Royal Opera House: Reliving History

आपल्याला ओपेरा म्हटले की मराठी संगीत नाटकं, ओपेरा हाउस म्हटले की आपल्याला युरोप मधील, तसेच ऑस्ट्रेलिया मधील प्रसिद्ध Sydney Opera House ची आठवण येते, आणि मुंबईतील ओपेरा हाउस असे नाव असलेला भाग आठवतो. पण आपल्या मुंबईत देखील ओपेरा हाउस, तेथे पूर्वी संगीताचे कार्यक्रम होत असत हे माहिती नसते. मला तरी हे मला तरी माहितीच नव्हते. १०-१२ वर्षांपूर्वी मुंबईतल्या गिरगावातील झव्हेरी बाजार  येथे काही कामानिमित्त येथे गेलो असता जवळच असलेल्या Royal Opera House चे प्रथम दर्शन झाले. ते अर्थातच त्यावेळेस बंद होते. मध्ये केव्हा तरी ऐकले होते की त्याचे संवर्धन, नुतनीकरण करून परत सुरु करणार आहेत. २०१६ परत ते २३ वर्षानंतर नुतनीकरण झाल्यावर सुरु झाले, त्यावेळेस प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांचा Royal Opera House वरील लेख देखील वाचण्यात आला होता. तेव्हापासून तेथे जायची मला ओढ लागली होती. त्याची वेबसाईट देखील सुरु झाली आहे. १९०८ मध्ये ब्रिटीशांनी तो पाश्चिमात्य संगीताचे कार्यक्रम(soap opera, western music) करण्यासाठी तो बांधला होता. गेल्या २०-२५ वर्षांपासून तो बंदच होता. हे ओपेरा हाउस म्हणे खाजगी मालकीचे आहे(गुजरातेतील गोंदल संस्थानिक). मागील आठवड्यात मुंबई भेटी दरम्यान तेथे जावे असे ठरवले.

जायच्या आधी त्यांच्या वेबसाईट वर पहिले की काय कार्यक्रम आहेत. मी जायच्या दिवशी मुक्त प्रवेश असलेला शिल्प, चित्र आणि नृत्य एकत्र असलेला दीडएक तासांचा कार्यक्रम असणार होता. मी थोडासा खट्टू झालो. मला तेथे ओपेरा पहायचा होता. त्यासाठी परत केव्हातरी येऊ असा विचार करून तेथे संध्याकाळी पोहोचलो. बाहेरून, आतून ओपेरा हाउसची इमारत पाहून हरखून गेलो. अतिशय कलाकुसर हे वैशिष्ट्य असणारे Baroque वास्तूशैली असलेली ही इमारत. मुंबईतील जुन्या इमारती, त्यांच्या विविध वास्तूशैली हा वेगळाच विषय आहे. ही इमारत तीन माजली आहे, समोर छानसे मोकळे आवार, आतील संगमरवरी बांधकाम, जोडप्यांनी बसून संगीताचा आस्वाद घेण्यासाठी केलेली बैठक रचना(royal box), वाद्यवृंदासाठी रंगमंचासमोर जागा(orchestra pit), लाल रंगाचा गालीचा, चित्रे असलेले छत, डोळे दिपवणारी मोठमोठाली झुंबरं हे सर्व आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते. मुंबईत, तसेच भारतात हे म्हणे एकमेकव असे ठिकाण आहे. पुण्यात मी Poona Music Society तर्फे आयोजित western music चे कार्यक्रम एक-दोनदा अनुभवले आहेत(जसे की Opus Gala), पण त्यांचा Mazda Hall हे काही ओपेरा हाउस नाही.

आम्हाला कार्यक्रमाला तसा थोडा उशीरच झाला त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर dress circle मध्ये जागा मिळाली. पण वरून संपूर्ण ओपेरा हाउसचा नजारा छान दिसत होता. सतीश गुप्ता नावाच्या कलाकाराचा Wings of Eternity हा कार्यक्रम होता. त्यांनी लिहिलेल्या Zen Whispers या पुस्तकाचे प्रकाशन देखील होते. रंगमंचावर गरुडाच्या पंखांच्या सोनेरी रंगातील मोठाले असे शिल्प मांडले होते. आम्ही आत जाऊन बसे पर्यंत, त्यांची मुलाखत चालू होती. नंतर काही स्वरचित इंग्रजी हायकूचे देखील त्यांनी अभिवचन केले. बौद्ध धर्मीय घालतात तसा पेहराव परिधान करून सतीश गुप्ता एका मोठ्याला ब्रशने calligraphic paintings काढत होते. त्या शैलीला gestural painting असेही म्हणतात असे त्यांनी दिलेल्या पत्रकावरून समजले. मागे गुढ असे कुठलेसे वाद्यसंगीत चालू होते. ईशा शर्वणी नावाच्या नर्तीकेने गरुड नृत्य सादर केले. नृत्य अर्थात प्रेक्षणीय होते. पण ह्या सगळ्या visual and performing art fusion मधून अर्थात काय म्हणायचे हे काही विशेष समजले नाही. कार्यक्रम संपला आणि आम्हाला अर्थातच बाहेर पडावेसे वाटत नव्हते. अगदी हरखून खाली वर जाऊन संपूर्ण ओपेरा हाउस पहिले, भरपूर छायाचित्रे काढली. ओपेरा हाउस मध्ये एके ठिकाणे gift shop आहे. पण त्यांनी निराशा केली. ओपेरा हाउसची माहिती देणारी पुस्तके, स्मरणिका, छायाचित्रे, magnets असे काही नव्हतेच तिथे. बाहेरील आवारात सतीश गुप्ता यांच्या काही चित्रांचे प्रदर्शन, त्यांची पुस्तके मांडली होती.

image

मुंबईतील ह्या आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अश्या स्थळांपैकी असलेले ह्या ओपेरा हाउसची अधिक माहिती त्यांच्या वेबसाईट वर मिळू शकेल, आणि विकिपीडियावर देखील आहे. त्यांनी त्यांची वेबसाईट आणखीन माहितीने सजवली पाहिजे, एवढा मोठा १०० वर्षाहून अधिक इतिहास असलेल्या ह्या ओपेरा हाउस बद्दल विशेष माहिती अशी काहीच नाही. माझ्याकडे पांढरपेशांच गिरगाव नावाचे मधुसूदन फाटक यांचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी जुन्या गिरगावच्या आठवणी सांगितल्या आहेत. ओपेरा हाउस गिरगावातच आहे. त्यांनी देखील त्याचा थोडाफार इतिहास दिला आहे. संगीताचे कार्यक्रम तेथे होत असत, आणि नंतर नंतर चित्रपटही तेथे लागत असे सांगतात.

असो. तुमच्या पुढील मुंबई भेटी दरम्यान हे आपल्या नशिबाने परत सुरु झालेले ओपेरा हाउस तुमच्या भटकंतीच्या यादीत जरूर असू द्या. तेथे कायमच काहीना काही कार्यक्रम चालू असतात. आम्ही तेथून बाहेर पडलो ते लवकरात लवकर परत एखादा ओपेरा असेल तेव्हा परत यायचे हे ठरवूनच!

One thought on “Royal Opera House: Reliving History

  1. Girish Devurkar says:

    It indeed was a memorable day spending with you all and seeing and being inside Opera house would be one great feeling forever.As you said Mumbaikars are really blessed to have this opera house and many don’t realise this.For me Avva and Geeta all the time spent with you all was so refreshing and I said it’s divine

    Like

Leave a comment