नाट्यत्रयी वाडा चिरेबंदी, भाग#२

मी वाडा चिरेबंदी या नाट्यत्रयीच्या जगावेगळ्या अनवट अश्या नाट्यानुभावाविषयी बद्दल लिहितो आहे. पहिला भाग, जो वाडा चिरेबंदी या पहिल्या नाटकाबद्दल आहे, तो येथे वाचू शकता. हा दुसरा भाग हा ह्या नाट्यत्रयी मधील दुसरे नाटक ‘मग्न तळ्याकाठी’ यावर आहे. पहिले नाटक दुपारी १ वाजता सुरु झाले होते. ते संपेपर्यंत ४ वाजून गेले होते. आधीच्या नाटकात सुधीर आणि त्याची कोकणस्थ बायको परत मुंबईस गेले असतात, पण कित्येक प्रश्न अनुत्तरीत ठेऊन. भास्करच्या मुलाला, पराग, जो teenage turmoil म्हणतात तश्या अवस्थेतून जाणारा, सैरभैर झालेला, त्याला मुंबईला जायचे असते. पण सुधीर त्याला मनाई करतो, म्हणून तो खट्टू होऊन गेलेला असतो. आता पुढे काय काय होणार असा विचार करत, साधारण तासाभरानंतरच्या विश्रांती नंतर साधारण पाचच्या सुमारास, ‘मग्न तळ्याकाठी’च्या प्रयोगाला येऊन बसलो. मग्न तळ्याकाठी? म्हणजे काय? मग्न की भग्न? असे प्रश्न मनास सतावत होते.

पडदा उघडला जातो. जवळ जवळ दहा वर्षे ओसरलेली असतात, आता, तात्यांचे निधन होऊन. प्रथम दर्शनात, वाड्यात झालेले बदल नेपथ्याद्वारे दिसत आहेत. वाड्यात दिवे आले आहेत, चुन्याने सारवलेल्या भिंती जाऊन रंगाने रंगलेल्या भिंती दिसतात, लाकडी छप्पर तसेच आहे, महिरप, आणि खुंट अजून आहेत. काळाचे स्थित्यंतर दिसते आहे. भास्करने आता पन्नाशी ओलांडलेली आहे, पण त्याचा पोशाख पूर्वी होता तसाच आहे. लहानपणचा सैरभैर झालेला पराग, आता मोठा होऊन, कुसंगत, वाईट मार्गाला लागलेला असतो. चिन्मय मांडलेकर याने तो ह्या नाटकात साकारलेला आहे. त्याचा प्रवेशच टाळ्या आणि शिट्या घेऊन जातो. तात्यांच्या वयोवृद्ध आईचे निधन होऊन गेले आहे. सुधीर आणि त्याची बायको, आणि त्यांचा मुलगा अभय, गावी येतात. अभय शिकून अमेरिकेत राहून, काही काळासाठी भारतात परत आला आहे.  देशपांडे कुटुंबात, आता वाड्यात, पुढच्या पिढीत काय होणार आहे, हाच ह्या नाटकाचा मुख्य विषय असणार आहे हे उमजू लागते. चिरेबंदी वाडा आणखीन ढासळणार आहे, हे तर उघड आहे.

परागच्या काळ्या कृत्यांमुळे घरात(म्हणजे वाड्यात) पैसा येत असतो. पण त्याचे आणि वडिलांचे(म्हणजे भास्कर) पटत नाही. तसे पहिले तर अभय आणि सुधीर यांच्यातही दुरावा आहेच. अभयचे काम सिद्धार्थ चांदेकर याने केले आहे. परागचा आणि त्याची बहिण, नंदिनी, या दोघांचे विवाह एकाच दिवशी होणार असतात. त्यासाठीच सुधीर पती पत्नी आले असतात. पहिली नाटकात भास्करच्या तोंडी एक वाक्य आहे, ”निदान मरणाला तोरणाला आपण एकत्र यायला हवं’, हे अगदी वैशिष्ठ्यपूर्ण आहे. वाड्यावर शुभकार्य असते. तयारीची लगबग सुरु आहे. त्यातच अभय आणि पराग या दोन चुलत-भावंडात सुरुवातीला असलेला दुरावा, हळूहळू कमी होतो. लहानपणी गावातल्या तळ्यात पोहायला शिकल्याची रम्य आठवण त्या दोघात असते. आणि नंतर हेच तळे मग नाटकातील मुख्य पात्र बनते. नंदिनीचा विवाह होऊन ती सासरी जाते, आणि परागचा विवाह होऊन त्याची बायको अंजली वाड्यावर येते. तिच्यामुळे आणि अभयमुळे देखील परागच्या मनोवृत्तीत हळू हळू बदल व्हायला लागतो. पण पोलीसांच्या जाळ्यात पराग शेवटी अडकतोच, आणि त्याला अटक होते, तसेच अभयही परत अमेरिकेत त्याच्या संशोधनाच्या कामाकरिता निघून जातो. आणि नाटक संपते.

पराग आणि अभय यांच्यातील जवळीक, एकमेकांना समजून घेणे, सुख-दुःख सांगणे हे सर्व काही हलक्या फुलक्या प्रसंगातून दिसते. पण मध्येच हे तळे, आणि रात्री-अपरात्री त्याच्या काठी बसून गंभीर चर्चा, तत्वचिंतन म्हणजे जरा जास्तच होते असे मला वाटले. परागचे परिवर्तन हे त्याच्या बायकोने ज्या प्रकारे केले हेही थोडे अवास्तव वाटते. पहिल्या भागात जसे सुधीरच्या बायकोचे कोकणस्थ असणे हा प्रकार त्यांच्या मधील खटकेबाज संवादामधून अधून मधून हशा मिळवते, तसे ह्या भागात विदर्भाचे मागासलेपण, उर्वरित महाराष्ट्राने विदर्भावर केलेला अन्याय वगैरे गोष्टी प्रेक्षकांची वाहवा मिळवतात. कारण साहजिकच आहे. हा राजकारणाचा सर्वश्रुत विषय आहे. सुधीर जेव्हा मुंबईहून येतो आणि आल्यावर म्हणतो की येथील रस्ते किती खराब आहेत, पुण्या-मुंबईचे रस्ते कसे चांगले आहेत. त्याला उत्तर म्हणून, भास्कर म्हणतो की पुण्या-मुंबईचे रस्ते विदर्भाच्या पैशांवर बांधले गेले आहेत. पण सुधीर सारख्या मुंबईत राहणाऱ्या माणसाला आपल्या गावाकडची, वाड्याची ओढ, माणसांची ओढ कायम आहे. हेही खरेच आहे. आजकालच्या पिढीला हे अशक्य आहे, म्हणूनच की काय कृषीपर्यटन वगैरे सारख्या गोष्टी वाढीस लागल्या आहे की काय असे वाटू लागते.

image

आता थोडेसे गावातल्या तळ्याबद्दल. एका बाजूला दोन भावंडांच्या मनात ह्या तळ्याबद्दल स्मरणरंजन आहेच, हे खरे आहे. पण ते त्यांच्या चिंतनाचे एक ठिकाण म्हणून दाखवले आहे. दोघेही एकमेकांच्या जीवनातील सद्यपरिस्थिती बद्दल ह्या तळ्याकाठी विचारमंथन करतात(स्वतःमध्ये मग्न होतात, आत्मपरीक्षण करतात). एका अर्थाने हे तळे म्हणजे माणसाचे मन, आत्मा असे काहीसे प्रतीकात्मक सूचीत केले आहे असे वाटते. आपल्या मुलांच्या, नातवंडांची मानसिक अस्वस्था पाहून तात्यांची पत्नी त्यांना म्हणते की, ते तळे तुझ्यातच आहे, ते तळे म्हणजे तूच आहेस. त्यात डोकावून पहिले पाहिजे, म्हणजे प्रतिबिंब दिसेल.

पण एकुणात, हे नाटक, किंवा वाड्याचा पुढचा भाग पहिल्या भागासारखा प्रभावी मला वाटला नाही. धरणगावच्या देशपांडे कुटुंबातील पुढील पिढीच्या सदस्यांची आयुष्ये पुढे सरकली इतकेच. वाडा अजून विशेष काही ढासळला नाही, तो नक्कीच बदलला, काळाप्रमाणे, माणसे, त्यांच्या मनोवृत्ती नक्कीच बदलल्या. पण तो काळाचा महीमा म्हणावा लागेल. समाज व्यवस्थादेखील बदलली आहे-गावातील बारा बलुतेदार हे वाड्यावर काही कार्य असेल तर अचानक उगवतात, इतर वेळी ते नामशेष झाले आहेत, वाड्याची सनातन प्रतिष्ठा, मान ही गोष्ट हळूहळू कालबाह्य होते आहे, एकत्र कुटुंबाचे अनिवार्य विघटन सुरु झाले. हे त्या काळाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. आतापर्यंतच्या या दोन नाटकांच्या सलग अनुभवामुळे, एखादी महाकादंबरी वाचल्या सारखे वाटू लागले आहे. पुढे आता काय, यांचे तसे पहिले तर सुचन झाले आहे. नंदिनीच्या पोटात देशपांड्यांचा वंशज वाढतो आहे. पुढची पिढी येऊ घातली आहे. आता धरणगावात आणखीन काय होणार?

 

Leave a comment