नागरिक/सैनिक

गिरीश कार्नाड यांचे एक कन्नड पुस्तक आगोम्मे ईगोम्मे (२००८, प्रकाशक मनोहर ग्रंथमाला, धारवाड) हे मी सध्या भाषांतरित करत आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा, व्यक्तिचित्रांचा, वेळोवेळी दिलेल्या भाषणांचा संग्रह आहे. बरेच लेख मूळ कन्नड भाषे मधीलच आहेत. काही इंग्रजी मधील आहेत, ते त्यांनी कन्नड मध्ये भाषांतरित करून पुस्तकात समाविष्ट केले आहेत.

त्या पुस्तकातील एक लेख म्हणजे अहमदनगर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९९८ मध्ये झाले, त्याच्या उद्घाटनानिमित्त केलेले भाषण होय. ते मूळ कन्नड मधील आहेत. त्यांनी एक टीपण देखील जोडलेले आहे. संमेलनाच्या वेळी त्यांना सरोज देशपांडे यांनी मराठीत भाषांतर करून दिले होते असे त्यांनी त्या टिपणात नमूद केले आहे. भाषणाचे मराठी भाषांतर अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या कुठल्या तरी पुस्तकात नक्की असणार. असे असले तरी, मी माझे भाषांतर ह्या टिपणाच्या भाषांतराच्या बरोबर केले आहे (त्या मूळ टिपणातील संवेदनशील असा भाग मी ब्लॉग मधून वगळला आहे). ते आज ह्या ब्लॉगच्या रूपाने देत आहे. ब्लॉगच्या सोयीकरता मी काही भागात विभागून देणार आहे. आज पहिला भाग.

एप्रिल २०२२ मध्ये ९५ वे अखिल मराठी साहित्य संमेलन येऊ घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठी वाचकांना आवडेल असा विश्वास वाटतो आहे. तसेच त्यांचे कन्नड मराठी अनुबंधाविषयी मांडलेले विचार देखील आवडतील.

नागरिक/सैनिक

२ जानेवरी १९९८ रोजी अहमदनगर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले . त्याच्या उद्घाटनानिमित्त केलेले भाषण म्हणजे हा लेख होय.

माझ्या भाषणामुळे फक्त संमेलनात नव्हे तर बाहेर देखील ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यामुळे मी दंग झालो. महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये माझ्या भाषणाची बातमी पहिल्या पानावर छापली गेली. बऱ्याच वर्तमानपत्रांतून त्यांतील संपादकीय रकान्यातून देखील भाषणाचा उहापोह केला गेला. त्याबद्दल अग्रलेखही आले. सकाळ, महारष्ट्र टाईम्स, इंडियन एक्स्प्रेस, इकॉनॉमिक पोलिटिकल विकली या सारख्या वर्तमानपत्रांतून अख्खे भाषणच छापले होते. संमेलन संपल्यानंतर देखील कित्येक दिवसा भाषणाचे समर्थन तसेच टीका करणाऱ्या प्रतिक्रिया येत राहिल्या. संमेलनाच्या एखादा महिना आधी मुंबईत घडलेल्या एक घटना देखील ह्या प्रतिक्रियेच्या मुळाशी होती.

महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारने एका मोठ्या कार्यक्रमात महारष्ट्रातील मराठी लेखक, नाटककार पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आणि पाच लाख रुपये पारितोषिक देवून सत्कार केला होता. पु. ल. पार्किन्सनच्या आजाराने ग्रस्त होते. तरी सुद्धा त्यांनी एक-दोन मिनिटे प्रयासाने का होईना, पण बोलले. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या हिंसाचाराच्या प्रती उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली होती. लोकशाही मार्गाने सत्ता काबीज करून नंतर ठोकशाहीचा मार्गाचा अवलंब करण्याविरुद्ध ते बोलले होते. त्यांनी कुठल्याही व्यक्तीचे अथवा राजकीय पक्षाचे नाव घेता हि प्रतिक्रिया नोंदवली होती. (edited) ह्या मुळे महाराष्ट्रात वादळ उठले. (edited) मी अहमदनगर येथे गेलो असता लक्षात आले कि वातावरण तंग आहे. मी या प्रकरणाबद्दल काय बोलणार आहे ह्या बद्दल बऱ्याच पत्रकारांनी मला विचारले. (मराठी साहित्य संमेलनात आपल्या इथल्यासारखी राजकारण्यांची हावळी नसते, हे लक्षात घेतले पाहिजे).

ह्या पार्श्वभूमीवर माझ्या भाषणात एक विशिष्ट अन्व्यार्थ दडला होता. मी मराठीत भाषण केले. (प्राध्यापक सरोज देशपांडे यांनी माझे भाषण मराठीत भाषांतरित केले होते.) (edited)

त्या तंग वातावरणात संतप्त लोकांना माझ्या भाषणात त्यांच्या मनातील रोष दिसला असेल. पण मी इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. ह्या भाषणातील मुख्य मुद्दे मी आधीच काही कर्नाटकातील कार्यक्रमात मांडले होते, जसे कुवेंपू विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, तसेच श्री बरगुर रामचंद्र यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या कर्नाटक साहित्य अकादमीच्या सभे देखील मी बोललो होतो.

फक्त राजकीय दडपशाही नाही तर, लष्करी दडपशाही जी नागरिकांच्या हक्कांना पायदळी तुडवणारी विचारसारणी आपल्या समाजाला पांगळे बनवते असा मी माझा विचार मांडला होता.

गिरीश कार्नाड यांच्या अध्यक्षीय भाषणाचा मराठी अनुवाद

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटना साठी तुम्ही मला आमंत्रित करून माझा मोठा सन्मान केला आहे याची मला जाणीव आहे. आज कन्नड मध्ये इतके मोठमोठाले साहित्यिक असताना त्या साहित्याचा प्रतिनिधी म्हणून मला तुम्ही निवडले हा देखील माझा गौरव आहे.

एक गोष्ट मी सुरुवातीलाच मान्य केली पाहिजे. मराठी साहित्याच्या ह्या महान सभेत मी उभा राहिलो असता, माझ्या मनात ‘मी बाहेरचा आहे’ हि भावना अजिबातच नाही. माझा जन्मच ,मुळी महाराष्ट्रातला आहे. माझे प्रारंभिक शिक्षण मराठीत झाले आहे. तसेच माझ्या साऱ्या कुटुंबाला मराठी साहित्याबद्दल रुची आहे. आनंद मासिक, हरी नारायण आपटे , खांडेकर, तसेच स्वराज्य, तेच स्त्री मासिक, किर्लोस्कर मासिक, सकाळ वर्तमानपत्र हि नावे मला अपरिचित नाहीत. हि वाचूनच मी मोठा झालो. वाढलो.

सुदैवाने समकालीन मराठी रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या बऱ्याच प्रतिभावान व्यक्तींशी माझा संपर्क आला. तेवढेच नाही तर, मला मराठी नाट्यपरंपरेचा वारसा मला माझ्या आई-वडिलांकडून आला आहे असे मी मानतो. माझ्या वडिलांनी संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ या नाटकांचे पहिले प्रयोग पाहिले होते. त्या बद्दल ते अतिशय आस्थेने बोलत असत. माझी आई तिच्या लहानपणी म्हणे घरातील थोरल्या मंडळींचा डोळा चुकवून बालगंधर्व कसे डोक्यावर पदर घेऊन गाणी गात तसे ती अनुकरण करत असे. मी कन्नड नाटक मंडळीची नाटके पाहिली ती दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या दिवसात. त्या काळात कन्नड नाटक मंडळीला उतरती कळा लागली होती. तरी सुद्धा त्यांच्या वर मराठी नाटकांची पडछाया स्पष्ट दिसत होती. त्यांपासून मी प्रभावित झाली, प्रेरित झालो.

कन्नड-मराठी! या दोन श्रीमंत संस्कृतीच्या संगमाच्या ठिकाणी लहानाचे मोठे होण्याचे, लिहिण्याचे परमभाग्य मिळालेल्या द. रा. बेंद्रे, किंवा शं. बा. जोशी या दोघांची नावे घेतली तरी पुरेसे आहे. ह्या दोघांची मातृभाषा मराठी. धारवाड शेजारी शेजारी राहत असत. खऱ्या शेजाऱ्यांमध्ये जशी भांडणे होतात, तशी त्यांच्यात देखील होत असत. मात्र त्यांचे भांडण कन्नड मध्ये होत असे!

तामिळनाडू मध्ये भक्ती संप्रदाय उगम पावला, आणि कर्नाटकात देखील पसरला. कर्नाटकात वचन साहित्य उगम पावले, आणि महाराष्ट्रात पसरले. ह्या पुण्यभूमीत ज्ञानेश्वर नामदेवादी संतांनी त्यांचे वाड्मय निर्माण केले. ह्या पासून स्फूर्ती घेऊन कर्नाटकात दास साहित्य निर्माण झाले. जर उत्तरभारतात देखील पसरले, असे इतिहासकार सांगतात. धर्म, कला, साहित्य, नात्य, तत्वज्ञान या क्षेत्रात दोन्ही संस्कृतींमध्ये कायम देवाणघेवाण होत आली आहे.

फाराकांबाद्द्ल बोलायचे म्हणजे, कन्नड साहित्यात महाकाव्य परंपरा हा प्रमुख भाग आहेत. दहाव्या शतकात सुरु झालेली हि परंपरा आजही अव्याहतपणे सुरु आहे. कन्नड भाषेच्या संवेदनेला विशिष्ट्य शक्ती प्रदान करते.

या मुळे आधुनिक कन्नड साहित्य मराठी साहित्याकडे दोन बाबतीत कौतुकाने, आदरपूर्वक पाहते. पहिली गोष्ट म्हणजे, विनोदी साहित्य. आम्ही कन्नडिग हसतो जरूर, पण कन्नड मध्ये विनोदी साहित्य तसे विरळच आहे. त्या मुले गडकरी, अत्रे, कोल्हटकर, चिं वि. जोशी, पासून पु. ल. देशपांडे यांच्या पर्यंत श्रेष्ठ विनोदी साहित्यकार मराठीत आहेत ह्याची आम्हाला असूया वाटते. पु. ल. देशपांडे तर विनोदी साहित्य, तसेच रंगभूमी या दोन्ही क्षेत्रात वावरले. ते विशाल हृदयाचे होते, तसेच निर्व्याज मानवियता हा त्यांचा गुण होता. ते माझे प्रिय मित्र आहेत हे सांगायला मला अभिमान वाटतो.

दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात असलेली निष्ठावंत सामाजिक राजकीय विचारवंतांची परंपरा. आगरकर, गोखले, फुले, टिळक, आंबेडकर, कर्वे, हि सगळी बुद्धिवादी मंडळी कार्यकर्ते, ज्यांनी मराठी भाषेत निर्भय पणे त्या विषयांची चर्चा, वाद-विवाद, चिंतन, परीक्षण, करण्याची परंपरा सुरु केली. धुळ्यात माझे एक मित्र श्री शरद पाटील राहतात. फुले-आंबेडकर-मार्क्सवादी पक्ष त्यांनी सुरु केला. त्यांची मला आलेली पत्रे, ज्या त्यांनी विविध विचार निर्भयपणे मांडले असतात, ती वाचून आपणही विचार करायला प्रद्युक्त होतो, हे पाहिल्यावर अशी परंपरा मराठी मध्ये, महाराष्ट्रात अजूनही जिवंत आहे याचा भरवसा वाटतो. केवळ मराठी बद्दल न बोलता, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे असल्यास, ह्या राज्यात जन्म झालेले अनेक पारसी, गुजराती, मुस्लीम आणि इतर विचारवंत यांची नावे घेतली तरी पुरेसे आहे.

(क्रमशः)

Leave a comment