कन्नड नाटक आणि मी

काही दिवसांपूर्वी कन्नड नाटक या विषयावर माझे भाषण झाले. धारवाडच्या अभिनय भारती या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळाली होती. हा ब्लॉग म्हणजे ते संपादित भाषण आहे. गेली चार दशके हि संस्था कर्नाटकात कन्नड नाटक चळवळीशी निगडीत आहे. पुण्यात राहून कन्नड भाषेत, त्यातही कन्नड नाटक विषयी काम करणाऱ्या चार वक्त्यांना बोलावण्यात आले होते. हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह होता. प्रसिद्ध अनुवादिका उमा कुलकर्णी यांचे देखील भाषण झाले, आणि त्या कन्नड नाटकांच्या अनुवादांशी निगडीत अनुभवांबाबत बोलल्या. वेळेअभावी मी पाहिलेल्या सगळ्याच कन्नड नाटकांबद्दल खूप बोलता आले नाही. पण मी त्या त्या वेळेला लेख लिहिले आहेत, त्यांची संकेतस्थळे मी येथे दिली आहेत.

कार्यक्रम पत्रिका

तो कार्यक्रम युट्युब वर उपलब्ध आहे.

नमस्कार

सर्वात आधी मी माझी ओळख करून देतो. माझे नाव प्रशांत कुलकर्णी, पुण्यात राहतो. पण माझे मुळ कर्नाटक, निंबाळ गावाचा. माझे प्रमुख कार्यक्षेत्र म्हणजे माहिती तंत्रज्ञान, ज्यात मी गेली ३० वर्षे कार्यरत आहे. छंद, किंवा हौस म्हणून इतर बऱ्याच क्षेत्रात माझी लुडबुड चालू असते. मी सह्याद्री डोंगररांगांमध्ये , महारष्ट्र कर्नाटक मिळून १५० अधिक किल्ल्यांवर भटकंती केली आहे. साहित्य, संगीत, भाषा, नाटक, चित्रपट (film appreciation course at NFAI) या या क्षेत्रांत रुची आहे. माझा ब्लॉग मी चालवतो आहे, त्या द्वारे माझे लेखन सुरु असते. कन्नड भाषेतील साहित्य मराठीत अनुवादित करण्याचा छंद आहे. २०१४ मध्ये मुंबई स्थित ग्रंथाली ने माझे अमीरबाई कर्नाटकी हे अनुवादित पुस्तक प्रकाशित केले. प्रसिद्ध अभिनेता गुरुदत्त यांच्या आईने त्याचे कन्नड भाषेतील चरित्र मी मराठीत अनुवादित केले आहे, जे या ब्लॉग वर उपलब्ध आहे. अजूनही एक दोन पुस्तकांवरकाम चालू आहे. बरीच कन्नड लेख देखील मराठीत अनुवादित केले आहेत. त्याच प्रमाणे मी मानसिक आजार क्षेत्रात देखील काम करतो (Schizophrenia Awareness Association).

मला या व्यासपीठावर बोलण्यास संधी दिल्याबद्दल श्री अशोक डंबल यांचा मी आभारी आहे. मी देखील आपल्या सर्वांप्रमाणे प्रथम विविध कलांचा एक आस्वादक आहे, रसिक आहे. त्याच नात्याने, कन्नड नाटकांच्या आस्वादाचा माझा प्रवास मी आज थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहे. खरे तर नाटकांप्रमाणेच कन्नड चित्रपटांबद्दल देखील मी पूर्वी माझ्या ब्लॉग वर लेख लिहिला होता (मी आणि कन्नड चित्रपट).

मी तसे पाहिले तर पुणेकरच, कारण माझे शिक्षण, व्यवसाय सर्व पुण्यातच झाले, होत आहे. पण आपल्या सर्वांप्रमाणे माझ्या वंशवृक्षाची मुळे कर्नाटकात आहेत. जन्म विजापूर(सध्या विजयपूर) जिल्ह्यातील निंबाळ या गावी(जेथे गुरुदेव रानडे यांच्या आश्रम आहे). दहावी परीक्षा दिल्यानंतर लागलेल्या सुट्टीत आईने कन्नड भाषा वाचायला(आणि थोडीफार लिहायला) शिकवले. घरी कन्नड बोलले जात असे, आणि तसेच कन्नड मासिके येत असत. ती मी थोडीफार वाचत असे अधूनमधून.

पण एकूणच साहित्य आणि तसेच विविध ललित कलांच्या अस्वादाकडे आयुष्यात मी जरा उशिराच ओढलो गेलो. पोटार्थी व्यवसाय आणि इतर संसारिक बाबी थोड्या स्थिरस्थावर झाल्यावर, २००० साली , काही निमित्ताने आधी नाटकं आणि मग इतर कलांच्या आस्वादाकडे जाणीवपुर्व लक्ष द्यायला लागलो. प्रायोगिक नाटके, तसेच व्यावसायिक नाटके पाहू लागलो. या सगळ्याचा इतिहास , एकेमकांवर झालेला प्रभाव याचा अभ्यास करू लागलो. मला आठवते, २००१ च्या सुमारास मला प्रसिद्ध नाट्यसमीक्षक वि भा देशपांडे यांचा मराठी नाट्यकोश हाती लागला. त्यात मराठी नाटकांच्या जोडीने, कन्नड रंगभूमी बद्दल, मीना वांगीकर यांचा लेख, वाचायला मिळाला. पुण्यातील स्नेहसदन येथे तसेच अलीकडे सुदर्शन रंगमंच येथे बरीच मराठी प्रायोगिक नाटके पहिली.

तशातच माझ्या इतिहासाच्या प्रेमापोटी मला २००४ मध्ये Indology अभ्यासक्रमाला प्रवेश घेता आला, आणि त्यातील विविध विषय शिकता शिकता झालेल्या वाचनामुळे मराठी-कन्नड भाषा, तसेच एकमेकांवर असलेला संस्कृती प्रभाव या बद्दल थोडेफार वाचायला मिळाले.

आणि २००७ मध्ये मी पहिल्यांदा बंगळुरास गेलो असता मी पहिले कन्नड नाटक पाहिले. ते म्हणजे प्रसिद्ध कन्नड लेखक भैरप्पा यांच्या मंद्र ह्या कादंबरीवर आधारित असलेले आणि तेही रंग शंकर या सुप्रसिद्ध अश्या कन्नड नाट्य चळवळशी निगडीत वास्तू मध्ये. रंग शंकर हे कन्नड नाट्य, चित्रपट अभिनेते शंकर नाग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या पत्नी अरुंधती नाग यांनी स्थापन केलेली संस्था. प्रायोगिक नाटके, कन्नड तसेच इतर भाषांतील नाटके, नाट्यप्रशिक्षण, या सर्व क्षेत्रात हि संस्था कायम कार्यरत असते. त्यावर्षीच्या बंगळूरू भेटी दरम्यान, कन्नड चित्रपटसृष्टीचा १९६० आणि १९७० च्या दशकातील सुपरस्टार असलेल्या डॉ. राजकुमार यांचा कन्नड जनमाणसावर असलेला प्रभाव मी अनुभवला. पण तो वेगळा विषय आहे, कारण आज कन्नड नाटक हा विषय आहे. असो.

नंतर पुढे त्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये अमोल पालेकर यांनी पुण्यात रंगसंगीत नावाचा नाट्यमहोत्सव आयोजित केला होता. त्यात अनेक कन्नड नाटकांचे प्रयोग होणार होते. एणगी बाळप्पा, तसेच आपल्या भारदस्त आवाजामुळे सुप्रसिद्ध अश्या बी जयश्री हे देखील येणार होते. एणागी बाळप्पा हे कन्नड संगीत रंगभूमी वरील मोठे नाव. गुब्बी विरण्णा सारखेच. दुर्दैवाने त्यांचे पुढे २०१७ मध्ये निधन झाले ते वयाच्या १०३ व्या वर्षी. गुब्बी विरण्णा यांची मुलगी, म्हणजे जी व्ही मालाताम्मा या देखील आल्या होत्या. मला त्या महोत्सवात बरीच नाटके माहायला मिळाली. लक्ष्मीपती, चित्रपटा, कारीमाई, चैती, गिरीजा कल्याण. तसेच कन्नड लोकरंगभूमी वरील सुप्रसिद्ध असे कृष्ण पारिजात हे लोकनाट्य देखील पाहायला मिळाले. पुढे काही वर्षांनंतर मला म्हैसूर येथील गणेश अमीन यांनी लिहिलेले एणगी बाळप्पा यांचे चरित्र भेट म्हणून पाठवले. त्याचा मी अनुवाद करत आहे. त्यात देखील तत्कालीन मराठी आणि कन्नड भागातील नाट्य व्यवहाराविषयी, होत असलेल्या देवाण घेवाणी विषयी माहिती मिळते.

त्याच वर्षी दसऱ्या निमित्त पुण्यातील कन्नड संघातर्फे एक कौटुंबिक नाटक सदर केले गेले. त्याचे नाव होते इडु जोडू. ६०-७० ह्या दशकात आलेल्या मराठी कौटुंबिक नाटकाप्रमाणेच हलकेफुलके नाटक धारवाडी कन्नड भाषेत पाहताना मजा आली होती.

२००८ मध्ये पुण्यात समन्वय तर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बी व्ही कारंथ रंगमहोत्सव नावाचा एक नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी देखील मला बरीच वेगवेगळी कन्नड नाटके पाहायला मिळाली होती. गिरीश कार्नाड यांचे हयवदन, डॉ. चंद्रशेखर काम्बार यांचे जोकुरस्वामी, पुतिना यांचे गोकुळ निर्गमन हि ती नाटके होत. बी व्ही कारंथ ह्यांनी नाटकांचे दिग्दर्शन नाही केले तर, त्यांनी संगीत देखील दिले बऱ्याच नाटकांना. त्याचा देखील आढावा सदर करण्यात आला होता त्या कार्यक्रमात. बी व्ही कारंथ कर्नाटकातील नाट्य-चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नाव. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटके दिग्दर्शित केली आहेत. त्यांनी रंगायन हे नाट्यसंस्था देखील स्थापन केली आहे.

२००८ मध्ये धारवाड महोत्सव असतो असे समजले होते, पण जायला जमलेच नाही. त्यात नाटकांशिवाय इतर कला प्रकार सादर होणार होते. विविध जानपद कलांचे सादरीकरण देखील होते.

पुढे एकूणच कलाटणी देणारी घटना घडली. २००९ मध्ये एका कन्नड मासिकात (मयूर) गोहारबाई कर्नाटकी आणि बालगंधर्व यांच्या संबंधावरील लेख वाचला. त्याचे महत्व जाणून मी त्याचे मराठी मध्ये अनुवाद करून ग्रंथाली प्रकाशनचे श्री दिनकर गांगल यांना दिला. त्यांनी तो थिंकमहाराष्ट्र या पोर्टलवर प्रकाशित केला. आणि त्यामुळेच त्यांनी पुढे मी अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी चे चरित्र २०१४ मध्ये प्रसिद्ध पुस्तक प्रकाशन संस्था ग्रंथाली यांनी प्रकाशित केले. ह्या पुस्तकाच्या अनुवादाने एकूणच स्वातंत्र्यपूर्व कालीन कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक संबंध कसे होते, हिंदुस्तानी राग संगीत, संगीत नाटक यांची कशी जोपासना झाली याचा सगळा पट उलगडला.

२०१२ राजेंद्र कारंथ यांचे एक नाटक बदकील्लदवन भावगीते मी बंगळूरू मध्ये के के कला सौध रंगमंदिरात पहिले. त्याचा प्रयोग चित्तार संस्थे तर्फे आयोजित राष्ट्रीय कारंथ नाटकोत्सव कार्यक्रमात आयोजित कण्यात आले होते. इतरही नाटके त्यावेळी होणार होती, पण ती पाहता नाही आली, जसे अभिनेत्री, गंगावतरण वगैरे. पुढच्या वर्षी पुण्यात सुदर्शन रंगमंच येथे नाटक केत्ताकथा पहिले, त्यात बी. जयश्री यांनी काम केल्याचे आठवते.

२०१५ मध्ये एकोणिसाव्या शतकातील कर्नाटकातील प्रसिद्ध कवी, नाटककार नारायणराव हुईलगोळ यांच्या चरित्राच्या एकूण खंडांपैकी एक खंड माझ्या हाती लागला. त्यांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्या भाषण त्यात दिले होते. त्यात त्यांनी मराठी रंगभूमी कशी जोमाने वाढत आहे, आणि तिचा उगम कर्नाटकातील लोकनाट्य अविष्कारात आहे हे त्यांनी ठासून नमूद केले होते.
अतुल पेठे यांचे सत्यशोधक हे नाटक मला कन्नड मध्ये देखील अनुभवण्याची संधी कन्नड संघामुळे लाभली. मी ते मराठी देखील आधी पहिले होते. हे नाटक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर आहे(ता. क. महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक समाज संस्था सप्टेंबर २४, २०२२ तारखेला दीडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे) . डी एस चौगुले यांनी ते नाटक मराठीतून कन्नड मध्ये अनुवादित केले होते. त्यांचेच आणखीन एक कन्नड नाटक वखारी धूस या नावाचे अतुल पेठे सादर करणार असे त्यांनी त्या वेळेस जाहीर केले होते, पण अजून तरी ते आले नाही असे दिसते. त्याच वर्षी माझ्या बंगळूरूच्या भेटी दरम्यान महान कन्नड नाटककार श्रीरंग यांचे कत्तले बेळकू हे नाटक पाहायला मिळाले, ते देखील बंगळुरातील रंग शंकर येथेच.

२०१६ मध्ये मला कर्नाटकातील हेग्गाडू येथे निनासम मध्ये जायला मिळाले. निनासम म्हणजे निलकंठेश्वर नाट्य सेवा मंडळी के व्ही सुब्बण्णा यांनी निर्माण केलेल्या ह्या नाट्य शिक्षणाची पंढरी असलेल्या ह्या संस्थेत प्रती वर्षी आठवडाभराचा संस्कृती शिबीर नावाचा एक निवासी अभ्यासक्रम राबवला जातो. नारळा, पोफळीच्या बागा असलेल्या अतिशय रमणीय या गावात आणि आजूबाजूच्या परिसरातील सामान्य लोकांना बरोबर घेत जात नाट्य चळवळ, नाटक कला जोपासण्याचे मोठे कार्य ह्या संस्थेने केले आहे. अश्या परिसरात वसलेल्या ह्या संस्थेत काही दिवस राहता आले हे माझे भाग्य. दररोज संध्याकाळी तेथील नाट्यगृहात विविध कन्नड नाटके (काही नवी, तर काही जुनी, क्लासिक). त्यात काम करणारे कलावंत म्हणजे निनासमचे विद्यार्थी, तसेच गावातील हौशी कलाकार. गेली कित्येक वर्षे हा प्रयोग चालू अतिशय यशस्वी पणे चालू आहे. तुमच्या पैकी कोणाला शक्य असेल तर जरुर यावे. त्याच वर्षी प्रकाश गरुड यांचे दोड्डाटा आणि सन्नाटा या कर्नाटकातील दोन लोकंनाट्य प्रकाराबाद्द्ल्चे सादरीकरण अनुभवता आले, पुण्यातील सुदर्शन रंगमंच येथे. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी बरेच संशोधन करून या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

२०१७ लोकशाकुन्तल हे कन्नड नाटक बंगळूरू मध्ये National School of Drama च्या आवारात असलेल्या नाट्यगृहात हा दीर्घांक मी पहिला. कालिदासाच्या शाकुंतल या संस्कृत नाटकाचा के व्ही सुब्बण्णा कृत कन्नड अविष्कार तो हि याक्षगानाच्या लोकरंगभूमीच्या रुपात वेगळा अनुभव होता तो. त्याबद्दल मी ब्लॉग लिहिला होता.

२०१८ रंग शंकर मध्येच दोन नाटके पहिली. पहिले होते चित्रा, जे रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रांगदा या नावाच्या बंगाली नाटकाचा इंग्लिश अनुवाद होता. दुसरे जे मी पहिले ते म्हणजे गिरीश कार्नाड यांचे milestone नाटक तलेदंड जे आपल्याला माहिती आहे कि कर्नाटकातील महान संत बसवेश्वराच्या जीवनावर बेतले आहे.

२०२१ मध्ये बंगळुरास गेलो होतो पण एकूणच कोरोना मुळे लावलेल्या निर्बंधामुळे नाटके पाहायला जाता आले नाही.
ह्या वर्षी (२०२२) मात्र एक मोठी संधी लाभली. एक-दोन महिन्यांपूर्वीच पुण्यातील कन्नड संघ ह्या संस्थेतर्फे भैरप्पा यांच्या पर्व या महाकादंबरी वर आधारित एक महानाट्य याचा एक प्रयोग आयोजित करण्यात आला होता. याच कन्नड संघातर्फे मी पूर्वी कधीतरी गुढी पाडव्याच्या वेळेला यक्षगानचा प्रयोग पहिला होता. जवळ जवळ सात तासांचा हा महाप्रयोग कुठेही कंटाळवाणा होत नाही. विषय आहे महाभारत आणि भैरप्पांनी त्या मधील स्त्री पात्रांच्या बाजूने मांडलेले विचार हे प्रयोगात खिळवून ठेवतात. महाभारतावरील नाटक, तेही एवढे मोठे, त्यावरून प्रसिद्ध नाटककार पीटर ब्रूक्स यांच्या इंग्रजी नाट्यप्रयोगाची आठवण होते. त्या बद्दल मी वाचले आहे, प्रयोग पाहिलेला नाही. त्यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील कन्नड संघ हि संस्था कित्येक दशकांपासून पुण्यातील कन्नड भाषिक लोकांना एकत्र आणण्याचे कार्य करते आहे.

तुफान लोकप्रिय अश्या मुख्यमंत्री या कन्नड नाटकाचा प्रयोग देखील मी पुण्यातच पहिला होता, कधी ते आठवत नाही. कन्नड संघ तर्फेच तो आयोजित केला गेला होता. मुख्यमंत्री चंद्रु या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याने मुख्यमंत्र्यांची भूमिका अगदी इरसाल रीतीने केली होती, ते पाहून मला निळू फुले यांच्या इरसाल राजकीय भूमिका आठवत होत्या.

असा हा माझा आतापर्यंतचा कन्नड नाटकांच्या अनुभवांचा प्रवास. अजूनहि बरीच नाटके पहायची आहेत, बरेच अनुवाद प्रकल्पांवर काम करायचे आहे. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल अभिनय भारती(धारवाड) संस्थेचे आभार आणि सर्व श्रोत्यांचे देखील आभार. मला वाटते पुढील सोमवारी कथावाचनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत, ठीक ७ वाजता. पुन्हा भेटू!

Leave a comment