२२ जून १८९७

काल २२ जून. पुण्यात चापेकर बंधूनी इंग्रज अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड याची हत्या केल्याचा दिवस. २१ जून कसा वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून(आणि आता आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून) कायम लक्षात असतो, तसं २२ जून हा चापेकर बंधूंचा म्हणून मी हटकून लक्षात ठेवला आहे. त्याला आणखीन एक कारण आहे. मी पुण्याजवळ चिंचवड मध्ये राहिलो, वाढलो. चिंचवड गावातील चापेकर बंधूचा वाडा, गावातील मुख्य चौकातील दामोदर हरी चापेकरांचा पिस्तुल चालवतानाचा पूर्णाकृती पुतळा कायम जाता येता डोळ्यासमोर राही. खरे तर तो पुतळा, ते घड्याळ असलेला मनोरा म्हणजे चिंचवडची ओळख झाली होती. अर्थात अधिक कित्येक शतके आधी मोरया गोसावी समाधी, गणपती मंदिर, पवना नदीचा तो रमणीय काठ, मंदिरामागील घाट अशी ओळख होती, आणि अर्थात नंतर चिंचवडची औद्योगिक क्षेत्र म्हणून नंतर ओळख झाली.

मी दूरदर्शनवर कित्येक वर्षांपूर्वी शाळेत असताना २२ जून १८९७ नावाचा चापेकर बंधूंवर तयार केलेला चित्रपट पाहिला होता. हत्येच्या घटनेला आता १२० वर्षे होऊन गेली. चार एक वर्षात शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा होईल. काल मी हा चित्रपट परत पाहिला. हा चित्रपट युट्युब वर येथे आहे. शाळकरी वयात हा पाहिलेला चित्रपट मनात खूप रुतला होता. काल तो परत पाहताना पुन: प्रत्ययाचा आनंद मिळाला, खुपच छान सिनेमा आहे, पण प्रिंट तितकीशी खास नाही. इनमीन दोन तासांचा चित्रपट. तरुण अश्या रविंद्र मंकणीची भूमिका आहे त्यात. १९७९ मध्ये आलेला हा चित्रपट अर्थात पुण्यात तसेच चिंचवड मध्ये घडतो. स्वातंत्र्यापूर्वीचा पुण्यातील तो काळ. एकोणिसावे शतक संपत आलेले. ब्रिटीशांनी हिंदुस्तानात आपले पाय भक्कम रोवले होते. टिळकांचा(चित्रपटात सदाशिव अमरापूरकर) तसेच त्यांच्या जहाल मतांचा तो उत्कर्षाचा काळ. चापेकर बंधूंवर टिळकांच्या जहाल मतांचा, सशस्त्र क्रांतीचा प्रभाव पडलेला. त्यातच पुण्यात १८९६ साली प्लेग रोगाची भीषण अशी साथ पसरली. चापेकरांचे कुटुंब म्हणजे कर्मठ सनातनी ब्राम्हण आणि शिकलेले. त्यांचे वडील कीर्तन करत, तेही चित्रपटात दाखवले आहे.

 

इंग्रज अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड ह्याला पुण्यात प्लेगवर उपाय योजना करण्यासाठी कमिशनर म्हणून नेमले गेले. प्लेग साथीचे निर्मुलन करण्यासाठी त्याने योजलेले काही असंवेदनशील उपाय जसे घराघरात घुसून तपासणी करणे, लोकांना बळजबरीने बाहेर काढणे, या सर्वांमुळे तसेच पुण्यातील हिंदू धर्मियांच्या भावना निष्ठूरपणे दुखावल्यामुळे, स्त्रियांशी असभ्यपणे वागल्यामुळे त्याच्या विरुद्ध असंतोष बळावत होता. चित्रपटाच्या पहिल्या तासाभरात हा सगळा मामला येतो. त्याकाळातील पुण्यातील वाडे, ब्राम्हणांची वस्ती, घरे, ब्रिटीश अधिकारी हे सगळे छान चित्रित केले आहे. धर्मांतरासाठी फूस  ख्रिस्ती मिशनरीच्या विरुद्ध असंतोष होता, त्याचे पर्यावसन एका पाद्रीवर चापेकर बंधू हल्ला करण्यात, होते असा एक प्रसंग आहे(ब्रिटीश कालीन धर्मांतराच्या संबंधित अनेक कांगोऱ्यांचा वेध घेणारी वि. ग. कानिटकर यांची एक कादंबरी आहे, त्याच्याबद्दल जरूर येथे वाचा). ब्रिटीश राणी विक्टोरिया हिच्या ब्रिटीश साम्राज्याच्या राज्यरोहण घटनेला ५० वर्षे झाली होती, यानिमित्ताने आज ज्या ठिकाणी पुणे विद्यापिठ आहे तेथे कार्यक्रम असणार होता. कमिशनर रँडला तेथून रात्री परत येताना गणेशखिंडीच्या झाडीत मारण्याचा चापेकर बंधू कट रचतात, आणि त्याप्रमाणे त्याची ते पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करतात. हा प्रसंग अतिशय छान वठला आहे. ‘गोंद्या आला रे’ अशी आरोळी, बग्गीच्या घोड्यांच्या टापांचा आवाज, रात्रीचा काळोख, झाडी हे सर्व वास्तवदर्शी वाटते पाहताना. चित्रपटाला विशेष असे पार्श्वसंगीत नाही, खरेतर कमीतकमी संवाद, साऱ्या चित्रपटभर सन्नाटा हे सर्व वातावरण निर्मिती करतात.

चित्रपटाच्या उरलेल्या तासाभरात हत्येनंतर काय काय होते हे सर्व होते. नेहमीप्रमाणे लोकमान्य टिळकांवर संशयाची सुई येते. नंतर अर्थात चापेकर बंधूंना धरपकड, चौकशी(त्यासाठी पुण्यात फरासखान्यात ठेवले गेले असा उल्लेख येतो), खटले, आणि फाशी हे सर्व विस्ताराने दाखवले आहे. चापेकर ब्रदर्स नावचा आणखीन एक सिनेमा एक-दोन वर्षांपूर्वी येऊन गेल्याचे आठवते. तो मात्र मी नाही पाहिला. नुकतेच मला समजळे की माझ्या एका मित्राचे वडील पाळंदे यांनी चापेकरांच्या पित्याची भूमिका केली होती. चापेकर बंधूंच्या या कामगिरीमुळे खरेतर इतर ठिकाणी देखील ठिणग्या पडल्या आणि ब्रिटीश साम्राज्याला धक्के बसण्यास सुरुवात झाली असे इतिहास सांगतो.

मला WhatsApp वरून मिळालेली माहिती अशी की, “वॉल्टर चार्ल्स रॅंड हा आय सी एस ऑफीसर होता. इंग्लंडमधल्या लिव्हरपूलजवळ त्याचं आयुष्य गेलं.  १८९७ मध्ये त्याचा खून होण्यापूर्वी १३-१४ वर्षे तो भारतातच – खास करून मुंबईच्या आसपास होता. रॅंडचे कागद अभ्यासत असताना त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र ब्रिटीश लायब्ररीत मिळालं. २३ सप्टेंबर १८८३ चं त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र. तो अंडर सेक्रेटरीला लिहीतोय की त्याने  मुंबईला जाण्यासाठी ‘व्हिक्टोरीया’ जहाजात जागा बुक केली आहे. पण त्याला अजून ऑफीशियल सेलिंग ऑर्डर्स (Sailing Orders) मिळालेल्या नाहीत. त्या डलविचला पाठविण्याची व्यवस्था व्हावी. २४ सप्टेंबरला हे पत्र इंडीया ऑफीसला मिळाले आणि २६ तारखेला त्याच्या सेलिंग ऑर्डर्स पाठवल्या गेल्यासुध्दा (हे सगळे तारखांचे शिक्के पत्रावर आहेत!)
त्याचा आणि आयर्स्टचा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत श्रीमती रॅंड व श्रीमती आयर्स्ट ह्यांना स्पेशल पेन्शन सुरु झाले. श्रीमती रॅंड ह्यांना वार्षिक £२५० व त्यांच्या मुलांना प्रत्येकी वार्षिक £२१ मिळत होते तर श्रीमती अायर्स्ट ह्यांना वार्षिक £१५० व त्यांच्या मुलांना वार्षिक £१५ मिळत असत. दोघेही ऑन-ड्यूटी मारले गेले असल्याने ही खास वाढीव दराने पेन्शने होती. हे सगळे पेन्शनचे कागद ब्रिटीश लायब्ररीत आहेत. दामोदर चापेकरांच्या पत्नी दुर्गाबाई (ज्यांचे नावही आपल्याला माहीत नसते!) १८९७ मध्ये फक्त १७ वर्षांच्या होत्या.  ह्या पुढे ६० वर्षे – म्हणजे १९५६ पर्यंत जगल्या – १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले ना कोणते त्यांचा नवरा स्वातंत्र्यसैनिक असल्याचे ताम्रपट”

हे सर्व वाचून एकूणच आपल्या वारश्याबद्दल आपली असलेली अनास्थाच समोर आली. चिंचवड गावातील मधील तो पुतळा चौकातून आता हटवून १२-१५ वर्षे झाली आहेत, फ्लायओव्हर करण्यासाठी. त्याच चौकात एका बाजूला एक वेगळे शिल्प समूह साकारले गेले आहे, इतक्याच त्याचे अनावरण झाले.

चिंचवड गावात चापेकर बंधूंचा एका वाडा आहे, तेथेही मी एकदोनदा गेलो होतो. औंध वरून पुणे विद्यापीठाकडे जात असता, सध्याच्या पुणे सेंट्रल मॉल असलेला भाग ज्याला गणेश खिंड असे म्हणत, ब्रिटिशांच्या काळात भरपूर झाडी असलेला जंगल असलेला भाग होता असे दिसते. त्या ठिकाणी चापेकर बंधूंनी पिस्तुलाने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. तेथे एक नाममात्र फलक आहे, तेवढेच. जाता येता तो लक्षात देखील येत नाही. पुण्यात त्यांचे वास्तव्य कुठे होते, तेथे काही स्मारक आहे का याची माहिती मला तरी नाही, किंवा चापेकर यांचे वंशज काय करतात, कोठे असतात हे ही माहिती नाही.

चापेकर बंधू वाडा

चापेकर बंधू वाडा, चिंचवड गाव

असो. तर असा हा २२ जून, आपल्या पुण्यातील, चिंचवडमधील क्रांतीवीर,राष्ट्रप्रेमी, करारी चापेकर बंधूंनी केलेल्या कामगिरीचे स्मरण करण्याचा, अभिमान बाळगण्याचा दिवस!

ताजा कलम: आजच(जुलै ७) वर्तमानपत्रात वाचले की, उद्या रविवारी चापेकरांच्या जीवनावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे. चला, देर आये, लेकिन दुरस्त आये!

Advertisements

थोर गणिती रामानुजन

जानेवारीत मी अमेरिकेत बोस्टन याठिकाणी कामानानिमित्त गेलो होतो. कुठेही गेलो की स्थानिक गोष्टी जाणून घेण्यासाठी तेथील वर्तमान पत्रे वाचण्याची मला सवय. माझ्या राहण्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये लॉबीत Community Advocate नावाचे दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे एक पत्रक होते. त्यात मला एक लेख आढळला जो त्या भागातील Donald Manzoli नावाच्या एका व्यक्तीवर होता. आयुष्यात अनेक टक्के टोणपे खाल्लेला, पण गणितावरील प्रेम जागृत असलेल्या नावाच्या व्यक्तीवर तो होता. त्याने म्हणे थोर भारतीय गणिती रामानुजनच्या काही गणिती सूत्रांवर काम करून प्रतिष्ठित Rocky Mountain Journal of Mathematics मध्ये प्रसिद्ध केले होते. मी ते वाचून चकित झालो. एक तर त्या व्यक्तीच्या जिद्दीबद्दल, गणित विषयावरील प्रेमावर. त्याहून अधिक चकित झालो ते आपल्या रामानुजनची अजूनही असलेली कीर्ती.

गेल्यावर्षी केव्हातरी पुण्यातील एका रस्त्यावर एके ठिकाणी जुन्या पुस्तकांच्या ढिगात मी पुस्तकं शोधत होतो. ब्रिटीश राजवटीच्या काळात दक्षिण भारतातील अल्पायुषी ठरलेल्या श्रीनिवास रामानुजन नावाच्या गणितज्ञाची कहाणी सांगणारे पुस्तक हाती लागले होते. पुस्तकाचे नाव ‘श्रीनिवास रामानुजन-एका गणितज्ञाची घडण’, लेखक प्रा. द. भ. वाघ, १९८७ साली, म्हणजे, रामानुजनच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रकाशित झाले होते. रामानुजन बद्दल मला थोडेफार जुजबी माहिती होतीच. शाळेत गणित या विषयात, आपल्यापैकी कित्येकांसारखेच, माझी विशेष काही गती अशी कधीच नव्हती. पण पुढे शिक्षण संगणकक्षेत्रात तसेच व्यवसाय देखील त्यातच असल्यामुळे गणिती ज्ञान आवशक होते, संगणकक्षेत्रातील त्याचा उपयोग, तसेच गणिताची एकूणच महती जाणत असल्यामुळे ते पुस्तक मी उचलले, पण वाचण्याचा काही योग आला नाही. हा ब्लॉग लिहिण्याच्या निमित्ताने ते वाचले. प्राचीन भारताची गणित विषयातील प्रगती सर्वज्ञात आहे. आर्यभट्ट, वराहमिहीर आणि इतर प्राचीन गणितज्ञ यांच्यासारखी प्रतिभा असलेला रामानुजन, वैयक्तिक आयुष्यात दारिद्र्य, सामाजिक परिस्थिती, आजारपण यांना तोंड देत देत आपले गणितातील काम करत राहिले.

E722715B-3E56-4081-9D7F-A934A06C5219

तसे पहिले तर रामानुजनवर इतक्यातच एक सिनेमा आणि एक नाटक देखील आले आहे. सिनेमाचे नाव आहे The Man Who Knew Infinity आणि नाटकाचे नाव आहे Death of a Mathematician. चित्रपट काही अजून पाहता आला नाही, पण नाटक मी पहिले होते. दोन्ही अर्थातच त्याच्या आयुष्यावर आहे. जेवढे गणितातील त्याचे कार्य प्रसिद्ध आहे, तेवढेच त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे आयुष्य रोचक आहे, नाट्य आहे, जे इतके दिवस सर्वसामान्यांना अपरिचित होते. ते या दोन कलाकृतींमुळे पुढे आले आहे. मूळ इंग्रजीत श्रीनिवास शारंगपाणी यांनी लिहिलेले हे नाटक हिंदीत स्वतंत्र थिएटर या नावाच्या नाटक मंडळीने गेल्यावर्षी नोव्हेंबर हिंदी नाट्यमहोत्सवात सादर केले होते. रामानुजन यांच्या व्यक्तीमत्वात असलेला साधेपणा, खरेतर भोळेपणाकडे झुकणारा स्वभाव, त्यांची नमक्कलदेवी वर असलेली अपार भक्ति, घरचे दारिद्र्य, धार्मिक वातावरण, यांचे दर्शन नाटकात येते. त्यांची पत्नी आणि आई यांच्यात असलेले घरगुती भांडण, वादविवाद यामुळे निर्माण झालेले ताणतणाव, भावनिक आंदोलने यांचे चित्रण येते. याची परिणीती म्हणून, वयाचा तेहतीसाव्या वर्षी झालेला अतिसारामुळे झालेले निधन हे सर्व चटका लावून जाते. The Man Who Knew Infinity हा चित्रपट त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. तोही पाहिला पाहिजे.

रामानुजानने विद्यापीठीय शिक्षण घेतले नव्हते, कुणाकडून मार्गदर्शन विशेष असे मिळाले नव्हते, ग्रंथालयाची देखील मदत झाली नव्हती. अल्पायुषी रामानुजन हे गणितात एवढे अचाट काम केले की लंडनच्या Royal Society तसेच केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप त्याला मिळाली, त्याच्या सर्व गणिती सूत्रांचा, प्रमेयांचा, शोधांचा संग्रह केम्ब्रिज विद्यापीठाने प्रसिद्ध केला, हे सर्व अद्वितीय आहे. रामानुजनचा जन्म दिवस, म्हणजे डिसेंबर २२, हा भारतात, राष्ट्रीय गणित दिवस(National Mathematics Day) म्हणून साजरा केला जातो, याचा मला थांगपत्ताच नव्हता. अजून दोन वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये, रामानुजनच्या अकाली मृत्यूला १०० वर्षे होतील. या निमित्ताने नक्कीच जगभर, विशेषतः केम्ब्रिज विद्यापीठात कार्यक्रम होतील. तामिळनाडू मध्ये त्याच्या नावाची एक गणित संशोधन संस्था देखील आहे, जिचे नाव आहे Ramanujan Mathematical Society.

जाताजाता एक सांगितले पाहिजे, अमेरिका हा देश जसा वरून भोगवादी आहे, तसाच तितकाच ज्ञानाधिष्ठित आहे, यांचे पदोपदी दर्शन आपल्या घडू शकते, अर्थात आपण जर ते पाहायचे ठरवले तर! अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. त्याच बोस्टन प्रवासात मला भेटलेल्या एका कॅबचालकाबद्द्ल, ज्याने Media Ecology या विषयात प्राविण्य मिळवले आहे, याबद्दल मी पूर्वी लिहिले होते.

 

आगळ्या वेगळ्या जगात नेणारा ‘न्यूड’

गोव्यात गेल्यावर्षी(नोव्हेंबर २०१७) पार पडलेल्या International Film Festival of India(IFFI) एस् दुर्गा आणि न्यूड या दोन सिनेमांची जोरदार चर्चा होती. त्यांच्यावर अश्लील म्हणून शिक्के बसले. तेव्हापासूनच रवी जाधव यांचा मराठी सिनेमा न्यूड, जो अनोळखी जगाची कवाडं किलकिली करणारा असा सिनेमा म्हणून अधूनमधून विविध माध्यमांतून येत राहिले. शेवटी एप्रिल मध्ये तो प्रदर्शित झाला. आज जाऊ, उद्या जाऊ असे करत करत अर्धा मे महिना गेला. इतर चित्रपटांच्या भाऊगर्दीत हा अजूनही चालू होता. मी तो एकदाचा पाहिला. मी इस्मत चुगताई यांचे १९४० मधील अश्लील ठरवलेल्या पुस्तकाचे मराठी भाषांतर कविता महाजन यांनी केले वाचतो आहे. त्यात त्यांनी इस्मत चुगताई यांना झालेल्या त्रासाची कहाणी दिली आहे, ते वाचून रवी जाधव यांना झालेला त्रास काहीच नाही असे वाटतेय!

चित्रपटाचा विषय अर्थातच स्फोटक आहे, म्हणूनच तर एवढी उलथापालथ झाली. चित्रकला शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मानवी शरीर जसे दिसते तसे कागदावर उतरवण्याचे प्रशिक्षण देतात. त्यासाठी स्त्री, पुरुष मॉडेल्स हवी असतात जी नग्न रूपात ह्या विद्यार्थ्यांसमोर बसू शकतात. अश्याच एका स्त्री मॉडेलची जीवनगाथा म्हणजे ह्या चित्रपटाचा विषय. खरे तर चित्रपटातील हा विषय तसा मला नवीन नव्हता.  मुंबईच्या सतीश नाईक संपादित चिन्ह ह्या चित्रकला ह्या विषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नग्नता ह्या विशेषांकात त्याची सविस्तर चर्चा केली होती (२०१०-११ दिवाळी विशेषांक, चित्रातील नग्नता आणि मनातील). संगीत, चित्रकला, शिल्पकला, त्याचे उपयोजन, यांसारख्या कलांबद्दल, कलाकारांबद्दल आस्वादक रीतींनी, कलेच्या निर्मितीबाबत, कलाकारांकडून विशेष असे लिहिले जात नाही. अर्थात काही सन्मानीय अपवाद आहे. सतीश नाईक हे त्यातील एक. त्यांच्याबद्दल नंतर कधीतरी.

तसे पहिले तर चित्रपट हा एका स्त्रीच्या(यमुना) अन्यायविरोधी संघर्षाची कहाणी आहे. ही स्त्री सकारली आहे ती कल्याणी मुळे हिने. कल्याणी मुळेला मी पूर्वी एका नाटकात पहिले होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एका खेडेगावातील, का तालुक्याच्या गावातील एका स्त्रीचा नवरा व्याभिचार करून तीला आणि त्याच्या मुलाला घर सोडून देण्यास भाग पाडतो. मराठी, आणि बरेक कन्नड संवाद ह्यांच्यात आहेत. मला मजा वाटली यामुळे, कारण मी कन्नडही जाणतो. मग ही स्त्री मुंबईला तिच्या नातेवाईकाकडे काहीतरी काम करून जगावे यासाठी येते. ही कोणी दूरची मावशी(अक्का) असते. ही साकारली आहे छाया कदम (हिचा अजून के छान सिनेमा रेडू देखील मी पाहिला) हिने. पण दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती असते. मुंबईत अतिशय गलिच्छ वस्तीत, गरिबीत, एका पत्र्याच्या घरात ते राहत असतात. बिनकामाचा नवरा पूर्वी मुंबईतील गिरिणी कामगार असावा असा उल्लेख येतो. मावशीच्या नोकरीवर घर चालत असते. नोकरी कसली तर मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स(मागील मुंबई भेटीत येथे जायचे राहूच गेले) मध्ये न्यूड मॉडेल म्हणून काम, पण वर वर सफाई कामगाराची नोकरी.

nude-marathi-film

यमुनेच्या पुढे उदरनिर्वाहाचा, मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आवासून उभा असतो. अक्केला ती नोकरी पाहायला सांगते. यमुनेला अक्केच्या व्यवसायाची माहिती समजल्यावर ही हादरते, तीला किळस वाटते. पण पुढे तीही तेच काम पत्कारते. ते ती कसे करते, मनाची कशी उलथापालथ होते, तिच्या मुलाला हे सर्व कळते का, हे सगळे चित्रपटातून पाहायला हवे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी या निमित्ताने हे अनोळखे जग आपल्यासमोर मांडले आहे. परिस्थितीमुळे संघर्ष करून जगण्यासाठी असाही मार्ग स्वीकारणाऱ्या न्यूड मॉडेल्स, प्रामुख्याने स्त्री मॉडेल्सची, जीवनगाथा मांडली आहे. कलाजगत या विषयाकडे कसे पाहते, त्यांचे विचार काय, सध्या परिस्थिती काय वगैरे गोष्टी थोड्याफार ओघाने येतात, पण तो चित्रपटाचा विषय नसल्यामुळे त्यावर भर नाही. पण अभिनेत्री छाया कदम आणि कल्याणी मुळे यांनी मात्र कमाल केली आहे. न्यूड मॉडेल्स म्हणून चित्र काढणाऱ्या मुलांच्या पुढे बसणे हे सगळे त्यांनी कसे केले असेल हे पाहून चकित व्हायला होते. चित्रपटात एकूणच सहजता आहे, ओढून ताणून काही आले असे वाटत नाही, किळसवाणे, विकृत असे देखील बिलकुल वाटत नाही, उलट चकितच व्हायला होते. हे श्रेय दिग्दर्शकाचेच असते.

nude-cinema

Poster of the cinema, courtesy Internet

न्यूड मॉडेल्स, आणि कलाशिक्षण ह्या विषयाच्या तश्या आणखीही काही बाजू आहेत. त्या सगळ्याच चित्रपटात येणे शक्य नाही. त्या सविस्तर अश्या वर उल्लेख केलेल्या विशेषांकात आल्या आहेत(त्याबद्दल लिहीन नंतर कधीतरी). अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा, वा इतर वस्तूचा गुण नसून, तो तसा आरोप करणाऱ्यांच्या मनाचा गुण आहे आहे असे विचारवंत आणि लैंगिकतज्ञ डॉ. एलिस म्हणतात. पण चित्रपटातच न्यूड मॉडेल्सच्या समर्थनार्थ एक वाक्य आले आहे की आपण जर कुत्री, मांजरी, आणि इतर प्राणी यांची चित्रे काढतो, तशी माणसांची देखील काढली तर काय हरकत आहे. हे थोडेसे बालिश आहे असे मला तरी वाटते. कलेच्या अभिव्यक्तीसाठी काही बंधन नसावे हे प्रमुख कारण त्याचे समर्थन करण्यासाठी पुरेसे आहे.

जाता जाता या बाबतचा एक वैयक्तिक अनुभव सांगतो. मी २००४ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भारतविद्या(MA in Indology) हा अभ्यासक्रम हौस, आवड म्हणून शिकत होतो. इतर विषयांच्या जोडीला, भारतीय चित्रकला, शिल्पकला, मुर्तीविज्ञान व त्याचा इतिहास यांसारखे  विषय असल्यामुळे बरेच जण कला क्षेत्रातील होते. त्यातील एकाने(जो पेशाने चित्रकार, शिल्पकार होता), ज्याच्याबरोबर चांगली मैत्री झाली होती, त्याने मला न्यूड मॉडेल म्हणून त्याच्यासमोर बसणार का असे विचारले होते. मीही अगदी तत्काळ उत्साहाच्या भरात त्याला होकार दिला होता. पण तो विषय पुढे निघाला नाही, का कोणास ठाऊक. नंतर त्या विषयाचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे मीही अर्थातच काढला नाही. पण माझी न्यूड मॉडेल बनण्याची संधी हुकली!

रेडू

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटात नाविन्याची, वेगळे काहीतरी दाखवण्याची, वेगळे विषय हाताळण्याची सकारात्मक लाट आली आहे असेच म्हणावी लागेल. कथेला, कथनाला महत्व आले हे चांगले आहे, त्यामुळे इतर गोष्टी गौण ठरतात. केवळ कथेवर चित्रपट चालू शकतो. इतक्यातच न्यूड, सायकल, रेडू सारखे हटके चित्रपट आले. मी रेडू हा चित्रपट नुकताच पाहिला. त्याबद्दल येथे थोडेसे. न्यूडदेखील पाहिला, पण त्याबद्दल परत कधीतरी.

रेडू म्हणजे रेडियो ह्या शब्दाचे ग्रामीण रूप. खरेतर ह्या चित्रपटाची कथा १९७०-८० मधील एखाद्या लघुकथेला साजेशी अशी आहे. मुख्य पात्र अर्थात रेडियो यंत्र. साल १९७२. कोकणातील(मालवणातील असे म्हटले पाहिजे वास्तविक) हडे गावातील एका गरीब रोजंदारीवर कष्ट उपसत जगणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या माणसाला एकदा रेडियो कुणाकडे तरी दिसतो. आणि ह्याला ते आवाज करणारे, गाणी म्हणणारे यंत्र भावते. हा माणूस म्हणजे तातू जो साकारला आहे अभिनेता शशांक शेंडे याने, त्याची बायको म्हणजे छाया कदम(न्यूड फेम). तो त्या रेडियोसाठी वेडा होतो. अचानक एके दिवशी त्याला तसाच रेडियो भेट म्हणून मिळतो. तो हरखून जातो. त्याला गावात भाव येतो. त्याचे आणि त्या रेडियोचे एक जिवाभावाचे नाते निर्माण होते. काही दिवस मजेत जातात. पण एके दिवशी घरातून रेडू अचानक गायब होतो, चोरीला जातो. आणि मग तातूची तडफड, तगमग सुरु होते. आणि सुरु होतो शोधाचा प्रवास, आणि कथेला कलाटणी मिळते. मी पुढचे मुद्दामच सांगत नाही. पुढचे चित्रपट पाहूनच अनुभवायला हवे.

आता मोबाईल आणि इंटरनेट मुळे सारे जग जवळ आले आहे. गावागावातून लोकं ही सर्व उपकरणं वापरताना सर्रास दिसतात. खेडेगावातून वीज नसल्यामुळे दिवेदेखील नसत. पूर्वी जेव्हा रेडियोचे नाविन्य होते तेव्हा गावातून एखादाच रेडियो असे. सगळे गावकरी, घरातील तो ऐकण्यास जमा होत असत. माझ्या मामाकडे गावी असाच एक रेडियो असे. तो आम्ही मुलं आजोळी गेलो की त्याच्या मागेमागे भुणभुण करत तो ऐकत असू. ज्यांनी हे सर्व अनुभवले आहे त्यांना हा चित्रपट त्या काळात नेणारा आहे. एखाद्याचा रेडियोमध्ये जीव गुंतल्यावर काय होते याची गमतीदार आणि भावस्पर्शी अशी ही कथा आहे. चित्रपट येऊन दोन आठवडे झाले होते. चित्रपटगृहात मोजकीच टाळकी होती. मला खात्री आहे ती सर्व माझ्यासारखी रेडियो प्रेमीच असणार. माझ्याकडेही असेच रेडियोचे यंत्र आहे, मी आजही रेडियो ऐकतो. माझ्या रेडियो ऐकण्याच्या नादाबद्द्ल मी पूर्वी येथे लिहिले आहे. आजकाल बरेच जण रेडियो कारमध्ये ऐकत असतात. त्यामुळे तो अजून ह्या जमान्यात आहेच.

५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘रेडू’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. पार्श्वभूमीवर वाजणारे ‘देवाक काळजी’ हे गाणे मस्तच आहे. कोकणचा निसर्ग, गावातील एकूण वातावरण, तेथील घरे हे सर्व छान आले आहे. मी अशा ठिकाणी ट्रेकिंगच्या निमित्ताने बरेच फिरलो आहे. संथ गतीने, सहज, एकाच गावात घडणारी, सावकाश बेताबेताने उलगडणारी ही कथा पाहायला हवी. शशांकचा अभिनय देखील उत्तम. त्याचे एक नाटक पहिले होते खूप पूर्वी, मळभ नावाचे, तेही फर्ग्युसन कॉलेजच्या सभागृहात. त्यानंतर एक दोन अपवाद विशेष त्याचे काम पहिले नव्हते. सगळे संवाद हे कोकणी, मालवणी भाषेत आहेत, त्यामुळे आई माईवरून शिव्या न देता वाक्यच सुरु होत नाही. म्हणी देखील भरपूर, त्याही अगदी ठसकेबाज, उदाहरण द्यायचे झाल्यास, एक म्हण अशी येते, ज्याच्या मनात पाप, तेका पोरं होती आपोआप! चित्रपटाच्या अतिशय वेगळ्या शेवटामुळे हा रेडियोचा चित्रपट राहत नाही तो होतो त्या तातूचा, तो माणूस म्हणून एका निर्णायक क्षणी कसा वागला तो आशय महत्वाचा आहे.

जाताजाता एक गंमत सांगतो. चित्रपटाची सकाळी तिकिटे ऑनलाइन खरेदी करताना घराजवळील सिटी प्राईडमधील घेतली असे मला वाटले होते. पण तेथे गेल्यावर समजले की ती शहरातील दुसऱ्याच भागातील सिटी प्राईड मधील आहेत. का असा गोंधळ झाला, समजले नाही. रेडियो ऐकण्याच्या नादात तर असे झाले नाही! मग परत नव्याने तिकिटे घेतली, आधी घेतलेली तिकिटे रद्दबातल करता येणार नव्हती. त्यामुळे दुप्पट पैसे देऊन हा चित्रपट पाहिला.

27 Down

रेल्वेचे आकर्षण कोणाला नसते? आजकालच्या जमान्यात जेथे विमान प्रवास तसा आवाक्यात आणि सोपा देखील झाला आहे, तरी रेल्वेचे वेगळेपण टिकून आहेच. मी कुठेही देशात, परदेशात जेथे मिळेल तिथे रेल्वेने प्रवास करण्याची संधी शोधत असतो. लहानपणी मामाच्या गावी, आजोळी जायचे म्हणजे रेल्वेनेच, त्याच्या कित्येक रम्य आठवणी आहेत. रेल्वेचा इतिहास, भारतातील आणि एकूणच जगातील आता हेरिटेज रेल्वे यांची माहिती करून घेण्यास मला नक्कीच आवडते. काही वर्षांपूर्वी असेच कुठल्यातरी पुस्तक प्रदर्शनात Discover India चे काही जुने अंक, जे भारतातील हेरिटेज रेल्वेला वाहिलेले होते, ते मिळाले होते. रेल्वेचे हे पुराण लावायला निमित्त अशे झाले की 27 Down हे शीर्षक असलेला सिनेमा दूरचित्रवाणीवर कुठेतरी लागणार होता असे दिसले मला परवा. मी म्हटले रेल्वेवर सिनेमा आहे की काय. पण तो निघाला १९७४ मधील हिंदी सिनेमा, जो मी नुकताच पाहिला. 27 Down या नावाने मुंबई वाराणसी एक्सप्रेस त्यावेळी होती असे दिसते. आता आहे का पहिले, पण तशी रेल्वे आढळली नाही. त्यांची नावे/क्रमांक बदललेली आहेत.

माझे कर्नाटकतील हुबळीचे एक काका जे रेल्वेत होते. ते train ticket checker(TTC) होते. त्यांचा तो काळा कोट, नाव असलेले स्टीलचा, पांढरी शुभ्र विजार, डोक्यावर रेल्वेची टोपी. विविध रेल्वे गाड्यांत ते कामानिमित्त फिरायचे. खूप भारी वाटे लहानपणी हे सर्व पाहताना. बऱ्याचदा आम्ही त्यांच्याबरोबर प्रवास करायचो, अर्थात फुकट, आणि तेही पहिल्या दर्ज्याच्या डब्यातून! हे TTC लोक पूर्वी पूर्वी रेल्वे स्टेशनच्या बाहेर जाण्याच्या ठिकाणी देखील थांबत, प्रवाशांची तिकिटे तपासायला. आता माहीत नाही. कित्येक दिवसात मी रेल्वेने प्रवासच केलेला नाही.

27 Down मधील नायक देखील असाच रेल्वेमध्ये, मुंबईत, TTC, आहे. बरं, ह्याला चित्रकलेत रस असतो, म्हणून भुसावळ वरून मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकत असतो. शेवटल्या वर्षाला असतो. पण बापाच्या इच्छेनुसार तो ते सोडून रेल्वेत काम करायला लागतो. लक्षात घ्या. चित्रपट १९७४ मधील आहे, त्यातील काळ देखील बहुधा तोच आहे. त्यावेळेस मुलं बापाचे ऐकायचे! घरची परिस्थिती हे कारण देऊन बाप ह्या शामळू, अबोल, बापाच्या शब्दाखातर आपल्या आवडीच्या क्षेत्रावर तिलांजली सोडतो. आधीच अबोल असलेला हा तरुण, आणखीन अबोल होतो. मुंबईचे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स हे अजूनही मी पहिले नाहीये. मागील मुंबई भेटीत देखील राहूनच गेले. ह्या सिनेमात पाहिली १५-२० मिनिटे जे जे मधील दृश्ये आहेत. इतक्यातच आलेला न्यूड सिनेमा देखील येथेच घडतो.

असो. सिनेमा पाहताना मजा येत होती, या तरुणाची परिस्थिती पाहून हसू येत होते. मुद्दामच श्वेत धवल असा बनवलेला हा सिनेमा. त्याकाळी कलात्मक चित्रपट, समांतर चित्रपट(parallel cinema) यांची लाटच आली होती. हा सिनेमाही त्यातीलच एक. एम् के रैना नावाच्या अभिनेत्याने त्या तरुणाची भूमिका केली आहे. मुळचे नाट्यक्षेत्राशी निगडीत असलेले रैना अजूनही अधून मधून हिंदी चित्रपटातून दिसत असतात. त्यावेळच्या मुंबई उपनगरीय रेल्वेची दृश्ये, त्यातही एक दृश्य जे तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस वरील आहे. एक खचाखच भरलेली उपनगरीय रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनसच्या एका फलाटावर येते. फ्रेम मध्ये ३-४ फलाट दिसत आहेत, सगळे रिकामेच आहेत. आलेल्या रेल्वेतून हळू हळू लोक बाहेर पडत राहतात, आणि तो फलाट काही वेळातच लोकांनी गच्च भरला जातो. काही क्षणात फलाटाचे बदललेले रुपडे आपल्यासमोर उलगडते. अश्या मनाविरुद्ध रेल्वेत काम करण्याची पाळी आलेल्या तरुणाचे रेल्वेमुळेच एका तरुणीवर(राखीने ही भूमिका केली आहे) प्रेम जडते. ती तरुणी भारतीय आयुर्विमा मंडळात(LIC) काम करते, रेल्वेने जा ये करत असते. मग त्यांचे ते संयत, अबोल प्रेम, एकमेकांच्या घरी जाणे येणे, चौपाटीवर जाणे वगैरे ओघाने येते. कलात्मक चित्रपट असल्यामुळे युगुलगीते, गाणी अशी नाहीत! पण पार्श्वसंगीत छान आहे, जे पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित भुवनेश्वर मिश्रा यांनी दिले आहे. विशेषतः तबल्याचा वापर छान केला आहे.

जसा हा शामळू तरुण, तशीच ती तरुणी देखील. तिच्या घरचे लोक, जे पुण्यात असतात, ते तिचे लग्न दुसरीकडे ठरवतात. झाले, हा आधीच खचलेला तरुण, असफल प्रेमामुळे अजूनच खचतो. त्यातच त्याचा बाप त्याचे लग्न एका मुलीबरोबर ठरवतो, हुंडा म्हणून ५-६ म्हशी मिळवतो! ह्या सगळ्यातून हा तरुण शेवटी घर सोडून निघून जातो. कुठे? अर्थात वाराणशी. कसे? मुंबई वाराणसी एक्सप्रेस २७ डाऊन, आणि कसे?! वाराणशीत भटकतो, वेश्याकडे जातो, काय करावे त्याला कळत नाही. आणि चित्रपट येथे विराम घेतो. चित्रपट ठिकठाक होता, दोन घटका करमणूक नक्की झाली. जुन्या काळातील मुंबई, पुणे, रेल्वे, वाराणशी वगैरे दिसते. चित्रपट त्याकाळातील तरुणांची, कुटुंबाची मानसिक जडणघडण वास्तवपणे चित्रित करण्याचा प्रयत्न करतो, पण कलात्मक चित्रपटात एखादा विषय, प्रश्न मांडला जातो किंवा काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न असतो, यात तसे काहीच नव्हते.

एक सांगायचे राहिले, वरती उल्लेख केलेले रेल्वेतील माझे काका देखील, माझ्या आठवणीप्रमाणे, जे जे मध्ये शिकत होते. फक्त फरक असा की त्यांनी त्यांचे कलाशिक्षण पूर्ण केले, रेल्वेत काम करत करत कला देखील जोपासली. आणि त्यांचे काही असे प्रेमप्रकरण नव्हते! त्यामुळे कथेत आणि त्यांच्या जीवनाचा काही तसा संबंध नाही!

Salaam Bombay!

शहरातील रस्त्यांवरील भिकारी, त्यातील बरीचशी अपंग, लहान मुलं, मुली देखील असतात. तसेच बेवारशी, अनाथ मुलं रस्त्यांवर काहीबाही करताना, वस्तू विकताना देखील दिसतात. दररोज आपण हे पाहतो. त्यांच्याबद्दल मी पूर्वी एक ब्लॉग लिहिला होता. ही मुलं अर्थातच शोषणाचे सहज बळी ठरतात. अश्याच मुलांचे जीवन, वास्तव प्रखरपणे चितारणारा सलाम बॉम्बे! हा चित्रपट काल टेलीव्हिजनवर पाहिला. तो अर्थातच मुंबई महानगरीतील अश्या मुलांबद्दल आहे. १९८८ मधील त्या चित्रपटाला तीस वर्षे झाली. विश्वास बसत नव्हता. मी पूर्वी तो पाहिल्याचे आठवत नव्हते. त्यामुळे तो बसून संपूर्ण पाहिला. काही वर्षांपूर्वीच ह्याच विषयाशी निगडीत Slumdog Millionaire हा चित्रपट पाहिला होता. तोही मुंबईतच. दुपारचे जेवण भाईचंद ताराचंद या हॉटेल मध्ये भरपेट(की पोट फुटेस्तोवर) जेऊन, रस्त्यांवरील भिकारी, आणि अश्या मुलांना नजरेआड करून, टाळून, एका मोठ्या वातानुकुलीत मल्टीप्लेक्समध्ये पहिला होता. हे सगळे खुपच किळसवाणे, संवेदनाशून्य वाटले होते त्यावेळेस मला. Slumdog Millionaire मध्ये मुंबईतील धारावीचे चित्रीकरण आहे. धारावी हा भाग नंतर पर्यटनस्थळ म्हणून पुढे आला!

असो. सलाम बॉम्बे! हा तीस वर्षांपूर्वीचा मीरा नायर दिग्दर्शित चित्रपट. परत एकदा अंगावर शहारे आणणारा अनुभव. परिस्थिती तर बिलकुल बदललेली नाही अजून. मराठी कादंबऱ्यांतून तरी मुंबईची ही काळी बाजू कित्येक वेळेला आली आही. जयवंत दळवी, भाऊ पाध्ये, मधू मंगेश कर्णिक आणि अजूनही इतरांनी हा विषय अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. चित्रपट अर्थातच चांगला आहे, वास्तवाचे हुबेहूब चित्रण करणारा आहे. तीस वर्षांपूर्वीच्या नाना पाटेकर, रघुवीर यादव, अनिता कंवर, इरफान खान, आणि शेवटी शेवटी सुलभा देशपांडे देखील या सर्व कसलेल्या अभिनेत्यांचे अभिनय अतिशय प्रभावी, ते पाहताना खिळून राहिल्यासारखे होते.

कर्नाटकातून विजापूरमधून मुंबईत आलेल्या कृष्णा नावाच्या मुलाची ती गोष्ट, पण त्या अनुषंगाने मुंबईतील रस्त्यांवरचे वास्तव अंगावर येते. व्यसन, वेश्यावस्ती, दलाली, ही मुलं करणारी विविध कामे जसे की चहा पुरवणे, कोंबड्या सोलणे, रेल्वेवर हमाली करणे इत्यादीचे खरेखुरे चित्रण येते. अश्या मुलांच्या प्रती पोलिसांचे वागणे, बालसुधारगृहात रवानगी, तेथील वातावरण हेही येते. या कृष्णाचे चित्रपटातील नाव चायपाव, आणि गर्द/गांजा यांचे व्यसन करणाऱ्या, त्यांच्या टोळीत राहणाऱ्याचे नाव चिल्लम!. ही भूमिका राहुवीर यादवची. मीरा नायर यांनी म्हणे रस्त्यांवरील मुलांना निवडून त्यांच्याकडून काम करवून घेतले होते. चित्रीकरण मुंबईतील प्रत्यक्ष स्थळांवर झालेले आहे, बिलकुल गाणी नाहीत. काही दृश्ये तर कमालीची झाली आहेत, जसे शेवटी गणपती मिरवणुकीच्या गर्दीत कृष्णा सापडतो, आणि त्यातून कसाबसा बाहेर येऊन नंतर एका बाजूला बसतो, आणि सगळे काही गमावल्यामुळे शून्यात नजर लावतो, आता पुढे काय हा मोठा प्रश्नचिन्ह समोर दिसतो. हे सगळे अतिशय लाजवाब आहे, आणि हृदयाला भिडणारे झाले आहे.

तर ह्या कृष्णाला, म्हणजे त्याची भूमिका करणाऱ्या लहान मुलाला त्यावेळेस अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. आहे कुठेतरी वाचले होते की तो सध्या बंगळूरूमध्ये रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. त्याला पुढे चित्रपटसृष्टीत काही करता नाही आले. चित्रपटासाठी त्याला रस्त्यावरून निवडून, काम करवून घेतले होते. पण त्यानंतर तो आणि इतर मुलं परत रस्त्यावरच आली होती. आता ती तीस वर्षांच्या काळ लोटला आहे. ती मोठी झाली असतील, आणि आता काय करत असतील, कोठे असतील, कोण जाणे! मुंबईच्या वास्तवाचे चित्रण करणारे हे दोन्ही सिनेमे बरेच गाजले, वादविवाद देखील झाले, पारितोषिके देखील मिळाली. त्यातून स्फूर्ती घेऊन काही विधायक काम करणारी मांडली पुढे आली, पण सर्वसाधारण परिस्थिती तशीच आहे.

दिग्दर्शक मीरा नायर यांचा खरे तर हा त्यावेळेस पहिलाच चित्रपट प्रसंग. त्यांनी नंतर बरेच चित्रपट केले. कामसुत्र सारखा सिनेमा देखील त्यांनी केला. तो मी अमेरिकेत पाहिलेला, मला आठवते अजून, १९९७ मध्ये. तो सिनेमा त्यांनी का केलं, काय त्यांना दाखवायचे होते, उमगलेच नाही. त्याचे नाव कामसुत्र हेच का, की फक्त पाश्चात्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्यायचे होते म्हणून हा खटाटोप केला. असो. पण त्यांचा सलाम बॉम्बे! हा चित्रपटच अजून देखील सर्वात प्रसिद्ध आहे.

यंत्रमानव आणि मन

संगणकाच्या सुरुवातीच्या काळापासूनच कृत्रिम बुद्धिमत्ता(artificial intelligence, AI) या विषयावर सातत्याने संशोधन चालू आहे. Alan Turing हे त्यातील महत्वाचे नाव, आणि त्याची नुकतीच जन्मशताब्दी साजरी झाली. एकविसाव्या शतकात संगणकाने जीवन व्यापून टाकणाऱ्या सार्वत्रिक अस्तित्वामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता(AI, analytics, big data, fuzzy logic etc) वापरून अनेक ठिकाणी आपले जीवन सुकर करण्याचे, व्यवसाय वृद्धी क्षेत्रात आणि इतर ठिकाणी फायदा होत आहे. यंत्रमानवाचे देखील तेच. कारखान्यापासून, अंतराळक्षेत्रात, शस्त्रक्रिया करणे इत्यादी आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचा वापर कित्येक वर्षांपासून होतो आहे. यामुळे मानवाला फायदाच झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाच्या अनुषंगाने यंत्रमानव हा विषय देखील तितकाच प्रसिद्ध आहे. दोन्ही विषयांचे अनेक कंगोरे आहेत, बरेच तात्विक, नैतिक प्रश्न देखील चर्चिले गेले आहेत आणि जात आहेत. तत्त्वज्ञान क्षेत्रासाठी हा अतिशय जटील प्रश्न आहे. या यंत्रमानवाला मानवासारखे मन लाभले तर?

कालच यंत्रमानव आणि मन, भावना यांची चर्चा करणारा एक इंग्रजी सिनेमा पाहिला. त्याचे नाव Ex Machina. त्यात एव्हा नावाची महिला यंत्रमानव(humanoid) असते.  या आधीही robots, humanoids या विषयावर अनेक पुस्तके, सिनेमे(एक यादी येथे पाहता येईल) येऊन गेले आहेत(science fiction या स्वरूपात). पण यंत्रमानव आणि मन, भावना(consciousness या अर्थी) यांची प्रदीर्घ तात्विक, नैतिक चर्चा करणारा हा मी पाहिलेला पहिला सिनेमा असेल. ह्या एव्हाच्या मनात(की एव्हा ह्या यंत्रात असे म्हण्याचे?) संशय, मत्सर, प्रेम, आपुलकी, विरुद्धलिंगी आकर्षण ह्या भावना निर्माण होतात, आणि त्यातून ज्या समस्या निर्माण होतात त्याचे चित्रण हा सिनेमा करतो. चित्रपटात शेवटच्या दृश्यात Issac Asimov ने सांगितलेल्या robotics च्या तीन नियामांपैकी एकाचे हा उल्लंघन करतो.

काही महिन्यांपूर्वीच वर्तमानपत्रातून बातमी वाचली होती की सौदी अरेबिया देशाने एका यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल केले आहे. या यंत्रमानवाचे नाव आहे सोफिया, म्हणजे महिला यंत्रमानव आहे असे समजायला हरकत नाही. आता प्रश्न असा आहे, की ज्या देशात महिलांना अजून कितीतरी अधिकार दिले गेले नाहीत, जसे की मोटार गाडी चालवणे(जो इतक्यातच दिला गेला आहे), बुरखा वगैरे, तेथे, अशा महिला यंत्रमानवाची काय परिस्थिती असणार आहे? मजेशीर प्रश्न आहे, नाही? मानवाने यंत्रमानव निर्माण केला म्हणजे त्याच्यावर मानवाचे नियंत्रण पाहिजे, आणि तसे नसेल तर काय होऊ शकते हे अनेक पुस्तकातून, चित्रपटांमधून पाहता येते. आणि दुसरे जास्ती महत्वाचे म्हणजे त्या सोफियाच्या नागरिकत्वाचे जे अनेक पैलू आहेत, ज्याचा मानवी मन, भावना यांच्याशी देखील काही अर्थाने संबंध येतो, त्याचे काय करायचे? सोफियाने असे संगितले आहे असे वाचले की तीला आता तिचे कुटुंब हवे आहे, म्हणजे पती, मुले वगैरे असाच अर्थ घ्यायचा. सोफिया जर स्वतंत्र नागरिक असेल तर तिच्यावर मानवाचे नियंत्रण नसायला हवे. तसे नसेल तर काय होईल? Ex Machina हा सिनेमा पाहून, सोफियाच्या बातम्या वाचून मन सुन्न झाले. हे सगळे प्रश्न कसे सुटणार?

नुकतेच असे वाचले की रशियात उमेदवारांची मुलाखत घेणारे व्हेरा नावाचे एक यंत्रमानव आहे. तेही परत एक महिला यंत्रमानवच! एखाद्या विषयावरील प्रश्न मुलाखतीत विचारून उत्तर तपासून व्यक्ती बाद की नाही हे ठरवणे एक गोष्ट आहे, पण मुलाखतीत इतर अनेक गोष्टी मानवी मुलाखतकार करत असतो, त्याचे काय? वर वर पाहता सोफिया जरी एक रोबो आहे असे दिसते, पण ते म्हणे लोकांशी संवाद साधणारे एक smart chatbot आहे असे The Verge मधील या लेखात म्हटले आहे. सोफियाची निर्मिती करणाऱ्या संस्थेच्या प्रमुख तंत्रज्ञान अधिकाऱ्याची मुलाखत देखील हेच सांगते. तीला नागरीकत्व देणे हा एक स्टंट आहे असे वाटले तरी त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, तसेच या विषयाच्या तंत्रज्ञानाची प्रगती पाहता हे सर्व लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. तेव्हा काय करायचे? मानव आणि यंत्रमानव याच्यातील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. एव्हा, सोफिया, व्हेरा काय या सगळ्या महिला यंत्रमानव याचेच उदाहरण आहे. मानव याचा अर्थ मन असणारा अशीही एक व्याख्या आहे. यंत्रमानवाची व्याख्यादेखील तशीच होणार असेल तर? खूप वर्षांपूर्वीच(१९९१ मध्ये) Machinery of Mind हे George Johnson कृत पुस्तक मी वाचले होते. त्यात artificial intelligence ह्या क्षेत्राचा विस्तृत आढावा घेण्यात आला होता, तसेच पुढे काय होऊ शकेल, संभाव्य धोके काय याची चर्चा केली गेली होती.