रेडू

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटात नाविन्याची, वेगळे काहीतरी दाखवण्याची, वेगळे विषय हाताळण्याची सकारात्मक लाट आली आहे असेच म्हणावी लागेल. कथेला, कथनाला महत्व आले हे चांगले आहे, त्यामुळे इतर गोष्टी गौण ठरतात. केवळ कथेवर चित्रपट चालू शकतो. इतक्यातच न्यूड, सायकल, रेडू सारखे हटके चित्रपट आले. मी रेडू हा चित्रपट नुकताच पाहिला. त्याबद्दल येथे थोडेसे. न्यूडदेखील पाहिला, पण त्याबद्दल परत कधीतरी.

रेडू म्हणजे रेडियो ह्या शब्दाचे ग्रामीण रूप. खरेतर ह्या चित्रपटाची कथा १९७०-८० मधील एखाद्या लघुकथेला साजेशी अशी आहे. मुख्य पात्र अर्थात रेडियो यंत्र. साल १९७२. कोकणातील(मालवणातील असे म्हटले पाहिजे वास्तविक) हडे गावातील एका गरीब रोजंदारीवर कष्ट उपसत जगणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या माणसाला एकदा रेडियो कुणाकडे तरी दिसतो. आणि ह्याला ते आवाज करणारे, गाणी म्हणणारे यंत्र भावते. हा माणूस म्हणजे तातू जो साकारला आहे अभिनेता शशांक शेंडे याने, त्याची बायको म्हणजे छाया कदम(न्यूड फेम). तो त्या रेडियोसाठी वेडा होतो. अचानक एके दिवशी त्याला तसाच रेडियो भेट म्हणून मिळतो. तो हरखून जातो. त्याला गावात भाव येतो. त्याचे आणि त्या रेडियोचे एक जिवाभावाचे नाते निर्माण होते. काही दिवस मजेत जातात. पण एके दिवशी घरातून रेडू अचानक गायब होतो, चोरीला जातो. आणि मग तातूची तडफड, तगमग सुरु होते. आणि सुरु होतो शोधाचा प्रवास, आणि कथेला कलाटणी मिळते. मी पुढचे मुद्दामच सांगत नाही. पुढचे चित्रपट पाहूनच अनुभवायला हवे.

आता मोबाईल आणि इंटरनेट मुळे सारे जग जवळ आले आहे. गावागावातून लोकं ही सर्व उपकरणं वापरताना सर्रास दिसतात. खेडेगावातून वीज नसल्यामुळे दिवेदेखील नसत. पूर्वी जेव्हा रेडियोचे नाविन्य होते तेव्हा गावातून एखादाच रेडियो असे. सगळे गावकरी, घरातील तो ऐकण्यास जमा होत असत. माझ्या मामाकडे गावी असाच एक रेडियो असे. तो आम्ही मुलं आजोळी गेलो की त्याच्या मागेमागे भुणभुण करत तो ऐकत असू. ज्यांनी हे सर्व अनुभवले आहे त्यांना हा चित्रपट त्या काळात नेणारा आहे. एखाद्याचा रेडियोमध्ये जीव गुंतल्यावर काय होते याची गमतीदार आणि भावस्पर्शी अशी ही कथा आहे. चित्रपट येऊन दोन आठवडे झाले होते. चित्रपटगृहात मोजकीच टाळकी होती. मला खात्री आहे ती सर्व माझ्यासारखी रेडियो प्रेमीच असणार. माझ्याकडेही असेच रेडियोचे यंत्र आहे, मी आजही रेडियो ऐकतो. माझ्या रेडियो ऐकण्याच्या नादाबद्द्ल मी पूर्वी येथे लिहिले आहे. आजकाल बरेच जण रेडियो कारमध्ये ऐकत असतात. त्यामुळे तो अजून ह्या जमान्यात आहेच.

५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘रेडू’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. पार्श्वभूमीवर वाजणारे ‘देवाक काळजी’ हे गाणे मस्तच आहे. कोकणचा निसर्ग, गावातील एकूण वातावरण, तेथील घरे हे सर्व छान आले आहे. मी अशा ठिकाणी ट्रेकिंगच्या निमित्ताने बरेच फिरलो आहे. संथ गतीने, सहज, एकाच गावात घडणारी, सावकाश बेताबेताने उलगडणारी ही कथा पाहायला हवी. शशांकचा अभिनय देखील उत्तम. त्याचे एक नाटक पहिले होते खूप पूर्वी, मळभ नावाचे, तेही फर्ग्युसन कॉलेजच्या सभागृहात. त्यानंतर एक दोन अपवाद विशेष त्याचे काम पहिले नव्हते. सगळे संवाद हे कोकणी, मालवणी भाषेत आहेत, त्यामुळे आई माईवरून शिव्या न देता वाक्यच सुरु होत नाही. म्हणी देखील भरपूर, त्याही अगदी ठसकेबाज, उदाहरण द्यायचे झाल्यास, एक म्हण अशी येते, ज्याच्या मनात पाप, तेका पोरं होती आपोआप! चित्रपटाच्या अतिशय वेगळ्या शेवटामुळे हा रेडियोचा चित्रपट राहत नाही तो होतो त्या तातूचा, तो माणूस म्हणून एका निर्णायक क्षणी कसा वागला तो आशय महत्वाचा आहे.

जाताजाता एक गंमत सांगतो. चित्रपटाची सकाळी तिकिटे ऑनलाइन खरेदी करताना घराजवळील सिटी प्राईडमधील घेतली असे मला वाटले होते. पण तेथे गेल्यावर समजले की ती शहरातील दुसऱ्याच भागातील सिटी प्राईड मधील आहेत. का असा गोंधळ झाला, समजले नाही. रेडियो ऐकण्याच्या नादात तर असे झाले नाही! मग परत नव्याने तिकिटे घेतली, आधी घेतलेली तिकिटे रद्दबातल करता येणार नव्हती. त्यामुळे दुप्पट पैसे देऊन हा चित्रपट पाहिला.

Advertisements

राजपुत्राचा विवाह

मे महिन्यातील शनिवारची दुपार. बाहेर रणरणते उन. त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही बाहेर जावेसे वाटत नाही. जेवण होऊन सुस्तावलो होतो. काहीतरी वाचावेसे देखील वाटत नव्हते. थोडावेळ रेंगाळून झोपावे असा विचार करत टीव्ही लावला. एके ठिकाणी कर्नाटकतील भाजपाचे येडेरुप्पा मुख्यमंत्री असलेले सरकार दुपारी विश्वासमत अजमावणार होते, त्याबद्दल घमासान चर्चा चालली होती. दुसरीकडे, CNN वर सहज आंतराष्ट्रीय बातम्या पहाव्यात म्हणून गेलो, तर तेथे इंग्लंडच्या राजपुत्राच्या विवाहाचा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण चालू होते. राजपुत्राचा शाही विवाह (The Royal Wedding), किंवा राजघराण्याशी निगडीत गोष्टी कायम आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या उत्सुकतेचा विषय असतो. त्यातही इंग्लंडच्या राणीने आपल्या भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेले. आपण त्यांची प्रजा, त्यामुळे हा तसा आपल्या घरचाच कार्यक्रम होता! हे थेट प्रक्षेपण लंडनहून जवळच असलेल्या Windsor Castle मधून होत होता. काही वर्षांपूर्वी इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स भारत भेटीवर आले होते, त्याची किती चर्चा झाली होती.

भारत देश तर राजे, राजवाडे यांसाठी हजारो वर्षांपासून प्रसिद्ध. स्वातंत्र्यापूर्वी भारतात साडे-सहाशेच्यावर संस्थाने होती. कर्नाटकातील मैसूरचे वडीयार राजघराणे(त्यांचा दसरा सोहळा अपूर्व असतो, जो मी प्रत्येक वर्षी पाहतो), तसेच राजस्थानातील राजे, अजूनही आपली परंपरा, संपत्ती, वैभव बाळगून आहेत. त्याबद्दल मी पूर्वी येथे लिहीले आहे. पण इंग्लंडच्या राणीची गोष्टच न्यारी. हजारो वर्षांची सलग परंपरा इंग्लंडच्या राजघराण्याला आहे. आजही, ब्रिटनच्या लोकशाहीच्या काळात त्यांचे स्थान अबाधित आहे. तसे पहिले तर इंग्लंडच्या राणीचा निवास लंडन मधील Buckingham Palace मध्ये असतो. मी लंडनला २०१० मध्ये गेलो होतो, तेव्हा ते पहिले होते, तेथील Queen’s Guard अनुभवले होते. पण आताचा विवाह सोहळा Windsor Castle मध्ये संपन्न होत होता. माझ्याकडे एक English Heritage Book of Castles नावाचे Tom McNeill चे एक पुस्तक आहे. जसे मराठीत सदाशिव शिवदे यांचे महाराष्ट्रातील वाडे यावर पुस्तक आहे तसे. किल्ले, वाडे, गढ्या हा तर माझा आवडीचा विषय. इंग्लंड, किंवा सर्व युरोपभर अशी गढी(castles) यांची मालिकाच विखुरलेली आहे. माझ्या लंडन भेटी दरम्यान इतर वाडे पाहता नाही आले. ह्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ऐतिहासिक Windsor Castle आणि त्याच्या सुंदर, हिरव्यागार परिसराचे देखणे रूप दिसत होते.

CNN ने थेट प्रसारणाची उत्तम व्यवस्था केली होती. दोन-तीन ठिकाणी त्यांची मंडळी, आणि इतर तज्ञ मंडळी ठाण मांडून बसली होती. मला काही वेळ समजले नाही CNNला का एवढी पडली आहे. पण नंतर समजले. या राजपुत्राची नियोजित वधू अमेरिकन आहे ते. मग डोक्यात प्रकाश पडला. अमेरिका आणि ब्रिटन हे दोघे खरेतर आता मित्र देश, पण अमेरिकेचा इतिहास पाहता, त्यातून परत भारतासारखेच अमेरिकेची निर्मिती ब्रिटीश वसाहतवादापासून मुक्त होऊन झालेली. त्याची नांदी अमेरिकेत बोस्टन येथे बोस्टन टी पार्टीच्या निमित्ताने झाली, ज्याला मी नुकतेच भेट देऊन आलो होतो. दोन्ही देश एकमेकांच्या कुरापती, मस्कऱ्या काढत असतात. आता काय, अमेरिकी मुलगी इंग्लंडचा राजघराण्यात सून म्हणून जाणार होती. त्यामुळे चर्चेला उधाण आलेले.

राजपुत्राचे नाव हॅरी, आणि नियोजित वधूचे मेघन मर्कल. हा हॅरी प्रिन्सेस डायानाचा धाकटा मुलगा. तर मेघन ही एक हॉलीवूड अभिनेत्री. एका blind date मध्ये दोघांची ओळख झाली आणि पुढे वाढली. मेघन ही एक तर biracial, त्यातच आधीच्या लग्नापासून घटस्फोट, दोन मुले, अशी सर्व तिची पार्श्वभूमी. Biracial म्हणजे असे की तिची आई ही कृष्णवर्णीय(African black), तर पिता श्वेतवर्णीय(white). ही ह्या इंग्लंडच्या सनातन अश्या राजघराण्याची स्नुषा होणार. इंग्लंडची राणी आणि प्रिन्सेस डायाना यांच्यामधील वाद, मतभेद प्रसिद्ध आहेत. राजघराणे अजूनही परंपरावादी आहे असे सर्व जण मानतात, हे सर्व असताना ही मुलगी नववधू म्हणून येते. ती कशी काय पुढे राहते, संबंध कसे राहतात हे सर्व उत्सुकतचे नक्की आहे. असो. ह्या विवाहासाठी हजर राहणारे लोक म्हणजे दोन्ही देशातील VIP मंडळी. थेट प्रक्षेपणात ते सर्व दाखवत होते. आपल्या प्रियांका चोप्राने देखील हजेरी लावली होती(ती अमेरिकन मालिकांमध्ये काम करत असे). अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या महिलांच्या डोक्यावर असलेली खास तयार केलेल्या विविध आकाराच्या, रंगांच्या टोप्या(hats, head gear). तश्या टोप्या परिधान करण्याची परंपरा आहे. राजपुत्र हॅरीला Duke of Sussex  हे तर मेघनला  Duchess of Sussex हे नामाभिधान देण्यात आले.

दुपारचे चार वाजत आले होते. कर्नाटकात येडूराप्पा यांनी विश्वासमत ठरावाच्या आधीच तडकाफडकी राजीनामा देऊन सगळी हवाच काढून घेतली. तर दूर इंग्लंड मध्ये लग्नघटिका जवळ येत होती. Windsor Castle समोर एक रस्ता आहे, ज्याला Long Walk असे नाव आहे, त्याच्या दुतर्फा हजारो लोक थांबले होते, जल्लोष करत होते. आधी दोन्ही राजपुत्र आले(हॅरी, आणि विलियम्स). हॅरीने काळा सैनिकी, सरदारी पोशाख परिधान केला होता. का कोणास ठाऊक हा हॅरी मला दाढी वाढवलेल्या भारतातील प्रिन्स सारखा दिसत होता, हसत होता. अहो, हा प्रिन्स म्हणजे आपला राहुल गांधी! तर नववधूने पांढरा शुभ्र wedding gown परिधान केला होता. तिच्या अंगावर एक दागिना नव्हता. आपल्याकडे असे शाही लग्न असते तर केवढे दागदागिने दिसले असते. Windsor Castle मध्ये असलेल्या चर्च मध्ये विवाहाचा विधी पार पडणार होता. राजपुत्र हॅरीच्या पित्यांनी म्हणजे राजपुत्र चार्ल्स यांनी नववधूचे स्वागत केले आणि तीला चर्च मध्ये नेले. इतर सगळे देखील तेथे जमा झाले. संगीत सुरु झाले होते. चर्च मधील पाद्रीने बायबल मधील वचने उद्धृत करून, ख्रिस्ती पद्धतीने विवाह झाला, एकमेकांच्या बोटात अंगठ्या सरकवल्या गेल्या, चुंबनविधी देखील पार पडला. त्या पाद्रीने विवाह म्हणजे काय, स्त्री पुरुष नाते, प्रेम, आदर या सर्व गोष्टी सांगितल्या. नंतर एका कृष्णवर्णीय पाद्रीनेदेखील उपदेश केला, तो थोडा विनोदी होता. त्याने अग्नी हा विषय घेऊन त्याचा शोध कसा क्रांतिकारक आहे हे सांगितले, त्याने दिलेल्या फेसबुक वगैरे उदाहरणावरून थोडी खसखस पिकली.

ते नवविवाहित जोडपे बाहेर येऊन समोर जमा झालेल्या जनसमुदायाला अभिवादन करून, घोडागाडीत बसून पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. CNNचे निवेदक चर्चा करत होते, मुद्दे मांडत होते. असा हा शाही विवाह, जो होऊ घातलेल्या बदलांची नांदी ठरू शकेल असा. हे सर्व येणारा काळच ठरवेल.

 

27 Down

रेल्वेचे आकर्षण कोणाला नसते? आजकालच्या जमान्यात जेथे विमान प्रवास तसा आवाक्यात आणि सोपा देखील झाला आहे, तरी रेल्वेचे वेगळेपण टिकून आहेच. मी कुठेही देशात, परदेशात जेथे मिळेल तिथे रेल्वेने प्रवास करण्याची संधी शोधत असतो. लहानपणी मामाच्या गावी, आजोळी जायचे म्हणजे रेल्वेनेच, त्याच्या कित्येक रम्य आठवणी आहेत. रेल्वेचा इतिहास, भारतातील आणि एकूणच जगातील आता हेरिटेज रेल्वे यांची माहिती करून घेण्यास मला नक्कीच आवडते. काही वर्षांपूर्वी असेच कुठल्यातरी पुस्तक प्रदर्शनात Discover India चे काही जुने अंक, जे भारतातील हेरिटेज रेल्वेला वाहिलेले होते, ते मिळाले होते. रेल्वेचे हे पुराण लावायला निमित्त अशे झाले की 27 Down हे शीर्षक असलेला सिनेमा दूरचित्रवाणीवर कुठेतरी लागणार होता असे दिसले मला परवा. मी म्हटले रेल्वेवर सिनेमा आहे की काय. पण तो निघाला १९७४ मधील हिंदी सिनेमा, जो मी नुकताच पाहिला. 27 Down या नावाने मुंबई वाराणसी एक्सप्रेस त्यावेळी होती असे दिसते. आता आहे का पहिले, पण तशी रेल्वे आढळली नाही. त्यांची नावे/क्रमांक बदललेली आहेत.

माझे कर्नाटकतील हुबळीचे एक काका जे रेल्वेत होते. ते train ticket checker(TTC) होते. त्यांचा तो काळा कोट, नाव असलेले स्टीलचा, पांढरी शुभ्र विजार, डोक्यावर रेल्वेची टोपी. विविध रेल्वे गाड्यांत ते कामानिमित्त फिरायचे. खूप भारी वाटे लहानपणी हे सर्व पाहताना. बऱ्याचदा आम्ही त्यांच्याबरोबर प्रवास करायचो, अर्थात फुकट, आणि तेही पहिल्या दर्ज्याच्या डब्यातून! हे TTC लोक पूर्वी पूर्वी रेल्वे स्टेशनच्या बाहेर जाण्याच्या ठिकाणी देखील थांबत, प्रवाशांची तिकिटे तपासायला. आता माहीत नाही. कित्येक दिवसात मी रेल्वेने प्रवासच केलेला नाही.

27 Down मधील नायक देखील असाच रेल्वेमध्ये, मुंबईत, TTC, आहे. बरं, ह्याला चित्रकलेत रस असतो, म्हणून भुसावळ वरून मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकत असतो. शेवटल्या वर्षाला असतो. पण बापाच्या इच्छेनुसार तो ते सोडून रेल्वेत काम करायला लागतो. लक्षात घ्या. चित्रपट १९७४ मधील आहे, त्यातील काळ देखील बहुधा तोच आहे. त्यावेळेस मुलं बापाचे ऐकायचे! घरची परिस्थिती हे कारण देऊन बाप ह्या शामळू, अबोल, बापाच्या शब्दाखातर आपल्या आवडीच्या क्षेत्रावर तिलांजली सोडतो. आधीच अबोल असलेला हा तरुण, आणखीन अबोल होतो. मुंबईचे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स हे अजूनही मी पहिले नाहीये. मागील मुंबई भेटीत देखील राहूनच गेले. ह्या सिनेमात पाहिली १५-२० मिनिटे जे जे मधील दृश्ये आहेत. इतक्यातच आलेला न्यूड सिनेमा देखील येथेच घडतो.

असो. सिनेमा पाहताना मजा येत होती, या तरुणाची परिस्थिती पाहून हसू येत होते. मुद्दामच श्वेत धवल असा बनवलेला हा सिनेमा. त्याकाळी कलात्मक चित्रपट, समांतर चित्रपट(parallel cinema) यांची लाटच आली होती. हा सिनेमाही त्यातीलच एक. एम् के रैना नावाच्या अभिनेत्याने त्या तरुणाची भूमिका केली आहे. मुळचे नाट्यक्षेत्राशी निगडीत असलेले रैना अजूनही अधून मधून हिंदी चित्रपटातून दिसत असतात. त्यावेळच्या मुंबई उपनगरीय रेल्वेची दृश्ये, त्यातही एक दृश्य जे तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस वरील आहे. एक खचाखच भरलेली उपनगरीय रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनसच्या एका फलाटावर येते. फ्रेम मध्ये ३-४ फलाट दिसत आहेत, सगळे रिकामेच आहेत. आलेल्या रेल्वेतून हळू हळू लोक बाहेर पडत राहतात, आणि तो फलाट काही वेळातच लोकांनी गच्च भरला जातो. काही क्षणात फलाटाचे बदललेले रुपडे आपल्यासमोर उलगडते. अश्या मनाविरुद्ध रेल्वेत काम करण्याची पाळी आलेल्या तरुणाचे रेल्वेमुळेच एका तरुणीवर(राखीने ही भूमिका केली आहे) प्रेम जडते. ती तरुणी भारतीय आयुर्विमा मंडळात(LIC) काम करते, रेल्वेने जा ये करत असते. मग त्यांचे ते संयत, अबोल प्रेम, एकमेकांच्या घरी जाणे येणे, चौपाटीवर जाणे वगैरे ओघाने येते. कलात्मक चित्रपट असल्यामुळे युगुलगीते, गाणी अशी नाहीत! पण पार्श्वसंगीत छान आहे, जे पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित भुवनेश्वर मिश्रा यांनी दिले आहे. विशेषतः तबल्याचा वापर छान केला आहे.

जसा हा शामळू तरुण, तशीच ती तरुणी देखील. तिच्या घरचे लोक, जे पुण्यात असतात, ते तिचे लग्न दुसरीकडे ठरवतात. झाले, हा आधीच खचलेला तरुण, असफल प्रेमामुळे अजूनच खचतो. त्यातच त्याचा बाप त्याचे लग्न एका मुलीबरोबर ठरवतो, हुंडा म्हणून ५-६ म्हशी मिळवतो! ह्या सगळ्यातून हा तरुण शेवटी घर सोडून निघून जातो. कुठे? अर्थात वाराणशी. कसे? मुंबई वाराणसी एक्सप्रेस २७ डाऊन, आणि कसे?! वाराणशीत भटकतो, वेश्याकडे जातो, काय करावे त्याला कळत नाही. आणि चित्रपट येथे विराम घेतो. चित्रपट ठिकठाक होता, दोन घटका करमणूक नक्की झाली. जुन्या काळातील मुंबई, पुणे, रेल्वे, वाराणशी वगैरे दिसते. चित्रपट त्याकाळातील तरुणांची, कुटुंबाची मानसिक जडणघडण वास्तवपणे चित्रित करण्याचा प्रयत्न करतो, पण कलात्मक चित्रपटात एखादा विषय, प्रश्न मांडला जातो किंवा काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न असतो, यात तसे काहीच नव्हते.

एक सांगायचे राहिले, वरती उल्लेख केलेले रेल्वेतील माझे काका देखील, माझ्या आठवणीप्रमाणे, जे जे मध्ये शिकत होते. फक्त फरक असा की त्यांनी त्यांचे कलाशिक्षण पूर्ण केले, रेल्वेत काम करत करत कला देखील जोपासली. आणि त्यांचे काही असे प्रेमप्रकरण नव्हते! त्यामुळे कथेत आणि त्यांच्या जीवनाचा काही तसा संबंध नाही!

बेट्टद जीव

मला कन्नड येत असूनही माझे कन्नड वाचन विशेष नाही, अगदी नगण्यच म्हणा ना. कन्नड मधील सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, यक्षगान संशोधक, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असे कोटा शिवराम कारंथ यांचे एक पुस्तक मिळाले, म्हणजे त्याचा मराठी अनुवाद मिळाला. मूळ कन्नड शीर्षक बेट्टद जीव, अनुवादित पुस्तकाचे शीर्षक डोंगराएवढा असे आहे. अनुवाद उमा कुलकर्णी यांचा आहे. कन्नड मध्ये बेट्ट म्हणजे डोंगर. एक-दोन वर्षांपूर्वी बेट्टद जीव नावाचा याच कादंबरीवर आधारित असलेला एक कन्नड सिनेमा पाहिला होता. पण पुस्तक वाचताना जास्ती मजा आली. मी वाचत होतो तो मूळ पुस्तकाच्या १९८० मधील अकराव्या आवृत्तीचा अनुवाद. पाहिली आवृत्ती १९४०च्या दशकातील.

स्वतांत्र्यापुर्वीच्या काळातील ही कथा. कर्नाटकतील दक्षिणेकडील दुर्गम अश्या भागातील एका खेड्यात घडते. तीला कथा असे म्हणावे का असा प्रश्न पडतो. कारण  त्या खेड्यात राहणाऱ्या वृद्ध जोडप्याच्या जीवनातील ४-५ दिवसाचे जीवनमान म्हणजे बेट्टद जीव. त्या दुर्गम भागात अपार कष्ट करत, आपल्याच मस्तीत, हसत खेळत, जगणारे ते जोडपे. अश्या ठिकाणी पाय रोवून उभे राहिलेले गोपालय्या आणि शंकरम्मा हे जोडपे, त्यांचे सुख, दु:ख सांगणारी ही कादंबरी. मंगळुरूकडून आग्नेय दिशेला असलेल्या पुत्तूर, सुब्रमण्य, सुळीया, धर्मस्थळ या भागात घनदाट जंगल, कुमार पर्वत या सारखे डोंगर, सुपारी, नारळ, मसाले, कॉफी यांच्या बागा, रबराचे मळे, कावेरी नदीचे खोरे यामुळे समृद्ध असा हा भाग. मी थोडासा या भागात हिंडलो आहे, १०-१२ वर्षांपूर्वी. वनराजीने, वन्यजीवनाने अतिशय समृद्ध असा सह्याद्रीचा दक्षिणेचा भाग आहे.

कादंबरीट प्रथम पुरुषी निवेदन आहे, म्हणजे स्वतः लेखक गोष्ट सांगतो आहे. तो सुब्रमण्यजवळ असलेल्या गावी जात असता, वाट चुकतो. त्याला देरण्णा, बट्ट्या हे दोघे भेटतात आणि जवळच असलेल्या केळबैलू या गावी राहत असलेल्या गोपालय्या आणि शंकरम्मा या हव्यक ब्राह्मण कुटुंबात रात्रीचा मुक्काम करून पुढे जावे असा सल्ला देतात. ते दोघे त्याला त्यांच्या घरी सोडून आपापल्या मार्गाला लागतात. ते दोघे मिळून त्याचे छान असे आदरातिथ्य करतात. या सगळ्याचे अतिशय रसभरीत वर्णन येते. तेथील निसर्गाचे, त्यांच्या जीवनपद्धतीचे, खाण्या-पिण्याचे तपशील येतात. निवेदनाच्या, संवादाच्या ओघात समजते की त्यांचा एक तरुण मुलगा १०-१२ वर्षांपासून दुरावलेला असतो, घराकडे फिरकलेला नसतो, काही संपर्क देखील नसतो. त्याचे त्यांना शल्य असते, जीव तुटत असतो.

आणखीन काही दिवस राहण्याचा निवेदकाला त्यांचा आग्रह मोडवत नाही. सकाळ संध्याकाळ त्यांच्याबरोबर आसपास मनसोक्त भटकतो, मलनाड प्रदेशाच्या निसर्गपर्यटनाचा आनंद घेतो. पती पत्नी उभायांतील कडू गोड संवाद, खटके, मुटके, एकमेकांचे चिमटे हे सर्व त्याला अचंबित करत होते. ते दोघे किती आनंदी जीवन जगात होते आहे त्या परिस्थितीत. कर्नाटकातील हव्यक ब्राम्हण लोकांतील रिती रिवाज यांचे रितीरिवाज, खाण्यापिण्याची वैशिष्ट्ये(उदा. काईहुळी म्हणजे नारळाची आमटी), त्यांच्या शेताची, बागेची कामे, तसेच हत्ती, साप, हरीण या सारख्या जंगलातील जनावरांचा त्रास, होणारे नुकसान यांचे वर्णन वाचायला मिळते. त्या भागात राहणाऱ्या मलेकुडीय नावाच्या आदिवासी लोकांबद्दल देखील समजते. गोपालय्या यांच्या मनाच्या मोठेपणाची, लोकांवर जीव लावण्याच्या वृत्तीची उदाहरणे कादंबरीत येत राहतात. नारायण नावाचा एक गडी त्यांच्या शेतावर काम करायला असतो, त्यांनी कसायला जमीन देखील दिलेली असते, त्याचे लग्न करून दिले असते, त्याच्या मुलांचे देखील ती दोघेही खूप करत असतात. पण नारायणला चिंता असते या दोघांच्या नंतर आपले कसे होणार. म्हणून तो आपले पैसे खर्च करून स्वतःची अशी शेतजमीन घेण्याचा विचार करत असतो. पण इकडे गोपालय्या यांनी त्याची देखील व्यवस्था लावलेली असते. असे करत करत निवेदकाचा त्यांच्याकडील ४-५ दिवसांचा मुक्काम संपतो, पुण्याला, मुंबईला जाऊन मुलाचा शोध घेण्याचे आश्वासन देतो आणि कादंबरी संपते.

प्रसिद्ध नट एच. जी. दत्तात्रय यांनी गोपालय्या यांची, तर रामेश्वरी वर्मा यांनी शंकरम्मा यांची भूमिका केलेल्या या चित्रपटात आणि कादंबरी यात थोडासा फरक आहे. चित्रपटात त्यांच्या मुलगा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी घर सोडून जातो अशी पार्श्वभूमी आहे, पण कादंबरीत तसे काहीच नाही. उलट कादंबरीत नारायणच्या पत्नीवर या मुलाने अतिप्रसंग केला असतो असे आले आहे, आणि त्यामुळे नारायण आणि त्याची पत्नी तो परत गावी आला तर कसे होईल याची धास्ती बाळगून असतात.  अनेक पुरस्कार मिळालेला हा चित्रपट युट्युबवर येथे आहे. असो. या कादंबरीला कारंथ यांची छोटीशी प्रस्तावना आहे. त्यात ते म्हणतात, ‘…माझे मित्र शुंटीकोप मंजुनाथ यांच्या घरी दहा दिवस ठाण मांडून लिहून काढली. तिथे जाताना संपाजे घाटात बस बंद पडली होती. तेव्हा बसमधून उतरून सभोवताली नजर फिरवत असता, बेट्टद जीव हे नाव सुचले….ह्या कादंबरीतील गोपालय्या हे व्यक्तिमत्व रंगवण्यास सुब्रमण्य सीमेवरील कट्टद गोविंदय्या ही थोर व्यक्ती! त्यांचे बोलणे, वागणे, सच्चेपणा, धीरोदात्तपणा या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. …’

अशी ही शिवराम कारंथ यांची कादंबरी, खऱ्याखुऱ्या माणसावर आधारलेली.  शिवराम कारंथ यांच्याबद्दल लिहायचे म्हणजे वेगळाच दीर्घ लेख लिहावा लागेल. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू होते. बघू पुढे मागे.

Ivan

आजकाल मी माझा मोर्चा अनुवादित पुस्तकांकडे वळवला आहे. पूर्वी अनुवादित पुस्तके तितकीशी वाचत नसे. परवा वाचनालयात अनुवादित पुस्तकांचा कप्पा धुंडाळता धुंडाळता अचानक एक रशियन पुस्तक हाती लागले, मराठी अनुवाद असलेले.  त्याचे नाव इवान(Ivan by Vladimir Bogomolov). माझे मन एकदम पंचवीस एक वर्षे मागे गेले. भारत आणि पूर्वाश्रमीचा सोविएत रशिया यांच्यात मैत्री संबंध हे १९९० पर्यंत मजबूत होते. त्यामुळे कित्येक क्षेत्रात देवाणघेवाण होत असे. त्यातलाच एक भाग म्हणून कित्येक रशियन पुस्तके ही भारतीय भाषांत, मराठीतही उपलब्ध होत असत. कथा, नाटके, कादंबऱ्या, बालवाड्मय असे सगळे. तसेच तांत्रिक विषयांवरील इंग्रजी पुस्तकेही मिळत. मीर प्रकाशन, रागुदा, प्रावदा या प्रकाशन संस्था सरकारी मदतीने हे काम करत असत. ही पुस्तके टिपिकल असत, त्यामुळे सहज ओळखू येत असत. त्यांची मांडणी, कागद, चित्रे, अक्षररचना इत्यादी.

मी इवान हे पुस्तक घरी आणले. पण लगेच वाचायला सुरुवात अशी केलीच नाही. ते आधी नीट व्यवस्थित न्याहाळले. मुखपृष्ठ, मलपृष्ठ, आतील चित्रे, कागद, रशियन भाषेतील काही मजकूर हे सगळे डोळ्यात साठवले, फोटो काढले आणि मग वाचायला घेतले! मला असेही वाटत होते की हे पुस्तक परत वाचनालयाला परत करूच नये, त्याची चक्क चोरी करावी आणि आपल्या संग्रही ठेवावे. पण अर्थातच तसे केले नाही. हे पुस्तक रादुगा प्रकाशन मॉस्को आणि लोकवाड्मयगृह मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १९८७ मध्ये आलेले हे पुस्तक. मुद्रण सोविएत रशियात झाले असे नमूद केलेले होते. मुखपृष्ठावर अनुवाद केलेल्या व्यक्तीचे नाव अश्या रशियातून आलेल्या पुस्तकांवर नसे, ह्या पुस्तकावर देखील ते नाही. आत ते आहे, आणि अनिल हवालदार असे नाव आहे.

 

ही कादंबरी घडते ती दुसऱ्या महायुद्ध्याच्या काळात, रणभूमीवरच. सोविएत रशियाचे लाल सैन्य(Red Army) आणि हिटलरची जर्मनी यांच्यातील युद्धाच्या काळात इवान नावाच्या मुलाने बजावलेली कामगिरी म्हणजे ही कामगिरी. या महायुद्धाच्या काळात जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यावर बरीच रशियन मुलं युद्धात या ना त्या कारणाने ओढली गेली. त्यातील एक मुलगा म्हणजे हा बारा वर्षांचा इवान बोन्दारेव अनाथ असा मुलगा. ह्या छोट्याश्या कादंबरीला प्रस्तावना आहे. त्यात अश्या काही मुलांचा उल्लेख आला आहे. प्रत्यक्ष युद्धात भाग नसे, पण संदेश पोचवणे, टेहळणी करणे, जखमी सैनिकांची सुश्रुषा करणे अशी कामे करत. आणि ती ही काही कमी धोक्याची नाहीत. बऱ्याचदा ही मुले शत्रुच्या हाती लागत, पण गुपित उघडे न करता बलिदान पत्कारले आहे असा इतिहास सांगतो.

जर्मन सैन्याकडून इवानचे कुटुंबीय मारले गेले असतात, तो Soviet Partisans या गनिमी काव्यानिशी लढणाऱ्या टोळीत दाखल होतो. पण नंतर त्याला सोविएत रशियन सरकारने निवासी शाळेत दाखल केले असते, पण हा पठ्ठ्या तेथून पळून सैन्यात दाखल होतो. भयानक थंडीत हा इवान तीन किलोमीटर नदीचे पात्र रात्री ओलांडून येतो आणि रशियन सैन्याच्या तावडीत सापडतो. त्याला पकडल्यानंतर तो कोण आहे ह्याच खात्री केली जाते, आणि त्याला पुढच्या मोहिमेसाठी ठेवून घेतले जाते. त्याचा करारी पणा, कसोशीने गुप्तता पाळण्याची त्याची धडपड हे सर्व छान चित्रित केले आहे. सोबतची रंगीत चित्रे मजा आणतात. कप्तान खोलीन पुढील हालचालीची तयारी करतात.  स्वतः खोलीन, इवान, निवेदक तिघे पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन झाडीत होडी लपवून ठेवणार होते. नंतर इवान सहाशे मीटर चालत एका खिंडीपर्यंत जर्मन सैन्याच्या तिसऱ्या बटालियनला ओलांडून पुढे आणखी पन्नास किलोमीटर अंतर कापून रशियन कंपूत जाऊन निरोप पलीकडे पोचवण्याचे काम त्याला दिले होते. सगळे व्यवस्थित होते, पण पुढे जर्मन सैनिक छोट्या इवानला पकडतात. उलटतपासणीच्यावेळेस त्याने आपले राष्ट्रप्रेम जागृत ठेवले, बिलकुल सहकार्यन करता, कोठलीही माहिती दिली नाही. त्याची हत्या केली जाते. अशी ही रोमांच आणणारी कथा. अनुवाद ठीकठाक आहे. बऱ्याच ठिकाणी शब्द खटकतात, रसभंगदेखील होतो.

 

ह्या कादंबरीवर Andrei Tarkovsky या फिल्ममेकरने Ivan’s Childhood नावाचा चित्रपट देखील बनवला, ज्याचा बराच बोलबाला आणि वादविवाद देखील झाला होता असे दिसते. तोही मी ही कादंबरी वाचल्यानंतर युट्यूबवर येथे पाहिला. बरेच बदल त्यांनी केले आहे मूळ कथेत, पण माध्यमांतर करताना असे नेहमी होतेच. तीन-चार वर्षांपूर्वी मी पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या ‘केल्याने भाषांतर’ हे परदेशी भाषेतील साहित्य मराठी अनुवादित करण्यासाठीचे त्रैमासिक सुनंदा महाजन चालवत आहेत, त्याचा वर्गणीदार होतो, बरीच वर्षे. त्यातही रशियन, आणि युरोपियन भाषेतील कथा, कविता येत असतात. इतक्यातच मी असेही ऐकले होते मराठीतील रशियन पुस्तकांच्या खजिन्याबद्दल मुंबईतील काहीजण एक माहितीपट बनवत आहे-‘धुक्यात हरवलेले लाल तारे’ असे त्याचे नाव. त्याबद्दल येथे पाहता येईल.

माझ्याकडे एका रशियन लेखकाचे धातू या विषयावरील इंग्रजी पुस्तक आहे. त्याचे नाव Tales of Metals, लेखक S Venetsky, मीर प्रकाशनचे, १९९०चे पुस्तक असेच भरपूर रंगीत चित्रे असलेले आहे, तेही अगदी मनोरंजक पद्धतीने लिहिले आहे. तसेच अजून एक पुस्तक ज्याचे नाव असे Tales of a Naturalist मूळ रशियन लेखक Pyotr Manteufel, इंग्रजी अनुवाद‎ Linda Noble यांचा आहे, ते सुद्धा नुकतेच मला कुठेतरी अगदी स्वस्तात मिळाले होते. लाल रंगीत मुखपृष्ठ असलेले पुस्तक रशियातील प्राणी आणि वन्यजीवांच्याबद्दल माहिती देणारे छोटेखानी पुस्तक आहे, आणि रादुगा प्रकाशनचेच १९८९ मधील आहे. असो. तर अशी ही रशियन पुस्तकं, आणि त्यांची मजा. आणखीन काही जुनी रशियन पुस्तके, विशेषतः मराठीतील, मिळतायेत का ते पाहायला पाहिजे.

The Seagull

पुणे विद्यापीठात ललित कला केंद्र(Center for Performing Arts) नावाची संगीत, नृत्य, नाटक इत्यादी प्रयोगक्षम कलांचे शिक्षण देणारी जुनी आणि नावाजलेली संस्था आहे. त्यांच्या तर्फे नेहमीच काहीना काही कार्यक्रम, चर्चासत्र, परिषद इत्यादी सुरु असते. मी पूर्वी बऱ्याचदा गेलो आहे. काल त्यांनी एका नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. तेही संस्थेच्या आवारात असलेल्या खुल्या रंगमंचावर, अंगण-मंच असे त्याला म्हणतात. नाटक होते ते प्रसिद्ध रशियन कथाकार, नाटककार अन्तन चेखोव्ह(Anton Chekhov) याचे  The Seagull. मराठीत प्रयोग होता. रशियन साहित्याचे मराठीत अनुवादित केलेली पुस्तके एकेकाळी खूप लोकप्रिय होती. महेश एलकुंचवार त्यांच्या पश्चिमप्रभा पुस्तकात त्यांनी अन्तन चेखोव्हबद्दल आणि त्याच्या नाटकांबद्दल म्हणतात, “…कमालीची लोकप्रिय असली तरी त्यांचे प्रयोग करणे महाकठीण आहे….ही कारागिरी नुसती रचनेत नसून व्यक्तिचित्रणात, संवादात, दृश्यसंकल्पनेत, सगळीकडे आहे. त्यामुळे दिग्दर्शकाला, नटांना त्याची खोल जाणीव येऊन त्यांनी एकमताने ensemble acting काम केले व अतिशय सूक्ष्म आणि अभिजात अभिनय तोही परस्परपूरक असा असा तरच या नाटकांना न्याय मिळून चांगला प्रयोग उभा राहण्याची शक्यता. नाहीतर सर्व चमू तोंडावर आपटण्याचीच शक्यता. बरे असे आपटले तर चेखोव्हना दोष देण्याची सोय राहिली नाही इतके त्यांचे मोठेपण अबाधित व सिद्ध आहे. त्यामुळे त्यांच्या नाटकांच्या वाटेला कोणी जातच नाही. मराठी रंगभूमीवर इतक्या पाश्चात्य कलाकृतींचे अनुवाद झाले आहेत पण एवढी दीडशे वर्षांची संपन्न परंपरा असलेल्या रंगभूमीवर चेखोव्हला हात लावायचे कोणी धैर्य दाखवले नाही ही गोष्ट खुपच बोलकी आहे…”.ह्या पार्श्वभूमीवर मी अतिशय उत्सुकतेने आणि भीतभीतच साशंक मानाने प्रयोग पाहायला गेलो.

एलकुंचवार पुढे म्हणतात की पत्रे अभिनीत करायची तर पूर्णपणे अंगात भिनवून घ्यावी लागतात, internalize करून घ्यावी लागतात. हा प्रयोग ललित कला केंद्राच्या नाट्यविद्येचे विद्यार्थी यांनी सादर केला आहे. प्रवीण डोळे यांनी अनुवाद आणि नाट्य-दिग्दर्शन केले आहे. प्रयोग संध्याकाळी अंगण-मंच येथे होता. खुल्या रंगमंचावर नाटक पाहणे हा एक छान अनुभव असतो. वर मोकळे आकाश, आजूबाजूला झाडी, नुकताच सूर्य अस्ताला गेल्यामुळे असलेला संधीप्रकाश, समोर मोठेसे अर्धवर्तुळाकार असा रंगमंच.  गेल्या गेल्या आम्हाला नाटकाबद्दलचे एक पत्रक देण्यात आले, तसेच खुल्या रंगमंचावर प्रयोग असल्यामुळे डासांपासून बचाव करण्यासाठी ओडोमॉस देखील देण्यात आले! आम्ही जाऊन स्थानापन्न होईपर्यंत संगीत सुरु झाले होते, वातावरण निर्मिती होत होती. नाटक सुरु झाले आणि हळू हळू रशियन नावे असलेली आणि पोशाख असलेली, पण मराठी बोलणारी माणसे अवतरू लागली. मोठे असे खुले रंगमंच असल्यामुळे ही माणसे विविध कोपऱ्यातून अवतरत होती. हे झेपायला थोडा वेळ लागला. चेखोव्हचे हे नाटक चार अंकी आहे, बाकीची बरीचशी एक अंकी आहेत. मॉस्कोपासून दुरवर एका खेड्यात तळ्याकाठी असलेल्या घरी काही लोक जमत आहेत अशी सुरुवात होती.

नाटकात एकूण पात्रे दहा. इरिना-अभिनेत्री, Constantine-इरीनाचा तरुण मुलगा, नीना-जमीनदाराची तरुण मुलगी, बोरीस-लेखक, प्योत्र-इरीनाचा आजारी भाऊ/निवृत्त सरकारी अधिकारी, एव्हजिनी-डॉक्टर, इलिया-फार्महाउसचा व्यवस्थापक, पोलीना-इलीयाची पत्नी, माशा-इलिया आणि पोलीना यांची तरुण मुलगी, सेमिऑन-शिक्षक. या दहा माणसांव्यतिरिक्त आणखीन एक महत्वाचे पात्र म्हणजे seagull पक्षी. हे सगळे लोक, जे आपापल्या क्षेत्रात काही करू पाहत असतात, आशा अपेक्षा, यश अपयश यांचे सगळे गाठोडे घेऊन हवापालटासाठी गावाकडील तळ्याकाठी असलेल्या फार्महाउस मध्ये आलेले असतात. कोणाला वाढत्या वयाची भीती, कोणा नाटककाराला चांगली नाटकं लिहिता येत नसल्यामुळे आलेले नैराश्य, तर कुणाला प्रेम गमावून बसण्याची भीती, तर कुणाला आणखी काही अपेक्षा, किंवा अपेक्षाभंगाचे दुःख, गोंधळलेली ही माणसे. कधी उपहास, तर कधी थेट, तर कधी हलके फुलके चिमटे काढत हे नाटक एका दुर्घटनेपाशी थांबते. बाकीचे तपशील सांगत नाही, रसभंग होण्याची शक्यता आहे.

चार अंकी हे नाटक चांगलेच रंगले. नाटकात भडक नाट्यमयता बिल्कूल नाही, सगळे कसे आपल्या घरी घडते आहे असे वाटते. सगळ्यांनी बरीच मेहनत घेतलेली दिसत होती. वेशभूषा, रंगभूषा साजेशी होती. पार्श्वसंगीत छानच होते, पक्षांच्या समयोचित किलबिलाट, घोडा, टांग्यांचा आवाज, संवाद देखील नीट ऐकू येत होते. शेवटच्या अंकात पार्श्वसंगीत जवळ जवळ नाहीसे झाले, का ते समजले नाही. प्रकाशयोजना अधिक परिणामकारी झाली असती असे वाटून गेले. व्यक्तिरेखेतील बारकावे लवकरच प्रस्थापित होत गेले, त्यामुळे मजा येत गेली. आम्हाला दिलेल्या पत्रिकेत प्रवीण भोळे यांची एक नोंद आहे. त्यात ते म्हणतात की प्रत्ययवादी(expressionism) शैलीतील हे नाटक  दिग्दर्शित करण्याचे आव्हान होते आणि स्तानिस्लाव्स्कीने(Stanislavsky)  आखून दिलेल्या method physical action ची पद्धत वापरली आहे.

असो. नाटक संपता संपता पर्यंत रात्र झाली होती. कुठेही कंटाळा आला नाही, अनुवादित नाटक, नवखे अभिनेते, असे असून सुद्धा. १८९० मधील हे नाटक, म्हणजे रशियातील १९१७ च्या क्रांतीच्या आधीचा हा काळ. त्याकाळच्या रशियन जीवनाचे प्रतिबिंब ह्या नाटकात येते असे म्हणता येईल. ह्याचा आजही संध्याकाळी त्याच ठिकाणी अजून एक प्रयोग आहे. जरूर जाऊन अनुभव घेऊन या असेच मी म्हणेन.

के फाईव्ह

डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पडली, आणि त्याचे अनेक पडसाद देशभर उमटले. मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट ही त्याचीच भीषण परिणीती. ही देश हादरवणारी घटना होती. नुकतीच पंचवीसहून अधिक वर्षे होऊन गेली ह्या सर्व गोष्टीला. हा इतका स्फोटक विषय, पण यांचे मराठी चित्रपट माध्यमातून, अथवा मराठी पुस्तकातून विशेष प्रतिक्रिया मला तरी दिसली नाही. इंग्रजी, हिंदी मध्ये काही आहेत. या विषयाची पार्श्वभूमी असलेल्यामुळे गेल्या आठवड्यात जेव्हा के फाईव्ह ही प्रसिद्ध लेखक अनंत सामंत यांची छोटीशी मराठी कादंबरी हाती पडली, तेव्हा उत्सुकता वाटली, आणि दोन-तीन बैठकीत वाचून काढली. त्याबद्दल थोडेसे लिहायचे आहे.

अनंत सामंत हे पूर्वाश्रमी मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यानिमित्ताने जग फिरून आलेले असे लेखक. दर्यावदी असल्यामुळे अनेक जगावेगळे अनुभव पाठीशी आहेत. हे सर्व त्यांच्या कृतीमधून उमटते. त्यामुळे अनंत सामंत यांच्या कादंबऱ्या मला आवडतात. विषय वेगळे, मांडणी वेगळी, थोडसे बोल्ड अनुभवकथन इत्यादी मुळे त्या नक्कीच उठून दिसतात. एम् टी आयवा मारू हे ठळक उदाहरण. ती तर त्यांची पहिलीच कादंबरी. वाचायला सुरुवात केल्यावर खालीच ठेववत नाही. त्यांचे अजून एक पुस्तक ऑक्टोबर एन्ड, त्याबद्दल पूर्वी लिहिले होते.  पण के फाईव्हने कादंबरीने साफ अपेक्षाभंग केला. कादंबरीचे गुणगान करणारी पुरस्कार स्वरूप अभिप्राय पुस्तकात दिली आहेत. तरीही मला ही कादंबरी आवडली नाही. पहिल्या दोन प्रकरणात थेट काश्मीर. भारतीय सैन्यदलातील कमांडोज काश्मीरच्या खोऱ्यात एका दहशतवाद्यांच्या विऱोधातील एका कामगिरीत गुंतले आहेत. के फाईव्ह हा त्या कमांडोज पैकी एक. त्या कामगिरीचे आणि कमांडोजचे वर्णन वाचताना बाबा कदम वगैरेंची काळा पहाड वगैरे नायकाची एखादी कादंबरी वाचतो आहे की काय असे वाटते. लपलेले दहशतवादी मारले जातात, पण दहशतवाद्यांच्या तावडीत एक स्त्री असते, ती बचावते, तीला पकडले जाते, आणि तेथेच कादंबरीला कलाटणी मिळते.

बाकीची कादंबरी म्हणजे त्या स्त्रीची कहाणी तिच्या जुबानी, मुलाखतीच्या रुपाने आपल्या समोर येते. मुंबई बॉम्बस्फोटात योगायोगाने ती आणि तिचे कुटुंब सापडते आणि मुंबईत त्यादिवशी दहशतवाद्यांच्या हाती सापडते. कोकणातून मुंबईत प्रथमच ती स्त्री आलेली असते. ती मराठी मुलगी, तिच्यावर अमानुषपणे कसे अत्याचार होतात, क्रूरपणे, निर्दयपणे छळ होतो, यांचे सद्यांत ती वर्णन करते आणि आपण ते वाचतो. त्यानंतर हे दहशतवादी तीला आपल्याबरोबर काश्मीर खोऱ्यात घेऊन जातात. अत्याचाराचे हे वर्णन अनेक ठिकाणी नको इतके भडक आहे. असले ते वास्तव, अश्या अत्याचाराच्या बातम्या नेहमी वाचतोच आपण. हा कादंबरीसाठी विषय नवा नाही, त्यामुळे थोडासा भडकपणा सोडला तर त्यातून वेगळे काही मिळत नाही. तर पुढे ह्या स्त्रीला तिच्या महाराष्ट्रातील घरी परत सोडून येण्याची कामगिरी के फाईव्हचे वरिष्ठ त्याच्यावर सोपवतात. आणि ही कादंबरी मुंबई बॉम्बस्फोट झाला तेव्हाची गोष्ट विस्तृतपणे सांगण्याची संधी लेखक गमावतो असे मला राहून राहून वाटले. ती होते स्त्री अत्याचाराशी निगडीत आणखीन एक कादंबरी. ही कादंबरी अर्थातच संवेदनाशून्य समाजमनावर भाष्य करते. पण त्यात नवीन काय सांगितले गेले, असा प्रश्न पडतो.

तीला तिच्या घरी घेऊन गेल्यावर कुटुंबियांकडून तिचा स्वीकार केला जात नाही. परत नेहमीचेच कथानक. मग आपला हिरो के फाईव्ह तीला मानवतावादी दृष्टीकोनातून आपल्या घरी घेऊन जातो, वगैरे. अवघड आहे! एक अत्याचार करणारा अतिरेकी, आणि दुसरा वाचवणारा अश्या दोन पुरुषाची टोकाची रूपे चित्रित केली आहेत. या कादंबरीवर एक मराठी चित्रपट, एक नाटक देखील निघालेले आहेत, दोन्ही सपशेल आपटली आहेत. ह्या कादंबरीचे शीर्षक के फाईव्ह का हा देखील प्रश्न पडतो. ही त्या कमांडोची कथा नाहीच. ही कादंबरी १९९४च्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाली आधी, आणि नंतर पुस्तक आले. लेखक आनंद सामंत यांनी दोन उल्लेख दिले आहेत सुरुवातीला, ते थोडे वेगळे वाटले. पहिला उल्लेख, जो अर्पणपत्रिकेच्या रूपात दिसतो तो असा आहे:

चितोडच्या राणा रतनसिंगाची पत्नी राणी पद्मिनी

अनहिलवाड्याच्या राणी कर्णदेवरायाची राणी कवलदे

अनहिलवाड्याच्या राणी कर्णदेवरायाची कन्या देवलदे

देवगिरीचा राजा रामचंद्रदेवरायाची मुलगी जेठाई, छिताईबेगम आणि या अखंडित परंपरेस

सहिष्णुतापूर्ण

हा उल्लेख अर्थात इतिहासातील स्त्रियांचे, त्यांच्या बलिदानाचे गुणगान करणारा आहे, ते अर्थातच सार्थच आहे. अर्थात ही यादी आणखीन मोठी आहे, पण ही प्रातिनिधिक आहे असे समजूयात. राणी पद्मिनी शिवाय इतर स्त्रियांच्या बद्दल मला तरी माहिती नाही, संदर्भ पाहायला हवेत.

दुसरा उल्लेख आहे तो गोविंद सरदेसाईकृत मुसलमानी रियासत खंड पहिल्या भागातील आहे. आणि तिसरा आहे तो Will Durant यांच्या The Story of Civilization मधील अभिप्राय. हे दोन्ही अभिप्राय म्हणजे भारतावर झालेल्या इस्लामी राजवटीचे आक्रमण(Mohammedan Conquest) आणि अत्याचार त्यावर प्रतिक्रिया आहे. मुंबई बॉम्बस्फोट असेल किंवा एकूणच दहशतवाद हे ही एका प्रकारे असे आक्रमणच आहे असे तर अनंत सामंत यांना सुचावायचे नाही ना?

ता. क. : आजचीच बातमी अशी आहे की मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक ताहेर मर्चंट, ज्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती त्याचा येरवडा कारागृहात मृत्यू झाला. माझा हा त्या विषयावरील ब्लॉग आणि ही बातमी, काय योगायोग आहे!