मंटो

दशकभरापूर्वी मी जेव्हा उर्दू लिपी आणि भाषा शिकत होतो, तेव्हा सआदत हसन मंटो या उर्दूतील प्रसिद्ध कथाकाराचे, आणि इतरही उर्दू लेखक जे परंपरावादी नव्हते, पुरोगामी होते, असे काही जण जसे इस्मत चुगताई वगैरे यांची नावे ऐकली होती. हे सगळे उर्दू साहित्यिक स्वातंत्र्यपूर्व काळात उदयास आले. स्वातंत्र्य, फाळणी, आणि नंतरची एकूण सामाजिक राजकीय परिस्थिती, आणि त्या काळातील मानवी भावभावनांची, अनुभवांची त्यांनी मुक्तपणे मांडणी त्यांच्या कथांतून करण्याचा प्रयत्न केला. मी काहींच्या कथा हिंदी, मराठी, तसेच उर्दूत देखील वाचल्या होत्या. त्या काळाच्या पुढे होत्या, त्या लेखकांवर अश्लीलतेचे आरोप झाले, कोर्ट-कचेऱ्या देखील झाल्या. मंटो देखील असाच. बेबंद, मनस्वी जीवन जगलेला, एकूणच जगण्यावर पराकोटीची वासना, आयुष्य पुरेपूर जागून घ्यावे हि मनात ईर्ष्या.

गेल्यावर्षी जेव्हा मंटोच्या जीवनावर एक हिंदी सिनेमा आला त्याबद्दल मला खूप उत्सुकता होती, त्याचे जीवनच तसे वादळी होते. पण त्यावेळी तो काही कारणाने पाहायला जमले नाही आणि एक हूरहूर लागून गेली होती. परवा नेटफ्लिक्स वर तो माझ्या पाहण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता दास हिने त्याची पटकथा लिहिली आहे तसेच तो तिने दिग्दर्शित देखील केला. मला तो आवडला. मंटोची भूमिका गुणी अभिनेता नवाजुद्दिन सिद्दकी याने केली आहे. तो ती भूमिका अक्षरशः जगाला आहे. पटकथेवर, त्याच्या संशोधनावर, मंटो यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून नंदिता दासने केलेला आहे. हा चित्रपट अर्थातच त्याच्या बालपणापासून सुरु होत नाही. तो होतो तेव्हा त्याचा विवाह होऊन, मुले देखील झालेली असतात. तो मुंबईत स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेस राहत असतो. हिंदी चित्रपटसृष्टीत काहीबाही काम करत असतो, कथादेखील लिहित असतो. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, फाळणीमुळे एकूणच देशातील वातावरण कलुषित झालेले असते. त्याच्या कथा ह्या सगळ्या स्थित्यंतराचा मागोवा घेतात असे म्हटले जाते. ते चित्रपटात देखील दिसते, तो कसा फाळणीमुळे अतिशय दुखीकष्टी झाला आहे हे दिसते. आणि त्यात सर्वातून जाताना, त्याला कोणास ठाऊक काय वाटते(बहुधा असुरक्षिततेची भावना बळावल्यामुळे), पण तो नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात, लाहोरला जाण्याचा निर्णय घेतो, आणि तेथूनच त्याची शोकांतिका सुरु होते. त्याच्या ठंडा गोश्त ह्या कथेवर खटला पाकिस्तानात भरला गेला, त्याचा त्याला अतिशय त्रास होतो.  खरे तर त्याच्यावर एकूण पाच खटले भरले गेले, आणि तोही अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढत राहिला.

त्याचे मुंबईतील जीवन, आणि नंतरचे लाहोर मधील जीवन यात जमीन अस्मानाचा फरक होता. मुंबईत तो अतिशय आनंदी, खेळकर होता असे दाखवले आहे. लाहोर मध्ये तो तिथल्या परिस्थितीमुळे निराशेच्या गर्तेत जातो, मुंबईची त्याला सतत आठवण येत असते. एकूणच चित्रपट दोन्ही गोष्टी प्रभावीपणे मांडतो. पुढे मंटोचा वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी त्याचा, व्यसनांमुळे(सिगारेट, दारू) दुर्दैवी मृत्यू होतो. चित्रपटातील इतर कलाकारानी देखील चांगले काम केले आहे. एक कथाकार म्हणून कसा होता, कसा विचार करायचा, त्याचे कुटुंब कसे होते, इतर कथाकारांसोबत काय संबंध होते(जसे इस्मत चुगताई आणि तो दोघे चांगले मित्र होते) वगैरे गोष्टी देखील चांगल्या तऱ्हेने पुढे आल्या आहेत.

मंटोच्या जीवनाबद्दल घेण्यास आणखीन एक स्त्रोत माझ्या नजरेस आला होता. तो म्हणजे प्रसिद्ध लेखक अंबरीश मिश्र यांचा त्याच्यावरील अतिशय भावतरल लेख. तो आहे ‘शुभ्र काही जीवघेणे’ या पुस्तकात. त्यात मिश्र यांनी विविध समकालीनांचा दाखला देत अनेक रोचक गोष्टी त्याच्याबद्दल सांगितल्या आहेत. १९४० च्या दशकातील मुंबईतील चित्रपटसृष्टीमध्ये असलेल्या वाव आणि त्या निमित्ताने आघाडलेले किस्से आणि गोष्टी त्याच्या स्वभावाचे दर्शन घडवतात.  रसिकांनी तो लेख जरूर वाचावा.

मला नुकतेच मंटो याच्या ललित लेखांचा संग्रंह असलेले एक पुस्तक मिळाले. हे लेख त्याने वेगवेगळ्या काळी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, मासिकातून लिहिले आहेत. आकार पटेल यांनी ते एकत्र करून इंग्रजीत त्या लेखांचे उर्दू मधून भाषांतर केले आहे. जे पुस्तक मला मिळाले, ते मराठी आहे, आणि त्याचे भाषांतर वंदना भागवत यांनी केले आहे. पुस्तकाचे नावही ‘मी का लिहितो?’ असे आहे. त्याच्या विचारांचा मागोवा, जसा वर उल्लेख केलेल्या चित्रपटातून घेता येतो, तसाच या पुस्तकातूनही घेता येतो. हे पुस्तक देखील मिळवून जरूर वाचा आणि चित्रपट देखील, पाहिला नसला तर पाहा.

काही वर्षांपूर्वी पुणे आकाशवाणी वरून मी का लिहितो या नावाची मालिका प्रसारित झाली होती, त्यात काही प्रसिद्ध मराठी लेखकांनी आपल्या लेखनाचा, सृजनाचा प्रवास सांगितला होता. त्याचे पुस्तक देखील येणार होते असे ऐकले होते. झाले आहे कि नाही माहित नाही. पण ह्या मंटोच्या पुस्तकात एका लेखात तो ते अतिशय खट्याळपणे ह्या प्रश्नाचे उत्तर देतो. तो कुठलाही मोठा लेखक कथाकार असल्याचा वाव आणत नाही. इतरही लेख अशाच धर्तीचे आहेत. मंटो एक माणूस म्हणून, त्याचे विचार समजून घेण्यास हे चांगले पुस्तक आहे. साधारण २५-२६ लेख त्यात आहेत. विविध विषय आहेत, एक चित्रपट परीक्षण देखील आहे(सैगल यांच्या जिंदगी या चित्रपटाचे). काही काही लेख तर अतिशय क्षुल्लक विषयांवर आहेत. तेही त्याने अतिशय खुमासदार शैलीत, तिरकस रीतीने लिहिले आहेत. काही लेख फाळणीच्या निमित्ताने प्रकट केलेले विचार आहेत. ते वाचताना मी गेल्या वर्षी फाळणी वर आधारित एक नाटक पहिल्याचे आठवले- जिस लाहौर न दैंख्या औ जम्या नई .आकार पटेल यांनी प्रत्येक लेखाच्या आधी एक अभ्यासपूर्ण नोंद देखील दिली आहे. त्याचा छान उपयोग काळ आणि इतर संदर्भ समजायला होतो. त्याचे मुंबई वर प्रेम होते, त्याला ते शहर आवडत असे. हे चित्रपटात तर दिसतेच, पण या पुस्तकात काही लेख मुंबईवर देखील आहेत, समकालीन मुंबई, फाळणीच्या वेळेची मुंबई समजायला मदत होते. त्यात त्याने चित्रपटसृष्टी बद्दलहि काही लेख आपल्या खुमासदार पद्धतीने लिहिले आहेत. मला वाटते, हे सर्व लेख मूळ उर्दू मध्येच वाचले तर त्याची मजा येईल.

इतक्यातच मी मंटोस्तान नावाचा त्याच्याच चार कथांवर आधारित चित्रपट पहिला, तो नक्कीच चांगला आहे.

थोडासा शोध घेता असे लक्षात आले कि, नरेंद्र मोहन यांनी लिहिलेल्या त्याच्या चरित्राचे मराठी भाषांतर देखील उपलब्ध आहे(खरे तर दोन वेगवेगळ्या भाषांतरकारांनी, प्रकाशकांनी ते आणले आहे). मंटो आणखीन जाणून घेण्यासाठी ती वाचायला हवीत. काही दिवसांपूर्वी वाचले होते प्रसिद्ध अभिनेता शेखर सुमन अभिनित मंटो वर एक हिंदी नाटक आले आहे. ते पुण्यात आले की मला पाहायला आवडेल.

Leave a comment