आगळ्या वेगळ्या जगात नेणारा ‘न्यूड’

गोव्यात गेल्यावर्षी(नोव्हेंबर २०१७) पार पडलेल्या International Film Festival of India(IFFI) एस् दुर्गा आणि न्यूड या दोन सिनेमांची जोरदार चर्चा होती. त्यांच्यावर अश्लील म्हणून शिक्के बसले. तेव्हापासूनच रवी जाधव यांचा मराठी सिनेमा न्यूड, जो अनोळखी जगाची कवाडं किलकिली करणारा असा सिनेमा म्हणून अधूनमधून विविध माध्यमांतून येत राहिले. शेवटी एप्रिल मध्ये तो प्रदर्शित झाला. आज जाऊ, उद्या जाऊ असे करत करत अर्धा मे महिना गेला. इतर चित्रपटांच्या भाऊगर्दीत हा अजूनही चालू होता. मी तो एकदाचा पाहिला. मी इस्मत चुगताई यांचे १९४० मधील अश्लील ठरवलेल्या पुस्तकाचे मराठी भाषांतर कविता महाजन यांनी केले वाचतो आहे. त्यात त्यांनी इस्मत चुगताई यांना झालेल्या त्रासाची कहाणी दिली आहे, ते वाचून रवी जाधव यांना झालेला त्रास काहीच नाही असे वाटतेय!

चित्रपटाचा विषय अर्थातच स्फोटक आहे, म्हणूनच तर एवढी उलथापालथ झाली. चित्रकला शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मानवी शरीर जसे दिसते तसे कागदावर उतरवण्याचे प्रशिक्षण देतात. त्यासाठी स्त्री, पुरुष मॉडेल्स हवी असतात जी नग्न रूपात ह्या विद्यार्थ्यांसमोर बसू शकतात. अश्याच एका स्त्री मॉडेलची जीवनगाथा म्हणजे ह्या चित्रपटाचा विषय. खरे तर चित्रपटातील हा विषय तसा मला नवीन नव्हता.  मुंबईच्या सतीश नाईक संपादित चिन्ह ह्या चित्रकला ह्या विषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नग्नता ह्या विशेषांकात त्याची सविस्तर चर्चा केली होती (२०१०-११ दिवाळी विशेषांक, चित्रातील नग्नता आणि मनातील). संगीत, चित्रकला, शिल्पकला, त्याचे उपयोजन, यांसारख्या कलांबद्दल, कलाकारांबद्दल आस्वादक रीतींनी, कलेच्या निर्मितीबाबत, कलाकारांकडून विशेष असे लिहिले जात नाही. अर्थात काही सन्मानीय अपवाद आहे. सतीश नाईक हे त्यातील एक. त्यांच्याबद्दल नंतर कधीतरी. प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा याची मुंबईतील(पण मुळची गोव्याची) स्त्री मॉडेल सुरंगा मुळगावकर प्रसिद्ध आहे.

तसे पहिले तर चित्रपट हा एका स्त्रीच्या(यमुना) अन्यायविरोधी संघर्षाची कहाणी आहे. ही स्त्री सकारली आहे ती कल्याणी मुळे हिने. कल्याणी मुळेला मी पूर्वी एका नाटकात पहिले होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एका खेडेगावातील, का तालुक्याच्या गावातील एका स्त्रीचा नवरा व्याभिचार करून तीला आणि त्याच्या मुलाला घर सोडून देण्यास भाग पाडतो. मराठी, आणि बरेक कन्नड संवाद ह्यांच्यात आहेत. मला मजा वाटली यामुळे, कारण मी कन्नडही जाणतो. मग ही स्त्री मुंबईला तिच्या नातेवाईकाकडे काहीतरी काम करून जगावे यासाठी येते. ही कोणी दूरची मावशी(अक्का) असते. ही साकारली आहे छाया कदम (हिचा अजून के छान सिनेमा रेडू देखील मी पाहिला) हिने. पण दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती असते. मुंबईत अतिशय गलिच्छ वस्तीत, गरिबीत, एका पत्र्याच्या घरात ते राहत असतात. बिनकामाचा नवरा पूर्वी मुंबईतील गिरिणी कामगार असावा असा उल्लेख येतो. मावशीच्या नोकरीवर घर चालत असते. नोकरी कसली तर मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स(मागील मुंबई भेटीत येथे जायचे राहूच गेले) मध्ये न्यूड मॉडेल म्हणून काम, पण वर वर सफाई कामगाराची नोकरी.

nude-marathi-film

यमुनेच्या पुढे उदरनिर्वाहाचा, मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आवासून उभा असतो. अक्केला ती नोकरी पाहायला सांगते. यमुनेला अक्केच्या व्यवसायाची माहिती समजल्यावर ही हादरते, तीला किळस वाटते. पण पुढे तीही तेच काम पत्कारते. ते ती कसे करते, मनाची कशी उलथापालथ होते, तिच्या मुलाला हे सर्व कळते का, हे सगळे चित्रपटातून पाहायला हवे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी या निमित्ताने हे अनोळखे जग आपल्यासमोर मांडले आहे. परिस्थितीमुळे संघर्ष करून जगण्यासाठी असाही मार्ग स्वीकारणाऱ्या न्यूड मॉडेल्स, प्रामुख्याने स्त्री मॉडेल्सची, जीवनगाथा मांडली आहे. कलाजगत या विषयाकडे कसे पाहते, त्यांचे विचार काय, सध्या परिस्थिती काय वगैरे गोष्टी थोड्याफार ओघाने येतात, पण तो चित्रपटाचा विषय नसल्यामुळे त्यावर भर नाही. पण अभिनेत्री छाया कदम आणि कल्याणी मुळे यांनी मात्र कमाल केली आहे. न्यूड मॉडेल्स म्हणून चित्र काढणाऱ्या मुलांच्या पुढे बसणे हे सगळे त्यांनी कसे केले असेल हे पाहून चकित व्हायला होते. चित्रपटात एकूणच सहजता आहे, ओढून ताणून काही आले असे वाटत नाही, किळसवाणे, विकृत असे देखील बिलकुल वाटत नाही, उलट चकितच व्हायला होते. हे श्रेय दिग्दर्शकाचेच असते.

nude-cinema

Poster of the cinema, courtesy Internet

न्यूड मॉडेल्स, आणि कलाशिक्षण ह्या विषयाच्या तश्या आणखीही काही बाजू आहेत. त्या सगळ्याच चित्रपटात येणे शक्य नाही. त्या सविस्तर अश्या वर उल्लेख केलेल्या विशेषांकात आल्या आहेत(त्याबद्दल लिहीन नंतर कधीतरी). अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा, वा इतर वस्तूचा गुण नसून, तो तसा आरोप करणाऱ्यांच्या मनाचा गुण आहे आहे असे विचारवंत आणि लैंगिकतज्ञ डॉ. एलिस म्हणतात. पण चित्रपटातच न्यूड मॉडेल्सच्या समर्थनार्थ एक वाक्य आले आहे की आपण जर कुत्री, मांजरी, आणि इतर प्राणी यांची चित्रे काढतो, तशी माणसांची देखील काढली तर काय हरकत आहे. हे थोडेसे बालिश आहे असे मला तरी वाटते. कलेच्या अभिव्यक्तीसाठी काही बंधन नसावे हे प्रमुख कारण त्याचे समर्थन करण्यासाठी पुरेसे आहे.

जाता जाता या बाबतचा एक वैयक्तिक अनुभव सांगतो. मी २००४ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भारतविद्या(MA in Indology) हा अभ्यासक्रम हौस, आवड म्हणून शिकत होतो. इतर विषयांच्या जोडीला, भारतीय चित्रकला, शिल्पकला, मुर्तीविज्ञान व त्याचा इतिहास यांसारखे  विषय असल्यामुळे बरेच जण कला क्षेत्रातील होते. त्यातील एकाने(जो पेशाने चित्रकार, शिल्पकार होता), ज्याच्याबरोबर चांगली मैत्री झाली होती, त्याने मला न्यूड मॉडेल म्हणून त्याच्यासमोर बसणार का असे विचारले होते. मीही अगदी तत्काळ उत्साहाच्या भरात त्याला होकार दिला होता. पण तो विषय पुढे निघाला नाही, का कोणास ठाऊक. नंतर त्या विषयाचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे मीही अर्थातच काढला नाही. पण माझी न्यूड मॉडेल बनण्याची संधी हुकली!

Leave a comment