माझे आजोळ निंबाळ

माझे आजोळ असलेले निंबाळ हे गाव कर्नाटकातील विजापूर जवळचे. सोलापूर पासून ८० किलोमीटरचे अंतर. आम्ही सर्व जण शाळेच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत निंबाळला जायचो. पुण्यापासून सोलापूरपर्यंत कुठलीतरी एक्सप्रेस ट्रेन. त्यानंतर, दक्षिण मध्य रेल्वेचे मीटर गेज सूरु व्हायचे. सोलापूरहून निंबाळपर्यंतचे अंतर कापायला ४ तास लागायचे. पहाटे पहाटे सोलापूरवरून मीटर गेज वरील एखादी कोळश्याचे इंजिन लावलेली गाडी पकडायची. ती सकाळपर्यंत निंबाळला पोचायची. त्या गाडीतला पहाटेच्या गारव्यात केलेला प्रवास अतिशय रमणीय असे. कोळश्याच्या इंजिनात एक विशिष्ट आवाज, धूर, त्याची ती सावकाश गती. हळू हळू उजाडायला सुरवात झाल्यानंतर दिसणारे दृश्य. गाडीत ईंडी किंवा होटगी स्टेशन आले की हाळी देत पेढे विकणारे पेढेवाले. मराठी बोलणे कमी कमी होत आता कन्नड भाषा ऐकू येवू लागे.

आम्ही निंबाळला येणार याची वर्दी पोस्टाने पत्र पाठवून आधीच कळवले असायचे. त्या बरहुकुम आम्हाला घरी न्यायला निंबाळ स्टेशनवर एखादी बैलगाडी आलेली असायची. मग सकाळी सकाळी आम्हा सगळ्याची स्वारी बैलगाडीतून तासाभराच्या प्रवासासाठी निघायची. गाडीवानाबरोबर गप्पा होत. वाटेत एक ओढा लागे, बैलगाडीचे बैल त्यातील पाणी पिण्यास हमखास थांबत. पुढे गेल्यावर एक वाट आमच्या शेताकडे जाण्यास फुटे, तर एक वाट गावात आमच्या घरी जाई. सोलापूरच्या पुढचा कर्नाटकातील हा भाग तसा दुष्काळीच. पठारी प्रदेश, माती पांढरी. बैलगाडीतून त्या कच्च्या रस्त्यावरून घरी जाताना आम्ही त्या धुळीने अगदी माखून जात असू. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती, बांधावर मोठ-मोठाले निवडुंग साथ शेवटपर्यंत करत.

गावात शिरल्या-शिरल्या किंबहुना काही अंतरापासूनच आजीच्या घराचे दर्शन होवू लागे, घराबाजुला असलेले हुडे दिसू लागत. आजीचे घर जमिनीपासून थोडे उंचावर होते. घर किती जुने होते हे नाही सांगता येत. पण आजी/आजोबाच्या आधीच्या पिढीने किंवा त्या आधीही ते बांधले गेले असावे. घराला एखाद्या छोटेखानी भुईकोट किल्ल्याचे स्वरूप होते. घरामध्ये परंपरागत पाटीलकी होती. आजोबांचे आडनाव देसाई, म्हणजे गावचा प्रमुख. पूर्वी विजापूरच्या भागात आदिलशाही राजवट होती. संरक्षणाच्या दृष्टिने असेल, पण, घर, आधी म्हल्या प्रमाणे थोडेसे उंचवट्यावरच होते. दोन्ही बाजूला मोठाले हुडे उभे होते. त्या दोघांच्या मध्ये एक सलग २५-३० फुट उंचीची भिंत असावी पूर्वी, कारण भिंतीचे अवशेष दिसायचे. डावीकडचा बुरुज आणि भिंत यातून चढावरून एक वाट गेली होती ती सरळ दारात जाई. भिंतीच्या उजव्या बाजूला एक दगडी कमान होती, जिला पूर्वी दरवाजे होते. पूर्वी तो मुख्य दरवाजा असावा.घर, ती संरक्षक भिंत, हुडे(खाली १० फुट दगडी बांधकाम होते) सर्व पांढऱ्या मातीने बांधले गेले होते. घरासमोर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला कट्टे होते. त्याच्या बाजूला प्रामुख्याने गायी आणि त्यांची वासरे बांधली जायची. कट्ट्यावर उभे राहिले की लांब दुरवर रेल्वे जाताना दिसे, साधारण दुपारी बाराच्या सुमारास एक गाडी जाई, तिला टपाल गाडी म्हणत. कोळश्याच्या इंजिनाचा आवाज, शिटीचा आवाज खोलवर ऐकू येई. मग आही सर्व मुलं कट्ट्यावर चढून ती सावकाश जाणारी रेल्वे पाहत असू.

घर म्हणजे चौसोपी वाडाच होता. मध्ये मोकळी जागा, चारी बाजूने खोल्या. आत शिरल्या शिरल्या डाव्या बाजूला आजोबांची बैठकीची, तसेच आल्या गेल्याची पाहुण्याची वर्दळीची खोली. उजव्या बाजूला असलेल्या खोलीचा गोदामासारखा वापर होई. ती कायम बंद असे. उन्हाळ्यात आंब्यांच्या अड्या लावल्या जात असत. मग पुढे अंगण. त्यात उजव्या बाजूला खाली जायला पायऱ्या होत्या. असे म्हणत की अंगणाच्या खाली भुयार किंवा शस्त्रे ठेवण्यासाठी गुप्त जागा होती, जी आम्हाला कायमच गुढ वाटे. त्यानंतर आडवी मोठी खोली, जी सर्वात जास्त वर्दळीची असे. सकाळच्या नाश्ता, जेवण, दुपारची वामकुक्षी किंवा रात्री काही मंडळी तेथे झोपत असत. तेथेच घरातला एकुलता एक आरसा खुंटीवर लटकवलेला असे. डावीकडून ती मोठी खोली ओलांडून गेले की स्वयंपाकघर आणि देवघर. उजव्या बाजूला एक अंधारी खोली-जी बाळंतीणीची खोली. पलीकडे मोठे न्हाणी घर. त्याच्या मागे तुळशी वृंदावन, परसबाग आणि मग परत पांढऱ्या मातीची भिंत. सारे घर शेणाने सारावलेले. घराच्या भिंती जाडच जाड अश्या होत्या.

20150208_105004 20150208_105136

सकाळी उठल्या उठल्या कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या आवाज येई, जो आमचा मामा ते काम करी. तो पूर्वी सैन्यात होता. गुरांना देण्यासाठी कडबा असे घरी, तो ते कापून गुरांना वैरण/पाणी देई. आम्हीही त्यात लुडबुड करत असू. काही वेळाने गुराखी येवून गाई चरायला घेवून जाई. घर सारवायचे असेल तर कोणी तरी आले असे. काही मंडळी गावातल्या विहिरीवरून पाणी आणत असत. मग आम्हीही त्यांच्यावारोबर विहिरीवर पाणी उपसायला मोठीच्या मोठी दोरी घेऊ जात असू. न्याहरीला ज्वारीच्या लह्याच्या पीठाचे गोड किवा तिखट असे बनवलेले असे. मग आमची स्वारी शेताकडे, विहिरीवर पोहायला. १०-१२ जणांचे टोळके २-३ मैल लांबवर असलेल्या शेताकडे जात असू. विहिरीवर मनसोक्त पोहत असू-सगळी धमाल. मग दुपारी घरी आल्यानंतर इतरांबरोबर पत्ते, सोंगट्या वगैरे खेळल्यानंतर जेवण. उन्हाळ्यात आमरसाचा बेत असे बऱ्याचदा. घरचीच गावरान गोटी आंबे अतिशय रसाळ असत. दुपारी केव्हा तरी मामा गुळाचा चहा करून पीत असे, आम्हालाही तो थोडा चाखायला देई. सर्व जण पहुडलेले असताना आम्ही मुलं मात्र घरात किंवा बाहेर खेळत असू. मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढे काही कडूलिंबाची मोठाली झाडे होती. त्या झाडावरचा डिंक काढण्याचा उधोग करत असू. पलीकडे एक मारुतीचे छोटेसे मंदिर होते. मारुतीची पंचमुखी उभी तांत्रिक स्वरुपाची मूर्ती आहे त्यात. काही वर्षापूर्वी तिचा जीर्णोद्धार केला गेला. तेथे सावलीत खेळत असू. दुपारी कधी कधी भुईमुग सोलण्याचे, चिंच सोलण्याचे किवा जात्यावर छोटे मोठे दळणकाम चालू असताना ‘हातभार’ लावायचो.

कधी कधी दुपारी घरापासून जवळच असलेल्या शंकराच्या एका जूनपुराण्या मंदिरात जायचो. ते चालुक्यकालीन मंदिर पूर्णपणे दगडी, आणि उत्कृष्ट शिल्पं असलेले होते. उन्हाळ्यातल्या दुपारच्या धगीत तेथे तुलनेने गारवा असे. भव्य नंदी, प्रवेशदारावर हत्ती, पंचायतनातील इतर मूर्ती, काही भग्न आणि विखुरलेली शिल्पं दिसत असत. बाजूलाच एक दगडी चौकोनी आणि पायऱ्या असलेली मोठी विहीर होती. त्यावेळेपासूनच भारतीय पुरातत्व विभागाकडे त्याची जबाबदारी आहे.

20150801_171631

संध्याकाळच्या सुमारास गुरं परत येत असत. मग त्यांची वासरांना पाजण्याची धांदल, मामी किंवा आजी एखाद-दुसऱ्या दुभत्या गाईचे दुध काढी. ते सर्व पाहायला आम्हाला खुपच मजा येई. हळू हळू अंधार पडे. त्या वेळी घरात वीज आणि दिवे नसत, तर कांदिले असत. घरातल्या बायकांची त्या कंदिलाची काच रांगोळीने पुसून काढण्याची, तसेच वात-बाती ठिक करून ते लावण्याची घाई होत असे. मग आम्ही अंगणात मामाचा एक छोटासा रेडिओ होता तो त्याच्या बरोबर ऐकत बसू, तर कधी गप्पा-गोष्टी करत असू. कधी कधी आम्ही, चुलीवर आजी किंवा मामी संध्याकाळचा स्वयंपाक करत असताना तेथे लुडबुड करायचो. रात्रीच्या जेवणानंतर अंगणात मोकळ्या हवेत, गोधड्यावर आडवे पडून. वर निरभ्र आकाश न्याहाळत, चांदण्या मोजत, काही तरी गप्पा-गोष्टी करत झोपी जात असू.

gurudev-ranade-nimbal

महिना पंधरा दिवस अशी सुटी घालवल्यानंतर मग परत जाण्याचा दिवस येवून ठेपलेला असे. परतीचा प्रवास सुरु होई, बैलगाडीने परत निंबाळ रेल्वे स्टेशनवर सारा लवाजमा घेवून येत असू, केव्हा तरी परत जाताना वेळ असलाच तर निंबाळ रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या गुरुदेव रानडे यांच्या आश्रमात जाऊन येत असू. तेथे बरीच भक्तमंडळी येत असत, अजूनही येत असतात. त्यानंतर परत रेल्वेने सोलापूर, आणि मग पुणे असा प्रवास करून घरी परत असू. अश्या आमच्या आजोळच्या ह्या सर्व आठवणी मनात रुंजी घालत असताना परतल्या नंतर शाळेत ‘निकाल’ लागलेला असे…आणि परत नेहमीच्याच शाळा/अभ्यास अश्या व्यापात पुढल्या सुटीची वाट पाहत गुरफुटून जात असू.

Leave a comment