An evening in Philadelphia

ह्या वर्षी देखील अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरी जायला मिळाले. ही माझी गेल्या तीन-चार वर्षातील तिसरी खेप. ह्या खेपेस फिलाडेल्फिया येथे जाण्याआधी बोस्टन शहराची देखील वारी झाली. जानेवारी महिना म्हणजे आधीच अमेरिकेतील ह्या भागात, म्हणजे ईशान्य भागात, भयानक थंडी. त्यातच मी तेथे जायच्या आधीच काही दिवस जोरदार बर्फवृष्टी झालेली. विमानांची उड्डाणे रद्द झालेली, विमानतळावर सगळीकडे गोंधळ,ज्या बद्दल मी येथे लिहिले आहेच. ह्या खेपेस ३-४ दिवसच फिलाडेल्फिया मध्ये होतो. पण तेही विविध अनुभव देऊनच गेले. हे ऐतिहासिक शहरच असे आहे.

न्यूयॉर्क मध्ये जसे आशियायी आणि इतर कॅबवाले प्रसिद्ध आहेत, तसेच फिलाडेल्फिया मध्ये बांगलादेशी कॅबवाले बरेच आहेत. त्यांना हिंदी बोलता येते, मुंबई बद्दल हमखास विचारणा होते. ह्या खेपेसस एके दिवशी, मला एक कॅबवाला भेटला, जो बांगलादेशी नव्हता, पण हैती या देशाचा होता. हा देश म्हणजे अटलांटिक महासागरातील, अमेरीकेजवळ क्युबा, वेस्ट इंडीज बेटांच्या शेजारील देश. कॅबवाला बराच बोलका होता. कॅब शिरल्या शिरल्या त्याने बोलणे सुरु केले. तो फ्रेंच भाषिक होता, हैती मध्ये फ्रेंच राज्यसत्ता होती. मला फ्रेंच येत नाही हे सांगितल्यावर मोडक्या तोडक्या इंग्रजीत त्यांनी आपल्या तोंडाची पट्टी सुरु ठेवली. हातात मोबाईल होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हैतीबद्दल काही अनुद्गार काढले होते असे वाटते. तो अर्थातच चिडला होता. मोबाईलवर विडियो मला दाखवून काही सांगण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रसंग अमेरिकी जनतेची सर्वसाधारण भावना ट्रम्प प्रश्नाबद्दल सध्या आहे, याचेच ते सूचक होते की असे वाटून मला गेले. असो. मला सांगायचे होते ते वेगळेच. नमनालाच घडाभर तेल गेले. आता निरुपण सुरु करतो!

ब्लॉगचे शीर्षक आहे An evening in Philadelphia असे आहे. उघड आहे, की मी फिलाडेल्फिया मधील एका विशिष्ट संध्याकाळच्या विषयी लिहिणार आहे. आधीच्या दोन भेटीदरम्यान शहरात बरेच फिरलो आहे. ह्या वेळेस सवड नव्हती, थंडीदेखील जीवघेणी होतीच. पण ती संध्याकाळ वेगळीच होती. ऑफिसचे काम संपवून संध्याकाळी खरेदी करावी म्हणून एक-दोन जणांना बरोबर घेऊन बाहेर पडलो. शहराच्या पूर्व भागात डेलावेअर नदीच्या किनारी काही शॉपिंग मॉल्स वसले आहेत. तेथे गेलो. शहराचा हा भागच अतिशय वेगळा आहे. नदीपलीकडे न्यूजर्सी हे राज्य सुरु होते. पूर्व भागातील नदीकीनारच्या ह्या रस्त्याचे नाव Christopher Columbus Boulevard.

त्याच्या दक्षिण भागात हे मॉल्स वसलेले आहेत. तेथे थोडावेळ घालवून, अंधार पडल्यावर, मग त्या रस्त्यावरून उत्तर भागात  गेलो. त्याभागात नदीवरील प्रसिद्ध असा Benjamin Franklin Bridge आहे. अंधारात तो ब्रीज रोषणाई मुळे छान उजळून गेला होता.

सर्वात आधी रात्रीचे जेवण केले जवळच असलेल्या La Peg नावाच्या छानश्या हॉटेलमध्ये. हॉटेल बाहेरच्या आवारात दोन जण बर्फात शिल्प कोरत बदले होते. एक जुने पाण्याचे पंप हाउस हॉटेल मध्ये रुपांतरीत केले गेले होते, आतील संरचना पंप हाउस सारखी त्यांनी ठेवली होती. त्याच आवारात एक बहुधा प्रायोगिक असे नाट्यगृह आणि संस्था (जिचे नाव FringeArts) असावे असा भाग होता(कधीतरी नंतर परत तेथे जाऊन नाटक पहिले पाहिजे).

जेवणानंतर परत भटकायला बाहेर पडलो, बोचरी थंडी, वारा होताच. गर्दी अशी नव्हतीच. पुढे त्याच भागात Penn’s Landing नावाची एक जागा आहे. फिलाडेल्फिया शहराचा संस्थापक William Penn याच्या नावाने असलेला हा नदीकाठचा भाग. त्याच्याबाजुला असलेले Independence Seaport Museum, जे मी मागील खेपेस पहिले होते(अरेच्च्या, त्याबद्दल लिहायचे राहूनच गेले की!). नदीच्या किनारी आम्ही चालत होतो. नदी बऱ्यापैकी गोठलेली होती, बर्फाचे मोठमोठे तुकडे पाण्यात तरंगताना दिसत होते. नदीचा असा विशिष्ट असा वास येत होता.

थोडे जवळच भरपूर रोषणाई केलेली दिसत होती. उत्सुकता म्हणून पाहायला गेलो तर, बर्फावर स्केटिंग करण्याची ती जागा निघाली. जागेचे नाव होते Blue Cross Riverink. थंडीच्या दिवसांत तेथे Winterfest आयोजित केले जाणार होते असे वाटत होते. त्याची तयारी चालू होती. Ice Resurfacer नावाच्या यंत्राने ice rink leveling चे काम चालू होते. Ice skating ची मजा तेथे लुटता येणार होती. जवळच बांबू हाउस सारखे काहीतरी दिसले, ते होते Franklin Fountain Confectionery Cabin.

लोकांना बसंल्या साठी बांबूच्या खुर्च्या, तसेच शेकोट्या पेटवण्यासाठी fireplace देखील ठेवलेली दिसत होती.  तेथे थोडावेळ घुटमळत, न्याहाळत, निरुद्देश भटकत होतो. मी पूर्वी फिलाडेल्फिया मध्येच ice hockey match कधीतरी पाहिली होती, त्याची राहून राहून आठवण होत होती. काही वेळाने जशी रात्र चढू लागली, थंडी असह्य होऊ लागली, आणि आमचे पाय परत निघाण्यासाठी वळाले. तर अशी ही माझी थंडीतील रमणीय An evening in Philadelphia!

 

Leave a comment