रेडू

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटात नाविन्याची, वेगळे काहीतरी दाखवण्याची, वेगळे विषय हाताळण्याची सकारात्मक लाट आली आहे असेच म्हणावी लागेल. कथेला, कथनाला महत्व आले हे चांगले आहे, त्यामुळे इतर गोष्टी गौण ठरतात. केवळ कथेवर चित्रपट चालू शकतो. इतक्यातच न्यूड, सायकल, रेडू सारखे हटके चित्रपट आले. मी रेडू हा चित्रपट नुकताच पाहिला. त्याबद्दल येथे थोडेसे. न्यूडदेखील पाहिला, पण त्याबद्दल परत कधीतरी.

रेडू म्हणजे रेडियो ह्या शब्दाचे ग्रामीण रूप. खरेतर ह्या चित्रपटाची कथा १९७०-८० मधील एखाद्या लघुकथेला साजेशी अशी आहे. मुख्य पात्र अर्थात रेडियो यंत्र. साल १९७२. कोकणातील(मालवणातील असे म्हटले पाहिजे वास्तविक) हडे गावातील एका गरीब रोजंदारीवर कष्ट उपसत जगणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या माणसाला एकदा रेडियो कुणाकडे तरी दिसतो. आणि ह्याला ते आवाज करणारे, गाणी म्हणणारे यंत्र भावते. हा माणूस म्हणजे तातू जो साकारला आहे अभिनेता शशांक शेंडे याने, त्याची बायको म्हणजे छाया कदम(न्यूड फेम). तो त्या रेडियोसाठी वेडा होतो. अचानक एके दिवशी त्याला तसाच रेडियो भेट म्हणून मिळतो. तो हरखून जातो. त्याला गावात भाव येतो. त्याचे आणि त्या रेडियोचे एक जिवाभावाचे नाते निर्माण होते. काही दिवस मजेत जातात. पण एके दिवशी घरातून रेडू अचानक गायब होतो, चोरीला जातो. आणि मग तातूची तडफड, तगमग सुरु होते. आणि सुरु होतो शोधाचा प्रवास, आणि कथेला कलाटणी मिळते. मी पुढचे मुद्दामच सांगत नाही. पुढचे चित्रपट पाहूनच अनुभवायला हवे.

आता मोबाईल आणि इंटरनेट मुळे सारे जग जवळ आले आहे. गावागावातून लोकं ही सर्व उपकरणं वापरताना सर्रास दिसतात. खेडेगावातून वीज नसल्यामुळे दिवेदेखील नसत. पूर्वी जेव्हा रेडियोचे नाविन्य होते तेव्हा गावातून एखादाच रेडियो असे. सगळे गावकरी, घरातील तो ऐकण्यास जमा होत असत. माझ्या मामाकडे गावी असाच एक रेडियो असे. तो आम्ही मुलं आजोळी गेलो की त्याच्या मागेमागे भुणभुण करत तो ऐकत असू. ज्यांनी हे सर्व अनुभवले आहे त्यांना हा चित्रपट त्या काळात नेणारा आहे. एखाद्याचा रेडियोमध्ये जीव गुंतल्यावर काय होते याची गमतीदार आणि भावस्पर्शी अशी ही कथा आहे. चित्रपट येऊन दोन आठवडे झाले होते. चित्रपटगृहात मोजकीच टाळकी होती. मला खात्री आहे ती सर्व माझ्यासारखी रेडियो प्रेमीच असणार. माझ्याकडेही असेच रेडियोचे यंत्र आहे, मी आजही रेडियो ऐकतो. माझ्या रेडियो ऐकण्याच्या नादाबद्द्ल मी पूर्वी येथे लिहिले आहे. आजकाल बरेच जण रेडियो कारमध्ये ऐकत असतात. त्यामुळे तो अजून ह्या जमान्यात आहेच.

५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘रेडू’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. पार्श्वभूमीवर वाजणारे ‘देवाक काळजी’ हे गाणे मस्तच आहे. कोकणचा निसर्ग, गावातील एकूण वातावरण, तेथील घरे हे सर्व छान आले आहे. मी अशा ठिकाणी ट्रेकिंगच्या निमित्ताने बरेच फिरलो आहे. संथ गतीने, सहज, एकाच गावात घडणारी, सावकाश बेताबेताने उलगडणारी ही कथा पाहायला हवी. शशांकचा अभिनय देखील उत्तम. त्याचे एक नाटक पहिले होते खूप पूर्वी, मळभ नावाचे, तेही फर्ग्युसन कॉलेजच्या सभागृहात. त्यानंतर एक दोन अपवाद विशेष त्याचे काम पहिले नव्हते. सगळे संवाद हे कोकणी, मालवणी भाषेत आहेत, त्यामुळे आई माईवरून शिव्या न देता वाक्यच सुरु होत नाही. म्हणी देखील भरपूर, त्याही अगदी ठसकेबाज, उदाहरण द्यायचे झाल्यास, एक म्हण अशी येते, ज्याच्या मनात पाप, तेका पोरं होती आपोआप! चित्रपटाच्या अतिशय वेगळ्या शेवटामुळे हा रेडियोचा चित्रपट राहत नाही तो होतो त्या तातूचा, तो माणूस म्हणून एका निर्णायक क्षणी कसा वागला तो आशय महत्वाचा आहे.

जाताजाता एक गंमत सांगतो. चित्रपटाची सकाळी तिकिटे ऑनलाइन खरेदी करताना घराजवळील सिटी प्राईडमधील घेतली असे मला वाटले होते. पण तेथे गेल्यावर समजले की ती शहरातील दुसऱ्याच भागातील सिटी प्राईड मधील आहेत. का असा गोंधळ झाला, समजले नाही. रेडियो ऐकण्याच्या नादात तर असे झाले नाही! मग परत नव्याने तिकिटे घेतली, आधी घेतलेली तिकिटे रद्दबातल करता येणार नव्हती. त्यामुळे दुप्पट पैसे देऊन हा चित्रपट पाहिला.

Leave a comment