तोकोनामा-जपानच्या अंतरंगाची सैर

जपान! अतिपूर्वेकडील देश, उगवत्या सूर्याचा देश म्हणजे जपान. भारतातून गेलेल्या बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या लोकांचा देश. हिरोशिमा-नागासाकी अणुसंहारातून परत निर्माण झालेला देश. मोटार उत्पादन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्पादन क्षेत्रात प्रगत असलेला देश. भूकंपाचा देश, सुमो पहिलवान, जुडो-कराटे खेळांचा देश अशी सर्व आपलाला सर्व-सामान्य ओळख असते. हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटातुन सायोनारा, बुलेट ट्रेन वगैरे आपण ऐकलेले, पाहिलेले असते. जपानी संस्कृतीचे काही पैलू जसे ओरिगामी(origami), इकेबाना(ikebana), बोन्साय(bonsai), जपानी उद्यान-शैली(जसे पुण्यात पु. ल. देशपांडे उद्यान आहे), सुशी खाद्यपदार्थ वगैरे गोष्टी माहीत असतात. आजकाल साहित्य क्षेत्रात मुराकामी हे नाव गाजलेले आपण ऐकलेले असते, तसेच तोत्तोचान ह्या शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवलेल्या पुस्तकाचे नाव ऐकले असते, हायकू ह्या जपानी कवितेचा प्रकाराबद्दल ऐकले असते. औद्योगिक क्षेत्रात कायझेन ह्या उत्पादन-गुणवत्तेशी निगडीत प्रणाली बद्दलही ऐकले असते.  पण मराठी मध्ये जपान बद्दल अशी प्रसिद्ध प्रवास वर्णने जवळ जवळ नाहीतच. अपवाद, तोही पन्नास वर्षांपूर्वीचा, प्रभाकर पाध्ये यांनी लिहिलेल्या तोकोनामा यां पुस्तकाचा.

प्रभाकर पाध्ये हे प्रसिद्ध लेखक, समीक्षक आहेत. त्यांचे त्रिसुपर्ण नावाचे ३ लघुकथा असलेले पुस्तक मी  वाचले होते. इतर काही वाचले नाही अजून. त्यांची पत्नी कमल पाध्ये यांचे आत्मचरित्र बंध-अनुबंध प्रसिद्ध आहे. प्रभाकर पाध्ये १९५७ मध्ये जपान मध्ये पेन(PEN conference)परिषद संमेलनासाठी गेले होते. त्या भेटीदरम्यान ते जे हिंडले-फिरले त्याबद्दल त्यांनी ह्या, तोकोनामा ह्या पुस्तकात लिहिले आहे. हे पुस्तक रूढ अर्थाने प्रवासवर्णन नाही. तसेच त्यांनी काही जपान उभा-अडवा देखील पहिला नाही. अतिशय हळुवार ललित अंगाने, आणि आस्वादक पद्धतीने लिहिलेल्या ह्या पुस्तकात, जपानच्या अंतरंगाची आपल्याला ते सैर घडवून आणतात. तोकोनामा म्हणजे काय हे प्रभाकर पाध्ये यांनीच त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेले पुस्तकात सुरुवातीला दिले आहे. ते म्हणतात, ‘जपानी घरांच्या खोल्यांत निदान आगतस्वागताच्या खोलीत, कोनाकडे भिंतीला एखाद्या लांबरुंद कोनाड्यासारखा भासणारा, एक भाग असतो. त्यात खाली चौरंगावर अगर पाटावर एक पुष्पपात्र असते. पुष्पपात्राच्या मागे, भिंतीला, त्या त्या ऋतुला योग्य असे एखादे निसर्गचित्र अगर चित्ररूप काव्यचरण रंगवलेला असतो. त्या भागाला तोकोनामा म्हणतात’. पुस्तकातील रेखाचित्रे सुद्धा अतिशय सुरेख आहेत, त्यात काही छायाचित्रे देखील आहेत. त्यांच्या बरोबर भारतातून परिषदेला आलेले मादाम सोफिया वाडिया, उमाशंकर जोशी, हिंदी साहित्यिक सच्चिदानंद वात्सायन उर्फ अज्ञेय  इत्यादी होते.

पहिल्या दोन प्रकरणात ते अतामी(Atami) या Japanese Riviera म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्ग सुंदर ठिकाणाला भेट देतात. तेथे गरम पाण्याचे झरे(hot springs) आहेत आणि त्यामुळे ती पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. तिन्ही बाजूने डोंगर, एका बाजूला समुद्र असलेले हे ठिकाण मधूचंद्रासाठी प्रसिद्ध आहे आणि टोकियो पासून जवळ आहे. तेथील त्यांच्या एका Spa Resort मधील वास्तव्याचे रसिकतेने वर्णन केले आहे. गेल्या ४००-५०० वर्षांपासून spa town म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण, आता(म्हणजे १९५७ मध्ये) स्वैराचाराचे ठिकाण बनले आहे असे त्यांना दिसले.  अतामीमध्ये त्यांना दिसलेल्या चीडाच्या वृक्षाचे(twisted pine) देखील सुंदर वर्णन आले आहे. हॉटेल्स मध्ये पर्यटकांना किमोनो परिधान करण्यासाठी देण्यात येतो. तसा तो परिधान करून, पर्यटक रास्यांवरून फिरत होते असे ते लिहितात. नंतरच्या प्रकरणातून गिंझा(Ginza) ह्या टोकियोच्या shopping district चे वर्णन येते. पण पाध्ये shopping बद्दल जास्त न लिहिता तेथे असलेली पेयगृहे, कॉफीहाउस, dance bar यांचे वर्णनच अधिक करतात. पाश्चिमात्य देशातील अद्ययावत ठिकाणासारखे ते आहे असे त्यांना दिसले. फर्नांड गीगो(Fernand Gingon) या प्रसिद् लेखकाचा उल्लेख करून ते म्हणतात, गिंझा थोडेसे अमेरिका कारण तेथे उंच इमारती आहे, ब्रॉडवे आहे कारण तेथे करमणुकीसाठी अभिजात नाटकापासून, बेलज्ज नग्नदर्शनापर्यंतची सर्व सोय आहे, कॉफीहाउसवर असलेल्या फ्रेंच पाट्यांमुळे थोडेसे Paris आहे आणि ते थोडेसे व्हेनिस देखील आहे, कारण सुमिदा(Sumida) नदीचे कालवे येथे आहेत.

पुढच्या ‘संक्षिप्त गेशा’ प्रकरणातून, त्यांनी टोकियोच्या आरामगृहातून त्यांना गेशाची संक्षिप्त आवृत्ती भेटली होती, तिचे बहारदार वर्णन ते देतात. जपानची गेशा म्हणजे इहलोकीची अप्सरा, फरक एवढाचकी देवांचे मनोविनोदन न करता, मानवांचे करतात. जपानच्या वैशिष्ट्यांची त्रिपुटी म्हणजे गेशा, चेरी, आणि फुजी असे ते नमूद करतात. एके संध्याकाळी ते त्यांचा जपानी मित्रांबरोबर(फुकुझावा, यामाकिटा) गेशा-दर्शन, पाहुणचाराचा अनुभव ते घेतात. जपानी भाषा येत नसल्यामुळे, आणि मित्रांच्या मदतीने संभाषण करण्याची वेळ आल्यामुळे गेलेली मजा याची ते खंत ते व्यक्त करतात. किमोनोधारी गेशाच्या हातून साकेपान(साके हे जपानी मद्य आहे), सामीसेन ह्या जपानी तंतूवाद्याच्या साथीने नृत्य, तसेच जपानी खाद्यपदार्थांचा(सुकीयाकी) आस्वाद याचे ते रसभरीत वर्णन करतात. ‘आसाकुसा’ प्रकरणात ते टोकियोच्या आसाकुसा कान्नोन मंदिराची(Asakusa Kannon Buddhist Temple, Sensoji temple) सैर आपल्याला घडवतात. नंतर आसाकुसा मधील सामुराई तलवारबाजीच्या खेळ्याच्या नाट्यगृहाबाहेरील चित्रांचे वर्णन ते करतात(तो हा खेळ का पाहत नाहीत हे समजत नाही), पण नंतर लगेच आसाकुसामधील एका strip-tease खेळाच्या अनुभवाचे ते वर्णन करतात.

अतामीजवळ यावातानो(Yawatano) गावाच्या समुद्र किनारी गुहेत स्थित ग्रामदेवतेच्या जत्रेचे वर्णन ‘किनोमियाची जत्रा’ या लेखात त्यांनी केले आहे. जपानचा प्रवासात प्रसिद्ध अमेरिकी मानववंशशास्त्रज्ञ हर्बर्ट पसीन(Herbert Passin) त्यांच्यासोबत होते, जे त्यांना त्या यात्रेसंबंषित गोष्टी, मिथके त्यांना सांगत होते. त्यांना दिसलेल्या अनेक गोष्टी ते सांगत राहतात. उदा. त्यांना जपानी बुद्धीबळासारखा खेळ, ज्याचे नाव गो(Igo), खेळताना लोक त्यांना दिसले(ह्या खेळाचा आणि नुकत्याच आलेल्या Pokemon Go खेळाचा काही संबंध नाही!). जत्रेल्या मिरवणुकीतील गोष्टी, जसे, ऑक्टोपस प्राण्यांची सोंगे, जत्रेचे बोधचिन्ह असलेले जपानी लिपीतील अक्षरे असलेली सर्वत्र दिसणारी कांदिले याबद्दल ते लिहितात.मिकोशी या शिंटो-पंथीय मंदिराची प्रतिकृती, त्याच्या तोरीसहित(म्हणजे प्रवेशद्वाराच्या) त्यांना दिसते आणि ती सुंदर प्रतिकृती पाहून भान विसरतात. त्यानंतरच्या ‘बाधा’ लेखात यावातानो गावाच्या जवळ आलेल्या जपानी लोकातील अंधश्रद्धेसाख्या घटनेचे अनुभव ते नमूद करतात. जपानी लोकांचे फोटोग्राफीचे वेड सांगताना ते लिहितात की चीनी माणसाच्या डोळ्यावर चष्मा चढवला, आणि खांद्यावर क्यामेरा लटकवला की झाला जपानी माणूस.

टोकियोतील १९५७ मधील पेन-परिषदेची माहिती नंतरच्या लेखात येते. अनंत काणेकर सुद्धा त्यांच्या परदेश प्रवासात लंडनमध्ये पेन-परिषदेला उपस्थित होते. त्यानिमित्ताने त्यांना जपान मधील साहित्यिक वातावरणाबद्दल समजले. जगभरातून आलेल्या प्रसिद्ध लेखकांच्या भेटी-गाठी झाल्या. त्यांनी दिलेली यादी पाहिली तर आपल्याला हरखून गेल्यासारखे होईल. Stephen Spender, Angus Wilson, John Steinbeck, Alec Waugh, George Mikes वगैरे. त्याउपर, जपान मध्ये असलेला साहित्यिकांबद्दल आदर, आणि लोकप्रियता याचा त्यांना आलेला अनुभव.  ही परिषद टोकियो मधील Otemachi भागातील Sankei Hall मध्ये भरली होती. थोर जपानी साहित्यिक Yasunari Kawabata यांनी स्वागतपर भाषण केले. परिषदेत झालेल्या वाद-विवादांची त्यांनी दिलेली माहिती रोचक आहे. परिषदेस आलेले लोक, जीवाचा जपान करण्यासाठी चर्चासत्रे चुकवून कसे सटकत याची सुद्धा त्यांनी खुलेपणाने चर्चा केली आहे. या नंतर ते Kyoto मधील Shinkyogoku या बाजारात गेले असता, त्यांना आलेल्या भेटींच्या देवाण-घेवाणीसंदर्भात असलेल्या जपानी प्रथेच्या संदर्भात हृद्य अनुभवावर त्यांनी भेट’ या लेखात लिहिले आहे. जपानमधील प्रसिद् चंद्रोत्सवाबद्दलदेखील लिहिले आहे, पुढच्या लेखात लिहिले आहे. तेथे आलेले वेगवेगळे सुंदर अनुभव त्यांनी अतिशय तरलतेने रेखाटले आहेत. जपानी नृत्यप्रकार आकेबोनो(akebono), जपानी लिपीचे सुलेखन(calligraphy), तेथील चहापानाच्या ठिकाणांत म्हणजे चाया मधील अनुभव, जपानी खाद्यपदार्थ टेम्पुरा(tempura) खिलवणाऱ्या गेशा यांचे अनुभव येतात. पुढे ‘कात्सुरा बंगला’ या लेखात १७व्या शतकात उभारेलेल्या राजवाड्याच्या भेटीचे ते वर्णन करतात. हा राजवाडा क्योटो भागात आहे, आणि तोशिहितो या राजपुत्राने बांधले. जपानच्या सर्वात जास्त ऐशोआराम असलेल्या, १९व्या शतकात बांधलेले इम्पेरीअल हॉटेल मध्ये राहिले त्याबद्दल देखील त्यांनी लिहिले आहे.

त्यानंतर त्यांनी कियोटो(Kyoto) आणि टोकियो(Tokyo) या दोन्ही शहरांचे स्वतंत्र प्रकरणातून वर्णन केले आहे. ह्या दोन शहरातील फरक सांगताना ते लिहितात, टोकियोहून कियोटोला जाणे म्हणजे इतिहासात प्रवेश करण्यासारखे आहे, आणि गिंझा हे जर टोकियोचे प्रतिक असेल तर कियोटोचे प्रतिक आहे Gion, तसेच रस्त्यातल्या कर्कश गालाक्याने टोकियोचे कान किटतात, तर देवळातील मंत्रजागराने कियोटोचे कान ताजेतवाने होतात. कियोटोचा प्रवास त्यांनी ऐतिहासिक अशा Tokaido Road, जो East Sea Road म्हणून देखील ओळखला जातो. टोकियोत त्यांनी सुमो पहिलावानांची कुस्ती, आणि त्याआधी होणारे विधी-आचारांचे अवडंबर देखील पाहिले, त्याचे वर्णन त्यांनी केले आहे. तसेच ते कोराकु-एन या १७व्या शतकात सरदार मित्सुकुनी याने वसलेल्या उद्यानात गेले होते. तेथे त्यांना जपानी कवी सेग्योचे स्मारक उध्वस्त दिसले. बौद्ध मंदिर निशी होन्गाजी, देखील पहिले, पण त्याची रचना पाहून त्यांची निराशा झाली. टोकियोतील वैशिष्ट्यपूर्ण निहोम्बाशी(Nihonbashi) पूल, जेथे जपान मधील सर्व रस्ते सुरु होतात, म्हणजे त्यांची लांबी येथून मोजतात, तो पहिला. टोकियो मध्ये असलेला जपानचे संसद भवन The National Diet, तसेच जवळच असलेला जपानच्या सम्राटाचा आकासका राजवाडा पहिला, त्याचे खुमासदार वर्णन त्यांनी केले आहे.

सर्वात शेवटी त्यांनी चेरी बहराचा उत्सव(cherry blossom) जो जपान मध्ये वसंत ऋतूत होतो, त्याचे वर्णन ‘चेरीचा मोहोर’ या प्रकरणातून केले आहे. एप्रिल १९६१ मध्ये परत जपानला गेल्यानंतर त्यांना हा बहर पाहायला मिळाला. फुजी आणि हाकोनेचा चेरी बहराच्या सहली भरून गेल्या होत्या, त्यामुळे ते टोकियोच्याच उएनो पार्क(Ueno Park) मध्ये चेरी बहर पाहायला गेले असे ते लिहितात. तेथे यासुकुनी(Yasukuni Shinto Shrine) मंदिरात, त्याच्या समोर असलेल्या चेरीच्या फुललेल्या फांद्या, त्यावर गुलाबी, सफेत फुले, वर आणि खाली पायाशी पाहून ते मोहरून गेले. पण लगेच त्यांना असे वाटले की हे काही अगदी असामान्य नाही, कारण त्यांना भारतात गुलमोहोर, जाकारांडा यांचा मोहोरही अतिशय सुंदर असतो असे नमूद करतात. जपानी लोकं फक्त चेरीचा बहरच साजरा करतात असे नाही तर, जर्दाळू(apricot), plum blossom(विशेषतः जपानी चित्रकार ओगाटा कोरीनचा आवडता) असे ते लिहितात. त्यांना जपानी लोकांनी ह्या चेरी महोत्सवाला माहात्म्य प्राप्त करून दिले याची त्यांना कौतुक वाटते, आणि ह्यात, तसेच त्यांना इतर ठिकाणी जे काही दिसले त्यात निसर्गचमत्काराच्या पूजनाच्या भोवती सौदार्यांचे विधीविशेष करणे ह्या जपानी संस्कृतीचा विशेष वाटतो असे ते लिहितात.

तर असे हे पुस्तक. अतिशय समृद्ध करून जाणारे. जपान सारख्या देशाची, तेथील स्थळांची, लोकांची, त्यांच्या संस्कृतीचे निसर्गाशी असलेले अनुबंध याविषयी, प्रथांची, स्थित्यंतरांची माहिती मिळते, आणि आपण आपसूकच ५०-६० वर्षानंतरचे संदर्भ तपासायला लागतो. काही वर्षांपूर्वी मी एका कंपनीत वेगवेगळया भाषांत कंपनीचे सॉफ्टवेअर उत्पादन जपानी(आणि इतर काही भाषांतही) मध्ये आण्यासाठी मी जपान मधील एका अनुवादिकेबरोबर काम करत असे. आपण कसे नावामागे राव, साहेब असे वापरून संबोधतो, तिथल्या प्रथेप्रमाणे, तसे ती मला माझ्या नावापुढे सान असे जोडून संबोधन करत असे. पुणे आणि जपानचे नाते जुने आहे. जपानी शिकणारेही बरेच आहेत. पुण्यात अधून मधून जपानी संस्कृती दाखवणारे कार्यक्रम, प्रदर्शन वगैरे होत असतात. जपानला जायचे तर आहेच, पाहूया कसे जमते. नुकतेच जपानला आगामी, म्हणजे, २०२० मधील, ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद, तेही चौथ्या वेळेस बहाल करण्यात आले आहे. नाही म्हटले तरी तोही एक मुहूर्त आहेच.

आज हे सगळं लिहीत असताना योगायोगाने दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक तर जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्याच्या घटनेला ७० वर्षे झाली, आणि जपान मधील सांरो-डेन-सुकुनाहिकोना(Sanro Den Sukunahikona) येथील मंदिराचे वारसाजतन करण्यात आले आहे, आणि त्याची प्रशंसा युनेस्कोने केली आहे.

 

Leave a comment