The Aftermath of 21 Day Lockdown

I re-blogging the below blog on what the topic of what would happen when 21 day lockdown to contain spread of COVID-19, in India ends on April 14, I agree the suggestions there. The situation mentioned in there could very well happen, if governments and most important we ourselves don’t maintain sanity towards the situation.

What do you think? And what can we do not get into this mindset?

Oblivion8

For starters, not all of us have siblings who are doctors and who can give us a scare, time and again while providing authentic information about what really should be our priority points.

The first thing my brother, who is a doctor, told me today was that, it’s not the 21 day lock down that matters, it’s what we do on day 22.

So here’s what’s going to happen:

  1. Like some people did during the Janta curfew, now the whole country is suddenly going to run out of their homes with the national flag, playing patriotic songs and shouting slogans like we’ve won a war and talking about how great of a nation we are forgetting that we have not completely eradicated the virus but merely tried to cut it down.
  2. The so called highly educated people of the city are going to flood public places like cinema theaters, restaurants…

View original post 665 more words

वेगळी वाट

मला चित्रपट पाहायला आवडतात त्यात काही नवीन नाही, जवळ जवळ सगळेच ह्या माध्यमाच्या प्रभावाखाली आहेत. पण मला त्यावर लिहायला आवडते, त्याच्या तंत्राविषयी, कलेच्या तत्वांविषयी समजावून घ्यायला भावते. त्यामुळे चित्रपट सजगपणे पहिले जाते असे मला वाटते. आज ज्या चित्रपटावर लिहिणार आहे, तो माझ्यासाठी खास तर आहेच. आपल्या मित्रमंडळी पैकी एखादा ऐन पस्तिशीत, आयुष्यात स्थिरसावर होत असताना, सर्व काही सोडून चित्रपट कलेची आवड म्हणून पूर्णवेळ त्यातच जाणे हे एखाद्यालाच जमते. तेच माझ्या मित्राने केले. दहा बारा वर्षांपूर्वी त्याने आपल्या स्वप्नांचा पाठपुरवा करायला सुरुवात केली. वेगळी वाट हा त्याचा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. इथपर्यंत झालेला त्याचा प्रवास अगदी जवळून पहिला होता.

माझ्या मित्राचा, म्हणजे, अच्युत चोपडे(उर्फ अच्युत नारायण) याच्या पूर्ण लांबीचा पहिल्या वहिल्या चित्रपटाची उत्सुकता होतीच. आज येईल उद्या येईल असे करत अखेरीस तो ह्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये झळकला. त्याचीच कथा आणि दिग्दर्शनहि त्याचेच. त्या कथेवर त्याने पूर्वी एक लघुपट देखील बनवला होता. पुण्यातील औंध मधील एका मॉल मध्ये दुपारच्या बाराच्या खेळाला मी तो पाहायला गेलो. इन मीन आठ दहा प्रेक्षक आले होते. मी थोडा खट्टू झालो. मराठी चित्रपटांच्या बाबतीत असे होऊ नये खरेतर.

चित्रपट सुरु झाला. सुरुवातीपासूनच चित्रपट साधा सरळ आहे असे जाणवले. चित्रपट माध्यम जर कथा सांगण्यासाठी असेल तर तो उद्देश अगदी सफल झाला आहे. एका सरळ रेषेत कथा फुलात जाते, मनाची पकड घेते, बाप आणि मुलगी यांच्या नात्याच्या गुंतागुंतीमध्ये प्रेक्षकाला अगदी गुंतून टाकते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या अनेक कलाकृती या पूर्वी देखील येऊन गेल्या आहेत. त्यात नवीन काही नाही. पण या चित्रपटात त्या व्यथेवर मात करण्यासाठी उपाय सांगितला आहे. समस्येकडे थोडा वेगळा विचार करून त्यावर मात कशी करता येते याचे प्रात्यक्षिक हा चित्रपट आहे. वेगळी वाट हे चित्रपटाचे शीर्षक अगदी समर्पक आहे.

वेगळी वाट

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावातील एका शेतकरी कुटुंबाची हि गोष्ट. राम हा २-५ एकर जमीन असणारा छोटा शेतकरी. दुष्काळामुळे तसेच अकाली झालेल्या गारपिटीमुळे पिक गमावून बसलेला, सरकारी मदतीची वाट पाहत होता. डोक्यावर कर्ज झालेले. सावकाराचा जमिनीवर डोळा. त्याला सोनू नावाची शाळकरी मुलगी. अभ्यासात हुशार, शिक्षकांची तसेच बापाची लाडकी. तरतरीत आणि बागडणारी अशी ती. तिला बापावर आलेले संकट समजते. त्यावर ती उपाय सुचवते तो भाजी व्यवसाय करण्याचा. तो उपाय बापाला आर्थिक संकटातून थोडेफार बाहेर काढते. शेतकऱ्यांचा पुढे असलेल्या विविध प्रश्नांवर वेगळा विचार करण्याची गरज आहे. शेतकी उत्पादनाच्या किमतीमधील चढउतार, हवामानाची अनिश्चितता, शेतमालाच्या वितरणातील समस्या आणि गैरप्रकार यामुळे शेतकरी भरडून जातो, यावर एकच उपाय म्हणजे थोडा वेगळा विचार करून, ह्या समस्यांवर मात करता येते.

सोनू शाळेतील एका निपुत्रिक शिक्षकाची ती लाडकी आहे. ते रामला आर्थिक मदत करतात, पण एका गोष्टीच्या मोबदल्यात. मग पुढे काय होते हे समजण्यासाठी चित्रपट पाहायला हवा.

चित्रपट आधी म्हटल्याप्रमाणे साधा सरळ आहे, मुख्य उद्देश कथा सांगणे हा आहे. वातावरण एकूणच वास्तवदर्शी, आणि पांढरकवडा गावातच चित्रीकरण झालेले. गेल्यावर्षी अच्युतकडून त्याविषयी मी अधून मधून ऐकत होतो. ऐन उन्हाळ्यातच चित्रीकारणाचे वेळापत्रक होते. लघुपट ते पूर्ण चित्रपट हा प्रवास, चित्रपट त्याच्या डोक्यात आल्यापासून, प्रत्यक्ष चित्रीकरण सुरु होणे इथपर्यंतचा प्रवास, आणि नंतरची आवश्यक असलेली वितरण व्यवस्था, त्यातील खाचाखोचा, मुंबईच्या त्याच्या वाऱ्या हे सर्व अधून मधून त्याच्याकडून ऐकत होतो. गेल्या महिनाभरापासून समाज माध्यमांवर चित्रपटातील गाणी, पत्रकार परिषदा, मुलाखती आकाशवाणी, दूरचित्रवाणीवर. वर्तमानपत्रातून येत होते. त्याची धडपड शेवटी फळाला आली याचा आनंद आहे. प्रमुख भूमिका शरद जाधव याची आहे, आणि योगेश सोमण यांची शिक्षकाची भूमिका केली आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय साजेसा झाला आहे.

आपणही हा पाहावा, आनंद घ्यावा आणि त्याचे कौतुक करावे असे नक्कीच सांगेन.  अच्युतचे काही हटके लघुपट जसे कि अर्धविराम आणि Return Gift  यावर देखील लिहिले आहे, जरूर वाचा.

 

पक्ष्यांचे हल्लानाट्य

माणूस आणि निसर्ग यांचा अनुबंध या विषयाचे भान जगातील विविध संस्कृतींत आणि समाजात अनादी कलापासून  आहे. पण गेल्या काही शतकांपासून विकासाच्या नावाखाली निसर्ग ओरबाडला जातो आहे. आजकाल त्याबद्दल बरेच काही बोलले जाते, केले जाते. उदाहरणार्थ, गेल्या काही वर्षांतील शहरी भागातील चिमण्यांचे दुर्लभ झालेले दर्शन. पण निसर्गातील प्राणी, पक्षी किंवा इतर सजीव यांनी, या हस्तक्षेपाविरुद्ध, अतिक्रमणाविरुद्ध, माणसांविरुद्ध बंड केले तर, थव्या थव्याने प्राणघातक हल्ला  केला तर? कशी वाटतेय हि कल्पना? खरे तर बिबट्या आणि वाघ या सारखे प्राणी मानव वस्तीजवळ येऊन, नरभक्षक होत आहेत, हे आपण पाहतो आहे. पण हे सर्व पोटाच्या भूकेसाठी होते. पण पक्ष्यांचे असे माणसांवर थव्याने हल्ला करणे हे वेगळे आहे, आणि ते कश्यासाठी असावे?

नेमका हाच विषय घेऊन आल्फ्रेड हिचकॉक ५०-६० वर्षांपूर्वी हा चित्रपट केला असावा. शांता शेळके यांच्या कुठल्याश्या पुस्तकात त्यांनी हा चित्रपट पहिल्याचा उल्लेख एका लेखात(निसर्गाकडे परत या नावाचा) आला होता. मला उत्सुकुता वाटली आणि तो मी युट्यूब वर येथे पहिला.

आल्फ्रेड हिचकॉकचे सिनेमे हे थरारपट, भयपट असतात हे सर्वाना माहित आहे. त्याला ह्या कल्पनेतच भय दिसले, थरार, रहस्य दिसले त्यात नवल ते काय. अजून एक हा एका लघुकथेवर आधारित आहे. ती लघुकथा आहे Daphne du Maurier या लेखिकेची.

चित्रपट पाहताना वरकरणी असे वाटते कि हे पक्षी विनाकारण, काहीही चिथावणी नसताना, लहान मुलांवर, नागरी वस्तीवर हल्ले करतात. आपल्याला माहिती आहे कि प्राणी, पक्षी असे विनाकारण सहसा हल्ले करत नाहीत. काहीतरी धोका, अथवा काही तरी त्रास दिला तर, तसे ते हल्ले करतात. नाही असे नाही. विशेषतः प्राणी. पक्ष्यांचे असे वर्तन, माणसांविरुद्ध दिसल्याचे मी तरी पाहिले, वाचले नाही. हा विषय रहस्य, थरार म्हणून आल्फ्रेड हिचकॉकने वापरला आहे. पण त्यामागे माणसाचा निसर्गात होत चाललेला वाढता हस्तक्षेप हे कारण असेल ह्याचे तो चित्रपटातून सहज जाता जाता निर्देशन करतो.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील Santa Rosa जवळील Bodega Bay ह्या समुद्र किनाऱ्यावरील भागात हा चित्रपट घडला आहे. मी अमेरिकेत वास्तव्यात असताना ह्या भागात हिंडलो फिरलो आहे. हमरस्ता क्रमांक १ (Pacific Coastal Highway#1) दक्षिणोत्तर किनाऱ्यावरून जातो. त्यावेळेस मी राहत असलेल्या सिलिकॉन व्हॅली जवळच, उत्तरेकडे, हा भाग आहे. अतिशय रमणीय परिसर आहे. थंडगार आणि निळेशार पाणी असलेला अथांग प्रशांत महासागर, किनाऱ्यावर दिसणारे वालरस सारखे जलचर, आकाशात दिसणारे पांढरे, करड्या रंगाचे सीगल् सारखे पक्षी यांचे थवे कायम दिसतात.

चित्रपट सुरु होतो तो एका पाळीव पक्ष्यांच्या दुकानात. नायकाला आपल्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त लव्हबर्ड्स ची जोडी भेट द्यायची असते. दुकानात त्याची भेट नायिकेशी होते, पण गमती गमती मध्ये तो तिला दुकानात काम करणारी मुलगी असे वाटले सांगतो. दोघांत प्रेमाकर्षण निर्माण होते हा ही एक घागा चित्रपटाचा आहेच. नायिका त्याला काही दिवसांनी लव्हबर्ड्स देण्याच्या निमित्ताने त्याच्या समुद्रकिनारी असलेल्या घरी जाते. आणि तेथेच सुरु होते ते अतार्किक, रहस्यमय असे पक्षी हल्लानाट्य. कथा जशी जशी पुढे जाते, तसे तसे हे हल्ले वाढतात, मग थव्या थव्याने देखील हे होत राहतात.  ह्या सगळ्यात आल्फ्रेड हिचकॉकची ट्रेडमार्क भयावहपणा, थरारकता, रहस्यमय चित्रण दिसत राहते.

या चित्रपटाचे अनेक अंगाने विश्लेषण केले गेले आहे. काही जणांनी अमेरिका रशिया शीतयुद्धाच्या दृष्टीने देखील याचा अर्थ लावला आहे (लक्षात घ्या हा चित्रपट १९६० च्या सुमाराचा आहे). स्त्री पुरुष संबंधांच्या दृष्टीने, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील ह्याकडे पहिले गेले आहे. निसर्गावर केलेले अत्याचार आणि त्यावरील पक्ष्यांची प्रतीकात्मक प्रतिक्रिया, असा जो अर्थ चित्रपटाच्या विषयाचा निघू शकतो, जी मी वर मांडली आहे, ती देखील अनेकांना पटते. पण शान्ताबाईंनी थोड्या वेगळेपणाने ह्या चित्रपटाकडे पहिले आहे. आजकालच्या सुसंकृत म्हणवणाऱ्या माणसांमधील संबंध कसे कृत्रिम असतात, तसे प्राणी पक्षी यांच्या मधील नसतात, ते अधिक उस्फुर्त असतात असे ते म्हणतात. आपण माणसे एखादा अनोळखी माणूस दिसला कि लगेच संशयाने पाहत नाही, आपण सहजपणे विश्वास ठेवतो, लगेच धोका होईल असे वाटत नाही. पण तसे प्राणी पक्षी यांत होत नाही हे ते सांगतात आणि ते सहज पटते देखील, कारण आपण तसे पाहतोच की आपल्या आजूबाजूला. जरी प्रत्यक्षात असे पक्ष्यांनी अनोळखी माणसांवर हल्ले केल्याचे कुठे घडल्याचे आढळत नाही, तरी चित्रपटात असे दाखवले असले, ते निसर्गाकडे परत जावे माणसाने, आणि उस्फुर्त, स्वभावोचीत जगावे हे सांगण्यासाठी, असा निष्कर्ष त्या काढतात.

तुम्ही देखील हा चित्रपट जरूर पहा, आणि ठरवा काय अर्थ लावायचा ह्या पक्ष्यांचा हल्ल्याचा!

रारंग ढांग आणि त्यानंतरची कहाणी

खूप वर्षांपूर्वी रारंग ढांग ह्या विचित्र नावाचे पुस्तक पाहिल्यानंतर वाटले काय आहे हे रारंग आणि ढांग. त्यात आणखीन ढांग हा मराठी शब्द परिचयाचा असतो, पण रारंग आणि ढांग हि जोडगोळी कानांना बरी वाटली तरी काय प्रकरण आहे हे समजले नव्हते. पुस्तक प्रभाकर पेंढारकर यांनी ते लिहिले होते. त्यांचे चक्रीवादळ हे पुस्तक वाचले होते. त्यांची पुस्तके पूर्णपणे काल्पनिक नसतात हे माहिती होते. तसेच हे देखील निघाले. प्रभाकर पेंढारकर हे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र. ते देखील चित्रपट क्षेत्रातच. भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजन मध्ये देखील काम केलेले, बरेच माहितीपट तयार केले. रारंग हे हिमाचल प्रदेशातील सिमल्याच्या ईशान्येकडे, तिबेटच्या सीमेजवळ असलेले एक गाव आहे. नकाशात एक बौद्ध मठ देखील दिसतो जवळपास. आणि ढांग म्हणजे तेथील स्थानिक भाषेत डोंगराची कडा. प्रभाकर पेंढारकर यांचे हे पुस्तक तसे खूप जुने म्हणजे १९८० मधील आहे. तर मी आज त्याबद्दल का लिहितो आहे? कारण ह्या पुस्तकाचा उत्तरार्ध म्हणून गाजलेले ‘रारंग ढांग नंतर…’ हे श्रीकृष्ण सवदी यांचे २०१४ मधील पुस्तक नुकतेच वाचले हे निमित्त.

आधी रारंग ढांगची कथा थोडक्यात. हिमालयातील पर्वतांच्या उंची एवढ्या उंचीवर जगात भारत हा बहुधा एकमेव देश असावा. हे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (Border Road Organization BRO) ही संस्था भारतीय सैन्याच्या अधिपत्याखाली करते. कथेचा काळ स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दुसऱ्या दशकाचा आहे, ज्यावेळी भारतात नेहरूंच्या नेतृत्वाखाली विविध पायाभूत सुविधा निर्माणाच्या करिता विविध प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले होते. कथेचा नायक विश्वनाथ, जो अभियंता आहे, तो खासगी नोकरी सोडून हिमालयातील दुर्गम, सीमा भागातील रस्ते बांधणीच्या प्रकल्पासाठी सरकारी नोकरीवर रुजू होतो. हे रस्ते प्रामुख्याने भारतीय सैन्याच्या दळणवळणाकरिता, सीमेच्या सुरक्षेच्या साठी आवश्यक असल्याने, त्यांचे या कामावर नियंत्रण असते. विश्वनाथ हा त्या प्रकापातील बिनलष्करी अभियंता असतो. त्यामुळे त्याचा नेहमी इतर लष्करी सहकारी, अधिकारी यांच्याकडून उपहास उपहास केला जातो. रारंग ढांग ह्या उभ्या कड्यातून रस्ता तयार काढण्याच्या कामाच्या वेळेस तो लष्कराने केलेल्या आराखड्याप्रमाणे काम न करता, अधिक सुरक्षित उपाययोजना करतो, त्यामुळे त्याला लष्करी कारवाईला(कोर्ट मार्शल) सामोरे जावे लगते. पुढे त्याची त्या अन्यायकारक आरोपांतून मुक्तता होते, पण त्याची नोकरी कायम होत नाही, त्याचा करार रद्द होतो, आणि त्याला त्यातून अतिशय खंत मनाने बाहेर पडावे लागते. त्याचे मुंबईतील उमा नामक चित्रकार तरुणीबरोबरच पत्रव्यवहार, प्रेमाचे धागे ह्याचे देखील चित्रण कादंबरीत येते. प्रभाकर पेंढारकर यांनी ह्या सर्व बाजूंचे, तेथील वातावरणाचे, लष्करी शिस्त, कोर्ट मार्शलची प्रक्रिया, मतभेद, याचे मनोवेधक चित्रण केलेले होते.

आता उत्तरार्ध. मराठीत कादंबरींचे उत्तरार्ध, पूर्वार्ध असे विशेष आलेले नाहीत. त्यातही ह्या कादंबरीचा उत्तरार्ध हा प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिला नसून श्रीकृष्ण सवदी यांनी लिहिला आहे. २०१० मध्ये पेंढारकरांचे निधन झाले, त्यानंतर चंद्रकांत मासिकाने उत्तरार्ध लिहिण्याचे आवाहन केले होते. श्रीकृष्ण सवदी यांनी ते स्वीकारले आणि त्यांचा उत्तरार्ध हा २०१४ मध्ये प्रकाशित झाला. श्रीकृष्ण सवदी हे तसे प्रथितयश लेखक नव्हेत, त्यांचा पोटार्थी व्यवसाय म्हणजे सैन्यासाठी असलेल्या लेखापरीक्षणाचे अधिकारी हा होता. पण त्यांचा इंग्रजी साहित्याचा अभ्यास होता. त्यातच ते BROच्याच सिक्कीम मधील रस्त्याच्या बांधणीच्या स्वस्तिक नामक प्रकल्पाचे ते लेखाधिकारी म्हणून १९६०च्या दशकात काम पहिले होते. त्या अनुभवांमुळे त्यांनी हे सहजरीत्या पार पडले, आणि मूळ कादंबरीच्या इतकेच हा उत्तरार्ध देखील authentic वाटतो.

काय होते उत्तरार्धात? अर्थात सुरुवात होते ती अपेक्षेप्रमाणे विश्वनाथला परत कामावर घेतले जाते आणि त्याची नियुक्ती, आता रारंग (जे सिमल्याजवळ आहे) येथून थेट पूर्वेकडील सिक्कीम भागात लाचेन आणि नंतर रिशी येथील प्रकल्पांवर होते. त्या प्रकल्पांवरील आव्हानांचा विश्वनाथ कसा सामना करतो याची कथा यात येते. सवदी यांनी मनोगतात नोंदवल्याप्रमाणे उत्तरार्ध हा ९० टक्के सत्यावर आधारित आहे. सिक्कीम मधील प्रकल्प, ज्यात विश्वनाथ काम करतो, तो प्रत्यक्षात राममूर्ती नावाचे कोणी अभियंता होते त्यांनी ते केले आहे असे ते लिहितात. दोन्हीतील आणखी एका फरकाबद्दल ते लिहितात, ‘…रारंग ढांग हे non-family station होते, तसेच लाचेनही होते, पण रिशी हे family station होते. प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहता येत असे….मुळात (सिक्कीम मधील) कालिम्पोंग हे शहर सुसंकृत, कलांचे गुणग्रहण करणारे असल्यामुळे तेथील वास्तव्य हा एक श्रीमंत अनुभव होता. उमाचे चरित्रचित्रण पुढे न्यायला संधी होती.’

सिक्कीमची पार्श्वभूमी असल्यामुळे तिबेटी बौद्ध धर्म, संस्कृती, तत्वज्ञान, रितीरिवाज हे सर्व आपसूकच येते. कांचनगंगा शिखर, तिबेटी चहा(जो याक प्राण्याचे लोणी घालून बनवलेले असते) हे देखील येतात. पुस्तकात खरेतर रोमतेक येथील लामा कारमापा यांचे एक छायाचित्र देखील आहे. लाचेनचे डॉक्टर लामा हे सुद्धा कथानकात येतात. लेखक स्वतः(वेगळ्या नवाने), लेखाधिकारी याच व्यक्तिरेखेत अधून मधून दिसतात. तेथील भयानक थंडी, तुफान होणारा हिमवर्षाव, अति उंचीवरील विरळ होणारा प्राणवायू या सारख्या प्रतिकूल परिस्थितीत विश्वनाथ आणि त्याच्या चमूला काम करावे लागते. तिथे गेल्यावर सर्वात आधी रांगपो येथील छोटेसे काम, नंतर लाचेन येथील रस्ता रुंदीकरणाचे काम, जे त्याने झपाट्याने केले, आणि स्वतःबद्दल अनुकूल मत तयार केले.

नंतर त्याला रिशी गावाजवळील जवळील रस्त्याच्या टिकाऊपणाची समस्या सोडवण्याची जवाबदारी आली. थोड्याश्या पावसामुळे देखील रस्ता खचून अतिशय खराब होत असे आणि लष्कराची जीवन रेखा दुभंगे. त्याच प्रकल्पाच्या दरम्यान त्याची चित्रकार प्रेयसी उमा देखील तेथे येते, तिबेटी चित्रकलेच्या कार्यशाळेच्या निमित्ताने. पुढे मग सगळे ठराविक चाकोरीप्रमाणे घडत जाते. त्या दोघांचा विवाह देखील होतो. प्रकल्प यशस्वी पणे पुरा होतो. त्यानिमित्ताने बरेच तांत्रिक तपशील सवदी यांनी दिले आहेत. तो थोडेसे डोक्यावरून जाऊ शकतात, रसभंग देखील होऊ शकतो. पण तशी हि कादंबरी एका बैठकीत संपवता येते.

हिमालयातून भटकंती करताना तेथील अवघड भूभागाची, अवघड रस्त्यांची कल्पना येते(मी उत्तराखंड भागात ट्रेकिंग साठी, तसेच सिमला, मानली, रोहतांग पास येथे गेलो आहे). गाड्या चालवतानाच अतिशय धोका असतो, तर आता असे रस्ते करणे किती कठीण असेल ह्याची कल्पना या कादंबरीद्वयातून समजते. खरे तर ह्या पुस्तकाचा पूर्वार्ध देखील यायला हरकत नाही. आणि ह्या तिन्ही पुस्तकांच्या कथानकावर एक छानसा चित्रपट होऊ शकेल. हिमामायालाची तसेच भारतीय सैन्यदलाची पार्श्वभूमी असलेला हा सारा पट चित्रपटासारख्या माध्यमाला उपयुक्त आहे असे मला वाटते. ह्याचा जरूर विचार व्हावा. जाता जाता शेवटचे. प्रसिद्ध कादंबरीकार गो नि दांडेकर यांची हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या भाक्रा नांगल धरणाची कथा त्यांनी अशीच संशोधन, कल्पना यांच्या मेळ घालून लिहिली होती. त्या पुस्तकाचे नाव ‘आम्ही भगीरथाचे पुत्र’, आणि ती देखील १९५९ मधील!

 

वारुणी पुराण

वारुणी हा संस्कृत शब्द म्हणजे मद्य, नेहमीच्या भाषेत दारू. हा विषय तसा सर्वांचाच प्रिय विषय, बहुतेक लोकांचा तरी असे म्हणूयात. आज ह्या विषयावर लिहायचे आहे. भारतात मद्य प्राशन हा काही सार्वजनिक प्रतिष्ठेचा भाग नाही, जसे ते पाश्चात्य देशात ते सर्वमान्य आहे. पण त्यामुळे भारतात पिण्याचे प्रमाण मुळीच कमी नाही, मिळेल तशी पिणे, धुंद होणे हे अधिक. त्यात चोरटेपणा जास्त आणि त्यामुळे अनेक अपघात होतात, तसेच अनेक किस्से, आणि प्रकरणे होतात. त्यातही दोन बाजू आहेत. एक तर मद्य शौकिनांचा, आणि दुसरा व्यसनाचा, त्याच्या दुष्परिणामांचा, आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक प्रश्नांचा. दुसरा विषय तसा खूप मोठा आहे, अनेक व्यक्ती, संस्था त्यात काम करताहेत(जसे अनिल अवचट यांची पुण्यातील मुक्तांगण ही संस्था). मी देखील मानसिक आजार क्षेत्रात काम करत असल्यामुळे व्यसनी आणि  मानसिक आजारी व्यक्ती पाहत असतो. पण हा लेख मद्य संस्कृती आणि शौकिनांच्या बाबतीतला आहे. मी विविध विषयांवर लिहित असतो, हा विषय काही वर्ज्य नाही. मी पण लिहिणार कसे, मी तर तसा त्यातला दर्दी रसिक तर नाहीच, पण असाही पिणारा देखील नाही. नुकतेच एक मस्त पुस्तक हाती लागले, त्याच्या आधारे लिहितो आहे. आणि मी जरी पीत नसलो तरी, माझेही काही अनुभव आहेतच कि, अभ्यास आणि निरीक्षण आहेच कि!

पुस्तकाचे नाव आहे मद्य नव्हे, हे मंतरलेले पाणी! आहे की नाही मस्त नाव? हे मान्यवरांच्या पिण्याच्या अनुभवांबद्दलच्या लेखांचे पुस्तक आहे. ते संपादले आहे अरुण शेवते यांनी. तसे हे पुस्तक वीस वर्षे जुने आहे. पण त्यामुळे त्यातील अनुभवांत विशेष बदल झालेला असेल वाटत नाही. काळ वीस वर्षे पुढे गेल्यामुळे खरे तर त्यात भरच पडली असेल. प्रस्तावनेतच पुस्तकाचे संपादक अरुण शेवते आपले अनुभव मांडतात. पिणे आणि शेरो-शायरी यांचा तसा घनिष्ट संबंध, त्याचे दाखले त्यात मिळतात. कवितेतून देखील ते दिसतात. प्रसिद्ध हिंदी, पंजाबी लेखिका अमृता प्रीतम(नुकतीच ह्यांची जन्म शताब्दीचे वर्ष सुरु झाले) यांचे शब्द उधृत करून त्यांच्या चिंतनशिलतेला मद्यामुळे कसे वेगळे परिमाण लाभते हे सांगितले आहे. पुस्तकात रेखा सबनीस(आता दिवंगत) या दुसऱ्या एका महिला लेखिकेचे/अभिनेत्रीचे/रंगकर्मीचे देखील अनुभव आहेत, त्यामुळे पुस्तक फक्त पुरुष मद्य शौकिनांचे अनुभव सांगत नाही तर, स्त्रीवर्गाचे प्रातिनिधिक अनुभव आहेत, आणि ते वाचून आश्चर्यचकित व्हायला नको आहे. ह्या रेखा सबनीसांचा पूर्वी एक २७ डाऊन नावाचा सिनेमा पहिला होता, त्याबद्दल येथे लिहिले आहे.

पहिले दोन लेख खरे तर मद्याच्या इतिहासाबद्दल आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा लेख वैदिक संस्कृती पासून, ते रामायण, महाभारत तसेच हिंदू धर्मशास्त्र, आयुर्वेद यातील विविध संदर्भ देत आढावा घेती तर दुसरे तसेच प्राच्यविद्या पंडित, तत्वज्ञ मे पु रेगे यांचा लेख ग्रीक, रोमन संस्कृतील मद्य संस्कृती, इतिहास याचे अनेक दाखले देत लिहिलेला लेख वाचनीय आहेत. त्यात त्यांनी Symposium चा अर्थ सहपान असा होतो असे दिले आहे, हे वाचून मजा वाटली. हा शब्द, आमच्या आयटी क्षेत्रात तर अनेक तंत्रज्ञानासंदर्भात चर्चा, आणि कार्यशाळा ज्या आयोजित होतात त्याला लागू आहे आजकाल. तिसरा लेखही, जो साहित्यिक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा आहे, तोही त्याच पठडीतील आहे, म्हणजे थोडा ऐतिहासिक आढावा घेणारा. पेशवेकाळ,औरंगजेब मोगलांच्या काळी काय परीस्थिती होती त्याची, विक्टोरियन काळातील इंगलंड मधील मद्यपानबंदी, तसेच मराठी रंगभूमी, एकच प्याला नाटकाचा परिणाम या सर्वांची चर्चा केली आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा लेख नवभारतच्या मासिकाच्या १९७८ मधील मद्य विशेषांकातून घेतला आहे, ही माहिती देखील मिळते, म्हणजे पहा!

चिरस्मृती ह्या लेखात द्वा. भ. कर्णिक यांनी मार्क्सवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातील भेटी दरम्यान रॉय यांनी पंडितजींना १६० वर्षे जुने ऱ्हाईन वाईन दिली यांची आठवण सांगितली आहे, तसेच रॉय आणि आचार्य अत्रे, रॉय आणि तत्कालीन युगोस्लावचे मार्शल टिटो यांच्या भेटी दरम्यानचे मद्यप्रसंग सांगून धमाल आणली आहे.

यातील मला स्वतःला आवडलेला लेख म्हणजे मिलिंद आमडेकर म्हणून कोणीतरी आहेत त्यांनी सांगितलेली एक शिकवण हेमिंग्वेची सत्यकथा. यात प्रसिद्ध अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे(Ernest Hemingway) आणि तत्कालीन नवोदित लेखक William J Lederer यांच्या संदर्भातील एक गोष्ट आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील. हेमिंग्वेने दिलेला शब्द कसा पाळतात, आणि सुसंस्कृतपणा कसा दाखवतात हे त्यात आले आहे. हे सर्व अर्थात मद्याच्या संदर्भात आहे बरं का! ती तुम्ही मुळातूनच वाचायला हवी.

सतीश काळसेकर, गिरीश कुबेर, फिरोझ रानडे, बाळ सामंत यांसारखे लेखक, पत्रकार मंडळी यांचे देखील लेख आहेत, ते त्यांच्या स्वतःच्या मद्य शौकासंबंधी, मद्ययात्रेविषयी, पानगोष्ठीविषयी, ओल्या पार्ट्यांविषयी आहेत. ते अर्थात भन्नाट आहेत. अनेकांनी मोरारजी देसाई, जे तत्कालीन मुंबई प्रांताचे(महाराष्ट्र राज्य अजून निर्माण झालेले नव्हते) मुख्यमंत्री होते, त्यावेळी, त्यांनी लागू केलेल्या दारूबंदीची खिल्ली उडवली आहे.

या लेखांमधून विविध मनोरंजक माहिती देखील मिळते. जसे कि दक्षिण भारतात फार पूर्वीपासून चांगली ताडी मिळत असली पाहिजे, किंवा श्रवणबेळगोळ येथील मूर्ती एका ताडीबहाद्दराने घडवली, किंवा हातभट्टीची पहिल्या धारेची दारू म्हणजे उर्ध्वपातनयंत्रातून सर्वप्रथम पडलेला द्रव(जो माद्यार्काने संपृक्त-strong असतो), मोहाच्या फुलांची दारू, आणि जंगलातील माकडे ती फुले पिऊन मद्यधुंद होऊन दंग करतात हि गोष्ट, मद्य आणि कामवासना यांचा परस्परसंबंध सुद्ध बकवास आहे, जयपूरची खास केशर कस्तुरी हि दुर्मिळ दारू, लेह मध्ये खास बनणारी तांदळाची दारू, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात मद्याला उन्मत्त द्रव्य असे नाव दिले आहे हा उल्लेख, ज्या इस्लाम धर्मात मद्य निषिद्ध आहे, त्याच धर्मातील शायरांनी मद्याचे गुणगान सर्वात जास्त त्यांच्या गझलांमधून केले आहे, हा विरोधाभास, तसेच हिंदी मधील प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांचा मधुशाला हा काव्यसंग्रह, जो वाच्यार्थाने मद्याविषयी आहे त्याबद्दल काहींनी लिहिले आहे. आम्हाला शाळेत हिंदी विषयाच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या एक दोन कविता होत्या हे आठवते आहे, पण हा काव्यसंग्रह मद्याच्या रूपकातून तत्वज्ञान सांगते हे ह्या लेखांमधून समजले.अश्या एक ना अनेक गोष्टी!

खावे त्याच्या देशा या पुस्तकात देखील अरुण नेने यांनी विविध देशांतील खाद्य संस्कृती, आणि मुख्य म्हणजे विविध देशांतील  पेय संस्कृती बद्दल, इतिहासाबद्दल लिहिले आहे, ते आहे माझ्याकडे. वाईन संहिता नावाचे एक पुस्तक पाहिले होते कुठेतरी. वाईन ह्या मद्यप्रकाराबद्दल सर्वंकष माहिती पुरवते, जी त्या उद्योगात जाण्याचे असेल त्यांना उपयोगी आहे. वाईन प्रामुख्याने द्राक्षांपासून बनते. सरकार देखील त्याला प्रोत्साहन देत आहेच. काही वर्षांपूर्वी मी पुणे नाशिक हमरस्त्यावरील नारायणगाव येथे ट्रेकिंगला गेलो असता जवळच असलेल्या Cheateau Indage या वाईन बनवणाऱ्या कारखान्यात गेलो होतो. पु ल देशपांडे यांचे एक मस्त वाक्य आठवते या निमित्ताने मला, जे पाश्चिमात्य आणि पौरात्य संस्कृतीच्या संदर्भातील आहे-त्यांची द्राक्ष संस्कृती, तर आपली रुद्राक्ष संस्कृती! हे सर्व आता बदलत आहे, हेही तितकेच खरे. अजून एका पुस्तकाबद्दल वर्तमानपत्रात वाचले होते. The Indian Spirit: Untold Story of Drinking in India या नावाचे इंग्रजी पुस्तक, कोणी मगनदीप सिंग यांनी देशभर हिंडून माहिती गोळा करून लिहिलेले पुस्तक आहे म्हणे, ते वाचायला हवे.

या विषयावर अजूनही बरीच पुस्तके असतील, पण हे अरुण शेवते यांचे पुस्तक मस्तच आहे आणि ती वाचताना मजा येते, आणि त्यातील बऱ्याच गोष्टी आपल्या पिण्याच्या बैठकींच्या बाबतीत आपण अनुभवलेल्या असतात, त्यामुळे देखील मजा येते. एक गोष्ट मला आढळली नाही ती म्हणजे कोणीही कॉकटेल्स बद्दल लिहिलेले नाही. का कोणास ठाऊक, पण कॉकटेल्सच्या जगताची देखील एक मजा आहे, ती देखील एक कला आहे असे मानतात. मोसंबी नारंगी म्हणजे हातभट्टीच्या, देशी दारूच्या गुत्त्यांच्या अनुभवांबद्दल काही जणांनी लिहिले आहे.

अमेरिकेत असताना मी देखील ही मद्य संस्कृती, त्यातील उच्चभ्रूपणा, नजाकतपणा, त्याला असलेली सामाजिक प्रतिष्ठा जवळून पहिली आहे. अर्थात त्याचा भाग मी स्वतःहून झालो नाही, लांबच राहिलो. अमेरिकेतील वाईन उद्योगाचा अड्डा असलेल्या नापा खोरे(Napa Valley) येथे गेलो होतो, थोडी बहुत वाईन टेस्ट देखील केली होती. त्या अनुभवांबद्दल सविस्तर लिहायचे कधीतरी, पाहूयात. नुकताच डेहराडून येथे गेलो असता महाशिवरात्रीच्या वेळेस शिवमंदिरात गेलो असता भांगेचे ठेले पाहिले आणि आयुष्यात पहिल्यांदा भांग घेतली अर्थातच तिचा अंमल देखील झाला याची गोष्ट मी येथे लिहिले आहे. खूप पूर्वी गुजरातेत दिव दमण सेल्वासा येथे गेलो असता तेथील किंगफिशर ह्या बियर कंपनीची टूर होती, तेथे देखील गेलो होतो. असो. ह्या लेखात उल्लेखलेली सर्व पुस्तके एका अर्थाने मद्य संस्कृतीची पाठराखण करतात, कधी थेटपणे, तर कधी मागल्या दराने. पण मद्य संस्कृतीमुळे व्यसनाधीनता देखील वाढते आहे, हे तर खरे आहेच. दर पाच पिणाऱ्या मागे एक व्यक्ती व्यसनाच्या जाळ्यात अडकते आणि एकूणच भयंकर  कौटुंबिक, सामाजिक दुष्परिणाम दिसतात. पिणे किंवा न पिणे, किंवा कधी कधी पिणे हे सर्व आपल्या हातात आहे. त्यामुळे ह्या निमित्ताने सारासार विचार करावा असे आवर्जून सांगावेसे वाटते.

मंटो

दशकभरापूर्वी मी जेव्हा उर्दू लिपी आणि भाषा शिकत होतो, तेव्हा सआदत हसन मंटो या उर्दूतील प्रसिद्ध कथाकाराचे, आणि इतरही उर्दू लेखक जे परंपरावादी नव्हते, पुरोगामी होते, असे काही जण जसे इस्मत चुगताई वगैरे यांची नावे ऐकली होती. हे सगळे उर्दू साहित्यिक स्वातंत्र्यपूर्व काळात उदयास आले. स्वातंत्र्य, फाळणी, आणि नंतरची एकूण सामाजिक राजकीय परिस्थिती, आणि त्या काळातील मानवी भावभावनांची, अनुभवांची त्यांनी मुक्तपणे मांडणी त्यांच्या कथांतून करण्याचा प्रयत्न केला. मी काहींच्या कथा हिंदी, मराठी, तसेच उर्दूत देखील वाचल्या होत्या. त्या काळाच्या पुढे होत्या, त्या लेखकांवर अश्लीलतेचे आरोप झाले, कोर्ट-कचेऱ्या देखील झाल्या. मंटो देखील असाच. बेबंद, मनस्वी जीवन जगलेला, एकूणच जगण्यावर पराकोटीची वासना, आयुष्य पुरेपूर जागून घ्यावे हि मनात ईर्ष्या.

गेल्यावर्षी जेव्हा मंटोच्या जीवनावर एक हिंदी सिनेमा आला त्याबद्दल मला खूप उत्सुकता होती, त्याचे जीवनच तसे वादळी होते. पण त्यावेळी तो काही कारणाने पाहायला जमले नाही आणि एक हूरहूर लागून गेली होती. परवा नेटफ्लिक्स वर तो माझ्या पाहण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता दास हिने त्याची पटकथा लिहिली आहे तसेच तो तिने दिग्दर्शित देखील केला. मला तो आवडला. मंटोची भूमिका गुणी अभिनेता नवाजुद्दिन सिद्दकी याने केली आहे. तो ती भूमिका अक्षरशः जगाला आहे. पटकथेवर, त्याच्या संशोधनावर, मंटो यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून नंदिता दासने केलेला आहे. हा चित्रपट अर्थातच त्याच्या बालपणापासून सुरु होत नाही. तो होतो तेव्हा त्याचा विवाह होऊन, मुले देखील झालेली असतात. तो मुंबईत स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेस राहत असतो. हिंदी चित्रपटसृष्टीत काहीबाही काम करत असतो, कथादेखील लिहित असतो. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, फाळणीमुळे एकूणच देशातील वातावरण कलुषित झालेले असते. त्याच्या कथा ह्या सगळ्या स्थित्यंतराचा मागोवा घेतात असे म्हटले जाते. ते चित्रपटात देखील दिसते, तो कसा फाळणीमुळे अतिशय दुखीकष्टी झाला आहे हे दिसते. आणि त्यात सर्वातून जाताना, त्याला कोणास ठाऊक काय वाटते(बहुधा असुरक्षिततेची भावना बळावल्यामुळे), पण तो नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात, लाहोरला जाण्याचा निर्णय घेतो, आणि तेथूनच त्याची शोकांतिका सुरु होते. त्याच्या ठंडा गोश्त ह्या कथेवर खटला पाकिस्तानात भरला गेला, त्याचा त्याला अतिशय त्रास होतो.  खरे तर त्याच्यावर एकूण पाच खटले भरले गेले, आणि तोही अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढत राहिला.

त्याचे मुंबईतील जीवन, आणि नंतरचे लाहोर मधील जीवन यात जमीन अस्मानाचा फरक होता. मुंबईत तो अतिशय आनंदी, खेळकर होता असे दाखवले आहे. लाहोर मध्ये तो तिथल्या परिस्थितीमुळे निराशेच्या गर्तेत जातो, मुंबईची त्याला सतत आठवण येत असते. एकूणच चित्रपट दोन्ही गोष्टी प्रभावीपणे मांडतो. पुढे मंटोचा वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी त्याचा, व्यसनांमुळे(सिगारेट, दारू) दुर्दैवी मृत्यू होतो. चित्रपटातील इतर कलाकारानी देखील चांगले काम केले आहे. एक कथाकार म्हणून कसा होता, कसा विचार करायचा, त्याचे कुटुंब कसे होते, इतर कथाकारांसोबत काय संबंध होते(जसे इस्मत चुगताई आणि तो दोघे चांगले मित्र होते) वगैरे गोष्टी देखील चांगल्या तऱ्हेने पुढे आल्या आहेत.

मंटोच्या जीवनाबद्दल घेण्यास आणखीन एक स्त्रोत माझ्या नजरेस आला होता. तो म्हणजे प्रसिद्ध लेखक अंबरीश मिश्र यांचा त्याच्यावरील अतिशय भावतरल लेख. तो आहे ‘शुभ्र काही जीवघेणे’ या पुस्तकात. त्यात मिश्र यांनी विविध समकालीनांचा दाखला देत अनेक रोचक गोष्टी त्याच्याबद्दल सांगितल्या आहेत. १९४० च्या दशकातील मुंबईतील चित्रपटसृष्टीमध्ये असलेल्या वाव आणि त्या निमित्ताने आघाडलेले किस्से आणि गोष्टी त्याच्या स्वभावाचे दर्शन घडवतात.  रसिकांनी तो लेख जरूर वाचावा.

मला नुकतेच मंटो याच्या ललित लेखांचा संग्रंह असलेले एक पुस्तक मिळाले. हे लेख त्याने वेगवेगळ्या काळी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, मासिकातून लिहिले आहेत. आकार पटेल यांनी ते एकत्र करून इंग्रजीत त्या लेखांचे उर्दू मधून भाषांतर केले आहे. जे पुस्तक मला मिळाले, ते मराठी आहे, आणि त्याचे भाषांतर वंदना भागवत यांनी केले आहे. पुस्तकाचे नावही ‘मी का लिहितो?’ असे आहे. त्याच्या विचारांचा मागोवा, जसा वर उल्लेख केलेल्या चित्रपटातून घेता येतो, तसाच या पुस्तकातूनही घेता येतो. हे पुस्तक देखील मिळवून जरूर वाचा आणि चित्रपट देखील, पाहिला नसला तर पाहा.

काही वर्षांपूर्वी पुणे आकाशवाणी वरून मी का लिहितो या नावाची मालिका प्रसारित झाली होती, त्यात काही प्रसिद्ध मराठी लेखकांनी आपल्या लेखनाचा, सृजनाचा प्रवास सांगितला होता. त्याचे पुस्तक देखील येणार होते असे ऐकले होते. झाले आहे कि नाही माहित नाही. पण ह्या मंटोच्या पुस्तकात एका लेखात तो ते अतिशय खट्याळपणे ह्या प्रश्नाचे उत्तर देतो. तो कुठलाही मोठा लेखक कथाकार असल्याचा वाव आणत नाही. इतरही लेख अशाच धर्तीचे आहेत. मंटो एक माणूस म्हणून, त्याचे विचार समजून घेण्यास हे चांगले पुस्तक आहे. साधारण २५-२६ लेख त्यात आहेत. विविध विषय आहेत, एक चित्रपट परीक्षण देखील आहे(सैगल यांच्या जिंदगी या चित्रपटाचे). काही काही लेख तर अतिशय क्षुल्लक विषयांवर आहेत. तेही त्याने अतिशय खुमासदार शैलीत, तिरकस रीतीने लिहिले आहेत. काही लेख फाळणीच्या निमित्ताने प्रकट केलेले विचार आहेत. ते वाचताना मी गेल्या वर्षी फाळणी वर आधारित एक नाटक पहिल्याचे आठवले- जिस लाहौर न दैंख्या औ जम्या नई .आकार पटेल यांनी प्रत्येक लेखाच्या आधी एक अभ्यासपूर्ण नोंद देखील दिली आहे. त्याचा छान उपयोग काळ आणि इतर संदर्भ समजायला होतो. त्याचे मुंबई वर प्रेम होते, त्याला ते शहर आवडत असे. हे चित्रपटातर दिसतेच, पण या पुस्तकात काही लेख मुंबईवर देखील आहेत, समकालीन मुंबई, फाळणीच्या वेळेची मुंबई समजायला मदत होते. त्यात त्याने चित्रपटसृष्टी बद्दलहि काही लेख आपल्या खुमासदार पद्धतीने लिहिले आहेत. मला वाटते, हे सर्व लेख मूळ उर्दू मध्येच वाचले तर त्याची मजा येईल.

थोडासा शोध घेता असे लक्षात आले कि, नरेंद्र मोहन यांनी लिहिलेल्या त्याच्या चरित्राचे मराठी भाषांतर देखील उपलब्ध आहे(खरे तर दोन वेगवेगळ्या भाषांतरकारांनी, प्रकाशकांनी ते आणले आहे). मंटो आणखीन जाणून घेण्यासाठी ती वाचायला हवीत. काही दिवसांपूर्वी वाचले होते प्रसिद्ध अभिनेता शेखर सुमन अभिनित मंटो वर एक हिंदी नाटक आले आहे. ते पुण्यात आले की मला पाहायला आवडेल.

मिरजेची सतारवाली गल्ली

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कर्नाटकच्या सीमेवरील गाव म्हणजे मिरज, हे आपल्याला परिचित असते. त्याच मिरजेतील संगीत क्षेत्राशी निगडीत वाद्य तयार करणाऱ्यांचे मोठे केंद्र आहे, ह्या बद्दल तसे आपाल्याला माहिती नसते. त्याबद्दल एका कन्नड मासिकात प्रसिद्ध कन्नड लेखक रहमत तरीकेरी यांचा एक लेख आला होता. त्याचे भाषांतर मराठी वाचकांसाठी या ब्लॉगवर देत आहे. मिरजेत अखिल भारतीय गांधर्व महामंडळाचे कार्यालय देखील आहे, तेथे मी पूर्वी कधी तरी गेलो होती. या मिरजेचे हिंदुस्तानी संगीताच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे, त्याचे कारण अब्दुल करीम खान उत्तरेतून येथे आले आणि किराण घराण्याची परंपरा येथे रुजली आणि वाढली. असो, ह्या सतारवाली गल्लीबद्दल जरूर वाचून अभिप्राय कळवा.

अनुवाद: प्रशांत कुलकर्णी, पांडुरंग कुलकर्णी

मिरजेची सतारवाली गल्ली

एक काळ असा होता की मिरज म्हणजे की मोठ्मोठ्याला हॉस्पिटल्सला पर्यायवाची नाव होते. एकोणिसाव्या शतकात एका ख्रिस्ती गृहस्थाने सुरु केलेले हे हॉस्पिटल, त्यावेळेस तेथे एकेका रुग्णाला तेथे न्यायचे म्हणजे जीवन मरणाचा संघर्षच असे समजायचे. कन्नड मधील प्रसिद्ध कादंबरीकार मिरजी अण्णाराय यांच्या निसर्ग नावाच्या कादंबरीत अनेक पात्रे मिरजेतील हॉस्पिटलमध्ये जातात असा उल्लेख आहे. अण्णाराय यांचे निवास असलेले शेडबाळ हे गाव मिरजेच्या जवळच आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील कोल्हापूर आणि सोलापुर ह्या दोन शहरांव्यतिरिक्त मिरज हे सीमेवरील तिसरे शहर गणले जाते. मिरजेला कन्नड भाषेतील अनेक मासिके, वर्तमानपत्रे आहेत, तसेच कन्नड बोलणारे लोक पावला-पावलावर आहेत. मिरजेमधील लोहमार्ग हा उत्तर कर्नाटकतील रेल्वेशी जोडला गेला आहे. जेव्हा फक्त मीटर गेज लोहमार्ग होता, त्या काळात, मुंबईला जाण्यासाठी प्रवासी मिरजेला उतरून मग पुढचा प्रवास ब्रॉड गेज ने करत असत. पण मिरज हे केवळ रेल्वे बदलण्यासाठी म्हणून असलेले जंक्शन न  राहता, ते वेगवेगळ्या दिशेने आलेल्या लोकांसाठी एक आश्रयस्थान देखील झाले. त्यामुळे मिरजेला आलेल्या कित्येक लोकांचे जीवन देखील बदलण्यास हातभार लावलेला आहे. त्यात बडोद्याहून मिरजेस आलेल्या किराणा घराण्याचे थोर गायक अब्दुल करीम खान(१८७२-१९३७) हे एक नाव. उत्तर कर्नाटकात हिंदुस्तानी संगीताचा प्रसार होण्यास अब्दुल करीम खान यांना जेवढे श्रेय जाते, तेवढेच ह्या मिरज-हुबळी लोहमार्गाला द्यावे लागेल. गायनासाठी आसपासच्या गावात जाताना मैफिलीसाठी लागणारी संगीताची वाद्ये रेल्वेतून विनासायास सुरक्षितपणे नेण्यास सुलभता होती. दरवर्षी ते म्हैसूरला देखील दसऱ्याच्या वेळेस दरबारात मैफिलीसाठी रेल्वेतून जात असत. त्यांना पूजनीय अश्या हुबळीच्या सिद्धारूढ स्वामीजींच्या दर्शनासाठी देखील ते मिरजेहून रेल्वेतूनच जात असत.

पुण्या-मुंबईकडे जाताना मी १०-१२ वेळातरी मिरजेहून गेलो आहे. पण कधी मिरजेत उतरून गाव पाहण्याचा योग आला नाही. ह्या वेळेस मी आणि माझी पत्नी दोघांनी मुद्दाम तेथे उतरून मिरजेची प्रसिद्ध सितारवाले गल्ली पाहायला गेलो. सुफी संत सय्यद शमसुद्दीन साहेब यांचा उरूस देखील सुरु होता. त्या दर्ग्याच्या जवळच करीम खान यांची समाधी आहे. दिल्लीच्या सुफी संत निजामुद्दीन यांच्या दर्ग्याजवळ हिंदुस्तानी संगीताचे पितामह अमीर खुस्रो यांची समाधी जशी आहे तसेच. संगीत तसे पहिले तर परंपरावादी मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे. पण हिंदुस्तानी संगीताची मुस्लीम गायकांशिवाय करूच शकत नाही. पण सुफी संतांनी संगीताला ईश्वर आराधनाचे मध्यम बनवले. दर्ग्यात नवस फेडण्यास येणाऱ्या सर्वधर्मीय लोकांना या सुफी संतांनी काव्य आणि संगीतातील रागांनी सुद्धा जोडले. साधारण पणे दर्ग्यात  राज दरबारातील पिढीजात कव्वाल गात असत, पण एखाद्या सुफी संताच्या उरुसात, राज्यातील गायक मंडळी येऊन एखाद्या गायकाच्या स्मृती प्रीत्यर्थ गायन करण्याची प्रथा हि मिरजेतच आहे. मिरजेत अब्दुल करीम खान यांच्या बरोबर भातखंडे, पलुस्कर, हिराबाई बडोदेकर यांसारखे गायक राहत असत.

आम्ही उभयंता पती पत्नी मिरज स्टेशन वरून दर्ग्याकडे चालत निघालो. रस्ता धुळीने माखला होता, वर ऊन मी म्हणत होते. रस्त्याच्या कडेला सफरचंद केळी द्राक्षे अशी फळे विकणाऱ्या बायका बसलेल्या. आजूबाजूला मिरज संस्थानाच्या राजा महाराजांनी बांधलेल्या उभारलेल्या इमारती नजरेस पडत होत्या. नुकतीच शिवाजी महाराजांची जयंती होऊन गेली असावी, त्यानिमित्त लावलेले भगवे झेंडे अजून होते. शिवाजी महाराज हे मराठ्यांचा हृदयात अस्मिता होती आणि, मोघल, आदिलशाही यांच्या विषयी त्यांच्या हृदयात द्वेषभाव भरून होता, असे असले तरी संगीताचा विषय निघाला कि हा सगळा द्वेषभाव मनातून काढून, ह्या मुस्लीम गायकांना हे आपल्या  हृदयात सामावून घेत, आणि त्यांची एखाद्या देवासमान वागवत असत.

दर्ग्याला जाणाऱ्या त्या रस्त्यावर एका चौकात कोपऱ्यात करीम खान यांचा अर्धपुतळा दिसला. छोटाशी चेहरेपट्टी, गळ्यात घड्याळाची साखळी गळाबंद कोटावर अडकवलेली दिसत होती. नाकही तसे लहानच, एकूणच चेहरेपट्टी आणखीन छोटी करणारी डोक्यावरील जरीच्या रुमालाची फेट्यासारखी बांधलेली पगडी दिसत होती. चित्राखाली काही नावे दिसली, ती मी वाकून वाचली. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना केसकर हे नभोवाणी मंत्री होते तेव्हा झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात हिराबाई बडोदेकर, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, कपिलेश्वरी, भीमसेन जोशी ह्या लोकांनी भाग घेतला होता असे दिसते. कपिलेश्वरी यांनी करीम खान यांच्या समाधीच्या अमृतशिळेची तयार केली होती. सवाई गंधर्व, केसरबाई केरकर, रामभाऊ रुकडीकर, सुरेश माने, हिराबाई बडोदेकर हे सर करीम खान यांचे शिष्यगण. त्यातील शेवटचे दोघे त्यांची मुलेच होती. सवाई गंधर्व हे भीमसेन जोशी, आणि गंगुबाई हनगल यांचे गुरु होते.

एकोणविसाव्या शतकात बांधलेला तो दर्गा तसा मोठाच होता. गोलाकार आवार असलेल्या त्या दर्ग्यात विविध ठिकाणाहून आलेले लोकं होते. दर्ग्यात सगळीकडे धूपाचा धूर(लोहबान), तसेच स्वयंपाक घरातील चुलीचा देखील धूर, आणि त्यात मसाल्यांचा वास मिसळून पसरला होता. दर्ग्याच्या समोरच विविध संप्रदायाशी, शाखांशी निगडीत फाकीरांचे आखाडे दिसत होते. काळे वस्त्र धारण केलेल्या रफाई फकिराने, आम्ही दोघे बाबा बुदानगिरीच्या आसपासचे आहोत हे समजल्यावर चहा दिला. दर्ग्यात येऊन तेथील संगीत ऐकत, समाधीवर फुले साखर वाहून, धूपकुंडातील राख नेणारे भक्त ही तर नित्याचीच बाब होती. पण विशेष वाटले ते असे कि मिरजेच्या सीमेवरील लिंगायत समजातील लोकं तेथे येऊन फातेहा अदा करत होते(इस्लाम धर्मातील कुराणातील वचने म्हणत करावयाचा एक विधी). हा लिंगायत समाज तसा विशेष जातीभेद न मानणारा. अशी लोकं दर्ग्यात येऊन त्यांच्यासारखेच धर्मातीत असणाऱ्या सुफीसंतांची पूजा करतात हे वैशिष्ट्यपूर्ण वाटले.

दुपारी ऊन उतरल्यावर मिरजेतील संगीतवाद्ये तयार करणाऱ्या सतारवाली गल्लीत गेलो. भारतात लखनौ आणि कोलकाता व्यतिरिक्त अशी संगीताची वाद्ये तायार करणारे तिसरे शहर म्हणजे मिरज. ह्या गल्लीचे खरे नाव महात्मा गांधी रस्ता हे होय. दर्ग्यापासून खालच्या बाजूला असलेल्या शनिवार पेठेतील हा भाग. भारतातील मुस्लीम समाज हा खालच्या जातीच्या लोकांनी बनला आहे. त्यांच्यापाशी पारंपारिक अशी शेतजमीन नाही. त्यामुळे ते एका गावी अथवा जागेत कायम राहत नाही, मिळेल ते काम करतात, हस्त कौशल्याचे, कारागिरीचे काम करतात, त्यामुळे देखील त्यांना अभद्र समाज मानले गेले असावे. मिरजेत देखील हेच झाले असावे. मिरजेतील सतार आणि इतर वाद्ये बनवणारे हे असे लोक असावेत.

सतारवाली गल्लीत असलेल्या विविध कारखान्यातून वीणा, हार्मोनियम, तानपुरा,  सतार, दिलरुबा, बीन, सरोद, सूरबहार; तबला, तबल्याचा डग्गा, ढोल, ढोलची असे सगळे विकण्यास ठेवलेले दिसत होते. भजन मंडळीकरिता असलेल्या वीणाच अधिक प्रमाणात दिसत होते. ह्या वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहेत. कीर्तनकार मंडळी गळ्यात अश्या वीणा अडकवून अभंग गात भजन, कीर्तन करतात. जमिनीवर, तसेच धुळीने माखलेल्या कपाटात दुरुस्तीसाठी आलेली भुंडी, तारा तुटलेल्या अवस्थेतील, कातडी फाटलेल्या, निसटलेल्या परिस्थितील ती विच्छिन्न वाद्ये दिसत होती, जशी काही सरकारी रुग्णालयात खाट न मिळाल्यामुळे जमिनीवरच पसरलेल्या रुग्णांसारखे ते दृश्य दिसत होते. दुकानाच्या वरच्या भागात असलेल्या माळ्यात त्या कुशल कामगारांचा संसार थाटलेला दिसत होता. घर आणि दुकान एकत्र असल्यामुळे वाद्ये तयार करण्याच्या, दुरुस्तीच्या कामात घरातील सगळेच हातभार लावत असताना दिसत होते. लाकूड कोरण्याच्या, तार बसवण्याच्या, कातडी बसवण्याच्या कामात, तसेच वाद्ये नीट जुळले आहे कि नाही, वाजताहेत कि नाही हे तपासण्याच्या कामात मग्न होते.

‘हे काम तुम्ही कधीपासून करत आहात?’ असे मी त्या लोकांना विचारले. त्यांना कधीपासून ते नक्की सांगता येईना.बहुतेक ७-८ पिढ्यांपासून हे काम असावे असे ते म्हणाले. एक मतप्रवाह असा आहे कि उत्तर भारतातून आलेल्या सतारवाले लोकं येथे आले, आणि त्यांनी मग स्थानिक  लोकांना हि कला शिकवून गेले. हाजी शौकत अली यांच्या दुकानात त्यांच्या आजोबांचे मोठेसे छायाचित्र लावलेले होते. माम्मुडी कृष्णराज वाडियार यांच्या सारखी जाडजूड मिशा असलेल्या, डोक्यावर पगडी असलेल्या असे ते होते. त्यांनी नवीन तंतूवाद्य निर्माण केले असे खाली नमूद केले होते. व्यवसाय कसा चालला आहे हे विचारता राज इब्राहीम उत्तरले, ‘आम्ही वाद्ये तयार करतो, पण देवच खरेदीदारांना आमच्याकडे पाठवतो. कलाकार ती वाद्ये वापरून कलेचे सृजन करतो. त्यांना गौरव प्राप्त होते, ते बरोबरच आहे. त्याच बरोबर आमच्यासारखे जे वाद्य तयार करतात त्यांना सुद्धा समाजात मान मिळायला हवा. आम्ही देखील देशाचे नाव उज्ज्वल करत असतो. सरकारने कर माफ केले आहेत, हे खरे आहे. ह्या कामातून जीवन जगता येऊ शकते. पण जास्त प्रगती होऊ शकत नाही. मिरजेत एखादा गवंडी दिवसा ५०० रुपये कमावतो. आम्ही एखादी सतार वीणा दहा-एक दिवस राबून तयार करतो, ती पंधरा हजारांना जाते. मजुरी ३०० रुपये जाते. त्यामुळे आमची मुले रिक्षा चालवणे पसंत करतात. परंपरागत हा जो कला कौशल्याचा व्यवसाय त्यांना करायचा नाही.’ तुमच्यात सर्वात चांगला कारागीर कोण असे विचारले असता शराफत भाई हे नाव घेतले. पण ते या जगात आता नाहीत. या सतारवाल्यांना बहुतेक सर्व गायकांची नावे माहिती होती. कर्नाटकाचे बालेखान हे आपल्या कुटुंबासोबत उरुसाला येऊन गायनसेवा करून जातात हे नमूद केले.

‘वाद्यांच्या दुरुस्ती मध्ये फायदा अधिक असेल’, असे विचारले असता ते म्हणाले, ‘बरोबर आहे, तार तुटली तर कलाकारच ती लावतात, पण तुंबा जर निकामी झाला तर आमच्याकडे यावे लागते, कातडे खराब झाले, फाटले तर ते आम्हालाच बदलावे लागते’. पण कलाकार आणि संगीत विद्यालयाच्या ठिकाणी, त्या त्या गावी, वाद्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारी सगळी उपकरणे, हत्यारे घेऊन जावे लागते. मोठमोठ्या संगीत महोत्सवात ह्या कारागिरांना कार्यक्रम संपेपर्यंत ठेऊन घेतले जाते. पण मोबदला अतिशय कमी दिला जातो. कातडे, तारा, लाकूड हे त्यांचा प्रमुख कच्चा माल. माझ्या पत्नीने ह्या सर्व कामात महिलांचा सहभाग किती असे विचारले. सतारवाल्यांनी बांबूच्या खिळ्यांकडे बोट दाखवून सांगितले कि हे सतारीच्या दांडीला डोक्याला खिळे बसवण्याचे काम महिला करतात. पुरुषांचाच ह्या वाद्य तयार करण्याचा कामात महिलांचा सहभाग विशेष नसताना, हे काम महिलाच करतात हे अर्थपूर्ण आहे.

वाद्यांच्या विविध भागाची नावे तर वेगळीच होती-तुंबा, तार, गुटी, तबकडी, शिगडा, जवारी. वाड्याच्या छातीवर तारांचे जाळ्याला टेकू देण्याचे काम जवारी करते, आणि ते हाडापासून बनवले जाते. तत्क्षणी मला शरीररचने सारखेच संगीत वाद्याची रचना असते हे सांगणारी एक रूपककथा आठवली. यल्लमा हिने कार्तवीर्यार्जुनाच्या शरीरापासून आणि मरळूसिद्ध कोल्हापूरच्या माई देहापासून वाद्य तयार करत असे सांगणाऱ्या काही गोष्टी आहेत. युद्ध मध्ये शत्रूला मारून त्यांच्या शरीरापासून वाद्य करून ते वाजवण्याची विजयकथा देखील आहे. महात्मा बसवेश्वर आपल्या अवताराच्या शेवटी आपल्या डोक्यावापासून वाद्याचे डोके, आपल्या नसांपासून तारा करून वाद्य करावे अशी कुडल संगमाजवळ प्रार्थना जात. देहाच्या अवयवांचे वेगवेगळे भाग करून वाद्य तयार करण्याचे वर्णन करणारे एक वचन देखील आहे.

या संगीत वाद्यांच्या विविध भागांचा कच्चा माल देशातील विविध येथे भागातून येतो. राजस्थान आणि लखनौ येथून जवारी तयार करण्यासाठी लागणारी उंटाची हाडे येतात, मुंबईहून तारा येतात, बल्लारी येथून लाकूड येते, केरळमधून हत्तीचे दात, पंढरपूर, अक्कलकोट येथून दुधीभोपळे येतात. लाकूड, तारा, हाडे आदी कुठून कुठून येतात, कुठे मिरज आणि कुठे संगीत? सगळे आश्चर्यचकित करणारे आहे. अशाच काहीश्या परिभाषेत अल्लमप्रभू आपले आणि गुह्येश्वर आपल्या वचन साहित्यात विवरण करत, ह्या वाद्यकारांच्या जोडीला मिरजेला आलेले दिसतात. दुकानांच्या जोत्यावर वाळलेले मोठमोठे दुधीभोपळे टांगलेले दिसत होते. आमच्या मलेनाड(सह्याद्री) येथील घरांवर जसे रंगीबेरंगी काकड्या टांगलेल्या असतात, तसे ते दिसत होते. हे भोपळे भीमानदीच्या तीरावर पिकतात. हे भोपळे सांबारात घालून खाल्यावर, पोट भरवून टाकणारी, तृप्त करणारी हि भाजी, कलाकारांच्या-साधकांच्या हातात असलेल्या वाद्च्या रूपाने, नादाने, श्रोत्यांचे कान देखील तृप्त करते. गुरुपंथात सामान्य व्यकी दीक्षा घेऊन साधनेत असे असाधारण रुपांतर  होण्यास आणि हे सामान्य भोपळे वाड्यात रुपांतरीत होण्याच्या प्रक्रियेत संबंध आहे. कच्च्या मातीचे घटवाद्यात होणारे रुपांतर देखील असेच आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या वचनात कायक म्हणजे हा घट होय. वाद्य आणि शरीराचा संबंध काही जगातील संस्कृतींमध्ये आहे.

चित्रपट पाहताना गाणे जे आपण ऐकतो पाहतो, त्यावेळेस पडद्यावरील कलाकारच फक्त दिसतात, पण त्यामागील अनेक जन जसे, ज्या गीतकाराने गीत लिहिले आहे ती व्यक्ती, संगीत देणारी व्यक्ती, वादन करणारे वादक आपल्या नजरेस पडत नाहीत. पूर्वीच्या काळात कर्नाटकात दान देऊन विविध कार्य करणाऱ्यांचे कन्नड शिलालेख त्यांच्या नावासहित आपल्याला आढळतात. पण ते कोरणाऱ्या लोकांची नावे दिसत नाही, दगड कोरणाऱ्या शिल्पींची नावे कुठे इतिहासात दिसत नाहीत. संगीत विश्वात कलाकारांची चरित्रे आहेत. पण त्यात अश्या वाद्य निर्मिती करणाऱ्या कारागिरांचा सहसा उल्लेख मिळत नाही. आपण खातो ते धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव जसे आपल्याला माहिती नसते, आपण परिधान करत असलेल्या कपड्यांचा धागा विणणाऱ्या विणकराचे नाव जसे आपल्याला माहिती नसते, तसेच हे आहे.

महात्मा बसवेश्वरांच्या वचनातील कुडलसंगम हे वाद्य बनवणार्या कुशल कारागीरच नव्हता, तर त्या वाद्याला पोटाशी धरून बत्तीस राग गाणारा गायक देखील होता. आता बहुतेक वाद्य तयार करणारे कारागीर गायन, वादन करत नाहीत.  तसेच गायन वादन करणारे जवळ जवळ सर्वच जण वाद्ये तयार करत नाही. असे असले तरी ह्या कारागिरांनी तयार केलेल्या वाद्यामधून निघणारा नाद, आणि वादकाच्या अथवा गायकाच्या पोटातून जन्मणारी गायन वादन कला या दोघांच्या मुळेच संगीत तयार होते. हे संगीत ऐकून रसिक जन आपल्या कानात, हृदयात साठवतात. ह्या त्रिकुटात म्हणजे कारागीर-गायक/वादक-रसिक श्रोता जे आहेत, ते वेगवेगळ्या धर्मातून, प्रदेशातून, संस्कृतीमधून आलेले असतात. संगीतक्षेत्रात असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण बहुत्व अथवा धर्मातीतता आहे. मिरजेतील प्रसिद्ध दवाखाने देहाचे आजार, दुखणे बरे करतात, तर सुफी संताचा दर्गा, संगीतातील महान कलाकारांची कला, आणि महात्मा गांधी रस्त्यावरील या सतारगल्लीतील वाद्य तयार करणाऱ्या कारागीर आणि त्यांची वाद्ये हि माणसाच्या मनाला बरे करते, शांत करते, असे वाटते. सितारवाला आपल्या आर्थिक विवंचनाचे निवेदन संपवून, शांत चित्ताने म्हणाला, ‘आम्ही कारागीर म्हणजे, घरच्या एखाद्या मुलीला वाढवून, तिचे अलंकरण करून, कोणा एका परिचिताच्या हाती देणाऱ्या माता पित्यांसारखे आहोत. ती नव्या घरी जाऊन ते उज्ज्वल करते. त्याच प्रमाणे आमचे वाद्य कलाकाराच्या हातात जाऊन अनाहत नाद निर्माण करते. याची आठवण आम्हाला नेहमी मनाला सार्थकता आणते’.