ब्रिटीश काळातील सीमा शुल्क रचना

इतक्यात मी एक वेगळेच पुस्तक वाचले आणि मला त्या पुस्तकाच्या विषय-वस्तूबद्दल लिहायचा मोह आवरत नाही. पुस्तकाचे नाव आहे ‘The Great Hedge of India’. लेखक आहे Roy Moxham जो ब्रिटीश आहे. पुस्तक तसे जुने आहे, मी ते घेवूनही बरीच वर्ष झाली पण ते हातात घेवून वाचण्याचा योग आता आला. लेखकाला ब्रिटीश काळात अस्तित्वात असलेली सीमा शुल्क पद्धतीबद्दल अगदी अपघातानेच समजले. आणि तसेच याबद्दल कोठेही विशेष माहिती सहजा सहजी मिळत नाही हे त्याला उमजले. त्यानंतर त्याने ह्या विषयाचा छडा लावून, वेगवेगळे माहिती स्त्रोत मिळवून, तसेच इतर पद्धती वापरून त्याची सध्याची परिस्थिती कशी आहे आणि त्याचा इतिहास त्याबद्दल त्याने अतिशय रोचक पद्धतीने लिहिले आहे.

Hedge म्हणजे झाडा-झुडूपांनी तयार केलेली सीमा रेषा. अशा पद्धतीची रचना बाहेरच्या देशांमध्ये घरांच्या आसपास असलेल्या बगीच्यामध्ये सर्रास पाहायला मिळते. तसेच शहरात सरकारने तयार केलेल्या बागेत अथवा रस्त्याच्या मधोमध तयार केलेली गच्च झाडा-झुडुपांची सौंदर्यपूर्ण रांग सुद्धा म्हणजे Hedge. थोडक्यात झाडीपासून बनवलेले जाडजूड असे कुंपण. तर अशाप्रकारची सीमा रेषा ब्रिटीश सरकारने पार अगदी उत्तरेमधील पासून खाली नर्मदेच्या पलीकडील शहरापर्यंत तयार केली होती. खाली दिलेल्या छायाचित्रातून त्याची व्याप्ती दिसून येईल.

20150614_111301

ह्या कुंपणावर ब्रिटीशांनी ठिकठिकाणी चौक्या तयार केल्या होत्या. अशा एकूण १७२० चौक्या होत्या. ब्रिटीश अधिकारी ग्रांड डफ याने ते पहिले होते आणि त्याने त्याची तुलना चीनच्या ‘The Great Wall of China’ बरोबर केली होती. कित्येक जण ह्या सीमेवर तैनात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात जसे आपल्याला माहीत आहे की भारतात, ब्रिटीश साम्राज्याच्या व्यतिरिक्त,  ६५० च्या पेक्षा जास्त संस्थानिकांची राज्ये होती. अशा संस्थानिकांमधून जेव्हा केव्हा मालवाहतूक ब्रिटीश राज्यामध्ये होत असे तेव्हा ह्या कुंपणामुळे(Hedge) अडवले जाऊन सीमा शुल्क आकारले जाई.

लेखकाने उद्धृत केलेल्या मूळ स्त्रोत असलेल्या एका पुस्तकातील उतारा पुढील प्रमाणे आहे:

“To secure the levy of a duty on salt…there grew up gradually a monstrous system, to which it would be almost impossible to find a parallel in any tolerably civilised country. A customs line was established which stretched across the whole of India, which in 1869 extended from the Indus to the Mahanadi in Madras, a distance of 2300 miles; and it was guarded by nearly 12,000 men…It would have stretched from London to Constantinople…It consisted principally of an immense impenetrable hedge of thorny trees and bushes.”

मीठावरील जकात हाही त्यावेळचा ज्वलंत प्रश्न होता. गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह त्याची साक्षच आहे. मीठ हे सर्वसामान्याच्या जेवणातील महत्वाचा आणि आवश्यक असा घटक. जकातीमुळे मीठ अतिशय महाग झाले होते. मीठाचे उत्पादन त्या वेळेस पश्चिम भागातील राजस्थान, पंजाब, गुजरात येथे अधिक होत असे. पंजाब मध्ये rock salt तेथल्या डोंगरांमधून असलेल्या खाणीतून काढत असत. तो ब्रिटीश राज्यामध्ये येण्याच्या आधी त्यावर जबर सीमा शुल्क वसूल केला जाई. इंग्रजांच्या राजकारणाची पद्धतीवर देखील लेखकाने या निमित्ताने प्रकाश टाकला आहे. इंग्रजांनी अगदी पद्धतशीरपणे मिठाचा पुरवठ्यावर नियंत्रण मिळवले. सर्व-सामान्य जनता त्यापासून वंचित राहू लागली. त्यामुळे कित्येक जणांचा कुपोषणामुळे मृत्य झाल्याची सरकार दप्तरी नोंद असल्याचे त्याने शोधून काढले.

भारतातील वेगवेगळया भागात जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याचा लेखकाने प्रयत्न केला. तसेच त्याने  भारतातील National Remove Sensing Agency संस्थेच्या सहाय्याने remote sensing maps यांच्या आधारानेही ह्या ऐतिहासिक कुंपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, याची माहिती पुस्तकात मिळते.  पुस्तकात ह्या निमित्ताने त्याकाळचा इतिहास, ब्रिटिशांची राजकारणाची नीती, मिठाचा सत्याग्रह, यावर अतिशय चांगला प्रकाश पडला आहे. ह्या कुंपणाची त्याला दिसलेली सद्य परिस्थितीची काही छायाचित्रे समाविष्ट केली असती तर त्याचा खुपच उपयोग झाला असता.

Leave a comment