माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#५

मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तच्या त्याच्या आईने, वासंती पदुकोण, यांनी लिहिलेले कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याची क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर जमेल तसे करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू आत्माराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध केला होता (माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१) आणि लगेचच दुसरा भागही सदर केला होता(भाग#२). सप्टेंबर महिन्यात मध्ये तिसरा आणि चौथा भाग देखील दिला होता(भाग#३ आणि भाग#४). आज पाचवा भाग देत आहे. काही दिवसातच म्हणजे ऑक्टोबर ९ रोजी गुरुदत्तची पुण्यतिथी आहे. त्यादिवशी सहावा आणि शेवटचा भाग देण्याचा मानस आहे.

मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#५

१९५२ च्या मी महिन्यात गुरुदत्तचा विवाह गीता सोबत झाला. गीता रॉय बरोबर गुरुदत्तने तिच्या पैश्यांसाठी तिच्या बरोबर लग्न केले असे टाईम्स ऑफ इंडिया मध्ये अतिशय अवहेलना करणाऱ्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या. गुरुदत्तला कधीच आर्थिक लोभ नव्हता. असे असते तर तिचे सगळे पैसे घेऊन तिला शोधचिट्ठी देऊ शकला असता. त्याच्या कडे त्याने स्वतः कमवलेले पैसे होते. कोणाचेही देणे त्याने ठेवले नव्हते, तसेच तो परोपकार करण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी तो नेहमी पैसे खर्च करत असे. त्याबद्दल तो चर्चा देखील करत नसे. हा चित्रपट व्यवसाय असाच आहे, जेथे कायम लोकं आत्मस्तुती करत असतात. गुरुदत्तला ह्या सर्वांमध्ये काहीच रस नसे. तो आणि स्वतःचे काम हेच त्याचे लक्ष होते. त्यामुळे त्याचे सद्गुण कोणाला समजले नाही, त्याचे सुख दुःख तो कधी कोणाला सांगत नसे, त्यामुळे ते कुणाला समजले नाही. पैश्यांची चणचण असेच. पण त्यामुळे हाती घेतलेले काम त्याने कधी सोडले नाही, कधी कोणाकडे जाऊन पैसे मागितले नाहीत. बाज चित्रपटानंतर आरपार चित्रपटासाठी शामा नावाच्या अभिनेत्री नायिका आणि गुरुदत्तने नायक असे काम केले. श्रमजीवी लोकांचे जीवन चित्रित करणारा हा चित्रपट खूप चालला, त्याने त्याला खूप नाव दिले, आणि पैसे देखील दिले. ह्याच दरम्यान घरातील वातावरण बदलल्याने देविदास, विजय हे दोघेही अभ्यासात मागे पडू लागले. देविदासला बोर्डिंग शाळेत पाठवून द्यावे असा सल्ला मी गुरुदत्तला दिला. त्याला ते त्यावेळी शक्य नव्हते तरी त्याने त्याला SSPM मध्ये त्याला पाठवले. आत्माराम आणि नागरत्न ह्यांचा विवाह त्याच सुमारास झाला.

गीता लग्नानंतर पूर्वी सारखी राहिली नाही. तिचा स्वभावच बदलला. लग्नानंतर ते सुखी राहतील असे वाटले होते, पण ती दोघे कायम भांडत असताना दिसत असत. गीता तशी चांगली मुलगी होती. पण का कोणास ठाऊक हे लग्न सुखी होणार नाही अशी मला भीती वाटत राहिली होती. गुरुदत्त माझ्या जवळ होता तेव्हा मी त्याला सूचित केले होते. त्याला देखील कधी कधी तसे वाटत होते कि काय कोणास ठाऊक. पण दिलेल्या शब्द तो कायम पाळत आला होता. तो म्हणत असे, ‘आई, मी काही झाले तरी गीतावर प्रेम करतो. तिच्याशी लग्न करणार असे वचन दिले आहे, ते मी कसे मोडू?’ ते साध्य नाही, नशिबात काय असेल ते होवो, तू उगाच चिंता करू नको.’ त्यानेच असे म्हटल्यानंतर, आणि तो कुटुंबाचा आधार होता, असे असताना मी त्याच्या वर जबरदस्ती कशी करणार? मी केली तरी तो ऐकणारा नाही, असा विचार करून गप्प राहिले.

१९५४ जुलै महिन्यात गुरुदत्तच्या थोरल्या मुलाचा तरुणचा जन्म झाला. त्याच वर्षी मे महिन्यात ललिताला मुलगी झाली होती. गुरुदत्तला स्वतःच्या मुलापेक्षा तिच्याच मुलाचे कौतुक, प्रेम अधिक होते. त्यानेच त्या मुलीला सर्वात प्रथम पाहिले. तिचे त्याने कित्येक छायाचित्रं काढली. कित्येक वर्षानंतर घर परत एकदा लहान मुलांने भरून गेले होते. दोन्ही मुलाचे बारसे करण्याचे ठरले होते. मुलीच्या मुलीचे कल्पना हे नाव ठेवले. गुरुदत्त-गीता ह्यांच्या मुलाचा जन्म झाल्यावर दोघेही आनंदात होते. मुलासाठी त्यांनी एकीला आया म्हणून घरात ठेवले होते. मी अधिककरून मुलीकडेच असे, कारण तिला आया ठेवायचे नव्हते, आणि तिला तशी अनुकुलता देखील नव्हती.

एका वर्षात गीता अनेक वेळेला अतिशय रागाच्या भरात घर सोडून गेली. लग्न झाल्या नंतर देखील तिला पूर्ण स्वातंत्र्य घेतले होते. नवरा असल्या मुळे ती अजून स्वैराचारी झालेली नव्हती. तिने कमावलेले पैसे तिच्याजवळच असत. गुरुदत्त त्यात बिलकुल लक्ष घातले नाही, किंवा कधी काही विचारले नाही. यासर्वांमुळे तिच्या आसपास मित्र मैत्रिणी गोळा झाले होते. ते सर्व एकत्र इकडे तिकडे जात येत असत. तिचा स्वैराचार बळावत चालेला होता. त्याच वेळेस गुरुदत्तने जर तिच्या वर लगाम खेचला असता तर काहीतरी बदललेलं असते असे आता वाटते आहे. तिला तशीच मोकळी ठेवण्याची चूक झाली.

१९५५ मध्ये गुरुदत्त खार मधील १२ व्या रस्त्यावरून १९ व्या रस्त्यावर नवीन मोठेसे घर भाड्याने घेतले आणि तिथे तो राहायला गेला. गुरुदत्तचा स्टुडिओ ताडदेव येथे होता. ह्या वेळेस एखादा हास्यप्रधान चित्रपट करावा या हेतूने मधुबालाला नायिकेचे काम दिले आणि त्याने स्वतः नायकाची भूमिका केली. हा चित्रपट देखील खूप चालला. पैसे देखील मिळू लागले होते. त्याच वेळी त्याच्या मुलाचा, तरुणचा, पहिला वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाची पत्रिका ललितानेच तयार केली होती. गुरुदत्त आणि गीता अनेक वेळेला एकत्र मुंबई फिरून आले, लंडन येथे देखील जाऊन आले. माझे यजमान त्याच वर्षी निवृत्त झाले. मी दिल्ली, काश्मीर, जयपूर, हरिद्वार, ऋषिकेश वगैरे ठिकाणे पाहून आले, आणि माझी अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली. माझ्या आईला ललिताच्या घरी ठेवले होते. माझे यजमान देखील दोन्ही मुलांकडे काही दिवस राहायला लागले. मी मुंबई सोडताना अंगात ताप होता. पण मी कोणाला सांगितले नव्हते. मला मुंबईतून काही झाले तरी निघून जायचे होते. आमचा संसार कायमच गरिबीचा होता, कायम पैश्यांची चणचण असे. त्यातच मुलांना मोठे करायचे, त्यांना चांगले व्यक्ती बनवायचे हा ध्यास घेतलेला. असे करत कष्ट झेलीत सासर रथ मी इथपर्यंत ओढला होता. मुलांवर ओझे बनायचे नाही असे देखील ठरवले होते. त्यांनी कोणाला सांभाळायचे? सदा भांडणाऱ्या बायकोला कि उसासे टाकणाऱ्या आई-बापांना. हा अनुभव आम्हालाच आला होता असे नाही, साऱ्या जगताचीच हि कहाणी आहे.

गुरुदत्त माझ्या पासून दूर झाला होता हे जरी खरे असले तरी, तो माझे हवे नको ते पाहत असे. मला कुठे जायचे असेल तर तिथे तो पाठवून द्यायचा. मला फिरायची हौस होती, निसर्ग सौदर्य पाहायचे होते. त्यामुळे दार्जीलिंग, काश्मीर अश्या ठिकाणी फिरून आले. मी त्याच्या खाजगी गोष्टींत, वैवाहिक जीवनात, व्यवहारात मी लक्ष घालत नसे. माझ्या कडून काही त्रास होऊ नये असेच पाहत असे. पण मनातून असेही वाटत होते कि आता दुसऱ्याच्या मर्जीत राहून आपल्याला जगावे लागणार.

गुरुदत्त जरी अंतर्मुखी होता तरी त्याचे मं अगदी निर्मल होते. परनिंदा त्याला सहन होत नसे. त्याचा तो सरळ स्वभावच त्याच्यावर उठला. त्याचे हितशत्रू त्याची खोटी स्तुती करून त्याला फसवत असत. काही झाले तरी परोपकार, गरीब विद्यार्थ्यांना घरी जेवायला बोलावणे, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे देणे, अश्या गोष्टी तो करतच राहिला, तेही निरपेक्ष भावनेने. आत्माप्रौढी मिरवत नसे. तो काही बोलत नसल्यामुळे, तो अहंकारी आहे असा गैरसमज झाला होता; त्याला कोणी नीट समजावून घेतलेच नाही. पदवीधर नव्हता तरी पण त्याला वाचनाचे वेड होते. शेक्सपिअर, बर्नार्ड शा, इमिली झोला, वूडहाउस, टोलस्टोय, स्टाईनबेक ह्या सारख्या लेखकांच्या साहित्यकृती तो कायम वाचत असे. पारंपारिक धार्मिक गोष्टींमध्ये त्याला रस नसला तरी तो भगवद्गीता, कुरण, बायबल वाचत असे. त्याला जसे समजेल उमजेल तसे तो आपल्या आयुष्यात त्यातील शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करी. दिवस रात्र तो चित्रपटांचाच विचार करत असे. कुठे तरी शून्यात नजर जाई, समोर कोण आहे नाही हे देखील त्याला बऱ्याचदा समाजात नसे. गीताचा स्वभाव ह्याचा विरुद्ध होता. ती कायम तिच्या मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात असे. कुठल्यातरी मृगजळाच्या मागे ती असे. स्वतःच्या सुखापुढे तिला दुसरे काही दिसत नव्हते. देवाच्या देणगीमुळे तिच्याकडे अतिशय चांगला गळा होता. पार्श्वगायनात लता मंगेशकरनंतर हिचेच नाव होते. पण तिचे नशीब नव्हते. ती स्वभावाने थोडी फटकळ झाली होती, मृदू अंतःकरण तिच्या जवळ नव्हते. चकचकीतपणा, लोकांचे गोड गोड बोलणे हेच तिला आवडे, यश तिच्या डोक्यात गेले होते. त्यामुळे गुरुदत्त आणि गीता यांचे कधी विशेष जमलेच नाही. गुरुदत्तचा सरळ, निर्मळ स्वभाव तिने कधी समजावून घेतलाच नाही; दुसऱ्यांना समजावून घेणे तिच्याकडे नव्हतेच. असे असले तरी गुरुदत्त तिच्यापासून काही लपवत नसे. ती जवळ आली कि तिला सर्व काही सांगत असे, तिचे मत विचारत असे. आता त्यांच्यात थोडा सलोखा, प्रेम आहे असे वाटते न वाटते, त्यांचे भांडण सुरु होई. त्याचा परिणाम काय होणार? ती तिच्या माहेरी निघून जाई. इथे असली तरी तिचे जेवण माहेरहूनच येई. या नवरा-बायकोचे जीवन आम्हाला मात्र अतिशय गूढ वाटे.

गुरुदत्त एकदा हैदराबाद येथे चित्रपटाचा प्रदर्शनासाठी गेला होता. तेथे त्याने रोजुलू मरायी नावाचा एक तेलुगु चित्रपट पाहिला. त्यात वहिदा रहमान हिने काम केले होते, त्यात तिचे नृत्य त्याला खूप भावले. लगेचच तिला आपल्या पुढच्या चित्रपटात घेण्यासाठी तिच्या आईची अनेक वेळेला भेट घेऊन विचारले तरी ती नाही म्हणत होती. एकदा त्याच्या डोक्यात एखादी गोष्ट आली तर तो सहसा तो पूर्ण केल्या शिवाय राहत नसे. अनेक प्रकारे प्रयत्न केले, तिच्या आईच्या मनासारखाच करार केला आणि शेवटी तिची परवानगी घेऊनच मग परत आला. तिला घेऊन केलेला चित्रपट अतिशय यशस्वी ठरला. सगळ्यांनी सुरुवातीला तिला का घेतले असे गुरुदत्तला सुनावले होते. त्याने कोणाचे ऐकले नव्हते. सांगितलेले काम ती चोख करेल असे तो सांगत असे. ती त्यावेळी फक्त सोळा वर्षांची होती. ती विशेष काही शिकली नव्हती. वडील निधन पावल्यानंतर घराची परिस्थिती अतिशय वाईट होती. त्या वेळी ती कोणातरी करवी चित्रपट क्षेत्रात आली. गुरुदत्तने तिला ह्या चित्रपटातून लोकांसमोर आणल्यानंतर सर्वाना गुरुदत्तचे दिग्दर्शन कौशल्य, त्याची ह्या माध्यमावरील पकड लक्षात आली. ह्या चित्रपटाने गुरुदत्तला मिळालेल्या पैश्याने ऑफिसमधील सर्वाना, घरातील नोकरांना तीन तीन महिन्यांचा बोनस दिला. आधीपासूनच तो स्टुडियो मधील लोकांना पैसे देणार, मग घरी पैसे देणार. चित्रीकरण सुरु असताना सगळे न बोलता चूप बसावे असा त्याचा दंडक होता. थोडा जरी आवाज झाला, किंवा सांगितलेल्या कामात चूक झाली तर तो सिंहासारखा गर्जत असे. सगळे ह्याला घाबरून असत, पण काम झाले कि तो त्यांचा परम मित्र असे. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होत असे, काय हवे नको ते विचारत असे. त्यामुळे स्टुडियो मध्ये तीनशेच्या आसपास काम करणारे लोकं त्याच्या शब्दावर, भारोस्यावर काम करत. त्याला जरा काही झाले कि देवाची प्रार्थना करत असत! प्रत्येक वर्षी एक शिल्पकार गणपतीच्या दिवसात गणपती आणून देत असे. तो १९६३ मध्ये निधन पावला आणि ती प्रथा थांबली.

गुरुदत्तला लहान मुले खूप आवडत असत. त्यातच त्याच्या थोरल्या मुलावर तरुणवर गुरुदत्तचे विशेषच प्रेम. काळ वेळ विसरून तो काम करत असे, त्यामुळे तो त्यातूनच काही वेळ आठवणीने काढून त्याला उचलून खेळवत असे. त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असे. त्याने आता तयार केलेला प्यासा हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय झाला होता. ऐश्वर्य, नाव, लोकांचे प्रेम हे सर्व त्याला ह्या चित्रपटामुळे मिळाले. लोणावळ्यात त्याने काही एकर जमीन घेऊन तीन खोल्यांचा बंगला बांधला होता. त्याला कंटाळा आला, किंवा चित्रपटासाठी काही लिखाण करायचे असेल तर तो तेथे जाऊन राहायचा. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करत असे, शेतावर असलेल्या मजुरांबरोबर काम करत असे. त्यांच्या कडून ज्वारीच्या अथवा बाजरीच्या भाकऱ्या आणि चटणी मागून खात असे; त्याने तेथे बांधलेल्या विहिरीचे पाणी शेंदून तो पीत असे. जवळपासचे मजूर वगैरे आले त्यांना पाणी देत असे. ती विहीर त्या सगळ्यांना एक तीर्थक्षेत्र होते. सगळे तेथून पाणी नेत असत. त्या जमिनीत जे काही पिकत असे, ते ऑफिस मध्ये, तसेच आपल्या भावा-बहिणींमध्ये वाटत असे, उरलेले घरी आणत असे. ह्या सर्वांमुळे लोणावळ्याची जागा त्याला अतिशय भावली होती. पण हेच गीताच्या रोषाला कारण झाले होते. खेड्यातील जीवन म्हणजे ती नाक मुरडत असे. गुरुदत्तने कसल्याही गोष्टी उत्साह दाखवला तर त्याच गोष्टीत ती निरुत्साही असे. नवरा बायकोच्या ह्या अश्या रुसव्या-फुगव्या मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा अरुणचा जन्म झाला. हि गोष्ट १९५६ मधील. ह्या वेळेला देखील मुलगी व्हावी असे त्यांची इच्छा होती. पण तसे झाले नाही. ह्या दरम्यान गुरुदत्तने पाली हिल्स येथे शंभर वर्षे जुना बंगला विकत घेतला. त्यात त्याने हजारो रुपये खर्च करून त्याला हवे तसे बदल करून घेतले. मोठ्या घरात राहण्याचे त्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले. गुजरातच्या गायी, सयामी मांजरे, विविध जातीची कुत्री, विविध पक्षी, माकडे, ससे त्याने पाळली होती. ह्या सर्वांवर कडी म्हणजे त्याने घरात एक वाघाचे एक पिल्लू देखील आणले होते. घरात एक छोटेखानी सर्कस तयार झाली होती. वाघाच्या पिल्लाने अरुणला एकदा चाटले होते असे मी ऐकले होते. त्याने ते पिल्लू लगेच कोणाला तरी दिले. धन-धान्य, पशु-पक्षी, मुलबाळे, सती-संत. गीता आता विविध व्यसनात गुरफटू लागली होती, आपल्या मित्र मैत्रिणीसोबत राहून, ती आपला सोन्यासारखा संसार बिघडवत होती.

गुरुदत्तला शास्त्रीय संगीत खूप आवडत असे. एकदा अत्तरबाई, एकदा सिद्धेश्वरीदेवी, अली अकबर, विलायत खान यांना बोलावून घरात संगीत मैफिल घडवली. दुसऱ्या दिवशी काहीतरी क्षुल्लक कारणाने परत भांडण होत असे. नेहमी प्रमाणे ती माहेरी जात असे, नंतर मुलांना बोलावून घेत असे. शेवटी ह्यानेच जाऊन तिला समजावून परत घरी घेऊन आणायचे. त्या भल्या माणसाला बायको-मुलं-घर म्हंटले कि काहीही अहंकार नसे. पुरुषी अहंकार सगळा विरघळून जात असे. एवढे करून देखील तिच्या मनाला काही समाधान तृप्ती नसे. गुरुदत्त स्वतःचे दुःख स्वतःकडेच ठेवत असे. एकदाही त्याने बोलून दाखवले नाही.

हाताखालच्या काम करणाऱ्यांमध्ये कोणी जरी थोडशी चुणूक दाखवली तर, तो त्यांना विविध संधी देत असे. स्वतः बाजूला होऊन त्यांना पुढे करत असे. राज खोसला याला सी आय डी चित्रपटात दिग्दर्शनाची संधी दिली, प्रमोद चक्रवर्तीला दोन चित्रपटात दिग्दर्शनाची संधी दिली. तसेच निरंजन नावाच्या कोणाला राज फिल्म करायला त्याने परवानगी दिली. त्याची कथा एका इंग्रजी कादंबरीवर आधारित होती. त्यात शिमल्यामधील बर्फ वर्षावाचे दृश्य चित्रीकरण करण्याचे साहस त्यानेच प्रथम दाखवले. त्याने गुरुदत्त कडे सात वर्षे काम करून देखील, त्याला त्याने दिग्दर्शन आवडले नाही. चित्रपट अर्धा तयार झाला होता. त्याने तो तेथेच अर्ध्यावर थांबवला. लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्या नन्तर एखादा बंगाली चित्रपट करावा अशी त्याची आशा होती. गौरी चित्रपटात गुरुदत्त नायक आणि गीता नायिका असे ठरले होते. एका शिल्पकाराच्या जीवनाची ती कहाणी होती. कलकत्त्यात चार महिने घर भाड्याने घेऊन, बंगाली रिती-रिवाजांचा अभ्यास करून, त्याने चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले. काही रील्सचे चित्रीकरण झाल्यावर गीताने काम करण्यास असमर्थता दर्शवली. गुरुदत्तच्या उत्साहावर पाणी पडले. हजारो रुपयांचे नुकसान झाले. हा धक्का सहन न झाल्याने, गुरुदत्त एक आठवडा कुठे गायब झाला होता ते समजले नाही. तो हरवला आहे हे समजल्यावर मी भ्रमिष्टासारखी झाले. कधी तो परत येईल असा विचार करत मी त्याची वाट बघत बसे.

जसे जसे गुरुदत्तच्या पदरी यश पडत गेले, तसे तसे, गीताच्या कारकिर्दीला ग्रहण लागत गेले. सगळे म्हणत असत कि गुरुदत्तच तिला गायची परवानगी देत नाही. खरी परिस्थिती काय होती, ते आमचे आम्हालाच माहित. तिनेच तिच्या वाईट सवयीमुळे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला होता. गुरुदत्तच्या चित्रपटात तिचे पार्श्वगायन चांगले होत होते, पण बाहेरील दुसऱ्या चित्रपटात चांगले होत नव्हते. तिने तिचा सुरेल आवाज गमावला होता. तिचे स्वतःचे नातेवाईक सुद्धा तिच्या पासून दूर होऊ लागले होते. हि दुनियाच अशी आहे, नाही का? इतकि वर्षे तिने त्यांच्या साठी काम करून त्यांना पोसले, आणि तिच्या कठीण समयी ते दूर झाले. तिचे कोणी ऐकेनासे झाले.

तिच्या स्वैराचाराला आळा बसू लागला. वहिदा गुरुदत्तच्या जीवनात आली हे आणखीन एक कारण. गुरुदत्त-वहिदा यांच्या विषयी गीतानेच अनेक अफवा पसरवायला सुरुवात केली. चित्रपट क्षेत्रात तर अशा बातम्यांना लगेच खतपाणी घातले जाते. असे असल्यावर काय सांगावे? ती स्वतः पत्नी सारखे न वागता, गुरुदत्तला लोकांच्या नजरेतून उतारवयाचे काम ती करत होती. गुरुदत्तच्या जवळच्या लोकांना हे सर्व माहिती असल्यामुळे, ते शांत असत, वहिदाला त्यांनी बाजूला केले नाही. पण ती स्वतःहून बाहेर गेल्यावर, तिला एकाहून एक चांगली कामे मिळत गेली. तिचे नशीब चांगले होते. तिचे काम लोकांना देखील आवडत होते, आणि ती त्यामुळे प्रसिद्ध होत गेली.

गौरी आणि राज या चित्रपटांमुळे गुरुदत्तला भयंकर फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाले. घरातील वातावरण तर हे असे होते. त्याच्या मनाचा तोल ढळू लागला, त्यात आश्चर्य ते काय. त्याला मद्रासच्या चित्रपटातून काम करायला संधी येत होत्या. या वेळेपर्यंत ते त्याने स्वीकारले नव्हते. आता निरुपाय होता, म्हणून त्याने मद्रासच्या निर्मात्यांच्या काही हिंदी चित्रपटांतून नायकाची कामे स्वीकारली. त्याच सुमारास चौदहवी का चांद चित्रपटाची बोलणी सुरु झाली. आधीच त्याने हात पोळून घेतले असल्यामुळे त्याने ते दिग्दर्शित न करता, दुसऱ्याला ते दिले. ते यशस्वी व्हावे याकरिता अनेक गाणी, नृत्ये त्यात त्याने घालायला लावली आणि तो चित्रपट त्याने संपवला. त्याच्या बाकीच्या चित्रपटांपेक्षा तो तसा बाजारू चित्रपट होता; त्यात कलात्मकता कमीच होती; सर्वसाधारण प्रेक्षकांसाठी तो बनवलेला होता. लोकांना तो अतिशय आवडला, त्याचे लोकं कौतुक करून लागले. ते त्याला आवडले नाही. असे असले तरी त्याला गाळातून बाहेर काढले. स्टुडियो मधील सर्वाना त्याने बोनस दिला. भाऊ विजय आणि मुलगा तरुण यांना दार्जीलिंगला फिरायला पाठवले. नंतर परदेशात देखील त्यांना पाठवायचे होते. पण देवाच्या मनात वेगळेच होते. त्याच्या कितीतरी योजना पूर्ण होऊ शकल्या नाही. एवढेच नाही तर, निराशेने भरलेले मन, अपयश पचवलेल्या मनःस्थितीत, त्याने चित्रपटातून नायकाच्या भूमिका कश्या काय करत राहिला, देवच जाणे! मोठ्यांचे आशीर्वाद, साधूसंतांची कृपा, स्वतःचे मनोधैर्य, सहनशीलता ह्याच गोष्टी त्याचे रक्षण करत होत्या असे वाटते. चित्रपट क्षेत्र हा एक व्यवसाय आहे. त्यासाठी व्यावसायिक वृत्तीच हवी. गुरुदत्त सारख्या हळव्या, संवेदनशील मनाच्या लोकांचे ते काम नाही. एकदा त्याच्या तावडीत सापडले कि बस, त्यातून बाहेर येणे अतिशय अवघड. चौदहवी का चांद चित्रपटाच्या आधी कागज के फूल हा चित्रपट त्याने सुरु केला होता, जो त्यानेच लिहिला होता, तसेच त्याने दिग्दर्शित केला. गुरुदत्तच्या चित्रपट क्षेत्रातील अनुभवच त्या चित्रपटाची कथावस्तू होती. हिंदुस्तानात पहिल्यांदा सिनेमास्कोप चित्रपट केला तो गुरुदत्तनेच. लोकांना जरी आवडला होता, कौतुक होत होते, तरी तो चित्रपट चालला नाही. त्यामुळे त्याचे पुढील चित्रपट दुसऱ्यांनी दिग्दर्शित केले. दुसऱ्याला कोणाला तरी संधी देऊन त्यांना पुढे आणायचे अशी त्याची इच्छा होती. स्वतःचे बलिदान केले. !

ह्या नंतर बंगाली चित्रपट करायच्या इच्छेने श्री विमल मित्र यांच्या मिथुन-लग्न हि कथा निवडली. (हे पुस्तक मी कन्नड मध्ये अनुवादित केले आहे, आणि काव्यालय प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे). ह्यात तंद्रा बर्मन हिला घेऊन तीन रिळे चित्रीकरण केले आणि त्यानंतर ते त्याने थांबवले. याचे कारण तिने अनेक प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्याने असे कितीतरी चित्रपट सुरु करून मध्येच अर्धवट सोडले त्याला काही गणतीच नाही. तसेच कितीतरी कथांचे हक्क पैसे देऊन घेतलेले, कराराच्या फाइल्स कोपऱ्यात पाडून होत्या. गुरुदत्त अतिशय संवेदनशील, मनाला येईल तसेच झाले पाहिजे अश्या मताचा असल्यामुळे, कामात थोडीशी देखील हयगय चालत नसे.

या दरम्यान गीताचा दोनदा गर्भपात झाला. तिचे स्वास्थ्य बिघडले होते. तिच्या प्रत्येक बाळंतपणी, आणि तिची प्रकृती बिघडली असताना मी हॉस्पिटल मध्ये तिच्या सोबत असे. आत्मारामने गुरुदत्त फिल्म्स कंपनी सोडून बर्मा-शेल मध्ये नोकरी सुरु केली. तेथे माहिती-पट बनवणाऱ्या विभागात काम मिळाले. १९५७ मध्ये तीन वर्षांसाठी लंडनला निघून गेला.

आत्माराम माहिती-पट क्षेत्रात बरेच नाव कमावले. गुरुदत्तला लंडनमध्ये चित्रपट वितरणासाठी एक कार्यालय हवे होते. त्या वेळेस गुरुदत्त मॉस्को, लंडन, जर्मनी ह्या ठिकाणी भेट देऊन आला. आत्माराम मध्ये असलेल्या प्रामाणिकपणा, अनुभव, कामाप्रती उत्साह या सर्वांमुळे, त्याला परत आपल्या स्टुडियो मध्ये काम करण्यासंबधी विचारले. आत्मारामला सुद्धा लंडन मध्ये राहयचे नव्हते, कारण त्याची मुलगी मोठी झालेली होती. तेथील संस्कार, वातावरण आपल्या मुलीवर परिणाम करतील असे त्याला वाटत होते. १९६० मध्ये आत्माराम लंडनहून मुंबईला आपल्या कुटुंबासमवेत परतला. आणि गुरुदत्त फिल्म्स मध्ये काम करू लागला. त्याच वर्षी त्याच्या लहान भावाने एका पंजाबी मुलीशी प्रेमविवाह केला. आणि त्याच वर्षी माझे यजमान निर्वतले.

मी १९५९ मध्ये माझ्या आई सोबत माटुंगा मधील घरी राहत होते. माझ्या आईला ऐकू कमी येत होते, दृष्टी देखील क्षीण झाली होती, स्मरणशक्ती क्षीण झाली होती. त्या घरात राहायची सवय असल्यामुळे ती आपले काम आपणच करत असे. गुरुदत्त कितीही रागवत असला तरी त्याच्या जवळ राहणे अनुकूल होत नव्हते. तो म्हणत असे, ‘आई, ,माझ्या मुलांना तू आवडतेस. त्याच्याबरोबर का राहत नाहीस? इथे राहायला आवडत नसले तर शेजारी एक दुसरा बंगला मी बांधतो, तेथे राहा’. पण त्याच्या बरोबर राहणे मला शक्य नव्हते. असे असले तरी त्याच्या घरी कोणी आजारी असल्यास, गीताच्या बाळंतपणी, किंवा त्यांचे भांडण झाल्यास मी जाऊन राहत असे. मला देखील गुरुदत्तला सोडून राहायचे म्हणजे जीवावर येत असे. माझ्या वृद्ध आईला सोडून कशी जाणार? तरीही मी अधून मधून जात असे, हे खरे आहे. पण नियतीने आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे कसे कळणार? आम्ही सर्व त्यांच्या इतके जवळचे असून देखील त्याच्या मनात काय खळबळ चालू हे कळत नव्हते. त्याच्या जवळ राहून त्याला काही नैतिक धैर्य देण्याचे देखील आम्हाला जमले नाही.

१९६१ मध्ये साहिब बीबी गुलाम हा चित्रपट करावा असा त्याच्या मनात विचार आला. कथा श्री विमल मित्र यांची होती, मोठा कठीण विषय होता. जुन्या काळातील जमीनदारांची ती कथा होती. एकदा मनात आले कि तो कसा काय थांबणार? कलकत्त्यात घर भाड्याने घेतले, जुन्या जमीनदाराचे घर शोधून काढले. वहिदा, मीनाकुमार, रहमान त्यात होते, आणि तो नायक होता. दिग्दर्शनासाठी त्याचा चांगला मित्र असलेल्या अब्बर अल्वी याला पाचारण केले. त्याने गुरुदत्तच्या अनेक चित्रपटांसाठी संवाद लिहिले होते. अतिशय प्रतिभावान होता. असे असले तरी तो दिग्दर्शन पहिल्यांदाच करणार होता. साऱ्या चित्रपटात गुरुदत्तने त्याच्या मागे उभे राहून दिग्दर्शन केले, हे सर्वाना माहित होते, पण नाव त्याचेच दिले. हा चित्रपट चालला नाही. पण तोच चित्रपट पाहायला लोकं गर्दी करतात.

त्याचे सुमारास घरातील परिस्थिती अतिशय दुःखाला कारण झाली होती. १९६१ मध्ये गुरुदत्तचे वडील गेल्यानंतर घरात कोणी विचारायला असे राहिले नाही असे झाले. गीता तर दिवस-रात्र नशेत असे. घरातील नोकरचाकर मंडळी गुरुदत्तसमोर चांगले वागत, पण नंतर त्याच्या मागे घरमालकिणीच्या हातातील बाहुल्या झाले होते. गीताने त्यांना पैसे देऊन आपल्या बाजूला केले होते.

१९६१ ऑक्टोबर मध्ये विजयला भयंकर आजार होऊन तो गुरुदत्तकडे राहायला आला. त्याच्या अपेंडिक्सचे ऑपरेशन करायला लागले. त्याच सुमारास गीता गायब झाली होती. कशी कोणास ठाऊक पण तो स्वःच परत घरी परतली. त्यावेळेला अनेक अशा गोष्टी घडल्या कि ज्या सांगू नयेत, किंवा सांगता येत नाहीत. गुरुदत्तच्या मुलाला तरुणला कोणीतरी पैशांसाठी फसवले, बदनामी केली असे समजल्यावर गुरुदत्तने त्याला दार्जीलिंगहून बोलावून घेतले. त्यावेळी गीता आपल्या माहेरी होती. मुलावरून दोघांत कडाक्याचे भांडण झाले. शेवटी तरुणला ती घेऊन गेली. एवढ्या मोठ्या घरात मला एकटीलाच राहावे लागले, असते, म्हणून मी माझ्या सासूला बोलावून घेतले.

त्या रात्री गुरुदत्तची मनःस्थिती कशी होती देवालाच माहिती. तरुण म्हणजे त्याचा जीव कि प्राण. काही दिवसांपूर्वी अशी आवई उठली होती कि तो गुरुदत्तला घटस्फोट देणार आहे. गीता देखील सहजसहजी देणार नाही असे देखील कानावर येत होते. मुले तिच्याकडेच राहणार, तसेच दोघांचेही समाजात नाव होते, त्यामुळे देखील होणारा अपमान त्याला सतावत होता. लग्न करताना सुद्धा त्याने रजिस्टर पद्धतीने करायला त्याचा नकार होता. हिंदू धर्माप्रमाणे, शास्त्रोक्तपद्धतीने, लोकांसमोर तो विवाह करायचा असा त्याचा आग्रह होता. गुरुदत्तला घटस्फोट सारख्या आधुनिक पद्धती मान्य नव्हत्या. चित्रपट-व्यवसायाशी निगडीत पार्ट्यांना तो अगदी अगत्य असेल तरच तो जाई. क्लब, रेस अश्या गोष्टी त्याला आवडत नसत. घोड्याच्या शर्यती त्याने कुतूहल म्हणून एक-दोनदा पाहायला गेला असेल. जातीभेद, धर्मभेद तो पाळत नसे. परंपरागत असलेल्या काही अंधश्रद्धा देखील पाळत नसे. भगवद्गीता, कुराण, बायबल वगैरे तो वाचे, पण मंदिरात, मस्जिद, मठात कधी गेला नाही. गीतेतील शिकवणीप्रमाणे फळाची आशा न करता तो आपले काम करत असे. जीवनातील एक देखील क्षण तो वाया न घालता कार्यरत असे. घर, स्टुडियो एवढेच तो करे, दुसरीकडे कुठेही जात नसे. वेळ मिळाला कि मुलांबरोबर खेळणे, स्वयंपाक करणे , दुसऱ्यांना जेवू घालत असे, वाचन करत असे, हे त्याचे वेळ घालवण्याचे उद्योग असत. त्याचा पुस्तकांचा संग्रह मोठा होता, मराठी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, हिंदी अशी सर्व पुस्तके त्याच्याकडे होती. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील बाजूला एक उघडे पुस्तक निपचीत पडले होते.

लहानपणापासूनच त्यांच्या सगळ्या कामात प्रयोगशीलपणा दिसून येत असे. इंग्रजी चित्रपटांमध्ये जसे दोन-तीन लघुकथा एकत्र करून चित्रपट बनवतात तसे, त्याला हिंदीत देखील करायचे होते. त्याची ती इच्छा प्रबळ होती, पण शेवटीही ती पूर्ण झालीच नाही.

(क्रमशः)

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#४

मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तच्या त्याच्या आईने, वासंती पदुकोण, यांनी लिहिलेले कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याची क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर जमेल तसे करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू आत्माराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध केला होता (माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१) आणि लगेचच दुसरा भागही सदर केला होता(भाग#२). ह्या महिन्यात(सप्टेंबर) मध्ये तिसरा भाग देखील दिला होता(भाग#३). आज चौथा भाग देत आहे. ह्या भागात पंडित उदय शंकर यांच्या पत्नी अमला यांचा उल्लेख आहे. अमला यांचे, ज्या स्वतः उत्तम नर्तकी होत्या, नुकतेच १०० व्या वर्षी निधन झाले. इतिहासातील एक दुवा निखळला. 

मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#४

१९४२ च्या ९ ऑगस्ट रोजी आम्ही मंगळुरूला पोहोचलो; पण तसेच तेथून बसने निघालोही; कारण माझ्या आईला मी तिच्याकडे गेल्याचे आवडले नव्हते. मी आणि माझी चार मुले सगळे धैर्य एकवटून मुंबईला निघालो. रस्त्यात आम्हाला ९ ऑगस्टच्या चाले जाव(Do or Die) चळवळीच्या मोर्चा ठिकठिकाणी दिसला. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना कैद केले गेले होते. त्यामुळे सगळीकडे हरताळ सुरु होता. आमचा प्रवास त्यामुळे अडखळतच सुरु होता. पुण्याला आलो तेव्हा आमची गाडी चुकली होती, त्यामुळे एक रात्र तेथे एका नातेवाईकांकडे काढावी लागली. मुंबईला पोहोचली तेव्हा शहरात युद्धामुळे अनेक लोकं घरदार सोडून गेले होते. मुंबईत ऑस्ट्रेलियाचे सैनिक नागरिकांना धमकावत, त्रास देत फिरत असत. आम्ही माटुंगा येथे माझ्या वाहिनीच्या मुलाकडे मुक्काम केला. पंधरा दिवसात आम्हाला नवीन घर मिळाले. आम्ही कलकत्त्याहून गडबडीत घर तसेच टाकून आलो होतो, सगळे सामान तेथेच होते. माझ्या चित्रकार भावाने काही आवश्यक समान, वस्तू पाठवल्या. उरलेले समान कुठे गेले, काय झाले कळलेच नाही. आमचे घर थोडेफार सजले. दोघा मुलांना बालक-मंदिरात पाठवायला लागले. धाकटी दोन मुले घरीच राहिली. विजयाला अजून चालायला, बोलायला देखील येत नव्हते. मी काहीतरी काम करण्यावाचून गत्यंतर नव्हते. एका महिन्यानंतर एका बंगाली कुटुंबात शिकवणी मिळाली. पण नोकरी मिळाली नाही. माझ्याकडे प्रमाणपत्रे नव्हती, त्यामुळे मला कोणी नोकरी देत नव्हते. अल्मोडा मध्ये नोव्हेबर मध्ये अतिशय थंडी असते, त्यामुळे केंद्र बंद असते. गुरुदत्त अचानकपणे मुंबईत आमचे घर शोधत शोधत आला. तो आला तेव्हा मी काहीतरी घरकाम व्यस्त होते. त्याने आई अशी हाक मारली, मी वळून पाहते तर गुरुदत्त! आश्चर्य संतोष अशा अनेक भावना मनात उचंबळून आल्या. त्याने मला नमस्कार केला. त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्याचे क्षेम-समाचार विचारायच्या आधीच मुले त्याच्या भोवती गोळा झाली आणि नाचू बागडू लागली. मी त्याला परत पाहिले. किती उंच झाला होता! किती सुंदर दिसत होता! त्याचा आवाज देखील भारदस्त झाला होता. मनात असेल तर आपल्याला कुरूपदेखील सुस्वरूप दिसू लागते! गुरुदत्त आधीपासूनच देखणा होता, मग काय विचारता? गुळगुळीत चेहरा, डोक्यावर घनदाट काळे कुरळे केस होते, काळसर मिश्या, चकाकणारे डोळे, चेहऱ्यावर सुहास्य, उंचापुरा रसरशीत असा देह. मी त्याला पाहून जवळ जवळ एक वर्ष होत आले होते. त्या रात्री मी आणि तो भरभरून बोलत होतो. रात्र कधी सरली समजलेच नाही. घरातील परिस्थिती पाहून तो खूपच हळहळला. मला तो म्हणाला, ‘मी विजयचा सांभाळ करतो, तू नोकरी कर’. पण त्या वेळी मुंबईत उदयशंकर यांचे कार्यक्रम होत होते. त्याला तेथे जावे लागे. मुंबईच्या न्यू एम्पायर नाट्यगृहात कितीतरी कार्यक्रम झाले. गुरुदत्तने एकदा माझी उदयशंकर यांच्याबरोबर ओळख करून दिली. त्यांनी गुरुदत्तची खूप प्रशंसा केली, ते ऐकून माझा उर अभिमानाने भरून आला.

१९४२ च्या फेब्रुवारी मध्ये उदयशंकर यांचा मुक्काम परत अल्मोडा येथे गेला. गुरुदत्त देखील त्यांच्या बरोबर निघाला. त्याला निरोप देताना अतिशय दुःख झाले. तो मुंबईत असे पर्यंत मला घराची चिंता नव्हती. त्याच वेळेला मला श्री सीताराम पोतदार शाळेत मला काम मिळाले होते. गिरगावात जावे लागे. मी घरी परत येई पर्यंत विजयला गुरुदत्तच सांभाळत असे. आणि भात आणि डाळ शिजवून स्वयंपाक देखील करून ठेवत असे. मुलांचे कपडे शिवून ठेवत असे, बाजारात जाऊन वस्तू आणत असे. अश्या रीतीने तो मला अनेक प्रकारे सहाय्य करत असे. तो तरी त्याचे शिक्षण सोडून किती दिवस राहू शकेल? तो गेल्यावर घरी काम करण्यासाठी एका बाईला त्याने सांगून ठेवले होते, असे नंतर समजले.

गुरुदत्त त्यानंतर देखील पत्र लिहित असे. त्या वर्षी अमला नावाची मुलगी अल्मोडा केंद्रात आली. श्रीमती सुशीला राणी यांची छोटी बहिण सुनीती हि देखील तिथे आली. देशातून अनेक ठिकाणाहून तिथे नृत्य शीकायला मुली आल्या असे त्याने लिहिले होते. लक्ष्मी शंकर, रमा गांगुली ह्या सुद्धा तिथे आल्या.

१९४३ च्या नोव्हेंबर मध्ये परत केंद्राला थंडीची सुट्टी मिळाली. उदयशंकर यांचा नृत्य संच परत मुंबई, अहमदाबाद, उत्तरप्रदेश अश्या अनेक ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करत फिरू लागले, त्यांचे सगळीकडे अजून नाव होऊ लागले होते. ह्या वर्षी दौऱ्याचे प्रमुख आकर्षण होते ते Swan Dance हे नृत्य. ते गुरुदत्तने लिहिलेले होते, आणि दिग्दर्शन देखील त्याचेच होते, रंगभूमीवर ते अद्भुतपणे सदर होत असे. सर्वाना ते अतिशय आवडत होते. उदयशंकर यांच्या मुलीने देखील नवनवीन नृत्य बसवली होती.

रामलीला नावाचे shadow play ह्या कार्यक्रमाने तर अतिशय प्रसिद्धी मिळाली होईत. त्यात सचिन शंकर(उदय शंकर ह्यांचा पुतण्या) हा राम झाला होता, तर गुरुदत्त लक्ष्मण झाला होता. श्रीमती सिमकी(French student Simkie) ह्या कैकयी, तर ताटकी ह्यांनी शूर्पणखेचे पात्र साकारले होते. मुंबईतील ह्या कार्यक्रमाच्या वेळी तुडुंब गर्दी झाली होती, तिकिटाचे दर देखील कमी होते, तेही कारण असेल. दौरा संपल्यानंतर गुरुदत्तला दोन महिन्याची सुट्टी मिळणार होती. गुरुदत्त थोडासा निराश झाला होता. अल्मोडा केंद्रात अमला नावाची जी मुलगी आली होती, तिच्या मुले तेथील वातावरण थोडेसे गढूळ झाले होते, असे त्याने लिहिले होते. अमला आणि उदय शंकर यांच्यामध्ये प्रेम संबंध जुळले होते. ते एकाच घरात एकत्र राहत होते, पण त्याच बरोबर गैरसमज, संशय अश्या गोष्टी देखील सुरु झाल्या होत्या. परत सगळे अल्मोडा केंद्रात गेल्यावर उदय शंकर आणि अमला यांचा विवाह झाला. ह्या मुळे सिमकी, ह्या फेंच मुलीचा प्रेमभंग झाला होता. तिने उदय शंकर यांच्याबरोबर केंद्रात अनेक वर्षे काम केले होते, तिच्या मुले फ्रांस मधून देणग्या मिळत असत; दोघे एकमेकांना आवडत असत. त्यांच्या वरील रागाने त्यामुळे तिने प्रभात नावाच्या एका मुलाशी विवाह करून ती अम्लोडा मधून निघून गेली. त्यामुळे केंद्र बंद करण्याची वेळ आली होती म्हणे. अनेक विद्यार्थी पुढे काय होणार ह्या चिंतेत होते. गुरुदत्त देखील त्याच्या चार मित्रांसोबत मुंबईला निघून आला. रवि शंकर, अली अकबर, शांती वर्धन हे सर्व बोरीवली मध्ये एक भाड्याची खोली घेऊन राहत होते. उरलेली मुले त्यांच्या त्यांच्या गावी परत निघून गेली. गुरुदत्तने माझा आश्रय घेतला, त्यानेच असे आश्रय शोधात फिरावे हे ऐकून माझ्या डोक्यावर आकाश कोसळ्यासारखे झाले. एकदा नृत्य, अभिनय, या सारख्या कलेच्या क्षेत्रात गेल्यावर, कार्यालयात बसून काम करणे अवघड होते, हे मला समजत होते. उपाय नव्हता. मी माझ्या चित्रकार भावाला काय करायचे असे विचारले. त्याने सांगितले कि एका कामासाठी मुंबईला येणार, तेव्हा पाहू असे आश्वासन दिले. त्यावेळी प्रभात फिल्म कमानीत बाबुराव पै नावाचे कोणी भागीदार होते. त्यांचा आणि माझ्या भावाचा परिचय होता. ते गुरुदत्तला त्यांच्याकडे घेऊन काही काम देण्यास विचारले. एवढ्या लहान मुलाला काय काम देणार असे म्हणाले. शेवटी त्याला नृत्य दिग्दर्शक म्हणून तीन वर्षांचा कराराने त्याला काम दिले. त्याला चित्रपटातून छोट्या छोट्या भूमिका करण्याच्या संधी मिळत गेल्या. लाखाराणी चित्रपटात त्याला थोडशी मोठी भूमिका मिळाली होती. नंतर हम एक है या चित्रपटात रहमान, देव आनंद, दुर्गा खोटे या सारखे कलाकार त्याच्याबरोबर होते. त्यावेळी देव आनंद आणि गुरुदत यांची चांगलीच मैत्री जमली. एकाच खोलीत ते राहत असत. देव आनंद हा सद्गृहस्थ होता, पदवीधर होता, चांगल्या सुसंकृत घरातून तो आला होता, त्यामुळे त्यांच्या मैत्रीत कधी फाटे पडले नाहीत. एकमेकांना यश मिळवण्यासाठी संधी देण्यासाठी दोघांनी मदत करण्याचे वचन दिले होते. देव आनंद याला मुंबईत दुसऱ्या काही चित्रपटातून काम मिळाल्यामुळे त्याने पुणे सोडून मुंबईला राहायला आला.

त्याच सुमारास श्री विश्राम बेडेकर यांनी गुरुदत्तमधील साहस, कलाकौशल्य आदी गुण हेरून त्यांच्या चित्रपटात सहाय्य करण्याबाबत विचारले. गुरुदत्तने ते स्वीकारले आणि आधी सुरु असलेल्या कामांसोबत हे देखील विनासायास करू लागला.

एकदा घरात मी गणपती पूजा संपवून मंगलारती घेत होते तेवढ्यात गुरुदत्त एका मुलीला घरी घेऊन आला. दोघे माझ्या पाया पडले. विस्मयाने मी दोघांकडे पाहिले. त्यावेळेस गुरुदत्त हसत हसत म्हणाला, ‘आई, हि विजया, तुझी होणारी सून’. मुलगी दिसायला साधारणच होती. गुरुदत्तने तिला पसंद केले असल्यामुळे, मी तिचे यथोचित स्वागत करावे या हेतूने, तिचा हात धरून तिला पाटावर बसवले, आणि गणपतीचा प्रसाद दिला. रात्रीचे जेवण करून, रातोरात ते दोघे पुण्याला परत गेले. ते दोघे घरी असे पर्यंत तिचे आई-वडील कोण, तिचे शिक्षण काय झाले आहे, या सर्वांबद्दल काही विचारलेच नाही.

रात्री बारा वाजता माझ्या नावाने एक तार आली. त्यात होते कि, ‘गुरुदत्तने विजयाला पळवून नेले आहे. ती जर उद्यापर्यंत घरी आली नाही तर पोलीस केस करावी लागेल’ कोणी खाजगीवाले नावाच्या व्यक्ती कडून ती तार आली होती. आता काय करावे हे मला काही सुचले नाही. दुसऱ्या दिवशी मी रात्री पुण्याला निघाले. ते धैर्य मला कसे आले माहित नाही! त्याच्या खोलीवर गेले तर तेथे कुलूप. तेथे असलेल्या सुरक्षारक्षकाला सांगून दोन खुर्च्या मागवल्या. हातातील सोन्याच्या बांगड्या खोलीच्या खिडकीतून आत टाकल्या आणि त्या दोन खुर्च्यांवर मी झोपी गेले. गुरुदत्त सकाळी शुटींग संपवून घरी आला. मला तेथे पाहून त्याला आश्चर्य वाटले. माझे डोके दुखत होते. रागाने मी ती तार त्याच्या समोर धरली. त्याने काही झालेले नाही असे दाखवत हसत म्हणाला, ‘तू काही घाबरू नकोस. ते सगळे त्या खाजगीवल्याचे कारस्थान आहे’, आणि पुढे त्याने काय झाले ते सविस्तर सांगितले, ‘विजया हि त्याच्या बरोबर अभिनेत्री असणारी मंजू हिची बहिण आहे. ती प्रभात फिल्म कंपनीत काम करते. खाजगीवाले हे पुण्यातील प्रसिद्ध वकील आहेत. त्यांचे या दोन तरुण मुलींवर बारीक लक्ष असे. विजयाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्याने हे कारस्थान रचले आहे.’ हे सर्व रामायण ऐकल्यावर मी तिथे रहायची आवश्यकता नव्हती. मला तेथे राहयचे म्हटले तरी मला राहता येणार नव्हते. सकाळच्या गाडीने मी परत निघाले. पण डोक्यातून तो विषय जाईना. कोणाला सांगून भार हलका करण्यासारखी ती परिस्थिती नव्हती.

संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला श्रीमती खाजगीवाले आमच्या घरी आले. त्यांना दहा मुले होती असे कळले. दिसायला सुद्धा वयस्कर प्रौढ दिसत होत्या. त्या मला म्हणाल्या, ‘गुरुदत्तला लहान आहे, फक्त एकोणिस वर्षांचा आहे. आई-वडिलांच्या परवानगीशिवाय असे लग्न करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही परवानगी द्या.’ त्यावेळेस त्या खूप मोठा उपकार करतायेत असे त्या वागल्या. माझ्या यजमानांना आधीच संसारात आसक्ती नव्हती. ते लगेच हो म्हणाले. मी लगेच होकार दिला नाही. मला काहीतरी काळेबेरे आहे असे वाटत होते. काही तरी करून तिला हाकलून दिले पाहिजे असे वाटले. पण ती जागेवरून हललीच नाही. कशीबशी तिची समजून घालून तिला निरोप दिला. आधीच घरात कटकटी कमी होत्या का, त्यात ही नवीन भानगड झाली होती.

त्या नंतरही आमच्या घरी येऊ लागल्या. ती परत लवकर देखील जात नसे. एकदा मला विजयाच्या आईच्या घरी काही वेळ गेले होते. तेव्हा समजले कि ती वेश्या आहे ते. ती आणि मी लगेच रात्री पुण्याला रेल्वेने निघालो. सकाळच्या वर्तमान पत्रात गुरुदत्त-विजया यांच्या विवाहाची बातमी छापली गेली होती. ते वाचून मला काहीतरी संशय आला. त्याच सुमारास श्री रमेश भट्ट, अनंत राय हे तेथे आले. त्यांची आणि माझी ओळख नव्हती. ते गुरुदत्तचे मित्र होते. ते मला म्हणाले, ‘तुम्ही काही काळजी करून नका. तुम्ही आत्ताच्या आत्ता गुरुदत्तला घेऊन मुंबईला निघून जा. आम्ही पाहतो काय करायचे ते. त्यांचा विवाह कसा होतो ते आम्ही बघतो’. आणि लगेच आम्हाला स्टेशनला पोहोचते केले. मुंबई आलो, आणि एक आठवडा आम्ही दोघे घरीच राहिलो. पुण्यात काय चालले आहे त्याचा आम्हाला पत्ता नव्हता. अर्थात लग्न झाले नाही. पण माझे मन मला खात राहिले, चिंता सतावत राहिली. खाजगीवाले हा अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य होता हे नंतर कळले. गुरुदत्तला काही अपाय होईल का, त्याच्या जीवाला काही धोका निर्माण होईल का असे वाटत राहिले. माझ्या डोक्याला काहीना काही तरी चिंता असावी हेच खरे.

गुरुदत्तचे दुसरीकडे लग्न केले तर हा प्रश्न कायमचा सुटेल असे माझ्या ध्यानात आले. माझा एक भाऊ हैद्राबाद येथे चित्रकार होता, तो छायाचित्रकार देखील होता. त्याला पाच मुली होत्या. थोरल्या मुलीला सून करून घ्यावे असे माझ्या मनाने घेतले, आणि दिवाळीच्या सुट्टीत त्याच्याकडे गेले. मुलीचे नाव सुवर्णा, आणि ती नावाप्रमाणेच सुंदर होती. तिचा स्वभाव देखील मला आवडला. गुरुदत्तला पुण्याहून बोलावून घेतले. तो आला, आणी त्याने सुवर्णाला पहिले, त्याला ती आवडली. डिसेंबर मध्ये मुलीला घेऊन आई-वडील आमच्याकडे आले. गुरुदत्त आणि सुवर्णा जोडीने फिरायला जाऊ लागले. तिच्या वडिलांनी त्या दोघांचे फोटो देखील बरेच काढले. ते दोघे एकमेकांना पत्र देखील लिहू लागले. १९४५ मध्ये त्यांचे लग्न करावे असे ठरले. परत हैदराबादला जाताना पुण्यात गुरुदत्तच्या घरी ते राहिले. ते गेल्या नंतर गुरुदत्तने मामाला आपल्या आधीच्या प्रकारांबद्दल साद्यंत कळवले. त्यांना माझ्याबद्दल माहिती हवी हा सद्हेतूने तसे त्याने केले. त्याचा स्वभाच मुले सत्यनिष्ठ, सरळ होता. काही लपवून ठेवायचे त्याला माहिती नव्हते. त्याच्या ह्या निस्पृह स्वभावामुळे पुढे त्याला वैरी निर्माण झाले. साऱ्या जीवनभर त्याला ह्याची किमंत मोजावी लागली. सत्याला मरण नसते असे म्हणतात. सत्यामुळेच माझ्या मुलाला मरण आले. गुरुदत्तचे पत्र वाचून माझ्या भावाला एकूणच संशय आला. आणि त्याने मुलीचे लग्न दुसरीकडे करून टाकले. हे गुरुदत्तला समजल्यावर त्याला अगदी वाईट वाटले. “हे असे होणार असे माहिती असते तर मी पत्र लिहिलेच नसते. माझी चूक कबुल करण्याचा स्वभाव असल्यामुळे मी कळवले. मामला ते समजले नाही’ असे तो नंतर माझ्याजवळ बोलला. खाजगीवाले परत गुरुदत्तला त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळे त्याला पुण्यातून मुंबईला घेऊन जावे असा मी विचार केला, आणि मी बाबुराव पै यांच्याशी बोलले, त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यावेळी त्यांनी स्वतः एक चित्रपट स्टुडीओ घेतला होता. ते म्हणाले, काही काळजी करून नका. त्याचा जबाबदारी आता माझी. मी त्याला नक्कीच मुंबईत घेऊन येईन. असे त्यांनी आश्वासन मला दिले.

एक दोन महिन्यातच श्री. पै यांचा चित्रपट तयार झाला. त्याचे नाव होते ‘मोहना’. त्यात देव आनंद, हेमावती सप्रू यांनी अभिनय केला होता. बनर्जी म्हणून कोणी दिग्दर्शक होते. गुरुदत्त त्यांच्या हाताखाली काम करायला लागला. पुणे सोडून येताना त्याला आणि त्याच्या मित्रांना खूप दुःख झाले. प्रभात फिल्म स्टुडीओ मधील लोकांमध्ये एकजूट होती, शिस्त होती, काम करताना उत्साह होता. ह्याही पेक्षा तेथे वातावरण अतिशय शांत होते. मुंबईत हे सगळे कसे मिळणार? मुंबईत आल्यावर गुरुदत्त आधी फेमस स्टुडीओ मध्ये काम करू लागला. तीन वर्षांचा करार संपायला एकच वर्ष राहिले होते. मोहना चित्रपट चालला नाही. त्या वेळेस त्याचे काम गेले. गुरुदत्तला काम करून कंटाळा आला होता. मुंबई सोडून मद्रासला गेला. जेमेनी आणि इतर ठिकाणी काम मिळवण्याचा खूप प्रयत्न त्याने केला. त्याच वेळेस त्याने प्यासा चित्रपटाची कथा लिहिली. कथा लिहिण्याचा नाद त्याला दहाव्या वर्षापासूनच जडला होता.

त्याच वेळेस अमिया चक्रवर्ती गर्ल्सस्कूल नावाचा चित्रपट बनवत होते. त्यांची पत्नी अल्मोडा मध्ये त्यांची बहिण लक्ष्मी(शंकर) ह्या आईसोबत राहत होत्या. गुरुदत्तला ते माहित होते. त्यामुळे अमिया चक्रवर्ती यांनी गुरुदत्तला सहायक दिग्दर्शक म्हणून कामावर ठेवले. त्यानंतर श्री ज्ञानेंद्रप्रसाद गोस्वामी यांनी संग्राम चित्रपटासाठी गुरुदत्तला स्वतःहून बोलावून घेतले. श्री गोस्वामी यांच्या वर गुरुदत्तची अतीव श्रद्धा होती. त्यामुळे गोस्वामींचे निधन झाल्यावर हे चित्रपट गुरुदत्तने बनवले त्यात त्याने त्यांचा आदरपूर्वक नामोल्लेख केला.

देव आनंदने देखील साधारण त्याच सुमारास त्याच्या भावाबरोवर, चेतन बरोबर, एक नवीन चित्रपट संस्था सुरु केली, नवकेतन या नावाने. त्यांचा पहिला चित्रपट नीचा नगर ह्या नावाचा असणार होता. दुसरा चित्रपट गुरुदत्तने दिग्दर्शित करावा असे गुरुदत्तला सांगून ठेवले. पण हे चेतनला रुचले नाही आणि आक्षेप घेतला. पण देव आनंदने शब्द दिल्याप्रमाणे गुरुदत्तलाच चित्रपट दिला. गुरुदत्तने बाजी चित्रपटावर देखील काम सुरु केले. बलराज सहानी यांची पटकथा होती. नायक देव आनंद, नायिका गीता बाली संगीत होते सचिनदेव बर्मन यांचे, १९४६ साली ह्या चित्रपटाचा मुहूर्त झाला. ह्या मुहूर्ताच्या वेळेला गीता बाली ‘तबदीर से बिगडी हुयी तकदीर’ हे गाणे गायली. तिचे रेकॉर्डिंग देखील झाले. ते ऐकून आम्हाला वेड लागायची पाळी आली होती, इतके छान झाले होते, किती मधुर असा तिचा आवाज! आम्हाला बंगाली भाषा, बंगाली लोकं यावर अधिक प्रेम होते, अभिमान होता. याचे कारण म्हणजे अनेक वर्षे कलकत्त्यात राहिलो असल्या मुळे तेथील जीवन जवळून पहिले होते, तेथील सुप्रसिद्ध लेखक, साधूसंत यांच्याशी संपर्क आलेला होता.बाजी चित्रपटाची मूळ कथा देखील गुरुदत्तचीच होती.

सचिनदेव बर्मन यांना मी कलकत्त्यात पहिले होते. ‘चंडीदास’ मध्ये बंगाली आणि हिंदी मध्ये गाणी गाऊन अत्यंत प्रसिद्धी मिळवलेले के. सी. डे हे परब यांच्या कडे नेहमी येत असत. परब हे स्टेट्समन वर्तमानपत्रात मोठ्या हुद्द्यावर काम करत असत. त्यांचा ज्योतिषावर विश्वास होता. आम्ही त्यांच्या घरातच खाली भाड्याने राहत होतो. आमच्या गुरुदत्तला त्यांनी लहानपणापासून बघत आले होते. दोघांची गाढ मैत्री होती. गुरुदत्तच्या सर्व प्रसिद्ध चित्रपटांतून त्यांनीच संगीत दिले होते. त्यांना काहीतरी नवीन सुचले, नवीन गाणे, नवीन चाल वगैरे, तर ते लगेच गुरुदत्त कडे येऊन त्याला ते ऐकवत होते; आणि त्याचे काय मत आहे ते विचारत. गुरुदत्तला पण त्यांच्यावर विश्वास, स्नेह, प्रेम होते. ‘दादा’ असे म्हटले कि पुरे, तो जिथे असेल तेथून उठून त्यांच्याकडे जायचा. गुरुदत्तच्या निधनाची बातमी ऐकून त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

गीता रे हिची मधुर आवाजातील गाणी, तिची शिडशिडीत अंगकाठी, सुंदरसा चेहरा हे सर्व पाहून गुरुदत्त तिच्या प्रेमात पडला. त्या वेळी ती माटुंगा मध्ये आपल्या आई वडिलांबरोबर, भाऊ-बहिण यांच्याबरोबर राहत होती. तिचे वृद्ध वडील कायम तिच्या सोबत असत, तिच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा आर्थिक व्यवहार ते पाहत असत. त्या वेळच्या गायिकांत लता मंगेशकर यांच्या बरोबर गीता रे सुद्धा प्रसिद्ध झाली होती. हजारो रुपये मिळत असत. गीता वर तिच्या परिवाराचा भार होता. तिच्या पैश्यावर सगळे चैन करीत असत. तिचे सगळे पैसे ते घेत आणि इकडे तिकडे खर्च करत, तिच्या हातात पैसे येतच नसत.

स्वभावाने गीता रे तशी खेडवळ होती. घराची सगळी जवाबदारी तिच्यावरच होती. कष्ट करणारी ती एकच, बाकी सगळे बसून खात असत. आपला आपला स्वार्थ साधण्यासाठी सगळे तिच्याशी गोड गोड बोलत असत. ती म्हणेल तसे झाले पाहिजे असा तिचा स्वभाव झाला होता. सुरुवातीला ती घरच्यांचा डोळा चुकवून आमच्या घरी येत असे. माझी मुलगी ललिता हिच्या मध्यस्थीने गीता आणि गुरुदत्त एकत्र आले. त्या वेळी गुरुदत्तला बंगाली लिहायला वाचायला तितकेसे येत नसे. गीता त्याला ते शिकवत असे. घरी आली कि ती मला गाणी ऐकवत असे, आणि मला ते आवडे. ती घरी परत जाताना, तिच्या बरोबर मी किंवा ललिता जात असू. बाजी चित्रपट खूप चालला. त्यावेळी गुरुदत्तने लग्नासाठी मागणी घातली तेव्हा तिने तीन वर्षे थांबण्याचा सल्ला दिला. तिचे ग्रहमान ठीक नाही असे तिने सांगितले. गुरुदत्त तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना देखील भेटून आला. तिची आई, आजी आमच्याकडे आल्या होता. पण हे प्रकरण पुढे गेले नाही. हे असे सर्व होऊन देखील आम्ही सर्व कधी कधी तिच्या बरोबर, तिच्या स्वतःच्या मोटार गाडीतून सहलीला अथवा दूर कुठेतरी फिरायला जात असू. गुरुदत्त आणि गीता हे दोघे देखील एकत्र फिरायला जात असत. कधी कधी ललिता देखील जात असे. असे करत दोन वर्षे गेली. गुरुदत्त त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या, जाल च्या तयारीत होता. गीताला अजूनही लग्न करायची इच्छा नव्हती असे दिसत होते. गुरुदत्तची सहनशक्ती संपली होती. कल्याण जवळ हाजीमलंग नावाचा मुस्लीम सत्पुरुषाचा दर्गा होता. तेथे गेल्यावर मनातील इच्छा पूर्ण होतात हे ऐकून, गुरुदत्त गीताला घेऊन तिथे गेला. गीताने एका बंगाली युवकासोबत असाच व्यवहार केला होता असे गुरुदत्तला समजले. पण तिकडे लक्ष दिले नाही. तिथे गेल्यवर तो तिला म्हणाला, ‘गीता, तू माझ्या भावनेशी असा खेळ खेळू नकोस. तुझ्या मनात काय आहे ते स्पष्ट सांग. तू माझ्या बरोबर लग्न करणार नसशील तर तसे सांगून टाक’ असे विचारल्यावर तिने त्याला होकार दिला. असे असले तरी तिच्या घरच्यांची तशी इच्छा नव्हती. पैसे देणारी हि कामधेनु दुसऱ्याच्या हातात द्यायची कशी द्यायची?

गुरुदत्तला त्याच्या कुटुंबाबद्दल वात्सल्य होते, कर्तव्यभावना होती, त्याच्यावर जवाबदारी देखील होती. आम्हा दोघांत तर खूपच स्नेह होता. आमच्या दोघांचे ध्येय, महत्वाकांक्षा, आवडीनिवडी, पुस्तकांबद्दल प्रेम सारखी असल्यामुळे, आमच्यात अन्योन्यभाव होता. माझ्या पासून तो काही लपवत नसे. तो माझ्यासाठी कल्पवृक्षासमान होता. बहिणीवर देखील तो अतिशय प्रेम करायचा. तिचे काय हवे नको ते पाहत असे.

१९५० पासून गुरुदत्तने माझी शाळेतील नोकरी सोडायला लावली. “एवढे वर्ष तू आमच्यासाठी कष्ट घेतलेस. बस झाले आता. मी आता मोठा झालो आहे, पैसे कमावतो आहे. तू जा अजून कष्ट घेत आहेस” असे म्हणून माझी नोकरी सोडवली.

गीताने तिच्या आईला वाचन दिल्या प्रमाणे, खार मध्ये एक प्रशस्त बंगला विकत घेतला, त्याची रंगरंगोटी करून, त्यात नवीन आणि आधुनिक साधन सामग्री, समानसुमान करवून आईच्या नावाने तो करून टाकला.

गुरुदत्तने सुरुवातील एक छोटीशी मोटार गाडी विकत घेतली. दिग्दर्शक झाल्यानंतर त्याला भेटायला येणाऱ्या लोकात वाढ झाली. मी राहत असलेले घर अतिशय छोटे होते. माटुंगा मध्ये आम्हाला मोठे घर असे मिळाले नाही. त्यामुळे गुरुदत्तने शेवटी खार मध्येच एक मोठे घर भाड्याने घेतले. त्यावेळी जाल हा चित्रपट बनत होता. त्याला मालवण भागातील पार्श्वभूमी होती. तो चित्रपट ख्रिस्ती धर्मीय व्यक्तीची कथा होती. त्यात देव आनंद, गीता बाली, राम सिंग हे सर्व काम करत होते. सचिनदेव बर्मन मालवणला जाऊन कोकण भागातील संगीताच्या अभ्यास करून आले, आणि मग चित्रपटासाठी संगीत दिले. मला तर माटुंगा सोडून जावेसे वाटत नव्हते. गुरुदत्त देखील एकट्यानेच नवीन घरी जात नव्हता.

ह्या दरम्यान मी, ललिता, देवदास आणि विजय असे सर्व धारवाडला मामा कडे जावे लागले. तिच्या मुलीची आई निर्वतली होती. मलाच ती आई मानत असे. मामा त्यावेळी तिच्यासाठी स्थळ शोधत होता. तिला लग्न करायचे नव्हते. एके दिवशी तिने पी. जी. बाळ नावाच्या ज्योतिष्याकडे ललिताला घेऊन गेली. त्याने तिला पाहून सांगितले कि तिचे घरह चांगले आहेत. तिचे लवकरच लग्न होईल. ती आपले शिक्षण पुढे सुरु ठेवेल. ललीताने मला घरी येऊन हे सर्व सांगितले. तिचे इतक्या लवकर लग्न करायचा माझा विचार नव्हता. ती त्यावेळी अजून कमर्शियल आर्ट्स शिकत होती. संसारातील कष्ट झेलून झेलून मी थकले होते. इतक्या लहान वयात तिच्या डोक्यावर संसाराचा भर मला टाकायचा नव्हता. ललीताने आपले शिक्षण संपवावे, पैसे कमवावेत, स्वावलंबी व्हावे, आणि नंतर तिला आवडेल त्या मुलाशी तिने विवाह करावा अशी इच्छा होती. तिच्या नशिबात काय होते कोण जाणे, ते कसे चुकवणार?

आम्ही मुंबईला परत आल्यानंतर काही दिवसातच ललिताच्या लग्नासाठी एक प्रस्ताव आला. मुलगा merchant navy मध्ये कप्तान होता. चांगला पगार होता. त्यांच्याकडे मोटार गाडी होती. घरात सर्व सुखसोयी होत्या. त्याचे नाव गोपालकृष्ण लाझमी.

त्यातच आत्माराम देखील त्यांच्या कॉलेज मधील एका मैत्रिणीशी लग्न करणार असा हट्ट धरून बसला होता. त्या मुलीला आई नव्हती. ती चांगले नृत्य करत असे. यामुळेच कि काय ती आत्मारामला नाचवत होती.

गुरुदत्त आणि गीता मध्ये थोडासा विसंवाद निर्माण झाला होता. अश्या परिस्थितीत मी काय करावे हे मला समजत नव्हते. त्यातच लग्नाची मुलगी घरात ठेवून मुलांचे लग्न करणे मला उचित वाटेना. ललिता कॉलेज मध्ये गेल्यावर तिला मुलांनी त्रास दिला, किंवा तिचा पाय घरासाला तर काय करायचे. असा सगळा विचार करून लालीतासाठी आलेल्या प्रस्तावाला मी होकार दिला. ललिताला थोडीशी नाराज दिसली. पण गुरुदत्तने तिची समजूत घारली आणि तिला पण राजी केले.

गोपालकृष्ण हे आत्मारामचे मित्र होते आणि ते त्याच्या वयाचाच होता. पण ते कधी घरी येत नसे. त्याची मामी ललितच्या शाळेत शिक्षिका होती. माझ्या आईच्या बाजूने सुद्धा आमचे जवळचे नाते होते. असे असले तरी घरी येणे जाणे नव्हते. त्याचे कारण आमची गरिबी, तसेच गुरुदत्तचे चित्रपट उद्योगात असणे. माझ्या नातेवाईकांना, एकूण आमच्या जातीच्या वर्तुळात गुरुदत्तने कुठलातरी अपराध केला आहे, काहीतरी हीन असे काम करतो अशी भावना होती. असे असले तरी हे स्थळ त्यांच्याकडूनच आले आणि आम्ही देखील होकार भरला. आमच्या कडून हे पहिले लग्नकार्य असल्यामुळे, गुरुदत्तला खूप धुमधडाक्यात करायचे होते. हजारो रुपये खर्च करून त्याने कार्यक्रम केला. गोपालकृष्ण अतिशय चांगले होते, सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचे, सर्वांना ते आवडायचे. वयाच्या सातव्या वर्षीच त्याचे वडील गेले होते, त्यानंतर तो आपल्या आजी-आजोबांकडेच मामाच्या आश्रयाने वाढला. तेराव्या वर्षीच जहाजावर काम करायला गेला. तेथे त्याचे शिक्षण आणि काम दोन्ही चालू होते. कष्ट करून त्याने आपल्या योग्यतेच्या जोरावर वयाच्या चोविसाव्या वर्षी कप्तान झाला. स्वतःचे घर घेण्याच्या खटपटीत तो होता. त्यातच त्याचे ललिताबरोबर त्याचे लग्न जुळले. १९५२ मध्ये मी खार येथील घरी राहायला गेलो. माटुंगाच्या घरी माझे यजमान आणि आत्माराम राहत होते. सकाळ संध्याकाळ त्यांना खार येथून जेवणाचे डबे पाठवायची व्यवस्था केली होती. त्यांना सुट्टी असताना ते खार येथील घरी येत असत. आत्माराम त्याच्या बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढे एम. ए करण्यासाठी त्याने पैसे जमवले होते. गुरुदत्तचा एक चित्रपट त्याच वेळी सुरु झाला होता. त्यासाठी काम करत होता.

ललिताचे लग्न अतिशय थाटामाटात झाले. तेव्हा गुरुदत्तची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. पण त्यासाठी लग्न पुढे ढकलावे असे त्याला वाटत नव्हते. त्याने इकडून तिकडून पैसा उभा केला. शेवटी १९५१ च्या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तिचे लग्न झाले एकदाचे.

मी खार येथे त्याच्या घरी राहायला आल्यापासून तो माझ्या पासून दूर होत गेला. सदा सर्वदा गीताच्या घरी असे. रात्री मात्र घरी येत असे. त्यांच्यात वादविवाद होत असत, त्यामुळे ती कधीतरी काही न सांगता परस्पर दुसऱ्या गावी कोणाकडे तरी निघून जात असे. नंतर गुरुदत्तच तिचा माग काढत, तिची समजूत काढून तिला परत घरी घेऊन येत असे. असेच एके वेळी तर ती चार दिवस गायब झाली होती, कुठे गेली होती, समजले नव्हते. आम्ही सगळे काळजीत होतो, भयभीत झालो होतो. तिचे समाजात नाव असल्यामुळे, ह्या विषयी बाहेर बोलता हि येत, नव्हते, बाहेरच्या न कळले तर किती अपमानाची परिस्थिती आली असती. चित्रपट सृष्टीत तर अशा गोष्टी पसरल्या तर अफवांना नुसता ऊत येत. त्यामुळे मुग गिळून चूप बसावे लागत असे. गीता परत आल्यावर दोघेही काही न झाल्यासारखे वागत असत. गुरुदत्त मला देखील बजावत असे कि झाल्या प्रसंगाबद्दल तिला काही विचारू नये असे.

जाल चित्रपटाच्या यशांतर गुरुदत्तने गीताबालीच्या बहिण हरिदर्शन हिच्या H G Films तर्फे बाज हा चित्रपट करायला घेतला. त्यावेळी गोवा प्रदेश हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. त्या संदर्भात, त्यांच्या राजवटीत होत असलेले अत्याचार, बलात्कार या विषयी त्याची कथा होती. पण जाल, बाजी या चित्रपटांइतका हा चालला नाही. चित्रपटाच्या नायकाने निर्मात्यांना खूप त्रास दिला असल्या कारणाने गुरुदत्तने स्वतःच भूमिका करावी असा निर्णय केला. स्वभावाने तो सुरुवातीपासून अंतर्मुखी, बुजरा होता. पण त्याने नेटाने काम केले. ह्या चित्रपटानंतर त्याला अभिनयाविषयी विश्वास आला. नंतरच्या सर्व चित्रपट त्याने नायक म्हणून अभिनयाचे देखील काम केले.

(क्रमशः)

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#३

मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तच्या त्याच्या आईने, वासंती पदुकोण, यांनी लिहिलेले कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याची क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर जमेल तसे करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू आत्माराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध केला होता (माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१) आणि लगेचच दुसरा भागही सदर केला होता(भाग#२).

आज तिसरा भाग देत आहे. मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#३

लहानग्या गुरुदत्तला त्या सगळ्या मुलांना सोडून जावेसे वाटत नसावे. पण रेल्वेचा प्रवास असेल किंवा त्या घरातून बाहेर पडलो असेल ह्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर तरी उत्साह होता. रेल्वे निघाल्यावर त्याने मुलांना हात हलवून ‘बाय बाय’ केले. काळा सारखी जशी जशी रेल्वे पुढे जात होती, तसे तसे त्या मुलांचे चेहरे धूसर होत गेले. गुरुदत्त थोड्याच वेळात झोपी गेला. दीड दिवसाच्या रेल्वे प्रवासानंतर आम्ही कलकत्त्याला पोहोचलो. गुरुदत्तला मागील कलकत्ता भेटीची आठवण असावी असे वाटले. तो कलकत्त्याला पोहोचल्या पोहोचल्या त्याच्या त्यावेळच्या बंगाली मित्रांकडे गेला. यजमानांना देखील छोटीशी नोकरी मिळाली. दीड महिन्यात मला दुसरा मुलगा झाला. गुरुदत्तच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाळाला सोडून एक क्षण देखील जात नसे. त्याने खेळणे देखील सोडून दिले. पाळण्याला झोके देणे, बाळ रडले तर त्याला टाळ्या वाजवून शांत करणे हे त्याचे काम झाले होते. बाळाला पाहून त्याला ते एखादे बाहुले आहे कि काय असे वाटत असावे. बाळाला तीन एक महिने झाल्यावर जवळच एक खोली भाड्याने आम्ही घेतली. जवळच एक मोठेसे मैदान देखील होते. संध्याकाळी तेथे एक जण काही बंगाली मुलांना घेऊन येऊन त्यांना विविध खेळ शिकवत असे. तसेच टागोरांची प्रार्थना-गीत शिकवत असे. माझ्या मावशीचा मुलगा देखील जवळच राहत असे. त्यांची मुले आणि गुरुदत्त हि सर्व मुले त्या मैदानात जात, आणि इतर मुलांसोबत खेळत. तेथे शिकलेली गाणी गुरुदत्त घरी येऊन माझ्यासमोर येऊन म्हणत असे. तो साधारण चार वर्षांचा असावा. त्याला शाळेत घालायचे होते. त्याच्या वडिलांना बंगाली भाषेबद्दल तिरस्कार होता. गुरुदत्तला बंगाली शाळेत पाठवू नये असा त्यांचा हट्ट होता. त्यामुळे जवळ असलेल्या एका नगरपालिकेच्या शाळेत त्याचे नाव घातले. त्या शाळेतील शिक्षकांची वागणूक, विद्यार्थ्यांना मारपीट हे सर्व पाहून गुरुदत्त मनातून बिचकला. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर त्याचा चेहरा पडलेला असायचा, ते पाहून माझ्या पोटात कालवाकालव होत असे. गुरुदत्तचा शाळेत जायचा उत्सव काही दिवसातच मावळला.

ह्या दरम्यान माझा दुसरा मुलगा शशिधर आजारपणामुळे, तीन दिवस अस्वस्थ होता, त्यातच तो गेला. गुरुदत्तला अतोनात दुःख झाले. त्याला ज्वर चढला. मी घाबरले. भावाच्या घरी जावे तर येऊ देईना. कलकत्त्याजवळ पद्दपुकुर गावाच्या रस्त्यावर अजून एकजण नातेवाईक राहत असत, त्यांच्या कडे गेलो. तिथे गेल्या वर गुरुदत्तला बरे वाटू लागले. नवीनच सुरु झालेल्या मद्रासी शाळेत त्याला पाठवयला लागले. फक्त पाच मुलांना घेऊन सुरु झालेली ती शाळा राष्ट्रीय पातळी वरील शाळा झाली. वर्षभरात जन्माला आलेला आत्माराम आणि गुरुदत्त त्याच शाळेत शिकले. जीवनातील शांती गेली होती, ती हळू हळू पूर्ववत येऊ लागली. गुरुदत्त त्याच्या भावासोबत दिवसभर राहू लागला. त्याला लहानपणापासूनच लाल रंगाचे आकर्षण. एके दिवशी मी स्वयंपाक संपवून स्टोव्ह बंद करून बाळाजवळ गेले. गुरुदत्त कुठून तरी धावत आला, आणि त्या गरम स्टोव्हला हात लावला. आणि चटका लागून जोरात ओरडला. जवळ जाऊन पाहते तर त्याची बोटं भाजलेली होती. डोळ्यातून पाणी येत होते, पण तोंडातून आवाज नव्हता. त्याची ती सहनशीलता त्याच्या वयपरत्वे अधिकच होती असे आता वाटते.

एप्रिल मे महिन्यात बंगाली लोकांचा ‘पोयला बैशाख’ हा उत्सव असतो, तो आमच्या घराजवळ साजरा होई. त्या ठिकाणी जत्रेसारखे स्वरूप येई. गावागावातून विविध रंगांच्या बाहुल्या विकायला येत, विविध प्रकारची खेळणी देखील येत. आठवडाभर हा उत्सव चाले. तो पाहायला पंचक्रोशी मधून लोकं येत. त्यांच्या रात्रीभर मनोरंजनाचे कार्यक्रम देखील होत असत. नाटक, गाणी, संगीत, नृत्य आदींचे कार्यक्रम आयोजित केले जात. गुरुदत्त देखिल शेजाऱ्यांबरोबर तेथे जात असे. त्याला भाषेचा विशेष अडसर नसे. हिंदी, बंगाली तो चांगली बोलत असे. तमिळ देखील त्याला थोडेसे येत असे. त्याला तेहील प्रत्येक गोष्टीत रुची होती. रात्री जे जे पहिले ते सारे तो मला दुसऱ्यादिवशी कथन करे.

गुरुदत्त सहा वर्षांचा झाला तेव्हा आम्ही सध्या राहत असलेले घर सोडून, जवळच त्याच रस्त्यावरील दुसऱ्या एका घरी राहायला गेलो. दोन खोल्यांचे स्वतंत्र असे ते घर होते. असे घर आम्हाला पहिल्यांदाच मिळाले होते. आमच्या शेजारी आमच्या दूरच्या नात्यातील एकजण राहत होते. मुलांना खेळण्यासाठी अंगण होते. गुरुदत्तने तेथे त्याच्या छोट्या बॅटने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आजूबाजूच्या मुलांना गोळा करून त्याने स्वतःचे एक टोळके तयार केले होते आणि खेळत असे. खेळ नसला कि माझ्याकडून तो पुस्तकातील गोष्टी ऐकत असे, नंतर तो स्वतः वाचत असे. उरलेल्या वेळात तो आत्माराम बरोबर खेळतच असे. आमच्या भागात कोणी एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे. ते प्रोफेसर होते. ते गुरुदत्त बरोबर भोवरे, गोट्या खेळायचे, त्याला थोडेफार गणित शिकवायचे. एकदा त्यांना सुट्टी असताना, दार्जीलिंगला त्यांच्याबरोबर गुरुदत्तला घेऊन जाईन असे म्हणाले. माझी आणि आणि यजमान नको म्हणाले. त्यांच्या बरोबर गप्पा मारायला गुरुदत्तला आवडे. ते दोघे काय असे बोलत असत, देवालाच माहित.

गुरुदत्त काही बाबतीत खूप आग्रही होता. त्याच्या मना सारखेच झाले पाहिजे. शाळेतील अभ्यासाकडे, लिहिण्या-वाचण्याकडे त्याचे विशेष लक्ष नसे. पण कथा, गोष्टींची पुस्तके खूप वाचे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करे, सांगितलेले ऐकत नसे, त्यामुळे कधी कधी माझ्या कडून त्याला मार बसे.

त्या घरात आम्ही पाच वर्षे राहिलो. लहानपणापासूनच त्याला बंगाली लोकनाट्य पाहायला आवडे. घराजवळ असलेल्या मैदानात अशी लोकनाट्ये रात्रभर होत असत. रामायण, महाभारत, राजा हरिश्चंद्र या सारख्या पौराणिक कथेवर रचलेली नाटके तेथे होत असत. पुरुषच स्त्री पात्रे करत असत. गुरुदत्त त्याच्या मित्रांना घेऊन रात्रभर ती नाटके पाहत असे. दिवसभर भावासमोर पाहून आलेल्या नाटकातील प्रसंग अभिनय करून दाखवत असे. आत्माराम देखील त्याचा तो आवेश पाहून हसत असे. गुरुदत्तचा आवाज विशेष चांगला नव्हता. तरीसुद्धा तो गाणी म्हणण्याचे थांबवत नसे. त्याचे गाणे ऐकून आत्माराम टाळ्या पिटत हसत गोधंळ घालत असे. आमची आर्थिक परिस्थिती तर कायमच ठीक नसे. असलेल्या पैश्यातून थोडे बाजूला ठेऊन गुरुदत्त साठी जुनी पुस्तके आणून देत असू, तेव्हा गुरुदत्त खुश होत असे. ती तो त्याच्या मित्रांना अभिमानाने दाखवत असे. आत्माराम सुद्धा चार वर्षे झाल्यावर त्याला शाळेत दाखल केले. गुरुदत्त आणि तो एकमेकांचे हात धरून शाळेत जात तेव्हा राम-लक्ष्मण यांची जोडी डोळ्यांसमोर येई. त्याच सुमारास आमची मुलगी ललिता हिचा जन्म झाला. गुरुदत्त त्याच्या भावाचा म्हणजे आत्मारामचा सांभाळ करत असे. मी हॉस्पिटल मधून आल्यावर दोघांना किती आनंद झाला! ती दोघे एकमेकांना सोडून राहत नसत. हि मुलगी मात्र ‘रोती सुरत’ होती, कायम रडत असे. प्रकृतीने अतिशय अशक्त देखील होती. गुरुदत्त त्याच्या परीने तिला शांत करत असे.

ह्या दरम्यान माझ्या भावाला बर्मा मध्ये देशात जावे लागले. त्यामुळे त्यांच्या घरी आम्ही राहायला गेलो. तेथे जवळच कालीमातेचे मंदिर होते. नवरात्रीच्या वेळेस तेथे मोठा उत्सव होत असे. दुर्गाष्टमीचा दिवस तर विशेष असे. नाटके, गाणी-बजावणी, नाचगाणी होत असत. गुरुदत्त ते सर्व तहानभूक, झोप विसरून पाहायला जात असे. सकाळी संध्याकाळी पूजेसाठी हजर असे. नमस्कार करत असे, जवळ असलेले पैसे तो तेथील भिक्षुकांना वाटत असे. पैसे नसतील तर जवळ काही खायला असेल तर ते देऊन टाकत असे. घरासमोरील मैदानात मुलं मुलं खेळत असताना काहीतरी भांडण तंटा झाला, मारामारी झाली तरी घरी काही सांगत नसे.

त्या वेळेस गावाकडून कामासाठी आलेल्या एकाला आमच्या घरी कामाला ठेऊन घेतले. दुर्दैवाने तो एका आठवड्यातच आजारी पडला. हि सगळी मुले त्याची सुश्रुषा त्यावेळी करत असत. त्याचे दावा-पाणी, पथ्य वगैरे गुरुदत्त पाहत असे. चौथ्या दिवशी माझा चित्रकार असलेला भाऊ आला. भावाने त्याला पहिले. त्याच्या अंगावर कांजिण्या उठल्या होत्या. मुले त्याच्या जवळ जातात म्हणून तो मला रागावला. त्याची हॉस्पिटल मध्ये रवानगी करायची व्यवस्था त्याने केली. नंतर काही दिवसांनी तो हॉस्पिटल मधून पळून गेला अशी बातमी आली, तर काही लोकं म्हणत कि तो मरण पावला आहे. अजूनही त्याचे काय झाले हे समजले नाही.

१९२४ मध्ये बिहार मध्ये आणि कलकत्त्यात देखील भयंकर भूकंप झाला. बिहार मध्ये हजारो लोकं मृत्यूमुखी पडले. घरं पडल्यामुळे कित्येक लोकं बेघर झाले. कलकत्त्यात देखील भूकंपाचे लहान लहान धक्के आम्हाला जाणवेल. पण विशेष हानी झाली नाही, असे असले तरी गरीब लोकांच्या झोपड्या वगैरे पडल्या, काहींनी प्राण देखील गमावले. मुले मैदानात खेळत असताना तेथे असलेली एक मोठी भिंत पडली होती. नशिबाने कोणाला काही झाले नाही. त्यांच्या कडे जावे तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे उभे राहता, चालता अशक्य झाले होते. काही वेळाने भूकंप थांबल्यावर सगळी मुले आपल्पल्या घरी गेली. रात्री सगळे घाबरले होते, परत भूकंप होतो कि काय, छप्पर पडते कि काय अशी भीती. देवाच्या दयेने तसे काही झाले नाही.

बर्मा देशातून मधून माझा भाऊ परत कलकत्त्याला आला. आम्हाला परत दुसऱ्या घरी जावे लागले. नवीन घर जरा लांब असल्या कारणाने मुलांना शाळेत बसने जावे लागत असे. ह्या घरात खोल्या वेगवेगळ्या ठिकाणी होत्या, स्वयंपाकघर एकीकडे तर न्हाणीघर दुसरीकडे, आणि झोपण्याची खोली तिसरीकडे. त्यामुळे घरात फेऱ्या मारून दिवसभर मी दमत असे.

ललितेला तीन वर्षे पूर्ण झाली होती. लहानपणापासूनच ती हट्टी. त्यामुळे ती माझ्याकडून सारखा मार खाई. माझी आई भावाकडे त्याला मुलगा झाल्या कारणाने गेली होती. मला तीन तीन मुलांचे करणे, घरातील कामे, यजमानांचे करणे, मुलांच्या खोड्या, मस्ती हे सगळे सांभाळता सांभाळता नाकी नऊ येत होते. गुरुदत्तची त्याच सुमारास शाळेतील वेंकट नावाच्या मुलाशी मैत्री झाली होती. त्यामुळे परत तो घरी वेळेवर घरी येत नसे. शाळेत देखील जात नाही असे कानावर आले होते. इतका हुशार मुलगा कुसंगतीमुळे वाया जाऊ नये अशी मला कायम काळजी वाटत असे. त्यामुळे मला संशय आला. आणखीन एका घटनेने माझा संशय आणखीन बळावला. अनेक वेळेस घरात एके ठिकाणी ठेवलेले पैसे गायब होऊ लागले होते. एके दिवशी ह्याच्या खिशातून दहा रुपये घेताना माझ्या दृष्टीस पडले. त्या दिवशी मी त्याला जेवढे मारले तेवढे कधीही मारले नव्हते. गुरुदत्तचे मन हळवे झाले. त्याला त्याची चूक उमगली, त्याने क्षमा मागितली, आणि पुढे असे करणार नाही असे वचन देखील दिले. वेंकट बरोबरची मैत्री त्या दिवशी पासून तुटली. त्या तसेच तो पुढे कधीही खोटे बोलला नाही, दुसऱ्यांनी खोटे बोलले त्याने खपवून घेतले नाही. गुरुदत्त परत जसा होता तसा झाला.

मला चार महिन्यांचा गर्भ राहून तो पडून गेला. त्यामुळे मी अशक्त झाले होते. न्हाणीघरात गरम पाणी नेत असताना मी पाय घसरून पडले आणि मला मुका मार लागला. तसेच पोटावर गरम पाणी देखील पडले. औषध चालू होते तरी पण मी एकूणच संसाराला वैतागले होते. ह्यातून मी बरी झाले तर ठीक असे वाटत होते. गुरुदत्त वर सगळा भर पडला होता. माझी आई सकाळी येऊन स्वयंपाक करून जात असे. बाकी सगळे गुरुदत्तच करत असे दिवसभर, इतर मुलांना सांभाळायचा देखील. डॉक्टरांनी सहा महिन्यांची सक्तीची विश्रांती सांगितली होती, त्यामुळे परत निरुपायानेअहमदाबादेचा आश्रय घ्यावा लागला. घरी सगळ्या तऱ्हेच्या सोयी होत्या. त्यांना दोन मुले होती. एक मुलगा आणि दुसरी मुलगी, जी आत्मारामच्या वयाची होती. मुलगा ललिताच्या वयाचा होता. गुरुदत्त तेच दहा वर्षांचा होता. त्या वयात मुलांना कुतूहल जास्ती असते. माझ्या सासऱ्यांना विचारून तो त्यांच्या बरोबर कापडाच्या गिरीणीत जात असे. तेथे सुतकताई कसे करतात, त्याला रंग कसा देतात हे सर्व तो पाहत असे. सासरे मोटार गाडी चालवत असताना त्यांच्या शेजारी बसून हजार प्रश्न विचारी. मोटार गाडी चालवताना लक्षपूर्वक पाहत असे.
त्याकाळी कामगारांची युनियन असे काही नव्हती. त्यांची पिळवणूक होत असे. काही चूक झाली की सासरे सोट्याने मारत असत. गुरुदत्तला हे बघवत असे. पण हे असे का असे विचारायचे धैर्य त्याच्या जवळ नव्हते. आम्ही तिथे २-३ महिने राहिलो आणि माझ्या भावाला नकोसे वाटू लागले.

भावाने एकदा विचारले कि मी काही काम का करत नाही ते. त्यावेळी मी वर्तमान पत्रातून, मासिकातून लिहित असे. माझे स्वतःचे, तसेच यजमान देखील लिहून देत ते देखील मी माझ्या नावावर देत असे. त्याने ते बोलून दाखवले. माझ्या मनाला ते लागले. त्यामुळे मी मनाचा हिय्या करून पंधरा दिवसांत हिंदी भाषेत स्वतः चित्रपटाची कथा लिहिली, तिचे नाव ‘जवानी के जुर्म’. मला चित्रपट व्यवसायाबद्दल काही माहिती नव्हते. काही दिवसातच मुंबईला आल्यावर एका ओळखीने रणजीत स्टुडीओ मध्ये गेले आणि चंदुलाल शहा, चतुर्भुज दास यांना भेटले. त्यांना मी माझी चित्रपट कथा दाखवली. त्यांना ती आवडली आणि ती ठेवून घेतली. त्यावेळी मिस गोहर ही अभिनेत्री प्रसिद्ध होती. काही कारणाने चित्रपट सृष्टीत पाउल ठेवणारी मी पहिली असेन. काही वेळी शुटींग पाहायला गेले असता गुरुदत्तला बरोबर घेऊन गेले होते. तो सर्वांना आवडला होता. पुढी त्याच्या जीवन-कार्यासाठी हिच नांदी ठरली. मुंबई मध्ये त्या वेळी असताना श्रीमती हिराबाई बडोदेकर, श्री अब्दुल करीम खान यांच्या संगीत मैफिलीला जाण्याचे सौभाग्य मला आणि गुरुदत्तला मिळाले होते. गुरुदत्त तर तीन तीन तास तल्लीन होऊन तो त्यांचे गाणे ऐकत असे! त्याला कंटाळा येत असे.

त्याच सुमारास मुंबईत प्रसिद्ध नर्तक उदयशंकर यांचा दौरा होता. त्यांच्या कार्यक्रमाचे कोणी एका ओळखीच्या माणसाने दोन प्रवेशपत्र आणून दिले. गुरुदत्तला माझ्या बरोबर यायचे होते, पण त्याला जमले नाही. किती सुंदर कार्यक्रम होता तो! ह्या जन्मात मी काही ते विसरणार नाही. त्यांचे ‘शिव-पार्वती’ हे नृत्य पाहताना साक्षात शिव-पार्वती कैलास येथून अवतरले आहेत कि काय असे वाटले. पुरातन वाद्ये, पौराणिक वेश-भूषा परिधान केलेले वेगवेगळी पात्रे, आणि साऱ्या रंगमंचावर त्यांचा वावर, त्यामुळे डोळे एका ठिकाणी ठहरत नव्हते. तो कार्यक्रम पाहून मी धन्य झाले. मुंबईला आले त्याचे सार्थक झाले असे वाटले. परत घरी आले आणि माझ्या आनंदावर विरजण पडले. गुरुदत्त त्याला घेऊन गेले नाही म्हणून रुसला होता, रडून झाले होते, जेवला देखील नव्हता. त्याची समजूत काढे पर्यंत माझा जीव गेला. पुढचे तीन दिवस त्याच्या मनात रुतून बसले होते. तो मला म्हणे, ‘आई, मी उदयशंकर यांच्या सारखे रंगभूमी वर नक्की येईन. तू पहाच.’ मुलांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देते का? मी हसले होते त्यावेळेस. पण एकदा त्याच्या मानाने घेतले कि तो ते करणारच हे देखील पुर्वानुभावावरून मला माहिती होते.

आम्ही सगळे कलकत्त्याला परत गेलो. मी काहीतरी काम करून पैसे कमावले पाहिजेत असे वाटत होते, तर गुरुदत्तला उदयशंकर यांच्या सारखे व्हायचे होते. माझा चित्रकार भाऊ जाहिरातीचे काम करत असे त्यामुळे त्याची उदयशंकर यांच्याशी चांगलीच ओळख होती. गुरुदत्त माझ्या भावाचे प्रवेशपत्र घेऊन अनेक वेळाला उदयशंकर यांच्या कार्यक्रमाला जाई, त्यांच्या नृत्यसंचातील अनेकांच्या ओळखी त्याने करून घेतल्याचे मला कितीतरी नंतर समजले. मुलांना चित्रपट पाहायला घेऊन जाण्याचा तो काळ नव्हता तरी, तो भावाबरोबर अनेक उत्तमोत्तम इंग्रजी चित्रपट पाहायला जाई. माझ्या पासून तो काही लपवत नसला तरी, तो नृत्य शिकतो आहे हे त्याने गुप्त ठेवले होते. आम्हा सर्वाना आश्चर्यचकित करायची त्यांची इच्छा होती.

मी ‘भोला-मेन्शन’ मध्ये राहायला आले, तेव्हा दोन गुजराती महिलांना इंग्रजी शिकवायला सुरु केले. दहा रुपये देत. पहिल्यांदा मला दहा रुपये मिळाल्यावर मला इतका आनंद झाला काय सांगू! केवढा आत्मविश्वास, धैर्य माझ्या मनात गोळा झाले त्यामुळे. नव्यानेच सुरु झालेले शिवमंगल प्रतिष्ठान च्या हॉस्पिटलच्या नर्सना मी इंग्रजी शिकण्यासाठी मदत करत असे. औषधांची नावे, शस्त्रक्रियेच्या अवजारांची नावे मी त्यांना सांगत असे. श्रीमती सरस्वती पालेकर नावाच्या कोणी श्री रामकृष्ण मठाच्या शिष्या होत्या. ती घरोघरी जाऊन रुग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल करत असे. ह्याच हॉस्पिटल मध्ये माझ्या एका मुलाचा जन्म झाला होता. श्रीमती सरस्वती यांना काही जणींना एल सी पी एस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पाठवावे असे वाटले. त्यावेळी मात्रिक झालेल्या लोकांना देखील तो कोर्स करता येई. माझी पण त्यांनी निवड केली. आणि आम्ही पाच जण होतो. सुरुवातीला त्या आम्हाला दहा रुपये शिष्यवृत्ती म्हणून देत असत. सहा महिने मी घरच्यांचा रोष पत्करला. घरातील काम, माझ्या शिकवण्या सांभाळून मी तो वैद्यकीय अभ्यासक्रम पुरा केला. डॉक्टर पाल म्हणून कोणी होते ते आम्हाला फिजीओलॉजी, बायोलॉजी शिकवत असत. मी पदवी मिळवून, डॉक्टर होऊन लोकांची सेवा करत, परोपकार करायचे असे शेख मुहम्मदी स्वप्न पाहत होते. असे असले तरी देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. आम्हाला मिळणारी शिष्यवृत्ती थांबली. त्याच्या शिवाय मला शिक्षण सुरु ठेवण्यासाठी अर्थसहाय्य नव्हते. त्यातच मला दिवस गेलेले. माझी डॉक्टरकी तेथेच थांबली. माझ्याबरोबरील इतर लोकं होती त्यांनी चारही वर्षे शिकून संपवली.त्यातील एकीने, इंदिरा तिचे नाव, तिने प्रसूतीगृह सुद्धा सुरु केले. तिथेच माझा शेवटला मुलगा जन्माला आला. गुरुदत्त त्या वर्षी शालेय परीक्षेत नापास झाला. शाळेतील अभ्यासक्रमाची पुस्तके तो वाचत नसे. कादंबऱ्या, नाटके, काव्ये, आणून तो वाचत बसे. तो नापास होण्यास मीच कारणीभूत आहे असे माझ्या आईने मला सुनावले. त्या वेळेस मी matric च्या परीक्षेसाठी बाहेरून बसावे असे ठरवले. मी बाळंत होई पर्यंत शिकवण्या करत, तसेच परीक्षेचा अभ्यास करत बसे. बनारस मधील काशी विश्वविद्यालय मध्ये त्या वेळी बाहेरून matric परीक्षेसाठी बसता येत असे. तेथे संगीत हा विषय घेऊन पदवी पर्यंत शिकता येते हे समजले, तेव्हा मी संगीत देखील शिकू लागले. पुरोहित नावाचे एक संगीत शिक्षक होते, त्यांच्या कडे तीन महिने शिकले. ते शिकवताना आत्माराम जवळ असे. त्यांचे तबला वादन तो लक्षपूर्वक ऐकत असे. तो कधी कधी गुरुजी नसायचे तेव्हा साथ देत असे. मला परीक्षेला बसायला बनारस येथे जायचे होते, पण ह्यांनी मनाई केली, त्यामुळे ते प्रकरण तेथेच मिटले.

१९३४ मध्ये मला अजून एक मुलगा झाला. त्यावेळेस कलकत्त्यात blackout चा सराव करत असत. युरोपात युद्ध सुरु होते. आपल देश ब्रिटीशांच्या हातात होता, त्यामुळे आपल्याला युद्धाची झळ लागेल असे लोकं म्हणत. गुरुदत्त त्यावर्षी शाळेत परीक्षेत पास झाला. तरीसुद्धा माझे कुटुंबीय म्हणत, ‘त्याला सगळ्यात रुची असते. पण तो कुठल्याच विषयात पुढे जाणार नाही. ह्या मुलाला पोट भरण्यासाठी काही विद्या शिकणार नाही. दुसरेच प्रयोजन नसलेले उद्योग करणार हा’ आणि निरुत्साही करत. कोणी काही म्हटले तरी माझा गुरुदत्तवरील विश्वास काही कमी झाला नाही. तो सुद्धा माझा विश्वास कमी होणार नाही असे वागत होता. त्याला एकाएकी अंगावर कांजिण्या उठल्या आणि तीन महिने तो त्यातून बरा झाला नाही. शाळेत जाऊ शकला नाही, पण शाळेतील मित्रांकडून अभ्यास समजावून घेऊन तो परीक्षा उत्तीर्ण झाला.

मला माझ्या एका बंगाली मैत्रिणीकडून समजले कि कलकत्ता विश्वविद्यालय देखील बाहेरून matric परीक्षेसाठी परवानगी देते. ह्या मैत्रिणीने मला अनेक प्रकारे सहाय्य केले होते. १९४१ मध्ये मी परीक्षेला बसले, आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मनात राहिलेली माझी कित्येक वर्षांची आकांक्षा आज पूर्ण झाली होती.

१९४१ मध्ये गुरुदत्त देखील matric परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचे वय त्यावेळेस पंधरा वर्षांचे होते. परीक्षा संपल्यावर टायपिंगच्या क्लासला जावे असे मी सुचवले. त्याने ते मनावर घेतले नाही. ह्याच दरम्यान त्याने रंगभूमीवर अनेक नृत्य सदर करून पदकं देखील मिळविली होती. तो करत असलेल्या नृत्यांपैकी स्नेक-चार्मर हे नृत्य खूप मनमोहक असे. त्याच्या बरोबर एक शिख मुलगी देखील नाचत असे. तिचे नाव अमरजित. ती मुलगी वारंवार घरी येऊ लागली. मला हे पटत नव्हते. तेवढ्यात त्याच मुलीने, आई-वडिलांच्या धाकाने, नृत्य थांबवले.

गुरुदत्तच्या मनाला दुःख झाले असणार. त्याच सुमारास त्याला महिना चाळीस रुपयांची नोकरी लागली. पहिला पगार त्याने घरातील सर्वाना भेटवस्तू आणून खर्च केला. त्याच्या गुरुजीना भगवत गीता आणून दिली. पुढच्या पगारात त्याने दहा रुपयात एक सायकल घेतली. ती नवीन सायकल अधून मधून स्वच्छ करण्यात तो वेळ घालवू लागला, बहिणीला त्यावर बसवून फिरवून आणत असे. त्या वेळेला हिटलरने झेकोस्लोव्हेकिया वर विजय मिळवला होता. त्यामुळे सगळीकडे ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ असे बोर्ड लागले होते. त्याच सुमारास माझा धाकटा मुलगा झाला होता, त्याला गुरुदत्तने त्यामुळे विजय हे नाव दिले. काही दिवसात दुसऱ्या महायुद्धामुळे परिस्थिती गंभीर झाली. बर्मा देशावर जपानी सैन्याने बॉम्ब टाकले. कलकत्त्यातील जनता घाबरून घर, गाव सोडून जात होती. सगळे गोंधळून गेले होते. असेही कानावर येत होते कि शत्रू पिण्याचे पाणी देखील दुषित करू शकतात. मारवाडी लोकं त्यांचे गाठोडे(पैसा-अडका) बांधून घेऊन गावी जात होते. आम्ही कुठेही जायचे नाही असे ठरवले होते. पण मुले सगळी लहानही होती. त्यांना घेऊन ह्या धामधुमीत कसे इथे राहायचे? शेवटी कामबंगडी येथे जायचे ठरवले. तेथे माझे रामदास नावाचे एक दीर राहत होते. त्यांचा तेथे एक आश्रम होता. माझी त्यांच्यावर श्रद्धा होती. माझ्या एका मुलाला आत्माराम हे नाव त्यांनीच दिले. आमचे सहा जणांचे कुटुंब होते, दानधर्मावर चालणाऱ्या त्या आश्रमात आम्ही गेलो होतो. त्यावेळी आमची परिस्थिती देखील ठीक नव्हती. मी सौदामिनी मेहता नावाच्या एका समाज-सेविकेच्या शाळेत महिना तीस रुपयावर नोकरी करत होते. ती सोडली आणि देवावर भरवसा ठेवून आम्ही कलकत्ता सोडण्याचा निर्णय घेतला. गुरुदत्तने मात्र कलकत्ता सोडून न जाण्यावर हट्ट धरून बसला होता. माझ्या यजमानांचे कार्यालय मुंबईला जाणार अशी आवई उठली होती. त्या दोघांना तिथेच कलकत्त्याला सोडून, बाकीचे आम्ही निघालो. केवढा गोंधळ त्यावेळेस! रेल्वेत ही मुंग्यांसारखी गर्दी. अशा स्थितीमध्ये मी दोन रात्री आणि एक दिवस रेल्वेने प्रवास करून मद्रासला पोहोचेपर्यंत जिवंत राहू कि नाही असे आम्हाला वाटत होते. एका पायावर उभी राहून हटयोग्याप्रमाणे तपश्चर्या करून प्रवास केला. मद्रासला पोहोचल्यावर मग काय करायचे? सगळीकडे खंदक खोदले गेले होते. ब्रिटीश सैनिक ट्रक मधून ये जा करत होते. खांद्यांवर बंदुका ठेऊन बुटांचा आवाज करत फिरणाऱ्या ब्रिटीश सैनिकांना पाहून धडकी भरत होती. अश्या ठिकाणी येऊन मला रात्रीचा मुक्काम करावा लागला. Air Raid च्या चेतवण्या ऐकून छाती दडपून जायची. कामबंगडी येथेच राहिलो असतो तर बरे झाले असते का एक मनात विचार, तर कलकत्त्यात गुरुदत्त आणि यजमान जसे राहत आहेत हा दुसरीकडे विचार मनात येत होता.

माझ्या यजमानांचे बर्माशेल कंपनीचे कार्यालय मुंबईला हलवले गेले, त्यामुळे ते मुंबईस आले. गुरुदत्तला उदयशंकर यांच्या अल्मोडा केंद्राकडून नृत्य शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. तो अल्मोडा येथे निघून गेला. काही दिवसांत अशी बातमी आली कि आम्ही राहत असलेल्या इमारती वर बॉम्ब पडून ते बेचिराख झाले. त्यावेळी माझा चित्रकार भाऊ कलकत्त्यामध्येच राहत असे.

आश्रमात आमचे झालेले स्वागत मी कधीही विसरणार नाही. मुंबईमधील अनेक श्रीमंत दानशूर व्यक्ती आश्रमाला पैसे दान देत असत. आम्ही गरीब होतो, पैसे नसत जवळ. असे असले तरी माझ्या कडे येत असलेल्या पैश्यांपैकी काही मी आश्रमात माताजी(कृष्णाबाई) यांना देत असे. रामदास यांच्या पत्रांचे भाषांतर करत असे, आश्रमातील मुलीना शिकवत असे, आणि इतर काही कामे मी आश्रमात करत असे. रामदास यांना लहान मुले आवडत असत. माझ्या सात महिन्यांच्या विजयला ते खेळवत. असे असले तरी आश्रमातील बाकीचे लोकं आमच्याकडे हीन दृष्टीने बघत असत. आश्रमात परमार्थसाधनेपेक्षा भौतिक विचार, लौकिक साधना अधिक चाले. एकमेकांकडे संशयाने पाहणे, नीट न वागवणे, गरीब-श्रीमंत असा भेदभाव करणे हे सर्व तेथे होत असे.

गुरुदत्तची पत्रे माझ्यापर्यंत पोहोचायला सात दिवस लागत. तो आठवड्यातून तीन पत्रे लिहित असे. ती देखील सविस्तरपणे. अल्मोडा येथील उदयशंकर यांच्या केंद्रात होत असणाऱ्या घडामोडी तो विस्ताराने कळवत असे. तो तेथे आनंदात आहे असे लिहित असे. तो तेथे सर्वात वयाने लहान होता, त्यामुळे सर्वजण त्याची काळजी घेत, असे त्याने लिहिले होते. उदयशंकर तर त्याला मुलासारखे वागवत असे त्याने लिहिले होते. केंद्रातील शिक्षक नावाजलेले कलाकार होते असेही त्याने लिहिले होते. कथकलीसाठी गुरु नम्बुद्रीपाद होते, तसेच मणिपुरी आणि भरतनाट्यम साठी देखील त्याकाळचे नावाजलेले कलाकार शिकवत होते. विविध वाद्य-वादन शिकवण्यासाठी अल्लाउद्दिन खान, अली अकबर, रविशंकर, अबनी भट्टाचार्य, श्री शांतीवर्धन या सारखे प्रसिद्ध कलाकार होते. श्री विष्णूदास शिराळी हे विविध प्रकारची जुने मृदंग वाजवायला शिकवत असत. उदयशंकर नाट्यशास्त्रातील त्यांना उपयोगी पडणारे भाग, आपला अनुभव जोडून ते शिकवत असत. ह्या सर्वाचा गुरुदत्तच्या मनावर चांगला परिणाम झाला असावा. तेह्तील शिस्त कडक होती, प्रत्येकाने आपला अभ्यास वेळच्या वेळेस करणे भाग होते, आपण आपले नाटकातील अभिनय सराव करणे, रंगभूषा, वेशभूषा करणे आवश्यक होते, तसेच रंगभूमी वरील प्रत्येक काम सगळ्यांनी करायचे असा नियम होता. त्यामुळे अल्मोडा हे सिद्धी प्राप्त कार्यासाठी प्रसिद्ध झाले होते. गुरुदत्त देखील आपल्या गुरूची एकाग्रतेने सेवा करत असे पत्रातून लिहिले होते. मनातील सर्व शंका तो विचारात असे. तो माझ्या जवळ नसला तरी, हे सर्व वाचून माझ्या मनात काही चिंता नव्हती. आम्हाला सोडून तिथे राहायचे म्हणजे त्याला सुरुवातीला कंटाळा आला असेल. त्याला नाच शिकायला पाठवल्याबद्दल सर्व जण मला दोष देत असत. कधी कधी मला सुद्धा ते सर्व ऐकून त्याच्या भविष्याबद्दल चिंता वाटत असे, नाही असे नाही. पण मनातून एक विश्वास देखील होता; शेवटी देवच्या मनात काय असेल ते होईल.

आश्रमातील माताजी यांच्या कडे बाहेरून आलेल्या काही मंडळीनी माझ्या बद्दल चुगल्या करायला सुरुवात केली, ‘हिला नवऱ्याकडे नांदायला जायचे नाही. मुलांना बरोबर घेऊन स्वतंत्र जीवन तिला जगायचे आहे, नोकरी करायची तिला खुमखुमी आहे.’ असे काहीबाही. जेणेकरून मी आश्रम सोडून जावे. एके दिवशी तीन वर्षांच्या देविदासला त्यांनी, काही मस्ती केली, खोड्या केल्या म्हणून, त्याला उन्हात एक तासभर उभे केले. ते सगळे असह्य होऊन मी तडकाफडकी आश्रम सोडून मुंबईला जावे; तिथे राहणे जमले नाही तर गांधीजींच्या वर्धा येथील आश्रमात जावे असा विचार करून, निघाले.

१९४२ च्या ९ ऑगस्ट रोजी आम्ही मंगळुरूला पोहोचलो; पण तसेच तेथून बसने निघालोही; कारण माझ्या आईला मी तिच्याकडे गेल्याचे आवडले नव्हते. मी आणि माझी चार मुले सगळे धैर्य एकवटून मुंबईला निघालो. रस्त्यात आम्हाला ९ ऑगस्टच्या चाले जाव (Do or Die) चळवळीच्या मोर्चा ठिकठिकाणी दिसला. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना कैद केले गेले होते. त्यामुळे सगळीकडे हरताळ सुरु होता. आमचा प्रवास त्यामुळे अडखळतच सुरु होता. पुण्याला आलो तेव्हा आमची गाडी चुकली होती, त्यामुळे एक रात्र तेथे एका नातेवाईकांकडे काढावी लागली. मुंबईला पोहोचली तेव्हा शहरात युद्धामुळे अनेक लोकं घरदार सोडून गेले होते. मुंबईत ऑस्ट्रेलियाचे सैनिक नागरिकांना धमकावत, त्रास देत फिरत असत. आम्ही माटुंगा येथे माझ्या वाहिनीच्या मुलाकडे मुक्काम केला.

(क्रमशः)

माझा पुत्र गुरुदत्त: भाग#२

मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तच्या त्याच्या आईने, वासंती पदुकोण, यांनी लिहिलेले कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याची क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर जमेल तसे करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू आत्माराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध केला होता (माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१).

आज दुसरा भाग देत आहे. मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#२

१९३६ मध्ये सिद्धनाथ पंत नावाचे एक हिंदी भाषेचे शिक्षक बंगळूरूस आले. ते घरोघरी जाऊन हिंदी भाषेचा प्रसाराचे काम करत. मला लिहा-वाचायचे वेड होतेच. मी, तसेचआणखीन काही जण मिळून त्यांच्याकडून हिंदी शिकू लागलो. पंत हिंदी शिकवण्याचे काही पैसे घेत नसत. हे असे मोफत शिक्षण नको असे म्हणत, माझ्या यजमानांनी आक्षेप घेतला. त्यांचा संशयी स्वभाव मला माहित होता. असे असले तरी काही काही बाबतीत मी त्यांचे ऐकत नसे. हिंदी प्रवेश परीक्षेत मी अखिल कर्नाटकातून पहिली आले. त्यावर्षी महात्मा गांधी यांच्या हस्ते  मद्रास मध्ये  पारितोषिक  वितरण होणार होते. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमासाठी म्हणून असलेल्या मंडप छान सजवले गेले होते. किती  तरी लोकं आले होते. हे असे सगळे वातावरण पाहून मला खूप आनंद झाला होता. ते मद्रास शहरातील पहिला हिंदी पारितोषिक वितरण समारंभ असल्या कारणाने कॉंग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आले होते. त्या समारंभात मला गांधीजींच्या हस्ते पारितोषिक मिळाले त्यामुळे माझ्या मनात त्यांच्या प्रती श्रद्धा, भक्ती, आणि देशासाठी काही तरी करण्याच्या माझ्या मनात येऊ लागले.

एक दोन महिन्यातच गांधीजी यांचे स्वास्थ्य बिघडल्याने हवा पालटासाठी बंगळूरूस आगमन झाले (माझे यजमान १९२० च्या असहकार चळवळीत गेले  होते). मी आणि गुरुदत्त त्यावेळेस फक्त खादीचे कपडे परिधान करत असू. मी चरखा देखील चालवत असे. मी गुरुदत्तला घेऊन गांधीजींच्या सायंकालीन प्रार्थनेला जात असे. त्यावेळेस कस्तुरबा, राजगोपालाचारी यांची मुलगी लक्ष्मी(हिच्याबरोबर माझा बरीच वर्षे पत्र-व्यवहार सुरु होता. तिचा देवदास गांधी यांच्या बरोबर विवाह झाला आणि आमची पत्र-मैत्री कमी कमी होत गेली). महादेव देसाई, मणीबेन पटेल, मदनमोहन मालवीय यासारख्या महनीय व्यक्तींशी माझी ओळख झाली होती. प्रार्थनेच्या वेळेस विविध लोकांची भजने होत. मी त्या वेळेस कन्नड दासपदं, श्री अप्पय्या यांची कन्नड गीतं गात असे. सर्वाना ती आवडत असत. अप्पय्या यांच्या गीतांत संस्कृत शब्द बरेच असत आणि अद्वैत तत्वज्ञानपर असत, त्यामुळे पंडितजी(मालवीय) मला जवळ बोलावून ती गाणी म्हणायला लावत. माझा देखील त्यामुळे संकोच मावळत असे आणि मुक्तकंठाने न भिता मी गात असे. या  सर्वांचा  गुरुदत्तच्या बालमनावर नक्कीच काहीतरी परिणाम झाला असणार. एकाग्र चित्ताने तो माझे गाणे, अगदी डोळे मिटून ऐकत असे, त्यामुळे सगळे त्याचे कौतुक करत असत. कोवळ्या मनावर होणारे असे संस्कार पुढे आयुष्यात उपयोगी पडतात. मला गांधीजींच्या आश्रमात जावेसे वाटू लागले. प्रार्थना संपल्यावर आम्ही गांधीजींबरोबर आश्रमात जात असू. पूज्य ‘बा’ त्यांच्या माथ्याला तेल लावीत. मणीबेन त्यांच्या पायाला तेल चोळत. गांधीजी लहानग्या गुरुदत्तला जवळ बोलावून त्याच्याशी बोलत. त्याच्या हातात खडीसाखरेचा खडा ठेवत, डोक्यावर हात ठेवत त्याला आशीर्वाद देत असत. एखाद्या वेळेस गुरुदत्त जर बरोबर नसला तर, त्याची ते विचारपूस करत असत. मी घाबरत घाबरत त्यांच्या कडे आश्रमात प्रवेश करण्यासंबंधी विषय काढला. माझ्या कडे पहिले आणि हसले, आणि म्हणाले होईल होईल, असे म्हणत पुढे काही बोलले नाही. मी पुढे नंतर विचारले नाही.

आमच्या गुरुदत्तचा दुसरा वाढदिवस आम्ही अतिशय जोरात साजरा केला. त्याने त्याचा प्रिय असा लाल शर्ट घालून अंगावर दागिने देखील परिधान करून, आमच्या घरमालकांच्या पाया पडायला त्यांच्या कडे गेला. त्यांनी त्याला बसवून त्याला ओवाळले म्हणे. तेथून आमच्या घरी येताना झाकून ठेवलेल्या छोट्या विहिरीजवळ तो पडला आणि तो जोरात मला हाक मारू लागला. ते ऐकून मी बाहेर पळत आले. त्याच्या कपाळाला लागले होते, रक्त वाहत होते. त्याला उचलून पटकन डॉक्टरकडे घेऊन गेले आणि उपचार करवून आणले. पण हे सर्व असे झाल्यामुळे माझ्या मनाला चुटपूट लागली. रात्री त्याला अंगात ताप देखील चढला. माझा एका वृद्ध वैद्यावर विश्वास होता. पूर्वी मी जेव्हा खूप आजारी होते, तेव्हा त्यांनीच मला औषध देऊन बरे केले होते. त्यांनाच बोलावले. नाडी पाहून त्यांनी औषध दिले. पण आठवडा होऊन गेला पण गुरुदत्तला विशेष बरे वाटत नव्हते. रात्री तो बडबडत उठे, घाबरून ओरडत उठत असे. दहा दिवसांत त्याची प्रकृती खालावली.

माझ्या मामेभाऊ डॉक्टर होता. तो गुरुदत्तवर अतिशय प्रेम करत असे. माझ्या यजमानांच्या मनात त्याच्या बद्दल का कोणास ठाऊक पण रोष होता. त्याला बोलावणे पाठवायला मागे पुढे पाहू लागले. एके दिवशी तर गुरुदत्तचे हात पाय गार पडले, आखडून सुद्धा गेले. त्याच्या डोळे देखील आत गेले. आईने रडायला सुरुवात केली. मी कोणाला काही न सांगता मामेभावाकडे गेले, त्याला सगळी परिस्थिती सांगितली. सगळे ऐकून, तो म्हणाला, ‘अश्या स्थितीत मी जवाबदारी घेणार नाही’. मी त्याच्या हाता-पाया पाडून म्हटले कि एकदा त्याला बघून तरी जा. त्याने थोडा विचार केला, आणि कसे काय पण त्याचे मन बदलले आणि तो माझ्याबरोबर यायला तयार झाला. घरी आल्यावर गुरुदत्तला नीट तपासले. गरम पाण्याची बाटली जवळ ठेवायला सांगितली आणि माझ्या समाधानासाठी म्हणून करड्या रंगाच्या गोळ्या त्याला दिल्या, आणि त्याला वारंवार गरम पाणी पाजत राहा असे सांगितले, आणि म्हणाला, ‘वासंती, तुझे नशिब चांगले असेल तर हा ‘गुंटी'(गुरुदत्त) ह्यातून बचावेल, रात्रभर ह्याच्यावर नजर ठेव. सकाळी परत येऊन पाहतो’. नंतर तो निघून गेला.

आम्ही घरातल्यानी मिळून गुरुदत्तवर रात्रभर नजर ठेवली. मला तर गुरुदत्तचे ते मोठे  झालेले डोळे पाहायला धीरच होत नव्हता. मी देवासमोर रात्रभर बसले होते. शेवटी पहाटे कधीतरी डोळे आत घेऊन बोलला, ‘आई, मला पाणी दे’. मी धडपडून उठले. पण मला एवढा आनंद झाला नाही. त्याच सुमारास, गल्लीतून कोणीतरी गाणे म्हणण्याचा आवाज येत होता:

जागी सर्वसुखी असा कोण आहे|
विचारी मना, तुही शोधूनी पाहे|

हा श्लोक अगदी टाळ वाजवत तो म्हणत चालल्याचे ऐकू येत होते.

हा श्लोक, तो आवाज ऐकून मला माझ्या बालपणीच्या वडिलांबरोबर जो काही अल्पस्वल्प राहता आहेल त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांचा स्नेह, विशुद्ध प्रेम, ममता हि माझी अंगरक्षक आहेत अशी माझी भावना आहे. त्यांच्या आठवणी म्हणून त्यांनी मला दोन ग्रंथ पाठवले होती- परमार्थ साधन आणि मनाचे श्लोक हि ती पुस्तके, जी मला खूप आवडतात. जेव्हा काही संकट आले कि मी ह्या दोन ग्रंथांची आठवण काढते.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले, त्यांनी गुरुदत्तला तपासून, आता ठीक आहे, पण त्याचे यकृत बिघडले आहे असे सांगितले. आयुर्वेद औषधे ह्या कारणीभूत असावीत असे त्यांना वाटले. अजून एक महिनाभर वेगळे उपचार करायला हवेत असेही म्हणाले.

गुरुदत्त वाचला होता. पण मला गांधीजीच्या भेटीसाठी आजारपणामुळे जमले नाही. मी त्यांना माझ्या तोडक्या मोडक्या हिंदी भाषेत एक पत्र लिहिले. त्याचे त्यांनी उत्तर मला पाठवले:

“प्रिय वासंती,

आश्रमात तुला येत आले नाही म्हणून वाईट वाटू नको. परमात्म्यावर श्रद्धा, भक्ती ठेवून मुलाला सांभाळ. त्याचे मानसिक, शारीरिक उन्नती करण्याचे कर्तव्य तुझे आहे. पती आणि मातेची सेवा करत राहा. जेवढे शक्य होईल तेवढी देशसेवा कर.

इति,

मोहन करमचंद गांधी
१०-१०-१९२६”

हे अमुल्य पत्र मी अतिशय जपून ठेवले होते. १९५२ मध्ये ते का कसे पण हरवले. जगप्रसिद्ध अश्या गांधीजीनी माझ्या सारख्या सामान्य स्त्रीला पत्र लिहिले होते हे सांगितले कि कोणी विश्वास ठेवणार नाही. पुरावा म्हणून जे पत्र होते, ते हातातून हरवून गेले आणि माझे तोंड बंद झाले. मी तो विचारच सोडून दिला. असो. पुढे काही दिवसातच गांधीजी बंगळूरूहून परत गेले.

गुरुदत्तला बरे वाटू लागल्यावर मी आणि आणि माझी आई, तसेच अर्थात गुरुदत्तला घेऊन कलकत्त्याला आले. माझ्या यजमानांनी बंगळूरूमधील नोकरी सोडून मंगळूरूला गेले. गुरुदत्तला सोडून जाताना त्यांना खूप दुःख झाला. मी त्यावेळी जे बंगळूरू सोडून गेले, ते परत बंगळूरूला आलेच नाही.

कलकत्त्यास माझा भाऊ, माझी वाहिनी, आणि माझा अजून एक चित्रकार भाऊ असे सर्व होते, त्यांनी आमचे छान आगतस्वागत केले. सगळ्या कुटुंबात गुरुदत्त एकटाच लहान मुलगा होता. त्यामुळे सगळ्यांना अतिशय प्रिय होता. त्याचे मस्ती करणे, बोबडे बोलणे सगळ्यांना खूप भावत असे.

माझे भाऊ धार्मिक होते, सोवळे वगैरे नेसून ते पूजा करत. गुरुदत्त त्यांच्या जवळ बसून त्यांची पूजा करणे, सर्व विधी निरखत असे. सारखे प्रश्न विचारून त्यांना हैराण करत असे. कधी कधी सोवळ्यात असलेल्या त्यांना शिवत असे. तरी ते त्याच्यावर कधी रागवत नसत. हसत हसत ते पूजा करत आणि संपल्यानंतर त्याच्या हातावर तीर्थप्रसाद ठेवत. घराच्या अंगणात एक कुत्र्याचे पिल्लू आणि एक मांजर होते. त्यांना खायला प्यायला द्यायचे, आणि त्यांच्यात काहीतरी कारणाने भांडण लाऊन ते पाहत बसायचे हा गुरुदत्तचा आवडता उद्योग. त्याचे मित्र त्याच्या पेक्षा वयाने मोठेच होते. त्यांच्याकडून भोवरा फिरवायला शिकला. आपल्या तळहातावर भोवरा फिरवून तो आम्हाला दाखवत असे. गोट्या खेळण्यात तर त्याने कौशल्य मिळवले होते.

माझा भाऊ वेळ मिळेल तसे, आम्हाला कलकत्यातील प्रसिद्ध ठिकाणे दाखवायला घोडागाडी मधून नेत असे. एकदा तेथील मदन नाट्यगृहात मिस कज्जन(कज्जनबाई) हिचे नाटक लागले होते. ते पाहायला आम्ही सगळे गेलो होतो. माझ्या शेजारी दोन तरुण मुले बसली होती. गुरुदत्त बरोबर ते बोलू लागले. मध्यंतरात ते गुरुदत्तला बाहेर घेऊन गेले. नाटक परत सुरु झाले तरी ते आले नाही. माझी भीतीने गाळण उडाली. माझा भाऊ माझ्यावर डाफरला. आधीच मी घाबरट, त्यातच भावाने रागावले होते. माझी नजर नाटकाच्या रंगमंचाकडे न लागता नाट्यगृहाच्या दरवाजाकडे लागली होती. आतल्या आत मी देवाचा धावा करत होते. नंतर कितीतरी वेळाने ती मुले आली आणि गुरुदत्तला माझ्या हवाली केले आणि माझा जीव भांड्यात पडला. पाहते तर काय, गुरुदत्तच्या हातात चॉकलेट आणि बिस्कीट, आणि गुरुदत्तच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

आम्ही कलकत्याला येऊन आता जवळपास एक महिना होऊन गेला होता. माझ्या यजमानांकडून परत येण्याबद्दल निरोप आला होता. एवढे दिवस कुठलीही चिंता नव्हती, नातेवाईकांकडे अगदी आरामात राहत होते. पुढे त्यांची तार देखील आली. मला एकटीला पाठवायला माझा भाऊ तयार होत नव्हता. तीन दिवस, एक रात्र असा प्रवास होता तो. आईने माझ्याबरोबर यायला नकार दिला, मीही जास्ती मागे लागले नाही. कारण माझे यजमान आणि माझी आई यांचे संबंध सुरळीत नव्हते. कायम काहीबाही कुरबुरी असत, त्या दोघांत मी सापडायचे.

शेवटी नात्यातल्या एका बरोबर मी आणि गुरुदत्त परत निघालो. त्या वर्षी मद्रास मध्ये काँग्रेसचे अधिवेशन होते. माझ्या मावशीच्या मुलगा , त्याची बायको, आणि तीन मुलांसह हैदाराबादेहून तेथे आले होते असे मी ऐकले होते. त्यांना मी शोधले आणि त्यांच्या कडे गेले. चार दिवस तिथे राहिले. गुरुदत्तला त्यांच्या तीन मुलांची सोबत मिळाली. काँग्रेस पक्षाच्या अनेक धुरिणांना मी तिथे जवळून पाहिले. पण महात्मा गांधींना मात्र लांबून पाहण्यात समाधान मानावे लागले. त्यांच्याशी बोलण्याचे तर शक्यच नव्हते. अजून काही दिवस तिथे राहावे असे मला वाटत होते. पण यजमान देखील घरी बोलावत होते. पती कसाही असला तरी, तोंड बंड करून त्याच्या आज्ञेत राहण्याचा तो काळ होता. त्यांच्याशी आपणहून बोलण्याचे, मनातील सांगायचे माझ्यात तरी धैर्य नव्हते.

मी कासरगोड येथे पोहचल्यावर मला माझ्या वाहिनीकडून ह्यांची नोकरी गेल्याचे समजले. मला धक्काच बसला. आता मी कोठे जावे, काय करावे? संध्याकाळी हे बंगळूरूहून कासरगोडला आले. नवीन नोकरी मिळेपर्यंत वाहिनीकडे राहावे असे ठरले, आणि ते काही दिवस राहून मग मंगळुरूला गेले. त्यावेळी तेथे राष्ट्रबंधू नावाचे साप्ताहिक तेथून निघत असे. कंडूगोडलु शंकर भट्ट हे त्याचे संपादक होते. त्यात प्रुफरीडर म्हणून काम मिळाले. माझ्या दिरांच्या मुलाच्या घरी बिऱ्हाड केले. नंतर राष्ट्रबंधू मध्ये मी लिहूपण लागले. पूर्वी बंगळूरूमध्ये असताना सरस्वती मासिकात(सं. डी. कल्याणम्मा) माझी एक कथा वरदक्षिणा आली होती. त्यामुळे राष्ट्रबंधू  मध्ये मला लिहायला मिळाले. राष्ट्रबंधू मध्ये मी अधून मधून लिहित राहिले. नंतर इकडे तिकडे प्रवास करावा लागला त्यामुळे हे लिहिणे थांबले. माझ्या नणंदेच्या मुलाकडे चार महिने राहायला जागा मिळाली. त्यांची पत्नी आजारी असल्या कारणाने माहेरी गेली होती. त्यांचे घर हे ‘शंकर विठ्ठल मोटार कंपनी’ समोरच होते. माझ्या दिराचा नातू प्रभाकर गुरुदत्तपेक्षा मोठा. तरीसुद्धा तो गुरुदत्त बरोबर कधी कधी खेळत असे. त्याला येणारी इंग्रजी नर्सरी ऱ्हायीम्स तो गुरुदत्तला शिकवत असे; गोष्टीपण सांगत असे. गुरुदत्त त्याच्या मनासारखे करत असे. त्याच्या पुस्तकातील चित्रे तो पाहत असे, प्रश्न विचारत असे. काहीतरी भांडण निघाले तर प्रभाकर गुरुदत्तला मारायला मागेपुढे पाहत नसे.

आमच्या घरा समोर असलेल्या मोटार कंपनीत गुरुदत्त ये जा करत असे. तेथील लोकांबरोबर त्याची ओळख वाढली. दिवसभर तेथे तो असे. मोटार दुरुस्तीचे काम तो मन लावून पाहत असे. त्यांना काम करता करता मध्येच काही तरी हवे असेल तर तो ते आणून देत असत. कधी कधी तो त्यांच्याबरोबर मोटार गाडीतून बाहेरही जात असे. सगळ्यांना गुरुदत्त हवा असे. तो कुठेही असला तरी संध्याकाळी सातच्या घरी हवा असे मी त्याला बजावत असे. तो ही तसा परत येत असे किंवा कोणी तरी त्याला परत आणून सोडत असे. घरी आल्यावर तो हातपाय धुवून, कपडे बदलून, देवासमोर नमस्कार करून, मी शिकवलेले स्तोत्र म्हणत असे. तो नुकताच लिहायला वाचायला शिकला होता. बंगळूरूला येई पर्यंत माझी आईच त्याला हवे नको ते पाहत असे. इथे आल्यावर मी ते पाहत असे. सुरुवातीला मला थोडा वेळ लागला, पण मी पण  त्याचे नीट करू लागले, त्यानेही सांभाळून घेतले.

माझ्या दिराचा मुलगा एल ओ सी एस कॉलेज मध्ये इंग्रजी भाषेचा प्राध्यापक होता. त्याला शास्त्रीय संगीतात रुची होती. मला देखील संगीतात रुची होती. पण मी शास्त्रीय संगीत असे काही शिकले नव्हते. तो शिकला होता. मी त्यांच्या कडून बरेच काही शिकले. प्रसिद्ध आंग्ल लेखकांचा त्याने मला परिचय करून दिला, माझ्यात साहित्याची रूची निर्माण केली. या सर्वांमुळे आमच्यात आपुलकी निर्माण झाली, पण ते माझ्या यजमानांना सहन होत नव्हते. तरीपण ते चार महिने कसे गेले हे समजले नाही. परत घर बदलताना, नको नको वाट होते. ते सोडून गेल्यावर आम्हाला जेलसमोर एक घर मिळाले. गुरुदत्तला तेथे कोणी सवंगडी नव्हते.  शेजारचे  कुटुंब प्रेमळ होते. 
त्यांच्या कडे जाऊन मीच त्यांची ओळख करून घेतली. ते सोन्या, चांदीचे दागिने करत असताना तो पाहता बसे, मध्ये मध्ये त्यांना प्रश्न विचारत असे, संधी मिळेल तशी ते करतील तसे करायचा तो प्रयत्न करत असे. हे सर्व त्याच्या जवळ असलेले अपार कुतूहल होते म्हणून तो करत असे. एकदा शेजारच्या घरात एक वृद्ध स्त्री मरण पावली होती. तेथे जाऊ नको असे कितीही सांगितले तरी तो माझा डोळा चुकवून तेथे गेला, सगळे विधी पहिले. मला भीतीच वाटली होती. पण त्याला त्याबद्दल विशेष असे काही वाटले नाही. घरी आल्यावर माझ्यासमोर ते सर्व विधी साभिनय करून दाखवायला लागला. माझे जीवन आधीच एकाकी होते, जीवनातील एकूणच रस निघून गेला होता. त्यात हे असे त्याचे मृत्यूविषयी असे वागणे बोलणे ऐकणे नको वाटत होते. तो ते सर्व विसरावे म्हणून त्याला मी दूरवर फिरायला घेऊन जाऊन लागले. तेथे त्याची वेगळीच तऱ्हा. रस्त्यावरील प्रत्येक गोष्टीबद्दल विचारत असे, त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे माझ्या जीवावर येत असे. मला जेवढी माहिती असेल तेवढे मी सांगत असे, पण त्याचे समाधान होत नसे. त्यावर आणखीन प्रश्न विचारात असे, आणि मग मी त्याला रागावणे थांबत असे. त्या प्रश्नोत्तरात बाल बुद्धीचा गुरुदत्त विजयी होत असे. त्या जेलजवळील रस्त्यावर पोलीस चोरांना पकडून घेऊन येत असत, त्यांची मारझोड करत असत, तेव्हा आरडाओरडा होता असे. गुरुदत्त हे सर्व होताना पाहत नसे, डोळ्यांवर हात ठेऊन डोळे बंद करून घेई, कान बंद करून घेई, आणि म्हणे ‘किती दुष्ट आहेत हे पोलीस!, आणि रडत असे. बऱ्याचदा पहाटे पहाटे कैद्याची फाशीची शिक्षा बजावली जात असे, तेव्हा त्या येणाऱ्या किंकाळ्या आम्हाला ऐकू येत असत, आणि त्या आम्हाला असह्य होत असत. बिचारा गुरुदत्त ते ऐकून अस्वस्थ होत असे. ह्याच घरात आम्ही असताना त्याचा एक वाढदिवस साजरा झाला.

माझे वडील मला कधीतरी पत्र पाठवत. पत्रात ते लिहित, ‘माझी तब्येत सध्या ठीक नसते. पण तू घाबरू नकोस. देव आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. गुरुदत्तची नीट काळजी घे. त्याच्यत सद्गुण येतील असे पहा, त्याला प्रोत्साहन दे. चुकीच्या मार्गावर त्याला जाऊ देऊ नकोस. तुमची परिस्थिती काय आहे, हे मला माहित आहे. तुम्हाला सर्वाना इथूनच आशीर्वाद देतो’ काही दिवसातच ते हृदयरोगाने गेल्याचे समजले. शेवटच्या क्षणी त्यांच्या जवळ त्यांची पत्नी(माझी आई)आणि मुले यांपैकी कोणी नव्हते. जे जे हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले असे कळले. ही बातमी ऐकून मला अतीव दुःख झाले. माझा जन्म बर्मा मध्ये झाला होता. तीन वर्षात माझ्या भावाचा जन्म झाला होता. त्यांमुळे माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले होते. मला माझी आई आवडत नसे, सदा सर्वदा रागावलेली असे, काही तरी काढून ती भांडत असे, माझ्या वडिलांनी केले माझे लाड तिला रुचत नसत. माझे वडील अतिशय समजूतदार आणि प्रेमळ होते. बहुतेक देवाला हे सर्व आवडले नसावे, मी सहा वर्षांची होते तेव्हा ते मला सोडून मुंबईला निघून गेले. तीन वर्षे मला ते भेटले नाहीत. मी त्यांना समजू शकले नाही. त्यांच्या मध्ये देवासारखे  मन होते. त्यामुळे हे असे अचानकपणे ते गेल्याचे समजल्यामुळे मला किती यातना झाल्या असतील, विचार करा! आणि त्यांचे वय देखील खूप नव्हते, फक्त त्रेप्पन.

गुरुदत्तच्या मनात त्याच्या आजोबांची आठवणी कश्या असतील? सहा महिन्यांचा असताना त्याने त्यांना पाहिले होते. मी त्याला नेहमी त्यांच्या बद्दल सांगत असे. मी सांगितलेले तरी त्याला आठवत असणार. आजकाल गुरुदत्तला गोष्टी ऐकायचा नाद लागला होता. इसापनीतीच्या कथा, मंजी मंगेशराय यांची ‘इलीगळ थकथई’ अश्या गोष्टी शोधून आणून मी त्याला सांगत असे. त्याला गोष्ट पूर्ण ऐकल्याशिवाय झोप येत नसे. माझी सहनशक्ती कधी कधी संपत असे, तेव्हा तो माझ्या हातचा मार खात असे. अभ्यास करतना देखील, नीट समजावून सांगितले तर लक्ष देऊन ऐके, पण मी जर रागवत, चिडत, मारत शिकवले तर तो देखील हट्टी होई. जेवण खाण सोडून एका कोपऱ्यात जाऊन रुसून बसे. त्यावेळी चेहरा पाहून माझे मन विरघळत असे.

ह्यांची नोकरी परत एकदा गेली. मी सहा महिन्यांची गर्भार होते. आता कसे होणार? शेवटी मी माझ्या अहमदाबाद येथे असलेल्या माझ्या भावाला पत्र लिहिले. त्यांची सुद्धा आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. माझ्या मावशीने माझ्या भावाला दत्तक घेतले होते. तिच्या नवऱ्याला वेडाचे झटके येत असत. तिलाही बरे नसायचे. घरातील समान एकाकडे ठेऊन आम्ही अहमदाबादला जायला निघालो. आम्ही तीन जण होतो. बसने धारवाडला आलो. माझ्या मामाची मुलगी तेथे राहत असे. ती तशी श्रीमंत होती, तिचे पतींचे नाव देखील होते. माझे दिवस भरत आले होते. घरात नोकर-चाकर होते, मुले होती. त्यांनी आमचे चांगले स्वागत केले. त्यावेळी हुबळी मध्ये असलेल्या श्री सिद्धारूढ स्वामी यांच्या दर्शनाला बरेच लोकं येत असत. मी आणि गुरुदत्त देखील गेलो. स्वामीजी काही बोलत नसत, मौन असे. डोके हलवून, हुंकार देऊन ते संवाद साधत असत. गुरुदत्तला त्यांच्या पाया पडायला लावले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवाला, आणि त्याला उठवले, आणि त्याला पाहून हसले. तिथे जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटले. ते सहसा तसे करत नसत. त्यांच्या दर्शनाने मला समाधान वाटले.

आम्ही धारवाड मध्ये एक आठवडा राहिलो. नंतर आम्ही मुंबईला निघालो. माझ्या आत्याने मुंबईत खार येथे घर बांधले होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो, आमचे चांगले स्वागत झाले तिथे. त्यांच्या मोठ्या मुलाचे माझ्या मोठ्या बहिणीबरोबर लग्न होणार होते, पण ती अकाली गेल्या मुळे ते झाले नाही. त्यांच्यात तसे खूप प्रेम जुळले होते. दुर्दैवाने एका महिन्यात ती, अजून एक थोरला भाऊ आणि दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ हे सर्व विषमज्वारामुळे अकाली निधन पावले. मला त्याने ग्रासले होते. हि घटना १९१६ सालची. मला मुंबईतील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. तीन महिन्यानंतर माझे अवयव, मेंदू चालू लागले, आणि मी कशीबशी त्यातून बचावले.

खार येथे गेल्यावर मला पाहून माझ्या दिरांना आनंद झाला. त्यांना माझ्या वारलेल्या बहिणीची, सुंदरीची, आठवण झाली. त्यांच्याकडे एक आठवडा राहून आम्ही सर्व अहमदाबादला गेलो. तिकडच्या घरातील वातावरण जरा त्रासाचे होते. माझे काका रात्री -अपरात्री ओरडायचे, भावाला मारायचे. सगळ्यांची झोपमोड होत असे. असेच पाच महिने कसे गेले समजले नाही. माझ्या यजमानांना हवी तशी नोकरी मिळाली नाही. गुरुदत्त संध्याकाळ झाली कि घाबराघुबरा होऊन इकडे जाऊ तिकडे जाऊ असे म्हणत असे. बाजूच्या खोलीत वैद्यकशास्त्र शिकणारी काही विद्यार्थी भाड्याने राहत असत. गुरुदत्तला त्यांचा आणि त्यांना गुरुदत्तचा लळा लागला होता. त्यांचे कॉलेज नसे तेव्हा ते त्याला घेऊन जात, आणि पतंग घेऊन देत, गोट्या, भोवरे देखील देत, फिरायला देखील घेऊन जात. तो बाहेर राहण्याविषयी माझी ना नव्हती, कारण घरातील विपरीत परिस्थिती. ती त्याच्या वर कशी परिणाम करेल हे सांगता येत नव्हते. तेवढ्यात माझ्या भावाने आम्हाला तेथून जायला बजावले. मी आठ महिन्यांची गर्भार होते. आता कुठे जायचे? हातात पैसा-अडका नव्हता. कपडेलत्ते देखील विशेष नव्हते. थोरले मंडळी जवळ कोणी नव्हती. शेवटी कलकत्त्याला जावे असा आम्ही विचार केला. शेजारच्या खोलीतील ती मुले गुरुदत्त बरोबर रेल्वे स्थानकावर देखील निरोप द्यायला आली होती. त्याच्यासाठी पेपरमिंटच्या गोळ्या, पुरीभाजी, बिस्किटे आणून दिली. तसेच माझ्या हातावर पंचवीस रुपये ठेवले आणि म्हणाले, ‘हे तुमच्या जवळ असु द्या प्रवासात लागतील. जमेल तेव्हा परत करा नंतर’. त्यांनी केलेली ती मदत आणि गुरुदत्त प्रती दाखवलेले प्रेम मला अजूनही स्मरणात आहे.

(क्रमशः)

माझा पुत्र गुरुदत्त: भाग#१

मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तच्या त्याच्या आईने, वासंती पदुकोण, यांनी लिहिलेले कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याचे क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर प्रत्येक महिन्यात करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू अत्म्नाराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. आज चरित्राचा पहिला भाग. मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१

आता हयात नसलेल्या माझा पुत्र गुरुदत्त याच्या अविस्मरणीय स्मृतीप्रित्यर्थ-वासंती पदुकोण

गुरुदत्तचा जन्म

त्यावेळी आमचा विवाह होऊन अडीच वर्ष झाली होती. ह्यांना हवी तशी नोकरी अजून मिळालेली नव्हती. शेवटी पानम्बुर(Panambur, मंगळुरू जवळ समुद्रकिनारी असलेले गाव) येथे एका शाळेत मुख्याध्यापकाची नोकरी त्यांना पत्करायला लागली. त्यांनी ती पत्कारलीही. हे गाव मंगळुरूच्या उत्तरेला समुद्रकिनारी, उडपीकडे जाताना लागते. अतिशय छोटेसे खेडेगाव. आठ-दहा उंबरठे असलेले. अश्या ठिकाणी एक शाळा होती. आजूबाजूच्या खेड्यातून शाळेत मुले येत असत. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्याची संख्या शंभरच्या आसपास होती. त्या काळात शिक्षकांना बराच मान असे. हि शाळा त्या गावातील ग्राम-पंचायतीतर्फे चालवली जाई.

आम्ही सर्व एका गौड-सरस्वत ब्राम्हणाच्या घरातील एका भागात भाड्याने राहत होतो. त्या गावी आठवडा बाजार भरत असे. आमच्या घराचे मालक वेगवेगळ्या प्रकारची मिठाई तयार करून ती त्या बाजारात विकत असत. त्यांच्या त्यात चांगला फायदा होत असे. कुठल्यातरी महामारी रोगामुळे यांचा एक डोळा निकामी झाला होता. त्यांना एकुलता एक मुलगा होता. तो त्या शाळेत शिक्षक होता. त्या म्हाताऱ्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता त्यामुळे मुलीची दोन्ही मुले त्याच्या जवळ राहत होती. ती दोन्ही मुले, आजी-आजोबा असे राहत होते. मुलाची पत्नी आणि आणखीन एक तान्ही नात देखील घरात होती. पत्नी शेतात जाऊन गावात कापून आणत असे. शेतावर काम करण्यासाठी कुळ लावले होते. मालकिणीचा माझ्यावर का कोणास ठाऊक स्नेह होता. घरी काहीही खायला केले कि मला ते आणून दिल्याशिवाय तिला चैन पडत नसे. ते मिठाई करत असताना जवळ थांबून मी ते न्याहाळत असे.

खेड्यातील ते जीवन मला आवडू लागले होते. त्यावेळेस माझे वय फक्त पंधरा वर्षांचे होते. तेथे माझ्या वयाचीच एक घरकाम करणारी मोलकरीण होती, आणि ती कायम माझ्याकडे पाहत असे. एके दिवशी तिला बरे नसल्यामुळे, मला जवळच असलेल्या विहिरीमधून पाणी आणायला लागले. ती विहीर घरापासून साधारण २०-२५ पावले दूर होती. येताना शाळेतील काही उनाड मुलांनी मला दगड मारले. त्यापासून मी स्वतःला वाचवून मी घरी आले आणि रडू लागले. भीतीमुळे माझ्या शरीराचा थरकाप होत होता. तोंडातून शब्द बाहेर येत नव्हता. माझे यजमान घरी आल्यावर घर-मालकिणीने त्यांना सविस्तर घटना सांगितली.  ह्यांचा आधीच रागीट स्वभाव. दुसऱ्या दिवशी शाळेत त्या उनाड मुलांना चांगलीच अद्दल घडविली. त्या मुलांत एक मुलगा शाळेच्या व्यवस्थापकीय कमिटीच्या सदस्याचा मुलगा होता. त्यामुळे हे प्रकरण चिघळले. सभा बोलाविली गेली, ह्यांना शाळेतून काढून टाकूयात असा ठराव झाला. पण शाळेतील मुलांचा यांच्यावर लोभ जडला होता, विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांनी हेच शिक्षक हवे असा हट्ट केल्यावर हे प्रकरण निवळले.

त्या वर्षी शाळेतील वार्षिक समारंभात अनेक कार्यक्रम झाले. छोट्या छोट्या नाटिका, गाणी, वाद-विवाद स्पर्धा अश्या गोष्टी झाल्या. त्या वर्षी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यासाठी माझ्या मागे लकडा लावला. मंचावर मी गेल्यावर माझे हात पाय लटपटत होते. मी मला दिलेले काम कसेतरी संपवून घरी आले.

माझ्या यजमानांना मलेरिया झाला होता. शाळेतील एक शिक्षक वच्चप्पा हे वैद्य होते. ते स्वतः औषध देत असत आणि त्यांच्या हाताला गुण देखील येई. हे देखील पटकन बरे झाले. पण वैद्यच म्हणाले कि, तुमची ग्रहदशा ठीक दिसत नाही. एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन या, असा सल्ला दिला. ह्यांचा मात्र ज्योतिषावर विश्वास नव्हता. पण सगळ्यांच्या आग्रहामुळे एका नामवंत ज्योतिषाला बोलावले. त्यांनी आमच्या दोघांच्या कुंडल्या, आमचे हात पाहून काहीबाही बोलले. माझ्या हात पाहायला घेतल्यावर तर माझ्या अंगावर काटे आले. ज्योतिषी म्हणाले, ‘मुली, तू भाग्यवंत आहेस. एका वर्षाच्या आत तुला एक मुलगा होईल. तो तुझ्या घराला सुख, ऐश्वर्य, संतोष मिळवून देईल, नाव कमावेल, तो खूप कीर्ती कमावेल, पण…’ ते थांबले आणि माझ्याकडे पाहू लागले. मला संकोच वाटू लागला. मुले होण्याच्या आधीच मुलांच्या विषयी कोणी विचार करतं का? ज्योतिषी पुढे काही न बोलता निघून गेले. माझ्या मनात मात्र त्यांनी सांगितलेली गोष्ट राहिली आणि वाईटसाईट विचार येऊ लागले.

पानम्बुर येथे त्यावेळेस, मी आधी सांगितल्या प्रमाणे आठवडा बाजार भरत असे. आजूबाजूच्या खेडेगावांतून, पंचक्रोशीतून लोकं त्यावेळेस येत. भाजीपाला, फळे, बांगड्या, अश्या वस्तू ती लोकं खरेदी करत. मला बांगड्यांचा नाद होता. आमच्या घरकाम करणाऱ्या बाईंबरोबर बाजारात आम्ही जात असू. बाजारात येणाऱ्या विविध प्रकारच्या लोकांना पाहून, त्यांचे बोलणे, त्यांची वागणूक मला एक प्रकारचा संतोष होत असे. आमच्या शेतातूनच आम्हाला ताजी भाजी मिळत असल्यामुळे , मी बाजारातून भाजी वगैरे काही विकत घेत नसे. नुसताच फेरफटका मारत असे. आमच्या घरमालकिणीबरोबर गप्पा मारणे, त्याच्या नातवाला खेळवणे मला आवडत असे. बऱ्याचदा, हे मला त्याबद्दल रागे भरत असत.

एके दिवशी मी त्या मुलाला झोपाळ्यावर झुलवत होते, तेव्हा घरमालकीण चारा भरलेल्या घमेले तसेच बरोबर असलेले गाढव एका बाजूला सरकवून, ती जमिनीवर लोळू लागली. तिचे डोळे लाल झाले होते. दृष्टीत क्रूरता होती, आणि आजूबाजूला कोणीतरी असावे असे ती पहात होती. तिचे शरीर थरथर कापत होते. तोंडातून काहीतरी अस्पष्ट असे बोलत होती. ते पाहून माझ्या अंगाला घाम आला. घाबऱ्या आवाजात तिने सुनेला हाक मारली. घरात ती धावत आली. त्यांना असे होते हे माहित असावे. विड्याच्या पानावर रुपयाचे नाणे ठेवून हात जोडून उभी राहिली. आणि म्हणाली, ‘आई, आमची चूक पोटात घे, ह्या वेळी तुमचे आणि वडिलांचे श्राद्ध करू शकलो नाही. येत्या तिथीला नक्कीच ते करू. तुम्ही निश्चिंतपाने परत जा.’ आणि साष्टांग नमस्कार घातला. म्हातारीच्या अंगातील देवी निघून गेली असावी, तिचा श्वासोच्छवास परत सुरळीत झाला. तिचे शरीर घामाने लडबडले होते. डोळे मिटलेले होते. सारा दिवस ती झोपून होती. दुसऱ्या दिवशी तिला त्या बद्दल विचारले असता, तिला काही माहिती नव्हते, लक्षात नव्हते.

कधी कधी आमच्या घराशेजारी असलेल्या मैदानात बैयलाट(कर्नाटकातील लोकनाट्य) कार्यक्रम होत असत. घरातील खिडकीतून सर्व काही पाहता येई. पाय दुखे पर्यंत आम्ही तिथे उभे राहून कार्यक्रम पाहत असू. त्यातील ती गाणी, संवाद, नृत्य, वेशभूषा हे सर्व मला एका अद्भुत लोकात घेऊन जात असे.

उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली होती पण काही कारणाने ह्यांनी शाळेच्या नोकरीचा राजीनामा दिला. जास्तीच्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी बंगळूरूस जाणार होते. मी देखील त्यांच्या बरोबर निघाले. पानम्बुर सोडून जाताना मन दुखिःकष्टी झाले. ते गाव, तेथील लोकं, तेथील वातावरण हे मला आवडू लागले होते. आमच्या घरमालकांचे देखील डोळे भरून आले होते. माझ्या सासऱ्यांनी घराच्या दोन्ही बाजूला नारळाची रोपे लावली. ती रोपे दाखवत ते म्हणाले, ‘मुली वासंती, ह्या कल्पवृक्षासमान तू मोठी हो, आणि सर्वाना मदत कर, तुमचे जीवन देखील समृद्ध होऊ दे, परोपकार करत सफल होऊ दे, सार्थक होऊ दे.’ असा त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्यांचे वय त्यावेळेस बहात्तर होते. त्यांचे ते प्रेमाचे शब्द, दया, आशीर्वाद माझ्या मनात घर केले आणि मी धन्य झाले. ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यांना जाऊन आता पंचेचाळीस वर्षे झाली. ती नारळाची झाडे आता मोठी झाली असतील, बहरली असतील.

माझ्या सासऱ्यांना दहा मुलगे होते, आणि तीन मुली होत्या. त्याकाळी समाजात जेवढी जास्त मुले तेवढा जास्त मान असे. आयुष्य अतिशय साधे सरळ होते. मुले म्हणजे ऐश्वर्य असे समजण्याचा तो काळ होता. माझे यजमान सर्वात धाकटे असल्यामुळे सर्वांचे लाडके होते. त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची आई निर्वतल्यामुळे वडिलांनी अतिशय प्रेमाने, लाडाने वाढवले होते. सासूबाई गेल्यानंतर पिता आणि पुत्राला इतर मुलांचा आधार घ्यावा लागला. ह्यांचे कॉलेज शिक्षण होई पर्यंत मोठ्या भावाकडे त्यांना राहावे लागले. माझे सासरे मला त्यांच्या जीवनातील अनुभव सांगत असत, नवरा बायको यांच्या मधील छोटी मोठी भांडणे कुरबुरी आपापसात मिटवावी हे चांगले असे सांगत. माझी तर त्यांनी खूप काळजी घेतली. दुर्दैवाने आम्ही गाव सोडल्यावर त्यांना आमच्या बरोबर राहणे जमले नाही.

१९१४ मध्ये हे बंगळूरूस गेल्यावर मला माझ्या मावशीच्या मुलीकडे(मंगळुरू) चार महिने निरुपाय म्हणून राहावे लागले. माझी थोरली बहिण तशी चांगली होती, पण तिच्या मनासारखे झाले नाही तर ती चिडायची, तोंडाला येईल तसे बोलत असे. मी एक वर्षे स्वतंत्र राहिले होते, त्यामुळे मला तिचे हे टोचून बोलणे लागायचे. मावशीचा मोठा मुलगा मात्र माझ्या बाजूने होता. तो माझ्याहून वयाने चार वर्षे मोठा होता. तो चांगला कलाकार होता. शाळेत त्याने नाटके लिहून पारितोषिके मिळविली होती. आमची जवळीक झाली होती. त्याला रवींद्रनाथ टागोर आवडत, त्यांचा तो भक्तच होता. त्यांच्या कवितांची पुस्तके शाळेच्या वाचनालयातून आणून मलाही तो वाचायला देत असे. कधी कधी मला त्या कविता वाचूनही दाखवत असे. त्यामुळे मला टागोरांच्या कवितांचा, त्यांच्याबद्दल एकूणच चांगला परिचय झाला. मलाही पुढे पुढे त्यांचे साहित्य वाचायचे वेड लागले. त्यावेळी वयात आलेल्या मुली एकट्या दुकट्या कुठे जात नसत. घरातील मोठी मंडळी देखील असे एकट्याला जाऊ देत नसत. माझा भाऊ मला कद्रीगुड्डा(कद्री टेकडी), फळनीर भागात(दोन्ही ठिकाणे हि मंगळुरू मध्ये आहेत), तसेच मैदानात संध्याकाळी घेऊन जात असे. आम्ही दोघे त्यावेळेस भविष्याबद्दल, कलेबद्दल, साहित्याबद्दल, बोलत आमचा वेळ घालवत असू. माझ्या बहिणीला हे रुचत नसे. माझ्या मावशीचे पती हे जरी जुन्या काळातील जुन्या विचारांचे होते तरी, असे प्रतिबंध घालत नसत. त्या दोघांचे वाद होत असत. शब्दाला शब्द वाढत असे. पण त्यांचे कोणी ऐकत नसे. ते पूर्वी रंगभूमीवर नाटकातून काम करत असत. पण ते तसे कंगाल झाले होते. यामुळे त्यांना कसतात दिवस काढावे कागले होते. त्यामुळे देखील त्यांना मुले किमत देत नसत.

मी त्यांना नेहमी काहीबाही मदत करत असे, त्यांनी छोटी मोठी कामे करत असे, त्यांना पान लावून देत असे. ह्यामुळे असेल किंवा आणखीन कशामुळे असेल, त्यांची माझ्यावर खूप प्रीती जडली होती. माझ्या मनात देखील त्यांच्या प्रती आदरयुक्त प्रेम होते. ते म्हणत, ‘ हे बघ वासंती, तुमचे घर बांधून झाले कि, मी तुमच्याकडे राहायला येईन’. दुर्दैवाने, मी बेंगळूरूला गेल्यावर काही दिवसातच त्यांचे निधन झाले.

आम्ही बेंगळूरूला दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहू लागलो. मी अल्पशिक्षित असल्यामुळे असेल किंवा शहरात राहत असल्यामुळे असेल, माझ्या सासरची मंडळी तशी तुच्छतेने वागवत, पहात. त्यामुळे मी तेथील कॉन्व्हेंट शाळेत माझे नाव घातले. तेथे नन्स भरतकाम शिकवत, ते शिकायला मी नाव नोंदवले. त्यांचे इंग्रजी मला विशेष कळत नव्हते. ते मला कन्नड मध्ये जसे जमेल तसे बोलून शिकवत असत. हे दोन महिने चालले. त्यानंतर मला नकोसे झाले. त्याचे कारण मला दिवस गेले होते, आणि मला थोडा त्रास सुरु झाला होता. मला त्या ज्योतीष्याचे भविष्य कथन आठवले. त्यामुळे मी मला जे माहिती होते त्याप्रमाणे धार्मिक पुस्तके वाचायला सुरुवात केली. तसेच रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांची चरित्र वाचत असे. गर्भवती स्त्रीचे आचार विचार तिच्या गर्भावर परिणाम करतात असे मी कुठे तरी वाचल्याचे माहित होते. मला जी मुले होतील त्यांना रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबातील मुलांप्रमाणे मान, प्रसिद्धी मिळाली पाहिजे असे मला वाटत असे. ती माझी अशा आता या वयात पूर्ण झाल्याचे पाहून मला अतीव संतोष होतो(माझी मुले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे).

६ जुलै १९३५ मध्ये माझा थोरला मुलगा जन्माला आला. ज्या हॉस्पिटल मध्ये तो जन्माला ते बरेच लांब होते. त्यादिवशी सकाळी मला माझे यजमान आणि माझ्या आईने मला हॉस्पिटल मध्ये सोडून निघून गेले. ते धर्मार्थ हॉस्पिटल असल्यामुळे त्यांना तेथे राहता येत नव्हते. मी लहानच होते, विशेष काही व्यवहार ज्ञान नव्हते. मी आत जाऊन हेड नर्सच्या खुर्चीवर जाऊनबसले. ते पाहिल्यावर मला ती तोंडाला येईल ते बोलली. आधीच अशक्त झाले होते, त्यातच पोटातून कळा येत होत्या. हे देखील निघून गेले होते. त्यातच ह्या नर्सचे रागावणे वेगळे. मला रडू कोसळले. पण तिथे रडता येईना, तशीच बसले. अकरा वाजता मला लेबर-रूम मध्ये घेऊन गेले. मध्यान्ही बारा वाजता मुलगा जन्माला आला. एक-दोन तासाने नर्स आली, आणि माझ्याजवळ आली आणि गाठोडे ठेवत म्हणाली, हे तुझे मुल, आणि निघून गेली. काचेच्या बाहुलीसारखे दिसणारे ते तान्हे मुल पाहून, माझ्याच्या पोटचा गोळा आहे, हा विचार आला आणि मला आश्चर्य वाटले. त्याच्या कपाळाचे हळुवार चुंबन घेतले आणि माझ्या पोटदुखी पळून गेली. मला अत्यानंद झाला होता. आईचे आणि मुलाचे काय मायापाश असतात त्या देवालाच माहित.

त्या दिवशी हॉस्पिटल मध्ये जन्मलेले हा एकच एक मुलगा. बाकी सगळ्या मुलीच जन्मल्या होत्या. हॉस्पिटल मध्ये जन्मलेल्या सर्व मुलांना गळ्यात एक दोरा बांधून त्यावर पुठ्यावर एक क्रमांक लिहिलेला असे. मला ते सर्व माहिती नव्हते. नर्सने पाहिलेले सहाव्या क्रमांकाचे मुल माझ्या जवळ आणून ठेवले. पण माझ्या मुलाचा क्रमांक नववा होता. दुध पाजवताना लक्षात आले कि मुलगी आहे ते. नर्सला समज तर देण्यात आली, त्या उपर ती बातमी डॉक्टर पर्यंत देखील पोहोचली आणि त्याचे विपरीत परिणाम झाले.

जनरल वॉर्ड वेगवेगळे रुग्ण तसेच बाळंतीणी देखील होत्या. माझ्या डाव्या बाजूला वयस्कर अशी ख्रिश्चन स्त्री होती. ती खूप चांगली होती. तिनेच मला शिकवले. संध्याकाळी माझी आई आणि यजमान एकत्र आले. मला मुलगा झाल्याचे ऐकून माझ्या आईला खूपच आनंद झाला. ह्यांना पण कुलदीपक मिळाला असेल असे वाटून आनंद झाला असावा असे वाटले. मुलगा रडू लागला कि ती ख्रिश्चन स्त्री येऊन त्याला शांत करत असे. मला ते जमत नसे. तान्हा मुलगा, रंग गोरा, मान तशी काळसर, डोळे मोठे आणि आकर्षक होते. हॉस्पिटल मध्ये मी दहा दिवस होते. अकराव्या दिवशी आईबरोबर मुलाला घेऊन घरी आले. माझी आई जेव्हा त्या तान्ह्या मुलाला आंघोळ घाली, ते पाहताना मला अचंबा वाटे. एवढ्या लहान तान्ह्या मुलाला इतक्या जवळून मी पहिल्याचा पहिलाच प्रसंग होता. छोट्या छोट्या हात पायांना तेल लावून कोमात पाण्याने आंघोळ घालणे मला दिव्य वाटायचे. बाराव्या दिवशी नातेवाईकानां आमंत्रण देऊन मुलाचे बारसे केले. आमच्या कुटुंबात मुलगा होण्याचा पहिलाच प्रसंग असल्यामुळे माझ्या भावाने कलकत्याहून दोन नावे सुचवून पाठवली होती. पहिले वसंतकुमार आणि दुसरे गुरुदत्त. मुलाचा गुरुवारी जन्म झालेला, आणि तो दिवस श्री मध्वचार्यांची जयंती होती. ही दोन्ही ठेवली, पण त्याला आम्ही सगळे ‘गोंटा'(म्हणजे सुंदर) असे हाक मारत असू. तो जरा कमी वजनाचा होता कि काय, पण कायम रडत असे(त्यातच बंगळूरू मध्ये कायम पाउस पडे, आणि त्यामुळे थंडी देखील बरीच असे). वारंवार सर्दी, खोकला होत असे. मलाही तसा मुलांचे पालन-पोषण करण्याचा अनुभव नव्हताच. त्याला उचलून घेतल्यावर तो हातातून खाली पडेल कि काय त्याची सारखी भीती वाटत असे. सुरुवातीला तर त्याचे शी-शू साफ करणे सुद्धा किळसवाणे वाटे, पण नंतर त्याची सवय झाली.

तो आता दीड महिन्याचा होता आला होता, पाळण्याजवळ कोणी आले कि चेहऱ्यावर हसू उमटे. तिसऱ्या महिन्यात त्याचा माथा भरून आला होता. मुलाला उचलून त्याला खेळवण्यात माझा जीव रमत होता. आम्ही राहता असलेल्या घराची मालकीणबाई हि लिंगायत समाजाची होती. तिला कोणीतरी सांगितले की आम्ही मच्छी-ब्राम्हण, मासे खाणारे आहोत असे चुगली केली. त्यामुळे आम्ही घर सोडून जावे या करिता तिने नाना तऱ्हेने आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी आम्ही ते घर सोडून चामराजपेटे भागात पाचव्या रस्त्यावर एक घर भाड्याने घेऊन राहू लागलो. घरमालकाचे तीम्मी नावाच्या घरकाम करणाऱ्या महिलेबरोबर संबंध होते. घरमालकीण छान सुंदर होती, तीन मुलांची आई होती. ते हे कसे सहन करील? ती माझ्याजवळ रोज आपले दुःख सांगत असे. घर सोडून जाते असे म्हणे. पण ती कुठे जाणार? तिला आई वडील, भाऊ बहिण असे जवळचे कोणी नव्हते. ह्या अश्या वातावरणात आम्ही तेथे आठ महिने राहिलो.

एके दिवशी माझे वडील त्यांच्या भाच्याकडे आले हे मला समजले. आम्ही दोघे त्यांना घरी आणायला म्हणून गेलो. आमच्या बरोबर ते आले, पण ते काहीसे अस्वस्थ होते. आल्या आल्या त्यांनी सहा महिन्यांचा असलेला गुरुदत्तला उचलून घेतले, आणि त्याचे पापे घेतले. गुरुदत्तने हसत डोळे मोठे करत हात पाय झाडत त्यांना मिठी मारली. माझ्या वडिलांना मी कित्येक वर्षांनी भेटले होते, मलाही आनंद झाला. माझ्या आईला तिचे यजमान अलाल्याचे रुचले नव्हते. कायम कपाळावर आठ्या ठेवून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत असे. माझे वडील सहनशील होते, त्यांनी आईला अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती एक शब्द बोलली नाही. आमच्या घरी आलेल्या माझ्या आई वडिलांचे हे संबंध पाहूनही, आईच्या भीतीने, आम्हाला सर्व काही मुकाट्याने पाहत राहण्याशिवाय काही करता आले नाही. माझी आई कलकत्त्यावरून बंगळूरूस आल्यानंतर आमच्या घरातील सारा कारभार तिच्याच हातात आला होता. अधिकार जगवण्याच्या बाबतीत माझ्या आईचा हात कोणी पकडू शकणार नाही. मलाही एकट्याने बाळाला सांभाळण्याचे धैर्य होत नव्हते. आई देखील जाता येता ‘मी परत जातेच कशी’, असा धाक भरत असे. माझे वडील मात्र दिवसभर छोट्या गुरुदत्तला खेळवत असत. त्याची देखील आजोबांबरोबर जास्त सलगी होती. मी बोलावले तरी माझ्याकडे विशेष येत नसे. ते काही दिवस अजून आमच्याकडे राहिले असते कि कोण जाणे. याच वेळेस एक घटना घडली. वडील एकदा माझ्या कडे आले आणि म्हणाले, ‘सहा साधू आले आहेत, त्यांना जेवायला घालतेस काय?’ मी हो म्हणाले. पण माझी आई म्हणाली, ‘माझ्याकडून होणार नाही. काय करायचे ते करा’. माझे वडील त्याच दिवशी निघून गेले. मी कितीही समजावले तरी काही ऐकले नाही. शेवटी गुरुदत्तला त्यांच्या मांडीवर ठेवत, रडवेल्या चेहऱ्याने विनंती केली. पण त्यांचा मनाला अतीव दुःख झाले होते, त्यामुळे ते निर्धाराने निघून गेले. तीच आमची पहिली आणि शेवटची भेट. गुरुदत्तला सारखी त्यांची आठवण येत होती, काही दिवस. झोपेत देखील तो त्यांची आठवण काढत असे.

माझ्या आजी-आजोबाना माझे वडील एकुलते एक होते. ते देखील कित्येक नवसाने ते झाले होते. घरात सगळेजण त्यांच्यावर लाड करत असत. त्यांचे मन विशेष करून मोडत नसत. त्यामुळे कि काय त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा हट्टीपणा आला होता, शीघ्रकोपी देखील होते. त्यांचे पंधराव्या वर्षी लग्न लावून टाकले. आईचे वय अकरा होते त्यावेळेस. तिने लहानपणीच आपल्या वडिलांना गमावले होते. तिचेहि तसेच, ती देखील हट्टी होती. तिच्या मनात येईल ते झाले पाहिजे. कोणापुढेही ती मान झुकवत नसे. लग्न होऊन सासरी आल्यावर तिने सगळ्यांशी जुळवून घेता आले नाही. सासू-सून यांच्यात वादविवाद होत असत. पती-पत्नी मध्ये देखील विशेष काही प्रेम नव्हते. तिला एक मुलगा झाल्यावर परिस्थिती बरी झाली होती.

माझे आजोबा शांत स्वभावाचे, प्रेमळ होते. सर्वांशी मिळून मिसळून वागत आणि सगळ्यांना त्यांच्याविषयी आदर वाटे. माझे वडील त्यांच्या वडिलांचे प्रतीरुपच होते. आईकडून हटवादी स्वभाव घेतला असावा. माझ्या आज्जीच्या एक बंधू आमच्या सारस्वत समाजाचे गुरु होते. पांडुरंगाश्रम पासून सर्वांचा आदर प्राप्त केलेले, व्रतनिष्ठ जीवन जगात आलेले होते. माझ्या आजीला ह्याचा खूप अभिमान होता.

माझे आजोबा निर्वतल्यावर घर मोडून पडले. आजी तिच्या मुलीच्या घरी निघून गेली. माझे वडील हुशार होते, इंजिनियरिंग शिकल्यामुले त्यांना चांगली नोकरी मिळू शकत होती. पण त्यांच्या सरळ सध्या स्वभावामुळे ते कुठेच विशेष टिकले नाही. उद्योग धंद्यात देखील ते गेले. पण त्यात एका गौड सारस्वत असलेल्या व्यक्तीकडून फसवणूक झाली. त्यावेळी आईचे दागिने गहाण ठेवून कसे बसे त्यातून निभावले. माझे वडील जेवढे उदार होते, तेवढीच माझी आई कंजूष होती. त्यांच्यात कायम झगडे होत असत, त्यामुळे आम्हा मुलांना आमच्या नातेवाईकांकडे राहावे लागले. एकूणच कष्टातच वाढलो आम्ही.

गुरुदत्त जवळ जवळ सहा महिने रांगत होता. किती मस्ती करायचा. सदा सर्वकाळ त्याच्या मागे कोणीतरी राहायला लागायचेच. सातव्या महिन्यात स्वतःहून बसायला शिकला. त्यावेळेस त्याचे पहिले छायाचित्र मी काढले. गुरुदत्तला शेजारचे घेऊन जायचे आणि खेळवायचे. त्याच्या बाल-लीला नंतर माला सांगायचे. त्याला दृष्ट लागू नये म्हणून माझी आई दररोज त्याची दृष्ट काढून टाकायची. दहाव्या महिन्यात तो चालायला शिकला. सुरुवातीला सुरुवातीला तो कसा काय उभा राहणार असे वाटत होते. सारखा पडायचा, परत उभा राहायचा! सगळे कसे मनमोहक असायचे. कृष्णाच्या बाल-लीला मी माझ्या गुरुदत्त मध्ये पाहत होते. त्याच्या पहिल्या वाढदिवशी आम्ही काही मित्रांना, स्नेह्यांना, नातेवाईकांना आमंत्रण दिले. गुरुदत्त प्रत्येक वस्तू कडे बोट दाखवून हे काय, हे काय असे विचारात फिरला होता. मोठी लोकं त्याच्या प्रश्नांना कधी उत्तरे देत तर कधी निरुत्तर होत. संध्याकाळी त्याला ओवाळत असताना निरांजानावर हात ठेवल्यामुळे हात भाजून घेतला होता. ह्यामुळे मला घरातील थोरल्यांकडून बोलणी खावी लागली होती.

आम्ही राहत असलेले ते घर आमच्या घरमालकाने विकल्यामुळे आम्हाला ते घर सोडावे लागले. तेथूनच जवळच असलेल्या दुसऱ्या रस्त्यावरील एका घरात आम्ही आलो. घरमालक तसे श्रीमंतच होते, पण चांगले देखील होते. ते गुरुदत्तला जे सकाळी घेऊन जायचे, ते पार संध्याकाळीच परत घेऊन येत. त्यांना मुलगा नव्हता. तिन्ही मुलीच झाल्या होत्या. ते गुरुदत्तबरोबर कन्नड भाषेमध्येच बोलत, त्यामुळे कोंकणी भाषेपेक्षा त्याला कन्नडच चांगले यायला लागले. सकाळी सकाळी गवळी गाय घेऊन घरी येत असे, आणि समोर दुध काढून देत असे, ते पाहायला गुरुदत्त तेथे जाऊन उभा राहत असे. घरात मग तो एखादे भांडे घेऊन, गवळ्यासारखे खाली बसून, दुध काढण्याचा अभिनय करत असे, आणि दुधाचे भांडे आणून देत असे. त्याचा हा असा खेळ चाले. आमचे चार खोल्यांचे घर होते. पण ती सर्व रेल्वे डब्यासारखी एका सरळ रेषेत होती. गुरुदत्तच्या खोड्या वाढल्या कि त्याला एका लांब दोऱ्याला बांधून सोडत असे. त्याच्या खोड्या काही थांबत नसत. लगाम असलेल्या घोड्या सारखे त्याचे उद्या मारणे असे, बांधून ठेवलेल्या माकडासारखे त्याचे किंकाळणे असे. बांधून ठेवले असले तरी, त्याला आवरणे कठीण व्हायचे. अंगणात येणाऱ्या पक्ष्यांना मी दाणे टाकत असे, ते त्याने पहिले. झाले, त्याचे सुरु, माझ्या मागे लकडा लावला, मी देखील दाणे टाकतो असा. दिले नाही तर भोकाट पसरे. शेवटी तोच जिंकत असे. गल्लीच कोणी डोंबारी आला, तो क्षणार्धात तो बाहेर उभा असे. डोंबारी खेळ संपवून परत जाई पर्यंत तो तेथेच एकाग्रतेने पाहत थांबे. आतून कितीही हाका मारल्या तरी त्याचे लक्ष नसे.

बंगळूरूमध्ये हरिदास मंडळींची भक्तीपदे गात घरोघरी भिक्षा मागायला कित्येक लोकं येत असत. त्यांना देखील बोलावून ती गाणी, पदे ऐकत असे. हे सर्व पाहून आम्हाला वाटे कि त्याची बुद्धी इतर मुलांपेक्षा जास्त आहे.

(क्रमशः)

माझा पुत्र गुरुदत्त: संपादकीय आणि परिचय

आज(९ जुलै) प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांची जयंती. १९२५ मध्ये आजच त्यांचा जन्म कर्नाटकात बंगळूरू येथे झाला. अजून पाच वर्षांनी जन्मशताब्दी! गुरुदत्तच्या आईने, म्हणजे वासंती पदुकोण ह्यांनी गुरुदत्तचे चरित्र, त्याच्या अकाली मृत्युनंतर कन्नड भाषेत लिहिले होते. मी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे. लॉकडाऊन मुळे ते कधी प्रकाशित होईल माहित नाही. एकेक प्रकरण मी या  ब्लॉग वर टाकत जाईन. गेल्या महिन्यातच मी त्या पुस्तकाची गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना ब्लॉगरुपात, मराठीत येथे प्रसिद्ध केली होती. आज त्याच्या जयंती निमित्त पुस्तकाचे संपादक असलेले मनोहर ग्रंथमालेचे प्रथितयश संपादक जोशी यांचे संपादकीय आणि गुरुदत्त यांचे सुपुत्र आत्माराम यांनी परिचयात्मक लिहिले शब्द देखील येथे देत आहे. तुमचा अभिप्राय जरूर कळवा.

संपादकीय

“नडेदु बंदा दारी”(मी चाललेली वाट) च्या वेळेस (१९५६-५७) मुंबईला गेलो असता कन्नड कलाकारांचे व्यक्तीचित्रण प्रकाशित करावयाच्या उद्देशाने अनेकांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी श्री ना देसाई आणि श्री व्ही के मूर्ती यांच्या बरोबर बोलताना दिग्दर्शक गुरुदत्त बद्दल लिहिले गेले पाहिजे असे समोर आले. त्यावेळी श्रीमती वासंती पदुकोण यांची मुलाखत घेतली. श्रीमती ललिता आझमी(गुरुदत्तच्या भगिनी, प्रसिद्ध चित्रकार) यांनी काही छायाचित्रे देखील पाठवली होती, पण ती त्या पुस्तकात देता आली नाही. नंतरही आमचा पत्र-व्यवहार सुरु होता. त्या दरम्यान गुरुदत्त यांचे आकस्मिक निधन झाले. मग शेवटी वासंतीबाईनी मुलाचे चरित्र लिहून पाठवले. प्रकाशित होण्यास विलंब झाला. गेल्या ऑक्टोबर मध्ये(गुरुदत्त यांचा ऑक्टोबर मध्ये निधन झाले होते) प्रकाशित करायचे ठरले होते. सर्व काही होण्यासाठी वेळ यावी लागते. वासंतीबाई अतिशय संयमाने वाट पाहत राहिल्या, त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

गुरुदत्त यांचे बंधू श्री आत्माराम यांनी त्यांच्या विषयी चार शब्द लिहून आपली स्नेह प्रगट केला आहे. त्यांच्याही प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

श्री गिरीश कार्नाड यांनी ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून देण्याचे कबूल केले होते, पण त्यांना लगेच वेळ झाला नाही. शेवटी त्यांनी कशीतरी फुरसत काढून प्रस्तावना लिहून दिली. हि त्यांची प्रस्तावना ह्या पुस्तकासाठी तिलक लावल्यासारखे शुभ झाले आहे. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.

श्री आर्य यांचे मुखपृष्ठ तयार करून दिल्याबद्दल, भारत प्रिंटींग प्रेस यांचे ते छापून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ह्या पुस्तकाच्या दरम्यान अनेकांचे सहाय्य झाले आहे, त्या सर्वांचे देखील मनःपूर्वक धन्यवाद.

-संपादक

परिचय

माझ्या आईचे सामर्थ्य आठवले कि मला कायमच कौतुक वाटते. एक तर, ती शाळेत गेली नाही; गेली असेल तर एक-दोन इयत्ता शिकली असेल. बाराव्या वर्षी तिचा विवाह झाला. चौदा मुलांना जन्म दिला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे तिने शिक्षिकेचे काम सुरु केले. शिकवता शिकवता ती देखील शिकली. परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन दाखवले. हिंदी भाषा विशारद झाली. कलकत्ता विश्व विद्यालयातून  matrick केले-१९४१ मध्ये; ते देखील तिच्या मुलासोबत, गुरुदत्त बरोबर! त्यावेळी गुरुदत्तचे वय सोळा वर्षांचे होते. १९४३ मध्ये रुईया कॉलेज मधून टीचिंग डिप्लोमा तिने केला. शाळेत शिक्षिकेचे काम करत, कमावत, पाच मुलांचे पालन पोषण केले. वेळ मिळाला तसा थोडेफार समाजकार्य देखील केले. तिला सात भाषा येत-बंगाली, मराठी, हिंदी, तेलगु, तमिळ, इंग्लिश, कन्नड. त्यात वर कोकणी देखील तिला येत असे. विमल मित्र, जरासंध(चारू चंद्र भट्टाचार्य), आणि बानी रे यांच्या पुस्तकांचे भाषांतर केले. हे सर्व बंगाली भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार.

आता तिचे वय सदुसष्ट आहे, पण तिचा उत्साह चकित करणारा आहे. पुस्तके वाचते, सिनेमा, नाटकं पाहते; संगीत मैफिलींना जाते, न कंटाळता ती ऐकते. ती नेहमी काही ना काही करत असते. बंगाली, मराठी, हिंदी, कन्नड, इंग्लिश, पुस्तके ती वाचत असते, आवडले असेल तर त्यावर चित्रपट करता येईल असे ती मला सांगत राहते. परवा परवा आमच्या घरी असताना, करायला काही नसल्यामुळे, गुरुदत्त बद्दलच्या आठवणी का लिहून काढू नये असे मी तिला सुचवले. तिने लगेच काम हाती घेतले, लिहायला सुरुवात देखील केली. ते पाहून मला अतिशय आनंद झाला.

गुरुदत्त हा सर्वात मोठा मुलगा, त्यावर तिचे प्रेम देखील अनोखे. त्याच्या जीवनाबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल, स्वतःबद्दल निःसंकोचपणे, उघडपणे, वस्तुनिष्ठ भाषा शैलीत, निर्हेतुक भावनेने आपली प्रतिक्रिया स्मृती-रूप-चित्र स्वरूपात रेखाटले आहे. गुरुदत्तवर प्रेम करणाऱ्यांसाठी त्याच्याबद्दल आणखीन आपुलकी वाटायला लावणारे असे हे लेखन आहे. गुरुदत्त आता इतिहासजमा होऊन दंतकथा बनून राहिला आहे. त्याच्यावर इतक्यातच दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. माझ्या आईचे त्याच्यावरील हे तिसरे पुस्तक, पण तितकेच वेगळे असणार आहे.

माझे गतदिवस आणि बालपण आठवल्यावर मी देखील बैठक मारून हे सर्व लिहून काढावे असे वाटू लागते. ते सर्व मी केव्हातरी लिहीनच. पण १९४० मध्ये निर्वतलेले माझ्या वडिलांच्या बद्दल येथे दोन शब्द सांगितले नाही तर मी माझ्या कर्तव्यात कुसूर केली असे समजेन. माझ्या वडिलांना व्यवहार ज्ञान असे जवळ जवळ नव्हतेच. जीवनभर ते कारकून म्हणून जगले. असे असले तरी त्यांच्या जवळ आश्चर्यकारक अशी लेखन-शक्ती होती. त्यांनी कविता केल्या, इंग्रजीत लेख लिहित, गुरुदत्त त्याच्या वडिलांचा आदर्श, तसेच आईची कलेची आवड आपल्यात असावे यासाठी धडपडत असे. गुरुदत्तने तयार केलेले सिनेमे तो गेल्यावरही अजूनही आहेत, नंतरही राहतील. तो जनमानसातदेखील राहील. त्यामुळे, वाचकहो, माझ्या आईने लिहिलेले हे तिच्या आवडत्या मुलाचे स्मृती-रूप-लेखन या पुस्तकात वाचा, आणि त्याचे व्यक्तित्व त्याने तयार केलेल्या चित्रपटातून पहा.

आत्माराम

गुरुदत्त कोण?

हा गुरुदत्त कोण बुवा, असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाबद्दल तुम्हाला माहीत नाही असाच होऊ शकतो. पण तुम्हाला जर गुरुदत्त हा हिंदी सिनेमाचा एक संवेदनशील फिल्ममेकर होता हे माहीत आहे, पण तरीही तो कोण होता, कसा होता, आणि इतर प्रश्न त्याच्याबद्दल असतील तर, ते नक्कीच वाजवी आहेत. गुरुदत्त म्हणजे प्यासा, कागज के फूल आणि साहिब बीबी और गुलाम हे चित्रपट, त्यातील प्रसिद्ध गाणी माहिती असतात. माझे देखील तसेच होते. त्याच्या निधनाला पन्नासहून अधिक वर्षे झाली आहेत. दोन पिढ्या दरम्यान होऊन गेल्या. त्याची चित्रपट कारकीर्द वादळी होती. त्याच्याबद्दल अनेक वर्षात अनेक प्रकारे लिहून झाले आहे.

मी २-३ वर्षांपूर्वी सुरु केलेले गिरीश कर्नाड यांच्या पुस्तकाचे, आगोम्मे इगोम्मे या कन्नड पुस्तकाचे भाषांतराचे, काम तसे अजून अर्धवटच आहे, त्यात एक कर्नाडांचा गुरुदत्तविषयी लेख आहे, तो मी वाचला, आणि बरेच दिवस विसरून गेलो. का आणि कसे पण अचानक मला गुरुदत्तच्या आईने(वासंती पदुकोण, १९७६, प्रकाशक-मनोहर ग्रंथमाला, धारवाड) लिहिलेल्या ‘नन्न मग गुरुदत्त’ हे चरित्रात्मक कन्नड पुस्तक हाती पडले. कर्नाडांचा तो लेख म्हणजे ह्या पुस्तकाची त्यांची प्रस्तावना होती. हे पुस्तक गुरुदत्तच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी प्रकाशित झाले होते. गुरुदत यांचे कुटुंब कर्नाटकातील, त्यांच्या जन्म देखील कर्नाटकातील, पण शिक्षण कलकत्ता येथे, आणि त्यांची कर्मभूमी अर्थात मुंबईची चित्रपटसृष्टी.

एक-दोन वर्षांपूर्वी, मी चित्रपट रसास्वाद शिबिराला गेलो होतो. तेथे गुरुदत्तचा उल्लेख झाला, तसेच सत्यजित राय यांचा अर्थातच देखील झाला. खोपकरांचे गुरुदत्त:तीन अंकी शोकांकिका हे पुस्तक होते माझ्याकडे, ते परत बाहेर काढले. सुधीर नांदगावकर यांनी संपादित केलेले गुरुदत्तवरील पुस्तक मागवले. आणि कर्नाडांच्या त्या कन्नड लेखाचे मराठी भाषांतर केले. ते मी येथे देत आहे. वासंती पदुकोण यांच्या त्या पुस्तकाचे देखील मराठीत भाषांतर सुरु केले आहे. गुरुदतच्या आयुष्यावर आणखी प्रकाश त्यामुळे पडणार आहे; गुरुदतचे वेगळेपण परत नव्या पिढीला समजण्यास मदत होईल असे मला वाटते.

Guru Dutt

The back cover of the book by Vasanti Padukone. Biography of Guru Dutt

एखाद्या आईने आपल्या मुलाचे चरित्र लिहावे असा मला माहिती असलेला पहिलाच प्रसंग आहे. नाही चुकलो. सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरचे चरित्र त्यांच्या आईने(मीनल गावसकर) देखील लिहिले आहे, पुत्र व्हावा ऐसा या नावाने ते पुस्तक आहे. पण ते नंतरचे आहे, १९८७ मधील. गुरुदत्तवरील पुस्तक १० वर्षे आधी आले. असो.

अनुवाद: माझा पुत्र गुरुदत-प्रस्तावना(गिरीश कार्नाड)

श्रीमती वासंती पदुकोण यांच्या बरोबर माझी पहिली भेट त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार सुरु झाल्यावर दीड वर्षांनी झाली. असे असले तरी पहिले पत्र वाचतातच त्या माझ्या अतिशय परिचयाच्या असल्याचा भास झाला. मुंबई मध्ये ‘संस्कार’ चित्रपट पाहून आल्यावर त्यांनी मला पहिले पत्र लिहिले होते. ‘मी गुरुदत्तची आई’ असे सुरुवात केलेले पत्र चित्रपटाबद्दल प्रशंसा करणारे होते, आणि काहीश्या अनिवार्यपणे त्यांनी गुरुदत्तबद्दल बरेचसे लिहिले होते. असे चित्रपट पाहिल्यावर पुत्राच्या आठवणी, त्याचे कलात्मक अभिनय, अर्थपूर्ण चित्रपट करावे असा त्याला असलेला ध्यास,त्याच्या अकाली मृत्यूमुळे अर्ध्यावरच थांबलेल्या कित्येक योजना, असे त्यांनी बरेच काही पत्रातून लिहिले होते.

ते पत्र आता माझ्याकडे नाही. तरी पण त्या पत्रात शेवटी आलेला मजकूर अजून लक्षात आहे. ‘मी लहान असताना मला नीट शिक्षण मिळाले नाही. मार्गदर्शन मिळाले नाही. काहीतरी करायला जावे तर त्यात खोडा घालणारे लोकच जास्त. त्यावेळी माझ्या पाठीशी राहून, मला उत्तेजन दिले असते तर, मी अजून बरेच काही केले असते. काही तर नक्कीच मिळवले कमावले असते.

हि गोष्ट मला अतिपरिचयाची वाटली. त्या पत्रातील त्यांच्या भावना. कळकळ हि एका पिढीची होती. त्या काळी विशी-एकविशीच्या उंबरठ्यावर असलेल्या समस्त सारस्वत स्त्रियांचीच ती मनोव्यथा त्या सांगताहेत असे मला वाटून गेले.

ह्या पुस्तकाचा विषय म्हणजे गुरुदत्त जो चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आहे. मी चित्रपट जगतात वावरत असल्यामुळे किंवा माझे चित्रपट श्रीमती पदुकोण यांना आवडत असावेत, त्यामुळे त्यांनी मला हि प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली असावी. असे असले तरी मी हि ‘स्मृतिचित्रे’ वाचल्यावर मला भावलेली गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकात आढळणारे सामाजिक प्रश्न.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी ‘चित्रापूर’ सारस्वत समाज हा कुमटा-मंगळूरू दरम्यानच्या प्रदेशात भूभागात एकवटलेला होता. काही एक अपवाद सोडले तर, बहुसंख्य सारस्वत समाज हा आर्थिकदृष्ट्या गरीबच होता. उद्योग धंदा करण्याएवढी चतुरता त्यांच्या जवळ नव्हती. जमीन कसण्याची शारीरिक क्षमता जवळ नाही. ब्रिटीशांनी भारतात घट्टपणे पाय रोवल्यावर, कारकुनाची नोकरी करण्याला त्यांना जमले होते, त्यावेळेस हि सर्व मंडळी, मोठ्या शहरांकडे, विशेषतः पुण्या मुंबईकडे स्तायिक होऊ लागले.

ह्या समाजाची लोकसंख्या तशी फार मोठी नाही, त्यामुळे हा नवीन पेशा आणि त्याच्याबरोबर आलेली नागरीकरणामुळे ह्या समाजावर पटकन परिणाम झाला. वरिष्ठ पदाची नोकरी हे ध्येय ठरल्यामुळे, त्याच्या आड येणाऱ्या सारस्वत समाजाचे संस्कार त्या आड आले तरी ते नाकारायला, ओलांडायला कठीण गेले नाही. हे सपष्ट करण्यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. समुद्र प्रयाण हे त्यांच्या मठाने बहिष्कृत केले होते. पण चांगल्या पदावरील नोकरी मिळवण्याकरिता इंग्लंडला जाणे आवश्यक झाले होते. पाहता पाहता बरेच जन परदेशगमन करून आले, आणि त्याचा परिणाम म्हणून अर्धाहून अधिक सारस्वत समाज मठाने बहिष्कृत केला. पण त्यामुळे झाले काय तर, मठाची सारी आर्थिक गणिते फिस्कटली. जाती बाहेर गेलेल्या मंडळीनी काही प्रयशित्त देखील घेतले नाही. शेवटी मठाने बहिष्कार मागे घेऊन त्यांना सामावून घेतले.

नवीन विचार नवीन आचार ह्या समाजात पसरू लागला, हे खरे आहे, पण समाज याचा अर्थ येथे त्यातील पुरुषमंडळी असा घ्यावा लागेल. बदलाचे वारे जरी पुरुषांना निर्भयपणे आपलेसे करण्यात काही अडचण आली नाही, पण स्त्रियांना तसे करायचा अधिकार नव्हता. दोन ‘बुकं’ शिक्षण, वयाची तेरा वर्षे ओलांडायच्या आताच झालेले लग्न, पंचविशीच्या आत कमीतकमी अर्धा डझन मुले पदरी पाडून, तारुण्य कुस्करले जाऊन, उरलेले सारे जीवन पत्नी म्हणून, आई म्हणून जगण्याचे भागदेय काही बदलले नाही.

महाराष्टात त्या काळी तीव्र वेगाने सामाजिक क्रांती सुरु झाली होती. कर्वे, गोखले वगैरे मंडळीनी स्त्री शिक्षण, विधवाविवाह या करिता आंदोलने सुरु केली होती. लक्ष्मीबाई टिळक, रमाबाई रानडे ह्या सारख्या समाजसुधारक महिला पुढे येऊन एक नवीन आदर्श समाजापुढे ठेऊ पाहत होत्या. त्यामुळे गाव मागे टाकून शहराकडे पुरुषांबरोबर आलेल्या सारस्वत महिलांना हे सर्व दिसत असल्यामुळे, त्यांच्या आशा-आकांक्षाना नवीन धुमारे फुटू लागले यात आश्चर्य ते काय. असे असले तरी सामाजिक जीवनात हे नवीन बदल अंगीकारत असताना, मानसिक बदल, विचारांतील बदल अजून म्हणावे तितके झाले नव्हते.

वासंतीबाईंच्या पहिल्या पत्रात मला दिसलेली ही तळमळ मी त्या पिढीतील इतर स्त्रियांकडूनही पूर्वी ऐकली होती.

‘त्यावेळी स्त्री शिक्षण नुकतेच सुरु झालेले होते. माझ्या शाळेची मुख्याध्यापिका घरी येऊन वडिलांच्या पाया पडून विनंती करत होत्या कि हिला शाळेत पाठवा, ती अतिशय हुशार आहे, पुढे ती काहीतरी नक्कीच करेल. पण त्यांनी ते ऐकले नाही, आणि माझा वयाच्या पंधराव्या वर्षीच विवाह लावला’. १९१४ मध्ये घडलेला हा प्रसंग साठ वर्षानंतर देखील आठवून डोळ्यात पाणी काढलेल्या महिला मी पहिल्या आहेत.

सामाजिक विरोधाला न जुमानता तसेच परिणामांची पर्वा न करता आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याचा ध्यास, आपल्या कर्तृत्व शक्तीवर असलेला विश्वास त्या वेळच्या स्त्रीयांकडे होता: स्वतःहून अथवा भाऊ असेल, किंवा पती असेल यांची मदत घेऊन शिक्षण पूर्ण करून, विणकाम शिकणे, संगीत शिकणे, नर्स, शिक्षिका किंवा समाज सेविका यांचे प्रशिक्षण घेणे, कथा, कविता, भजन, कीर्तन लिहिणे, उतार वयात आकाशवाणी वर कोकणी कार्यक्रमात भाग घेणे, अश्या अनेक उपक्रमातून त्या कार्यरत राहत असत.(चित्रपट शृष्टी म्हटले कि मध्यमवर्ग अजूनही नाक मुरडत असे, घाबरत असत. असे असताना चाळीस वर्षांपूर्वी भावाने वासंतीबाई यांना ‘तू काही काम का करत नाहीस?’ असे दिवचाल्यावर त्यांनी चित्रपटासाठी एक हिंदी पटकथा लिहून, मुंबईला जाऊन त्यावेळचे चित्रपट सम्राट चंदुलाल शाह यांच्या ती देऊन त्या आल्या होत्या हे येथे नमूद केले पाहिजे). असे सगळे असले तरी, त्यावेळी, शेवटी ह्या स्त्रीयांच्या नशिबी पुढे विशेष काही आले नाही.

अशी अतृप्त, अस्वस्थ मनोवृत्ती झाल्यामुळे. हि अपूर्ण महत्वाकांक्षा त्यांनी आपल्या मुलांच्या जीवनात पाहिली. आपल्याला जे जमू शकले नाही त्यांच्या हातून घडावे ह्या करता त्या आग्रही राहिल्या. त्यामुळे ‘माझा पुत्र गुरुदत्त’ हे जरी वैयक्तिक चरित्र न राहता, त्या वेळच्या सामाजिक प्रतिक्रियेचे विस्ताराने केले चित्रण आहे असे म्हणू शकतो.

तरीसुद्धा असा परकाया प्रवेश सोपा नसतो, त्यात धोके असतात. वैवाहिक जीवनात सुख असे नव्हतेच. त्यांचे पती, जे त्या पिढीच्या साऱ्या पुरुषांचेच प्रतिनिधी करणारे असे होते, मध्यमवर्गीय मुल्यांवर विश्वास असणारे, जीवनात सुस्थिती, स्थैर्य असावे असे वाटणारे, सरकारी नोकरीच्या गुंगीतून येणारी निष्क्रियता, या मुळे विकासाला पोषक असे वातावरण नव्हते आणि आवश्यक असा संयम असाही नव्हता. याहुनही विशेष म्हणजे स्वतःची मुले यशस्वी होऊन पुढे ती त्यांना सोडून गेली याचे दुःख त्यांना झेलावे लागले. आपला मुलगा आयुष्यात मोठा होत आहे, यशस्वी होत आहे, नाव कमावत आहे, या विषयी असलेले समाधान होतेच, पण त्याच बरोबर तो आपले असे वेगळे स्वातंत्र्य जीवन जगणार आहे, आपल्या दुःखाभोवती तटबंदी निर्माण करतो आहे, अश्या अनुभवांना देखील त्यांना सामोरे जावे लागले. शेवटी आपल्या जीवनात आपल्याला जे साधले नाही ते आपल्या मुलांत पाहत असताना, ते शक्य झाले नाही, हा व्यक्त केलेला विषाद असे सर्व या पुस्तकात येते.

आधी सांगितल्याप्रमाणे, हा सर्व अनुभव हा काही याच पुस्तकाच्या निमित्ताने आलेला नाही. किंवा त्या पिढीच्या साऱ्या स्त्रियांच्या नशिबी असेच जीवन आले होते असेही मी म्हणत नाही. पतीची नोकरी, त्याहून वरची मुलांची नोकरी, सुसंकृत, शिष्टाचारी मुलगी, सासू, लहानपणापासून मनी जपलेले स्वप्न, मनातील रेडियो, मोटार-कार, संगीताच्या रेकॉर्ड्स, या सगळ्यात संतृप्त अश्या ह्या स्त्रीया जीवनात मागे राहिल्या. त्या सर्व स्त्रिया पुण्यशील होत्या.

असे असले तरी ‘माझा पुत्र गुरुदत्त’ मध्ये मला जाणवलेले म्हणजे रोष, आंतरिक पिशाच्च या विरुद्ध त्यांचा लढा दिसतो. श्रीमती पदुकोण यांनी माझ्या बद्दल, आणि त्यांच्या जवळपास असणाऱ्याबद्दल काही न लपवता, न विसरता लिहिले आहे. बहुशः, विविध यातना सहन केल्यामुळे, त्या पिढी मध्ये अशी प्रामाणिकता, धैर्य दिसून येते.

(फेब्रुवारी १९७६)