखील थांबला होता. आम्हाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आले. मी माझ्या साऱ्या जीवनात एवढी भेदरलेली, घाबरलेली नव्हते.’

असे असले तरी नादियाच्या चित्रपट कारकीर्दीच्या सुरुवातीला वाटणारी समस्या हि ‘स्टंन्ट’ ची नव्हतीच!

‘मला भाषेची मोठी समस्या वाटत होती. सुरुवातीच्या एका चित्रपटात एक असे दृश्य होते कि, मला गुंडांनी पकडलेले असते. मुझे छोड दो असे मला ओरडायचे होते. पण मी तसे ओरडल्यावर तेथे असलेले सगळे जण जोरजोरात हसू लागले होते. शेवटी हिंदी शिकवायला मला एक मास्टर ठेवण्यात आला. छोड दो आणि चोत दो या दोन वाक्यातील फरक मला सांगण्यात आला!’

‘असे असले तरी सुद्धा ह्या हिंदी भाषेच्या समस्येच्या आव्हानाने मला प्रेरित केले होते. पहाडी कन्या या चित्रपटात तर मला पुरते एक पान संवाद होते. मी एक महिना ते पाठ करत होते.’

‘वसंत प्रोडक्शनचा पहिला चित्रपट मौज(१९४२) यात माझ्या तोंडी मी रडत रडत म्हणण्याचे काही संवाद होते. मी दिवस रात्र ते पाठ करून समाधानकारकपणे शॉटच्या वेळेस म्हटले. चित्रपट पूर्ण झाल्यावर वितरकांना जेव्हा दाखवला गेला तेव्हा त्यांनी माझे ते संवाद असलले दृश्य काढून टाकावे असे सुचवले. त्याप्रमाणे ते दृश्य काढले गेले. मी अशी रडकी स्त्री नाही असे त्यावेळी ते म्हणत होते.’

नादिया-जॉन कावस (John Cawas)यांचे चित्रपट पाहिल्यावर कॅथार्सिसचा (भावनांचे विरेचन) अनुभव येत नसे. चित्रपट पाहून झाल्यावर त्याचे स्वतःचे एक असे स्थान असे. दुपारचा matinee चा खेळ पाहिल्यानंतर आम्हा शाळकरी मित्रांची टोळी ढिश्युम ढश्याम करत हवेत हातवारे करत फिरत असू. ह्याच कारणामुळे असे चित्रपट पाहून आल्यानंतर घरी घेत नसत. कारण आम्ही घरी सुद्धा तसेच करत फिरत असू. घरातील मेज, खुर्ची इत्यादी वर प्रहार करत, आवाज करत चित्रपटातील दृश्यांचे अनुकरण करत असू. पण आम्ही हे असे अनुकरण बाहेर, शेतात, झाडांवर विशेष करत नसू, ते सुरक्षित नसे.’

”स्टंन्ट’ चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे १९३५-४०. त्या नंतर ती क्रेझ गेली. १९४१-४३ हि वर्षे तर आणखीन वाईट गेली.’

ह्या ‘स्टंन्ट’ युगातील शेवटचा चित्रपट वाडिया मूव्हीटोन यांनी निर्मित केलेला चित्रपट ‘राज नर्तकी’ (The Court Dancer)हा होय. त्यात साधना बोस हि नायिका होती. अत्यंत महत्वाकांक्षी असलेला हा चित्रपट जी. बी. एच यांनी चार भाषेत दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचा खर्च वाढत गेला, बजेटच्या बाहेर गेला. पण बॉक्स ऑफिस वर हा साफ आपटला. तेथेच जी. बी. एच आणि होमी वाडिया वेगळे झाले.

दुसरे महायुद्ध सुरु झाले. महागाई गगनाला पोहोचली.

‘उदाहरणार्थ, वाडिया मूव्हीटोन बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आम्ही आमचे सेट्स, इतर सामग्री व्ही. शांताराम यांना दोन लाखात विकावी लागली. ध्वनी यंत्रणा दक्षिणेकडील एका निर्मात्याला साठ हजारात विकावी लागली. ‘

‘१९४३ मध्ये होमी वाडिया यांनी चेंबूर मध्ये बसंत स्टुडियो सुरु केले.

मी मेकअप मध्ये काम करू लागले, Waves, perms इत्यादी,’ नादिया बोलत होत्या. चित्रपटांचे स्टंन्ट’ युग संपल्यात जमा होते. मला उदारनिर्वाहासाठी दुसरा उपाय नव्हता. पाच महिने ते काम मी केले! एक दिवस होमी वाडिया धावत माझ्याकडे आले आणि म्हणाले आपण ‘हंटरवाली कि बेटी’ हा चित्रपट करणार आहोत.’

नादिया, तसेच जॉन कावस हे देखील चित्रपटात असणार होते. चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला. पुढील दहा वर्षे नादियाने आणखीन दहा चित्रपटातून काम केले.

‘पण प्रेक्षकांची अभिरुची बदलत होती,’ होमी म्हणाले, ‘न्यू थियेटर, बॉम्बे थियेटर यांचे सामाजिक चित्रपट लोकप्रिय होऊ लागले होते. ‘

वाडिया मूव्हीटोनने फक्त स्टंन्ट चित्रपटांचीच निर्मिती केली असे नाही. बसंत स्टुडियो मध्ये होमीने रामभक्त हनुमान, माया बझार, वीर घटोत्कच श्रीगणेश महिमा या सारखे पौराणिक चित्रपट देखील केले. ते देखील यशस्वी ठरले. पण ते इतर चित्रपटासारखे लोकप्रिय झाले नाहीत. त्याचे वेळेस तेलगु पौराणिक चित्रपट सुद्धा समाज मान्य झाले नव्हते. आज देखील नादिया हे नाव तिच्या सामान्य स्टंन्ट चित्रपटांमुळेच तसेच फियरलेस नादिया देखील ओळखले जाते.

नादिया आणि होमी १९६० मध्ये विवाह बद्ध झाले.
कुलाब्यातील एका जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात ते राहत असत. Basant Film Distributors हि मुंबईतील मोठ्या विताराकांपैकी एक आहे. तसेच बसंत स्टुडियो मध्ये आजही बरेच चित्रपट बनत असतात त्यात होमी वाडिया व्यस्त असतात, असे असून सुद्धा माझ्या साठी ते आत्मीयतेने मुलाखतीकरता बोलले.

नादिया आता स्थूलपणाकडे झुकल्या आहेत. हसत हसत बोलत होत्या. सुरुवातीला मुलाखतीसाठी मागे पुढे पाहणाऱ्या नादिया यांनी नंतर त्या आणि होमी दोघांनी गतकाळातील अनेक स्मृतींना उजाळा दिला, चित्रपट व्यवसायातील अनेकोनेक गोष्टी सांगत गेल्या.

दिवाणखाण्यातील भिंतींवर त्यांच्या अश्वशर्यतीतील घोड्यांची छायाचित्रे टांगलेली होती. अजून एक चित्र रेफ्रीजीरेटर वर होते. ते नादियाच्या पूर्वजांचे होते असे त्यांनी सांगितले खरे, पण त्यात नादिया, होमी दोघे शंभर वर्षांपूर्वी असलेल्या विक्टोरियन युगातील वेशभूषा असलेले छायाचित्र होते. सिडनी मध्ये नादिया यांचा मुलगा असतो. एके काळी तो भारतीय हॉकी मध्ये गोली होता. त्याचे देखील छायाचित्र होते.

‘मला अभिमान वाटावा असा कुठला चित्रपट आहे? तसे पहिले तर काही चांगले पौराणिक चित्रपट देखील मी केले’ होमी हसत म्हणत होते, ‘पण माझे अत्युत्तम चित्रपट हे मेरीने त्यात काम केलेले चित्रपट होत.’

‘मी त्या जीवनातील प्रत्येक क्षण enjoy केला आहे’, नादिया-मेरी बोलल्या , ‘मला जर हे जीवन परत जगता आले तर मी चित्रपटक्षेत्रातच काम करेन!’

मला जर माझे बालपण परत मिळाले तर, मी तिचे चित्रपट परत परत पाहिले असते!

[सौजन्य: Cinema Vision, ३/१९७६]

(समाप्त)

Leave a comment