Some Like It Hot

मी आजच माणूस साप्ताहिकातील चित्रपट विषयक लेखांचा संग्रह असलेला फ्लॅशब‌ॅक हे सतीश जकातदार संपादित पुस्तक वाचता वाचता एका लेखावर थांबलो. तो लेख होता जगप्रसिद्ध मादक सुंदरी पण अल्पायुषी अशी अभिनेत्री मेरिलिन मन्रो हिच्यावर, तिच्या शोकांतीकेवर. नुकताच मी तिचा एक सिनेमा पाहिला होता. विमानप्रवासात वेळ घालवण्याचा मार्ग म्हणजे सिनेमे पाहणे. विमानात पहिलेल्या काही सिनेमांबद्दल पूर्वी मी लिहिले आहे. आज त्या मेरिलिन मन्रोच्या सिनेमाबद्दल लिहायचे आहे. हा आहे  Some Like It Hot. विमानात कार्यक्रम चाळता चाळता हा सिनेमा नजरेस पडला. मी तिचा एकही सिनेमा या पूर्वी पाहिला नव्हता. त्यामुळे मी लगेच तो सुरु केला.

Merylin Manroe

Photo courtesy Marathi book titled Flashback Ed Satish Jakatdar

सिनेमा १९५८ मधील. तिचा दुर्दैवी मृत्यू १९६२ मधील(आत्महत्या केली असे म्हणतात), जिला आता पन्नास वर्षे होऊन गेली आहेत. आपल्याला माहिती असते की तिची अनेक प्रेम प्रकरणे होती/अनेक विवाह झाले होते, तीला मानसिक आजाराने ग्रासले होते. तिच्याबद्दल काहीतरी वाचले होते मी पूर्वी. तिचा तो प्रसिद्ध उडणाऱ्या झग्यातील फोटो देखील पाहिलेला असतो आपण (मी तिच्या या वेशातील लंडन मध्ये असलेल्या Madame Tussaud wax museum मधील मेणाच्या पुतळ्याबरोबर मी फोटो देखील काढला होता) . मी कुठेतरी असे वाचले होते की ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान तिच्या मानसिक आजाराने डोके वर काढले होते(त्याला झटके किंवा episodes म्हणतात, हे मी ह्या क्षेत्रात काम करतो यामुळे प्रत्यक्ष अनुभवले आहे) आणि वर आणखीन तीला दिवसही गेले होते. तिचा अभिनय हा काही विशेष नव्हताच कधी. ह्याही चित्रपटात काही विशेष अशी कामगिरी तिची झाली नाही, पण चित्रपट मनोरंजक होता, त्यात मेरिलिन मन्रोचे सौंदर्य, भोळेपणाकडे, निरागसते कडे झुकणारा तिचा एकूणच वावर(dumb sexy blonde असेच तीला म्हणत!) त्यामुळे दीड एक तास करमणूक झाली, आणि तिच्याच स्वप्नात नंतर मी विमानात झोपी गेलो!

Some Like It Hot

Some Like It Hot poster, courtesy Wiki

मेरिलिन मन्रोचे नाव या सिनेमात हे शुगर! तिने एका गायिकेचे काम यात केले आहे. तिचा all women band असतो शिकागो मध्ये. चित्रपट तसा त्याकाळच्या फार्सिकल पद्धतीचा, विनोदी प्रणयकथा असलेला. १९८०-९० मधील टिपिकल मराठी सिनेमे असत तसा. तर ही शुगर आणि तिच्या band मधील मैत्रीणी/सहकारी यांच्याबरोबर आगगाडीतून फ्लोरिडा येथे मायामी मध्ये कार्यक्रमासाठी निघतात. आणि दोन हिरो(अगदी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे टाइप) जे दोघेदेखील वादक असतात. काही कारणाने एका हॉटेलमध्ये गुंडांबरोबर हातापायी होऊन, पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते दोघे देखील ह्या आगगाडीत स्त्रीवेश घेऊन येतात. आणि मग सुरु होतो सगळा सावळा गोधळ.

हे दोघे हिरो तीला पटवण्याचा प्रयत्न करत असतात. पण मध्ये त्यांना आपण स्त्री वेश घेतला आहे याचा विसर पडत असतो. त्यामुळे खसखस पिकत जाते. तिच्याशी बोलता बोलता समजते की मायामी मध्ये शुगर ही कोणा मोठ्या श्रीमंत असामीबरोबर विवाह करायचे ठरवून आलेली असते. झाले. सगळे जण मायामी मध्ये येतात. मग दोन हिरोंपैकी एक जण तिच्यासोबत श्रीमंत असण्याचे नाटक करत तीला पटवण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरा, ती अजून स्त्रीवेशात असते, तिच्यावर मायामीमधील एक बडी असामी भाळते! म्हणजे पहा, आता कसा सगळा मामला एकमेकात गुंतला आहे ते!

पुढे हा सगळा गुंता सुटतोच, त्याशिवाय सिनेमा काही संपणार नाही, हो ना? मी काही सगळी स्टोरी सांगत बसत नाही, तुम्हाला पुढे काय होणार, कसा हा गुंता सुटणार हे समजले असेलच आता. नाही समजले तर पहा तो सिनेमा, आहे युट्युबवर येथे. सिनेमात भरपूर गाणी, संगीत आहे, कारण एकूणच संगीतमय अशी पार्श्वभूमी आहे त्यामुळे. सगळ्यांची कामे मस्तच झाली आहेत. मेरिलिन मन्रो, चित्रपट कृष्ण धवल असूनही, तर प्रत्येक फ्रेम मध्ये किती मस्त दिसते! सिनेमाचे नाव Some Like it Hot असे का? तर हा all women music band जो आहे, त्यांची jazz संगीत त्यांची विशेषता असते, त्यातही hot jazz नावाचा प्रकार. मेरिलिन मन्रोच्या आयुष्याशी एकूणच बरेच साम्य असावेसे वाटत राहते, हा सिनेमा पाहताना. हा सिनेमा म्हणे  तिच्या काही लोकप्रिय आणि प्रसिद्ध सिनेमांपैकी आहे म्हणे. अमेरिकेतील नाट्यपंढरी ब्रॉडवे वर हा सिनेमा आता संगीतमय(अर्थात!) अश्या नाट्यस्वरुपात अवतारतोय असे वाचले.

मेरिलिन मन्रोचे इतरही सिनेमे वेळ काढून पहिले पाहिजेत, तिच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडलेले एक मराठीत पुस्तक आहे, मीना देशपांडे यांचे, तेही वाचायला हवे, तिच्या आयुष्याची शोकांतिका, तिचा मानसिक आजार समजावून घेण्यासाठी. इंग्रीड बर्गमन या अजून एका तितक्याच सुंदर पण अतिशय जिवंत, सुंदर अभिनय करणाऱ्या, आणि विविध भूमिका केलेल्या अभिनेत्रीबद्दल बऱ्याच जणांनी, जसे कवी ग्रेस, लेखक जी ए कुलकर्णी, लिहून ठेवले आहे. तिचाही मी एकही सिनेमा पाहिला नाहीये. बघुयात कसे जमते!

 

 

 

Leave a comment