खूप लोक आहेत

दोनच आठवड्यापूर्वी मी पुण्यातून जुन्या पुस्तकांच्या रस्त्यावरच्या पुस्तकवाल्याकडून  श्याम मनोहर यांचे ‘खूप लोक आहेत’ हे पुस्तक घेतले. त्यांचे मी अजून पर्यंत एकही पुस्तक वाचले नव्हते. त्यांच्या काही पुस्तकाबद्दल मी वाचले होते, तसेच त्यांच्या पुस्तकंची शीर्षके ही हट के असतात, त्यामुळे उत्सुकतेपोटी मी ते पुस्तक खरे तर घेतले. त्याबद्दल थोडे लिहावे असा विचार केला. परवाच त्यांच्याबद्दल आणखी एक बातमी वाचली. ती म्हणजे त्यांना कर्नाटकातील एक पुरस्कार जाहीर झाला आहे. तो म्हणजे प्रख्यात कन्नड  कवी कुवेंपू(Kuvempu) यांच्या नावाने दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार. मला तर हा एक सुखद धक्काच होता. मी स्वतः एक अनुवादक असल्यामुळे, तेही कन्नड मधून मराठीत, त्यामुळे मराठी आणि कन्नड साहित्य विश्वातील देवाण-घेवाण याबद्दल मला रस आहेच. माझ्या अमीरबाई कर्नाटकी यांच्यावरच्या पुस्तकाच्या निमित्ताने माझा मूळ कन्नड लेखक रहिमत तरीकेरे यांचा घनिष्ट परिचय झाला. त्यांच्या नाथ संप्रदायाच्या संशोधनाच्या निमित्ताने त्यांनी मराठीतील जेष्ट्य संशोधक आणि लेखक रा. चिं. ढेरे यांच्या बरोबर केलेल्या चर्चा, तसेच त्यांनी ढेरेंचा हम्पी विद्यापीठात केलेला त्यांच्या सत्कार ह्या सर्व गोष्टी मला त्यांच्या कडून मला कळल्या. त्यामुळे श्याम मनोहरांना कुवेम्पू प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्या देवाणघेवाणीच्या परंपरेत आणखीन भर पडली असे वाटले. श्याम मनोहरांची बरीच पुस्तके कन्नड मध्येही अनुवादित झाली आहेत.

आता थोडे मी वाचलेल्या मनोहरांच्या ह्या पुस्तकाबद्दल. ही एक कादंबरी आहे. त्याचे वेगळेपण त्यांनी दिलेल्या अनुक्रमणिकेपासूनच सुरु होते. आता ही काही नमुन्यादाखल भागांची/प्रकरणांची शीर्षके पहा. ‘प्रणवच्या सातव्या वर्षी’, ‘सर्वज्ञ आणि रोमान्स’, ‘कश्शाचा उपयोग होत नाही’. ही वरवर कादंबरी आहे असे वाटते, पण ते लेखकाचे स्वतःचे असे मुक्त-चिंतनही आहे असे वाटत राहते. दोन मुख्य प्रश्नांचा ह्यात वेध घेण्यात आला आहे. धर्माची गरज का असावी किंवा का नसू नये, आणि दुसरा अध्यात्म म्हणजे काय किंवा सत्याचा शोध असा काही घेता येतो का. साधारणपणे पुस्तकाच्या अर्ध्या भागापर्यंत पहिल्या प्रश्नाचा, आणि उर्वरित भागात दुसऱ्या प्रश्नाचा उहापोह आहे. कादंबरीची शैली नक्कीच वेगळी आहे. मला तरी नेमाडे त्यात काधीतरी झाकताना दिसतात. छोटी छोटी वाक्ये, मध्येच कारण नसताना प्रमाणित भाषेतील शब्दांच्या ऐवजी ग्रामीण भाषेतील शब्द योजना, मध्येच मुक्त-चिंतन वजा निवेदन, अशी सारी सरमिसळ आहे. आपण हे काय वाचतोय असा प्रश्न पडावा इथपर्यंत ते डोक्यात जाते.

समाज कसा धर्म आणि अध्यात्म या विषयी आपापल्या परीने जगण्याचा प्रयत्न करतो हे दाखवले आहे. उदाहरणार्थ, विविध अध्यात्मिक गुरूंच्या संस्था आणि त्यांची कार्यपद्धती, तसेच रेकी सारख्या अतींद्रिय आणि उर्जा/शक्ती संबधी पद्धती याचे विवेचन आले आहे. ह्या निमित्ताने गाब्रिएल मार्केझच्या ‘फ्र्याग्रंस ऑफ ग्वावा’ ह्या पुस्तकाचाही संदर्भ येतो. पुस्तकात वेगवेगळया व्यक्तिरेखा येत राहतात, ते आपापल्या परीने ह्या प्रश्नांचा मागोवा घेत राहतात, आणि ह्या जगातून निघून जातात. मग लेखक आणखी दुसऱ्या व्यक्तिरेखा पुढे आणतो. पुस्तकात ‘लोक खूप आहेत’ असा दोनदा उल्लेख येतो. एका ठिकाणी ह्या वाक्याच्या आधी ‘वस्तू खूप आहेत’ असे वाक्य आहे. त्यामुळे ‘वस्तू खूप आहेत’ असेही ह्या पुस्तकाचे शीर्षक चालू शकले असते! गमतीचा भाग सोडा, पण ह्या वाक्याचा संदर्भ असा आहे की पुस्तकातील जे पत्र धर्माचा, सत्याचा शोध घेत असते, ते अचानक इहलोक सोडून जाते. त्यामुळे लेखक असे विधान करतो की जगात अजून बरेच लोक आहे हा शोध घ्यायला.तेही बरोबरच आहे म्हणा…प्रत्येक जण आपापल्या परीने हा शोध घेतच असतो, किवा निदान असा शोध घ्यावा. पुस्तकाच्या शेवटच्या भागात अशाच एका अनवट शीर्षक असलेल्या प्रकरणात (‘आठवण: आईच्या संतापाचे काय करायचे?’), लेखक व्यक्तिरेखेच्या शोधासाठी थेट कैरोत जातो. तेथेही परत मार्केझचा उल्लेख येतो.

मला वाटते पुस्तकाचा अर्क हा शेवटच्या भागातील शेवटून तिसऱ्या प्रकरणात आहे. ते प्रकरण सरळ सरळ लेखकाचे चिंतन आहे. पुस्तकाचा शेवट लेखक स्वतच सर्व व्यक्तिरेखांचा परत परामर्श घेतो आणि अजून कोणत्या व्यक्तिरेखा त्यात येवू शकल्या असत्या याची चर्चा करतो, आणि पुस्तक संपते(किंवा संपवले जाते असेच म्हणावे लागेल)

पुस्तकात धर्माबद्दल, अध्यात्माबद्द्ल, एकूण जीवनाबद्दल इंटरेस्टिंग वाक्ये आली आहेत:

अध्यात्म हे पर्फोर्मिंग आर्ट आहे, अध्यात्म म्हणजे अज्ञाताची मेंदूत कायम जाणीव, मराठी फिक्शनने सत्याचा शोध घेतलाच नाही.

एके ठिकाणी षडरिपुबद्दल चर्चा आहे. त्यात असे म्हटले आहे:

काम->पर्मिसीव सोसायटी, क्रोध->रिवोल्ट, मद->सत्तास्पर्धा->लोकशाही, मोह->भांडवलशाही(की जाहिरातशाही), लोभ->व्यापार, मत्सर->स्पर्धा

तसेच बऱ्याच ठिकाणी प्रचलित माहिती, शास्त्रीय माहिती अथवा सरकारी रिपोर्ट्सचे तपशील, कथानकाशी काहीही अर्थाअर्थी संबंध नसताना येतात. उदाहरणार्थ, एका प्रकरणात संबंधित व्यक्तिरेखा रस्ते अपघातात मरण पावते. मग त्यानंतर भार्तातातील रस्ते अपघाताबद्दल चर्चा. काही वर्षापूर्वी मी इंटरनेटवर भारतातील वाहतूक व्यवस्थेची खिल्ली उडवणारी माहिती वाचली होती. ती पुस्तकात तशीच्या तशी दिलेली आहे. मूळ लेखाचा उल्लेख त्यात आहे, पण तो लेख देण्याचे प्रयोजन काय?

तर असे हे पुस्तक आणि असा हा लेखक. साधारणतः अशी शैली असलेली पुस्तके अनुवादासाठी कठीण असतात. माझी ह्या लेखकाच्या इतर पुस्तकाबद्दल उत्सुकता वाढली आहे. जाता जाता, अजून एक माहिती, त्यांच्या अजून एका पुस्तकाचे नाव आहे ‘उत्सुकतेने मी पुन्हा झोपलो’ आणि त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे!