जीवाची मुंबई

पूर्वीच्या काळी गावातून, अथवा तालुक्याच्या ठिकाणाहून मुंबईला गेले की अगदी वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे होई. मोठे शहर, ट्राम, मोठमोठ्या जुन्या इमारती, चाळी, गर्दी वगैरे पाहून लोकं अचंबित होत. चार दिवस हे लोक मुंबईत येऊन या सगळ्याची मजा घेऊन परत गावी जाऊन आपल्या राम-रगाड्यात गुंतून जात. ह्या सर्वाचे निर्देशक म्हणून जीवाची मुंबई करणे हा वाक्यप्रचार देखील प्रचारात आला. आजकाल मुंबईला जाणे हे काही अप्रुपाची गोष्ट राहिली नाही. डेक्कन क्वीन सारख्या रेल्वेतून, द्रुतगती मार्गावरून चाकरमाने आणि इतर दररोज पुणे मुंबई पुणे असा प्रवास करतात. मीही आपल्या सर्वांप्रमाणे कित्येकदा या ना त्या कारणाने मुंबईला गेलो आहे. कामानिमित्त, किल्ले पाहायला, तसेच नेहमीचे फिरायला म्हणूनही गेलो आहे. मुंबईचे, विशेषतः दक्षिण मुंबईतील, जुन्या मुंबईचे आकर्षण  फिरण्यासाठी आकर्षण कमी होत नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईचा पोवाडा, मुंबईचे वर्णन सारखी पुस्तकांतून, आणि इतर कथा/कादंबऱ्यामधून आपल्याला थोडाफार १९व्या, २०व्या शतकातील मुंबई कशी होती हे समजते. तसेच जुन्या चित्रपटांमधून देखील तीचे दर्शन होतेच. उदाहरणादाखल, गिरीश कर्नाड यांनी त्यांच्या आत्मचरित्रात मुंबई वास्तव्याचा उल्लेख केला आहे. ते एके ठिकाणी म्हणतात, की मुंबईचा नकाशा पाहिला तर असे वाटते की एखादा अरबी माणूस समुद्रात आपले बाहू पसरून उभा आहे.

परवा असेच काहीतरी निमित्त होऊन मुंबईला गेलो, थोडासा वेळ होता म्हणून जीवाची मुंबई करण्याचा बेतही आखला. आमचा पहिला पाडाव नव्या मुंबईत नेरूळ येथे एका नातेवाईकांकडे होता. मुंबईत जुन्या गोष्टीबरोबर दरवर्षी काहीना काही तरी पाहण्यासारख्या नवीन गोष्टींची भर पडतच जात असते. १२-१५ वर्षांपूर्वी IMAX theater, fly-overs, द्रुतगती मार्ग, INS Vikrant Museum(जे नामशेष झाले आहे आता), Essel World, Water Kingdom नवीन होते. ह्या वेळेस Sea Link, Metro Railway, नुतनीकरण झालेले Royal Opera House, गोराईचा बौद्ध धर्मीय Golden Pagoda, आणि अजून काही गोष्टी वगैरे गोष्टी डोक्यात होत्या. त्यादिवशी संध्याकाळी मी नेरूळहून नवीन Eastern Freeway वरून थेट Royal Opera House येथे एका कार्यक्रमासाठी म्हणून गेलो. त्याबद्दल येथे सविस्तर वेगळेच लिहिले आहे.

त्या नंतर रात्रीची मुंबई पाहिली. कशी? रात्रीची मुंबई पाहण्यासाठी MTDC ने छान सोय केली आहे असे ऐकले होते. Gateway of India येथे त्याची तिकिटे मिळतात, आणि नंतर Hornbill House/Wellington Fountain येथून सहल सुरु होते. त्यांच्या वरून खुल्या असलेल्या डबल डेकर बसमधून(Open Deck, नीलांबरी) रात्रीची जुनी मुंबई, तेथील इमारतींवरील रोषणाई पाहत तास दीडतास त्यांच्या गाईडची बडबड ऐकत फिरणे हा छान अनुभव आहे. त्यातील मुंबई महापालिका आणि सीएसटी इमारत(पूर्वाश्रमीची व्हीटी) यांच्या वरील रोषणाई पाहण्यासारखी असते. Western Railway चा मुख्य कार्यालयाच्या इमारतीवर त्यादिवशी रोषणाई नव्हती. जुन्या मुंबईच्या संस्कृतीचा, ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती यांचे जतन हा एक मोठा विषय आहे. तसेच मुंबईतील खाद्य भटकंती हा देखील एक मोठा विषयच आहे खरेतर. रात्रीच्या मुंबईची धावत्या भटकंती नंतर, आम्ही स्वाती नावाच्या गुजराती पदार्थ हे वैशिष्ट्य असणाऱ्या हॉटेल मध्ये विविध पदार्थांवर मस्त ताव मारला. रात्री परत अंधेरीला मुक्कामासाठी येताना जांभळ्या रंगात रोषणाई केलेल्या Sea Link वरून येताना एकदम मस्त वाटते.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बांद्र्यात फिरायचे होते. प्रथम तेथील जुने असे हळू हळू अस्ताला पावणारे इराणी हॉटेल Good Luck Restaurant मध्ये चक्कर मारली. जवळच चित्रपट चित्रीकरणासाठी प्रसिद्ध साले मेहबूब स्टुडिओ आहे, तो पहायचा राहून गेला. नंतर तेथील टेकडीवरील १०० वर्षांहून अधिक जुने Mount Mary Church पाहायला गेलो. त्यावेळेस नेमके तेथे प्रार्थना चालू होती, आणि त्या दिवशी Palm Sunday देखील होता. नंतर बांद्र्यातील जुना १६व्या शतकातील पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला(खरे तर त्याचे अवशेष) पाहिला. त्याचे पोर्तुगीज नाव Castella de Aquada. तो सर्व परिसर छान आहे. जवळच Taj Lands End नावाचे हॉटेल आहे. किल्लावरून Sea Link, आणि अर्थात समुद्राचे नयनरम्य दृश्य दिसते. पण ह्या भागाला Bandstand म्हणतात, का ते कळाले नाही. पूर्वी तेथे bands वाजवले जात असत की कोण जाणे.

नुकतेच असे वाचले होते की वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर कासवे दृष्टीस पडली, कचरा, घाणीविना असलेला किनारा, कासवे यांचे छायाचित्र देखील आले होते. बांद्र्यापासून जवळच होते, म्हणून पाहायला गेलो तर निराशाच झाली. तेथे दहा मिनिटे देखील थांबू शकलो नाही. त्यानंतर मोर्चा वळवला तो जुहू भागातील नाट्यक्षेत्रातील जुने, प्रसिद्ध असे ठिकाण म्हणजे पृथ्वी थिएटर पाहायला गेलो. पृथ्वीराज कपूरने सुरु केलेले, तसेच पुढील पिढीने जतन, संवर्धन केले हे नाट्यचळवळीतील महत्वाचे ठिकाण. त्या दिवशी सकाळी तेथे दुर्दैवाने काही नाट्यप्रयोग नव्हता, तो होता रात्री. त्यामुळे प्रयोग पाहण्यासाठी, तसेच NCPA देखील पाहण्यासाठी परत यावे लागेल!

शाहरुख खानचा मन्नत बंगला पाहिला तसेच अमिताभ बच्चनचे प्रतीक्षा, जलसा हे बंगले लांबूनच पहिले. दुपार होऊन गेली होती, जेवण करून मेट्रो रेल्वेने घरी जायचे ठरले होते. Gonguura नावाच्या हॉटेलमध्ये आंध्र प्रदेश/तेलंगणा स्टाईल जेवण केले, मेट्रोने जायचा कंटाळा आला, उन मी म्हणत होते, म्हणून सरळ रिक्षा करून घरी पोहचलो.

पूर्वीच गेटवे ऑफ इंडिया आणि परिसर, घारापुरीची लेणी(परवा ऐकले की तेथे नुकतीच वीज आली, म्हणजे इतकी वर्षे वीज नव्हती?!), Strand Book Stall(जे नुकतेच बंद झाले), Prince of Wales Museum, RBI Coin Museum, जहांगीर आर्ट गॅलरी, काला घोडा परिसर(कलेच्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स राहिलेच आहे पाहायचे), मुंबई विद्यापीठ वगैरे गोष्टी पहिल्या होत्याच. पण ह्या सर्व गोष्टी आणि आणखीन कितीतरी गोष्टी सवडीने, चालत चालत(Bombay Heritage Walks) परत पाहायला हव्यात. काही वर्षात मुंबईच्या समुद्रात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, स्मारक निर्माण होत आहे, तेही नक्कीच पर्यटकांमध्ये hit होणार यात शंका नाही.

अशी दोन दिवसांची जीवाची मुंबई करून, रात्री परत पुण्याला घरी पोहचलो आणि सहज टीव्ही लावला, तर एके ठिकाणी मुंबईमधील मराठी टक्का कमी होतोय, मेट्रो मुळे, तसेच परळ आदी भागातील जुन्या कापड गिरण्या नामशेष झाल्या आणि त्यांच्या जागेवर मोठमोठाल्या इमारती, मॉल्स उभारली गेली, या सर्वांमुळे देखील, त्यात हा टक्का कमी होण्यात आणखीन भर पडते आहे असा सूर असलेला रिपोर्ताज चालू होता. मी मनात म्हटले हा तर काळाचा महिमा!

Independence Seaport Museum

मी इतक्यातच कुठेतरी आय एन एस विराट(INS Viraat) या भारताच्या विमानवाहू युद्धनौकेबद्द्ल वाचले. ही युद्धनौका नौसेनेतून निवृत्त होऊन एक वर्ष झाले, आणि दुर्दैवाने पुढे तिचे काय करायचे हे ठरत नाही. आंध्र प्रदेश सरकारने तिचे विशाखापट्टण येथे संग्रहालय करून तिचे जतन करण्याचे तत्वत: मान्य केले आहे, पण अजून काही हालचाली नाहीत. ती सध्या मुंबईतील डॉक यार्ड मध्येच आहे. मुंबईला जेव्हा आय एन एस विराट(INS Vikrant) ही भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका जेव्हा संग्रहालयाच्या रुपाने होती, मी २००२ मध्ये तिच्यावर फिरून आलो होतो. खूप छान अनुभव होता. गेटवे ऑफ इंडिया बंदरातून छोट्या बोटीने आय एन एस विक्रांत(INS Vikrant) जवळ जाऊन, त्या युद्धनौकेवरील संग्रहालय पहिले होते. INS Viraat चे सुद्धा त्या प्रमाणे जतन होऊ शकते. आता INS Vikrant ही युद्धनौका आता संग्रहालय स्वरूपात देखील नाही, ती नामशेष झाली आहे, ही दुर्दैवाचीच बाब म्हणावी लागेल.

माझ्या गेल्या वर्षीच्या अमेरिका भेटी दरम्यान मला फिलाडेल्फिया मधील नदीकिनारी १९६१ पासून थाटात उभे असलेले अमेरिकन नौसेनेचे संग्रहालय पहिले. तेथे USS Olympia नावाची युद्धनौका आणि USS Becuna नावाची एक पाणबुडी संग्रहालय स्वरूपात अजूनही आहेत. त्याची या निमित्ताने आठवण झाली.

न्यू जर्सी आणि पेनसिल्व्हेनिया या दोन राज्यांच्या सीमेवरून, तसेच फिलाडेल्फिया पूर्व भागातून वाहणाऱ्या डेलावेअर नदीच्या किनाऱ्यावर हे युद्धनौका संग्रहालय उभे आहे. जवळच प्रसिद्ध दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसच्या नावाचा रस्ता आहे. संग्रहालयाच्या जवळ त्याच्या नावाने उभारेलला भला मोठा स्तंभ आपले लक्ष वेधून घेतो.

Christopher Columbus Pillar

मुख्य इमारतीमध्ये गेल्या गेल्या काही प्रदर्शने मांडली गेली आहेत ती दिसतात, जी विविध दालनातून दिसतात. त्यातील काही अमेरिकेच्या नौदल इतिहासशी निगडीत होती. त्यातील एक होते, Rescues on River या नावाचे. डेलावेअर नदी मधून माल वाहतूक सुरु झाल्यानंतर, झालेल्या दुर्घटना, त्यावेळेस झालेले मदतकार्य, बचावकार्य याला देखील एक इतिहास, तो त्यांनी मांडला आहे. त्याच भागात एक ठिकाणी भली मोठी लाकडी model ship दिसत होती. बहुधा ती लहान मुलांसाठी, जहाजे कशी बनतात हे समजावण्यासाठी असावी असे वाटत होते.

ही प्रदर्शने पाहून मग पुढे मी माझा मोर्चा आधी नदीत असलेल्या पाणबुडीकडे वळवला. मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष आतून बाहेरून अशी पाणबुडी पाहत होतो. पूर्वी फक्त इंग्रजी सिनेमातूनच पाहिलेल्या होत्या. ही पाणबुडी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला कार्यरत होती, विशेषतः जपानी नौसेनेच्या विरोधातील काही मोहिमा तिने पार पाडल्या होत्या. १९६९ मध्ये ती निवृत्त झाली आणि येथे आली. ही पाणबुडी आतून फिरून पाहताना रोमांचित होत होते. सुरुवातीला ती डिझेल इंजिन असलेली होती, नंतर electric battery वापरून ती बदलण्यात आली असे तेथील इतिहास सांगतो.

सर्वात शेवटी USS Olympia युद्धनौका पाहायला गेलो. ही बरीच जुनी अशी, एकोणिसाव्या शतकातील, अमेरिकन युद्धनौका आहे (१८९५-१९२२). ती अजून पाहायला मिळते हे आश्चर्यच आहे. ही नौका बरीच मोठी आहे. कप्तानाची खोली, ठिकठिकाणी लावलेली जुनी छायाचित्रे, इतिहास यांनी ती सजली आहे. तिने बऱ्याच मोहिमांत भाग घेतला आहे. पहिल्या महायुद्धात देखील ती सक्रीय होती.

तो दिवस माझा पूर्णपणे भटकंतीचाच होता. हवा मस्त होती, कोवळे उन पडले होते.. त्यादिवशी सकाळपासून चालत होतो मी. Independence Seaport Museum हे संग्रहालय सकाळी सकाळी पाहिले आणि त्यानंतर अख्खा दिवसभर एका मागून एक अशी आसपासची बरीच ठिकाणी पाहिली. पण त्या सर्वांबद्दल नंतर कधीतरी.

An evening in Philadelphia

ह्या वर्षी देखील अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरी जायला मिळाले. ही माझी गेल्या तीन-चार वर्षातील तिसरी खेप. ह्या खेपेस फिलाडेल्फिया येथे जाण्याआधी बोस्टन शहराची देखील वारी झाली. जानेवारी महिना म्हणजे आधीच अमेरिकेतील ह्या भागात, म्हणजे ईशान्य भागात, भयानक थंडी. त्यातच मी तेथे जायच्या आधीच काही दिवस जोरदार बर्फवृष्टी झालेली. विमानांची उड्डाणे रद्द झालेली, विमानतळावर सगळीकडे गोंधळ,ज्या बद्दल मी येथे लिहिले आहेच. ह्या खेपेस ३-४ दिवसच फिलाडेल्फिया मध्ये होतो. पण तेही विविध अनुभव देऊनच गेले. हे ऐतिहासिक शहरच असे आहे.

न्यूयॉर्क मध्ये जसे आशियायी आणि इतर कॅबवाले प्रसिद्ध आहेत, तसेच फिलाडेल्फिया मध्ये बांगलादेशी कॅबवाले बरेच आहेत. त्यांना हिंदी बोलता येते, मुंबई बद्दल हमखास विचारणा होते. ह्या खेपेसस एके दिवशी, मला एक कॅबवाला भेटला, जो बांगलादेशी नव्हता, पण हैती या देशाचा होता. हा देश म्हणजे अटलांटिक महासागरातील, अमेरीकेजवळ क्युबा, वेस्ट इंडीज बेटांच्या शेजारील देश. कॅबवाला बराच बोलका होता. कॅब शिरल्या शिरल्या त्याने बोलणे सुरु केले. तो फ्रेंच भाषिक होता, हैती मध्ये फ्रेंच राज्यसत्ता होती. मला फ्रेंच येत नाही हे सांगितल्यावर मोडक्या तोडक्या इंग्रजीत त्यांनी आपल्या तोंडाची पट्टी सुरु ठेवली. हातात मोबाईल होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हैतीबद्दल काही अनुद्गार काढले होते असे वाटते. तो अर्थातच चिडला होता. मोबाईलवर विडियो मला दाखवून काही सांगण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रसंग अमेरिकी जनतेची सर्वसाधारण भावना ट्रम्प प्रश्नाबद्दल सध्या आहे, याचेच ते सूचक होते की असे वाटून मला गेले. असो. मला सांगायचे होते ते वेगळेच. नमनालाच घडाभर तेल गेले. आता निरुपण सुरु करतो!

ब्लॉगचे शीर्षक आहे An evening in Philadelphia असे आहे. उघड आहे, की मी फिलाडेल्फिया मधील एका विशिष्ट संध्याकाळच्या विषयी लिहिणार आहे. आधीच्या दोन भेटीदरम्यान शहरात बरेच फिरलो आहे. ह्या वेळेस सवड नव्हती, थंडीदेखील जीवघेणी होतीच. पण ती संध्याकाळ वेगळीच होती. ऑफिसचे काम संपवून संध्याकाळी खरेदी करावी म्हणून एक-दोन जणांना बरोबर घेऊन बाहेर पडलो. शहराच्या पूर्व भागात डेलावेअर नदीच्या किनारी काही शॉपिंग मॉल्स वसले आहेत. तेथे गेलो. शहराचा हा भागच अतिशय वेगळा आहे. नदीपलीकडे न्यूजर्सी हे राज्य सुरु होते. पूर्व भागातील नदीकीनारच्या ह्या रस्त्याचे नाव Christopher Columbus Boulevard.

त्याच्या दक्षिण भागात हे मॉल्स वसलेले आहेत. तेथे थोडावेळ घालवून, अंधार पडल्यावर, मग त्या रस्त्यावरून उत्तर भागात  गेलो. त्याभागात नदीवरील प्रसिद्ध असा Benjamin Franklin Bridge आहे. अंधारात तो ब्रीज रोषणाई मुळे छान उजळून गेला होता.

सर्वात आधी रात्रीचे जेवण केले जवळच असलेल्या La Peg नावाच्या छानश्या हॉटेलमध्ये. हॉटेल बाहेरच्या आवारात दोन जण बर्फात शिल्प कोरत बदले होते. एक जुने पाण्याचे पंप हाउस हॉटेल मध्ये रुपांतरीत केले गेले होते, आतील संरचना पंप हाउस सारखी त्यांनी ठेवली होती. त्याच आवारात एक बहुधा प्रायोगिक असे नाट्यगृह आणि संस्था (जिचे नाव FringeArts) असावे असा भाग होता(कधीतरी नंतर परत तेथे जाऊन नाटक पहिले पाहिजे).

जेवणानंतर परत भटकायला बाहेर पडलो, बोचरी थंडी, वारा होताच. गर्दी अशी नव्हतीच. पुढे त्याच भागात Penn’s Landing नावाची एक जागा आहे. फिलाडेल्फिया शहराचा संस्थापक William Penn याच्या नावाने असलेला हा नदीकाठचा भाग. त्याच्याबाजुला असलेले Independence Seaport Museum, जे मी मागील खेपेस पहिले होते(अरेच्च्या, त्याबद्दल लिहायचे राहूनच गेले की!). नदीच्या किनारी आम्ही चालत होतो. नदी बऱ्यापैकी गोठलेली होती, बर्फाचे मोठमोठे तुकडे पाण्यात तरंगताना दिसत होते. नदीचा असा विशिष्ट असा वास येत होता.

थोडे जवळच भरपूर रोषणाई केलेली दिसत होती. उत्सुकता म्हणून पाहायला गेलो तर, बर्फावर स्केटिंग करण्याची ती जागा निघाली. जागेचे नाव होते Blue Cross Riverink. थंडीच्या दिवसांत तेथे Winterfest आयोजित केले जाणार होते असे वाटत होते. त्याची तयारी चालू होती. Ice Resurfacer नावाच्या यंत्राने ice rink leveling चे काम चालू होते. Ice skating ची मजा तेथे लुटता येणार होती. जवळच बांबू हाउस सारखे काहीतरी दिसले, ते होते Franklin Fountain Confectionery Cabin.

लोकांना बसंल्या साठी बांबूच्या खुर्च्या, तसेच शेकोट्या पेटवण्यासाठी fireplace देखील ठेवलेली दिसत होती.  तेथे थोडावेळ घुटमळत, न्याहाळत, निरुद्देश भटकत होतो. मी पूर्वी फिलाडेल्फिया मध्येच ice hockey match कधीतरी पाहिली होती, त्याची राहून राहून आठवण होत होती. काही वेळाने जशी रात्र चढू लागली, थंडी असह्य होऊ लागली, आणि आमचे पाय परत निघाण्यासाठी वळाले. तर अशी ही माझी थंडीतील रमणीय An evening in Philadelphia!

 

Where is my checked-in baggage?

Yesterday, I happened to stumble upon 9/11 movie United 93 during my post-dinner channel surfing pastime. Some of the opening shots of the movie are detailed around  airports of New York. Memories of my recent experience at that airport came fore. Fortunately, I don’t have to travel frequently. But I do get to travel sometimes. And yes, you guessed it right. You know what this blog is about. The title say it all. Many of us travel frequently, and in the lifetime of travelling, I am sure you would have faced situation where your checked-in luggage does not arrive with you or gets lost. This is exactly what happened to me during my last travel. It was international travel. I had a long nonstop, long-haul flight from Delhi to New York.

I have flown into New York few times in the past. This was the first time I was traveling by Air India, internationally, I mean. It was cold month of January. The last week of December last year, the entire north east region of USA experienced heavy snow dumping, snow storm. This was termed as bomb cyclone. Many flights all over USA were canceled, airports were shut down. The situation was pretty bad. And unfortunately, early January, when the situation was not normal, I had a travel itinerary which was to land me in New York on Jan 6. City of New York is served by 3 major international airports viz John F Kennedy international airport(JFK), LaGuardia airport(LGA) and Newark Liberty International airport(EWR). My Air India flight AI 101 landed on JFK right time, that is at 6.30 am, on January 6. Let me correct. Though it landed, it did not dock at the bay. Here is where the fun began.

Our plane landed smoothly on the tarmac right time. Like all other passengers, I also was pleasantly surprised on this on-time landing. I had a connecting flight to Boston in 3 hours. I gazed out of the window. The airport had lot of white and black snow lying around. This sight was clearly telling tale of preceding week’s bomb cyclone. We got our first announcement that our plane is in the queue for getting docked. And then we kept getting updates every now and then. The captain of the plane was a lady. You cannot believe, we were stranded off on the tarmac(taxiway) for more than 4 hours before we finally got an opportunity to disembark. The situation inside the plane was getting worse by every minute of the wait. Kids started crying, others who had connecting flight were getting impatient. Fortunately, we were allowed to use our phones, so folks who had someone waiting, were able to inform them.

I had a young man as my fellow passenger. He was a student from Ahmadabad in India and he was to start attending university for a spring course at Stevens Institute of Technology. He did not seem to be fazed by the situation. In fact, he was quite relaxed. He was talking to his folks back in India over WhatsApp video call, also reached out to his uncle in New York who was to come for receiving him. I was wondering how would I have reacted if I were him. This young generation is certainly different. To kill time, I kept chatting with him when our plane was standstill on the tarmac. Fortunately, the entertainment system was still working. Some of us switched to that once again. Other passengers around me were moving, not understanding what can they do. Airline also were done with food as well. Passengers were going to pantry areas in the hope of getting some tea, coffee and something for munch. I also joined them. The lady captain was appealing for patience and co-operation every now and then. She updated us that ours was not the only plane which was stranded. There were many behind us. It was turning out to be a nightmarish endless wait. So far, so near!

Finally, announcement came in, that aircraft stairs are getting docked to the flight for getting us down and out. There was a sudden commotion and chaos. The moment I stepped out of the airplane, the freezing cold air hit me. It was -15 degree Celsius outside, with bone-chilling wind and cold. I got down to the last step and I was asked hold on for next bus which was yet to get ready for the next batch of passengers to be carried to the terminal. Those few seconds were like hell for me. I was shivering and shaking top to bottom. I did not have anything except a pullover. Finally, I got inside the terminal, which was terminal 4 at JFK. After usual chaos at immigration check lounge, I went towards baggage claim area only to find that my baggage is not in there yet. And some more fun began!

It was belt#10 which was announced where the baggage could have been claimed. That is where all the AI 101 passengers had gathered together. There was no sight of anyone’s baggage. There were couple of Air India employees who were surrounded by passengers. The news traveled finally to us that baggage has not been yet offloaded from the plane and that the flight has moved to some other area to make space for other flights in the queue to get their passengers disembarked. No one knew when and where would our baggage be offloaded and when would we be able to get it. Most of my essentials, include warm clothes were in my checked in baggage. My next Delta Airlines flight to Boston had departed without us long time back. I was trying to find the next one to Boston, while trying to know about my checked-in luggage. I was running literally pillar to post.

It was getting clear that there were no flights out of JFK to Boston where I could be accommodated that day. I worked with my travel agency to get next morning’s flight and also got myself a hotel to stay near LaGuardia Airport in New York from where next day’s American Airlines flight to Boston was to fly out of. Now I was more focused on my luggage situation. After some time it was clear that we would not get our luggage that day. I was, of course, tired. hungry. It was well beyond post-noon already. There were two food shops on the ground floor of terminal 4 at JFK. Central Diner and Dunkin Donuts. Both of them were packed, and had huge waiting period. After long wait, finally, got hold of something to eat. I reached out to Air India staff again, who accepted the contact details, provided us with their phone numbers. And I left the airport, after spending more than 10 hours there, without my checked-in baggage wondering where it is.

To conclude the story, the luggage arrived at Boston Airport after four days, for which I had to go, in person and claim it. Luckily, everything was fine with it. This was my personal story, refer for more stories in news from the media on this here and here.

 

 

 

बोस्टनची वारी

मला अमेरिकेहून परत येऊन आज आठवडा झाला. अजून jet-lag आहेच. पहाटे खूप लवकर जाग आली आणि बसलो लिहायला. ह्या वेळेस अमेरिकेतील बोस्टन येथे जायला मिळाले. पहिल्यांदाच तेथे गेलो. बोस्टनचे आकर्षण खूप आधीपासून, म्हणजे शाळेपासूनच होते. सातव्या इयत्तेत असताना इतिहासाचा धडा होता त्यात बोस्टन टी पार्टीबद्दल वाचले होते. ते मनात कुठेतरी कायम राहिले होते.  अधून मधून मला माझ्या कामाच्या स्वरूपामुळे फिरायला मिळते, प्रामुख्याने अमेरिकेत. ह्या वेळेस बोस्टनबरोबर फिलाडेल्फिया येथेही गेलो. पूर्वी बरेच फिरल्यामुळे फिलाडेल्फियाचे नाविन्य नव्हते, जास्त दिवसही राहता नाही आले. त्यामुळे नेहमीच्या Reading Terminal Market मध्ये देखील चक्कर मारता नाही आली. फिलाडेल्फियामध्ये इतक्यातच नवीनच एक संग्रहालय उभारले आहे, तेही पाहायचे राहून गेले. असो. ह्या ब्लॉगवर ऐतिहासिक शहर असलेल्या बोस्टनच्या वारीबद्दल लिहायचे आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत पूर्व भागात, उत्तरेकडे, जोरदार वादळी बर्फवृष्टी झाली होती. त्याला त्यांनी bomb cyclone असे नाव दिले. नेमक्या त्याच सुमारास माझे प्रयाण निश्चित झाले. दिल्ली, न्यूयॉर्क करत बोस्टनला पोहोचलो. न्यूयॉर्क विमानतळावरील मधील मी अनुभवलेली गंमत एक वेगळा विषय असल्यामुळे मी येथे विस्ताराने लिहिले आहे. बोस्टन हे पूर्व किनाऱ्यावर वसलेले अमेरिकेतील आद्य शहर. विमानातून खाली पाहत होतो. निळेशार पाणी, बऱ्याच ठिकाणी पाणी गोठून बर्फ झालेले, जे अजून तरंगत होते. अनेक लहान मोठी बेटे नजरेस पडत होती. छान उन पडले होते, पण तापमान शून्याखालीच होते. खाली तो अथांग अटलांटिक महासागर आणि त्यावरून हळू हळू विमान उतरत उतरत अलगद असे बोस्टनचा लोगन विमानतळावर उतरले. विमानतळाच्या बाहेर येऊन मोटारीत बसेपर्यंत पार गारठून गेलो होतो. मुक्कामचे ठिकाण खुद्द बोस्टनमध्ये नव्हते. मार्लबोरो(Marlborough) नावच्या उपनगरात पश्चिमेकडे साधारण ४० मैल लांब होते. मोटार शहरातून बाहेर पाडून हमरस्त्याला लागली, आणि भरधाव धावू लागली. चोहीकडे साचलेले बर्फच बर्फ नजरेस पडत होते. पानगळ झालेली निष्पर्ण, काळीशार अशी झाडे अधूनमधून दिसत होती.

कामाची पाच दिवस संपवून, शनिवारी बोस्टन शहरात फेरफटका मारून यावे म्हणून सकाळी लवकरच बाहेर पडलो. शहर दर्शन बसचे(Old Town Trolley tour) तिकीट काढून ठेवले होते. मार्लबोरोवरून Interstate Highway 90 ज्याला Mass Pike/Massachusetts Turnpike असेही म्हणतात, त्यावरून बोस्टनकडे निघालो. शहराच्या परिघावर ह्या हमरस्त्याला लागूनच Boston University ची इमारत दिसते. Boston Common जवळ असलेल्या Cheers Bar या जुन्या आणि प्रसिद्ध ठिकाणी tour सुरु होणार होती. शेजारीच Gibson House नावाचे १८६० मधील घर होते. हे आता संग्रहालय म्हणून पाहायला मिळते. बस अजून यायची होती. सकाळची वेळ असल्यामुळे बार सुरु नव्हता, त्यामुळे आत जाता नाही आले. मग समोरच असलेल्या जुन्या Boston Public Park बागेत फेरफटका मारून आलो. त्यात George Washington चा अश्वारूढ पुतळा, झाडांवर असलेल्या मोठ्याल्या, धीट अश्या खारी यांनी लक्ष वेधून घेतले. बस आली. ही बस आम्हाला दिवसभर बोस्टन शहरात फिरवणार होती, साधारण पंधरा एक प्रसिद्ध ठिकाणी ती थांबणार होती, तशी ती त्यामुळे hop-on, hop-off अश्या प्रकारची बस होती. बस मध्ये बसचा चालकच आमचा गाईड होता.

चार्ल्स नदीच्या दोन्ही बाजूला वसलेल्या, आणि एका बाजूला(पूर्वेला) अटलांटिक महासागर पसरलेल्या ह्या शहराचा इतिहास मोठा आहे. अमेरिकेच्या क्रांती मध्ये सक्रीय ह्या शहराचा सहभाग होता. ठिकठिकाणी जुन्या इमारती, वास्तू, चर्च, विविध संग्रहालये आहेत. तसेच औद्योगीकरण झाल्यानंतर झालेल्या प्रगतीमुळे नवीन इमारती, मोठाले रस्ते, दुकाने ही देखील दिसतात. बसचा पहिला थांबा होता Trinity Church भागात. तेथे उतरून चर्च बाहेरून फेरा मरून पाहिले. हे चर्च बोस्टनच्या प्रसिद्ध Copley Square जवळच आहे. तेथून Boston Public Library दिसत होती, प्रसिद्ध कवी खलील जिब्रानचे छोटेसे स्मारक देखील आहे. पलीकडे Old South Church होते तेथे जाऊन आलो. हवेत अतिशय गारवा होता, वारा झोंबत होता, त्यामुळे फिरणे थोडेसे त्रासदायक होत होते. लवकरच दुसरी बस आली आणि त्यात मी चढलो.

बोस्टनच्या जुन्या भागातून, अरुंद रस्त्यांमाधून बस चालली होती, चालक प्रेक्षणीय स्थळांची, इतिहासाची माहिती सांगत होता. Fenway Park नावाचा भाग आला, जेथे अमेरिकन बेसबॉल स्टेडियम(ballpark) आहे. प्रसिद्ध अश्या बोस्टनच्या Red Sox Team चे ते मैदान आहे. बस पुढे चार्ल्स नदी Harvard Bridge वरून ओलांडून केम्ब्रिज या उपनगरात आली. येथे जगप्रसिद् शैक्षणिक संस्था Massachusetts Institute of Technology(MIT) तसेच Harvard University आहेत. आमची बस ही प्रसिद्ध Kendall Square मध्येच थांबली. या भागात बऱ्याच संगणक, तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध startups आधीपासून आणि आताही आहेत. तेथे एक अणुशक्ती केंद्र(nuclear reactor) देखील आहे. मी मनात म्हटले या भागात अशी संस्था कशी काय. नंतर कळाले की ती MIT ची संशोधनासाठीची प्रयोगशाळा आहे. बराच वेळ या भागात फिरत होतो. विविध संस्था दिसत होत्या, पुढे MITचा भव्य घुमट दिसला आणि आत शिरलो, आणि माझे MIT ला पाय लागले! पुढे Harvard University भाग होता पण नाही गेलो. परत येऊन बस पकडली.

बसने Longfellow Bridge वरून चार्ल्स नदी परत ओलांडून बोस्टनच्या मुख्य भागात परत आली. दुपार होऊन गेली होती. बोस्टन टी पार्टीचे संग्रहालयाला जाण्याचे वेध लागले होते. मग मध्ये कुठे न उतरता थेट तेथेच जायचे ठरवले. वाटेत बऱ्याच गोष्टी दिसत होत्या-Massachusetts State House ची इमारत, Granary Burying Ground, Boston Fire Museum(जसे पुण्यात fire brigade museum आहे तसे) वगैरे.  बोस्टनच्या financial district मधून शेवटी आमची बस Boston Tea Party Ship Museum जवळ आली. बोस्टन बंदराचे विहंगम दृश्य दिसत होते. Boston Tea Party हा अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाची घटना आहे. माझ्या Boston Tea Party च्या अनुभवाबद्दल वेगळे लिहिले आहे, येथे पाहता येईल. बोस्टनमध्ये अजून बरेच पाहायचे राहिले होते, वेळ कमी होता, जीवघेण्या गरठ्यामुळे बाहेर जास्त फिरता देखील येत नव्हते. परत बस पकडली. बोस्टन मधील Masonic Temple ची इमारत पाहायची होती(तशी फिलाडेल्फिया, आणि चक्क पुण्यात देखील आहे, त्याबद्दल सविस्तर कधीतरी). The Freedom Trail नावाने प्रसिद्ध असलेली self-guided tour आहे, ज्यात काही महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती चालत चालत होऊ शकते. त्यातील काही दृष्टीस पडली होती, पण Faneuil Hall, USS Constitution Warship राहिले होते, ते बसमधून ओझरते पहायाला मिळाले.

मार्लबोरोला परत जाण्यासाठी Massachusetts Bay Transport Authority(MBTA) च्या रेल्वेगाडीने जायचे ठरवले होते. त्याप्रमाणे ऐतिहासिक South Station येथे जाऊन गाडी पकडायची होती. त्यामुळे tour bus मधून शेवटी Boston Common नावाच्या ऐतिहासिक पार्क जवळ उतरलो. ही बाग म्हणे अमेरिकेतील सर्वात जुने city park आहे म्हणे.  चालत चालत South Station ला गेलो. वाटेत Boston Masonic Building दिसली. तिचे फोटो काढले, आत नाही गेलो. छानसा असा ४०-४५ मिनिटे रेल्वेने प्रवास करून पुढे मार्लबोरोला हॉटेलला जाताना कॅब केली, तर तिचा चालक(Michael Giobbe त्याचे नाव) Old Trolley Tour चा trainer निघाला, तसेच त्याने media ecology ह्या अनोख्या विषयात शिक्षण घेतले होते, आणि तो त्यावर पुस्तक लिहितो आहे असे बोलण्याच्या ओघात समजले. अमेरिकेत असे विचित्र(eccentric) लोक खूप भेटतात. पूर्वी केव्हा तरी साहित्याचे परिसरविज्ञान(म्हणजे literature ecology) नावाचे पुस्तके पाहिल्याचे आठवते. असो.

फिलाडेल्फिया सारखेच बोस्टन हे तसे पायी फिरण्याचे शहर. दोन्ही शहरात कोपरान् कोपरा इतिहासाने व्यापलेला आहे. खरं तर माझी ही बोस्टनची वारी ही धावतीच भेट होती. माझ्या मार्लबोरो मधील कार्यालयातील एकाने असे सांगितले होते की बोस्टन मध्ये Berlin Wall चे काही अवशेष एके ठिकाणी ठेवले आहेत. ते काही मला पाहायला मिळाले नाही, तसेच अजूनही बरीच ठिकाणे पाहायची राहून गेली आहेत. परत बोस्टनला येण्यास हे नक्कीच कारण आहे! पाहुयात, पुढे मागे, कसे जमते ते.

३१ डिसेंबरची आठवण

३१ डिसेंबर आणि त्याची आठवण म्हणजे लक्षात आलेच असेल, नाही का? थर्टी-फर्स्टची पार्टी, सरत्या वर्षाला निरोप, नवीन वर्षाचे धडाक्यात स्वागत, जल्लोष वगैरे, वगैरे. ख्रिसमस पासूनच वातावरण निर्मिती सुरु होते, ठिकठिकाणी. जिथे पहावे तिथे चर्चा ३१ डिसेंबरच्या तयारीची, कार्यक्रमाची. प्रत्येकाला काहीतरी खास ठिकाणी, खास असे काही तरी करून, हा साजरा करायचा असतो. गेल्या काही वर्षात हे अगदी ठळकपणे जाणवते आहे. मद्य-परवाने, पोलिसांच्या सूचना, हॉटेल्स, पब्स, रिसॉर्टसच्या जाहिराती, खुणावणारे समुद्र किनारे, जोडून आलेल्या सुट्ट्या, पाश्चिमात्य संगीत, नृत्य, रोषणाई, फटाक्यांची आताषबाजी, यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन इत्यादी यातून हे दिसते. काहीना काही करून हा दिवस करणी लावायचा असतो. १९९०-९१ पासून जेव्हा जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, त्याच्या बरोबर ज्या गोष्टी आल्या, त्यात ही देखील गोष्ट हळू हळू पुण्यासारख्या त्यावेळी तश्या छोट्याश्या शहरात देखील चालू झाल्या. एकुणात, हा दिवस(की रात्र!) साजरा करण्याची प्रथा कशी आणि का सुरु झाली हे पाहायला हवे. असो.

माझी आठवण आहे ती १९९४ मधील, ३१ डिसेंबरची. अगदी काही दिवसांपूर्वीच मी अमेरिकेत आलो होतो, तेही आयुष्यात पहिल्यांदाच. बरोबर इतर भारतीय सहकारी होते. अमेरिकेतील सॅन होजे, बे एरिया भागात माझे वास्तव्य होते. अजून अमेरिकन कल्चर शॉक मधून पूर्णपणे बाहेर आलो नव्हतो. अमेरिकेतील ह्या भागात बर्फ जरी पडत नसला तरी थंडी बरीच असतेच. ख्रिसमसपासूनच एकूण माहौल बदलत चालेला जाणवत होता. निर्मनुष्य रस्त्यांवरील, टुमदार घरे ख्रिसमससाठी सजली गेलेली दिसत होती. त्यावर्षी ३१ डिसेंबर नेमका शनिवारी आला होता. दिवसभर आम्ही सहकारी इकडे तिकडे भटकंती करत, विविध मॉल्स मध्ये जाऊन खरेदी करत घालवला. सॅन फ्रान्सिस्को हे महानगर हे साधारण पन्नास एक मैल लांब. नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी सॅन फ्रान्सिस्को येथे जाण्याचे ठरले. अमेरिकेत जीवाची मुंबई करण्यासारखा हा बेत होता!

सॅन फ्रान्सिस्को हे प्रशांत महासागराच्या किनारचे मोठे शहर. फिशरमन्स वार्फ, युनियन स्क्वेअर, गोल्डन गेट ब्रीज ही काही प्रसिद्ध स्थळे. सगळे शहर चमकत होते. ह्या शहराची एक गंमत आहे कारण अनेक छोट्या-मोठ्या टेकड्यांवर वसले आहे, त्यामुळे येथील रस्ते असे खाली वर, वळणदार(crooked) असे आहेत. आम्ही शहरात पोहचेपर्यंत रात्रीचे नऊ बाजून गेले होते. रात्र चढत होती, चिंचोळ्या रस्तांवरील रंगबिरंगी गर्दी, रोषणाई nightlife ची उत्सुकता वाढवत होती. रस्त्यांवरून गडद निळ्या रंगातील गणवेशातील सॅन फ्रान्सिस्कोचे पोलीस फिरताना दिसत होते. काही ठिकाणी तर तगड्या, उंच काळ्या घोड्यांवरून ते फिरत होते(mounted unit). रस्त्यांवरून आम्ही आजू-बाजूला असलेली दुकाने, लोकं न्याहाळत, थट्टामस्करी करत भटकत होतो. अचानक आमच्यातल्या काही जणांच्या डोक्यात चावट विचार आला, आणि काही कळायच्या आत आम्ही एका strip tease club मध्ये शिरलो. तेथील अंधाऱ्या वातावरणात, सिगारेटच्या धुरात, मद्याच्या पेल्यांसोबत, समोर एका मागून एक ललना येत, बेधुंद संगीताच्या तालावर, strip tease show करत होत्या. समोरचे दृश्य पाहून आमचे डोळे विस्फारलेले, डोके गरगरायला लागले. आमच्यातील एकजण तात्विक प्रश्न उभा करून आत आलाच नाही. काही वेळाने ते दृश्य पाहवेना, बाहेर पडावेसे वाटू लागले. त्या वासनेच्या बाजारातून बाहेर आलो, मन आतून खात होते. एक दीर्घ सुस्कारा टाकला. बाहेरच्या थंडगार हवेत, परत आम्ही जमिनीवर आलो, थंडगार झालो!

नंतर पावले वळली ती dance bar कडे. तसेच वातावरण, अंधारे, अधूनमधून लेसर, स्पॉट लाईट. कानठळ्या बसतील असे संगीत, आवाज. लोकांची ही गर्दी. सगळे बेधुंद होऊन नाचत आहेत, आरडाओरडा करत आहेत. तेथे थोडावेळ थांबून बाहेर आलो. नंतर समुद्र किनारी फिशरमन्स वार्फ, आणि तेथील Pier 39 भागात फटक्यांची आताषबाजी पाहायला गेलो, आणि डोळ्यांचे पारणे फिटले. बराच वेळ तेथे आम्ही घालवला. असे दृश्य कधी आयुष्यात पहिले नव्हते. अर्थात dance bar, strip tease club देखील पहिल्यांदाच पहिले होते! Pier 39, आणि हजारो दिव्यांनी नटलेला, चमकत असलेला Venetian Carousel भाग हा अतिशय रमणीय आहे. Embarcadero Center या भागात artificial ice rink मध्ये लोक स्केटिंग करताना दिसत होते. Port of San Francisco ची उंच इमारत पाठीमागे दिसते आहे. त्याच ठिकाणी रात्रीचे बारा वाजले, १९९४ वर्ष सरले, १९९५ हे साल सुरु झाले. एकच जल्लोष, happy new year चा जयघोष, कल्लोळ सुरु झाला. चालत चालत, शोधत शोधत, कडाक्याच्या, मध्यरात्रीच्या थंडीत कुडकुडत आमची मोटार गाडीपाशी आलो, तर पाहतो तर काय, पोलिसांनी गाडीवर नवीन वर्षाची भेट चिकटवली होती. काही तरी झाले होते, आणि आम्हाला वाहतूक पोलिसांकडून दंड झाला होता(तो अर्थातच आम्हाला नंतर भरायचा होता). आम्ही कपाळावर हात मरून घेतला! आलीय भोगासी, आणि काय!

Skating at midnight

Ice Rink at Embarcadero Center, San Francisco, circa 1994

काधीतरी पहाटे घरी परतलो. झोपलो नाहीच. १९९५, जानेवारी १, रविवार सुरु झालेला. परत पहाटे पहाटेच भटकंती साठी म्हणून लेक टाहो(Lake Tahoe) येथे गेलो. हे ठिकाण कॅलिफोर्नियामध्ये बे एरियाच्या उत्तरेला नेवाडा राज्याच्या सीमेवर आहे. हा परिसर Sierra Nevada च्या डोंगर रांगांनी वेढलेला आहे. वाटेत थोडेसे बर्फ लागले. जसे जसे डोंगरात जाऊ लागलो, तसे तसे सगळी कडे बर्फच बर्फ दिसायला लागले. आयुष्यात पहिल्यांदाच बर्फ पाहत होतो. दिवसभर तेथे भटकलो, तेथील skiing resort वर, परत आयुष्यातील पहिल्यांदा, skiing केले(खरे तर ते करण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केला). रात्री परत घरी या अनोख्या(आणि काही रंगेल!) आठवणी मनात साठवत परतलो. तर अशी ही माझी ३१ डिसेंबरची आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा केल्याची आठवण! न्यूयॉर्क मधील टाईम्स स्क्वेअर येथील ३१ डिसेंबरच्या रात्रीचा the ball drop चा कार्यक्रम प्रसिद्ध आहे असे ऐकले आहे, पण कधी तेथे त्यावेळेस गेलो नाही. पाहुयात, पुढे मागे, कधीतरी.

अमेरिकेतील ज्यू लोकांचा इतिहास

परवा जर्मनी मधील ज्यू लोकं आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराशी(holocaust) निगडीत एक The Reader नावाचा सुंदर चित्रपट पाहिला(ह्या विषयावर खरे तर बरेच चांगले चित्रपट आहेत-Schindler’s List, The Boy in the Striped Pyjamas, वगैरे) . एका प्रसिद्ध जर्मन कादंबरीवर तो बेतला होता. त्या चित्रपटाला अनेक पदर आहेत, त्याबद्दल नंतर कधीतरी लिहिणार आहे. चित्रपटाच्या शेवटी एक ज्यू स्त्री, जी अत्याचारांमधून बचावली असते, आणि अमेरिकेत वास्तव्य करीत असते, तीला मिळालेले धन ती अमेरिकेतील शाळेला देऊन टाकते, असा प्रसंग आहे. अमेरिकेत ज्यू लोकं कित्येक वर्षांपासून येत आहेत, आणि तेथेच मिसळून जात आहेत. अर्थात ज्यू लोकांचे मूळ म्हणजे इस्राईल. तेथेच त्यांना राहणे मुश्कील होत गेल्याने, कित्येक दशकांपासून तो समाज जगभरात, प्रामुख्याने अमेरिकेत, युरोपात विखुरले गेले. जर्मनीत अर्थात त्यांच्यावर हिटलरने अंगावर काटा आणणारे अत्याचार केले. अशा ज्यू लोकांचा अमेरिकेतील इतिहास सांगणारे मी संग्रहालय पहिले होते त्याची या चित्रपटातील प्रसंगामुळे आठवण झाली.

मी पाहिलेले हे संग्रहालय, ज्याचे नाव आहे National Museum of American Jewish History, ते  फिलाडेल्फिया या शहरात Independence Mall भागात आहे. आता हा भाग म्हणजे अगदी भन्नाट आहे, येथे अमेरिका देशाचा जन्म झाला. त्याबद्दल कधीतरी परत. अमेरिकेतील ज्यू लोकांचा इतिहास सांगणारे, हे चांगले भले मोठे संग्रहालय आहे-चार मजले आहेत. मी बराच वेळ घेत हे संग्रहालय पहिले. अमेरिकेत बरेच प्रथितयश लोक ज्यू वंशीय आहेत. आपल्या महाराष्ट्रात अलिबाग येथे बेने इस्राईली नावाचे लोक आहेत, ते मुळचे ज्यू आहेत, त्याबद्दल माहिती होते, तसेच पुण्यात देखील ज्यू लोकांचे लाल देवल नावाचे synagogue आहे. तर अमेरिकेतील ज्यू लोकांचा अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, तसेच पुढील प्रगतीत खूप मोठा वाटा आहे त्याचा इतिहास, तसेच अमेरिकेच्या काही वादग्रस्त राजकीय निर्णयांचा(ज्यू समाजाप्रती, इस्राईल देश असेल, holocaust असेल) इतिहास येथे पाहता येतो. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळेस, holocaust चा दरम्यान, अमेरिकी सरकारने immigration policy सैल सोडली असती तर कित्येक ज्यू लोकांचे प्राण वाचले असते, ही सल अजूनही त्या समाजात आहे. त्याबद्दल एका दालनात सविस्तर, सचित्र माहिती आहे. ज्यू संस्कृती, धर्म, भाषा, पारंपरिक जीवन, त्या समाजातील आजचे प्रश्न, संस्कृती टिकून ठेवण्याचे आव्हान इत्यादी विषय देखील पाहता येतात. ज्यू लोकांनी सतराव्या शतकात अमेरिकेत पाऊल ठेवल्या पासून, ते आज पर्यंत, हा समाज कसा टिकला, वाढला, त्यांनी वेगवेगळया क्षेत्रात कशी प्रगती साधली याचे सविस्तर चित्रण दिसते.

प्रत्येक मजल्यावर कित्येक जुनी छायाचित्रे, विविध जुन्या पुराण्या वस्तू ,मांडून ठेवल्या आहेत. ह्यातील बऱ्याच वस्तू ज्यू लोकांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातून ह्या संस्थेला दिल्या आहेत, हे विशेष. एकूणच अमेरिकेत राहून ज्यू लोकांनी आपली अस्मिता जागरूकपणे जपून ठेवली आहे असे दिसते(पारशी लोकांप्रमाणे ज्यू लोकं सुद्धा त्यांच्या समाजातच विवाह करण्याचे पसंत करतात). अमेरिकेतील निवडक प्रथितयश ज्यू लोकांची माहिती(उदा. अल्बर्ट आईनस्टाईन) सुद्धा एका दालनात दिसते. एकूणच ह्या अत्याधुनिक, multi-media, आणि भव्य अश्या संग्रहालयातून फेरफटका मारताना ज्यू समाजाच्या इतिहासात डोकावून आल्यासारखे वाटून गेले. संग्रहालयाच्या दारातच Religious Liberty नावाचे एक शिल्पसमूह आहे, जे संग्रहालयात जाणाऱ्याला ज्यू लोकांनी अस्मितेसाठी, स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढयाचीच आठवण करून देते.

माझे एक-दोन ज्यू मित्र आहेत. इस्राईल मध्ये ते पूर्वी होते, आता अमेरिकेत राहत आहेत. अर्थात ते आताच्या पिढीचे आहेत. इस्राईल मध्ये Palestine बरोबर सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर ते अमेरिकेत आलेले आहेत. त्यांच्या बरोबर एकदा ह्या सर्व विषयाबद्दल बोलून जाणून घ्यावेसे वाटू लागले आहे. तसे पहिले ज्यू आणि holocaust चा इतिहास सांगणारे आणखी एक संग्रहालय अमेरिकेत आहे. या पार्श्वभूमीवर ते पाहायला हवे. भारतीय लोकं देखील आता अमेरिकेत जाऊन १०० वर्षे होऊन गेली. भारतीयांनी अमेरिकेत केलेल्या भरीव कामगिरीचे एक संग्रहालय अमेरिकेत करायला हरकत नाही. अमेरिकेतील आफ्रिकन वंशाचे लोकही त्याहून अधिक काळापासून आहेत. त्यांचे देखील एक संग्रहालय फिलाडेल्फिया मध्ये आहे, ते मी पाहिले होते. त्या बद्दल नंतर काधीतरी.

The Franklin Institute

I have written various travelogues on this blogs in the past. I love to travel and explore, and off late, also write about it. Sometimes when we travel to places, when we study the history, we find that some personalities leaving profound impact on country or state or city, we are visiting. Benjamin Franklin was one such personality who had an immense impact on the USA in general and cities like Philadelphia specific. I have written about impact he has on the city of Philadelphia, which I had witnessed during my visit. Today I want to write more about one such place I visited called The Franklin Institute in Philadelphia itself, founded to honor Benjamin Franklin himself, in 1824.

20170218_150533

That day, when I reached the place(which is in Parkway Museum District of the city), it was afternoon as I had visited another interesting place nearby. The imposing Latin architecture style of the building and particularly facade is captivating. This institute is focused on subject of science. It also has many museums and Tuttleman IMAX theater. I was particularly interested in a show at that theater along with a specialty museum themed around dinosaurs. As I got in and found myself inside a dome in the front court, where one can see full size marble structure of Benjamin Franklin himself. I straightaway went to the 3D IMAX show which was titled Flying Monsters as it was a perfect precursor for museum show following next Jurassic World Exhibit. The film had a voice of David Attenborough. and it was about flying creatures that predates dinosaurs on the earth. The Jurassic World Exhibit, which is a mobile exhibition, came to the institute in November 2016. When I visited it in February 2017, it was still around.

Jurassic World Exhibition is certainly a very unique with moving moving and life size models of various types of dinosaurs on the display, with light and sound effect. After that, I visited few more exhibits and gift shop, book store, before the institute shut down. One was around train engines, another was aviation technology. The train engine exhibition is titled The Train Factory. Incidentally, Philadelphia has been part of early train history in the USA. The place where I was put up, was a near a famous area called Reading Terminal, which itself was a train terminus. The exhibit includes a famous steam engine locomotive called Baldwin 60000, which you can walk inside and look around a piece of metal. The air show is again similar, tracing the history right from Wright Brothers early attempts to some modern air-crafts. It also had a simulation console to give visitors a first hand experience of how pilots are trained.

There were many more exhibits, I visited one around brain and another one around heart. The one on heart, basically was a supersized, giant colorful model of heart, making you walk through various veins, and explaining how pumping takes place inside of a heart. The one around brain was interesting, due its nature of fuzzy decision making based on illusions and sensory systems made of neural network.

All in all, the institute experience was good. There is so much packed here, even one day won’t be enough.

 

वेलियनाडच्या आसपास

मी केरळ राज्यात, ज्याला God’s Own Country असेही म्हणतात, एक-दोनदा फिरलो आहे. दोन्हीवेळेस आधी कोचीला जाऊन मग पुढे गेलो आहे. माझी कोची आणि मग पुढे लक्षद्वीप भेटीबद्दल पूर्वी मी लिहिले आहेच. आज वेलियनाड नावाच्या गावात मी १० दिवस राहिलो होतो आणि आसपास भटकलो होतो, त्याबद्दल लिहिणार आहे.

मी वेलियनाड ह्या अनोळखी गावी जायचे काही कारण नव्हते. ते काही कुठल्याही tourist map वर नाही. मी गेलो होतो ते चिन्मय मिशनच्या Chinmay International Foundation नावाच्या संस्थेत एका अभ्यासक्रमाच्या निमित्ताने. कोची विमानतळापासून वेलियनाड(Veliyanad) हे गाव तसे थोडे लांबच आहे. कोचीला पोहचलो तेव्हा रात्र झाली होती. त्यामुळे वेलियनाडला जाई पर्यंतचा नजारा काही दिसला नाही. मुक्काम केंद्रातच होता. हे गाव म्हणजे आद्य शंकराचार्यांचे मातुल-ग्राम. सकाळी उठून पाहतो तर काय, अतिशय छान अशी केरळी तऱ्हेची घरे जी नक्षीदार लाकडी काम  यांनी सजलेली, नारळाची झाडी असलेले टुमदार गाव. ज्या झाडापासून साबूदाणा बनतो, ती  Tapioca झाडे बरीच आहेत तेथे. केंद्राचा परिसर देखील असाच रम्य आहे. आद्य शंकराचार्यांचे मातेचे घर, त्यात असलेले स्वामी चिन्मयानंदांचे ध्यानमंदिर, अय्यप्पाचे आणि नाग यक्षी यांचे केरळी मंदिर आहे. एका लाकडी बांधकाम असलेल्या आणि कौलारू छप्पर असलेल्या हॉलमध्ये दररोज सकाळी आणि दुपारी अभ्यासवर्ग असे. पहिल्याच दिवशी पाऊस सुरु झाला. माझ्या एकदम लक्षात आले, की त्या वर्षीचा मान्सुनचा पहिला पाऊस मी अनुभवतो आहे, कारण मी बरोबर जूनच्या पहिल्या आठवड्यात तेथे गेलो होतो आणि मान्सुन सुरु होणार होता.

दररोज सकाळी आणि संध्याकाळी जमेल तसे आम्ही आसपास भटकट असू. पहिल्या दिवशी काही जमले नाही, पण दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच असलेल्या Peppathy गावात शिवाचे मंदिर पहायला गेलो, तसेच पुढे Pazhur गावातील Perumthikkovil हे नदी काठी असलेल्या बाराव्या शतकातील मंदिर पाहायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून Pazhur गावातच पण Muvattupuzhla नदीच्या पलीकडे असलेले नृसिंह स्वामी मंदिर पाहायला गेलो. नंतर कोणीतरी आम्हाला त्या गावातील सुंदरन नावाच्या एका ज्योतिषाकडे देखील घेऊन गेले, ज्याचे भविष्य सांगण्याचे तंत्र वैशिष्ट्यपूर्ण आहे.

तिसऱ्या दिवशी कुठे जावू शकलो नाही. चौथ्या दिवशी दुपारनंतर, Thrippunithura या नावाच्या कोचीच्या उपनगरात Ameda Temple पाहायला गेलो, जे सप्तमातृका मंदिर आहे, तसेच जवळच असलेले Poornathrayessa Temple देखील बघितले जे विष्णूचे मंदिर आहे. केरळ मधील मंदिर स्थापत्य हा वेगळाच विषय आहे. Thrippunithura हे तसे ऐतिहासिक आहे, कोचीन राज्याची ती राजधानी आहे, आणि तेथे Hill Palace नावाचा राजवाडा आणि संग्रहालय आहे जे पाहायला आम्ही परत दुसऱ्या दिवशी तेथे गेलो. आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेले कलाडी येथेही गेलो. जवळच असलेल्या Perumbavoor गावात्तील  Iringole Kavu जंगलात दुर्गेचे मंदिर आहे तेथेही गेलो. वेलियनाड जवळ Thirumarayoor नावाच्या गावातील रामस्वामी मंदिर पाहायला गेलो. Piravom गावातील एक जुने, पहिल्या शतकातील असे Syrian Church(St Mary’s Cathedral) आणि आत असलेली जुनी चित्रे देखील पाहायला मिळाली.

आमच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी, चिन्मय मिशनच्या केंद्रात असलेल्या अयप्पा  मंदिरात सहस्रदीप कार्यक्रम झाला, ज्यात संपूर्ण मंदिर उजळून निघाले, जे अपूर्व दृश्य होते. नंतर भजनाचा कार्यक्रम झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गावात असलेले काही बंगाली कामगार गायनाच्या कार्यक्रमाला आले होते, ज्यांनी बंगाली गीते, बाऊल संगीत, कबीराचे दोहे वगैरे गायली, आणि त्या केरळी वातावरणातील संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. दुसऱ्या दिवशी आम्हा सर्व सहापाठींनी अजून एक दिवस भटकंती करून पुढे आपापल्या गंतव्य स्थळी जावे असे ठरले आणि त्या प्रमाणे, Thrissur(erstwhile Trichur) जिल्यातील प्रसिद्ध गुरुवायुर मंदिरला भेट दिली. हे मंदिर त्यांच्या हत्तीशाळेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आवारात हत्तीची राहण्याची व्यवस्था आहे. मंदिरातच रात्रभर मुक्काम ठोकला. रात्री उशिरापर्यंत कोणीतरी केरळचा प्रसिद्ध शास्त्रीय नृत्याचा अविष्कार मोहिनीअट्टम् सादर करत होते. आणि नंतर आम्ही अगदी पहाटे पहाटे ३ वाजता कृष्णमंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर Thrissur शहरातील Vadakkumnathan Temple जे प्रसिद्ध असे प्राचीन शिवमंदिर आहे त्याला भेट दिली. कोची शहरात किल्ला, जुने चर्च वगैरे पाहून कोची विमानतळावर पुण्याकडे रवाना होण्यास धडकलो.

शेवटला, जाता जाता, चिन्मय मिशन मधील अभ्यासक्रम आणि तेथील खाद्य-भ्रमंती या बद्दल!  भारतीय तत्वज्ञान/दर्शनातील क्षेत्रातील न्यायदर्शनाच परिचय हा अभ्यासक्रम जो पुण्यातीलच संस्कृततज्ञ वसिष्ठ नारायण झा यांनी आखलेला, आयोजित केलेला होता. त्याबद्दल मी पूर्वी माझ्या ब्लॉगवर येथे लिहिले आहेच. केरळची जशी मंदिर वैशिष्ठ्यपूर्ण आहेत, तशीच तेथील खाद्य-संस्कृती देखील वेगळीच आहे. त्याबद्दल अगदी थोडेसे. चिन्मय मिशन केंद्रात तेथे आम्हाला सकाळी नाश्त्याला बऱ्याच पुट्टु हा पदार्थ, इडली, सागू, कुर्मा, तेथील इलायची केळी(ती पण कधी कच्ची, तर कधी उकडलेली!), फिल्टर कॉफी सोबत मिळत असे. दोन्ही वेळच्या जेवणात अर्थातच भात, भातच असे. लाल, जाडा भरडा अश्या तांदळाचा भात, पांढरा भात, सांबार, रसम्, भाजी, मस्त ओले खोबरे  वगैरे घातलेली, पायसम्, अवियल, कच्च्या केळ्याची भाजी, फणसाची भाजी, गोथांबू पायासम्, उन्नीयप्प्म नावाचे गोड पदार्थ इत्यादी. मी तेथून फिल्टर कॉफी तयार करण्याचे पात्र, तसेच पुट्टु तयार करण्याचे पात्र पुट्टुपात्र घेऊन आलो, आणि अधून मधून केरळची आठवण म्हणून ते पदार्थ करत असतो!

तर अशी ही माझी केरळची offbeat भटकंती, जी टूरिस्ट कंपन्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी आणि समृद्ध करणारी!

आहुपे, भाग#२(रानभाजी महोत्सव)

माझ्या मागील ब्लॉग मध्ये आहुपे या आगळ्या वेगळ्या ठिकाणाच्या पावसाळी निसर्ग पर्यटनाचा अनुभव मी सांगितला होता. त्याच भटकंतीत अजून एक वेगळा अनुभव मी घेतला. वनवासी कल्याण अश्राम ही समाजसेवी संस्था गेली ५०-६० वर्षे वनवासी, आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी कार्य करते आहे. त्या संस्थेच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे गेली दोन वर्षे रानभाजी महोत्सव असा आगळा वेगळा महोत्सव आहुपे, जुन्नर जवळील कुकडेश्वर आणि तळेरान या तीन ठिकाणी केला जातोय. त्याबद्दल खूप उत्सुकता होतीच. महाराष्ट्र सरकारची एक Tribal Research and Training नावाची एक संस्था पुण्यात आहे, तेथे मी पूर्वी एकदा गेलो होतो.

IMG_0828

माझ्या आहुपेच्या वास्तव्याच्या दुसऱ्या दिवशी हा रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम होता. रानभाज्या म्हणजे सहसा शहरी भागात न आढळणाऱ्या भाज्या. जंगलात, शेतात, बांधांवरून आपोपाप उगवल्या जाणाऱ्या अश्या ह्या भाज्या. प्रामुख्याने पावसाळ्यात, काही महिने ह्या असतात. जसे कासच्या पठारावर पावसाळ्यातील काही दिवसच काही विशिष्ट फुले, रानफुले येतात, आणि काही दिवसातच ती नष्ट होतात, तसाच हा काहीसा प्रकार. अश्या ह्या रानभाज्यांची माहिती, अर्थात, जंगलात राहणाऱ्या,वनात शेती करणाऱ्या वनवासी, आदिवासी लोकांना माहिती असते. ती परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. नुसत्या त्या भाज्यांची माहिती नव्हे तर, त्या स्वयंपाकात, खाण्यात कशा वापराव्या याचे देखील पिढीजात ज्ञान त्यांच्याकडे असते. यातील बऱ्याच भाज्या औषधी गुणधर्म देखील असलेल्या असतात. या सर्वांचे एका तऱ्हेने दस्ताऐवजीकरण व्हावे, तसेच ह्याची माहिती इतरांना पोहोचावी, त्यातून आदिवासी लोकांना चार पैसे देखील मिळावे हा अश्या कार्यक्रमाचा उद्देश. आहुपे हा भाग देखील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा आणि यां निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून ह्या वनपुत्रांचा, त्याच्या भागाचा शाश्वत विकास व्हावा हा प्रमुख हेतू.

पुण्यातून वनवासी कल्याण आश्रमातर्फे पर्यटकांना आहुपेत ह्या कार्यक्रमासाठी, आश्रमाच्या अंजली घारपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणले. वनवासी कल्याण आश्रमाची स्मरणिका सर्वाना देण्यात आली, ज्यात त्यांच्या उपक्रमाबद्दल, इतिहासाबद्दल माहिती दिली होतो. सकाळी १० वाजता आहुपेतील शासकीय आश्रम शाळेत सगळे जमले. नाश्ता आणि नाचणीचे गरम गरम असे आंबट गोड आंबील देऊन स्वागत करण्यात आले. तेवढ्यात पावसाने देखील जोरदार सरी वर सरी झाडून जणू काही स्वागतच केले. आहुपे गावातील वाड्या, वस्त्यामधून अनेक महिला(लहान मुलींपासून ते आजी/मावशीपर्यंत सर्व) नटून थटून हातात त्यांनी बनवलेली रानभाजी, भाकरी यांनी सजलेले ताट घेऊन कार्यक्रम स्थळी येत राहिल्या. हॉल मध्ये भिंतींवर २५-३० रानभाज्यांची माहिती देणारी विविध भित्तीपत्रके लावली गेली होती. आलेल्या महिला आपापल्या जागी बसून त्या चाखायला येणाऱ्यांना त्याची माहिती उत्साहाने देत होत्या. आम्ही सर्व पर्यटक, तसेच नेमून दिलेले परीक्षक, ह्या सर्व भाज्या चाखत, खात फिरत होतो. प्रत्येक ठिकाणचे भित्तीपत्रक वाचून माहिती करून घेत होतो. मला एका तऱ्हेने खूप वर्षांपूर्वी केलेली अमेरिकेतील Napa Valley मधील wine tasting ची ट्रीप आठवली.

रुखाळ, भोकर, तेरा, आबई,  काट माट, कर्दुला, कोंदर, कुर्डू, तोंडेची भाजी, चावा, टाकळा, कुसरा, करंज, भारंगी, चिंचूरडा, रताळ कोंब, गोमेटी, हळदा, महाळुंग, खुरासणी, कोंभाळा अश्या भाज्यांची माहिती देणारी पत्रके लावली होती. त्यातील बऱ्याच भाज्या महिलांनी आणल्या होत्या. कुर्डू खूप जणीनी आणली होती.  काही वेळाने मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. विविध मान्यवरांची भाषणे झाली. अंजली घारपुरे यांनी कार्यक्रमाची कल्पना, स्थानिक लोकांचे सहकार्य याबद्दल बोलत, सहभागी महिलांचे कौतुक केले. डॉ. भोगावकर, ज्या वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत, त्यादेखील एकूण परंपरा जपण्याचे आवाहन करत, कार्यक्रमाचे स्वागत केले. त्यांनी ह्या Wild Edibles of Vidarbha नावाचे  एक पुस्तकही लिहिले आहे. वनवासी कल्याण संस्थेतर्फे देखील रानभाज्यांच्या माहितीचे संकलन असणारे पुस्तकाचे लवकरच प्रकाशन करत आहे. परीक्षकांतर्फे स्पर्धेचे निकाल जाहीर करून, विजेत्यांचे कौतुक, बक्षीस वितरण, मनोगत हे सर्व झाले आणि हा सोहळा पार पडला.

तेवढ्यात जेवणाची सूचना झाली. मी विचारच करत होतो की ह्या आलेल्या सर्व पर्यटकांचे भोजनाची व्यवस्था कशी होणार. पण सूचना ऐकून चाट पडलो. कल्पना अशी होती की गावातील वनवासी बंधूंकडे त्यांनी प्रत्येक ४-५ लोकांच्या समुहाची जेवणाची व्यवस्था केली होती.  अश्या प्रकारे गावातील १२-१५ जणीना त्यामुळे काही पैसे मिळाले, आणि आम्हा पर्यटकांना त्यांच्या घरात शिरकाव करून त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मिळाली. बसके घर, उताराचे कौलारू छप्पर, अंधाऱ्या खिळ्या, अंगणात शेळ्या, गायी, कोंबड्या, सरपण. स्वयंपाक घरात चूल. सारवलेल्या घरात, चुलीसमोर बसून पोत्यावर बसून घरातील आजी, मावशी यांच्या सोबत गप्पा मारत गावरान भोजनाचा आस्वाद घेण्यास मिळाला. मला तर माझ्या आजोळची आठवण झाली. माझ्या सुदैवाने माझ्या बरोबर पुणे आकाशवाणीच्या प्रसिद्ध आणि वरिष्ठ निवेदिका अंजली लाळे ह्या होत्या आणि अनपेक्षितपणे त्यांच्या आकाशवाणी संदर्भात गप्पा मारता आल्या. त्यानंतर आम्ही मग गावकऱ्यांकडून स्थानिक वाणाचे  तांदूळ विकत घेतले. सर्वांचा निरोप घेऊन, भाज्यांच्या चावीच्या आस्वादाच्या आठवणी काढत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.

एकूणच हा असा अनपेक्षित, आणि वेगळा अनुभव देणारी सहल ठरली. आदिवासी संस्कृती, जीचे विविध आयाम आहेत, त्यातील ही खाद्य-संस्कृती, ती पण जपली गेली पाहिजे. अंजली घारपुरे यांच्या पुढाकाराने नक्कीच हे होईल. प्राची दुबळे यांनी जसे आदिवासी संगीत जपण्यासाठी त्याचा अभ्यास करून, त्याचे रेकॉर्डिंग आणि दस्ताऐवजीकरण केले आहे, किंवा गणेश देवी यांनी भाषा लोकसर्वेक्षण करून आदिवासी बोली भाषेची माहिती संकलित केली, मुकुंद गोखले यांनी गोंडी लिपी तयार केली, तसेच हे आहे. परवाच जागतिक आदिवासी दिन साजरा झाला, त्या दृष्टीने ही सहल औचित्यपूर्णच ठरली असे म्हणावे लागेल.