बाकीबाब

परवा जुलै ८ रोजी, मराठी कवी बा भ बोरकर(टोपणनाव बाकीबाब) यांचा स्मृतिदिन साजरा झाला. त्यानिमित्त परत त्यांच्या आठवणी, कविता यांचा जागर झाला. मला गेल्यावर्षी त्यांचे १९८२ मधले ललित लेखांचा संग्रह असलेले एक पुस्तक(चांदण्याचे कवडसे) रस्त्यावर जुन्या पुस्तकाच्या गठ्ठ्यात सापडले होते. त्यावेळी मी तसा थोडासा चकितच झालो होतो. बोरकर मला फक्त कवी म्हणून माहिती होते. त्यांनी गद्य लेखन केले आहे हे माझ्या गावी देखील नव्हते.  मला जाणवले कि बोरकरांबद्द्ल पूर्वी इतके ऐकूनही मी त्यांचे काही वाचले नव्हते. घेतलेले पुस्तक परत वाचले पण त्यांच्या इतर साहित्याची ओळख करून घ्यायला सवड झाली नव्हती. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आकाशवाणी वर व्यंकटेश माडगुळकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी सांगितले होते कि ते महात्मा गांधी यांच्यावर महाकाव्य(महात्मायन) रचत आहेत, पण ते पूर्ण करण्याच्या आत त्यांचे निधन झाले. शोध घेता घेता असे समजले कि त्यांनी कथा, कादंबरी, अनुवाद, चरित्र, ललित असेही भरघोस विपुल लिहिले आहे. पोर्तुगीज, कोकणी भाषेतही लिहिले आहे.

बोरकर गोव्याचे, गोमंतकातील हे माहित होते. पण बोरकर पुण्यात १४ वर्षे राहिले हे माहिती नव्हते. त्यांना सारखी गोव्याची ओढ वाटत असे. जी ए कुलकर्णी यांच्या बाबतीत तेच झाले होते. त्यांना सारखी बेळगाव/धारवाडची आठवण येत असे आणि पुणे आवडत नसे.

त्यांच्या कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम पु ल देशपांडे आणि सुनिता देशपांडे करत असत, दूरदर्शनवर पूर्वी कधीतरी पाहिल्याचे आठवत होते. आजच दूरदर्शनवर पु ल देशपांडे आणि बाकीबाब यांचा सहभाग असलेला प्रतिभा आणि प्रतिमा हा जुना कार्यक्रम देखील अनायासे तासभर पाहता आला. त्यात बाकीबाब म्हणतात कि त्यांची कविता हि त्यांचा आत्माविष्कार आणि आत्माविस्तार असते, ते किती खरे आहे हे कार्यक्रम पाहताना आणि त्यांचे मराठी, कोंकणी काव्यगायन ऐकताना वाटत होते.

त्यांच्या निसर्ग आणि प्रेम विषयाच्या कविता यावरून त्यांना आनंदयात्री असे देखील संबोधले जाई. त्यांच्या काही कविता खूप प्रसिद्ध आहेत, जसे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती,  ​ओवीबद्ध असलेली माझ्या गोव्याच्या भूमीत  ही कविता, जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग , झिणि झिणी वाजे बीन सख्या रे अनुदिन चीज नविन, जीवन त्यांना कळले हो, अनंता तुला कोण पाहू शके?  इत्यादी. ही सर्व गीते आपण कायम ऐकत असतो कुठे ना कुठे!

बाकीबाब यांची जन्मशताब्दी २००९ मध्ये झाली. त्या निमित्त त्यांच्या आणि त्यांच्या योगदानावरील वाड्मयाची तपशीलवार सूची तयार करण्यात आली, ती ‘कविवर्य बा भ बोरकर जन्मशतसांवत्सरिक’ या नावाने प्रसिद्ध झाली. ती येथे आहे, रसिकांनी ती जरूर पहावी. त्यात एका पुस्तकाची नोंद  होती, ज्याचे नाव पोएट बोरकर असे होते,आणि ते प्रसिद्ध समीक्षक व दि कुलकर्णी यांनी लिहिले होते. ते ईबुक स्वरूपात मला मिळाले. त्यात त्यांनी केलेल्या बोरकरांच्या कवितांचे निरुपण, प्रेरणा याचे विवेचन भावते. त्यांच्या भक्तीपर असलेल्या कवितांविषयी त्यांनी लिहिले आहे. परवा असे वाचनात आले कि त्यांच्या पत्रांचा एक संग्रह बाकी संचित या नावाने गोवा मराठी अकादमीने नुकताच प्रकाशित केला आहे. त्यातून बोरकर यांच्याबद्दल आणखीन दुर्मिळ माहिती समोर येईल.

आता चांदण्याचे कवडसे या माझ्याकडे असलेल्या ललितलेखांच्या संग्रहाबद्दल. त्यातील सुशेगाद हा लेख मला खूप आवडला. गोव्यावर पोर्तुगीज संस्कृतीचा ठसा उमटला आहे. सुशेगाद  या मूळ पोर्तुगीज शब्दाच्या अर्थाच्या आज कोण कोणत्या छटा प्रचलित आहेत ते सांगितले आहे. एक प्रमुख अर्थछटा आहे तो संथ प्रकृती, संथपणा दर्शवणारी, जी गोव्याच्या जीवनात आहे! अजून एका लेखात ते गृहस्थाश्रामाबाबत सांगताना तीन सूत्रे आपल्या हाती देतात. Sense of priorities(अग्रक्रम), sense of proportion(प्रमाण) आणि sense of propriety(औचित्य) अशी ती तीन सूत्रे! त्यांच्या पुस्तकांच्या आणि वाचनाच्या हव्यासाबद्दल दोन लेख आहेत. हायकू या मुळ जपानी काव्यप्रकाराबद्दल एक लेख आहे. स्वप्नांबद्दल लिहिताना पौगंडावस्थेत असताना त्यांना पडलेल्या एका शृंगारिक/कामुक स्वप्नाबद्दल आणि झालेल्या स्खलनाबद्दल  मनमोकळेपणाने लिहितात. आणि त्यांच्या आवडत्या विषयावर म्हणजे निसर्गावर, त्याच्या विविध रूपावर, तन्मयतेने तीन-चार लेख आहेत. ह्या ललितलेखांच्या संग्रहाव्यतिरिक्त कागदी होड्या, पावलापुरता प्रकाश, घुमटावरचे पारवे हे त्यांचे इतर ललितलेख संग्रह देखील आहेत.

बोरकरांचे रवींद्रनाथ टागोरांच्यावर अतिशय प्रेम होते. त्यांच्यावर देखील त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. गोवा मुक्ती संग्रामात देखील त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. पोर्तुगीज राजवटी मध्ये ते लहानाचे मोठे झाले असल्यामुळे त्यांच्यावर युरोपियन संस्कृतीचे, संगीताच, सौंदर्य विषयक विचारांचे, तत्वज्ञानाचे संस्कार झाले होते.

मी कवितेच्या प्रांतात शिरलो नाही अजून, थोडा लांबच राहिलो आहे. पण या निमित्ताने का होईना कवितेच्या आस्वादाची रुची लागली तर चांगलेच आहे. कविता ऐकायला मजा येते. आवडते पण जाणून बुजून कविता वाचूयात असे क्वचित घडले आहे. दिवाळी अंकांतील कवितेची पाने मी क्वचित पाहतो. कविता वाचणे म्हणजे शास्त्रीय राग संगीत ऐकण्यासारखे किंवा अमूर्त चित्रांचा आस्वाद घेण्यासारखे थोडा अमूर्त कारभार आहे असे मला वाटते. शास्त्रीय राग संगीत ऐकण्याच्या, कानसेन होण्याच्या मार्गावर चालतो आहे, बाकीच्या दोन गोष्टींकडे वळायचे आहे अजून. काही वर्षांपूर्वी प्रा. विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलय काव्यात हा कवितांचा कार्यक्रम पाहिल्याचे आठवते. कवितेला वाहिलेल्या काव्यरत्नावली(१८८७ ते १९३५) द्वैमासिकाच्या वाटचालीवर एक संशोधनपर पुस्तक नुकतेच हाती लागले आहे. कविता-रती या नावाच्या अजून एका कवितेला वाहिलेले द्वैमासिकाबद्दल मला नुकतेच समजले आहे. हे द्वैमासिक १९८५ मध्ये बोरकरांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे स्वकीय पुरुषोत्तम पाटील यांनी सुरु केले होते. ह्या दोन्ही उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आधुनिक कवितेच्या परंपरेचा इतिहास समोर येतो. नुकतेच सुरेश भटांच्या जयंती निमित्त त्यांची मुलाखत, त्यांच्या कविता, आणि मराठी गझला ऐकल्या होत्या, जाणून घेता आले होते. त्याबद्दल देखील लिहायचे आहे नंतर केव्हातरी.

असो, तात्पुरते तरी बोरकरांच्या इतर साहित्यकृतींचा शोध घ्यायचा आहे. पाहूयात कसे जमते ते. बोरकरांच्या पोर्तुगीज भाषेतील लेखनाबद्दल मराठीत कोणी जाणकारांनी लिहिले आहे का ते माहित नाही, नसेल तर लिहिले पाहिजे. असो, पण त्यांना बाकीबाब हे टोपणनाव कसे मिळाले हे अजून कुठे सापडले नाही!

स्मरण आचार्य अत्र्यांचे

आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे हे दोघेही मराठीतील सुप्रसिद्ध लेखक, आणि तेही विनोदी. पण तसे दोघेही अनेक क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहिलेले. या दोघांचे नाव माहित नसलेला मराठी माणूस विरळा, अर्थात आत्ताच्या पिढीचे काही सांगता येत नाही! १२ जून हा पु ल देशपांडे यांचा स्मृतीदिन, तर आचार्य अत्रे यांचा १३ जूनला असतो. काय विचित्र योगायोग आहे नाही! पु ल देशपांडे यांचे निधन होऊन वीस वर्षे झाली ह्या वर्षी(२०२०), तर आचार्य अत्रे यांचे निधनाला दोन वर्षांपूर्वी(२०१८) पन्नास वर्षे झाली. सर्वसामान्य मराठी वाचकांप्रमाणे, रसिकांप्रमाणे, मी दोघांचेहि थोडेबहुत साहित्य वाचले आहे, आणि इतर क्षेत्रातील त्या दोघांचे कर्तृत्व थोड्याफार प्रमाणात माहित आहे. मी पु ल देशपांडे यांच्या एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाबद्दल थोडेसे लिहिले आहे या आधी(काय वाट्टेल ते होईल). आचार्य अत्रे यांच्या बद्दल काहीच लिहिले नव्हते. कालच त्यांचा स्मृतीदिन साजरा झाला, त्यामुळे हा लेखन-प्रपंच.

आचार्य अत्रे

आचार्य अत्रे यांचे अर्कचित्र(निवडक ठणठणपाळ या पुस्तकातून साभार)

अर्थात आचार्य अत्रे यांना मी पुस्तकांतूनच अधिक अनुभवले आहे, कारण त्यांच्या निधनाच्या वेळी मी जेमतेम एक वर्षांचा होतो! सुदैवाने पु ल देशपांडे यांना प्रत्यक्ष पाहता आले होते. साधारण १२-१५ वर्षांपूर्वी मी आचार्य अत्रे यांच्या स्मृतीदिनानिमित पुण्यातील बाबुराव कानडे यांच्या आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती विविध वक्ते देत होते. बाबुराव कानडे आचार्य अत्रे यांचे शिष्य. आचार्य अत्रे यांच्या प्रेमापोटी त्यांनी हे प्रतिष्ठान आणि त्याच बरोबर विनोद विद्यापीठ देखील उभारले आहे. पु ल देशपांडे देखील आचार्य अत्र्यांना गुरु मानायचे.

माझ्या आठवणीप्रमाणे त्यांच्या कवडी चुंबक या नाटकातील एक उतारा आमच्या नववी किंवा दहावीच्या मराठीच्या पुस्तकात होता. पण माझ्या वाचनप्रवासात अत्रे थोडे उशिरा आले असे म्हणावे लागेल. अत्र्यांचे आत्मचरित्र कऱ्हेचे पाणी (याचे पाचही खंड) हे मला वाटते मी गंभीरपणे वाचलेली त्यांची पहिली साहित्यकृती. त्यांची तोंडओळख हि शाळेतील पाठ्य पुस्तकांतून झालेली होतीच. त्यांच्या मुलीने म्हणजे शिरीष पै यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांतून देखील त्यांच्या बद्दल आणखीन समजते. एकूणच अफाट व्यक्तिमत्व होते त्यांचे. त्यांच्या वकृत्वाचे, हजरजबाबीपणाचे, तसेच फटकळपणाचे किस्से अजूनही चर्चिले जातात. आचार्य अत्रे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान फार मोठे आहे. मराठी चित्रपटाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो त्यांच्या श्यामची आई या चित्रपटाला(आणि योगायोग पहा, परवाच ११ जून साने गुरुजींचा स्मृतिदिन होता). प्रसिद्ध नाटके मोरूची मावशी, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी आणि इतरही बरीच अशी त्यांच्या नावावर आहेत.

गेल्यावर्षी असेच पाथारीवरील जुन्या पुस्तकांच्या ढिगात आचार्य अत्रे यांचे केशवकुमार या टोपण नावाने प्रसिद्ध झालेल्या विडंबन काव्याचा संग्रह झेंडूची फुले हे पुस्तक अवचित हाती लागले. विडंबन काव्याची परंपरा खंडित झाली आहे असे दिसते आहे(माझे नागपूरकडील एक नातेवाईक प्रा. सुरेश खेडकर हे विडंबन काव्य करतात आणि ती सादर देखील करतात. त्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे एप्रिल फुले असे आहे). त्यांचे समाधीवरील अश्रू हे मला भावलेले पुस्तक. त्यांनी अनेक मान्यवर व्यक्तींच्या मृत्युनंतर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखांचा संग्रह आहे. मुलांसाठी लिहिलेले नवयुग वाचनमाला हि पुस्तके देखील अतिशय लोकप्रिय होती. माझ्याकडे असलेले अजून वेगळे पुस्तक जे आचार्य अत्रे यांनी लिहिले नाही, पण ते त्यांच्या विषयी आहे. त्याचे शीर्षक आहे आदेश विरुद्ध अत्रे, पु भा भावे यांचे. आदेश हे नागपूर वरून प्रसिद्ध होत असलेले पु भा भावे संपादित मराठी साप्ताहिक. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या नवयुग मधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अशिष्ट अशी टीका केली होती. आदेश मधून पु भा भावे यांनी त्याच प्रकारे त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यावरून आदेश आणि अत्रे यांच्यात न्यायालयीन तंटा झाला. त्याचा पु भा भावे यांनी या पुस्तकात वृत्तांत दिला आहे. पुस्तकाची प्रथमावृत्ती आहे १९४४ मधील आहे. ते सर्व वाचणे मनोरंजक आहे; अत्र्यांच्या आणि समोरच्या पक्षाच्या विचारांचे त्यातून दर्शन होते. आचार्य अत्रे यांनी असे अनेक वाद-विवाद ओढवून घेतले आहेत. जसे अत्रे-ना सी फडके वाद, अत्रे-बाळासाहेब ठाकरे वाद!

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या विनोद गाथा या पुस्तकात विनोदाचे थोडेफार तात्विक विवेचन केले आहे. ते नक्कीच उदबोधक आहे. त्यात ते म्हणतात कि समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निघाली, त्यात विनोदाचे रत्न कसे सापडले नाही याचे राहूनराहून आश्चर्य वाटते. आचार्य अत्रे यांचा आवडता आणि अतिशय प्रसिद्ध शब्द म्हणजे गेल्या ‘दहा हजार वर्षांत..’! हे अतिशयोक्ती स्वरूपाचा विनोदाचे उदाहरण आहे. या निमित्त एक किस्सा सांगितला जातो. पु ल देशपांडे यांच्या विषयी बोलताना ते म्हणतात, ‘पु ल देशपांड्यासारखा विनोदी लेखक येत्या दहा हजार वर्षांत होणार नाही’. कुणीतरी बोलले कि, ‘आचार्य, तुम्ही फार अतिशयोक्ती करता बुवा’. यावर आचार्य अत्रे उत्तरले, ‘अरे, यात अतिशयोक्ती कसली? मला अतिशयोक्तीच करायची असती तर मी म्हणालो असतो की पु ल देशपांड्यासारखा विनोदी लेखक येत्या दहा हजार वर्षांत होईल! असे हे अत्रे!

१९५-६० च्या काळात लोणावळा खंडाळा हे अनेक प्रसिद्ध लोकांचे आवडते ठिकाण होते असे दिसते. प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्तच्या चरित्रात त्याच्या लोणावळा खंडाळा येथील घराचा उल्लेख आहे. आचार्य अत्रे यांचे देखील ते आवडते ठिकाण होते, त्याबद्दल, त्यांच्या खाद्य रसिकते बद्दल, तेथील विविध मैफिलीबद्दल त्यांनी चवीने लिहिले आहे. काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रातून वाचले होते कि त्यांचे तेथील घर राजमाची दर्शन हे डॉ बावडेकर यांच्या मालकीचे आहे आणि त्यांनी त्याची चांगली देखभाल केली आहे. हि चांगली बातमी आहे. साहित्यिकांची घरे हि पुढच्या पिढीसाठी प्रेरक असतात. त्याबद्दल मी पूर्वी लिहिले होते(लेखकाचं गाव लेखकाचं घर).

पु ल देशपांडे नवीन पिढीला माहित आहे असे म्हणता येईल, पण तसे आचार्य अत्रे यांच्या बाबतीत नाही म्हणता येणार. नव्या पिढीला आचार्य अत्रे नावाच्या झंझावाताची थोडीफार कल्पना यावी याकरिता त्यांच्या नावाचे संकेतस्थळ(website) सुरु करायला हवे किंवा एखादा माहितीपट/चरित्रपट करायला हवा(असेल तर मला कल्पना नाही). जसे पु ल देशपांडे आणि गदिमा यांची संकेतस्थळे आहेत त्याच धर्तीवर. त्यामुळे रसिकांच्या मनात नक्कीच त्यांच्या स्मृती कायम राहतील आणि प्रेरणा देत राहील. आजचे प्रसिद्ध व्हिडियो समाज माध्यम Youtube वर चारी अत्रे यांच्या बद्दल बरेच साहित्य आहे.  दरवर्षी त्यांच्या जन्मगावी(सासवड) येथे त्यांच्या जयंतीच्या(१३ ऑगस्ट) निमित्ताने आचार्य अत्रे साहित्य संमेलन आयोजित केले जाते, ती नक्कीच स्पृहणीय गोष्ट आहे.

ता. क. आज(सप्टेंबर ८, २०२०) कळले कि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे निधन झाले. त्यांनी लिहिलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारित हुतात्मा हि कादंबरी खूप गाजली होती. त्यावर आधारित वेब मालिका देखील आली होती गेल्यावर्षी. त्याचे भाग मी पाहतो आहे, त्यात आचार्य अत्र्यांची भूमिका अभिनेता आनंद इंगळे यांनी चांगली आठवली आहे. ती मालिका जरूर पाहा.

लेखकाचं गाव लेखकाचं घर

आपल्याला वाचनाची, साहित्याची आवड असेल तर, आपल्या आवडत्या, प्रसिद्ध लेखकाबद्दल माहिती करून घेणे हे नक्कीच उत्सुकतेचे असते. मॅजेस्टिक प्रकाशनने खूप वर्षांपूर्वी लेखकाचे घर नावाचे पुस्तक प्रकशित केले होते. विख्यात लेखकांचा त्यांच्या वास्तूशी असलेल्या संबंध उलगडून दाखवावा, त्याच्या लेखनाशी घराचे असलेले नाते स्पष्ट करावे या उद्देशाने ललित मासिकात लेखमाला आली होती. त्यांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक. त्यात प्रामुख्याने मराठीतील अनेक प्रथितयश लेखकांच्या घरांबद्दल मनोवेधक माहिती संकलित केली आहे. काही वर्षांपूर्वी गणपती पुळे येथे गेलो असता केशवसुत यांचे निवासस्थान पहिले होते.

या पुस्तकात अश्या २५-३० लेखकांच्या स्वकीयांनी, मित्रांनी घराचे, वास्तव्याचे वर्णन करणारे लेख लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ, माधव आचवल, माडगुळकर बंधू (त्यांची घरे म्हणजे पंचवटी, आणि अक्षर), प्रभाकर पाध्ये, मधू मंगेश कर्णिक, अनिल अवचट, जयवंत दळवी, इंदिरा संत, कुसुमाग्रज, गंगाधर गाडगीळ, यांच्या निवासस्थानांबद्द्ल वाचता येईल. जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे यांच्या निवासस्थानाबद्द्ल का नाही हे समजले नाही. अरुणा ढेरे यांनी रा. चिं. ढेरे यांच्या घराबद्दल लिहिले आहे, ते आता संशोधन केंद्र झाले आहे.

व्यंकटेश माडगुळकर यांच्या चरित्ररंग या पुस्तकातील काही लेख असेच काही लेखकांच्या घराबद्दल, गावाबद्दल लिहिले आहे. आणि तेही पाश्चात्य लेखकांच्या बद्दल. पाश्चात्य जगातील लेखकांच्या गावाबद्दल, घरांबद्दल असलेल्या पुस्तका असले तर मला तरी माहिती नाही. व्यंकटेश माडगुळकर हे किती विविधांगी लेखन करत याचा अनुभव प्रत्येक वेळेस त्यांचे एखादे नवीन पुस्तक हाती घेतल्यावर येतो. हे पुस्तक वाचले त्याचा प्रत्यय परत आला. तो खरे तर पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. त्या लेखांची विभागणी दोन भागात आहे. एका भागात त्यांच्या चित्रपट क्षेत्राशी निगडीत तीन चार आठवणी आहेत. आणखीन एका भागात त्यांनी तीन इंग्रजी लेखकांची आगळीवेगळी ओळख करून दिली आहे. त्या भागात अर्थात इतरही काही लेख आहेत जसे की चित्रकार देऊस्कर यांच्यावरील व्यक्तिचित्रणात्मक लेख.

माडगुळकर यांचे इंग्रजी वाचन देखील अर्थातच अफाट होते. त्यांनी चितारलेले हे तीन इंग्रजी लेखक म्हणजे Liam O’Flaherty, John Steinbeck, Kenneth Wilkie. मला यातील John Steinbeck फक्त माहिती होता, त्याची काही पुस्तके माझ्याकडे आहेत, काही वाचली आहेत. दुसरा Liam O’Flaherty हा कसा समुद्रकिनारी राहून तेथील प्राणी, पक्षी जीवन आपल्या कथा, कादंबऱ्यांत आणले आहे त्याच्याबद्दल आहे, आणि तिसरा लेख Kenneth Wilkie यांचे The van Gogh Assignment या पुस्तकाच्या निर्मितीची कथा, त्याच्याविषयीच्या लेखात आहे.

John Steinbeck च्या लेखात माडगुळकर त्याच्या अमेरिकेतील गावी दिलेल्या भेटीचे वर्णन करतात. John Steinbeck हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील Salinas ह्या गावी जन्माला, बराच काळ तेथेच त्याचे वास्तव्य होते. त्याच्या कादंबऱ्या ह्या सर्व त्याच भागात घडतात. मी देखील २००४ मध्ये कॅलिफोर्नियात गेलो असता, Salinas च्या आसपासच्या (Monterey Bay) भागाला भेट दिली होती. हा लेख वाचताना त्या सर्वांची मला परत आठवण झाली. त्या भेटीबद्दल मी येथे लिहिले आहे. माडगुळकर Salinas मधील त्याच्या घराला भेट देऊन आले.

Liam O’Flaherty वरील लेखात सुद्धा त्यांनी त्याचे आयर्लंड मधील समुद्रकिनारचे गाव, आणि त्याच्या कथा, कादंबऱ्यांतून तो आलेला परिसर यांचे छान वर्णन त्यांनी केले आहे. समुद्र, किनारा, तेथील प्राणी, पक्षी जीवन, हेच त्याचे विषय आहेत. याची कुठलीच पुस्तके माझ्या कडे अजून नाहीत, किंवा वाचली देखील नाही.

Vincent van Gogh वरील त्यांचा लेख म्हणजे त्याच्याविषयी Kenneth Wilkie याच्या शोधाच्या खटपटीचा धावता परिचय आहे, ज्यात Vincent van Gogh च्या वास्तव्याच्या विविध ठिकाणांची माहिती येते. उदाहरणार्थ Netherlands मधील Neunen या खेडेगावी जेथे तो दोन वर्षे राहिले, तेथे छानसे संग्रहालय आहे. तसेच Paris शहरातील एका इमारतीतील असलेले त्याचे वास्तव्य, तसेच लंडनमधील वास्तव्य, बेल्जिअम मधील त्याची वास्तव्याची ठिकाणे याबद्दल आले आहे. फ्रान्स मधील Arles गावातील त्याचे Yellow House नावाने प्रसिद्ध असलेले घर देखील Kenneth Wilkie ने पहिले.  माझ्याकडे Lust for Life नावाचे Irvine Stone लिखित Vincent van Gogh चे चरित्र आहे. मला vangoghroutes.com नावाची एक छान वेबसाईट सापडली . त्याच्या विविध वास्तव्याच्या ठिकाणची माहिती संकलित केली आहे.

असो. मी दोन-तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे गेलो असता Edgar Allan Poe या इंग्रजी कथाकाराचे निवासस्थान पहिले होते, त्याबद्दल येथे लिहिले आहे. फक्त लेखकांच्या घराचे कशाला, प्रसिद्ध व्यक्तीच्या घराबद्दल आपल्याला नक्कीच उत्सुकता असते. जसे दिल्लीला गेलो असता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे घर, राष्ट्रपती भवन, मुंबईत चित्रपटसृष्टीतील ताऱ्यांची, तारकांची घरे, आणि इतर. हे सर्व पाहताना, वाचताना समृद्ध करणारे अनुभव देऊन जातात. सुप्रसिद्ध कन्नड लेखक कुवेंपू आणि शिवराम कारंथ यांची कर्नाटकातील निवासस्थाने(अनुक्रमे तीर्थहल्ली, पुत्तूर), शेक्सपिअरचे घर, रविन्द्रनाथ टागोर यांचे घर देखील पाहायला जायचे मनात आहे कितीतरी दिवसापासून, पाहुयात कसे काय जमते.

प्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे यांचे पुण्याजवळ फलटण भागात विंचुर्णी गावात असलेले त्यांचे घर, घराशेजारी असलेले तळे वगैरे त्यांच्या विंचुर्णीचे धडे या पुस्तकातून वाचायला मिळते. पुणे आकाशवाणी वर नुकताच एक कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी निवेदिका गौरी लागू आणि इतर काही लेखिका हे सर्व विंचुर्णी येथे त्यांचे घर पाहायला गेले होते. तेथे गेल्यावर त्यांना काय दिसले, गौरी देशपांडे यांच्या पुस्तकांतून आलेल्या विविध व्यक्तीरेखा, स्थळे, विंचुर्णीच्या घराचे बांधकाम चालू असतानाचे उल्लेख या सर्वांबद्दल प्रत्यक्ष भेटीवर चांगला तासभर कार्यक्रम केला.

तुमचे काय आठवणी, अनुभव आहेत अश्या लेखकांच्या घरांबद्दल, गावाबद्दल?

 

माझा वाचनप्रवास, भाग#१

ब्लॉगचे शीर्षक वाचून दचकू नका. मी काही फार मोठा वाचक वगैरे नाही(लेखक तर मुळीच नाही). साहित्याचे माझ्या जीवनात असलेले स्थान याबद्दलही लिहिणार नाहीये. वाचनप्रांतात थोडीफार लुडबुड करतो वेळ मिळेल तसा. आणि वाचलेल्या पुस्तकांबद्दल(तसेच इतर गोष्टींबद्दल) लिहायला आवडते, म्हणून लिहितोही. आज असेच मनात आले की आपण कधीपासून वाचायला लागलो, काय वाचले लहानपणी वगैरे. मग बसलो त्याबद्दलच लिहायला. हे एक प्रकारे स्मरणरंजनच(down the memory lane) म्हणा हवे तर.

मला आठवतय त्याप्रमाणे माझ्या घरी, अथवा आसपास वाचनसंस्कृती अशी काही गोष्ट अस्तित्वातच नव्हती. चाळीतील कनिष्ठ मध्यमवर्गीय जगणे. थोड्याफार अभ्यासाव्यतिरिक्त इतर मुलांबरोबर हूडपणा, व्रात्यपणा यातच वेळ जायचा. घरची परिस्थिती बेतासबात असल्यामुळे वर्तमानपत्र देखील अगदी कधीतरी येत असे. शाळेतही ग्रंथालय वगैरे नव्हते. पण झाले असे, आठवी-नववीत असताना माझा एक हात मोडला, आणि १५-२० दिवस जायबंदी झाला. शाळेला कित्येक दिवस दांडी झाली. तेव्हा मला आठवते त्याप्रमाणे, जवळच एक छोटेखानी वाचनालय होते, ते लावले. आणि सुरु झाला आमचा वाचनप्रवास! ते चिंतामणी वाचनालय आणि तेथील उपाध्ये नावाचे गृहस्थ, अजून डोळ्यांसमोर आहे. या आधी मी ब्लॉगवर वाचनालयांवर एक लेख लिहिला होता.

अधून मधून वडील मुलांसाठी असलेली मासिके घरी आणायचे. जसे चांदोबा, चंपक, आनंद वगैरे वाचल्याचे आठवते. चांदोबा विशेष प्रिय, त्यातील विक्रम आणि वेताळ यांच्या गोष्टींसाठी. काही वर्षांपूर्वी तर मी चांदोबाचा collectors’ edition एक विकत घेतली, या आठवणींकरता. वाचनालयातल्या असलेले अमृत मासिक मला खूप आवडायचे, अजूनही मी ते केव्हातरी वाचत असतो. वाचनालयातच असलेली गुरुनाथ नाईक यांची पुस्तके माझ्या हाती लागली.युद्धस्य कथा रम्य: ह्या उक्ती प्रमाणे त्यांच्या त्या थरारकथा मनाची पकड घेत असत. मेजर भोसले, कप्तान दीप, भारत पाकिस्तान युद्ध, या नायकांच्या करामती, हे सर्व वाचताना मन रंगून जायचे. तेथेच मी रणजित देसाई यांची स्वामी, शिवाजी सावंत यांची पुस्तके वाचल्याचे आठवते. पु. ल. देशपांडे यांची बटाट्याची चाळ आणि इतर पुस्तके देखील वाचली. वाचनालयात बरीच मासिकेही असत, त्यातील देखील किर्लोस्कर, मनोहर सारखी मासिके, साप्ताहिक स्वराज्य सारखी साप्ताहिके वाचायला मिळत. त्याच सुमारास, किंवा थोडे आधी असेल, समोर पाठक म्हणून कुटुंब राहत असे. त्यांच्याकडे असलेली सिंहासन बत्तीशी, वेताळ पंचविशी सारखी पुस्तके वाचल्याचे आठवते. नंतर दहावीत गेल्यावर दहावीचे वर्ष, म्हणून, अभ्यासावर लक्ष असावे, यासाठी, वाचनालयाची वर्गणी बंद झाली आणि वाचन बंद झाले. अर्थात हे सगळं फुटकळ वाचनच होतं.

अकरावीत असताना घरी नको त्या वयात नको ते पुस्तक हाती लागले. काही दिवस मनाची चाळवाचाळव, आजूबाजूला असलेल्या मोठ्या लोकांकडे पाहताना माझी मलाच वाटलेली शरम, हे सगळे अजून आठवते. काही दिवसांनी ते पुस्तक घरातून गायब झाले आणि मी परत मार्गाला लागलो! त्याच सुमारास घरी कन्नड मासिके, जशी तुषार, तरंग, सुधा अशी मासिके यायला लागली. नुकतेच आईकडून कन्नड वाचायला शिकलो होतो, त्यामुळे ही मासिके वाचायला आवडू लागले. या व्यतिरिक, नंतर कॉलेजमध्ये असताना विशेष वाचनप्रेम जडले नाहीच, का कोणास ठाऊक. तरी बरं त्यावेळेस आम्ही मित्रांनी पुण्यातील प्रसिद्ध अश्या ब्रिटीश लायब्ररी(British Library) नाव नोंदवले होते. पण आमचे उदिष्ट वेगळे होते, ते म्हणजे, संगणकविषयक पुस्तके वाचण्यासाठी, संदर्भासाठी. त्यामुळे की काय काही अपवाद(जॉर्ज ऑर्वेल(George Orwell), पी. जी. वोडहाउस(P G Wodehouse)ची पुस्तके, तसेच क्रिकेटची आवड असल्यामुळे Bob Willis चे Fast Bowling हे पुस्तक) वगळता त्यांच्याकडे असलेल्या इंग्रजी साहित्याच्या खजिन्याकडे कधी लक्षच गेले नाही. माझ्या एका मित्राला इंग्रजी पुस्तके वाचण्याचा नाद होता. एकदा मी त्याच्याकडून घेवून Robin Cook चे Coma हे पुस्तक वाचल्याचे आठवते. कॉलेजच्या अभ्यासक्रमासाठी अशी जी पुस्तके असत, त्यातील काही विकत घेतली होती. पण तेवढेच.

पुढे कॉलेज संपून नोकरी सुरु केली, तरी सुद्धा माझी वाचनाची गाडी पुढे सरकेना. कामातच इतका गुरफटून गेलो होतो. फक्त एक अपवाद-एकदा एका सहकाऱ्याकडे Frederick Forsyth चे Fist of God हे पुस्तक पहिले, आणि ते वाचल्याचे आठवते. ते पुस्तक माझ्याकडेच राहिले, आणि आजही ते आहे. नंतर मी अमेरिकेत गेलो, तेव्हा जाताना स्वयंपाक हे सिंधुताई साठे यांचे पुस्तक विकत घेतले. हे माझे विकत घेतलेले पहिले मराठी पुस्तक! तेथे गेल्यावर तेथील वाचनालयांची श्रीमंती पाहिली. एका वेळेस १०-१५ पुस्तके/मासिके घरी घेवून जाता येत असत. तेथे बरीच पुस्तके वाचली, त्यातील प्रामुख्याने पर्यटनावरील, इतिहास यावरील. अजूनही साहित्याची गोडी लागली नव्हती. वाचनाने महत्व समजत होते. कामाचा भाग म्हणून, तसेच इतर तत्सम अशी पुस्तके वाचत होतो, विकत घेत होतो. पण निखळ साहित्य, म्हणजे कथा, कादंबरी, कविता यांचे विश्व अजून खुणावत नव्हतेच. त्या दृष्टीने करंटेच राहिलो.

काही वर्षांनतर पुण्यात परतलो. हिंडण्या-फिरण्याचा, भारताचा इतिहास जाणून घेण्याचा छंद जडला होता(Indology च्या नादाने). त्यानिमित्ताने पुस्तके विकत घेण्याचा, वाचण्याचा सपाटा सुरु झाला. दिवाळी अंक घेऊ लागलो आणि त्यामुळेही मराठी साहित्यविश्वाची ओळख होत गेली. नाटकं, त्यातही, प्रायोगिक नाटके पाहण्याचा नाद लागला. त्यानिमित्ताने देखील पुस्तके घेण्याचा, पुस्तक प्रदर्शनात जावू लागलो. हळू एक एक करत, कथा, कादंबऱ्याकडे ओढला गेलोच शेवटी. पुण्यातील Institution of Engineers हे इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन भरवणारे प्रसिद्ध स्थळ. तेथेही हळू-हळू इंग्रजी साहित्यामध्ये, सुरुवात, science fiction ने(Robot Vision-Issac Asimov, The Nuclear Age-Tim O’Brian) होत, अडकू लागलो. पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी यांची पुस्तके, शामची आई, माडगुळकर यांची बनगरवाडी, माणदेशी माणसे, विश्राम बेडेकर यांचे नाटक टिळक आणि आगरकर, रा. चिं. ढेरे यांचे लज्जागौरी इत्यादी. त्याचवेळेस चिंचवड गावातील वाचनालयातून प्रभुदेसाई यांचा देविकोश हाती लागला. मग अमरेंद्र गाडगीळ यांचा गणेशकोश सापडला. त्याच सुमारास एका मित्राकडून भारतीय दर्शन की रूपरेखा हे हिंदी पुस्तक हातात पडले आणि भारतीय दर्शन म्हणजे काय हे समजले. नंतर मी भरतविद्या(Indology) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर तर त्या विषयाची बरीच पुस्तके घेतली, वाचली, अजूनही चालूच आहे.

माझ्या वाचनप्रवासातील या पुढची वाटचाल नंतर कधी तरी, याच ठिकाणी!

 

 

दि बा मोकाशी यांच्या कथा

परवा मी मुंबईला अमेरिकेच्या व्हिसासाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. रात्रीच्या मुक्कामासाठी बरोबर मोकाशी यांचे पुस्तक नेले होते. त्यातील ‘आता आमोद सुनासि आले’ ही कथा वाचत होतो आणि तिने मला खिळवून ठेवले. त्यात एकाच्या मुलाच्या मृत्यनंतर निर्माण झालेल्या मानसिक अवस्थेचे वर्णन, आणि समांतर अशी दुसरी घटना, जेथे एक गाय व्यायते आहे, अडली आहे, आणि त्यावेळेस होणाऱ्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे, ताण-तणाव यांचे वर्णन असलेली ही कथा न संपवता झोपूच शकलो नाही. गेली ७-८ वर्षे मी मोकाशी यांची पुस्तके जमेल तशी मिळवून वाचतोय. त्यांचा परिचय मला जी ए कुलकर्णी यांच्या पत्रांच्या संग्रहाचे खंड वाचताना झाला. त्यात त्यांनी मोकाशी यांच्या कथा, लघुकथा याबाबतीत अनुकूल मत(जे अतिशय दुर्मिळ आहे) नोंदवले होते. मला वाटते त्यांनी ‘देव चालले’ या पुस्तकाबद्दल लिहिले होते. त्यामुळे खरे तर त्यांच्या पुस्तकांकडे वळण्यास सुरवात केली. गेल्या आठवड्यात त्यांचे ‘जरा जाऊन येतो’ हे पुस्तक हाती लागले होते. त्यातीलच वर उल्लेखलेली कथा आहे. हा कथा संग्रहच आहे, पण तो सरोजिनी बाबर यांनी निवडलेल्या कथांचा. त्या आधी कुठे प्रकाशित झाल्या होत्या की काय याचा उल्लेख नाही. हे जरा वेगळेच वाटले. आधी वाचलेले कथासंग्रह मोकाशी यांनीच तयार केलेले होते. परत या संग्रहाला सरोजिनी बाबर यांची छान प्रस्तावना आहे. १९८७ मध्ये प्रकाशीत झालेल्या या पुस्तकाचे निमित्त काय होते हेही समजले नाही. पण प्रस्तावनेतून त्यांच्या बाबतीत, तसेच त्यांची जडण घडण कशी झाली हे समजते.

ते कायम पुण्यात राहिले, त्यांचा छोटासा स्वतंत्र व्यवसाय होता. १९३८-८१ या काळातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय जीवनानुभव यावर सहसा आधारित या कथा आहेत. अतिशय तरल, ललित लेखनाच्या अंगाने जाणाऱ्या, वेगवेगळया शैलीचे घडवणाऱ्या, अतिशय छोट्या छोट्या विषयांच्या, किंवा शुल्लकशा अश्या विषयांच्या आसपास फिरणाऱ्या या कथा आहेत. उदा. ‘आपला-तुपला चहा’ या कथेत विषय असा आहे की एका व्यक्तीला महिनाभर वस्तीला आलेल्या पाहुण्यांनी जेरीस आणले असते. ते बाहेर गेल्यानंतर, त्याला हवा असलेल्या एकांत मिळालेला असतो, पण तो अनुभवता त्याची मानसिक अवस्था म्हणजे ही कथा. ह्या संग्रहात ‘वाया दिवस बालपणीचे’, तसेच ‘डोंगर चढण्याचा दिवस’ हे दोन ललितलेखही आहे, ते या कथासंग्रहात कसा आला हे समजत नाही, पण हरकत नाही. ‘डोंगर चढण्याचा दिवस’ हा लेख वाचून माझ्या सारख्या कायम डोंगर-किल्ले चढणाऱ्याला गंमत वाटली. मीही माझ्या ट्रेकिंगचे अनुभव लिहीत असतो, इतरांचे लेख वाचत असतो, पण हे अगदी वेगळेच वाटले.

२०१५ साल हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. त्यावर्षी अंतर्नाद मासिकाच्या दिवाळी अंकात मोकाशी यांच्या पत्नीनी लिहिलेल्या आठवणीचा लेख आला आहे. तो त्यांनी दि बा मोकाशी यांच्या मृत्युनंतर १२ वर्षांनी लिहिला होता(१९८१ मध्ये मोकाशी गेले, लेख १९९३चा आहे, आणि १९९४ मध्ये त्यांच्या पत्नीदेखील निर्वतल्या). त्यांच्या मुलीने तो लेख मासिकासाठी दिला होता. तसेच मासिकाने कथा स्पर्धा देखील आयोजित केली होती. त्यांच्या पत्नीच्या लेखात सहजीवनाच्या, कथांच्या जन्माच्या, त्यांच्या लकबी, सवयी इत्यादींचे वर्णन आहे. मी सुरुवातीला उल्लेखलेल्या कथेचे बीज त्यांनी चौक गावात अनुभवलेल्या एका घटनेचे रूपं होते हे (आता परत) वाचून गंमत वाटली. या संग्रहात ‘रोमच्या सुताराची गोष्ट’ नावाची एक  गमतीदार कथा, ज्यात, एकाचे गोष्ट सांगणे विविध कारणांमुळे अडते, अडखळते, आणि ती सांगून संपवणे होतच नाही. ह्या कथेचे मूळ मोकाशी पती-पत्नी यांच्या एका हट्टात, खटक्यात आहे हे नमूद केले आहे. पण मला ती गोष्ट, म्हणजे रोमच्या सुताराची, पूर्णपणे काय आहे हे माहीत नाही.

त्यांची इतर काही पुस्तकं मी वाचली आहेत. आदिकथा, वणवा, अठरा लक्ष पावलं इत्यादी. त्यांच्याबद्दल लिहीन कधीतरी परत. पण जी ए कुलकर्णी यांनी प्रशंसलेली ‘देव चालले’ हे पुस्तक काही मिळत नाहीये अजून. त्यांचे अजून एक पुस्तक म्हणजे वात्सायन ही कादंबरी, जी त्याच्या जीवनाचा पट मांडते, तसेच त्याने कामसुत्रे कशी कशी लिहिली याचा देखील तो पट आहे. दि बा मोकाशी यांची कायमच स्त्री पुरुष यांच्या भावविश्वाचा, सहजीवनाचा वेध त्यांनी  त्यांच्या कथांतून घेतलेला आहे. या दृष्टीकोनातून हे पुस्तक वाचायला हवे. पाहुयात कसे जमते ते.

NINASAM

नीनासम संस्कृती शिबीर-भाग#१

माझ्या ह्या आधीच्या ब्लॉगवर मी नीनासम आणि तेथील संस्कृती शिबीर याबद्दल लिहिले होते. आता ह्या ब्लॉगवर त्या शिबिराच्या मुख्य कार्यक्रमाच्या माझ्या अनुभवावर लिहायचे आहे. हे शिबीर बहुत्व ह्या संकल्पनेच्या वेगवेगळया पैलूंच्या भोवती रचला गेला होता. ह्या शिबिराचा आणखीन एक महत्वाचा आणि रोचक भाग असा की दररोज संध्याकाळी, आम्हाला एक कन्नड नाटक पाहायला मिळायचे. त्याबद्दल मी आणखीन एक ब्लॉग लिहिणार आहे.

पुण्याहून आदल्या दिवशी पुणे-सागर अशी कर्नाटक राज्य सरकारची बस पकडून, मी ऑक्टोबर ८ च्या सकाळी सकाळी सागर जवळील हेग्गोडू ह्या गावीस्थित नीनासम(Sri Neelkantheshwar Natyaseva Sangh) मध्ये धडकलो. इतर बरेच शिबिरार्थी आजूबाजूला दिसत होते. नीनासमचा परिसर, तेथील बैठी शैली असलेल्या इमारती पाहून मन हरखून गेले. माझ्या बसमध्ये रात्री केव्हातरी तरुण मुलांचा हुबळीला एक गट चढला होता, त्यांच्या बोलण्यावरून ते देखील नीनासमला जात होते असे समजले. नंतर ते समजले की तो गट हुबळीच्या संस्कृती कॉलेजचे विद्यार्थी होते, त्यांच्या बरोबर त्यांचे प्राचार्य नटराज होणावल्ली हे देखील होते. यथावकाश नोंदणीचे सोपस्कार झाले. अंघोळी वगैरे आटपून, खास कर्नाटकी शैलीतील नाश्ता म्हणजे इडली, चटणी, सांबार जो स्थानिक पालेभाजी अरवे सोप्पू घालून केलेला होता. तेथील कॉफी, तसेच मसाला घातलेले दुघ, ज्याला ते कषाय म्हणतात, तेही घेतले आणि, ९.३०वाजताच्या समारंभाची वाट पाहत होतो, तेवढ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले प्रसिद्ध सिने-पटकथाकार जावेद अख्तर दिसले. इतरांबरोबर मी ही त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढून घेतले. त्यानंतर सभागृहात कार्यक्रमासाठी गेलो. ते सभागृह म्हणजे मोठे कौलारू घरच आहे, मध्ये मोठीशी मोकळी जागा, तेथे दोन बाजूला रंगमंच अवकाश, असल्यासारखा भाग होता.त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते जावेद अख्तर. त्यांना बोलते केले ते त्यांचे स्नेही अशोक तिवारी यांनी. त्यांनी एकूणच भारतातील बहुत्व संकल्पनेवर आधारित आपले अनुभव, विचार नमूद केले, ठिकठिकाणी त्यांनी त्यांचे स्वतःचे शेर, शायरी उद्धृत केली. त्यानंतर भोजनानंतरचा कार्यक्रम होता तो कन्नड कविता वाचनाचा. पाच वेगवेगळया जणांनी नव्या-जुन्या प्रसिद्ध कविता वाचून दाखवल्या. त्यादिवशीचा शेवटचा कार्यक्रम आधुनिक पूर्व कन्नड साहित्यातील बहुत्व या विषयावर आधारित होता.

ऑक्टोबर ९ रोजी पहिला कार्यक्रम हा गोव्यातून आलेले क्लॉड अल्वारिस(Claud Alvares) ह्या हरहुन्नरी पर्यावरणवादी व्यक्तिमत्वाच्या भाषणाचा. त्यांचा विषय होता भारतीय शास्त्रे, तंत्रज्ञान यांना पुढे आणण्याचा, तसेच पाश्चिमात्य विचारांचे ओझे कमी कसे करता येईल हा. त्यांनी ह्या क्षेत्रात काय काम करत आहेत हे अतिशय रंजक तऱ्हेने सांगितले. भोजन अवकाशानंतरचा कार्यक्रम कन्नड कथा-साहित्यातील बहुत्व दर्शवणाऱ्या निवडक कथांचे अभिवचन होते. कन्नड मधील प्रसिद्ध कथा-कादंबरीकार कुवेंपू, वैदेही, श्रीनिवास वैद्य इत्यादींच्या कथा रजनी गरुड, नीनासमचेच गणेश(ज्यांनी अतुल पेठे यांचे मराठी नाटक सत्यशोधक कन्नड मध्ये आण्यात भूमिका बजावली होती) आणि इतर जणांनी अतिशय उत्कटतेने वाचल्या. त्यादिवशीच तिसरा आणि शेवटला कार्यक्रम हा बहुत्व आणि सामाजिक प्रश्न यासंबंधी होता.

ऑक्टोबर १०चा दिवस सुरु झाला तो परत अल्वारिस यांच्याच कार्यक्रमाने. त्यात त्यांनी सध्याची शिक्षण व्यवस्था, त्यांचे गोव्यातील अनुभव, जुन्या काळातील धर्मपाल नावाचे तत्वज्ञ, गांधीवादी विचारवंत आणि त्यांचे काम या बद्दल ते विस्तृत बोलले. शेवटी भारतीय संगीत आणि बहुत्व यावर एक परिसंवाद झाला. पसिद्ध संगीत समीक्षक, द हिंदू या वर्तमानपत्राचे सहसंपादक  दीपा गणेश यांनी दोन गायिका शैलजा आणि वैशाली श्रीनिवास यांच्याशी त्यांच्या सप्रयोग भाषानंतर संवाद साधला. कर्नाटक आणि हिदुस्थानी संगीत प्रकारात होत असलेली देवाणघेवाण, आदिवासी, देवदासी समाजाने जतन केलेले कर्नाटक संगीतातील गोष्टी इत्यादींनी श्रोतृवर्गाला समृद्ध केले.

ऑक्टोबर ११ रोजी प्रसिद्ध भाषा-शास्त्रज्ञ गणेश देवी यांनी लोकशाही आणि बहुत्व या विषयावर मुद्देसूद आणि विस्तृत विवेचन केले. बहुत्व आणि विविधता यात मुलभूत फरक काय हेही त्यांनी सांगितले. त्यानंतर धर्म आणि बहुत्व या विषयावर मुल्सिम आणि ख्रिस्ती धर्माचे प्रतिनिधी चर्चा करण्यासाठी त्यांनी बोलावले होते. फादर जोस हे कॅथोलिक पाद्री बंगळूरूवरून आले होते, तसेच कुराणाचे कन्नड मध्ये भाषांतर करणारे अब्दुसलाम पुथिगे हे देखील आले होते. मीरा बैन्दूर ह्या ह्या चर्चेच्या समन्वयक होत्या. मला स्वतःला मीरा बैन्दूर यांच्याशी थोडी चर्चा करायला मिळाली. त्यांचा विषय मुळात मानसशास्त्र, पण त्यांनी संस्कृत, तसेच पर्यावरणीय तत्वज्ञान विषयात संशोधन केले आहे. भारतीय तत्वज्ञान विषयात त्यांना गती आहे.

ऑक्टोबर १२ हा शिबिराचा शेवटचा दिवस. त्याची सुरुवात प्रसिद्ध कन्नड कवी तीरुमलेश यांच्या काव्याची चर्चा करणारा,  त्यांच्या काव्याच्या प्रेरणा, तसेच त्यांचे स्वतःचे आत्मकथन अशा स्वरूपाचा होता. नंतरचा विषय वेगळाच होता, आणि तो भारतीय आयुर्वेद आणि त्याची पाळेमुळे ह्या विषयावर होता. दर्शन शंकर नावाचे प्रसिद्ध संशोधक, ज्यांची संस्था ह्या विषयावर काम करते आहे, त्यावर होता. भोजनानंतर कन्नड काव्य कन्नडी(म्हणजे आरसा) हा काही प्रसिद्ध कवितांचे दृश्यरूप दाखवणारा कार्यक्रम होता. त्यात ८ प्रसिद्ध कन्नड कवितांवरील ८ लघुपट दाखवले गेले. कवितेचे अमूर्त रूप काहीसे मूर्त करण्याचा प्रयत्न दर्शवणारे ते लघुपट होते.  सर्वात शेवटी सुंदर सरुक्काई यांचे निरोपाचे भाषण झाल्यावर शिबीर संपले.

नीनासम संस्कृती शिबीर जे दरवर्षी ऑक्टोबर मध्ये होते, तो एकूण भारतीय, तसेच कर्नाटकातील संस्कृतीच्या विविध पैलूविषयी अपूर्व अनुभव देतो. दररोज सकाळी आम्ही काही जण, कार्यक्रमांच्या आधी आसपासच्या परिसरात गप्पा मारत फिरायला जात असू. नीनासम हे नाव ज्या ग्रामदेवतेच्या नावावरून आले आहे त्याचे मंदिर पाहायची उत्सुकता होती. तेही एके सकाळी पहिले. छोटेसेच पण अतिशय सुंदर असे ते मंदिर आहे. तर असे अतिशय रम्य वातावरण, कर्नाटकातून, तसेच बाहेरून आलेले शिबिरार्थी, विषयाशी निगडीत २०-२५ प्रसिद्ध व्यक्ती, कार्यक्रमात होणाऱ्या चर्चा, विराम-वेळेत होणाऱ्या ओळखी, चर्चा, सलग पाच दिवस दिसणारे हे सर्व लोक, एक वेगळीच अनुभूती देणारे, तसेच समृद्ध करणारे मला तरी वाटले. कन्नड साहित्य, संस्कृती, काव्य, कथा, नाटक, कर्नाटकातील हेग्गोडू ह्या मलनाड प्रदेश ज्याला म्हणतात तो निसर्गरम्य प्रदेश ह्या वातावरणात, काय बोलू, काय ऐकू आणि काय पाहू अशी अवस्था तेथे माझी झाली.

विदुर महाजन

मी अनुवादित केलेले अमीरबाई कर्नाटकी हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अधून मधून वाचकांचे फोन येत असतात. वेगवेगळे अनुभव येतात. फोन केलेल्यांपैकी बरेचसे फोन, हे अमीरबाई यांची तसेच त्याकाळातील गाणी ऐकलेल्या वाचकांचे असतात. त्यांचा आठवणींना उजाळा मिळालेला असतो. मागच्या आठवड्यात विदुर महाजन यांचा असाच पुस्तकाबद्दल सांगायला फोन आला. मी त्यावेळेस ऑफिस मध्ये होतो. अगदी भरभरून बोलले, त्यांचा संदर्भ अमीरबाई यांच्या गाण्याकडे नव्हता, तर एका त्याकाळी स्त्रीने दिलेला परिस्थितीशी लढा हा होता, आणि त्यांना ते भावले होते. बोलण्याच्या ओघात, त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितले. ते सतारवादक आहेत. राहायला तळेगावात असतात. आणि पिंपळे सौदागर भागात(म्हणजे मी राहतो त्याच भागात) ते सतार शिकवायला आठवड्यातून एकदा येतात. त्यांनी पुस्तके देखील लिहिली आहेत हे त्यांच्याकडून समजले. मला त्यांनी भेटायला येण्याचे आमंत्रण देऊन आमचे त्यावेळचे संभाषण थांबले.

मला अतिशय उत्सुकता वाटली. त्यांच्याबद्दल जाणून घ्यावेसे वाटू लागले. विदुर महाजन हे नाव कुठेतरी ऐकल्याचे वाटू लागले. पुस्तकाच्या संदर्भात, की त्यांच्या सतार वादनाच्या संदर्भात, आठवेना. मी त्यांची तीन पुस्तके मागवली, जी आत्मकथनात्मक आहेत. त्यातून त्यांच्या आयुष्याचा आलेख, चढ-उतार, संघर्ष, जीवनाबद्दल असणारे प्रेम पदोपदी जाणवते. पहिले पुस्तके आहे मैत्र जीवाचे. जे त्यांनी लिहिले, जेव्हा त्यांचा तरुण मुलगा अपघातात दगावला. त्यानंतर त्यांनी ते दुःख कसे पचवले, आपले जीवित ध्येय कसे निश्चित्त केले. जे अतिशय प्रेरणादायी आहे. ते आहे २००९ चे. ग्रंथालीने प्रकाशित केलेले(माझे पुस्तक देखील ग्रंथालीचेच, त्यामुळे हा एक समान धागा) . आणि दोन आवृत्या निघाल्या त्याच्या. दुसरे पुस्तक त्यांचे २०१३ मधील, नाव शोधयात्रा. ह्यात त्यांनी आपल्या व्यवसायासंदर्भात आलेले अनुभव सांगितले आहेत. व्यवस्थेशी त्यांनी लढा कसा दिला, त्यातून ते कसे बाहेर आहे, सचोटीने कसा त्यांनी व्यवसाय केला, हे सर्व समजते. बाहेर येवून त्यांनी सतार जवळ केली आणि त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. तिसरे पुस्तक २०१५चे, नाव एका स्वरवेड्याची आनंदयात्रा. त्यात त्यांनी सतार, सतारवादन याबद्दल लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास याबद्दल लिहिले आहे. लोणावळ्याच्या कैवल्यधाम मध्ये कार्यक्रम करतात हे समजते, सतारवादन क्षेत्रात त्यांनी कसे आणि कुठले प्रयोग केले याची माहिती मिळते, जसे की कॉर्पोरेट क्षेत्रात मनुष्यबळ विभाग, जो महत्वाचा असतो, त्यांना प्रशिक्षण देण्याच्या वेगवेगळया पद्धती आहेत. त्यातील एक म्हणजे outbound learning किंवा  experiential learning, ज्या बद्दल मी गरुडमाची संदर्भात मी लिहिले होते. त्या क्षेत्रात त्यांनी, आणि त्यांच्या मित्रांनी सतार वादनाचा उपयोग करून Tuckman’s model of team building(जे जुने आणि प्रसिद्ध मॉडेल आहे) याची सांगड घातली. आणखी त्यांची जे काही करायचे त्यात झोकून द्यायची वृत्ती दिसून येते. या तिसऱ्या पुस्तकातील एक वाक्य अतिशय आवडले, त्यात ते यशाची व्याख्या करतात. ते वाक्य असे आहे-‘ज्याच्याकडे पुरेसा वेळ, पैसा, आणि काम या तिन्ही गोष्टी आहेत, आणि ज्याला पुरेशा आहेत, म्हणजे किती, याचं प्रमाण नेमकं ठरवता येतं, तो यशस्वी’.

काही वर्षांपूर्वी मी संजय भास्कर जोशी यांचे ‘आहे कॉर्पोरेट तरी’ हे पुस्तक वाचले होते. त्यात त्यांनी चाळीशी मध्ये मोठी नोकरी सोडून, आपले छंद, आणि आवडींकडे(जसे साहित्य, वाचन, लेखन) या कडे लक्ष केंद्रित केले, याचे अनुभव कथन केले होते. विदुर महाजन यांची पुस्तके वाचल्यानंतर देखील मला तसेच वाटले. मुळात ते व्यावसायिक होते, म्हणजे, आजकाल ज्या बद्दल बरेच बोलले जाते, entrepreneurship, तसे ते होते. धडाडी, उत्कटता, सचोटी होती. काही कारणाने ते सर्व सोडून सतरीकडे ते वळले. त्यातही तशीच धडाडी, उत्कटता, सचोटी दाखवत त्यांनी आपल्या जीवनाची मार्गक्रमणा सुरु ठेवली आहे.

मला तळेगावाबद्दल आणखीनच आदर वाटू लागला आहे. माझे काही मित्र तळेगाव वडगाव भागात पूर्वी राहायचे, अधून मधून तेथे जायचो. संगीत क्षेत्रात थोडा रस घ्यायला सुरु केल्यानंतर केव्हातरी समजले की कलापिनी ही संस्था तेथे काम करते. उर्दू शायर मदहोश बिलग्रामी तळेगावात राहतात. त्यांना देखील भेटायला गेलो होतो, काही मित्रांसोबत. प्रसिद्ध लेखक, सह्याद्री मधील किल्ल्यांवर भटकणारे गो. नि. दांडेकर देखील तेथेच राहत. आता विदुर महाजन. हा सगळा लेखन प्रपंच मी त्यांना अजून न भेटताच केला आहे. पाहुयात केव्हा भेटणे जमते ते.

कालच मी माझ्या पुस्तकाच्या मूळ कन्नड लेखकाशी, रहमत तरीकेरी यांच्याशी विदुर महाजन यांच्याबद्दल बोललो. महाजन यांचे त्यांच्याशी संभाषण झाले होते. त्यांनादेखील देखील अतिशय छान वाटले. तर असे हे विदुर महाजन, जगण्याचा आनंद शिकवणारे. त्यांची पुस्तके जरूर वाचावी अशी आहेत. त्यांची पुस्तके वाचल्यानंतर मला उमजले की त्यांनी त्यादिवशी फोन करून माझ्या पुस्तकात आलेल्या अमीरबाईच्या जीवनाच्या लढ्याबद्दल मला अशी प्रतिक्रिया दिली ते.

सर्व काही संपल्यावर

मी गिरीश कार्नाड यांच्या आगोम्मे ईगोम्मे (Agomme Igomme) या कन्नड पुस्तकाचे मराठी मध्ये भाषांतर करतो आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. याच पुस्तकातील एका लेखाचे भाषांतर मी माझ्या एका ब्लॉग मध्ये पूर्वी केले होते. तो लेख होता नाटकाच्या उगमा संदभातील (Origin of Theatrical Arts) एका पौराणिक कथेच्या निमित्ताने. आज मी येथे या ब्लॉग वर त्यांची एक कथा जी या पुस्तकात आहे तिचे मराठी भाषांतर ब्लॉगच्या स्वरूपात आपल्यापुढे ठेवतो आहे. आशा आहे ते आपल्याला आवडेल.

१९७० मधील ही कथा आहे. प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार शिवराम कारंत यांच्या कादंबरीवर चित्रपट तयार करण्याच्या प्रक्रियेच्या निमित्ताने हि कथा गिरीश कर्नाड यांनी लिहिली आहे. हि कादंबरी मराठीत देखील आली आहे. केशवराव महागावकर यांनी याचा ‘मिटल्यानंतर’ या नावाने अनुवाद केला आहे. याची माहिती मला दया पवार यांच्या पासंग या पुस्तकातील लेखातून मिळाली. ते या कादंबरीबद्दल लेखात म्हणतात, ‘१७७ पानांच्या या कादंबरीत ६० वर्षांच्या म्हाताऱ्याचा आयुष्याच्या तो मेल्यानंतर रहस्यकथेसारखा लेखकाने शोध घेतला आहे….एखादं महाकाव्य उलगडत जावं आणि मनुष्य स्वभावाचे, सामाजिक परिस्थितीचे आणि विकृतीचे, समर्पणाचे विश्वदर्शन व्हावे असे वाचकाला होते. ‘ कादंबरीला मुंबईची पार्श्वभूमी आहे. 

‘अळीद मेले'(अर्थ: सर्व काही संपल्यावर)

माझ्याकडे पाहत असलेल्या रिझवीच्या डोळ्यात मला मिश्कील भाव जाणवले. रिझवीच्या ते लक्षात आले असावे. त्याच्या त्या स्मित हस्यामागील कारण मी विचारेन की काय असे वाटून, बहुधा त्याने आपली नजर दुसरीकडे फिरवली आणि दिग्दर्शनाच्या कामात मग्न झाला. काही वेळानंतर त्याने त्याचे ते मिश्कील भाव ‘स्वीच ऑफ’ करून गंभीरपणे तो म्हणाला, ‘डायलॉग रेडी आहेत का रे? उर्दू फार कठीण वाटत असेल तर मला सांगा’

ही रिझवीची पद्धत होती: एखादी महत्वाची बातमी सांगायची असल्यास, त्याचे ते अर्थपूर्ण आणि सूचक मौन, ‘मला…’, अशी उद्वेग्पूर्ण दीर्घ पूर्वपीठिका असे. त्यानंतर शब्दाच्या अथवा वाक्यांच्या मध्ये श्वास न घेता, भडभडा बोलून टाकायचा. शिवराम कारंत यांच्याकडून पहिले पत्र आल्यादिवशी तर त्याचा हा सर्व अवतार एक डोकेदुखीच झाली होती. आता, आज त्याचा उत्साह पाहून त्या मागचे काय कारण असावे हे जाणून घेण्यास थोडी वाट पहावी लागणार हे मी ताडले होते.

‘लंच ब्रेक’ मध्ये आम्ही सर्व जेवताना त्याने घरून आणलेला मटण दो प्याजा माझ्या आणि भूषणच्या ताटात वाढला आणि म्हणाला, ‘हे घ्या, गिरीश, माझ्या बायकोने केले आहे. “अळीद मेले” ला फायनान्स मिळाले आहे. आता काम सुरु. डब्यात काही ठेवायचं नाही हं, नाही तर ही आकाश-पाताळ एक करते. भूषण, तुम्ही हे संपवून टाका’ असे तो सगळे एका दमात बोलून गेला.त्याच्या ह्या तोऱ्याला बळी न पडता त्याचे मी अभिनंदन केले.

‘अभिनंदन! मार्व्हलस!’ रिझवी खुश झाला.

‘के. पी. प्रोडक्शनने होकार दिला आहे. म्हणजे आता शूटिंगची तयारी करायला पाहिजे. गम्मत अशी आहे की ह्या वेळेस कारांताकडूनही पत्र आले आहे. हे शेड्यूल संपल्यानंतर, शाली-ते कुठे आहे? शा-‘

‘शालीग्राम’

‘हो. तेच. शालीग्रामला जाऊन यावे लागेल. त्यांनी मला बोलावले नाहीये, मीच त्यांना म्हणालो होतो की मी येवून भेटेन असे.’

‘रिझवीजी, कारंत हे सहजगत्या तृप्त होणारे गृहस्थ नाहीत. तुम्ही म्हणाल त्यावर ते माना डोलावतील, होकार भरतील असे समजून घेऊ नका. मीच स्क्रिप्ट लिहितो असेसुद्धा म्हणतील.’

‘असे का वाटते? त्यांच्याकडून तीन पत्रे आली आहेत आतापर्यंत. त्यांनी त्यात काहीही अटी घातलेल्या नाहीत’, असे वाद जिंकल्याच्या अविर्भावात रिझवी बोलून गेला. ‘त्यांना भेटल्यावर त्यांचे चित्रीकरण कसे करायचे ह्याची आयडिया येईल म्हणून चाललो आहे झाले’ असे बोलून त्याने स्मित केले.

‘मला त्यांच्या बद्दल माहित आहे. तुम्ही काळजी करून नका’, तो पुढे म्हणाला.

रिझवीची कारांतांच्या प्रती किती भक्ती होती हे सांगायचे म्हणजे-‘काय कादंबरी आहे ती जनाब! आतूनच यायला हवे!’ माझ्याकडे सहेतुक नजरेने पाहत म्हणाला.

रिझवीचा मोठा भाऊ(जो आता संवाद लेखकही आहे) हा प्रसिद्ध अनुवादक आहे. त्याने कुठल्यातरी प्रकाशनासाठी ‘अळीद मेले’ कादंबरी उर्दू भाषेत भाषांतरित केली होती. रिझवीला ती वाचून वेड लागले होते.

‘गिरीश, खरे सांगायचे म्हणजे ह्या कादंबरीचा चित्रपट होईल. किती अद्भूत कथा आहे ही! असे असूनही हिंदी मध्ये कोणी वितरक त्याला हात लावील तर शपथ. सगळे हरामी लेकाचे! त्यामुळे आत्ता ही टेलीफिल्म करायला घेतली’ असे नाटकी हावभाव करून बोलला.

मी रिझवीला भेटलो ते १९९० मध्ये. तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. त्या दिवशीच टोयोटा रामरथातून सोमनाथ वरून अयोध्येला जाण्याऱ्या एल. के. अडवाणी यांना बिहार मध्ये लालू प्रसाद याने त्यांना अडवले होते.

रिझवी माझ्याकडे आलेला ते एका detective मालिकेत काम करण्याबद्दल विचारायला.पाच मिनिटात मी होकार दिला. त्यामुळे मला वाटले तो आता निघेल. पण कसले काय. इकडच्या तिकडच्या गोष्टी करत राहिला. लालू प्रसादांच्या विषयी म्हणाला, ‘मुस्लीम आणि बहुजन समाजाने एकत्र झाल्याशिवाय तरणोपाय नाही. नाहीतर हे हिंदू लोक मुस्लिमांना खाऊन टाकतील. त्याच्या कुटुंबियांनी पाकिस्तानात जावू असे सुचवल्यावर, त्यांना त्याने ‘तेथे जाऊन काय लाथा खायच्या आहेत?’ असे सांगून कसे समजावले या वर एक छोटेखानी व्याख्यानच दिले. त्याच प्रवाहात एका कन्नड कादंबरीबद्दल बोलायला त्याने सुरुवात केली. मला त्याचे उर्दू भाषांतरीत नाव माहित नव्हते. त्याला मूळ कन्नड कादंबरीचे नाव माहित नव्हते. पण थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले की तो ‘अळीद मेले’ या कारांतांच्या कादंबरीबद्दल बोलत होता. त्याच्या बद्दलचे माझे कुतूहल वाढत गेले.

कारांतांच्या घरचा पत्ता काय आहे? ते होकार देतील का? त्यांना किती रॉयल्टी द्यावी लागेल? ‘चित्रपटात कारांतांची भूमिका तुम्ही करावयास हवी. यशवंतरायच्या भूमिकेसाठी अनंत नाग’ असे त्याने घोषित केले, आणि वर प्रामाणिकपणे असे मान्य केले की detective मालिका हे निमित्त होते, ‘अळीद मेले’वरील चित्रपटासंबंधी चर्चा करणे हा मूळ हेतू होता.तिथल्या तिथे माझा कडून अनंत नाग यांना फोन करवून त्यांच्याकडूनही होकार मिळवला.

ह्या सगळ्या भानगडीत, मध्ये मध्ये शिवराम कारंत होकार देतील की नाही हा प्रश्न डोके वर कधीत होता. ज्याने कर्नाटकात कधी पाय ठेवलेला नाही, ज्याला कन्नड साहित्य, साहित्यिकाबद्दल काही माहित नाही आणि उत्तर प्रदेशातील कुठल्यातरी कोपर्‍यात असलेल्या एका खेड्यातून मुंबईला आलेल्या आणि तिसऱ्या दर्ज्याचे गल्लाभरू हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या ह्या रिझवीला चर्चा करण्यास आणि भेटण्यात कारंत होकार देतील असे मला वाटत नव्हते.

पण रिझवीच्या पत्रातून त्याची व्यक्त झालेली भक्ती आणि निर्धार पाहून, त्यांनी होकार भरला असावा. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. एक दिवस ‘तुम्ही ह्या कादंबरीवर एखादी कलात्मक चित्रपट बनवाल नाही? तसे झाले तर मी काही तरी करून फायनान्स उभा करेन’. त्या प्रश्नाला उत्तरादाखल मी म्हणालो, ‘माझा मित्र बि. व्ही. कारंत याने ‘चोमन गुडी’ हा चित्रपट बनवला आहे यावर’.

‘ओहो, पहिला आहे मी तो’

रिझवी सगळे कन्नड कलात्मक चित्रपट पाहत असे. त्यांच्यावर टिप्पण्या तयार करत असे. त्यात त्याला रुची होती म्हणून नव्हे तर, ‘अळीद मेले’ चित्रपटासाठी काही कल्पना सुचतील का ते तो शोधात होता. ‘घटश्राद्ध’ पहिल्याच्या दिवशी तर उत्साहात त्याने फोन केला.

‘गिरीश,ब्राह्मणात विधवा स्त्रियांचे मुंडण करतात. आपल्या चित्रपटातही असण्याऱ्या दोन विधवांचे डोके मुंडण करायला हवे.’

‘जाऊ दे, ते अवघड आहे. आपला हिंदी प्रेक्षकाना ते रुचणार नाही’, मी म्हणालो.

तो उत्तरला, ‘त्या ‘घटश्राद्ध’ मध्ये विधवा मुलीचे केस कापलेले होते की, अशी authenticity हवी’

माझ्या उत्तरात त्याला रस नव्हता. ‘कोण सिनिअर हिंदी अभिनेत्री असे केस कापून घेईल’ असे म्हणून फोन ठेवून टाकला.

ब्राम्हण विधवा कशी असावी हा प्रश्न रिझवीच्या दृष्टीने फक्त अभिनेत्री कोण असावी एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. तो त्याच्या टेलीफिल्मचा आत्मा होता, कारण कादंबरीच्या मध्यावर पोहचल्यावर रिझवी परत परत त्याच विषयाकडे येत असे.

‘काय प्रसंग आहे तो! कारंत त्या गावी येतात. त्यांच्या मित्राच्या म्हणजे यशवंतराय यांच्या मानलेल्या आईला पहिले. त्या वृद्धेच्या इच्छेखातर मंदिराचा जीर्णोद्धार करतात. त्याचा परिणाम असा होतो की एकमेकांच्या वारी असलेल्या त्या एकाच गावातल्या दोन वृद्ध स्त्रिया परत एकत्र येतात! लाजवाब!’ रिझवीचा स्वर गदगदित होता.

हे मी अर्ध्या डझन वेळा आधी ऐकले होते. वैतागून मी म्हणलो, ‘रिझवीजी, तुम्ही कादंबरीचा पूर्वार्धच फक्त सांगता आहात. अजून बरेच कथानक आहे, बरीच पात्र पुढे इत. कारंत यशवंतरायच्या पत्नी, मुलांना सुद्धा भेटतात. त्याच्या बद्दल तुम्ही काही बोलतच नाही की!-‘

रिझवी माझ्याकडे एकदा कटाक्ष टाकून, आणि डोके खाजवून, ‘अब्दुल-‘ अशी हाक मारतो. Production Manager आल्यावर त्याला बरेच काहीबाही बोलतो. मी, भूषण तेथे आहेत हे तो विसरून गेलेला असतो. त्यानंतर भूषणकडे वळून, ‘तुम्हाला ती कथा माहीत आहे का? यशवंत राय नावाची व्यक्ती एकट्यानेच जीवन जगून, आप्त मित्र नसलेल्या जागी, मरून जातो. कारांताना अस्थी विसर्जन करण्याची विनंती करतो. ते काही त्याचे मित्र नव्हते. असे असून सुद्धा ते यशवंतरायच्या कुटुंबियांचा शोध घेतात. गावी आल्यावर यशवंत राय च्या मानलेल्या आईचे, पार्वत्म्मा-‘

अचानक बोलणे थांबवून, त्याने त्याच्या पिशवीतून स्क्रिप्टचा कागद बाहेर काढला आणि भूषण समोर ठेवला.

‘ग्राफ पाहिलात का. सुरुवातीला यशवंत राय मरण पावला आहे. एकाकी, बेवारस. त्या विधवेच्या खातर, कारांतांच्या नशिबी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे आले, इतर पत्रे आहेत, कुठेतरी adjust करू. पण चित्रपटाचा केंद्रबिंदू तो आहे, भूषण. मंदिराचा जीर्णोद्धार. मनुष्याच्या spiritual जागृतीचा सिम्बॉल.’

नंतर माझ्याकडे पाहून तो म्हणाला, ‘आपल्या फिल्मचा शेवटचा सीन. Imagine करा. त्या मोडक्या तोडक्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. दोन वृद्ध स्त्रिया एकमेकांना बिलगून अश्रू ढाळीत आहेत. तुम्ही-म्हणजे कारंत-गाव सोडून जात आहात, आणि सहज मागे वळून पाहत आहा. तुमचा मित्र यशवंत राय हा नास्तिक आहे. तुम्ही सुद्धा नास्तिकच. मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुमचे जीवन कृतार्थ झाले! तुमच्या डोळ्यातही अश्रू. मित्राच्या प्रती कृतकृत्य झाल्याची भावना. काय वाटते भूषणजी? कसा आहे क्लायम्याक्स?’

‘तुम्हाला माझा खरेच माझा अभिप्राय हवा असेल तर सांगतो’, भूषण कुठल्याही नटाने दिले असते ते उत्तर देतो. ‘तुम्ही ह्या वेळेला पुढच्या भागाचे पैसे देणार असेल तर ठिक आहे. यशवंत रायाच्या भूमिकेसाठी मीच योग्य आहे!’

रिझवी जोरात हसला. तोच signal समजून सहनिर्देशकही आला आणि म्हणाला, ‘लायटिंग रेडी आहे’. रिझवीने ती स्क्रिप्ट पिशवीत कोंबत, ‘पहिला शॉट तुमचा, भूषणजी’ असे म्हणत, त्या सहनिर्देशकाकडे न पाहता निघून गेला.

‘खूप बोलतो हा’, असे मान हलवत म्हणाला, ‘मी याच्या चित्रपटात काम करण्याचे कारण म्हणजे त्याच्या बायकोने बनवलेले नॉन-व्हेज जेवण!’ आणि, मेकअप रूम कडे निघून गेला.

पुढे पंधरा दिवसातच रिझवीचा मृत्यू झाला.

मी सिंगापुरात चित्रीकरणासाठी गेलो होतो. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणाला, ‘चित्रीकरण काश्मीर मध्ये व्हायला हवे होते. पण काय करणार, काश्मीर मध्ये अतिरेकी. काशिमीर गुंडांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या मुळे स्वित्झर्लंड, सिंगापूरला जावे लागते. या देशाला सध्या, त्या अतिक्रेकीना नीट धडा शिकवणारे सरकार हवे आहे’ असे म्हणून, ह्या अतिरेक्यांमुळे त्याच्या चित्रपटाला झाल पोहचत आहे असे सुचवून पुढे म्हणाला, ‘आपल्या स्टार्सनादेखील तेच हवे आहे! स्वित्झर्लंड, सिंगापूर! इंडस्ट्री ची चिंता कोणाला आहे?’

परत आलो तेव्हा अयोध्या प्रकरण झाले होते. राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनंतनागला फोन केला, त्याने वेगळीच माहिती दिली.

‘रिझवी बेंगळुरूमध्ये येऊन मला भेटून गेला होता. अडवान्स पैसेही दिले. न थांबता बोलत होता. त्याच रात्री शिवराम कारंत यांना भेटण्यास उडुपीची बस पकडून गेला. मुलकी जवळ अपघात झाला, आणि डोक्यावर ट्रंक पडून त्याचा मृत्यू झाला असे कळले. अख्ख्या बसमध्ये तो फक्त मरण पावला म्हणे. त्याचा प्रेत तीन दिवस तेथेच पडले होते!’

मी त्या दिवशी संध्याकाळी रिझवीच्या घरी गेलो. बंद्र्यापासून पालीहिल ला जाताना कोपऱ्यावरील एका गल्लीत त्याचे जुनेसे घर होते. रिझवी १९६० च्या सुमारास मुंबईला आला तेव्हा त्याने ते घर भाड्याने घेतले होते. आता त्या घराची किमत गगनाला भिडली आहे. घरमालकाने घर खाली करण्यासाठी तगदा लावला होता. बदल्यात प्रशस्त सदनिका देतो असे म्हणत होता, पण रिझवी त्याला दाद देत नव्हता.

‘घर म्हजे घर पाहिजे. सदनिका नाही’, असे म्हणत वाद घालत असे.

रिझवीची पत्नी बाहेर येवून सोफ्यावर एका कोपऱ्यात बसली. काहीच बोलली नाही. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. त्यांची मुलगी कोठेतरी बाहेर गेली असावी. मुलगा याकुब हसन, वय २०-२२ असेल. त्याने एक तांब्या भरून पाणी आणून माझ्यासमोर ठेवले आणि त्याने माहिती दिली.

अपघातात रिझवी मरण पावला. त्याच्या पाकिटातील पत्ता वाचून मुलकीच्या पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा त्याचा भाऊ, ज्याने ‘अळीद मेले’चा अनुवाद केला होता, उडपीला निघाला. तितक्यात तेथे काही मुस्लिमांना ही गोष्ट कळली, की कोणी मुस्लीम व्यक्ती मरण पावली आहे. त्यांनी दफन करण्यासाठी मृतदेह मागितला. पण त्यांचा भाऊ येईपर्यंत पोलिसांना काही करता येत नव्हते. त्यामुळे मृतदेह तीन दिवस तसाच बेवारस पडला होता. मुलकी गावापर्यंत जाऊनही त्यांच्या भाऊ कारंत यांना न भेटता परत आला.

याकुब सावकाश बोलत होता. त्याच्या बोलण्यात बापासारखी घिसाडघाई नव्हती.त्याचे चेहरा आई सारखा होता-गोल चेहरा आणि पसरट तोंड. त्याचे बसणेदेखील रिझवी सारखे नव्हते.

‘अंकल, तुमची मला एक मदत हवी होती’, तो म्हणाला. ‘या फिल्मसाठी त्यांनी फायनान्स घेतला होता, एक लाख अडवान्स घेवून, तो खर्च केला आहे. आता आपण ती फिल्म पूर्ण करूयात’

रिझवी असे स्पष्ट, संक्षिप्त बोलला नसता. त्याची काहीही लक्षणे मुळात नव्हती. कशामुळे तरी मन विषण्ण झाले.

‘बजेट किती असेल याचा काही करार झाला होता का?’, मी विचारले.

‘दाखवतो’, असे म्हणत तो उठून आत गेला.

त्यानंतर रिझवीची पत्नी बोलू लागली.

‘मुलीचे वय झाले आहे, लग्न केले पाहिजे. त्यासाठी मी त्यांच्या मागे लागले होते. पण हा कन्नड चित्रपट झाला तर त्यातून लग्नाचा खर्च भागेल असे म्हणत. तीस वर्षापासून ह्या industry मध्ये काम करून काय मिळवले? कसे तरी घर चालले, भागले. मुलीच्या लग्नासाठी हवे तेवढे पैसे बाजूला राहिलेच नाहीत. हा सिनेमा झाल्यावर हाती बरेच पैसे राहतील असे म्हणत होते’ आणि बोलायचे थांबली. काही वेळाने उद्वेगाने, ‘असे त्यांचे बोलणे एकूण एकूण मी निराश होत असे. आता तर तेच निघून गेले’ म्हणाली.

भाभीजी माझ्याकडून जेवढे होईल तेवढे करेन’, असे म्हणालो.

याकुब फाईल घेवून आला. त्यातील हिशोब पाहून मी स्तंभित झालो. दोन तासाची टेलिफिल्म सोळा मिमी निगेटिव्ह वापरून चित्रीकरण करायचे होते. ते अकरा लाखात होईल असे रिझवीने मान्य केले होते. कोठे तरी काही तरी चुकले असावे असे मला वाटत होते, म्हणून मी तो हिशोब पुन्हा पुन्हा तपासून पाहत होतो. काहीच हाती लागले नाही. उलट दोन गाणी ही त्यात होतील असे रिझवीने कबुल केल्याचे समजले.

‘याकुब, के. पी. प्रोडक्शन यांच्याबरोबर एकदा बोलायला हवे’

‘मी त्यांचा नंबर देतो. मी ही यायला हवे का?’ मला त्यातले काही कळत नाही. पप्पा कधी मला शुटींग जवळ फिरकूही देत नसत’, याकुब उत्तरला.

‘आता शिक’, मी म्हणालो.

रिझवीची पत्नी मान करून मुलाकडे पाहू लागली. मी विचारले, ‘तुम्हाला काही हरकत नाही ना?’

ती म्हणाली, ‘रुकसानाचे लग्न व्हायचे आहे ना, अजून एकदा प्रयत्न करायला हरकत नाही’

‘अंकल, कादंबरी लेखकालाही कळवायला हवे नं’

‘ते मी पाहून घेतो’, मी म्हणालो.

त्याच दिवशी शिवराम कारंत यांना फोन केला. ‘मला काही हरकत नाही. मी आधीच अनुमती दिली आहे. रिझवीच्या कुटुंबियांनी हे काम पुढे नेल्यास आणि दुसऱ्या कोणी दिग्दर्शकाने केल्यास काही हरकत नाही’, ते म्हणाले.

त्यानंतर के. पी. प्रोडक्शन यांच्या बरोबर भेटण्याची वेळ ठरवली.

जीवन चक्र फिरण्यास सुरुवात झाली होती. यशवंत रायासारखाच रिझवी, आपल्या आप्त-मित्रांपासून दूर ऐकतात मरण पावला होता. त्याच्या विधवेच्या मनोरथ पूर्ण व्हावयाचे होते. वास्तवातही मी शिवराम कारंत यांचे कादंबरीतील भूमिका वठवत होतो.

रौप्य, सुवर्ण महोत्सव साजरे केल्याचे फोटो, चांदीचा, सोन्याचा गिलावा दिलेल्या ट्रॉफीज, त्याच्या मागे लपलेले प्लास्टिक ट्रॉफी असे सर्व मांडून ठेवेले होते. अर्धनग्न नायक-नायिकांच्या पोस्टरच्या मधोमध ओमकाराचे चिन्ह, त्रिशूल आणि ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा दिसत होती. हे याकुबच्या लक्षात आले की नाही कळले नाही.

‘बजेट वाढवायचा प्रश्नच नाही. इम्पोसिबल!’ के. पी. प्रोडक्शनचे कैलाश प्रसादने आपली असमर्थता नमूद करून दोन्ही हात पसरले.

‘अकरा लाखात फिल्म होणार नव्हती तर त्याने मान्यच का केले?’

दीनपणे याकुब माझ्याकडे पाहत होता.

‘मला माहीत नाही’, असे मी म्हणालो खरा, पण मला काय कारण असावे हे समजून चुकले होते.

ह्या धूर्त आणि व्यवहारात पक्का असलेल्या कैलाशने रिझवीच्या असहायतेचा फायदा घेतला होता. रिझवीला ही टेलिफिल्म काहीही करून करायची होती. त्यामुळे मुलीचे लग्नही त्याने पुढे ढकलेले होते. लग्नाचा खर्च निघेल असे पत्नीला खोटे सांगितले होते. रिझवीचा उत्साह पाहून, तो कुठल्याही बजेटला तयार होईल हे कैलाश प्रसादने ताडले होते. रिझवीने, याउपर ३-४ लाखाचे कर्ज घेतले होते-वैयक्तिक कर्ज. याचा अर्थ मुलीचे लग्न आणखी लांबणीवर पडणार होते.

मी उठलो.

‘अकरा लाखात फिल्म होवू शकत नाही. क्षमा करा. आम्ही येतो. चल याकुब’.

‘असे असेल तर मी दिलेल्या अडवान्स चे काय?’

‘ते रिझवीने स्वतः खर्च केले नाहीत. फिल्मसाठी काम करणाऱ्याना दिले आहेत. मलाही दिले आहेत. विचार करून सांगा, नाही तर ते पैसे गेले समजा. अठरा लाखात मी करून देतो’

मी सोळा म्हणार होतो. लग्नासाठी २ लाख त्यात वाढवले. पण हे इथेच संपणार नाही हे माहीत होते.

याकुब दिग्मूढ झाला होता. कैलाश प्रसादने केलेल्या अन्यायामुळे विव्हळत झाला होता. मी स्क्रिप्ट आणि बजेटची फाईल त्याच्या हातात सोपवून म्हणालो, ‘तो खादिम जर हो म्हणाला तर ठीक. नाहीतर बहिणीच्या लग्नासाठी दुसरीकडून व्यवस्था कर. अकरा लाखात फिल्म करण्याच्या भानगडीत पडू नकोस.’

मी रिक्षा पकडून घरी निघालो. रिझवीच्या मूर्खपणाची मला कल्पना होती. नाहीतर, असा अव्यावाहीरिक उद्योगात पडलेल्या व्यक्तीला काय म्हणावे? अडमुठा? वेडा? कन्नड मध्ये त्याला समर्पक असा शब्द दिसत नाही. अरबी भाषेत-मजनू!एका कादंबरीच्या ६० पानामुळे भ्रांत झालेला मनुष्य.

६ डिसेंबर. अयोध्या येथे बाबरी मशीद पाडली गेली.

दुसऱ्याच दिवशी भूषणचा फोन आला. ‘बरे झाले, त्यांना तसाच धडा शिकावयाला हवा होता. त्याशिवाय त्यांना समजणार नाही’ असे म्हणाला.

माझे कुटुंबीय, आप्त-मित्र सर्व जण त्याच प्रमाणे मन डोलवत होते. माझा परिसर हिंसेमुळे

साधारण एक आठवड्यानंतर.

चहा पीत असताना याकुब रिझवीचा फोन आला.

‘अंकल, तुम्ही अजून अर्धा तास घरी आहात का?’

‘आहे ना, आज दुपारी शुटींग शिफ्ट…’

‘तसे असेल तर आत्ताच येतो…अर्ध्या तासात’

याकुबने फोन ठेवला. विसाव्या मिनिटाला दारावरची घंटी वाजली. दारात काही क्षणासाठी रिझवीच उभा आहे असे वाटले.

‘ये ये, बस’, असे म्हणत असतानाच एक प्रश्न सतावत होता. मागच्या वेळेला मला याकुब आणि त्याच्या वडिलांमध्ये काही साम्य दिसले नव्हते. आज मला रिझवीची का बरे आठवण आली असावी.

‘काय विशेष?’, मी विचारले.

‘थांबा जरा, अंकल. आधी तोंड गोड करा. नंतर बोलू!’ असे बोलून पिशवीतून मिठाईचा बॉक्स काढला. हसत माझ्या कडे पाहत होता. मी ते हास्य ओळखले. रिझवीचा ट्रेडमार्क होता तो!

‘मिठाई कशासाठी?’

‘आईने तुमच्या साठी पाठवली आहे. ही हैदराबादी स्पेशल मिठाई आहे. शाही तुकडा. तुम्ही तो खाल्यानंतर बोलायचे असे तिने मला सांगितले आहे.’

शाही तुकडा गोड होता. मी विचारले, ‘काय बहिणीचे लग्न ठरले की काय?’

‘नाही, पण आता ते ठरेल हे नक्की’

‘म्हणजे?’

‘अंकल, के. पी. प्रोडक्शनने “अळीद मेले” साठी सतरा लाख देण्याचे कबुल केले आहे. कालच संध्याकाळी फोन आलेला’

एका मागोमाग शब्द आले. मी काही बोललो नाही.

‘लवकरात लवकर सुरु करा असे ते म्हणाले’

‘याकुब, ते आता शक्य नाही’

बापासारखेच मुलानेही मी काय म्हणतोय याकडे लक्ष न देता पुढे म्हणाला, ‘तुमची कमिटमेंट आहे हे मी त्यांना सांगून टाकले आहे’

‘याकुब, मी ही फिल्म करत नाही आहे’

ह्या वेळेला त्याच्यापर्यंत माझे म्हणणे गेले. तो ते ऐकून हडबडला. इतका वेळ उभा असलेला, मटकन खुर्ची वर अर्धवट हसत बसला.

‘का अंकल? तुम्ही आधी हो म्हणाला होता ना. ते सतरा म्हणतात, पण जर अठराच हवे असतील तर…’

त्याचा आवाज खाली आला होता. उत्कर्षाच्या उंबरठ्यावर उभे राहून, भविष्याविषयी ऐकून ऐकून दमलेल्या त्याच्या आई सारखा त्याचा आवाज झाला होता.

ह्याला काय सांगावे बरे. मी विचारात पडलो.

‘हे पहा, तुझ्या वडिलांना ही कथा अतिशय आवडली होती म्हणून. चित्रपटाच्या शेवटी मंदिराचा जीर्णोद्धार आहे म्हणून.ते त्याच्या दृष्टीने मानवीयतेचे प्रतिक वाटले म्हणून. आता ‘मंदिर बांधा’, मंदिरचा पुनरुद्धार करा’ ह्या घोषणेचा अर्थच बदलला आहे.

‘म्हणजे?’

याकुब समजून घेण्याचा प्रयत्न करत होता की दुसरयाच विचारात गढलेला होता हे समजले नाही.

‘बाबरी मशीद पडून तेथे आता मंदिर बांधायचे आहे असे चालले आहे, तुला माहीत नाही का ते?’

‘ते कोणाला माहीत नाही, अंकल, त्याच्याशी ह्याचा आणि तुमचा काय संबंध?’

मी उठून खिडकीपाशी गेलो आणि बाहेर पाहू लागलो. असे करायला नको असे वाटून गेले. टेलीव्हिजनवर प्रत्येक मालिकेत घरातील ज्येष्ठ व्यक्ती असेच उठून खिडकीतून बाहेर पाहू लागते.

‘संबंध आहे, सगळीकडे तो येतो. अयोध्ये मधील विध्वन्सानातरची निर्माणाची कल्पना भ्रष्ट होते आहे. त्या विध्वंसात एक अनाथ शव तसेच पडले आहे-हिंदू संस्कृतीचे’, मी आरंभिले.

मेलोड्रामाटिक न होता, माझे म्हणणे पूर्ण करावे म्हणून, मी पुढे बोलू लागलो, ‘माझ्याकडून तर ही फिल्म शक्य नाही’.

याकुब माझ्याकडे पाहतच राहिला.

मी रिझवी सारखा बोलू लागलो, विचार करू लागलो की काय असा मला भास झाला. मुख्य विषय सोडून वेगळेच, पाल्हाळ लावतोय की काय असे वाटू लागले. बाबरी मशीद विध्वंसासारखी घटना काहीही परिणाम न करता विलग राहू शकत नाही. ती आपली संस्कृती कलुषित केल्याशिवाय राहत नाही. ३० वर्षापूर्वी लिहिली गेलेली कन्नड साहित्यकृतीही त्यातून बचावू शकत नाही-इत्यादी.

‘अंकल’, याकुब बोलू लागला, पण थोडा थांबला. ‘मी हे सांगणार नव्हतो, पण सांगतो आता. ही फिल्म झाली तर माझ्या बहिणीचे लग्न होईल. तुम्ही हा चित्रपट डायरेक्ट करण्यास होकार दिला यामुळे, मी सांगू नये, पण, माझे सर्व कुटुंब तुमचे किती आभारी आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे’

काही क्षण मी थांबून, बोलून गेलो, ‘आता तुम्ही पाहून घ्या’

ह्याला मी कसे समजावू. उद्या हा चित्रपट टेलीव्हिजन आल्यावर सर्वाना हेच वाटणार की मी कन्नड मधील ह्या कादंबरीचा उपयोग ह्या अशा लज्जास्पद घटनेच्या समर्थनासाठी करतोय. त्यांना कुठे समजणार आहे की रिझवी साठी, ह्याच्या बहिणीच्या लग्नासाठी हा खटाटोप केला आहे ते.

‘बाबरी मशीदच फक्त पुसून गेली नाही, याकुब. त्याबरोबर, तुझ्या वडिलांचे स्वप्नही विखुरले गेले’, असे सांगायचे होते, पण न सांगताच सांगून मी बाहेर पाहू लागलो.

बराच वेळ शांतता होती. कोणीच बोलले नाही.

‘तुमची मर्जी’, असे म्हणत याकुब उठला. ‘तुम्हाला भीडेस पाडणे मी करणे बरोबर नाही’

मी किती वेळा तेच तेच सांगू? अथवा न सांगताच जे सांगायचे आहे ते किती वेळा सांगू?

‘ठिक आहे, येतो मी आता’, असे म्हणत तो दरवाज्याकडे गेला.

मेजावर मिठाईचा बॉक्स होता, त्याच्या बाजूला फिल्मची स्क्रिप्ट होती.

‘याकुब, ते घेवून जा’, मेजाकडे बोट दाखवत मी म्हणालो.

‘ते आईने तुमच्यासाठीच स्पेशल पाठवले होते’

मी हडबडून म्हणालो, ‘मिठाई नाही, स्क्रिप्ट’

याकुब माझ्याकडे पाहू लागला. क्षणासाठी त्याच्या डोळ्यात मला आनंद दिसला.

‘राहू दे, त्याचा काय उपयोग आता आम्हाला? येतो मी’, असे म्हणत निघून गेला.

[पूर्व-प्रकाशित: कन्नड प्रभा दिवाळी अंक १९९७]

Ruskin Bond

Rusty and I

Since quite a few years, I keep visiting book exhibitions which are held in Pune’s Institution of Engineers’, where they sell English books at reduced rates. And I have found many treasures there. The book titled Rusty and I by Swapan Banerjee is one such book which not only introduced me to Ruskin Bond and also led me into his world of books. Before that, like others, I also had heard about Anglo-Indian writers like Ruskin Bond and Rudyard Kipling, but then had not paid much of attention to their writing due to other priorities. I want to write a bit about that book here today. I have written about Bond’s few other books here, and Kipling’s here in the past.

I always love books on books and also books on authors. And this one is both! The book is a collection(or anthology as the publisher says) of various writings such as interviews, reminiscences, reviews of his some works, poems and short story dedicated to him. Most of it has appeared at various places such as Amirta Bazar Patrika, in the past. The book has introduction by famous Odiya/English writer Manoj Das as well. I also got introduced to him through this book only(yes, I know I am exhibiting my literary illiteracy here, but that is what it is!)

Ruskin Bond

Cover page of the book

The book’s front blurb says, ‘Rusty and I is a tangible expression of the highest admiration for the great literary gift and rare humanism of Ruskin Bond. At the time, Bond was pilloried and tomahawked by some critics who thought him fit only to be published in weekend supplements as his style of writing, according to them, was ‘simplistic’. To me, exactly due to this simplistic writing he is adored even today. In this book itself, there is an interview by Dr Prabhat K Singh, author of Creative Contours of Ruskin Bond. In that interview’s opening note, Dr Singh mentions Bond explaining in his book Best of Ruskin Bond, that goes like this: ‘People often ask me why my style is so simple. It is, in fact deceptively simple. It is clarity that I am striving to attain, not simplicity. Of course, some people want literature to be difficult. And those who think this is simple should try it themselves.’

The best part of the book which I like is those three interviews of Ruskin Bond which author himself has taken at various times, in which various facets of Ruskin Bond come out. The other interesting part is letters between Bond and the author. I also liked the report on first Mussorie’s Writers Mountain Festival, which has now got lot of fame.

The book is about long lasting bond with Rusty, which is Ruskin Bond himself(the little boy in his famous book The Room on the Roof), and the author Sawapan Banerjee. We are also introduced to Rusty’s simplistic approach to life, down to earth personality, and someone who has never hurt anyone. The author’s admiration and regard towards Rusty is all in this book. If you are Ruskin Bond lover, you need to grab his book. The other thing, I need to do is to watch television series made on him titled Ek Tha Rusty, which I had watched few times accidentally. Not sure if anyone here has watched it. Ruskin Bond is over 80 these days. It is very heartening to know that Rusty still writes. I see him writing in Times Of India’s Sunday editions. I wish that he keeps writing and giving us a joy!

शेक्सपिअरचे गारुड

मी गेल्या आठवड्यात बंगळूरूला गेलो होतो. पुण्याच्या विमानतळावर द विकचा(The Week) अंक कुलुपबंद कपाटात दिसला आणि त्यावर शेक्सपिअर विराजमान होता. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. प्रसिद्ध कवी आणि नाटककार शेक्सपिअरची ४००वी पुण्यतिथी ह्या वर्षी २३ एप्रिल साजरी होत आहे. तो अंक त्यावर असणार. ह्या शतकातील ही मोठी घटना आहे असे म्हणायला हरकत नाही. २६ एप्रिल १९६४ ह्या च्या चौथ्या जन्मशताब्दी वर्षी सुद्धा अश्याच मोठ्या प्रमाणात साजरी केली गेली असणार.  शेक्सपिअरबद्दल मी काही लिहावे एवढा माझा वकूब नाही. पण मी एक नाटकवेडा रसिक आहे, तसेच पुस्तकवेडाही  आहे. मला शेक्सपिअरचे आकर्षण आहे आणि जमेल तसा मी त्याच्याबद्दल समजावून घेत असतो. त्याच्या ४००व्या पुण्यतिथीनिमित्त थोडेफार मला भावलेला समजलेला, त्याच्याबद्दल वाचलेले, ऐकलेले येथे लिहावे म्हणून हा प्रपंच. हे सर्व स्मरण रंजन आहे, त्याच्या गारुडाचे.

इंग्रजी साहित्य घेवून बी.ए/एम्. ए करणाऱ्या मंडळीना शेक्सपिअर, त्याची नाटके अभ्यासाला असतात. जशी संस्कृत मध्ये बी.ए/एम्. ए करणाऱ्या मंडळीना कालिदास असतो तसे. कालिदास भारताचा शेक्सपिअर. मी तर संगणक शास्त्र क्षेत्रातील. मला वाटते अकरावी बारावी मध्ये इंग्रजी विषयात त्याच्या नाटकातील एखादा प्रवेश असावा. त्याच्या नाटकातील काही प्रसिद्ध वाक्ये आपल्याला माहिती असतात. जसे To be or not to be is the question, What’s in a name वगैरे. साधारण २००१ च्या सुमारास जेव्हा माझे नाटक वेड पूर्ण भरात होते तेव्हाच, मला विनय हर्डीकर यांचा ‘सर्वांसाठी शेक्सपिअर’ हा कार्यक्रम मला पाहायला मिळाला. आजच मी वाचले की ते हा कार्यक्रम आता, पुण्याबाहेर देखील घेवून जाणार आहेत. गेली पंधरा वर्षे ते हा कार्यक्रम करत आहेत. मी अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी यांच्या चरित्राच्या निमित्ताने, आणि एकूणच संगीत नाटक, त्याचा इतिहास, ह्या विषयावरील वाचनामुळे असे समजले की मराठीतील नाटकांच्या सुरुवातीच्या काळात शेक्सपिअरचा प्रभाव होता. उदा. सं. झुंझारराव हे प्रसिद्ध नाटक.

त्याची प्रसिद्ध नाटके रोमिओ जुलिएट, ऑथेल्लो, मर्चंट ऑफ व्हेनिस अशी आपल्याला महिती असतात. प्रामुख्याने राज घराण्यावरील नाटके त्याने लिहिली. त्याने शोकांतिका, विनोदी, तसेच रहस्यमय नाटके देखील हाताळली. मानवी स्वभावाचे चिरंतर पैलू जसे राग, लोभ, मत्सर, प्रेम, सूड ही सगळी त्याने मांडली. तो स्वतः अभिनेता देखील होता. त्याची नाटक कंपनी होती, त्याचे नाट्यगृह होते(Globe Theater). या सर्वामुळे तो सार्वकालिक, तसेच सर्वाना आपलासा वाटणारा ठरला. शेक्सपिअरच्या नाटकामध्ये सर्वसामान्य रसिकाला दिसणारा मुद्दा म्हणजे त्यातील इंग्रजी, जे व्हिक्टोरियन काळातील आहे, ते बरेचसे बोजड वाटते. तसेच नाटकातील मोठ-मोठाली स्वगते हे आणखीन एक वैशिष्ट्य. कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकात(आणि इतक्यात आलेल्या सिनेमात देखील), हे आपण पहिले असते. त्यातील प्रसिद्ध नट, अशाप्रकारच्या नाटकातील भूमिका करून मोठा नट झालेला असतो, आणि त्याच्या उतरत्या काळात त्याला हे सर्व आठवत असते, आणि तो ते मोठ-मोठाले संवाद, स्वगते म्हणतो. २००१ च्या आसपासच मला किंग लियर ह्या नाटकाच्या मराठी अनुवादाचे पुस्तके मिळाले. हे लिहिले आहे विंदा करंदीकर यांनी. त्यात त्यांची भली-मोठी विवेचक प्रस्तावना आहे. गोविंद तळवलकर हे देखील असेच शेक्सपिअर अभ्यासक आहेत.

शेक्सपिअरचा अभ्यास, आणि त्याच्यावरील पुस्तके हा देखील एक वेगळाच विषय आहे. त्याच्यावर म्हणे एक लाखावर पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. अनेक अंगाने त्याचा अभ्यास करण्यात आला आहे. वोल्टेअर(Voltaire)चे गमतीदार विधान कुठेतरी मी वाचले होते. तो म्हणतो कि शेक्सपिअर हा थोडीफार कल्पना शक्ती असलेला, प्यायलेला हिस्त्रक पशुसारखा आहे ज्याची नाटके लंडन आणि कॅनडा मध्ये थोडीफार चालतात (Shakespeare is a drunken savage with some imagination whose plays please only in London and Canada).  मराठीमध्ये शेक्सपिअरवर एक पुस्तक मराठी नाट्य परिषदेने प्रसिद्ध केले आहे. तो केला १९६५ मध्ये, चौथ्या जन्मशताब्दी वर्षी. त्यातही अनेक अभ्यासकांनी शेक्सपिअरची अनेक अंगानी ओळख करून दिली आहे. ते मला गेल्यावर्षी मिळाले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी देखील १९७९ मध्ये शेक्सपिअर परिचय ग्रंथ असे पुस्तक प्रकाशित केले होते. The Tales from Shakespeare by Charles and Mary Lamb हे पुस्तक त्याच्या नाटकात आलेल्या कथेसंदर्भात अभ्यासासाठी छोटेखानी पुस्तक आहे. त्यात शेक्सपिअरच्या एकूण माहीत असलेल्या ३८ नाटकांपैकी २० नाटकांच्या कथेसंदर्भात लिहिले आहे. हे पुस्तक मला जी ए कुलकर्णी यांच्या पत्रातून नमूद केल्याचे दिसले आणि ते मी २-३ वर्षापूर्वी घेतले. मी वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या नाटकात मानवी स्वभावाचे पैलू दिसत राहतात. काही अभ्यासकांनी त्याच्या नाटकांचा(प्रामुख्याने किंग लिअर) अभ्यास मानसशास्त्र आणि मानसोपचारशास्त्राच्या अंगाने देखील केला आहे. मी ह्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला ते आणखी समजावून घेण्याची उत्सुकता आहे.

जगभरात त्याची ४००वी पुण्यतिथी जोरात साजरी होणार. लंडनमध्ये, तसेच त्याच्या जन्मगावी म्हणजे Stratford जे एव्हान नदीच्या किनारी आहे(Stratford upon Avon), जेथे त्याचे घर आहे, तेथे तर कार्यक्रमांची लयलूट आहे आणि ती वर्षभर असणार. ब्रिटीशांनी ते घर अजून जपून ठेवले आहे. आपण बऱ्याच प्रवासवर्णनात त्याबद्दल वाचले असते. मलाही तेथे जायचे आहे एकदा, पण तात्पुरते तरी मी माझ्या इंग्लंड मधील मित्रांना त्याबद्दल विचारणार आहे! ते असो, पण इंटरनेटवर देखील बरीच माहिती आहे. इच्छुकांनी येथे आणखी माहिती मिळवता येयील. BBCच्या संकेतस्थळावर देखील Shakespeare Lives असा ऑनलाईन महोत्सव कार्यक्रम सहा महिने चालणार आहे. इतरही बऱ्याच संकेतस्थळांवर माहिती मिळू शकेल. पुण्यात देखील बरेच कार्यक्रम असणार. त्यातील एक आहे विनय हर्डीकर यांचा ‘सर्वांसाठी शेक्सपिअर’, एस. एम् जोशी सभागृहात, संध्याकाळी ६.३० वाजता. तो जरूर आपण सर्वानी पाहावा, आणि शेक्सपिअरचे गारुड अनुभवा.

आणखीन एक जाता जाता. एप्रिल २३ हा देखील स्पेन मधील प्रसिद्ध कादंबरीकार सर्वांतेस याची देखील ४००वी पुण्यतिथी आहे. तो त्याच्या डॉन क्विक्झोट ह्या महाकादंबरीबद्दल प्रसिद्ध आहे. ती मी अजून अर्थात वाचली नाही, कधी तरी वाचायची म्हणून घेवून ठेवली आहे. पण जी. ए. कुलकर्णी यांच्या काही कथा त्यातील मूळ धाग्यावर आधारलेली आहेत. त्यांच्या पत्रलेखनात देखील त्याच्याबद्दल बऱ्याचदा उल्लेख येतो. स्पेनमध्ये त्याची पुण्यतिथी साजरी केली जात आहे.