अमर फोटो स्टुडिओ

अमर फोटो स्टुडिओ हे नाटक गेली दोन-तीन वर्षे गाजते आहे, सातत्याने प्रयोग होत आहेत. परवा गांधीजयंती होती आणि त्याच्या निमित्ताने सुट्टी होती, आणि हे नाटक बालगंधर्वला पाहिले. अमर फोटो स्टुडिओ म्हणजे एखाद्या फोटो स्टुडिओ भोवती हे नाटक असणार हे उघड होते. मी मनात म्हणत होतो की कोण जाते आजकालच्या मोबाईल फोटोग्राफीच्या जमान्यात, फोटो स्टुडिओ मध्ये. एका वाक्यात सांगयचे म्हणजे नाटक टाईम मशीन(कालयंत्र) संकल्पनेवर आधारित आहे. मला तरी वाटते ही science fiction संकल्पना मराठी रंगभूमीवर प्रथमच येते आहे. मग याला science fiction(sci-fi) नाटक म्हणायचे की काय? याच संकल्पनेवर आधारित Back to the Future हा sci-fi फँटसी सिनेमा आपल्याला माहीत असतो. सध्या मराठी रंगभूमीवर सुरू असलेली अमर फोटो स्टुडिओ ही देखील एक फँटसी प्रकार आहे. पण नाटकाचे हे वेगळेपण सोडल्यास मला तरी हे नाटक विशेष भावले नाही.

अमर फोटो स्टुडिओ

अमर फोटो स्टुडिओ

नाटक लिहिले आहे मनस्विनी लता रविंद्र यांनी. त्यांचे कसदार स्तंभलेखन मी वाचले आहे. नाटकाची सुरुवातच एकजण गळफास घेत आत्महत्येच्या तयारीत असलेला दिसतो. हा अपू आणि त्याची प्रेयसी तनू यांचं एकमेकांवर प्रेम आहे. अपू हा आत्मविश्वास नसलेला तरुण, तर तनू संशयी, पझेसिव्ह अशी. तो अमेरिकेला उच्च शिक्षण घेण्यासाठी निघणार आहे. त्याची परत येण्याची वाट पाहण्याची तनूची तयारी नाही. तनूला ब्रेक अप हवा आहे. अपूचा आत्मविश्वास ढळण्याचे एक कारण दिले आहे ते मला तरी तद्दन फालतू आणि न पटणारे वाटले.  अपूचे वडिल, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा हे सगळेच वयाच्या २७व्या वर्षी घरातून पळून गेले आहेत आणि आता तोही २७ वर्षांचा असल्याने आपण पळून जाऊ, अशी त्याला भीती वाटतेय. तनुच्या वडिलांची देखील अशीच काहीशी पार्श्वभूमी असते, ज्यामुळे तिचे त्यांच्याबद्दल गैरसमज असतात.

ते दोघे अमेरिकेला निघालेल्या अपूचा व्हीसासाठी फोटो काढायला एका फोटो स्टुडिओपाशी येतात, ज्याचं नाव आहे अमर फोटो स्टुडिओ. एक विचित्र बोलणारा, विक्षिप्त म्हातारा त्या स्टुडिओचा मालक आहे. टाईम मशीन ही संकल्पना व्यक्तीला आधीच्या किंवा पुढील काळात घेऊन जाते. वर्षे कितीही असू शकतात! काहीतरी एक trigger लागतो काळ पुढे मागे जाण्यास. तसा trigger  नाटकात camera click ने येतो. कल्पना छान आहे; कृष्ण धवल अशी नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना या द्वारे ते छान जुळवूनही आणले आहे. फोटो काढायला आलेला अपू दुसऱ्याच क्षणी १९४२ सालात जातो आणि तनू १९७७ मध्ये, जो आणीबाणीचा काळ. मग वेगवेगळ्या काळात वेगळ्याच माणसांना घेऊन येते आणि वेगवेगळे प्रसंग त्यांच्या समोर  येत जातात आणि नाटक पुढे जात राहते.

काळाचा मोठा पट समोर असल्याने भरपूर शक्यता निर्माण होतात. उदा. अपु जातो थेट व्ही. शांताराम यांच्या फिल्म शुटींग मध्ये. तर तनु जाते ती आणिबाणीच्या काळात, एका हिप्पिच्या संगतीला. त्यामुळे धमाल मात्र होते. गाणी, नाच हे देखील ओघाने येतो. एकूणच काय मग नाटक हे नाटक न राहता एक म्युझिकल शो होऊन बसतो. कधी या काळातील तर कधी त्या काळातील प्रसंग असे येत राहतात. भूतकाळातल्या स्त्रियांचे पुरुषप्रधान व्यवस्थेतलं शोषण आणि त्यांचं दुय्यम स्थान आणि त्यावर भाष्य येते. दोघेही आपापल्या जन्मदात्या पित्यांचा मागोवा या निमित्ताने घेतात, त्यांना अधिक समजावून घेतात. हा एक नाटकाचा भावनिक पैलू येतो.

नाटक वेगवान आहे. आजच्या पिढीतील दमदार कलाकारांना घेऊन हे नाटक केले असल्यामुळे उर्जा सतत जाणवत राहते. वेशभूषा, नेपथ्य आणि पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना या सर्वांना विविध काळ चितारायचे असल्याने भरपूर वाव आहे. सुव्रत जोशी हा अपु, पर्ण पेठे ही अवखळ, उत्फुल अशी अभिनेत्री तनु आहे. तिचा वाय झेड हा सिनेमा मी पाहिला होता. नाटकात यापूर्वी सखी गोखले हे पात्र करायची, ती नुकतीच गेली परदेशी (लंडनला) शिकायला गेली. फोटो स्टुडिओ मालक अमेय वाघ ने साकारला आहे. त्याने हिप्पी व्यक्ती, व्ही. शांताराम हे देखीलही साकारले आहेत, जे मस्त जमले आहेत. त्याचा म्हातारा फोटो स्टुडिओ मालक नाही आवडला. त्याचे गेली एकवीस वर्षे हे नाटक मी पूर्वी पाहिले होते. ही सर्व टोळी झी मराठी वरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील आहे. 

तर अशा या फार्सिकल नाटकात पुढे काय होते, ते दोघे परत आजच्या काळात कसे येतात, परत पॅच अप होते का, हे सर्व नाटक पाहिल्यानंतर समजेल. पाहायचे की नाही ते तुम्ही ठरवा, करमणूक नक्कीच होईल, पण हाती काही लागेल की नाही हे सांगता येणार!

Advertisements

लेबेदेव आणि बंगाली रंगभूमी

मागील आठवड्यात सुट्टीच्या दिवशी असाच दूरचित्रवाणीवर channel surfing करत असताना एके ठिकाणी थबकलो. जुने कलकत्ता शहर, एक गोरा असा इंग्रज वाटणार मनुष्य, हिंदी, बंगाली बोलणाऱ्या स्त्रिया वगैरे पाहून काहीतरी स्वातंत्र्यपूर्व काळातील काही तरी चालू असावे असे वाटून रेंगाळून तो कार्यक्रम पाहिला.  एका जुन्या मालिकेचे भाग पुन्हा प्रक्षेपित केले जात होते. नाव होते लेबेदेव की नायिका. हे नाव वाचल्यावर डोक्यात प्रकाश पडला. दोन वर्षांपूर्वी याच नावाचे एक बरेच जुने असे हिंदी पुस्तक जे FTII Open Day मला मध्ये मिळाले होते. त्याचे लेखक प्रतापचंद्र ‘चंद्र’ यांनी लिहिले, पुस्तकाचा विषय लक्षात होता. लेबेदेव (Herasim Lebediff or Gerasim Lebedev)) नावाचा कोणी एक रशियन वादक, भाषातज्ञ होता, अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी काही काळ त्याचे वास्तव्य त्यावेळच्या कलकत्त्यात होते. त्याच्यावर ते पुस्तक, खरे तर लघुकादंबरी अशी होती. ही मालिका त्यावर बेतलेली होती. लगेच मग ते पुस्तकही मी वाचले, तसेच त्या मालिकेचे काही भाग युट्युब वर देखील पहिले. Bengali Theatre नावाचे किरोणमोय राहा यांनी बंगाली रंगभूमीचा इतिहासाचा पट मांडलेले पुस्तक माझ्याजवळ होते तेही बाहेर काढले आणि लेबेदेवबद्दलचा भाग वाचले.

Lebedev and Bengali Theater

लेबेदेव की नायिका

तर ह्या रशियन लेबेदेवचा आणि बंगाली नाट्यसृष्टी यांचा काय असा विशेष संबंध असावा? तुम्ही जर नाट्यप्रेमी असाल तर आपल्याला माहिती असेलच की बंगाली रंगभूमी ही मराठी रंगभूमी सारखीच संपन्न आहे, मोठा इतिहास आहे. एकूणच भारतीय रंगभूमीला मोठी परंपरा आहेच, लोकरंगभूमी असो, किंवा भरतमुनींचे नाट्यशास्त्र असो. पण ब्रिटीश भारतात येई पर्यंत ती कुठेतरी खंडीत झाली. बंगाली रंगभूमीचे देखील तसे झाले. भारतीय रंगभूमीच्या उगमाची गोष्ट सांगणाऱ्या गिरीश कर्नाड यांच्या एका कन्नड लेखाचे भाषांतर मी पूर्वी केले होते. असो. तर बंगाल मध्ये जत्रा नावचा लोकंरंगभूमीचा प्रकार परंपरेने होताच. भारतात कलकत्ता येथे ब्रिटिशांनी राजधानी स्थापन केली, आणि तेथील बंगाली लोकांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडू लागला. त्यामुळे बंगाली संस्कृतीची, भाषेची पीछेहाट होऊ लागली. त्यातच लेबेदेव नावाचा एक रशियन संगीतकार, वादक मद्रासवरून ब्रिटीश music band group बरोबर कलकत्त्यात आला.

त्याने जवळ जवळ दहा वर्षे कलकत्त्यात राहून बंगाली भाषा शिकला, दोन मूळ इंग्रजी नाटकांचे बंगालीत भाषांतर/रुपांतर करून ती स्थानिक नाट्यकलावंताना घेऊन बसवली. त्यातील एकाचे दोन हाउसफुल प्रयोग देखील केले. पहिला प्रयोग १७९५ मध्ये झालां आणि येथेच अशा रीतीने त्याने आधुनिक बंगाली रंगभूमीची (proscenium stage) मुहूर्तमेढ रोवली. हे त्याचे कार्य, आणि इतिहासात त्याचे नावाचा उल्लेख केला जातो. त्याने नाट्यगृह देखील बांधले असा उल्लेख आहे. दहा वर्षांच्या वास्तव्यानंतर भारतातून निघून गेला, आणि त्याचे कार्य तसे अल्पजीवी ठरले, कारण त्यानंतर ह्या रूपात बंगाली नाटकं रंगभूमीवर येण्यास आणखीन चाळीस वर्षे जावी लागली. त्या काळात लेबेदेवने केलेल्या या दोन प्रयोगांना खूप महत्व आहे. कारण कलकत्त्यात नुसते बंगाली लोकं राहत नव्हती तर, बहुभाषिक, परदेशी लोकं देखील होते. ते आणि आधुनिक बंगाली लोकंही शेक्सपियरकृत इंग्रजी नाटकांना (काही संस्कृत नाटकांची इंग्रजी भाषांतरेही असत), त्यांच्यासाठी म्हणून असलेली नाट्यगृहात जात असत. स्थानिक बंगाली लोकसंगीत कलाकार, लोकनाट्य कलाकार, कोठीवाल्या, मुजरेवाल्या स्त्रिया आणि इतर स्थानिक कलाकार यांना घेऊन नाट्यगृह बांधून रुपांतरीत नाटकाचे बंगालीमध्ये प्रयोग करणे हे खूप मोठे काम होते.

लेबेदेवच्या सोबत एक स्थानिक बंगाली विद्वान होते, गोलोकनाथ दास असे त्यांचे नाव. त्यांनी बरीच मदत केली असा उल्लेख आहे. कुसुम नावाची के गायिका, तसेच चम्पा नावाची दुसरी एक स्त्री कलाकार, आणि इतरही स्त्री पुरुष कलाकारांची त्यांची एक टोळी जमली होती. त्यात चम्पावर त्याचा विशेष स्नेह होता, आणि वर उल्लेख केलेल्या कादंबरीत त्या दोघांचा संबंध हाही एक प्रमुख विषय आहे. आता ही कादंबरी किती काल्पनिक, आणि किती इतिहासाशी प्रामाणिक आहे हा भाग वेगळा. पण त्याच्या  दुसऱ्या एका रुपांतरीत नाटकाचा प्रयोग होण्याआधी त्याचे नाट्यगृहच नष्ट करण्यात आले. आणि मग विमनस्क मनस्थिती मध्ये लेबेदेव एकूणच या सर्वातून बाहेर पडून भारतदेश सोडून निघून गेला, आणि त्याचे कार्य, त्याची दूरदृष्टी याला तात्पुरता लगाम बसला.

मी कोलकत्याला अजून कधी गेलो नाही, बंगाली नाटकं देखील पाहिली नाहीत कधी अजून. पण सध्या तरी रविंद्रनाथ टागोर यांच्या जीवनाचा, साहित्य-विश्वाचा धांडोळा घेणे चालू आहे. पुढे मागे कोलकाता, आणि इतर आसपासचा भाग पाहायचा आहे, इतिहासात डोकायचे आहे. बघूयात कसे काय जमते ते. जाता जाता अजून एक. लेबेदेव आणि त्याचे कलकत्ता मधील वास्तव्य, कार्य, त्याची नायिका या सर्वांवर एक छानसी period film होऊ शकते.

 

 

Chitragada

Chitrangada

These days, I am hooked on reading about Ravindranath Tagore, his life, his works, Shantiniketan and other various facets of his personality and life. I traveled to Bengaluru last month. One of my favorites things to do whenever I go there, is to catch up on plays and latest on theater scene here. I was fortunate to witness two shows this trip. One of them was Girish Karnad’s famous, classic play Taledand, in Kannada. The other one was Chitraa. This one was in English. It is a modern day adaption of Ravindranath Tagore’s Bengali play Chitrangada written in 1891. After learning about this show, I did not really want to miss this, despite being on weekday evening, as the play was by Tagore. It was perfect opportunity for me to extend my immersion into Tagore era.

I rushed to the Rang Shankara that evening where this play was to take place. I was handed over a pamphlet containing information about the play. As I entered inside, I noticed a young man was playing flute in one corner of the stage. He was standing, while his accompaniment tabla player was sitting. He played few pieces for fifteen minutes or so before the play began. I had an idea of the story line of play as I had read it earlier somewhere. It is a dance-drama style treatment to a Mahabharata side story. This story is that of princess, named Chitrangada, of kingdom of Manipur, in north east of India and one of the five in-exile Pandavas, Arjun. There are many such side stories in Mahabharata, throwing light on eternal human qualities through ages of mankind.

 

Chitrangada

Ticket of the play, with catchy design

The play was produced by Red Polka Productions, which is Bengaluru based amateur theater company.  Chitrangada is only child of the King of Manipur and also heir to the throne. She dresses like a man and is the protector of the land. One day, she meets Arjuna and falls in love with him. She is concerned about her manly appearance, also not being beautiful. Arjuna is impressed by her fighting abilities but all along believes her to be a man. Chitrangada believes he could never be her lover the way  she is. She receives a boon from Kamadeva, Hindu God of Love, and she transforms herself into a beautiful woman. When she meets Arjuna again, he cannot help but fall in love with her. But later she reveals her true self to his shock. What happens next? How does Arjuna react to that? To get answers, you need to watch the play. I don’t want to spoiler here. This play is about journey from bodily love, lust to pure, transcendental love.

Chitragada

Still from the play. Courtesy Internet

The 95 minute play keeps the audiences spellbound from the word go. After opening solo dance, the pair of Kamadeva and his seemingly homosexual companion (Vasanta, God of Seasons) enters the scene. Warrior princess prays for change in her look which she is granted. The pair brings in humor in the play which is refreshing. Arjuna, who is dressed like a common person, as he is in exile, enters and falls for her. There are nicely choreographed dance sequence between them which are sensuous to watch. I somehow did not find actor who was portraying Arjuna quite apt for the needs of the role. He lacked energy as Arjuna the warrior, Arjuna as romantic lover, too.

Mahabharata is full of such stories, as I said earlier. Earlier this year, I had watched, famous Marathi music drama(संगीत नाटक) of bygone era, called Sangit Soubhadra, which also happens to be on Arjuna and his marriage to Subhadra, sister of Krishna. This particular show of Bengali play, was a different experience to watch, as it was in English, plus heavy on dance, music, songs. A lot has been written about Tagore’s plays and his treatment to theatrical possibilities and experiments. Chitrangada is just one of his 52 plays handling various contemporary subjects in different styles and forms.

Chitrangada finds mention in Bhyrappa’s Kannada mega novel Parv. I am reading its Marathi translation right now, so more about it later. Apart from Chitrangada, Arjuna had married Uloopi. She is said to adapt Babruvahana, the son of Chitrangada and Arjuna. I had watched Kannada movie titled Babruvahana, played by Dr Rajkumar, Kannada megastar of 1970s. This was another reason to catch the play.

बसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड

मी जुलै महिन्यात बेंगळुरूला गेलो होतो. नाटकांची एकूणच आवड आणि त्यात कन्नड समजत असल्यामुळे, एखादे तरी बसवण्णा नाटक पाहण्याचा योग जुळवून आणतोच. त्यातच बेंगळुरू मधील प्रसिद्ध रंगशंकरा हे नाट्यगृह माझ्या वास्तव्याच्या जवळच आहे. ह्या वेळेस १९८९ मध्ये गिरीश कार्नाड यांनी लिहिलेले तलेदंड(कन्नड मध्ये ತಲೆದಂಡ) ह्या नाटकाचा प्रयोग पाहिला. कर्नाटकातील प्रसिद्ध समाजसुधारक, लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर (उर्फ बसवण्णा) यांच्या जीवनातील विशिष्ट घटनांवर आधारित हे नाटक. असे म्हणतात की कलाकाराची महानता ही त्याच्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांना कलेच्या माध्यमातून प्रतिसाद देणे, व्यक्त होणे यात आहे. ह्या नाटकाला जवळ जवळ तीस वर्षे झाली. नाटकाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कार्नाड म्हणतात की ने नाटक म्हणजे त्यावेळी चालू असलेल्या अयोध्या मंदिर विषय, मंडल आयोग जो आरक्षणाविषयी होता, चळवळीच्या निमित्ताने निर्माण झालेली राजकीय, सामाजिक परिस्थिती वर भाष्य आहे असे सूचित केले आहे.

Taledand

तलेदंड नाटकाच्या पुस्तकचे मुखपृष्ठ

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाची भलावण, आणि इतर राजकारण हे सर्व ताजेच होते. तसेच काही वर्षांपूर्वी उमा कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद वाचला होता. त्यामुळे जेव्हा ह्या नाटकाचा प्रयोग होत आहे हे समजले तेव्हा त्याबद्दल उत्सुकता आणखीनच वाढली. धावपळ करून, सवड काढून त्या शनिवारच्या दुपारी मी रंगशंकरा मध्ये धडकलो. अर्धगोलाकार रोमन कोलोसियम सारखी अतंर्गत रचना असेलेल रंगशंकराचे नाट्यगृह तुडुंब भरले होते. नाटकाबद्दल लिहिण्याआधी बसवण्णा यांच्या बद्दल थोडेसे.

बसवण्णा यांचा जन्म आजच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बसवनबागेवाडी(त्यावेळी नुसते बागेवाडी) येथे बाराव्या शतकात ब्राम्हण कुटुंबात झाला. त्याभागात कलचुरी घराण्याचा राजा बिज्जल हा राज्य करीत होता. त्याच्या पदरी बसवण्णा मंत्री होते. शैवपंथाचे अनुयायी असलेल्या बसवण्णा यांनी अनेक सामाजिक सुधारणांना हात घातला. सामाजिक समानता, जातीय एकात्मता, स्त्री-पुरुष समानता यांसारखे काळापुढचे विचार त्यांनी आपल्या कन्नड कवनांमधून(ज्याला वचन साहित्य) असे म्हणतात. मूर्तीपुजाविरोध, कर्मकांड विरोध, संस्कृत भाषेऐवजी कन्नड भाषेचा पुरस्कार त्यांनी केला. लिंगायत समाजाची स्थापना केली, हजारो अनुयायी मिळवले. त्यांनी कर्नाटकात बिजापूरजवळ कुडलसंगम येथे समाधी घेतली. कुडलसंगम हे ठिकाण कृष्णा आणि मलप्रभा या नदीच्या संगमावर वसले आहे. जवळच आलमट्टी धरण आहे. मी दोन्ही ठिकाणी गेलो होतो खूप पूर्वी. असो. पुढील काळात त्यांचे विचार, वचन साहित्य त्यांच्या नंतर इतर वचनकारांनी वाढवले. आज लिंगायत समाज हा कर्नाटकात(प्रामुख्याने उत्तर कर्नाटक भागात), महाराष्ट्रात मोठ्या संख्येने पसरला आहे. कन्नड वचन साहित्याला कर्नाटकात दास साहित्याप्रमाणे मोठे स्थान आहे, परंपरा आहे, संस्कृतीचा भाग आहे.

तलेदंड या कन्नड शब्दाचे विवेचन करताना कार्नाड लिहितात, ‘तलेदंड याचा शब्दशः अर्थ शिरच्छेदाने मृत्यू (तले-शीर, दंड-शिक्षा). मध्ययुगीन कर्नाटकात एखाद्या प्रतिज्ञापूर्ती नंतर किंवा प्रायश्चित्त या सारख्या कारणांसाठी आपले मस्तक उतरवून देण्याची पद्धत सर्वसामन्यांमध्ये रूढ होती. बसवण्णा आपल्या वचनांमध्ये हा शब्द वारंवार वापरतात. काही अमंगल प्रसंगी किंवा दोष निर्देशाच्या प्रसंगी ‘माझे शीर पडू दे’ किंवा  ‘मी माझे मस्तक अर्पण करतो’ अशा अर्थाने तो शब्द वापरला आहे’. बाराव्या शतकातील राजा बिज्ज्ल, आणि बसवण्णा यांची प्रमुख पात्रे असलेली नाटकात कार्नाड यांनी जाती-व्यवस्थेच्या विरोधी भाष्य केले आहे, मानवताधर्माचा पुरस्कार केला आहे. असे करताना ते इतिहासातील तपशील किती त्यांनी तसाच ठेवला आहे, काही छोटे मोठे बदल केले आहेत, नाटकाच्या उद्देश्यानुसार, किंवा नाटक आटोपशीर ठेवण्याच्या दृष्टीने, हे पहिले पाहिजे. पण ते विशेष महत्वाचे नाही.

 

हे तीन अंकी नाटक आहे. हा कन्नड प्रयोग बेंगलुरूच्या रंगसीरी ह्या हौशी नाट्यसंस्थेने केला होता. संदीप पै हे नाट्यदिग्दर्शक आहेत. त्या दिवशी ते नाट्यगृहात खाली ऑनलाइन राखलेली तिकीटे देण्याच्या ठिकाणी थांबले होते, प्रेक्षकांचे स्वागत करत होते. आत गेलो तेव्हा रंगमंचावर मागील बाजूस, पण मध्येच छोटासा गायक, गायिका तसेच वाद्यवृंद विराजमान झाला होता. बाकी सारा अंधार, पण त्यांच्यावर अंधुकसा स्पॉट होता. त्यांनी हळुवार आवाजात वचन गायन सुरु केले. सहसा रंगमंचासमोर असलेल्या बेचक्यात वाद्यवृंद असतो. ऐतिहासिक असे नाटक असल्यामुळे पात्रे अनेक. राजा बिज्जल, त्याची पत्नी, त्यांचा मुलगा ज्याने बसवण्णाची धास्ती घेतली आहे, खुद्द बसवण्णा, त्याचे अनेक अनुयायी, आणि बरेच जण. राजा बिज्ज्ल आणि बसवण्णा यांचे संबंध सौहार्दपूर्ण असतात. पण बसवण्णा यांनी आपल्या कारभारात जातीयता न मानता केलेला व्यवहार अनेकांना रुचत नाही. पुढे पुढे तर बसवण्णा यांचे, त्यांच्या विचारांचे प्रस्थ वाढते, अनुयायी वाढतात. त्यातच मग एका ब्राम्हण मुलाचे आणि खालच्या जातीच्या चांभार मुलीचे लग्न करून देण्याच्या प्रस्तावाला बसवण्णा मान्यता देतात, स्वतः हजेरी लावतात. आणि हा रोष शिगेला पोहोचतो, त्यांचे अनुयायी, आणि इतर यांच्यात हिंसा होते, आणि होत्याचे नव्हते होऊन बसते. सनातनी मंडळींचा प्रकोप होतो, रक्तपात होतो. बसवण्णा यांच्या मनाला अतोनात क्लेश होतो. आणि तेथेच नाटक संपते.

प्रयोग अतिशय रंगतो. बसवण्णा यांची भूमिका निभावलेल्या कलाकाराचे अतिशय छान काम झाले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवरचे नाटक असूनही नेपथ्य अतिशय आटोपशीर आहे, वेशभूषा ही साजेशी आहे. मध्ये मध्ये वचन साहित्यातील वेचे मांडली जातात, त्याने नेमका परिणाम साधतो.

गिरीश कार्नाड यांच्या आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले होते, त्याबद्दल मी पूर्वी लिहिले होते. अतिशय प्रगल्भ, अनुभव संपन्न आयुष्य जगलेल्या कार्नाड यांचे खेळता खेळता आयुष्य जरूर वाचा!

The Phantom of the Opera

मी जेव्हा जेव्हा न्यूयॉर्कला जातो, तेव्हा तेव्हा काय पाहू आणि काय नको असे होऊन जाते. इतकी विशाल महानगरी, अद्भूत जगच, चारशे वर्षांचा इतिहास, अगणित गोष्टी पाहण्यास, अनुभवण्यास आहेत. ह्या वेळेस, जुलै/ऑगस्ट मध्ये जेव्हा माझे जाणे ठरले, तेव्हाच मी ठरवले होते की न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर The Phantom of the Opera चा प्रयोग पहायचा. मागील वेळेस गेलो तेव्हा मी एक नाटक (Sistas the Musical) पाहिले, पण ब्रॉडवेवर नाही, तर तो एक ऑफ-ब्रॉडवे शो होता, तेही ऐनवेळेस जमले म्हणून.

ब्रॉडवे हा न्यूयॉर्क मधील भागातील एक रस्ता, पण तो जगभर नाट्यरसिकात नाट्यपंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. हा रस्ता या भागातील आखीव, रेखीव रस्त्यांना अडवा तिडवा छेदून जातो. यांचे कारण हा रस्ता या भागातील कित्येक शतके मूळ रहिवासी रेड इंडियन लोकांचा वहिवाटीचा रस्ता होता. न्यूयॉर्क जसे विस्तारू लागले, तसे या रस्त्यावरच्या काही भागात एका मागून एक अशी नाट्यगृहे, ओपेरा हाउस अशी उभी राहिली. आणि हा भाग नाटकांसाठी, त्यातही संगीतीकांकरिता प्रसिद्ध होत गेला. हा सर्व इतिहास मनोरंजक आहे, तो विकिपीडियावर पाहता येईल, त्याची पुनुरावृत्ती करत नाही. या भागात कधीही फिरा, विविध नाट्यगृहे, त्यात सुरु असलेल्या नाटकांच्या मोठमोठ्याला जाहिरात्ती, झगमगाट आपले लक्ष वेधून घेतातच. फिलाडेल्फिया शहराला देखील अशीच नाटकांची, जुन्या नाट्यगृहांची मोठी परंपरा आहे. त्याबद्दल मी पूर्वी येथे लिहिले आहे. न्यूयॉर्कला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये ब्रॉडवे आणि त्यात सुरु असलेली नाटके पाहणे हा लोकप्रिय कार्यक्रम असतो. भली मोठी नाट्यगृहे, आणि व्यावसायिक नाटके, चकचकीत, संगीत, नृत्य, गाणी असलेली, भव्य दिव्य अशी नाटके हे येथील वैशिष्ट्य. ब्रॉडवे पासून थोडे लांब, आजूबाजूला छोटी छोटी, प्रयोगिक नाटकांसाठी, ज्यांना ऑफब्रॉडवे, किंवा अजून लांब असलेल्या नाट्यगृहांना ऑफऑफब्रॉडवे असे म्हणतात.

IMG_2688

The Phantom of the Opera हे ब्रॉडवे वरील अतिशय प्रसिद्ध असे नाटक आहे. त्याचे तिकीट मी आठवडाभर आधीच राखून ठेवले होते. ब्रॉडवेवरील नाटके खूप महाग असतात. माझे तिकीट ५५ डॉलर्सचे, २० डॉलर्स वरील चार्ज, आणि एवढे करून अगदी मागील आसन मिळाले होते. खर्च होतो, पण हौसेला मोल नाही, असे म्हणत मी पैसे खर्च करत असतो! या नाटकाबद्दल बरीच वर्षे ऐकत होतो. गेली तीस वर्षे, म्हणजे १९८८, पासून ते ब्रॉडवेवरील Majestic Theater मध्ये याचे प्रयोग सुरु आहेत. Gaston Leroux याने १९११ लिहिलेल्या याच शीर्षकाच्या कादंबरीवर हे नाट्य आधारित आहे. ही कादंबरी मला २०१५ मध्ये जुन्या पुस्तकांच्या दुकानात सापडली. Peter Haining याची अभ्यासपूर्ण प्रस्तावना देखील आहे. या कादंबरीवर आधी चित्रपट देखील निर्माण झाले आहेत.

माझा प्रयोग दुपारी दोनचा होता. सकाळी सकाळी फिलाडेल्फिया वरून प्रयाण केले. दुपारी एक पर्यंत Grand Central Terminal, Madison Square Garden, Bryant Park, Times Square असे भटकून, जेवून Majestic Theater धडकलो. पाहतो तर काय, आत जाण्यासाठी भली मोठी रांग आधीच लागली होती. आत गेलो. थिएटर ओपेरा हाउसच्या धर्तीवर दिसत होते. पूर्वी ते ओपेरा हाउसच असावे. मी मुंबईतील, आणि भारतातील एकमेव असे रॉयल ओपेरा हाउस पहिले होते, हे ही तसेच वाटत होते. भले मोठे नाट्यगृह, जवळ जवळ १०००-१२०० आसन क्षमतेचे, पाहता पाहता भरून गेले. आत गेल्यावर हातात नाटकाची एक पुस्तिका प्रत्येकाला दिली गेली. तेथे तशी प्रथा आहे, त्या पुस्तिकेला playbill असे म्हणतात.

नाटकाची(तसेच कादंबरीची) कथा ही पॅरिस मधील एका ओपेरा हाउस मधील एका भूताची, आणि त्यातील प्रमुख गायिकेची. त्यामुळे मांडणी रहस्यात्मक, थरारक, आणि चमत्कृतीपूर्ण आहे. Phantom म्हणजे भूत. नाटक सुरु होते ते ओपेरा हाउसच्या व्यवस्थापकांकडून त्यातील वस्तूंचा लिलाव होत आहे ह्या दृश्यापासून. तितक्यातच आवाज, आणि प्रकाश येऊन टांगलेले झुंबर असे सरकन वर जाते. ओपेरा हाउस मधील भुताच्या अस्तित्वाची सगळ्यांना कल्पना येते. इथेच तांत्रिक करामतींची सुरुवात होते. ओपेरा हाउस मधील एका गायिकेवर ह्या भुताचे मन बसलेले असते. त्यामुळे तीला प्राप्त करण्यासाठीचा खटपटी, त्यामुळे होणारी इतरांची धावाधाव, आणि हे सगळे सादर करण्यासाठी विविध तांत्रिक करामती, या सर्वामुळे हे नाटक अचंबित करून टाकते. रंगभूमीवर ओपेरा हाउस जवळील तळे, त्यातील हलती फिरती बोट असे सगळे नेपथ्याची, प्रकाश, ध्वनी यांची अद्भूत तंत्रे पाहता, अनुभवता येतात. रंगभूमीवर असेही करता येते, अश्याही तांत्रिक शक्यता आहे, हे लक्षात येते. रंगभूमीवरील आवृत्ती आणि कादंबरी यात काही फरक देखील आहेत, पण ते ठिक आहे.

IMG_2710

दोन अंकी नाटक संपले, कलाकारांचे अभिवादन देखील झाले. नाट्यगृह दिव्यांनी उजळले. ह्या भव्य दिव्य नाटकाचा हा सर्व छान अनुभव होता. बाहेर येईपर्यंत दुपारचे साडे चार वाजून गेले होते. ब्रॉडवे वरील हे नाटकाने अनेक रेकॉर्ड्स केली, तोडली, आणि नवीन केले आहेत. १९८८ मध्ये जेव्हा प्रथम आले, तेव्हाच Tony Award हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता(हा पुरस्कार ऑस्करच्या तोडीचा आहे असे समजतात).

आता माझी अजून एक इच्छा आहे, ती म्हणजे लंडन मधील वेस्टएन्ड भागात, थिएटर डिस्ट्रीक्ट आहे, तेथे एखादे नाटक पाहायचे, शेक्सपिअरच्या देशात, त्याच्या गावी फिरून यायचे आहे. बघू कसे काय जमते ते.

समाजस्वास्थ्य

भारताचा ७१वा स्वातंत्र्यदिन  सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शंभर एक वर्षांपूर्वी भारतात जेव्हा स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले होते, तेव्हा काही मंडळी समाजसुधारणेला प्राधान्य देऊन त्यात काम करत होते. स्वातंत्र्य आधी की समाजसुधारणा आधी हा प्रश्न होता. या अनुषंगाने टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेद प्रसिद्ध आहेत. समाजसुधाराण्यांचा भर शिक्षण, समाजातील अंधश्रद्धा निर्मुलन, जाती व्यवस्था, समानता, वैज्ञानिक दृष्टीकोन, स्त्रीमुक्ती, विधवा विवाह, आणि इतर अनेक विषयांवर काम करणे हा होते. त्यांचा जोर अर्थातच बुद्धीवादावर. सगळ्या समस्यांकडे, परिस्थितीकडे बुद्धिनिष्ठ पद्धतीने पाहणे हे वैशिष्ट्य. समाजसुधारणा विषयात काम करणाऱ्यांमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे एक अग्रणी समाजसुधारक होते. त्यांचे पुत्र राधुनाथ हे देखील अश्याच एका वेगळ्या विषयात समाजमन ढवळून टाकत होते. त्यांच्या जीवनपट उलगडणारा ध्यासपर्व हा मराठी चित्रपट २००१ मध्ये मी पाहिला होता. अमोल पालेकर यांचा तो चित्रपट. त्यात किशोर कदम याने रघुनाथ कर्वे यांची भूमिका केली होती.

गेल्या वर्षीच रघुनाथ कर्वे यांच्या वरील एक नाटक आले, ज्याचे नाव समाजस्वास्थ्य,  तेव्हा माझी उत्सुकता ताणली गेली होती. त्यातच अजित दळवी हे नाटककार, आणि अतुल पेठे हे प्रमुख कलाकार, आणि दिग्दर्शक सुद्धा. हे नाटक मी नुकतेच पाहिले. रघुनाथ  धोंडो कर्वे उर्फ रधों हे त्यावेळेस, किंबहुना आजही, अतिशय दुर्लक्षित, घोर अज्ञान असलेल्या लैंगिक शिक्षण स्वातंत्र्यपूर्व काळात या विषयात काम करत होते. त्यांना खरेतर लैंगिक बुद्धिवादाचा प्रणेते असेच संबोधले जाते. अमोल पालेकरांचा चित्रपट त्यांच्या एकूणच जीवनाचा वेध घेतो, तर हे नाटक रधों वरील विविध खटल्यांचा, न्यायालयीन वादविवादाचा मागोवा घेते. रधोंचे प्रमुख कार्य म्हणजे ते लैंगिक विषयाशी, आणि प्रामुख्याने कुटुंबनियोजन अथवा संततीनियमन या विषयांशी निगडीत प्रबोधन करणारे समाजस्वास्थ्य हे मासिक चालवत असत. त्यातील लेखांवर आक्षेप घेणारे, प्रामुख्याने त्याकाळच्या कर्मठ, सनातनी लोकांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. खटले उभे राहिले, कारावासाची शिक्षा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रघुनाथ कर्वे यांच्या बाजूने खटले लढवत. हे सर्व या नाटकातून मांडण्यात आले आहे. या अनुषंगाने त्यांच्या क्रांतिकारक, काळाच्यापुढील विचारांचा प्रेक्षकांना परिचय होतो.

प्रसिद्ध मराठी साहित्य अभ्यासक, समीक्षक अनंत देशमुख यांनी रधोंच्या लेखनाचा, त्यांच्याविषयी उपलब्ध लेखन सामग्रीचा अभ्यास करून, त्यांनी संपादन केलेल्या आठ पुस्तकांचा संच प्रकाशित पद्मगगंधा प्रकाशन तर्फे काही वर्षापूर्वी झाला होता. रधोंबद्दल आणखीन माहिती करून घेण्यास तो वाचायला हवा. पण हे नाटक नक्कीच त्या काळात आपल्याला घेऊन जाते. अतुल पेठे यांचा जबरदस्त अभिनय, स्पष्ट संवाद हे सर्व नक्कीच जमेची बाजू आहे. समाजस्वास्थ्य हे मासिक त्यांनी १९२७ पासून पंचवीसहून अधिक वर्षे चालवले. अनेक लेख लिहिले, इतरही समकालीन मासिकांतून लेख लिहिले, बरेच वाद ओढवून घेतले, मनस्ताप सहन करावा लागला. नाटक प्रामुख्याने अर्थात कोर्टात घडते, पण तसेच ते त्यांच्या घरात देखील घडते. अतुल पेठे यांच्या अभिनयातून रधोंचे करारी व्यक्तीमत्व, अभ्यासू वृत्ती, हाती घेतलेल्या कार्याप्रती समर्पण इत्यादी त्यांचे गुण नक्कीच प्रकट होतात. नाटकघर संस्थेतर्फे हे वैचारिक नाटक सादर करण्यात आले आहे.

ते आणि त्यांच्या पत्नी हे दोघे मिळून स्वतःच्या मुंबईतील घरातच संततीनियमन केंद्र सुरु केले, त्याची झलक नाटकात सुरुवातीच्या पहिल्या काही प्रसंगातच दिसते. तसे पहिले तर भारतात प्राचीन काळापासून लैगिक विषयांवर मोकळेपणाने विचार करण्याची परंपरा होती हे कामशास्त्र सारख्या विविध कृतींमधून, तसेच इतिहासाचार्य राजवाडे यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास सारखे पुस्तक, यातून दिसते. पण मधल्या काळात सनातनी, कर्मठ संस्कृती मध्ये अंधश्रद्धेमुळे असेल, अज्ञान असेल, किंवा पुरुषी वर्चस्वाच्या वृत्तीमुळे असेल, हे विचार कुठेतरी लुप्त झाले. ते का व कसे झाले याचा अभ्यास करायला हवा.  पण जवळ जवळ एक शतकापूर्वी भारतात जेव्हा स्वातंत्र्य चळवळ जेव्हा ऐन भरात होती तेव्हा रधों यांनी हे समाजप्रबोधनाचे कार्य सुरु केले.

जाता जाता अजून एक. आजच हा ब्लॉग लिहिताना अमेरिकेत पंचवीस वर्षानंतर रंगमंचावर परत आलेले Angels in America या Tony Kushner लिखित नाटकाबद्दल एक वृतांत पाहण्यात आला. Andrew Garfield ची प्रमुख भूमिका त्यात आहे. हे नाटक(खरे तर महानाटक, कारण दोन भागात, एकूण ७ तासांचे आहे असे समजले), १९८० च्या दशकात अमेरिकेत AIDS मुळे उठलेल्या वादळाचा, समलैंगिक संबंधाचा, त्या संबंधी असलेल्या अज्ञानाचा, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा वेध घेते. आज समाजस्वास्थ्य बद्दल लिहीत असताना हे पाहण्यात आले, या योगायोगाचा मला अचंबा वाटला.

लाहोरची दास्तान

मध्ये मी प्रसिद्ध लेखिका इस्मत चुगताई यांचा एक कथा संग्रह रजई यांचे मराठी भाषांतर वाचत होतो. त्यातील प्रसिद्ध आणि त्याकाळी अतिशय अशी वादग्रस्त कथा रजई ही वाचत होतो. ही कथा समलिंगी संबंधावर आहे. हा कथा संग्रह १९४० च्या आसपास प्रसिद्ध झाला, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात. त्यावेळेस त्यांना लाहोर मधील कोर्टाने समन्स बजावून तेथे खटला चालवला. त्यांना तेथे जावे लागले होते, त्या सर्व अनुभवांबद्दल, जिंदादिल लाहोर शहराबद्दल लिहून ठेवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील पंजाब प्रांताची लाहोर तशी राजधानी, मोठे आणि प्रसिद्ध शहर. व्यापार, संगीत, संस्कृती यांचे केंद्र. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना लाहोर मध्ये केली होती. १९४७ मध्ये फाळणी झाली आणि पंजाब प्रांत विभागाला गेला, आणि लाहोर पाकिस्तानात गेले. फाळणीची आणि लाहोर शहराची पार्श्वभूमी असलेले एक नाटक बऱ्याच वर्षांपासून ऐकत आलो होतो. त्याचे नाव जिस लाहौर न देंख्या औ जम्या नई. ते पाहायचा काल योग आला.

स्वतंत्र थिएटर

Jis Lahore Na Dekhya Ou Jamya Nai

कालचा हा प्रयोग स्वतंत्र थिएटरने सादर केला. पुण्यातील ही संस्था हिंदी नाटकं प्रामुख्याने करते. तसे पाहिले तर ‘जिस लाहौर नही…’ हे नाटक १९८९ मधील. असघर वजाहत यांनी ते लिहलेले उर्दू, पंजाबी, हिंदी भाषेतील हे नाटक. हा प्रयोग झाला घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रात. प्रेक्षकांत बरीच मंडळी पंजाबी, सिंधी, काही मुस्लीम, अमराठी भाषिक दिसत होती. मी मुद्दामच हे निरीक्षण करत होतो. नाटकाचा विषयच तसा आहे. हिंदुस्तानाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे देश जन्माला आले. लाहोर पाकिस्तानात गेले. मुस्लीम लोकांची पाकिस्तानात जाण्याची धडपड, तर हिंदूंची भारतात. दंगे, लुटालूट, जाळपोळ, धार्मिक हिंसाचार दोन्ही बाजूला झाला, जवळपास एक-दीड कोटी लोकसंख्या बाधित झाली. या निमित्ताने अनेक दारुण कहाण्या विविध रूपात आल्या आहेत. हे नाटक म्हणजे लखनौ मधून लाहोर मध्ये फक्त जिवानिशी स्थलांतरित होऊन आलेल्या एका मुस्लीम कुटुंबाची कहाणी.

या कुटुंबाला शरणार्थी शिबिरात राहिल्यानंतर, सरकारतर्फे स्थलांतरित मुस्लीम लोकांना घरवाटप योजनेत लाहोर शहरातील मधील एक घर दिले गेले असते. ते त्या घरी आले असता त्यांना समजते की घरात एक पंजाबी बोलणारी हिंदू वृद्ध महिला अजून राहत असते, कारण ते तिचे घर असते, ती दंग्यातून बचावली गेली असते. तिचा मुलगा, आणि इतर कुटुंबियांचा पत्ता नसतो. त्या मुस्लीम कुटुंबाचे धाबे दणाणते.  काय करावे समजत नाही. आधी सुरुवातीला नकार, तीला घराबाहेर काढून, भारतात जाण्यासाठी छावणीत रवानगी करण्यापासून, गुंडांकरवी तिची हत्या करण्याचे विचार त्यांच्या मनात येतात. तीला अर्थातच लाहोर मध्येच राहायचे असते, भारतात जायचेच नसते. कालांतराने, माणुसकीच्या नात्याने तिच्या सर्वांना मदत करण्याच्या स्वभावामुळे, ती त्यांच्यात मिसळून जाते, आणि जिव्हाळा, ओलावा निर्माण होतो. ती त्या कुटुंबातील एक आजी होते. हे सर्व छोट्या छोट्या प्रसंगातून छान फुलवले आहेत.

काही दिवसांत दिवाळी आलेली असते. लाहोर मधील मुस्लीम घरात दिवाळी साजरी केली जाते, हा मोठा वादंगाचा विषय होऊन जातो. मुस्लीम कुटुंबाला त्रास दिला जातो. या सर्वांची परिणीती ती आजी घर सोडून जाण्यात होते, पण तीला परत आणले जाते. आणि मग एके दिवशी तिचे वृद्धापकाळाने निधन होते. मग तिच्या अंत्यसंस्काराचा विषय निघतो, आणि परत वितंडवादाला तोंड फुटते. मौलवीच्या सल्ल्यानुसार हिंदू पद्धतीनुसारच तिचे अंत्यसंस्कार करावे असे ठरते. याचा निषेध म्हणून त्यामुळे गुंडांकरवी तो मौलवी मारला जातो. आणि मग नाटक संपते ते आजीची अंत्ययात्रा सुरु करून, आणि दुसरीकडे त्या मौलवीचा जनाजा काढून.

नाटकात अर्थात उर्दू, आणि पंजाबी भाषेचा भरणा आहे. उर्दू भाषेचा लहजा, गोडवा कित्येक वर्षांनी कानावर पडला. मी ९-१० वर्षांपूर्वी उर्दू भाषा शिकत होतो, त्यावेळची आठवण झाली. ठिकठिकाणी शेरो-शायरी, टाळ्या घेणारी वाक्ये, संवाद यामुळे सर्व वातावरण भारून जाते. नाटकाचा संदेश अर्थातच धार्मिक सलोखा राखण्याचा, एकमेकांचा आदर, इन्सानियत ह्या दृष्टीकोनातून पाहण्याचा आहे. त्यातच आपापल्या शहरांच्या, गावाच्या आठवणी, त्यात रमणे, ह्या सर्वांमुळे प्रेक्षक नाटक डोक्यावर घेतात. प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ असतेच, कुठल्याही धर्माचे, भाषेचे असा. नाटक संपल्यावर सर्व कलाकारांनी अभिवादन केले, त्यातील काही जणांनी मनोगत व्यक्त केले. प्रेक्षकातून कोणाला बोलायचे असल्यास, प्रतिक्रिया द्यायची असल्यास, ती देऊ शकता असे सांगितल्यावर, एका महिलेने, जिचे मूळ गाव लखनौ आहे, तिने हे नाटक म्हणजे तिची कथाच आहे हे नमूद केले.

लाहौर

जिस लाहौर न देख्या औ जम्या नई

आता नाटकाच्या शीर्षकाचा अर्थ असा आहे की ज्याने लाहोर पहिले नाही, तो जन्माला येऊन सुद्धा नसल्यासारखा आहे, अशी लाहोर शहराची थोरवी गाणारा असा आहे. या निमित्ताने तरी तेथे जाऊन आले पाहिजे!